किती वर्ष झाली बरं? बाळ्या दोन वर्षाची असेल. तेंव्हा, तेंव्हा गेलो होतो आम्ही राजस्थान पहायला.
तिथल्या सरदारांनी आपापल्या हवेल्या आता हॉटेल म्हणुन वापरायला सुरवात केल्याने आम्ही शाही पाहुणचार घेत फिरत होतो अस म्हणायला हरकत नाही. तर चितोड मध्ये एका रिक्षावाल्याला मी आपल माझ्या बडबड्या स्वभावानुसार विचारल राजस्थानात त्यांच अस वैशिष्ट्यपुर्ण अस खाणं कोणत? म्हणजे आपली कशी झुणका-भाकर तस काही? तर त्याने सुचवली दाल-बाटी. वेगळ काही खायचं म्हंटल की माझ्या नवर्याच्या कपाळावर सतराशेसाठ आठ्या पडतात. पण आता सतराशेसाठमध्ये एकसश्ठावी आठी मी असल्याने, त्याला नंदीबैलासारखी मान हलवत गपगुमानं हॉटेलमध्ये ही ऑर्डर द्यावी लागली. अर्थात त्याच नशिब जोरावर असल्याने दालबाटी अशी रोज नाही बनत अन ऑर्डर दिल्यावर अर्ध्यातासात तर नाहीच मिळणार अस पुणेरी स्टायल उत्तर मिळालं. मग दुसर्यादिवशी तोच रिक्षावाला आम्हाला जेथे हमखास दाल-बाटी मिळते अश्या ठिकाणी घेउन गेला, अन राखेत भाजलेल्या बाटीज विथ उडदाची आमटी अस खाण आम्ही तोंड वेडवाकड करत खाउन बाहेर पडलो. (त्यानंतर नवर्याने काय आकांडतांडव केला असेल तो मी येथे उधृत करु इच्छीत नाही)
एकुण काय प्रकरण असतं याची चुणु़क आम्ही पाहिली अन परत या डिशकडे वळायच नाही असा अलिखीत करार केल गेला. पण मेलबर्नमध्ये किर्ती सिन्हा म्हणुन राजस्थानी कायस्थ (हे काय असत? अस विचारायच नाही. ते अगदी अभिमानाने सांगतात,"हम राजस्थानी कायस्थ है।) मैत्रीण भेटली. माझ चिकन हाणुन गेल्यावर तिने आम्हाला तिची दाल-बाटी खायच आमंत्रण दिलं. अर्थात आम्ही घरुन निघताना पोटभर खाउन निघायची खबरदारी घेतली होतीच, पण काय आश्चर्य? अहो चक्क खुसखुशीत अन चमचमीत निघाली ही घरची दाल-बाटी. त्यात अन ती "कायस्थ" पद्धतिने बनवल्यामुळे म्हणे खुपच वेगळी असते. मग काय? त्यानंतर घरात अधुन मधुन हा प्रकार बनायला लागला.
तर मंडळी गप्पा फार झाल्या आता कामाला लागा. तसेही चारच दिवस उरले कार्याला तर अजुन नवर्यामुलाला केळवणाला अथवा गडनेराला नसेल बोलवलं तर दाल-बाटी बनवुन अगदी खुशाल आमंत्रण धाडा.
तर पहिला साहित्यः-
१/२ वाटी तुर डाळ
१/२ वाटी अख्खे चणे (हरभरे)
१/२ वाटी हिरवे मूग
१/२ वाटी राजमा
१/२ वाटी मसुर
३/४ वाटी काळे उडीद
हे सगळ स्वच्छ धुवुन एक अर्धातास भिजत ठेवा.
अर्थात आता अर्धातास करायच काय म्हणुन मग मी असा टाइमपास केला...
अहो असं स्वच्छ उन्हं आल होत घरात म्हणुन सांगु ?
तर असो. आता या भिजलेल्या डाळीत
१/२ कांदा चिरुन
१ टोमॅटो
चविप्रमाणे मिठ, हिंग हळद अन आमचं कोल्हापुरी तिखट (माझ्या सिंगापुरच्या मैत्रीणींच्या दाल मख्खानी माझ्या या तिखटाशिवाय होत नव्हत्या. जाम डिमांड होता मैत्रीखात्यात) हे सर्व घालुन मस्तपैकी शिजवुन घ्या.
आता फोडणी -
नेहमीचीच जीरे, मोहरी, कडीपत्ता, हिंग लसूण अन १/४ चिरलेला कांदा.
मोठ्या पातेल्यात तेल चांगले गरम करुन गॅस बंद करा. आता त्यात मोहरी घालुन तडतडु द्या, मग जीरे घाला मग कडीपत्ता अन लसूण घालुन गॅस पुन्हा मंद सुरु करा. आता त्यात कांदा घालुन मग शेवटी हिंग टाका.
या फोडणीवर शिजलेली डाळ घालुन थोडे पाणी मिसळा. तिखट मिठ आपण डाळ शिजताना घातल्याने आता फक्त अॅडजस्ट करा. झाली दाल तयार.
आता बाटी.
बाटी साहित्य- गव्हाचे पिठ चार वाट्या.
१/४ चमचा ओवा
३/४ ते १ वाटी तेल.
वरुन लावायला कलौंजी (फ्लेवरसाठी ऑप्शनल)
आता या पिठात ओवा अन तेल गरम करुन मोहन घाला. मोहन इतक हवे की पिठाचा मुटका करुन उडवला (हलकेच ! लगेच बॉलींग नका करु) तरी तो टिकला पाहीजे( हाच तो कायस्थ टच!!) आता हे पिठ जरा घट्टसर मळुन घ्या. त्याचे छान जरा चपटे अन आत मध्ये किंचीत हॉलो गोळे तयार करा अन ओव्हन मध्ये २०० सेंटीग्रेड्वर साधारण चाळीस मिनिट भाजुन घ्या. हे गोळे वळताना आपण मोदकाला कशी पाती तयार करत जातो तशी तयार करुन मिटवायची .
तयार आहे दाल-बाटी.
__/\__
अपर्णा
प्रतिक्रिया
10 Jul 2013 - 8:16 am | मुक्त विहारि
झक्कास....
10 Jul 2013 - 8:24 am | प्रचेतस
वाह......!!!!!!!!
सकाळी सकाळी अत्याचार आहेत हे.
10 Jul 2013 - 8:25 am | स्मिता चौगुले
मस्तच... नक्की करुन बघेन
10 Jul 2013 - 8:27 am | विंजिनेर
पन त्ये साजूक तूप इसरला जनू? अस्सं वाटीभर घ्यायाचं पघा आन भिजवायच्या बाट्या त्या तूपामंदी.. त्याबिगर मजा नाय ह्या डिशला पघा....
10 Jul 2013 - 8:45 am | स्पंदना
तूपाच नाव नका काढु हो!
वजन वाढत! :)
10 Jul 2013 - 8:55 am | रितुश्री
आम्ही तूप घालुन खातो:)....आम्ही तूप घालुन खातो:)....
10 Jul 2013 - 10:01 am | आतिवास
+ १ तूप नसेल तर दाल बाटीची तितकी मजा नाही याच्याशी सहमत.
महाराष्ट्रात जळगाव भागातही दालबाटी खाल्ली जाते - अनेक गावांत पाहुणे आलेत म्हणून माझ्यासाठी खास दालबाटी बनवली जात असे - त्याची आठवण आली.
हं! आत्ता मी जिथं राहतेय तिथं दालबाटी मिळण्याची अजिबात शक्यता नाहीये :-(
11 Jul 2013 - 12:37 am | विजुभाऊ
तुम्ही केलेली बाटी ही चुलीत ( चुलीवर नव्हे) भाजून करतात.
भराणपुर कडे ही बाटी तळून करतात. त्यात तूप साखर आणि बाटी साठी स्पेश्यल रश्शाची भाजी असते.
11 Jul 2013 - 12:50 am | विजुभाऊ
तुम्ही केलेली बाटी ही चुलीत ( चुलीवर नव्हे) भाजून करतात.
भराणपुर कडे ही बाटी तळून करतात. त्यात तूप साखर आणि बाटी साठी स्पेश्यल रश्शाची भाजी असते.
10 Jul 2013 - 9:11 am | रेवती
चवीचवीनं सांगितलेली कृती आहे ही! बाटी करण्याची वेगळी पद्धत (कायस्थी गं) आवडली. फोटूही झक्कास!
वरच्या फोटूत तू जशी दिसतेस तशीच असणार हे तुझ्या लेखनावरून मनात आलं होतं. माझ्या एका मैत्रिणीनं बाटी करून त्यात बटाट्याचे सारण भरले होते. आधीच दाल बाटी हा पोटभरीचा पदार्थ, त्यातून बटाट्याचे सारण असलेली एक बाटी खाऊन मी जी गप्प बसले की गप्पा मारायलाही तोंड उघडलं नाही. ;)
माझ्याकडे बरीच कलौंजी आहे. ती एका पंजाबी भाजीच्या फोडणीत घालायला म्हणून आणली होती. बरीच उरलीये. आता दाल बाटी करताना बाट्यांना लावून लावून येत्या दहा एक वर्षात नक्की संपेल.
10 Jul 2013 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लै भारी....! शेवटच्या फोटोला खपलो. :)
-दिलीप बिरुटे
10 Jul 2013 - 9:58 am | मदनबाण
दालबाटी माझ्या एक राजस्थानी मित्राकडुन हादडण्यात आलेली आहे... छान लागतो हा प्रकार !
(सध्या कुल्फी विथ रबडीची चव जिभेवर घेउन फिरणारा);)
10 Jul 2013 - 10:31 am | मदनबाण
राजस्थानी कायस्थ (हे काय असत? अस विचारायच नाही. ते अगदी अभिमानाने सांगतात,"हम राजस्थानी कायस्थ है।)
'कायास्थितः सः कायस्थः'
परम शक्तीने जेव्हा आकार धारण केला ( काया धारण केली) तेव्हा कायेत स्थित झाल्यामुळे तो कायस्थ झाला.
कायस्थांमधे अनेक पंडीत, संत योद्धा होउन गेले आहेत...यांनी ४ही वर्णाला स्वतःमधे समावुन घेतल.
याच प्रमाणे "ब्रम्हम जानाति सः ब्राम्हणः" याचा अर्थ जो ब्रम्ह जाणतो,ज्याला आत्मज्ञान आहे,तो ब्राम्हण. इथे ब्राम्हण ही जात किंवा वर्ण नसुन तो ती वॄती आणि गुण आहे. वेदांमधे आणि अनेक ठिकाणी ब्राम्हण हा शब्द येतो तो याच अर्थाने. :)
10 Jul 2013 - 1:26 pm | रमेश आठवले
गोळवलकर गुरुजी (ब्राह्मण) यांना एकदा कोणीतरी त्यांची जात विचारली . त्यावर त्यांनी मी कायस्थ आहे कारण माझा या कायेत वास आहे असे उत्तर दिल्याचे वाचले आहे.
11 Jul 2013 - 4:49 am | स्पंदना
धन्यवाद मदनबाण. आता मी तिला जरा जास्त समजु शकेन, किंवा थट्टा करण्याचा मोह होणार नाही. (आजवर केली नाही पण तरीही ...)
10 Jul 2013 - 10:46 am | दिपक.कुवेत
नेहमीप्रमाणेच खुशखुशीत लेखनासहित खुशखुशीत बाट्या. मी सुद्धा हा प्रकार एकदा (च) राजस्थानी मैत्रिणीच्या लग्नात खाल्ला तेवढाच. परत काय खायची म्हणुन हिम्मत झाली नाहि. असो पण तू कॄतीवार वर्णनच ईतकं छान केलयस कि आता परत एकदा करुन पाहिन. बाय द वे चुरमा लड्डु कुठे आहेत? असं एकलय कि डाल-बाटि-चुरमा सर्व करतात.
10 Jul 2013 - 12:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
नेहमीप्रमाणेच खुशखुशीत लेखनासहित खुशखुशीत बाट्या.
+१११
11 Jul 2013 - 4:54 am | स्पंदना
आम्हीसुद्धा असाच धसका घेतला होता दाल-बाटीचा. मुख्य म्हणजे दाल-बाटी ची जी डाळ असते ती नुसते उडीद घालुन केल्याने जरा चिकट, अन त्यात त्या बाट्या राखेने भरलेल्या, कडक!!
पण भरपूर मोहन घालुन घरात बनवलेल्या बाट्या खरच खुप चवदार अन वेगळ्या लागतात.
बाटी चुरमा करताना त्या बाटीत ओवा घालत नाहीत. मोहनाला फक्त तूपच असत, आणी बाटी भाजून झाल्यावर ती खलबत्त्यात कुटून त्यावर आणखी तूप शिंपडुन गुळ, बडीशेप, अन ड्रायफ्रुटस मिसळुन त्याचे लाडु वळतात. मला तर हा चुरमा प्रकार मलिद्यासारखा वाटला, किंवा आपण नाही का पोळीचा लाडु करत? तसा काहीस्सा. नथिंग ग्रेट!
10 Jul 2013 - 10:52 am | पिलीयन रायडर
ही वेगळीच पद्धत आहे बाटी बनवायची! आणि दाल पण सुंदर दिसतेय!
माझी रेसेपी + सासु बाईंची रेसेपी = आम्ची रेसेपी जरा वेगळी आहे..
ह्यात मी बाटी कणिक + रवा घालुन करते तर सासु बाई गहु आणि मका जाडसर दळुन आणतात आणि त्याची बाटी करतात.
मी गोळा लंबुळका लाटते, मग त्याचा रोल करते आणि त्या रोल ला मग दुमडुन त्याचा लहान गोळा करते. (सासु बाई डायरेक्ट गोळे करतात). आता हे गोळे पाण्यात उकडुन घेतो (आई कुकर मध्ये उकडते). आणि मग उकडलेल्या गोळ्यांना पाणी काडुन, थंड करुन, त्याचे थोडे लहान तुकडे करतो. (रोल करुन बनवलेले असल्याने त्याला छान पदर सुटतात). ह्याला तेलात तळु शकतो / शॅलो फ्राय करु शकतो. तेल जास्त पित नाही बाटी. पण तळल्याने कुर्कुरीत होते.
आता ही बाटी दाल + तुप (मस्ट) सोबत चुरु खायची. आईकडे आणखी एक व्हर्जन म्हणजे साधा वरण+तुप+गुळ ह्यात बाटी चुरतात.
एकंदरित आमच्या कडे दाल बाटी ४-५ पद्धती एकत्र करुन एका विचित्र फ्युजन पद्धतीने बनवली जाते!
11 Jul 2013 - 4:58 am | स्पंदना
धन्यु पिलीयन रायडर.
मी पण माझ्या मानस कन्येकडुन, (एका मिपाकराची नवपरिणीता) अस ऐकल होतं पण तुझ्याकडुन व्यवस्थीत माहीती समजली. हे ही करुन पाहेन.
10 Jul 2013 - 11:04 am | प्रभाकर पेठकर
हम्म्म्म! मी ही दालबाटी राजस्थानात खाल्ली होती तेंव्हा मलाही ती तेवढी भावली नाही. परंतु, आता ह्या पाककृती प्रमाणे करून पाहीन.
दाल दिसायला सुंदर आहे चवीलाही असणारच. बाटी अजून गडद रंगावर भाजली गेली असती (प्रत्यक्ष निखार्यांवर) तर जास्त चांगली दिसली असती. इथे जरा पांढरट दिसते आहे. अर्थात, त्याने चवीत फरक पडणार नसेल तर पांढरी बाटीही चालू शकेल.
11 Jul 2013 - 4:59 am | स्पंदना
निखार्यावर ती व्यवस्थीत भाजली नाही जात पेठकरकाका, वरुन जळते अन आतुन कच्ची रहाते, वर आणि कडक होते, त्या ऐवजी मला तरी ओव्हनमधली जास्त आवडली.
11 Jul 2013 - 2:25 pm | प्रभाकर पेठकर
हम्म्म्म! कधी कधी आपल्याला जमत नाही हे खरेच. पण निखार्यांची धग नियंत्रित करावी लागते. जेंव्हा जास्त हवी असेल (ब्राऊनिंगसाठी) तेंव्हा निखारे वरखाली करून त्यावरील राख झटकून टाकतात त्याने निखारे लालबुंद आणि रसरशित दिसतात. त्यात उष्णता जास्त असते.
कमी उष्णता हवी असेल तर निखारे हलवत नाहीत त्यावर राख जमू देतात. उपहारगृहात तंदूरमध्ये जमणारी रोजची राख टाकून देत नाहीत. काढून वेगळी ठेवतात. जेंव्हा गरम तंदूरची उष्णता कमी करण्याची वेळ येते तेंव्हा निखार्यांवर ती राख पसरून टाकतात आणि मग पदार्थ शिजवतात.
बट्टी आंत पर्यंत शिजविण्यासाठी आधी आंच मंद पाहिजे आणि बट्टी शिजली की राख झटकून रसरशीत निखार्यावर 'ब्राऊनिंग' करून घ्यावे.
बट्टी कडक न होण्यासाठी बट्टीत मोहन आणि पाणी योग्य असावे. ते कमी असेल तर बट्ट्या कडकडीत होण्याचा संभव असतो. बट्टी शिजल्यावर ती तुपात बुडवितात आणि नंतर सादर करतात. ह्यानेही बट्टी खुसखुसशीत लागते.
ओव्हन मध्येही ओव्हनचे तापमान कमी ठेवून आधी बट्ट्या आंतपर्यंत शिजवून घ्यायच्या आणि शेवटच्या कांही मिनिटांत तापमान वाढवून 'ब्राऊनिंग' करून घ्यायचे. ब्राऊनिंग पूर्वी बट्ट्यांना तुप लावले तर ब्राऊनिंग लवकर आणि चांगले होईल.
10 Jul 2013 - 11:05 am | मी_देव
मस्तच.. रविवारीच केलेली. आणि काय हा योगायोग!!!!! मी ही आजच टाकणार होतो दालबाटीची पाकृ.. कालच माबो वर टाकली होती.. आता नुसता फोटो टाकतो.
मी माझ्या मध्यप्रदेशातील मित्राच्या पद्धतीने केली होती. मिरचीची पिवळी डाळ होती, थोडी वेगळी पद्धत. पण ही डाळ जास्त खास वाटतेय. :) पण बाटी अगदी अशीच. परत खावीशी वाटतेय...
10 Jul 2013 - 11:44 am | चंबु गबाळे
फोटो आवडला! येऊदेत तुमची पण पाक्रु.. डबल मेजवानी :)
10 Jul 2013 - 11:48 am | पिलीयन रायडर
हो मी कालच माबो वर वाचली तुमची पा.कृ. आणि सासुबाईंना सांगितलही की "आज एका दाल बाटीचा अप्रतिम फोटो पाहिला आहे!"
11 Jul 2013 - 5:02 am | स्पंदना
मिरचीचं वरण!!!
आहाहा!! त्या वरणाचा आंबट गोड अन तिखटपणा...काय वर्णावा.
उफ्फ!!
तुमचा फोटो पण मस्त. अस सर्व्ह केल तर आपला साधा वरणभात सुद्धा एकदम फ्युजन होउन जाईल.
10 Jul 2013 - 11:40 am | चंबु गबाळे
आवडती डीश! मस्त फोटो
10 Jul 2013 - 11:59 am | पैसा
पाकृ सांगण्याची स्टाईल आणि एकूणच सगळं छान! फोटो पहिल्यापासून शेवटपर्यंत झक्कास!
अवांतर: अरे पाकृ वाल्यांनी सानिकासारखे व्हिडिओ तयार करा ना प्लीज!
10 Jul 2013 - 1:04 pm | गणपा
+१
अगदी असेच म्हणतो.
मी स्वतः आजवर हा पदार्थ कधी चाखला नाही. नुसतं एकुनच आहे या बद्दल.
10 Jul 2013 - 7:57 pm | निवेदिता-ताई
+१
11 Jul 2013 - 5:03 am | स्पंदना
ए गप ग! व्हिडीओ पाहिजेत म्हणे!
10 Jul 2013 - 1:55 pm | सुहास झेले
एकूणच ह्या प्रकाराबद्दल खूप मित्रांकडून वाईट लागते वगैरे प्रतिक्रिया मिळाल्या होत्या, पण ही पाककृती वाचून एकदा तरी ट्राय करावी वाटतेच :)
देव बाबू, इथेही येऊ दे की पाककृती. फोटो जीवघेणा आलाय :) :)
10 Jul 2013 - 2:03 pm | त्रिवेणी
खुप खुप आवडीची.आता तुमच्या पध्दतीने डाळ करुन बघेन. पण आम्ही जळगावकर बट्टीला तुपात भिजवुनच खाणार(कितीही वजन वाधले तरी).
मी बाल्कनीत एका मोट्या तगारीत गवर्यात बट्टी थेऊन मग भाजते.
10 Jul 2013 - 2:04 pm | सुहास..
छान !!
मराठवाड्याकडे दालबाटी वेगळीच करतात.....
10 Jul 2013 - 2:28 pm | प्यारे१
'बोलकी' पाकृ मस्तच.
देवबाप्पांचं क्रिएशन पण येऊ द्यात लवकर.
एकाच्या लग्नाचा अल्बम बघितला म्हणून दुसर्याच्या लग्नाचा बघत नाही असं थोडीच्च आहे? ;)
10 Jul 2013 - 4:03 pm | रुस्तम
एकाच्या लग्नाचा अल्बम बघितला म्हणून दुसर्याच्या लग्नाचा बघत नाही असं थोडीच्च आहे?
10 Jul 2013 - 7:21 pm | प्यारे१
ते राजस्थानी फोटोचं सांगायचं र्हायलं. 'दाजी' पक्कं राजस्थानी दिसतेत. तुमी बी बर्या हायसा.
11 Jul 2013 - 5:04 am | स्पंदना
दाजींच्या दाढीवर ते राजस्थानी वारी वारी जॉवॉ झाले होते भाऊ!
10 Jul 2013 - 2:45 pm | अत्रुप्त आत्मा
रामदेवबाबा...ढाब्याची अठवण झाली... !!!
10 Jul 2013 - 2:58 pm | सूड
कुणीतरी दालबाटी आयती करुन द्या प्लीज !! :))
10 Jul 2013 - 3:15 pm | त्रिवेणी
आम्हा दोघान कडून तुम्हाला आजच आमत्रण देते. सगळे जण या दाल बाटी खायला.
10 Jul 2013 - 7:20 pm | प्यारे१
>>>आम्हा दोघान कडून
कोण कोण आमत्रण देतंय?
10 Jul 2013 - 4:09 pm | बॅटमॅन
तुमच्या पाकृ बाकी भारी जिवंत असतात. फुल्टू मजा येते वाचायला. मागं ती कुठलीशी चिकन का मटनची पाकृपण वर्णनामुळे भारी वाटत होती-मूळ फटू कातिल होता हेवेसांनल. :)
11 Jul 2013 - 5:04 am | स्पंदना
धन्यु!
10 Jul 2013 - 5:19 pm | सानिकास्वप्निल
उत्तम +१
एकदम खल्लास पाकृ :)
दालबाटी अजून एकदा ही मी करुन बघीतली नाही त्यामुळे आता नक्की बनवून बघणार पण तूप जास्तं घालून ;)
10 Jul 2013 - 5:29 pm | स्पा
जबराट ..
भारी वाटतेय
10 Jul 2013 - 5:34 pm | स्वाती दिनेश
गप्पा मारत सांगितलेली दालबाटी आवडली. माझी एक मारवाडी मैत्रिण आहे तिची दालबाटीची पध्दत खूपच वेगळी आहे..
स्वाती
11 Jul 2013 - 12:18 am | कवितानागेश
तिची दालबाटीची पध्दत खूपच वेगळी आहे..>
कशी??
सांगा बरं लवकर.
10 Jul 2013 - 5:49 pm | रुमानी
आम्ही कुकर मध्ये उकडुन करतो त्याला बाफल्या असे म्ह्नणतो व निखार्यांवर भाजतो त्याला बाटी.
ह्या ईड्ली पात्रात ही छान उकडता येतात. :)
एकदा अशा प्रकारे करुन पाहवी लागेल.....
11 Jul 2013 - 5:06 am | स्पंदना
बाफल्या?
पद्धत मी बनवली आहे तशी की वर पिलीयन रायडरने दिली आहे तशी?
10 Jul 2013 - 7:38 pm | सुधीर
दाल बाटीचा आस्वाद घ्यायला मिळेल असं मुंबईतलं नावाजलेलं ठिकाण कुणी सांगितलं तर आभारी राहीन.
22 Nov 2014 - 11:29 pm | बोका-ए-आझम
बाबुलनाथ मंदिरासमोरचं ' सोम ' आणि भाटिया हाॅस्पिटलजवळचं ' स्वाती स्नॅक्स '.
10 Jul 2013 - 7:45 pm | अनन्न्या
पण फोटो पाहून प्रयत्न करायला हरकत नाही असे वाटतेय. तुमचा राजस्थानी फोटो मस्तच!
10 Jul 2013 - 8:14 pm | अजो
होटेलात एकदा दाल बाटी खाल्ली आहे. फारशी आवडली नाही. एखाद्या दिवशी ह्या प्रकाराने करून बघेल.
बाकि फोटो एकदम मस्त.
10 Jul 2013 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
रोचक गोष्टीच्या सजावटीत पेश केलेली दालबाटी दिसायला तर एकदम खमंग दिसतेय. नक्कीच खावून बघीतली जाईल !
10 Jul 2013 - 10:03 pm | garava
पाकृ मस्तच..
पण ओव्हन शिवाय बाटी कशी करायची?
11 Jul 2013 - 5:10 am | स्पंदना
ओव्हन शिवाय बाटी तुम्ही केक पॅनमध्ये करु शकता, किंवा एका मोठ्या भांड्यात (जुना कुकर शक्यतो वापरात नसलेला) घेउन त्यात वाळु पसरा तळाला, वाळु गरम झाली की आंच कमी करुन त्यात दुसर्या एका भांड्यात किंवा ताटलीत बाटी ठेवुन मंद आचेवर १५ मिनिट ठेवा. नंतर आच बंद करुन न उघडता ठेवले तर बाटी तयार होतील.
किंवा आजकाल गॅस ओव्हन पण मिळतात. पावभाजी साठी पाव तयार करायला एका कुकरी शो मध्ये हा गॅस ओव्हनचा प्रकार पाहिला होता मागे एकदा. तो ही चालेल.
11 Jul 2013 - 12:24 am | कवितानागेश
मस्त लिहिलय. पण तरिहि मी करेन असं वाटत नाही. :P
11 Jul 2013 - 5:12 am | स्पंदना
थांब आता! नाही तुला बाटी खायला घालुन बाटवलं, तर नाव सांगणार नाही. :D
13 Jul 2013 - 8:36 am | सस्नेह
आम्ही पण रेडी आहोत बरं बाटायला !
11 Jul 2013 - 4:52 am | रेवती
पुन्हा एकदा फोटू बघून गेले.
11 Jul 2013 - 10:38 am | गवि
बाट्या कशा अगदी लाडवांसारख्या दिसताहेत ना? उदा. तंबिटाच्या लाडवांसारख्या..
11 Jul 2013 - 1:15 pm | बॅटमॅन
तंबिट!!!!!!!!
आईची आई करायची हे लाडू कधीमधी त्याची आठवण झाली या निमित्ताने एकदम :) मस्त चव असायची.
11 Jul 2013 - 1:24 pm | कवितानागेश
कधी मिळ्णार हे लाडू?
:D
11 Jul 2013 - 2:05 pm | बॅटमॅन
समय से पहले भाग्य से ज्यादा कुछ नै मिळता ;)
13 Jul 2013 - 1:51 am | सूड
जे क्या होता हे भाय?
11 Jul 2013 - 7:42 pm | रेवती
गवि, तुम्ही मला माफ कराच आता! मी प्रयत्न केला नाही असे नाही पण काही केल्या तसे लाडू जमत नाहीयेत. त्यासाठी भारतात असायला हवे. इथे केलेले लाडू दोनदा काळपट झाले. संपवताना नाकी नऊ आले होते.
11 Jul 2013 - 6:11 am | नगरीनिरंजन
अप्रतिम! पाककृती इतकीच लिहिण्याची पद्धत आवडली!
_/\_
11 Jul 2013 - 10:25 am | रुमानी
अपर्णा तुमची नाही व पिलियन पिलीयन रायडरने बनविली तसे हि नाही..! तर त्यांच्या सासुबाई करतात त्या प्रमाणे :) . पण मी त्याच्यात थोडा खाण्याचा सोडा पण घालते जेने करून त्या खुस -खुशीत होतात व त्या गोळ्याचे सारखे ४/६ भाग करून तळते ,ह्या बफ्ल्या आणि हेच गोळे जेव्हा आहारावर भजतो त्याला बाटी असे म्हन्तो. तसे तुमची पद्धतही छान आहे . तसे दाळ हि तुमची वेगळीच आहे . आमच्याकडे ती जरा पातळ असते व केवळ त्यां साठी तुरीची डाळच वापरतो तुमच्या पद्धतीने हि एकदा नक्की करून पाहिलं :)
11 Jul 2013 - 1:27 pm | सुहास..
@श्रुती ...मराठवाडा का ?
मच्याकडे ती जरा पातळ असते व केवळ त्यां साठी तुरीची डाळच वापरतो तुमच्या पद्धतीने हि एकदा नक्की करून पाहिलं >>
करेक्ट ...विषेश सांगायचे म्हणजे मी जी खाल्ली त्यात हळद टाकत नाहीत , तर ती बाटी त टाकतात :)
11 Jul 2013 - 5:04 pm | रुमानी
हो एकदम करेक्ट ...मराठवाडा च !
काहो पण......? :)
11 Jul 2013 - 5:49 pm | कर्ण
त्या पेक्षा तूर दाल मध्ये ज्वारी ची भाकरी कुस्करून, तूप घालून खालेल्ला बरा … स्वाद लागतो
12 Jul 2013 - 5:01 am | स्पंदना
ओ? भाकरीची आठवण कोणी काढायला सांगीतली होती? ऑ?
झाली का पंचाइत? जावा आता पिठ शोधायला.
आणि हे बघा भाकरीची तुलना बाकी कोणत्याही चवीशी होत नसल्याने आम्ही ती कटाप समजतो कळलं?
नाव कर्ण आहे मग काय भाकरी दान करणार का काय? अन करत असलात तर कोठे दान करता तेही कळवा.
उगा सक्काळी सक्काळी डोक्याला शॉट...
12 Jul 2013 - 5:47 am | धमाल मुलगा
बुट्टीतल्या भाकर्या..त्यातली एखादी शिळी. त्या शिळ्या भाकरीवर तेल-तिखट-मीठ अन मेतकुट कालवून फासलेलं, सोबत झुणका नायतर पिठलं, बचकभर ठेचा/खर्डा, लसणाच्या चटणीचा गोळा, पातीचा कांदा, गाडग्यातलं कवडी-कवडीचं दही, वाटीभर काकवी, त्यात साजूक तूप....अन हे सगळं हादडून झाल्यावर गप्पा मारत चघळायला एखादं ऊसाचं कांडकं. :D
12 Jul 2013 - 6:05 am | स्पंदना
कुणी हाय का?
धम्याची सुपारी द्याची हाय! कोण हाय का तयार?
धम्या तुझ दिस भरलं! कुटल्या देवाच नाव घ्याच आसल तर लागलीच घे. म्या सुपारी काढल्या तुझ्या नावाची.
12 Jul 2013 - 6:08 am | धमाल मुलगा
दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी.... :)
12 Jul 2013 - 1:02 pm | दिपक.कुवेत
वाचुनच तोंडाला पाणी सुटलयं.....फार मिस करत असशीला ना हे सगळे पदार्थ?
13 Jul 2013 - 2:05 am | स्मिता.
बास झालं आता! नाहीतर त्या ऊसाच्या कांडक्यानेच मार खाशील... ऊस खाऊन कित्येक वर्षं झाली असतील :(
14 Jul 2013 - 6:32 pm | प्यारे१
घोळ मिटवून आज सकाळी घरला पोचलो. आनि पयला पोराला बगिटलो. त्ये झालं की .... आनि मग साडेपाच म्हैन्यांनी पोहे खाल्लो. (च्यामारी त्या अल्जेरियन लोकांच्या. हे सुट्टी संपेस्तवर ;) )
आनि दुपारी जेवताना काय जेवलो म्हायत्ये?
मेथीची भाजी लसूण फोडणी वाली नि जोंधळ्याची भाकरी. तुमाला अॅअॅअॅअॅअॅअॅ! ;)
15 Jul 2013 - 8:00 am | स्पंदना
कितीही अॅअॅअॅअॅ केलास तरी वैनीच्या हातच्या भाकरीचा राग नाही धरणार मी, आज ना उद्या मला खाऊ घालेलच ती.
खाऊन घ्या! खाऊन घ्या! उगा भाव नका मारु!
13 Jul 2013 - 9:10 am | किसन शिंदे
सर्वात वरचं रंगीबेरंगी कुंटूंब आवडलं. या पाककृतीवरून एकदा चव घ्यायला हरकत नसावी असंच वाटतंय.
13 Jul 2013 - 9:45 am | अजया
अपर्णा, मस्तच गं! इन्दुरला एका मारवाडी लग्नात हा पदार्थ संपवताना जीव गोळा झाला होता!! कसाबसा संपवला नाही तर नवर्या मुलीच्या वडिलांनी अरे, एतनेसे क्या होगा डॉक्टर, करत एक रास ताटात वाढली होती, तेव्हा अक्षरशः हात जोडुन पळुन आले होते!!
18 Sep 2014 - 9:47 pm | अतुल झोड
डिश फारच सुन्दर वाटली ......
27 Sep 2014 - 9:56 am | संजय कथले
सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला.
सासरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला
सासू माझी जाच करिते लवकर न्येई ग तिला
भवानी आई, रोडगा वाहीन तुला
भवानी आई ....................