Sankshi Fort. सांकशी किल्ला

भ ट क्या खे ड वा ला's picture
भ ट क्या खे ड वा ला in भटकंती
30 Aug 2013 - 7:39 pm

13 August 2013 सकाळी ०७:०० वाजता डोंबिवली पनवेल बस ने पनवेल ला पोहचलो. काही जण अंबरनाथ,कल्याण येथून येणार होते तर काही जण ठाणे येथून,पोहोचताच बस स्थानकासमोरील "हॉटेल विसावा" येथे गरमागरम कांदेपोहे आणि चहाचा समाचार घेतला, आलात कि लगेच" विसावा त " या असा फोन सर्वाना केला होता, आमचा सरदार संजय पाटील आधीच विसावात विसावला होता. या ट्रेक ला विशेष उपस्थिती होती अमरावती युनिट ची सदस्य प्राची, श्रीकांत आणि अनिरुद्ध यांची, विशेष यासाठी कि हि तिघही YHAI च्या वेगवेगळ्या युनिट ची सदस्य आहेत(एकाच कुटुंबातील असूनही ) डोंबिवलीचे डॉक्टर वसंत भूमकर हे सुध्दा आमच्याबरोबर पहिल्यांदाच ट्रेक ला आले होते. राम वहाळकर ने पनवेल ला फोन करून तीन टमटम रिक्षा सांगून ठेवल्या होत्या. महेंद्र आपल्या दोन सहकार्यांसह रिक्षा घेऊन तयारच होता. ०८:०५ ला आम्ही २८ जणाचा रिक्षा प्रवास सुरु झाला . साधारण १ तासाच्या प्रवासा नंतर आम्ही "बळवली" या गावात पोहोचलो.

YHAI च्या नेहमीच्या पद्धतीने,सुरक्षेचे नियम , ओळख परेड ,ट्रेक ,किल्ला याबद्दलची माहिती हे सर्व झाल्यावर आम्ही किल्ल्याच्या दिशेने निघालो . आजच्या ट्रेक चा नेता या नात्याने मलाच या सर्व गोष्टी कराव्या लागल्या . "नेता जरी मी असलो तरी राम आणि सरदार हि जोडी या क्षेत्रातली जाणकार मंडळी आहेत" सुरक्षा नियमांबाबत त्यांचा शब्द अंतिम राहील" हे आधीच स्पष्ट केले .
आज पाऊस नव्हताच पण हवा मात्र पावसाळी होति. ८/१० जण आजच्या ट्रेक ला पहिल्यांदाच आले होते मागील दोन ट्रेक ला अनुक्रमे ११४ आणि ७३ जण होते त्यामुळे एखाद्या ठिकाणी थांबलो कि फार वेळ मोडत होता . आज फक्त २८ जण असल्यामुळे आणि मागील ट्रेक सारखा पाऊस नसल्याने निवांत गप्पा मारत चाललो होतो . वाटेत दिसणाऱ्या झाडांबद्दल माहिती राम आणि मी देत होतो . आंबा /फणस हि झाडे सुद्धा नीट न ओळखु शकणारी तरूण मंडळी पाहून खरे तर वाईट वाटत होते. पण सर्वांचा मूड मात्र माहिती ऐकण्याचा दिसत होता . त्यामूळे राम व मी माहिती देत होतो पळस ,पांगारा, करंज , जांभूळ ,असाणा ,ऐन असे अनेक वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा होते. १/२ झाडे आम्हाला ओळखता आली नाहीत. एका झाडावर लाल डोंगळ्यानि पाने चिकटवून घरटे केलेले दिसले कोकणात या डोंगल्याना "ओम्बिळ " म्हणतात.

आजूबाजूला असलेल्या शेतातून सगळीकडे दोडकी,कारली,काकडी,पडवळ ,भोपळे यांचे वेल दिसत होते. खरेतर हि शेतजमीन नाही छोट्या टेकड्या किंवा माळरान आहे .पण जवळच्या शहरांची भाजीपाल्याची गरज पूर्ण करण्यासाठी हि सर्व लागवड केलेली दिसत होती.

तासाभराच्या चाली नंतर थोडी वस्ती लागली एका घरा बाहेर टोपलीभर काकड्या दिसल्या .श्रीकांतने बर्याचशा काकड्या विकत घेतल्या आणि चाकूने डेखे काढून लगेच वाटप सुरु केले. चिबुड सुद्धा होते पण ते येताना घेऊ असे सांगून निघालो. थोड्याच वेळात आम्ही बद्रुद्दिन दर्ग्या जवळ पोहोचलो.या किल्याला बद्रुद्दिन किल्ला असेही म्हणतात. पूर्वीच्या जुन्या दर्ग्या जवळ आता बरेच मोठे नवीन बांधकाम केलेले आहे. तेथील माणसाना आम्ही किल्याला जाण्याची वाट कोणती असे विचारले . माहिती द्यायला ते फारसे उत्सुक दिसले नाहीत , आमचे येणे त्यांना फारसे रुचलेले दिसत नव्हते ,परंतू त्याकडे दुर्लक्ष केले. आणि पुढे निघालो.

थोडे पुढे जाताच एक आदिवासी स्त्री दिसली तिने आपणहून चौकशी केली आणि पुढे जाण्याची गरज नाही थोडे मागे जाऊन रस्ता सोडा आणि पायवाटेने निघा म्हणजे किल्याची वाट मिळेल असे सांगितले. या किल्याकडे फारसे कोणी फिरकत नसावे असे दिसले कारण पायवाट मळलेली दिसत नव्हती ,आणि नेहमी वाट दाखवणारी विविध वेष्टणे ,पाऊच इत्यादीही दिसत नव्ह्ते.(कदाचित एखादा सह्याद्रीवर मनापासून प्रेम करणारा ग्रुप नुकताच येउन गेला असावा) पण नाही वाट अजीबातच मळलेली दिसत नव्हती बर्याच वेळा वाट कोणती हेच समजत नव्हते "सांगाती सह्याद्रीचा " या पुस्तकातील पानाची प्रत आमच्याकडे होती त्यातील वर्णनानुसार एव्हाना पहिली सपाटी यायला हवी होती . राम,मी,सरदार थोडे पुढे जाऊन वाट मिळते का पाहिले ,थोड्याच वेळात हलकीशी चढाई करून आम्ही पहिल्या सपाटीवर पोहोच्लो. भन्नाट रान वार्याने आमचे स्वागत केले. थोडावेळ थांबलेच पाहिजे असा आग्रह जणू वारा करत होता त्याचा मान ठेऊन थोडे विसावलो.
पाठ पिशवी थोडी हलकी करावी म्हणून मी "उसरी" चे पाकीट बाहेर काढले . हे काय ,हे काय ,कसे खायचे असे सर्वजण विचारू लागले. बहुतेकांनी "उसरी " पाहिली नव्हती. चिकूच्या आकाराचे "अळू " नावाचे एक फळ कोकणात मे महिन्यात होते त्याच्या मीठ लाऊन सुकवलेल्या फोडी म्हणजे उसरी असे सांगताच अळू ला फळ येते? असे प्रश्न आले ,अरे फदफदे ,अळूवडी वाले हे झाड नाही याचा वृक्ष असतो त्याला काटे असतात ,आणिहिरव्यारंगाची बरीच फळे लागडतात आणि पिकल्यावर कॉफीच्या रंगाची होतात अशी सर्व माहिती दिली. बघताबघता पाकीट संपले ,शेवटी पाकीट पळवून मी राम आणि सरदार साठी थोडी उसरी ठेवली कारण पुढचा रस्ता शोधण्यासाठी ते डोंगराकडे गेले होते. पुढच्या ट्रेक ला दोनतीन पाकिटे आणीन असे सांगितल्यावरच मला शिल्लक राहिलेली उसरी मिळाली.

अळूचे झाड असे दिसते याच्या पिकलेल्या फळापासून उसरी तयार होते , चित्रातील फळे कच्ची आहेत. झाडाला काटे असतात मे महिन्यात फळे पिकतात पिकल्यावर कॉफी च्या रंगाची होतात्त.

राम ,सरदार परत न येता तेथूनच आम्हाला बोलावू लागले त्यांना वाट मिळाली होती . वाट अशी नव्हतीच , थोडासा रॉक प्याच पार करून ,काही जणांना पार करायला मदत करून आम्ही दुसऱ्या टप्प्यावर पोहोचलो . इथे गवतात लपलेली पाण्याची बुजलेली टाकी दिसली.एका टाक्यात पाणी होते , गवत वार्यावर मस्त डोलत होते. इतक्यात पावसाने पण हजेरी लावली. पुन्हा एक रॉक प्याच लागला इथे वाट थोडी निसरडी होती . आणि उंची हि जास्त होती राम ,सरदार वरती आणि मी व रवि खाली असे उभे राहून सर्वाना सुरक्षित पोहोचवले. आता बरीच उध्वस्त बांधकामे दिसू लागली. आम्ही किल्यावर पोहोचलो होतो.

किल्यावर पाण्याची टाकीच टाकी आहेत "सांगातीत " वर्णन केल्या प्रमाणे उखळीच्या/वाईनाच्या आकाराचे बरेच खोदकाम केलेले खळगे आहेत त्यातील काही एकमेकांना जोडलेले आहेत , त्यांचे प्रयोजन काही कळले नाही .(वाइन = पूर्वी कोकणातील घरांना एक कांडपाची खोली असायची त्यात एकगोल खळगा असलेला दगड पुरलेला असायचा,त्यात भात टाकून ते मुसळाने कांडले जायचे तांदूळ ,पोहे करण्यासाठी,तो दगड म्हणजे वाइन )


या छायाचित्रातील प्रतिमेचा काही अर्थ लागत नाही ,

डबे खायला कातळावर मस्त जागा होती आणि भूक हि लागली होती, थट्टा मस्करी करीत जेवलो ,एकाने तर हे खोदलेले खळगे "फिंगर बाउल ' असावेत असाही शोध लावला.

गड फेरी करून परतीच्या वाटेला लागलो,उतरण्यासाठी दुसरी वाट आहे असे वाचल्याचे आठवत होते पुन्हा सांगाती चे पान पाहिले आणि त्यानुसार उतरायला सुरुवात केली.
इथेही थोड्याच वेळात एक अवघड जागा आली ,सरदार,रवी,मी खाली उतरलो ,राम वरतीच थांबला , आधी पाठ पिशवी आणि मग तिचा मालक,मालकीण या क्रमाने एकेकाला सुरक्षित खाली उतरवायला सुरवात केली. "दोनतीन दगड आणून कातळाच्या बेचक्यात टाक" असे रामने सांगितले. याचा खूप फायदा झाला कारण उतरताना पाय खाली टाकताना येणारा ताण ,अंतर कमी झाल्याने कमी झाला. रवि आणि मी चक्क उतरणार्याचा पाय पकडून त्या दगडावर ठेऊ लागलो ,त्याचा पाय टेकला कि तो रामचा पाय पकडलेला आपला हात सोडत असे, अशा प्रकारे सर्वजण सुरक्षित उतरलो .

सरदार आणि श्रीकांत पुढे गेले, कारण अजून एक अवघड ठिकाण होते ,कातळात खोदलेल्या एका बेच्कात हाताची बोटे अडकवून निसरडी कातळ पायरी उतरावी लागत होती. बाकी वाट निसरडी, पण पडलो तरी धोका नाही अशी होती.हा टप्पा पार झाल्यावर मात्र सोपी पाउलवाट लागली ती थेट जुन्या दर्ग्यापर्यंत. न थांबता सरळ दर्ग्याच्या कट्यावर येऊनच थांबलो. फोटू बिटू काढून झाल्यावर रस्त्याला लागलो.

खाली आल्यावर राम ने सांगितले कि नेहमीप्रमाणे दोर त्याच्या पाठपिशवीत होता पण काढायलाच हवा एव्हढी अवघड जागा नव्हती.कारण खोली फार नव्हती आणि दगड टाकल्याने वाढलेल्या उंचीचा फायदा झाला
पण या दोन्ही अवघड जागा जरा सुरक्षित करण्यासाठी पुन्हा येउन बोल्ट ,साखळी अशी काहीतरी व्यवस्था करायची असे राम ,सरदार आणि मी ठरवले बघूया कधी जमत ते.
आता गाडी रस्ता हि काय चुकण्या सारखी गोष्ट नाही पण गप्पांच्या नादात काही जण पुढे गेले आणि त्यांच्या मागून बाकीचे, एका डबक्यात एक चांदी आणि तिचे रेडकू मस्त डुंबत होते ,अरे हे डबके येताना आपल्याला लागले नव्हते हे लक्षात येताच पुढील मंडळीना हाक मारून बोलावले आणि बळवली गावच्या रस्त्याला लागलो.
०४:३० पर्यंत पोहोचू असे महेंद्रला सांगितले होते पण उतरताना दोन ठिकाणी गेलेला जास्तीचा वेळ आणि रस्ता चुकल्यामुळे ०५:५० ला बळवलीत आलो . टमटम तयारच होत्या पनवेल ला येताच मिळेल त्या यष्टीने आपपल्या घराकडे निघालो.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Sep 2013 - 5:57 pm | मुक्त विहारि

आवडला..

पैसा's picture

6 Sep 2013 - 2:50 pm | पैसा

अनवट ठिकाणचे खुसखुशीत वर्णन. ओंबील आणि आळूची फळे बरेच दिवसांनी पाहिली.

YHAI म्हणजे युथ होस्टेल का?

भ ट क्या खे ड वा ला's picture

8 Sep 2013 - 1:35 pm | भ ट क्या खे ड वा ला

हो YHAI म्हणजे युथ होस्टेल
अंबरनाथ युनिट

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Dec 2013 - 4:34 pm | राजेंद्र मेहेंदळे

यांचा पत्ता आणि नंबर तुमच्याकडे मिळेल काय? असल्यास व्यंइ. करणे
धन्यवाद

अनिरुद्ध प's picture

6 Sep 2013 - 3:53 pm | अनिरुद्ध प

आळुच्या फळान्ची माहिती नव्याने कळाली.

प्रचेतस's picture

7 Sep 2013 - 9:25 am | प्रचेतस

भटकंती आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Sep 2013 - 6:00 pm | अत्रुप्त आत्मा

अळूंमुळे... शिवथरघळ/वरंधा घाट सगळे अठवले! :)

अँग्री बर्ड's picture

8 Sep 2013 - 9:36 pm | अँग्री बर्ड

कोकणात ह्या मुंग्यांना 'हुमले' असेही म्हणतात. बाकी हे अळूचे फळ प्रथमच बघतोय, भटकंती आवडली !
किल्ल्याची माहिती अजून यायला हवी होती !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Sep 2013 - 5:35 pm | निनाद मुक्काम प...

लय भारी

बॅटमॅन's picture

16 Sep 2013 - 2:03 pm | बॅटमॅन

मस्त वर्णन!!

आनन्दिता's picture

19 Sep 2013 - 9:02 am | आनन्दिता

हे अळूचे फळ म्हणजे उन्हाळ्यातील रानमेव्यापैकी आहे... सातारा, महाबळेश्वर भागात भरपुर असतात. याची अढी राखेत घालतात.....चवीला गोड, तुरट असतात... अप्रतिम लागतात... यम्मी!, :)