त्यावेळी आम्ही कोल्हापूरात नागराज गल्लीमध्ये राह्त होतो, मंडळाचा सुकाळ व माझा नवीन पोपट हा इत्यादी गाणी अजून तयार झाली नव्हती त्याच्या आधीची गोष्ट.
लहानपणापासून मला विविध देवदेवतांचे जरा खासं आकर्षण होते, त्यांची चित्रविचित्र नावे, त्यांची वाहने, त्यांच्या अफाट अश्या विविध स्तरावरील निसर्गाला आपल्या ताब्यात ठेवणार्या शक्ती याचे मला अप्रुप होते. पण हे सगळे जाणत्या वयानंतर.. जेव्हा मला काही समजत देखील नसे तेव्हा पासून गणपती या देवतेच्या खूप प्रेमात आहे. वयाच्या दुसर्या वर्षी माझ्या हट्टामुळे आमच्या देवार्हात पितळी गणपती विराजमान झाले व वयाच्या सातव्या वर्षी याच हट्टापायी ५ दिवसाच्या शाडूच्या मुर्तीचे आगमन आमच्या घरी झाले. हे सर्व लिहताना सोपं वाटत आहे, पण कट्टर जातिय वातावरण असलेल्या जैन कुटुंबात घडलेले हे दोन ह्ट्ट म्हणजे दोन पिढ्यातील अंतर शेकडो पिढ्यांनी वाढवण्यास हातभार लावण्यासारखं होते.
माझ्या दोन्ही आजोळी कर्मठ असे धार्मिक वातावरण होते. पहाटे पहाटे चा बस्तीमधील मुर्तीवरील पचांभिषेक असो किंवा दोन्ही वेळचा व्हासा असो, कांदा, लसूण लांबची गोष्ट साधी भुईमुगाची शेगदाणे खाण्यात देखील पाप असते असे बिंबवलेले गेलेले लहानपण होते माझे. दोन्ही जेवणाच्या वेळा सुर्यांने ठरवलेल्या, तो उगवला म्हणजे सकाळचे जेवण व तो मावळणार म्हणजे त्याआधी संध्याकाळचे जेवण. सकाळचे मुर्तीदर्शन अगदी शारिरिक गरज असल्याप्रमाणे ठरलेलेच असे त्यात चूक नाही. व मुर्तीदर्शन म्हणजे दिसला देव ठोकला नमस्कार असे नाही, पाचवेळा णमोकार मंत्र पठन, त्यानंतर दर्शनमात्रे, त्यानंतर परत सोयीनुसार ११,२१,५१ पटीत णमोकार मंत्र. मग अक्षतांचे स्वस्तिक व त्याची पुजा, व हे सगळे मांडी घालून, नाही नाही साधी नाही योगी-मुनी घालतात ती "हे राम" पद्धतीने किंवा मग आजकाल रामदेव बाबा घालतात त्या पद्धतीने. हे सगळे झाल्यावर चंदन तिलक, आधी चंदन घासा, मग कपाळावर एक टिळा, कानाच्या दोन्ही पाळीवर टिळा, स्वरयंत्राच्या थोडे खाली टिळा लावणे, बरं हे फक्त लावणे नाही तर, शास्त्रोक्त पद्धतीने लावणे!
अश्या घराण्यात जैनोत्तर देवतेची प्राणप्रतिष्ठापणा, विनोद नाही महाराज! पण एकुलता येक कुलदिपक, घराण्याचा दिवा, घराण्याचे वैभव व प्रतिष्ठा वाढवण्यासाठी व गतवैभव घराण्याला परत मिळवून देण्यासाठी जे या तलावर आले आहेत त्यांची इच्छा का मोडा... इति आजोबा. आजोबा एवढे बोलले पण घराण्याला सुतकीकळा आली होती याची मी पैज लावण्यास आजपण तयार आहे. (सर्वांसमोर झुरळ खाण्यापासून ते जगात जे जे खाण्यायोग्य आहे ते खाण्यासाठीच असते, हे माझे विचार ऐकण्यासाठी ते या ईहलोकी राहिले नाहीत नाही तर घराण्यावर मी काय दिवे ओवाळले आहेत हे पाहूनच त्यांना मोक्षप्राप्ती झाली असती )
नागराज गल्ली मधील आमच्या दोन खोल्यातील घरात जेथे आधीच आम्ही चार लोक राहत होतो, दोन फुल्ल, दोन हाफ! त्यात एक गणपती महाराज घेऊन येणे हे नक्की करण्यासाठी मला आधी आठवडाभर आई-बाबांची मनधारणी ते वेळोवेळी भोकांड पसरणे इत्यादी हातखंडे वापरावे लागले, मागून सहकार्य अक्का नियमित देत होती, मी रडायला चालू करायचा आवकाश ती आपणे रडगाणे जोरात चालु करायची. शेवटी कसेबसे बाबा तयार झाले व मग मात्र आमच्या घरात आनंदाचे अगदी भरतेच आले. गणपतीचे बुकिंग इत्यादी असली थेरं चालु झाली नव्हती, पण बाबांकडून चार कपडे उधारीवर घेऊन जाणार्या कुभांर गल्लीतील एका कुंभाराला बाबा एक गणपती हवा एवढे सांगून आले. जैनाच्या घरात गणपती घरी कोठे मांडायचा या पासून ते काय काय करायचे याची चर्चा पुर्ण नागराज गल्ली मध्ये चालू होती. त्यावेळी नागराज गल्लीमध्ये नाभिक समाज विपुल संख्येने राहत होता व ते सांगतील तशी मांडणी व सजावट चालू होती. घर मालकिन बाई माने यांनी मोदक करण्याची जबाबदारी घेतली होती व बालगोपाल मंडळी गणपतीच्या आरतीची तयारी करत होते व माझा नवीन शर्ट, चड्डी व डोक्यावर एक गांधी टोपी जाधव काकांची घालून, हातात पुजेची घंटा घेऊन सकाळ पासून तयार उभा होतो. एक च्या सुमारास जेव्हा बाबा जेवण्यासाठी घरी आले तेव्हा आम्ही सगळे गणपती घेऊन येण्यासाठी निघालो....
कुभार गल्लीमध्ये नुसती जत्रा भरली होती. सगळे मोरया मोरयाचा गजर, व चेहर्यावर प्रत्येकाच्या हास्य! समोरचा कोणी हातात गणपतीचे ताट घेऊन आला तरी गणपती बप्पा मोरया!!! चा गजर होत असे. ज्यांच्याकडे आमचा गणपती होता तेथे गेल्यावर बाबांनी मला पुढे केले व म्हणाले, राज्या, तुझा देव तुच निवड व तुलाच येतून घरी घेऊन जायचा आहे, ते पाहून निवड. एकापेक्षा एक सुंदर गणपती समोर दिसत होते, कोणी हत्तीवर, कोणी मोरावर, कोणी सिंहासनावर.... पण मला भावलेला गणपती हा एका उंदरावर होता व मला तो खूपच आवडला होता. बाल-गणपती उंदरावर विराजमान होते, मी माझा होकार कळवला. बाबांनी पटकन त्यावर रुमाल घातला व म्हणाले " हे, गणपती आता आमच्या घरी येतील." त्यावेळी मुर्तीवर किंमतीचा बिल्ला, लेबल लटकत नसे. समोरचा जो मनाने देई त्यातच कुंभार काका आनंद मानत असे, बाबांनी हाती पैसे देऊ केले तर ते कुंभार काका यांनी ते पैसे मुर्तीला स्पर्श केले व बाबांच्या खिश्यात परत ठेवले. ते काही तरी बोलले पण बाबांनी त्यांना हलकेच थोपटले व मी इकडे ताट उचलल्या उचलल्या कुंभार काका जोरात ओरडले.... गणपती बप्पा... व आम्ही जोरात म्हणालो.... मोरया!
------------
आंणि हा आमच्या घरचा या वर्षीचा गणपतीबाप्पा!
प्रतिक्रिया
12 Sep 2013 - 8:51 am | यशोधरा
:)
12 Sep 2013 - 8:53 am | प्रचेतस
मस्त रे राजे. छान लिहिलंस.
12 Sep 2013 - 9:05 am | पैसा
सुरेख लिहिलंस! तुझ्या गावच्या सगळ्या आठवणी म्हणजे अगदी खास जिवाभावाच्या असतात. इतका लहान असताना घरात नवी प्रथा सुरू केलीस म्हणजे 'मुलाचे पाय पाळण्यात' तेव्हाच दिसले होते म्हणायचे!!
12 Sep 2013 - 10:33 am | दशानन
खिक!
पण खरे तर अवघड असते.. अश्या बाबतीत मन वळवणे.
12 Sep 2013 - 10:47 am | चाणक्य
तुम्हाला. सोपं नसणार नक्कीच,
तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांनाही.
12 Sep 2013 - 10:52 am | विटेकर
आवडले !
" त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला ..." असे बी कविनी म्ह्णून ठेवले आहे.
तेव्हा अशी बंद्खोर वृत्तीच समाज पुढे नेत असते !
12 Sep 2013 - 2:01 pm | सस्नेह
गणपती हे दैवत जाती जमातींच्या भेदापलीकडे आहे अन सर्वांच्या हृदयावर साम्राज्य करणारे.
12 Sep 2013 - 2:43 pm | बॅटमॅन
कशा मस्त आवडली!!!!! छानच लिहिले आहे.
12 Sep 2013 - 5:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त लेख आणि तो लिहिण्याची शैलीसुद्धा !
मागून सहकार्य अक्का नियमित देत होती, मी रडायला चालू करायचा आवकाश ती आपणे रडगाणे जोरात चालु करायची.
हा सक्रीय पाठींबा लै आवडला !!13 Sep 2013 - 10:25 pm | दशानन
धन्यवाद काका :)
12 Sep 2013 - 10:03 pm | मोदक
मस्त रे!!!
12 Sep 2013 - 10:13 pm | किसन शिंदे
फार सुंदर लिहलंय रे राजे. लेख आवडला.
12 Sep 2013 - 10:34 pm | प्यारे१
राजे छान रे. लेख मस्तच.
साला पोरामंदी गट्स हाय. साला समदा उलटसुलटा करते पन दिलचा चांगला हाय डिक्रा.
13 Sep 2013 - 10:26 pm | दशानन
>>साला समदा उलटसुलटा करते
मुळतः हे आमचे अवतारकार्यच मुळी आहे ;)
17 Sep 2013 - 6:21 am | स्पंदना
जोरदार अनुमोदन!!
12 Sep 2013 - 11:02 pm | जोशी 'ले'
छान लिहलय....
13 Sep 2013 - 12:29 am | विजुभाऊ
राज्या साल्या इतकं छान लिहीलं आहेस. मस्त. लेखणीत मजा आहे .
13 Sep 2013 - 12:42 am | अग्निकोल्हा
एकदा डेमो द्याच. बाकि लेख खुस्खुषित अन त्यातला प्रसंग तर... क्या केहेना :) _/\_
13 Sep 2013 - 9:53 am | सामान्य वाचक
...
13 Sep 2013 - 10:07 am | दशानन
अहो तो किस्सा अफाट आहे =))
असेच कुठल्याश्या सणादिवशी की काय कोण जाणे, सगळे पाहूणे एकत्र झाले होते. सगळे आनंदात गप्पा इत्यादी मारत होते, मी नुकताच रांगू लागलो होतो कींवा फार फार तर पाऊले टाकू लागलो होतो. त्या सगळ्या घोळक्यात मला मध्ये घेऊन सगळे माझ्या "बाललिला" पाहण्यात दंग होते व त्यानंतर मी चमत्कार केला... समोरुन एक लहान झुरळ तुरु तुरु पळत इकडून तिकडे जात होते, मी त्याला पकडण्यासाठी झेपावलो... सगळे खळखळून हसले पण मी सगळ्यांकडे दुर्लक्ष करुन सरळ त्या झुरळाचा ताबा घेतला व सरळ तोंडात टाकले!
सगळे अवाक!!!! मावश्या व मामांच्या तर जवळ पास दातखीळी बसली व आजोबा डोळे जवळपास...... ;)
आई धावत पुढे येऊन तोंडात बोट घालून झुरळ शोधू लागली.. हाती शुन्य लागले, झुरळाची आहुती पडली होती.
त्यानंतर जो हंगामा झाला होत लिहण्यासारखा आहे, पुढे कधीतरी यावर एक लेख लिहीन.
17 Sep 2013 - 6:23 am | स्पंदना
:))
13 Sep 2013 - 6:29 am | आदूबाळ
दशानन साहेब, अतिशय सुंदर लेख!
13 Sep 2013 - 9:52 am | सामान्य वाचक
छान लिहिले आहे
13 Sep 2013 - 10:03 am | झकासराव
चांगलं लिहिलं आहेस रे. :)
13 Sep 2013 - 11:09 pm | मुक्त विहारि
झक्कास...
14 Sep 2013 - 10:27 pm | दशानन
सर्व वाचकांचे व प्रतिसाद देण्यार्या सदस्यांचे आभार :)
15 Sep 2013 - 1:21 am | अत्रुप्त आत्मा
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त!
15 Sep 2013 - 12:42 pm | स्वाती दिनेश
छान लिहिले आहे राजे,
स्वाती
15 Sep 2013 - 2:02 pm | अभ्या..
लैच भारी लिहता राव तुम्ही.
धन्यवाद राजे.
17 Sep 2013 - 12:49 am | अर्धवटराव
गणारायाशी तुमची दोस्ती दिवसेंदिवस अशीच वृद्धींगत होवो.
(मागील अवतारी तुम्ही बापास पटवले, यंदा चिरंजीवांशी दोस्ती केलीत... न्यु जनरेशन म्हणतात ते हेच :) )
17 Sep 2013 - 6:25 am | स्पंदना
बाप रे!
घरातले तयार कसे काय झाले देव जाणे. तशी बाप्पाची भुरळ सकळीकांना पडतेच पडते, पण रुढे मोडुन अस काही करणं म्हणजे तुम्ही अगदी धन्यच आहात.
17 Sep 2013 - 10:32 pm | दशानन
असे रस्ता सोडून धावता धावता मागे काय काय सोडले याचा हिशोब एकदा मांडायला हवा मला, या रुढी मोडण्याच्या नादात खूप काही हवे हवेसे वाटणारे मागे मागे सोडत देखील आलो आहे मी..