उत्तराखंड राज्यातील सद्य भयावह परिस्थितीवर नक्की काय लिहायचे कसे लिहायचे हा मोठा प्रश्न आहे. या वर लिहायला घेतले खरे पण या लेखनाचा नक्की साचा कसा असावा हे ठरवू न शकल्याने मुक्त स्वगत लिहीत आहे. यात अनेक मुद्द्यांना स्पर्श केला आहे मात्र त्यात सुसूत्रता असेलच असे नाही.
=========
रविवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री श्री. विजय बहुगुणा यांची श्री.करण थापर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली/पाहिली. या पदावरील व्यक्तीने जितका प्रामाणिकपणा दाखवणे अपेक्षित आहे तितका या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी दाखवला असे माझे मत झाले. २००७ मध्ये स्थापन झालेल्या राज्यस्तरावरील दुर्घटना नियोजन आयोगाची एकही सभा न होण्याची किंवा राज्याला "अतिवृष्टी'ची पूर्वसूचना मिळण्याची कबुली वगैरे या मुलाखतीत आहे. मात्र त्याच बरोबर त्यांनी उभे केलेले मुद्देही ग्राह्य आहेत असे वाटते. या वर्षी तेथे झालेला वर्षाव हा नजीकच्या भूतकाळातील सर्वात मोठ्या प्रमाणावरचा आहे. इतक्या मोठ्या (आणि अपवादात्मक) दुर्घटनेला यशस्वी तोंड देण्यासाठी कोणतीही संस्था/राज्य/देश तयार राहणे आर्थिकदृष्ट्या कितपत शक्य आहे यावरही विचार व्हायला हवा. शिवाय अशा परिस्थितीत सरकारने व शासकीय यंत्रणेने काय करता येऊ शकले असते किंवा काय करायला हवे होते या स्वरूपाच्या चर्चा या क्षणी करणे कालापव्यय आहे हा मुख्यमंत्र्यांचा मुद्दाही मला मान्य आहे.
मात्र सरकार बरोबरच मिडिया, आपण जनता, आपत्तीग्रस्त पर्यटक आणि आपत्तीग्रस्त स्थानिक यांनाही यातून बरेच काही शिकण्यासारखे आहे असेही वाटते. अश्या परिस्थितीमध्ये सगळी जबाबदारी सरकारवर टाकणे हा उच्च कोटीचा बेजबाबदारपणा आणि दांभिकपणा झाला असे वाटते.
सर्वप्रथम आपत्तीग्रस्त पर्यटकांचा विचार करूया. या प्रसंगाच्या निमित्ताने माझ्यामते सर्वाधिक दांभिक (आणि म्हणूनच संतापजनक) आचरण या गटाने केले आहे. सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की विविध भौगोलिक परिस्थितीत असणार्या भूप्रदेशांशी निगडित काही अंगभूत सुविधा असतात तसेच तेथे काही अंगभूत जोखमीसुद्धा असतात. कोणत्याही ठिकाणी पर्यटनाला जाताना तेथील सौंदर्यानुभव, विश्रांती, तेथील सामाजिक वैशिष्ट्यांचा आनंद घेणे (जसे आहार, राहणीमान, उत्सव,धार्मिकता वगैरे) या गोष्टींबरोबरच तेथील भौगोलिक तथ्यांचा अभ्यास करून तेथील जोखमींचाही विचार करणे आवश्यक असते. हिमालयापुरता विचार करायचा तर या भागात भूस्खलन, ढगफुटी हे काही दुर्मिळ प्रकार नाहीत. यंदा हे प्रकार इतक्या मोठ्या भूभागात झाल्यामुळे व पर्यटनाचा मोसम असल्याने या दुर्घटनेच्या भयावहतेत इतकी वाढ झाली आहे. मात्र वैयक्तिक किंवा कौटुंबिक पातळीवर काही गोष्टी जवळ न बाळगणे ही या पर्यटकांची चूक नाही का? स्वानुभव सांगतो: आम्ही जेव्हा जेव्हा या प्रदेशात गेलो आहे तेव्हा तेव्हा कापराचा फोल्डिंग स्टोव्ह आणि बरीचशी मॅगी पाकिटे जवळ बाळगली आहेत. अनेकदा भूस्खलनामुळे एखादा घाट १२-१४ तासांसाठी बंद असल्यास याचा आम्हाला अतिशय उपयोगही झाला आहे. या स्टोव्हचे वजनही तितके नसते आणि आकारही. प्रत्येकाने स्टोव्ह नेले पाहिजेत असे नाही पण, या अश्या प्रकारच्या भौगोलिक भागात जाताना स्वतःकडे किमान २-३ दिवसांचा अतिरिक्त अन्नसाठा नसणे ही सरकारी चूक कशी? तीच गत औषधांची. एका च्यानेलवरील डॉक्टर सांगत होते की बहुतांश व्यक्ती या ठणठणीत आहेत केवळ जुलाब, विरळ हवे मुळे होणारी किरकोळ डोकेदुखी, चक्कर वगैरे आजारांचे स्वरूप आहे. या सगळ्याचा विचार दुर्घटना झाली नसती तरी पर्यटकांनी वैयक्तिक पातळीवर करायला हवा होता असे वाटते. इतक्या उंचीवर सफर करण्याआधी आपली शारीरिक तपासणी न करणे, आवश्यक व त्या भौगोलिक परिस्थितीस योग्य त्या प्रकारची "प्रथमोपचार करण्यायोग्य औषधे" जवळ न बाळगणे वगैरे कडे काणाडोळा करून मिडियासमोरच्या मुलाखतीत स्वतःच्या निष्काळजीपणाबद्दल जराही खंत न बाळगता केवळ सरकारच्या अपुर्या सुविधेला दोष देणे हा शुद्ध दांभिकपणा वाटतो.
दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा पडतो की "सरकारी मदत हा आपत्तीग्रस्तांचा हक्क आहे का?". अश्या वेळी सरकारने मदत करणे ही जनतेची अपेक्षा असणे योग्यच. किंबहुना सरकारने मदत करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र तो आपत्तीग्रस्तांचा विशेषतः पर्यटकांचा "हक्क" असावा का? "सरकारने कसे तंबू दिले आहेत, तेथे एकीकडून थोडे पाणी गळतेच शिवाय ६-८ लोकांना एकाच तंबूत झोपावे लागते. त्यामुळे आमचे हाल होत आहेत" अशा प्रकारे केवळ क्यामेरा दिसतो आहे म्हणून आरडाओरड करणार्यांकडे पाहिलं की संताप होतो. एकतर ती "मदत" आहे, दुसरी गोष्ट तुम्ही काही तिथे कायमचे राहणार नाही आहात, तुमच्या सोयीसाठी सरकारने एक "तात्पुरती" सोय केली आहे, त्याउप्पर या असल्या टिपण्या अगदीच बेजबाबदार वाटतात. तिच गत "हेलिकॉप्टर राइड"ची. काही ठिकाणी रस्ते गाडी वाहतुकीसाठी योग्य स्थितीत नसले तरी त्यावरून चालत जाणे आता शक्य झाले आहे. सरकार व लष्कर आपत्तीग्रस्तांना विनंती करते आहे की जे धडधाकट आहेत त्यांनी १०-१२ कि.मी रस्त्याने चालत जावे व नंतर गाडीने जायची सोय केली आहे व उरलेल्या वयस्कर, जखमी व लहान मुले व त्यांच्या आया यांना हेलिकॉप्टरची सोय आहे. पण कित्येक मंडळी त्यास तयार नाहीत. त्यांना बहुदा फुकटात "हेलिकॉप्टरमध्ये बसायला मिळतेय तर कशाला सोडा" असा भाव असावा अशी शंका घेण्यास जागा आहे. मिडियात दिसणारे व्हिडियो व वृत्तपत्रातील छायाचित्रे हेच दाखवत आहेत की जी मदत पोचते आहे ती 'ओरबाडली' जाते आहे. या पर्यटकांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की ते तेथे अडकले आहेत, त्यांनी सुविधा नाहीत हा ओरडा करत राहण्यापेक्षा लष्कर व सरकारला मदत करत मिळणार्या सुविधांचा अधिक जबाबदारीने वापर करणे गरजेचे आहे.
=========
आपत्तीग्रस्त पर्यटकांइतकेच मिडियाने या भागात ज्या दर्जाचे वार्तांकन केले आहे त्याकडे बघता "बोभाटा" या व्यतिरिक्त त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही. आपत्तीग्रस्त भागात आम्ही कसे पहिले पोचलो आणि तेथील पहिली 'व्हिज्युअल्स" आम्ही कशी पोचवली याचेच कवतिक! वार्तांकन करणार्या 'मिडीयापर्सन'ने स्वतः रिव्हर क्रॉसिंग करून लष्कराचा वेळ वाया घालवणे असो की क्यामेरासमोर येण्याची अहमिका लागलेल्या अडकलेल्या टुणटुणीत पर्यटकांच्या तथाकथित व्यथांचा बाजार मांडणे असो. एकुणातच त्यांनी या आपत्तीचे पॉर्न केले आहे असा माझा आरोप आहे. तेथील जमिनीवरचे प्रश्न मांडण्यापेक्षा तेथील उत्तम व्हिज्युअल्स आणि न जमल्यास सनसनाटी "ऑडियो" मिळवून भडक सादरीकरण करण्याव्यतिरिक्त या मिडियाने काहीही केलेले दिसत नाही.
========
त्यानंतर येतो ते आपण! टीव्हीपुढे चिकटून ती विदारक दृश्ये चवीने बघत "उफ् उफ्" करत दिवाणखान्यात चर्चा झोडणारे तेच ते आपण! "मग काय तिथे प्रत्येकाने मदतीला जावे काय?" हा प्रश्न लगेच येईल याची कल्पना आहे. किंवा "आम्ही पंतप्रधान-निधीला / मुख्यमंत्री निधीला / NGOला पैसे/मदत देण्याव्यतिरिक्त काय करू शकतो?" हा सवालही येऊ शकतो. याचे उत्तर आहे आपल्या भागात येऊ शकणार्या आपत्तीला तोंड द्यायची तयारी.
इतके सगळे बघूनही आपल्यापैकी किती जणांनी आपत्ती आल्यास घरात कोणी कोणती कृती करायची याचा प्लॅन बनवला आहे? उद्या काही झाले तर घरातील कोणत्या वस्तू वाचवण्याला प्राथमिकता द्यावी यावर ठाम विचार किती घरांत झाला आहे? आपल्या सोसायटीत, चाळीत, गल्लीत (किंवा तत्सम समूहांत) किती ठिकाणी सुरक्षेबद्दल मीटिंगा लागल्या आहेत? आपल्या सोसायटीतील, गल्लीतील पाणी जायची व्यवस्था किंवा आग लागल्यास बाहेर पडायची सोय यावर तुम्ही विचार केला आहे काय?नैसर्गिक आपत्तीत आपले घर, दुकान वगैरे अडकल्यास सुरक्षा देणारे विमा काढणे तितकेही महाग नसावे. शिवाय आयुर्विमासुद्धा!
का मोठी आपत्ती आल्यावर पुनर्वसन व साहाय्य करणे ही केवळ सरकारी जबाबदारी असल्याचे तुम्हीही मानता?
======
बाकी, सारे पर्यटक, मिडिया, लष्कर, हवाईदल वगैरे १५-२० दिवसांत निघून जातील पण तेथील स्थानिकापुढे अधिक मोठा आणि कित्येकपटीने भयाण प्रश्न उभा आहे. कित्येकांची घरे वाहून गेली आहेत, कित्येकांची दुकाने वाहून गेली आहेत. त्यांनी काय करायचे? हा जितका राज्य सरकार, केंद्रसरकारने विचार करायचा प्रश्न आहे तितकाच तो त्या त्या कुटुंबाने विचार करायचा प्रश्न आहे असे वाटते. गावाचे पुनर्निमाण करताना पुन्हा अश्या आपत्तीची काळजी घेऊन निर्माण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. आणि त्यासाठी गावकर्यांनी काही असुविधा झाल्यास, स्थलांतर करावे लागल्यास त्याची तयारी दाखवणे आवश्यक आहे असे वाटते.
असो. फार विस्कळीत विचार आहेत. बराच विचार करून तयार झालेली मते नव्हेत. या विषयावर चर्चा झाल्यास या स्वतःच्याच प्राथमिक मतांत बदल करून एक माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून अधिक विधानात्मक/संरचनात्मक मत घडावे इतकाच या मुक्तकाचा उद्देश!
प्रतिक्रिया
25 Jun 2013 - 8:17 pm | पैसा
असं आहे खरं. आता याहून मोठे काहीतरी संकट येईपर्यंत सगळे लोक हे विसरून गेलेले असतील. तेव्हा परत नव्याने बोंबाबोंब करायला आपण सगळे तयार असूच!
25 Jun 2013 - 8:41 pm | पिंपातला उंदीर
पंतप्रधानानी स्वताहा पाण्यात उतरून मदत कार्य करावे अशी अपेक्षा असणार्या काही चेपु पोस्ट्स पाहून मानसिक धक्का बसला. असो.
27 Jun 2013 - 12:04 am | काळा पहाड
बसणारच! सरंजामशाही विचारसरणीचा परिणाम, दुसरं काय! बाकी तो सरदार या सुद्धा लायकीचा नाही.
25 Jun 2013 - 10:16 pm | श्रीरंग_जोशी
या लेखात मांडलेले संतुलित विचार पटत आहेत. भारतीयांचे काही गोष्टींचे वेड नियंत्रणात येणे (जसे सोने खरेदी व तीर्थयात्रा) देशासाठी फारच गरजेचे आहे.
वृत्तवहिन्यांच्या प्रवॄत्तीबद्दल संपूर्णपणे सहमत. एक काळ असा होता की मी सतत वृत्तवाहिन्यांवरील बातम्या व चर्चा बघत असे. गेल्या २-३ वर्षांपासून हे मी जाणीवपूर्वक थांबवले अन तोच वेळ चांगले चित्रपट व माहितीपट पाहण्यात घालवतो. वॄत्तपत्रांच्या जालिय आवृत्त्यांमधल्या बातम्या वाचत असतोच पण वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम पाहण्यापेक्षा हे नक्कीच बरे आहे.
लेखकाने सुचविलेल्या वैयक्तिक व सामुहिक उपाययोजनांबद्दल लेखकाचे धन्यवाद.
2 Jul 2013 - 7:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
न्युज एक्सप्रेसचा रिपोर्टर नारायन परगाई पाहा याचे वृत्तांकन. आता त्याला काढून टाकल्याचेही वाचले.
बाकी, ऋषिकेशच्या काही मताशी सहमतच.
-दिलीप बिरुटे
25 Jun 2013 - 10:22 pm | राघवेंद्र
एकदम मनातले लिहीले आहे. धागा कढल्या बद्द्ल धन्यवाद.
माझ्यामते सिडको सारख्या संस्थाना अधिकार देउन शहरे सुस्थितीत राखली पाहिजेत.
घरातील बजेट मध्ये सुरक्षेबद्दल थोडी तरतुद केली पाहिजेत.
25 Jun 2013 - 10:46 pm | कवितानागेश
खरं आहे. स्थानिकांपुढचा प्रश्न जास्त भयानक आहे.
पुढची काही वर्षे पर्यटनावर विपरित परिणाम होणार आहेच. अश्या वेळेस खरे तर स्थानिक लोक सरकारी मदतीवर जास्त अवलम्बून आहेत. त्यांना पुन्हा उभे रहाणे कठीण जाणार आहे.
26 Jun 2013 - 12:00 am | सुबोध खरे
एक मनात आलेली गोष्ट.
अशा वातावरणात वायू सेना आपली हेलीकोप्टर साधारणपणे चालविणार नाहीत पण या स्थितीत असे नाही म्हणणे त्यांच्या वरिष्ठांना( authorities) शक्य नाही. आणि या विमान किंवा हेलीकोप्टरचे नेहेमीचे सर्व्हिसिंग किंवा सर्वसाधारण (routine maintainance प्रतिशब्द आठवत नाहीये ) जो दर २५ किंवा ५० तासांनी होतो तो तरी करता येईल काय? मानवतेच्या आणि राजकीय कारणांसाठी ते पुढे ढकलले जाईल.असे नौदलात मी प्रत्यक्ष पहिले आहे तेंव्हा वायुदलात पण होत असणारच मग ती काळजी आणि तेल पाणी न झालेली विमाने चालविताना वैमानिकाला एक किंतु मनात येऊ शकतो. शेवटी जमिनीवर चालणारे वाहन बंद पडले तर बाजूला लावता येते उडणारे विमान तसे नाही.
लष्कराच्या जवानांच्या बद्दल असे बर्याच वेळा ऐकले आहे कि आता हे थोडेफार काम करत आहेत. नाही तर १९७१ नंतर कारगिल चे काही दिवस सोडले तर युद्ध झालेच कुठे. इतर वेळी हे लोक काय करतात. फुकटचे रेशन तर खात असतात आम्ही भरलेल्या करातून. (हि अतिशयोक्ती नाही प्रत्यक्ष माझा झालेला संवाद आहे मी लष्करात असताना)
असो.
26 Jun 2013 - 11:50 am | सौंदाळा
दुर्दैवाने आजच हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाल्याची बातमी वाचली आणि वरील माहितीची प्रचिती आली.
अवघड आहे.
जे डॉ. असुन (प्रत्यक्ष विमान/हेलिकॉप्टर न चालवता असे समजुन)तुम्ही सांगता ते या लोकांना माहिती असणारच, असे असुनही ही घटना होणे म्हणजे अक्षम्य दुर्लक्ष आहे असं वाटतं.
26 Jun 2013 - 3:54 pm | मोदक
:-(
हेच लिहायला आलो होतो रे सौंदाळा!
27 Jun 2013 - 12:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
...नाही तर १९७१ नंतर कारगिल चे काही दिवस सोडले तर युद्ध झालेच कुठे. इतर वेळी हे लोक काय करतात. फुकटचे रेशन तर खात असतात आम्ही भरलेल्या करातून. (हि अतिशयोक्ती नाही प्रत्यक्ष माझा झालेला संवाद आहे मी लष्करात असताना)
...
अशी मुक्ताफळे उधळणार्यांच्या अकलेबद्दल काय म्हणावे !?
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सैन्य उभारले आहेच तर रोज कोणा ना कोणाशी युद्ध उकरून काढायचे की काय? किंवा मग युद्ध सुरु झाल्यानंतर सैन्य उभारायला लागायचे (तहान लागल्यावर विहिर खणायची) ? या दीडशहाण्यांच्या मुक्ताफळांतील वायफळपणा बालबुद्धीलाही सहज समजेल.
पण सतत खड्या सशस्त्र दलाचे महत्व व्यवहारात त्याच्याही फार पुढे आहे. याला व्यवस्थापनात Deterrent Factor असे म्हणतात. सामर्थ्यवान राष्ट्रावर त्याचे 'उघड शत्रू' हल्ला करायला घाबरतात आणि 'छुप्या शत्रूंसकट इतर सर्व' नाईलाने का होईना मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवतात. "युद्ध होऊ न देता, युद्ध जिंकल्याने होणारे सर्व फायदे कमावणे" हे सर्वात शहाणपणाचे आणि फायद्याचे युद्धतंत्र आहे !
आजच्या घडीला भारताच्या सशत्र दलाच्या (Armed Forces) संख्येमुळे आणि पात्रतेमुळेच केवळ पाकिस्तान सारखे राष्ट्र उघड हल्ला करायला कचरते आहे. मात्र स्वतःच्या शक्तीचा योग्य उपयोग करण्यात भारतीय राजकीय इच्छाशक्ती सतत कचखाऊ असल्याचे पुरेपूर समजून असल्याने छुप्या कुरापती काढणे मात्र सतत चालू ठेऊन आहे. जर भारताकडे सबळ सशस्त्र दले नसती तर अश्या उघड आणि छुप्या शत्रूंनी भारताची काय अवस्था केली असती आणि वरच्यासारखी बाष्कळ बडबड करणार्या अतीशहाण्यांसकट सर्व भारतीय नागरीकांची काय अवस्था झाली असती हे विस्ताराने सांगण्याची गरज नाही.
सगळं काही आलबेल आहे असे म्हणत नाही, पण "अचानक येणार्या शत्रूच्या गोळ्या झेलण्याची तयारी ठेवून सिमेवर अथवा LOC वर आपले सैनीक उभे आहेत म्हणून तुम्ही-आम्ही आपल्या घरात रोज सुखाने झोपतो." ही काही कवितेची ओळ नाही तर सत्यस्थितीचे वर्णन करणारे वचन आहे हे मात्र नक्की.
26 Jun 2013 - 12:23 am | शिल्पा ब
अशा परीस्थितीत एकमेकांना मदत करुन आहे त्या परीस्थीतीत तरुन जाणे हे महत्वाचे आहे... :(
सरकार / लष्कर तरी किती पुरणार?
26 Jun 2013 - 12:32 am | विकास
सर्वप्रथम मुक्तक आवडले.
"आम्ही पंतप्रधान-निधीला / मुख्यमंत्री निधीला / NGOला पैसे/मदत देण्याव्यतिरिक्त काय करू शकतो?" हा सवालही येऊ शकतो. याचे उत्तर आहे आपल्या भागात येऊ शकणार्या आपत्तीला तोंड द्यायची तयारी.
हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. त्याकडेमात्र दुर्लक्ष होते.
त्यांनी काय करायचे? हा जितका राज्य सरकार, केंद्रसरकारने विचार करायचा प्रश्न आहे तितकाच तो त्या त्या कुटुंबाने विचार करायचा प्रश्न आहे असे वाटते. गावाचे पुनर्निमाण करताना पुन्हा अश्या आपत्तीची काळजी घेऊन निर्माण होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
असे वाटू शकते की हे केवळ विकसनशील अथवा अविकसीत भागातच होत असावे. पण वास्तव वेगळे आहे असे वाटण्यासारखी परीस्थिती आहे. पश्चिम किनारपट्टीचे माहीत नाही, पण अमेरीकेतील पूर्वकिनारपट्टीवर अनेक जण अक्षरशः सागरकिनारी घरे बांधतात. कधी कधी त्यांचे ते दुसरे घर असते तर कधी कधी एकच असले तरी पेश्शल म्हणून तसे बांधलेले असते. त्याव्यतिरीक्त साध्या माणसांची घरे देखील अशा ठिकाणी कामाकरता म्हणून असतातच... पण आता लक्षात येत आहे की अनेक ठिकाणी घरात पूर येतो, मग विम्यातून आणि सरकारच्या आपत्कालीन व्यवस्थेतून पैसे द्यावे लागतात वगैरे... म्हणून न्यूयॉर्क राज्याचा गव्हर्नरने तर आता अशा काही जागा सरळ विकत घेऊन बांधकामांपासून दूर ठेवण्याचे ठरवले आहे. आता ते कधी होईल ते माहीत नाही, पण काही तरी धोरण म्हणून विचार केला जातो, ते आमलात आणायचे प्रयत्न केले जातात. आपले राज्यकर्ते आणि जनता देखील धोरणे ठरवत नाहीत आणि ठरवली तरी ती इतरांकरताच असतात अशा पद्धतीने वागते... उदा. मिठी नदीची काय अवस्था आहे सांगा बर!
आपत्कालीन व्यवस्थापन हे आजही आपल्याकडे खूप ठरवले गेले आहे असे वाटत नाही. त्याचे महत्व वाटणे तर लांबच राहूंदेत! हा नक्कीच सरकार (शासन/शासकीय अधिकारी), राज्यकर्ते (सर्वच) आणि विशेष करून उच्चभ्रू वर्ग यांच्या अनास्थेचा प्रश्न आहे. दुसरा भाग आहे तो चुकीची दुरूस्ती अर्थात करेक्टीव्ह अॅक्शन्स...
जागतिक पर्यावरण बदलामूळे आक्स्मात नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता सर्वत्रच वाढत आहे. त्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन हे लोकसंख्या जास्त असलेल्या कुठल्याही भूभागास आवश्यक आहे. एकीकडे विकसीत होण्याची स्वप्ने बघणार्या भारतास तर नक्कीच गरज आहे. ज्यावेळेस दुसर्यांच्या जीवाचे मोल वाटेल, तेंव्हा ते होईल असे वाटते. असो.
26 Jun 2013 - 9:28 am | ऋषिकेश
आभार!
सहमत आहेच.
मात्र,
याबद्दल सहमती असण्याबद्दल साशंक आहे ;)
तरीही
याबद्दल पूर्ण सहमती आहे :)
26 Jun 2013 - 9:43 am | स्पा
परफेक्ट लिहिले आहेस रे ऋ.
मिडीयाचा जो काही तमाशा सुरु आहे. त्यापुढे शब्दच संपतील . पत्रकारितेची विकृतीच म्हणावी लागेल .
26 Jun 2013 - 10:00 am | llपुण्याचे पेशवेll
ऋषिकेशशी सहमत होण्याचे प्रसंग फार कमी येतात. हा त्यातला एक.
आपल्या देशातली जनताच फालतू, बेजबाबदार, उठवळ आहे त्यामुळेच इथला मिडीया आणि नेते तसे आहेत हे आमचे मत तुम्ही संयत आणि वेगळ्या शब्दात मांडले आहे असे वाटते.
तुला पूर्ण अनुमोदन आहे.
पूर्वी चारधाम यात्रा वगैरे जिवावर उदार होऊन केल्या जात. लोक घरदारावर तुळशीपत्र ठेऊन यात्रेला जात इतकी ती कठीण होती. परंतु आता ही यात्रा अत्यंत सुखकर आहे. त्यामुळे पर्यटनाइतकी सोपी आहे. त्यामुळे सदर पर्यटकानी पर्यटन स्थळाच्या शक्य असलेल्या जोखमींचा विचारही जरूर करावा हे ही तितकेच खरे. असो.
26 Jun 2013 - 12:33 pm | विक्रान्त कुलकर्णी
आपल्या देशातली जनताच फालतू, बेजबाबदार, उठवळ आहे त्यामुळेच इथला मिडीया आणि नेते तसे आहेत हे आमचे मत तुम्ही संयत आणि वेगळ्या शब्दात मांडले आहे असे वाटते.
एकदम सहमत...... प्रसन्गाचे गांभीर्य ना मिडियाला नाभाविकांना "मूर्ख भाविकांना".. या ठिकाणी दोन वर्षांपूर्वी जपानमध्ये झालेल्या त्सुनामीच्या वेळी तेथील जनतेने दाखविलेला संयम वाखाणण्याजोगा होता.. महासत्ता उगाच कोणी व कसेही बनत नाही...
26 Jun 2013 - 12:48 pm | चौकटराजा
आपत्ती व्यचस्थापन म्हणजे त्यात गव्हरर्नन्स चा भाग आला. आयला आपल्या गल्लीतला साधा कचरा वेळेवर उचलायला
जमत नाही आपल्या पालिकाना. परवा एका बेंकेच्या लॉकर मधून ३ कोटीचे सोने राजस्थानी सुतारानी चोरून नेले. तेथील
क्लोज सर्कीट कॅमेरे बिघडले होते. सुतारांच्या कंत्राट दाराकडे त्यांचे नाव पत्याची नोंदच नव्हती. असा कारभार आपल्या देशात चालतो. ते त्यांचं जाउ द्या आमच्या मोलकरणीचे नाव देखील मला माहीत नाही. ती कुठे नक्की रहाते याचाही शीध
घेण्याचा प्रयत्न नाही. उद्या आमच्या घरीच चोरी झाल्यास आम्ही पोलिसाना तिच्याबद्द्ल काय माहीती देणार ?
26 Jun 2013 - 12:59 pm | श्रीगुरुजी
लेख चांगला आहे. अजून एक मुद्दा आलेला नाही. तो म्हणजे स्थानिकांचा केबलकार किंवा इतर पर्यायी वाहतूक व्यवस्थेला असलेला विरोध. आपले रोजगाराचे साधन हिरावून जाऊ नये म्हणून स्थानिक घोडेवाले किंवा डोलीवाले यांनी विरोध करून केबल कार येउन दिलेली नाही किंवा छोट्या बस/कार जाता येतील असा डांबरी रस्ता होऊन दिला नाही. परिणामी अशा आपत्ती प्रसंगी पुरात अडकलेल्यांना बाहेर आणणे हे खूप अवघड झाले आहे.
महाराष्ट्रात माथेरानमध्ये अगदी असेच आहे. तिथले स्थानिक घोडेवाले/सायकलरिक्षावाले यांचा डांबरी रस्ता करायला व त्यामार्गे पर्यटकांना स्वतःची वाहने घेऊन किंवा बससारख्या वाहनातून माथेरानमध्ये प्रवेश करून द्यायला सक्त विरोध आहे. त्यामुळे माथेरानला पोहोचणे व तिथे एका पॉईंटपासून दुसर्या पॉईंटला जाणे हे अत्यंत वेळखाऊ व खर्चिक काम आहे. पायी चालणे, पायी चालण्याच्याच गतीने घोड्यावर बसून जाणे किंवा त्याच गतीने ३ माणसांच्या मदतीने सायकलरिक्षात बसून जाणे हे तीनच पर्याय उपलब्ध आहेत. कचर्याने पूर्ण भरलेली मोठा कचर्याचा डंपर ३-४ माणसे चढावर, दगडधोंडे पसरलेल्या मातीच्या रस्त्यावरून जीव खाऊन ढकलत नेताना पाहून अतिशय वाईट वाटले. तिथल्या सायकलरिक्षामध्ये एका माणसाला ढकलण्यासाठी पुढे १ व मागे ढकलायला २ अशी एकूण ३ माणसे लागतात. एका माणसाच्या वाहतुकीसाठी ३ माणसांचे श्रम वापरणे हे मानवी श्रमांचे अवमूल्यन आहे. तसेच ही सायकलरिक्षा नसून "दो बिघा जमीन" मध्ये दाखविलेली पुढील माणसाने पोटापाशी पुढचा दांडा घेऊन चालत किंवा पळत जाऊन ओढायची डोली आहे. भविष्यात एखादी दुर्घटना माथेरानमध्ये घडली तर तिथे अॅम्ब्युलन्स किंवा इतर कोणतेही यांत्रिक वाहन जाऊ शकत नसल्याने (तिथे सायकल सुद्धा दिसली नाही) दुर्घटनाग्रस्तांना वेळेवर वाचवून एखाद्या मोठ्या रूग्णालयात नेणे हे अत्यंत कष्टाचे, खर्चिक व वेळखाऊ काम आहे कारण त्यांना घोड्यावर बसवून किंवा सायकलरिक्षात बसवून न्यावे लागेल. एकंदरीत माथेरान ही "टूरिस्ट अनफ्रेंडली" जागा आहे.
उत्तराखंडातील आपत्तींचा विचार करून केदारनाथ, माथेरान व जिथे पर्यटकांची वेगवान वाहतूक होऊ शकत नाही अशा सर्व ठिकाणी केबल कार, बसेस, कार इ. वाहनांची सोय असणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात दुर्घटनातील मनुष्य हानी कमी होऊ शकेल.
27 Jun 2013 - 4:11 pm | अनिरुद्ध प
लेख चांगला आहे. अजून एक मुद्दा आलेला नाही. तो म्हणजे स्थानिकांचा केबलकार किंवा इतर पर्यायी वाहतूक व्यवस्थेला असलेला विरोध. आपले रोजगाराचे साधन हिरावून जाऊ नये म्हणून स्थानिक घोडेवाले किंवा डोलीवाले यांनी विरोध करून केबल कार येउन दिलेली नाही किंवा छोट्या बस/कार जाता येतील असा डांबरी रस्ता होऊन दिला नाही. परिणामी अशा आपत्ती प्रसंगी पुरात अडकलेल्यांना बाहेर आणणे हे खूप अवघड झाले आहे.
आप्ल्या वरिल विधानाशी पुर्णपणे असहमत आहे काल दिनान्क २६/०६/२०१३ मधील लोकसत्ता व्रुत्तपत्रातिल तज्ञाचा अभ्यास अह्वाल वाचावा हि विनन्ती.
26 Jun 2013 - 10:44 pm | अर्धवटराव
आपल्याकडे दोन अत्यंत बेसीक व तेव्हढ्याच आवश्यक गुणाची प्रचंड वानवा आहे... शिस्त आणि कॉमनसेन्स.
अर्धवटराव
27 Jun 2013 - 12:50 am | रेवती
लेखन आवडले असे म्हणणार नाही, पटले असे म्हणॆन. या तीर्थयात्रा देवस्थानांमधील गर्दी, कचरा, व एकंदरीत व्यवस्था एरवी जेमतेम असते (म्हणजे नसते) तर आपत्कालीन परिस्थितीत किती हाल असतील आणि त्याचे वर्णन किती पटीने वाईट होत असेल याची कल्पनाच केलेली बरी.
27 Jun 2013 - 1:27 am | प्यारे१
लेख बर्याच अंशी पटला.
27 Jun 2013 - 7:42 am | स्पंदना
खरच कमालीचा गलीच्छापणा भरलाय आपल्यात. इथल्या पेपरमधली बातमी अशी की या पूरग्रस्त ठिकाणी एका वार्ताहराने पूरग्रस्ताच्या खांद्यावर बसुन लाइव्ह रिपोर्टींग केले. अन ते टि.व्ही. वर दाखवले गेले. वर त्या रिपोर्टरचा शेरा काय? तर म्हणे माझ्या स्टँडर्डची व्यक्ती त्या माणसाच्या घरी जाणे हे त्याचे भाग्य समजुन त्याने मला खांद्यावर बसवुन नदी पार करुन दिली. अन ते मला असा रिस्पेक्ट दाखवत असताना मी लाइव्ह रिपोर्टींग केले.
एकुण हल्ली मला मिडीया हा एका गिधाडापेक्षा वेगळा वाटत नाही. अक्षरशः कोणतीही न्युज "चावत" बसतात. तीच तीच माहीती घोळुन घोळुन सांगीतली जाते. मेल्याच दुखः नाही वर चला न्युज मिळाली असा आनंदच दिसतो स्गळी कडे.
चारधाम यात्रा ही आयुष्याच्या उतरणीत करुन मरणाला सामोरे जायची तयारी म्हणुन केली जाते अस निदान मला तरी ऐकुन माहिती आहे. आता देवाने पापं धुवुन काढायची ठरवल्यावर रडायच कशाला म्हणते मी?
त्यात उद्धव ठाकरे उठुन मोदिंवर बरसताहेत. माझा मुद्दा, मोदी गुजरात सरकारचा पैसा वापरुन तुमची मदत का करतील? तुम्ही काय करताय हप्ते घेउन? उठा! करा मदत! जो करतोय त्याला नाव ठेवुन काय साध्य होणार आहे?
27 Jun 2013 - 1:21 pm | गणपा
तुझे विचार विस्कळीत वाटले नाहीत. सगळेच मुद्दे पटावे असेच आहेत.
27 Jun 2013 - 8:11 pm | आतिवास
मुक्त चिंतन आवडलं.
पण "आपण" करायच्या गोष्टी आणि "सरकार"ने करायच्या गोष्टी एकमेकांना पर्याय म्हणून ठरतील ही अपेक्षा जरा भाबडेपणाची वाटली. आपण आपले काम केले पाहिजे आणि सरकारने सरकारचे. सगळे लोक फार चांगले असतील तर सरकार हवे तरी कशाला? लोक नीट वागत नसतील तर त्यांना वठणीवर आणायचे कुणी? (अर्थीत हे कायद्याचा बडगा दाखवून, नुसती मनमानी किंवा हडेलहप्पी करुन नाही!) सरकार आपण कशासाठी निवडून देतो? (भले त्याबद्दल मतमतांतरं असतील..)
अनेकदा अशा गैरव्यवहारात स्थानिक उच्चपदस्थांचा सहभाग असतो आणि म्हणून गैर गोष्टी चालू राहतात, कायदेशीरही बनतात ..
बाकी धर्माचा बाजार बनल्याने तीर्थक्षेत्रीही लोक 'गि-हाईक' म्हणून वावरतात; आणि प्रसारमाध्यमे - याबद्दल नव्याने बोलण्याजोगं काही नाही माझ्याकडे :-(
1 Jul 2013 - 2:58 pm | चिगो
पटला.. बाकी "आमचे किती हाल होताहेत, पहा" वाले लोक चारधाम यात्रेच्या कुठल्याही शारीरीक आणि मानसिक तयारीविना गेल्यासारखेच वाटते. पहिला परीच्छेद त्यामुळे अगदी पटला. "डिसास्टर मॅनेजमेंट", "मॉक ड्रिल्स", "एक्झिट / एस्केप रुट प्लानिंग" ह्याबद्दल जनतेत किंवा सरकारी लोकांमध्ये किती उदासिनता आहे, ह्याचा अनुभव आहेच. मॉक-ड्रीलला बाहेरही पडत नाही लोक.. कार्यालयांमध्ये "सुरक्षा मार्ग"चा मॅप इतक्या छोट्या साईजचा आणि बारीक प्रींटमधला असतो, की तो समजे समजेपर्यंत मरणार माणूस..
आमचा अजूनही "देवच वाचवेल / मारेल आम्हाला" वर प्रचंड विश्वास आहे. फॅटॅलिस्टीक अॅटीट्यूड (मराठी?) अजुन पुर्णपणे बाहेर आलेलो नाही आम्ही अजून. त्यात मग भ्रष्टाचार, अनियोजित विकास आणि बांधकाम, नैसर्गिक आपत्ती ह्यांची भर टाकली की ही असली विपत्ती निर्माण होते.. बाकी मिडीयाने "समजूतदारपणा" दाखवावा ही अपेक्षा करायला आता मन धजावत नाही. :-( टिव्ही बघून तर हेच वाटतंय की फक्त सैन्यदलेच काम करताहेत, प्रशासन झोपलंय. Understanding it really well, that why is it a thankless job..