नरनाळा किल्ला आणि अभयारण्य पदभ्रमंती

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in भटकंती
1 Sep 2013 - 2:24 pm

YHAI अकोला युनिट च्या आग्रहाच्या निमंत्रणाला प्रतिसाद देऊन YHAI अंबरनाथ चे २४ आणि YHAI गुजरात चे ३ सदस्य यांची रेल्वे आरक्षणे November च्या अखेरीस निश्चित झाली.आमचा १ सदस्य आदित्य काही कामासाठी बुलढाण्याला गेला होता." इकडे विदर्भात पाऊस पडतोय" असा निरोप त्याने संध्याकाळी फोन करून दिला." हवामानातील बदलांचे भान कायम बाळगणे आणि अद्ययावत माहिती आपल्या सहकार्यांना देणे, हि आदर्श ट्रेकर ची लक्षणे" आदित्य काही या ट्रेक ला येणार नव्हता पण आपल्या मित्रांना त्रास नको म्हणून वेळात वेळ काढून त्याने हि माहिती दिली. हो , ना करताकरता आम्ही १९ जण २२ फेब्रूवारी ला रात्री ०८.४० ला कल्याण स्थानकात जमलो . मुंबई नागपूर गाडी वेळेवर कल्याण स्थानकात दाखल झाली. YHAI अमरावती युनिट ची सदस्या प्राची सुद्धा या ट्रेक ला यायची होती. प्राचीनेच आंम्हाला नरनाळा किल्याची ओळख चिखलदरा पद भ्रमंती च्या वेळेस करून दिली होती. wildlife and environment conservation society चा १ कार्यक्रम (नैसर्गीक साधनांपासून रंग तयार करणे आणि त्यांचा उपयोग याची प्रात्यक्षिके ) अमरावतीत याच दरम्यान सुरु होता त्यातील सक्रिय सहभागामुळे खूप इछ्या असूनही येऊ शकत नाही असा निरोप तिने दिला.
२३ च्या सकाळी ०६.१५ ला आम्ही अकोला स्थानकात उतरलो . YHAI अकोला चे देवेंद्र ( राजा ), ललित, राजू , आणि उदय आमच्या स्वागतासाठी हजर होते. गाडीतून उतरल्यावर अमृतपानाचा (चहा ) कार्यक्रम अकोला स्थानकात पार पडला. स्थानका बाहेर एका अशोका ? च्या झाडाला हिरव्या रंगाची खूप फुले लगडलेली दिसली. हे झाड दिसले कि मला डॉक्टर श्रीश क्षीरसागर यांच्या "बहर " मधील १ लांबलचक पण महत्वपुंर्ण वाक्य आठवते "श्वेतगुलाबी फुलांच्या रेन ट्री ला गफलतीने शिरीष समजलं जात, जांभळ्या फुलांचा कांचन बेशक आपटा म्हणून खपवला जातो ,छोट्यामोठ्या तळी तलावात सापडणाऱ्या water लिली कमळ म्हणून सर्रास विकल्या-विकत घेतल्या जातात ,सयामी केशिया व पेल्टोफोरम मध्ये फुलांच्या पिवळे पणा मुळे नेहमीच घोटाळा केला जातो ,आणि या सगळ्यांवर कडी म्हणून उंच सरळ सॉट वाढणाऱ्या MAST TREE च झाड चक्क अशोक म्हणून आपल्याकडे ओळखलं जात .तर असे हे मास्ट tree कालच्या पावसाने सुस्नात होऊन फुलांच्या आणि पानाच्या हिरव्या रंगातील दोन छटा मुळे सकाळच्या सुर्य प्रकाशात चमकत होते. स्थानकाच्या बाहेरील धाब्यावर कचोरी ,खमण आणि सांबार वडी असा नाश्ता आमची वाट पहात होता. यातील सांबार वडी स्पेशल होती . नाष्टा करून चहा साठी आम्ही दुसऱ्या टपरी कडे वळलो . आम्हाला घेऊन जाणारी बस येथूनच सुटणार होती . चविष्ट चहा बरोबर टपरी वाला आणि एका माणसाचे वैदर्भीय हिंदीतील भांडण फ्री मध्ये ऐकायला मिळाले. देवेंद्र , ललित , राजू आमच्या बरोबर येतील तर मी तुम्हाला उदया भेटेन असे उदय यांनी सांगितले. कालच्या पावसा मुळे हवा आल्हाददायक आहे, त्यामुळे उन्हाचा चटका तूम्हाला लागणार नाही असा दिलासा देऊन उदय नि आमचा निरोप घेतला . आता आमचा बस प्रवास दूतर्फा शेती असलेल्या रस्त्यावरून सुरु झाला. बहुतेक शेतां मध्ये कापसाची लागवड दिसत होती. काही शेतात गहू हि दिसत होता. रस्त्याकडेला बाभळीची झाडे आणि त्यावर अनेक पक्षी होते अरे हा बघ कोतवाल ,हा tree pie , हा morning dove हा बुलबुल हा खंड्या हा बंड्या असं म्हणे म्हणे पर्यंत ते उडून जात होते. सारखी सारखी मान वळवायचा व्यायाम होत होता शेवटी मी आता फक्त झाडे/शेती पहायची असे ठरवले. काही जण देवेंद्र (राजा) यांच्या कॅमेरयातील पक्षांचे फोटो पाहण्यात आणि त्यांची माहिती ऐकण्यात गर्क झाले. देवेंद्र कडून या परिसराची माहिती ऐकणे हा एक छान अनुभव आहे.
साधारण १० वाजता आम्ही आकोली-अकोलखेड येथे पोहोचलो .शेगाव च्या गजानन महाराजांनी आपल्या अध्यात्मिक सामर्थ्याने "सजल" केलेली विहीर या ठिकाणी आहे.वहीरीला भरपूर पाणी आहे. रहाटाने पाणी शेंद्ण्याची मजा काही जणांनी लुटली. भाविकांनी पाणी भरून ती बाटली वेगळी ठेवली . परिसरात खूप वृक्ष आहेत त्यामुळे खूप पवित्र वाटले. स्वच्छता गृहाच्या सुधारणेला भरपूर वाव आहे. दर्शन वगैरे आटोपल्यावर आम्ही पुन्हा बस मध्ये परतलो.थोड्याच वेळात शहानुर या गावात एका डेरेदार चिंचेच्या झाडाखाली बस थांबली.
शहानुर गावात ७०/७५ उंबरठा आहे घरे रस्त्याच्या दूतर्फा १ सारखी आहेत. पा.पू योजना कार्यान्वित आहे . वीज ,डांबरी सडक,शाळा आहे. कोरकू लोकांची वस्ती आहे "कोरु याचा अर्थ माणूस, कोरकू याचा अर्थ माणसे असा होतो."इति मराठी विश्वकोश. असो."नरनाळा वन्यजीव अभयारण्य,वन्य जीव विभाग अकोट आपले सहर्ष स्वागत करीत आहे "अशी कमानदार पाटी असलेल्या प्रवेशद्वारातून आम्ही अभयारण्यात प्रवेश केला. जंगलात फिरताना पाळावयाचे नियम/ पथ्ये यांचे फलक आकर्षक पद्धतीने जोगोजागी लावले होते. पण खरे स्वागत केले ते पक्षांच्या किलबिलाटाने. कार्यालयात आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करून आम्हाला दिलेल्या शयनकक्षाकडे निघालो, तो पळसाच्या वृक्षाने पुष्पवर्षाव करीत आमचे स्वागत केले. पूर्ण बहरलेल्या पळसाने खालची फरशी सुद्धा केशरी केली होती. या अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी निवास ,भोजन अरण्य सहल हि कामे Eco Developement Comitte मार्फत केली जातात. स्थानिकांना रोजगार देण्याचा उद्देश या मूळे साध्य झाला आहे. अभयारण्यात आढळणाऱ्या सजीवांची सुंदर छायाचित्रे, कोरकू लोकजीवन व संस्कृती यांची माहिती असलेले प्रदर्शन पाहण्यासारखे आहे. अकोला YHAI चे देवेंद्र तेलकर हे महाराष्ट्र शासनाचे मानद वनसंरकक्षक आहेत.स्थानिक रहिवासी , शासकीय कर्मचारी ,EDC यांच्यामध्ये सलोखा राखून ते पर्यावरण रक्षण, लोकशिकक्षणाचे काम निस्वार्थ वृतीने करत आहेत.
अभयारण्यातील निवास व्यवस्था उत्तम होती. तिचा लाभ घेत आम्ही सर्वजण पुढील कार्यक्रमासाठी तयार झालो.कल्याण हून निघाल्यापासून RG म्हणजे रमेश कुलकर्णी आमचे नेता होते यापुढील भागासाठी अकोला युनिट चे राजू नेतृत्व करणार होते.त्यांनी इशारा करताच परिसरातील झोपाळ्यांवर बसलेले , पक्षांच्या मागे धावणारें , शेजारील शेतातील घाटे (हरभरे) पळवू इच्छिणारे सर्वजण सभागृहाकडे धावले.
राजू यांनी पुढील कार्यक्रम सांगितला. जेवण तयार होईपर्यंत पुन्हा बागडायची संधी आहे,हे समजताच लहान मुलांप्रमाणे जो तो आपल्या मागील उद्योगात रमला. आपण लहान आहोत हे समजण्यासाठीच तर निसर्गात जायचे असते. दुपारच्या भोजनात हिरव्या मिरची च्या ठेच्याने खरी रंगत आणली, जेवण तर छान होतेच पण त्याही पेक्षा छान होता तो आजूबाजूचा परिसर.
बरोब्बर ३ वाजता अरण्य भ्रमंती साठी निघालो, उन होते पण वाऱ्या मुळे फारसे जाणवत नव्हते, हा पानगळीचा मोसम असल्याने झाडांच्या वेगवेगळ्या आकारांचे एरवी न दिसणारे रूप उठून दिसत होते, या जंगलात साग, पळस, सालई, टेंभूरणी,चारोळी,शिमट ईत्यादी वृक्ष मुबलक आहेत. झाडांवर पर्णसंभार नसल्याने पक्षी सहज दिसत होते. इतक्यात कुणीतरी तोडावर बोट ठेऊन गप्प राह्ण्याची खुण करू लागले,समोर पाहतो तो एक लांब लचक काळाभोर साप एका ढोलीत तोंड खुपसत होता.बाजूला एक पोपट केकाटत होता.आम्ही स्तब्ध होऊन हे दृश्य पहात राहिलो. आमच्या अस्तित्वाची दखल न घेता सापाची पोटपूजा सुरूच होती.त्या पोपटाच्या केविलवाण्या ओरडण्याने नेहमी प्रमाणेच मला एक गजल आठवली."कोई ये कह्दे गुलशन गुलशन लाखो बलाए एक नशेमन "(नशेमन=घरटे )बेगम अख्तर आणि तो पोपट यांच्या स्वरातील कारूण्य मनाला अस्वस्थ करून गेले.
वाटेत वनविभागाने प्राण्यांसाठी केलेले कृत्रिम जलसाठे दिसत होते. वेगवेगळ्या प्रकारची विष्ठा,पावलांचे ठसे यावरून तो प्राणी कसा ओळखायचा याची माहिती देवेंद्र सांगत होता.एखादे पुस्तक वाचावे तसे देवेद्र हे जंगल वाचतो आहे असा मला भास होत होता.साधारण दीड तासाच्या भ्रमंती नंतर आम्ही "पालधऱी" या ठिकाणी पोहोचलो. येथे वन रक्षकांची राहण्याची व्यवस्था आहे , बाजूला एक मचाण आहे. उद्या ज्या किल्ल्याला भेट द्यायची होती त्याचे एक टोक समोर दूरवर दिसत होते. हौशी मंडळींनी मचाणावर बसून फोटु काढले. ग्रुप फोटो काढला. वन रक्षकांचे आभार मानून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.
मुक्कामी आल्यावर अकोला युनिट ने १९९८ साली केलेल्या "अकोला ते khardung la pass bike expidition" ची ध्वनिचित्रफीत पाहिली तसेच उद्या ज्या नरनाळा किल्यावर जायचे होते त्याची हि ध्वनिचित्रफीत पाहिली. तत्कालीन जिल्हाधिकारी श्रिकर परदेशी यांच्या प्रेरणेने अकोल्यातील निसर्ग प्रेमींनी केलेल्या अनमोल कार्याचा पुरावा म्हणजे ही ध्वनिचित्रफीत.एक उत्तम प्रशासक जनतेच्या सहभागातून किती उत्तम कार्य करू शकतो याचे हे उत्तम उदाहरण
रात्री, हातावर थापून केलेली चुलीवरची भाकरी, झुणका,आणि आमचा नेता राजू भागवत याने स्वतः केलेले वांग्याचे भरीत असा फक्कड मेनू होता.जोडीला हिरव्या मिरचीचा ठेचा is must.राजूच्या वागण्या ,बोलण्यात वैदर्भीय आदरातिथ्य कायम जाणवते. ट्रेकर हा उत्तम खवय्या असतो आणि खिलवण्यात हि त्याला आनंद मिळतो. राजू च्या चेहऱ्यावर तो ओसंडून वहात होता ते आम्हाला सोलर लाईट च्या मंद प्रकाशात ही स्पष्ट दिसत होते.
"रात्री एकट्याने बाहेर पडू नका जरी कुंपण भक्कम असले तरी साप इत्यादी प्राण्यांचे भय असतेच" अशी सुचना राजू ,ललित ,देवेंद्रने दिली अर्थात कोणाला बाहेर येण्याची गरज नव्हती आणि देवेंद्रने दाखवलेले कम्पाऊण्ड जवळच्या निलगिरीच्या झाडावरील अस्वलाच्या नखांचे ठसे सर्वांच्याच लक्षात होते. त्यमुळे कडी कोयंडे निट लावून आम्ही सर्वजण शांतपणे झोपलो . उद्या नरनाळा किल्ला पाहायला सकाळी सात ला तयार राहणे आवश्यक होते.

वाहनांचे,कुकरच्या शिटीचे,आणि इतर अनेक मानव निर्मित आवाज ऐकत जागे होण्याची सवय असलेल्या सर्वाना आज जाग आली ती पक्षी गायनाने. त्यांच्या साथीला होता भन्नाट रान वारा.जसे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक तरी मिसळ किंवा वडापाव यासाठी प्रसिद्ध ठीकाण असते तसे आमच्या शयनकक्षा जवळ असलेले पळसाचे झाड बहुधा असावे. कारण आसपासची इतर पळसाची झाडे सोडून बरेच पक्षी त्याच झाडावर न्याहरी साठी जमले होते.मटकीची उसळ दही आणि पाव असा नाष्टा करून नरनाळा दर्शनासाठी निघालो. राजूने YHAI च्या शिस्ती प्रमाणे ०६ ला बेड टी मिळेल असे सांगितले होते पण दूध वेळेवर उपलब्ध न झाल्याने चहा आणि त्या पाठोपाठ नाष्टा झाला. अर्थात या बद्दल कुरकुर करणारा कोणीही तेथे नव्हता. सर्व ट्रेकर होते टूरिस्ट कोणीही नव्हता.'आम्ही दमड्या मोजल्यात चिंचोके नाही " असले काही झाले नाही. राजू ,देवेंद्र, ललित, यांनी पुन्हा एकदा जंगलात फिरताना पाळावयाचे नियम/पथ्ये यांची उजळणी घेतली. राजू चा एक मित्र आणि फोटोग्राफर अभय देशमुख आणि EDC चे गाईड रामलाल गवते हेही आज आमच्या बरोबर असणार होते. अर्थात देवेंद्र असताना वेगळ्या गाईड ची गरज नव्हती पण स्थानिकांना रोजगार व शिक्षण या धोरणानुसार देवेंद्र ने रामलाल ना बरोबर घेतले होते. वाटेत ठिकठिकाणी या जंगलात आढळणारे प्राणी,पक्षी यांची माहिती असलेले फलक होते
.देवेंद्र जंगल वाचत होता आम्ही श्रवण करत होतो, साधारण १ तासाच्या हलक्या चढाई नंतर आम्ही जाफराबाद point पाशी पोहोचलो. नरनाळा,तेलिया आणि जाफराबाद असे तीन जोड किल्ले या परिसरात आहेत. पूर्वेकडचा जाफराबाद,मधला मोठा भाग म्हणजे नरनाळा आणि पश्चीमदिशेला तेलीया , या point वरून जाफराबाद किल्ला अगदी स्पष्ट दिसतो. जाफराबाद किल्ल्यावर प्रवेश करायला बंदी आहे वन्यजीवांसाठी तो राखीव ठेवलेला आहे. थोडे फोटो चेष्टा विनोद इत्यादी करून तेथून निघालो आणि २०/२५ मिनिटात नरनाळा किल्ल्याच्या "शहानुर " दरवाज्या पाशी पोहोचलो. या किल्ल्याला सहा मोठे आणि बावीस छोटे दरवाजे आहेत.उंची समुद्रसपाटी पासून ३१०० फुट आहे किल्याचा परीघ २४ मैल तर ३९२ एकर जमिनीवर त्याचा विस्तार आहे.किल्यावर २२ तलाव असून ६ तलावांना वर्षभर पाणी असते. जसजसे आम्ही किल्ला बघत पुढे जात होतो तसतसे देवेंद्र खुलत होता. एखाद्या गायकाची मैफल रंगणे जसे श्रोत्यांच्या संख्येपेक्षा दर्जा वर अवलंबून असते तसे रसिक व चौकस श्रोते मिळाल्यामुळे देवेंद्र,राजू,ललित,अभय या सर्वाना आलेला हुरूप तांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. हि सर्व माहिती मराठीतून सांगणे सुरु होते पण त्यामुळे आमच्या गुर्जर बांधवांची (मेहताजी ,अमरसिभाई आणि जीत ) होणारी कुचंबणा लक्षात येताच राजूने त्यांना हिंदीत माहिती द्यायला सुरुवात केली. मी हि त्यात सामील झालो कारण मला काल चहाच्या टपरीवर ऐकलेले वैदर्भीय हिंदी मिरीचीच्या ठेच्या इतकेच आवडले होते.थोड्याच वेळात देवेंद्रने एकाठिकाणी आम्हा सर्वाना थांबवले आणि थोडा इतिहास सांगितला. आणि ........... चला आत या किल्याचे खरे वैभव पाहायला असे म्हणून तो बाजूला होताच आम्ही पुढे सरसावलो आणि पाहतो तो काय?

मूर्तिमंत भिंत उभी तसा मूर्तिमंत महाकाली दरवाजा दृष्टीस पडला.अबब हा दरवाजा म्हणजे एक प्रचंड इमारत आहे.याची एकूण उंची आहे ३७ फूट ३ इंच प्रवेश द्वाराची कमान १५ फुट उंच आणि १०.५ फुट रुंद आहे दरवाज्याच्या दोन्ही बाजूने अप्रतिम कोरीव कामाने सुशोभित केलेले सज्जे आणि खोल्या आहेत. यावरील सुंदर नक्षीकाम पाहून डोळ्याचे पारणे फिटले.या दरवाजावर फारसी भाषेत एक शिलालेख कोरलेला आहे.तसेच लैला मजनू नी त्यांच्या प्रेमासारख्याच ठिसूळ खडू ने लिहिलेले आधुनिक शी लेख हि आहेत. काही ठिकाणी तर चक्क oilpaint हि वापरला आहे. हा मजनू जऱा अनुभवी असावा त्यामुळे खडूचे आणि मागील प्रेमाचे ठिसूळपण बहुदा त्याला समजले असावं असा एक खोडसाळ विचार माझ्या मनात आला. या विशाल वास्तूचे मनसोक्त दर्शन घेऊन नेहमी प्रमाणे फोटो सेशन करून पुढे निघालो अजून बराच किल्ला पहायचा होता. आणि वेळ मात्र थोडा.१५/२० मिनीटात राणी महाल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका अजूनही भक्कम असलेल्या वास्तू पाशी पोहोचलो. गाविल गडावरील महालाची आठवण यावी असे प्रशस्त फरसबंद प्रांगण या वास्तू भोवती आहे.
पूर्वी बहुधा कारंजे असावे असा एक हौद आहे. शामियाना उभारण्यासाठी लोखंडी हूक ,खांब उभारण्यासाठी असलेले अष्टकोनी दगड आहेत . या वास्तूच्या डाव्या बाजूला एक वास्तू आहे सरकारी फलक हि इमारत "मशीद" असल्याचे सांगतो . तिचा निर्माता आजच्या शासकांपेक्षा हि secular असावा कारण मशीदीवर कमळ ,नागप्रतिमा असे बरेच काफिर कोरीव काम आढळते.येथून हाकेच्या अंतरावर एक मोठ्ठा तलाव आहे त्याचे नाव शक्कर तलाव. "कुत्रा चावल्यावर रुग्णाला या तलावाचे पाणी येथपर्यंत चालत आणून पाजले असता तो बरा होतो असे म्हणतात" असो.तलावात भरपूर पाणी आहे, जवळचे पाणी संपले असल्यास पिण्यास हरकत नाही असे राजूने सांगितले.या किल्यावर तोफ बनवायचा कारखानाही होता, किल्ल्यावरच तयार केलेली एक अजस्त्र तोफ पाहिली. "नऊ गज" असे तिचे नाव आहे २७ फुट लांब बाह्य घेर २.५ मीटर तर आतील घेर १ मिटर पेक्षा जास्त आहे
"राणीचा हमामखाना" हि इमारत सुद्धा अजून शाबूत आहे. कोणत्याही इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी राजू ,ललित यांपैकी जो पुढे असेल तो " हॉ हॉ " असे ओरडत असतं. त्याचे महत्व या हमाम् खान्यात गेल्यावर समजले. येथे अस्वलाची ताजी (८/१२ तासापुर्वीची ) विष्ठा आढळली. ब्रिटीशानी या इमारतीचा उपयोग कार्यालय म्हणून केला होता.किल्यावरील त्या काळातील पाणी पुरवठा योजनेचे काही अवशेष आजही आढळतात. "मालखाना " नावाने ओळखला जाणारया भागात ५/६ गोदामांचे अवशेष पाहून त्यांच्या भव्यतेची कल्पना येते. आता आम्ही एका फलकापाशी पोहोचलो. "तेल तूपाचे टाके असा फलक असलेल्या भागात चार खोलवर बांधलेली आजही उत्तम स्थितीत असलेली टाके आहेत. किल्याचे एकंदर वैभव पाहता त्याकाळी हि नक्कीच तेल तुपाने भरलेली असावीत. टाक्यांच्या खोलीचा अंदाज घेऊन झाल्यावर आम्ही अकोट दरवाजाकडे निघालो.
किल्यावर तीन तोफा आहेत असे काल ध्वनीचित्रफीत पाहताना समजले होते नऊगज तोफ पहिली होती उरलेल्या दोन या दरवाज्याच्या परिसरात आहेत. त्या पाहून अकोट दरवाजात पोहचलो. "आल्यावाटेने परतायचे कि दूसरी वाट धरायची यावर थोडी चर्चा करून दुसया वाटेने जायचा निर्णय झाला. हि वाट उतरतांना थोडा तरी का होईना पण ट्रेक चा फिल आला. वाटेत" तिखाडी" हे सुगन्धि गवत होते त्याच्या काड्या चुरून १०/१२ जणांना हुंगायला दिल्या. थोड्याच वेळात शेते लागली. कापसाची वेचणी झालेल्या शेतात "सब्जा" तण म्हणून उगवला होता. हा "सब्जा"आहे यावर कोणी विश्वास ठेवेना शेवटी काही तुरे हातावर चुरून वास दिला तेव्हा २/४ जणांनी मुठी भरून खिशात कोंबला.
आज दुपारी जेवण करून लगेच निघायचे होते. आज खास मेनू होता विदर्भ स्पेशल "पातोडी" (जिज्ञासूनी 'पातोडी' असे लिहून सर्च करावे.) बेत मस्त जमला होता http://www.loksatta.com/daily/20090228/ch14.htm
काही जणांना जेवण जरा तिखट वाटले असे सांगताच 'तुमच्यासाठी जरा सौम्य केली असे राजूने सांगितले. आम्हाला घेऊन जाणारी बस केव्हाच येउन पोचली होती,पटापट आवरून बस मध्ये बसलो . राजू आणि ललित च्या आग्रहाखातर गाणी सुरु केली.सगळ्यांनीच आपला घसा साफ करून घेतला. वाटेत वनवासी कल्याण आश्रम संचलित "एकलव्य छात्रालय" ला भेट दिली युनिट तर्फे आणि काहीजणांनी वैयक्तिक देणगी दिली, मुलांच्या हातावर थोडा खाऊ ठेऊन पुढे निघालो.

5.30 ला अकोल्याला पोहोचलो. आता ०८.४० पर्यंत काय करायचे हा प्रश्न पडला परंतू श्री उदय मालसे यांचा " एरो मोडेलिंग " चा छन्द आणि त्यांनी बनवलेली विमाने त्यांचा workshop पाहता पाहता ८ केव्हा वाजले ते समजलेच नाही .

उदय ,देवेंद्र, ललित,राजू यांचा निरोप घेताना मुकेशच्या एका गीतातील शब्द मनात रुंजी घालत होते
"कल तक जो बेगाने ने थे जन्मोके मीत है ................

महाकाली दरवाजा

नऊ गज तोफ

तेल तुपाचे टाके

भक्ष्याच्या शोधातील साप

शक्कर तलाव

तेल तुपाचे टाके

उदय मालशे यांचा एरो मोडेलिंग छंद

पळसाचा सडा

महाकाली दरवाजा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 Sep 2013 - 2:47 pm | मुक्त विहारि

आवडला...

अनिरुद्ध प's picture

4 Sep 2013 - 5:26 pm | अनिरुद्ध प

उत्तम माहिती.(छायाचित्रे कमी असल्याची खन्त)

पप्पुपेजर's picture

5 Sep 2013 - 7:53 am | पप्पुपेजर

फोटु दिसत नाहि आहेत... जुन्या आठवणी जाग्या झाल्या ....

नितिन काळदेवकर's picture

18 Sep 2013 - 2:43 pm | नितिन काळदेवकर

अहो फोटू ???? दिसत नाही

आदित्य पाध्ये's picture

11 Oct 2013 - 11:57 am | आदित्य पाध्ये

हा ट्रेक हुकला खरा परत कधी जायचंय सांगा ?

पैसा's picture

11 Oct 2013 - 7:50 pm | पैसा

मध्यंतरी मिपा बंद पडत राहिल्याने हे काही लेख वाचायचे राहून गेले होते. एकूणात वर्णन आणि फोटो खूप आवडले. "जाफराबाद?" विशेष आहे. मग त्या जाफराबादी म्हशी कुठून येतात?

२७ फूटी तोफेतून गोळा उडवण्यासाठी किती दारू भरावी लागत असेल आणि तो किती लांब जात असेल?

बाकी सगळे छान आहे. पण दरवाजावर कोणी गाढवांनी आपली नावे खडूनी लिहून ठेवलीत ती?