मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे

शरद's picture
शरद in विशेष
10 Sep 2013 - 8:37 am
श्रीगणेश लेखमाला २०१३

मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे ?

"गीतरामायणा"तील सर्वात उत्कृष्ठ गीत कोणते? बरेच जण बरीच निरनिराळी गीते सांगतील. पण हे ठरवावयास आपण त्या दर्जाचे परिक्षक आहो तरी कां? तेव्हा प्रश्न थोडासा बदलू. तुम्हाला सर्वात जास्त आवडणारे गीत कोणते? आता ठीक. कॊणीही उत्तर देण्यास हरकत नाही. तुम्ही तुमचे मत द्याच. माझी पसंती वरील गाण्यास. पतीने त्याग केल्याच्या बातमीची वीज कोसळ्यावर सीतेने जा धीरगंभीरतेने लक्ष्मणाला निरोप दिला आहे तो तिच्या आईचा, धरतीचा, वारसा सांगणारा आहे. सगळा दोष श्रीरामावर लादण्यास वाव असतांना ती केवळ एकदा तसे म्हणावयास सुरवात करते व लगेच थांबते. तिला मनोमन माहित असते की राम हा पती व नृपती आहे व त्याचे प्रथम कर्तव्य नृपतीचे आहे. ती आपल्या नशिबाला दोष देते. महर्षी वाल्मिकीने काय लिहले ते बघितले तर असे दिसते की तेथील सीता रामाला अजिबात दोष देत नाही...

सुरवात होते ती तिने लक्ष्मणाला विचारलेल्या प्रश्नाने. पतीने सोडल्यानंतर जावयाचे कुठे ? अरण्य हा काही मुद्दा नव्हता. पंधरा वर्षांपूर्वी तिने स्वेच्छेनेच ते स्विकारले होते. पण तिचा आक्रोश आहे तो आता पतिचरण दिसणार नाहीत याचा. पुढील काही कडवी हिंदीत ज्याला ’उलटबाणी" म्हणतात त्या प्रकारची आहेत. एकामागून एक विरोधाभास तिच्या वाणीतून बाहेर पडत आहे.

करुणाघन राशव कठोर झाला हे तिला पटतच नाहीये. ती म्हणते, "अरुणोदय झाला म्हणजे काळोखाचा अंत होतो पण आज तर काळोखानेच अरुणाला गिळले, पाण्याने अग्नी विझावयाच्या ऐवजी अग्नीच जिंकला." वर उल्लेखलेला कठोरपणा येथे अग्नीशी चपखळ जुळतो.

पुढील कडव्यात ती स्वतास दोष देत आहे. आर्य स्त्रीची धारणा

स्वकुलतारक सुता सुवरा वरूनी वाढवी वंश वनिता !
सुखविला नच जनक, न माता ऐशी कांता नरकरता !!

ती प्रकट करते व म्हणते आज झळाळत्या सोन्याला तांबे म्हटले जात आहे !

लंकेत तिने अग्नीत उडी मारल्यावर तिला वर काढून अग्नी म्हणाला होता

"एषा ते राम वैदेही पापमस्यां न विद्यते" हे रामा, ही तुझी सीता, हिचे ठिकाणी दोषाचा संपर्क नाही.
पण आज माझा त्याग झाल्याने बिचारा अग्नी मात्र असत्यवक्ता ठरला. या कडव्यातील अनुप्रासही मनोवेधक आहे.
लंकेत तिने न घाबरतां अग्नीत उडी मारली होता. आज समोर गंगा आहे, इथे ती श्रीभागिरथी म्हणते, रघुवंशातील भगिरथाची कन्या, म्हणजे तिच्याच घराण्यातील, ती तर सीतेला बोलावतच आहे, पण तरीही अंतिम क्षण कां अडखळतो आहे? तिच्या दृष्टीने सीतेचे जीवन संपलेच आहे पण ती आई आहे व कुलदीपकाकरितां जगणे तिला भाग आहे. पुढच्या कडव्यात कडवटपणा आहे कां?

राजा सुखांत नांदो राजा असे म्हणतांना तसे वाटते खरे. पण मला वाटते जेव्हा सीता राम न म्हणता राघव, रघुवर, रघुनाथ म्हणते तेव्हा तिच्यासमोर पती राम नसतो तर रघुवंशातला राजा असतो, त्याची कर्तव्ये तिला माहीत असतात; दिलीपाने एका गायीकरिता आपले प्राणही द्यावयाची तयारे दाखवली होती, तिच्या पतीने प्राणापेक्षाही प्रिय असलेली पत्नी त्यागण्याची कृती केली होती.पुढच्या कडव्यात ती ते बोलून दाखवावयास सुरवात करतेही पण तिचे प्रेम ते बोलूनही देत नाही. स्वत:चे बोलणे तिला बाणासारखे खुपू लागते.

भावजींना परत जाण्याची परवांगी देण्याची वेळ आली होती. दु:खार्त लक्ष्मणाचे हाल तिलाही पहावत नव्हते. तिने रीतीनुसार प्रथम तीन सासवांना वंदन, मग राजाला प्रणाम व दीराला आशिर्वाद दिला. बोलण्यासारखे काही उरलेच नव्हते !

सीतात्यागाबद्दल आज आपणास तिच्यावरील अन्यायाची चीड येते. मग सीतेने तसे कां दाखवलेले नाही? प्रथम लक्षात घ्या. तिचे रामावरील संपूर्ण समर्पित प्रेम. तिला जाणिव आहे की रामाचे आपल्यावर तेवढेच प्रेम आहे. एकरूप झालेल्या या दोघांना दुसर्‍याला दोष देण्याची गरजच नव्हती. श्रीरामाने पुढील आयुष्यात सुखोपभोगांचा त्याग केला, अयोध्येत वनवास भोगला व यज्ञाच्या वेळीही दुसरे लग्न न करता सीतेचा सोन्याचा पुतळा शेजारी बसवला. आपण कसले त्यांचे मुल्यमापन करणार? असला त्याग करण्याची क्षमता असलेली स्त्रीच भारतातील कोट्यावधी महिलांची शेकडो वर्षे "आदर्श" होवू शकते

पण आज मला महाकवी कालीदासाने रघुवंशात काय वर्णन केले आहे त्याकडे आपले लक्ष वेधावयाचे आहे. चौदाव्या सर्गातील आठ-दहा श्लोक वाचनीय आहेत त्याचे भाषांतर मी करणे हा गाढवपणाच होईल. कालीदास व गदिमा एकच प्रसंग कसा रंगवतात हे पाहणे मोठे मौजेचे आहे. दोघांच्या मध्ये काही शतकांचा कालावधी गेला असला व एक उत्तर भारतातील व दुसरा महाराष्ट्रातील असला तरी दोघांचीही सीता मात्र एकच आहे. अखेरचा निरोप देतांनाही प्रथम सासूबाईंना नमस्कार, पतीला प्रणाम, दीराला आशिर्वाद, संस्कृतचा कोणी जाणकार तेवढे भाषांतर येथे देण्याची कृपा करेल काय?

मित्रहो, आजच्या लेखाचा उद्देश या साम्याकडे आपले लक्ष वेधणे एवढाच आहे. या दोघाही कवींना म. वाल्मिकींच्या व्यक्तीरेखेत आपली अक्कल चालवून बदल करावा असे वाटले नाही. कर्णावरील पुस्तकाच्या आवृत्यांमागून आवृत्या निघत असतांना याचे महत्व ध्यानात राहिले पाहिजे.

शरद

---------------

मज सांग लक्ष्मणा जाउं कुठें
मज सांग लक्ष्मणा, जाउं कुठें?
पतिचरण पुन्हां मी पाहूं कुठें?

कठोर झाली जेथें करुणा
गिळी तमिस्‍त्रा जेथे अरुणा
पावक जिंके जेथें वरुणा
जें शाश्वत त्याचा देंठ तुटे

व्यर्थ शिणविलें माता जनका
मी नच जाया, नवे कन्यका
निकषच मानीं कासें कनका
सिद्धीच तपाला आज विटे

अग्‍नी ठरला असत्यवक्‍ता
नास्तिक ठरवी देवच भक्‍ता
पतिव्रता मी तरि परित्यक्‍ता
पदतळी धरेला कंप सुटे

प्राण तनुंतून उडूं पाहती
अवयव कां मग भार वाहती?
बाहतसे मज श्रीभागिरथी
अडखळें अंतिचा विपळ कुठें?

सरले जीवन, सरली सीता
पुनर्जात मी आतां माता
जगेन रघुकुल-दीपाकरितां
फल धरीं रूप हें, सुमन मिटें

वनांत विजनी मरुभूमीवर
वाढवीन मी हा वंशांकुर
सुखांत नांदो राजा रघुवर
जानकी जनांतुन आज उठे

जाइ देवरा, नगरा मागुती
शरसे माझे स्वर मज रुपती
पती न राघव, केवळ नृपती
बोलतां पुन्हा ही जीभ थटे

इथुन वंदिते मी मातांना
प्रणाम पोचवी रघुनाथांना
आशिर्वच तुज घे जातांना
आणखी ओठिं ना शब्द फुटे

श्रीराम.. श्रीराम.. श्रीराम..

प्रतिक्रिया

पैसा's picture

10 Sep 2013 - 9:23 am | पैसा

एका सुंदर गाण्याचा सुंदर परिचय. मी हे गाणं लताबाईंच्या आवाजात अगदी मूर्तिमंत आर्तता या स्वरूपात ऐकलं आहे. ऐकणं असह्य व्हावं इतकं. पण जालावर कुठे लिंक मिळत नाही. कुणाकडे असेल तर जरूर द्या.

प्रचेतस's picture

10 Sep 2013 - 9:25 am | प्रचेतस

पण सुधीर फडक्यांच्या आवाजातले त्याहीपेक्षा सुंदर वाटते.
बाकी शरद सरांचा लेख नेहमीप्रमाणे उत्तमच.

अत्रन्गि पाउस's picture

10 Sep 2013 - 5:16 pm | अत्रन्गि पाउस
पैसा's picture

10 Sep 2013 - 6:45 pm | पैसा

धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!!!

मुक्त विहारि's picture

10 Sep 2013 - 12:56 pm | मुक्त विहारि

मस्त

सुरेख...

कवितानागेश's picture

10 Sep 2013 - 3:55 pm | कवितानागेश

नेहमीप्रमाणेच सुंदर लेख. :)

अर्धवटराव's picture

10 Sep 2013 - 11:09 pm | अर्धवटराव

कारुण्याची आणि नियतीच्या कठोरतेची परिसीमा एकसाथ कुठे पहायला मिळत असेल तर ते सीतेचं चरित्रं.

गीतरामायण अप्रतिमच. काकांचा लेख देखील.
मात्र वाल्मिकी रामायणात असा काही उल्लेख नाही म्हणे! (नाना चेंगटनं दुसर्‍या एका आयडीनं असं लिहीलेलं ब्वा.)

आशु जोग's picture

11 Sep 2013 - 5:04 pm | आशु जोग

लिहीलेलं ब्वा
ही मराठी कुठली ?
लिहिलं होतं असं म्हणायचय का !

कुणाला कुणाला वाक्याचा अर्थ कळालेला नाहीये? कृपया हात वर करा!

'ब्वा' हे बुवा चं मिपारुप आहे. मिपावर बरेच ठिकाणी वापरलं जातं.
'लिहीलेलं' मध्ये काय अडचण आहे? ओके. अडचण आहे म्हणता?
लिहीलं होतं म्हणतो. :)
भावना पोचणे हे महत्त्वाचं काम. ते झालं की झालं असा समज होता. असो. बदलीन. :)

अनिरुद्ध प's picture

11 Sep 2013 - 1:59 pm | अनिरुद्ध प

अप्रतिम.