२०१३ च्या पावसाळ्याची चाहूल लागली आणि ट्रेक चे बेत ठरायला लागले. फोनाफोनी, मेलामेली नको त्यापेक्षा प्रत्यक्षच भेटू असं ठरलं. आमच्या ‘चढवय्ये’ नावाच्या ट्रेक ग्रूप मधले फाउंडर आणि नियमित सदस्य असे आम्ही भेटणार होतो.
त्याप्रमाणे मी, प्रसन्न आणि स्वानंद एक दिवस भेटलो, पुढच्या सहा महिन्यातले ट्रेक्स ठरवायला. सी सी डी मधे आमची ही भेट रंगली. एकदम कॉर्पोरेट स्टाईल मधे कॅलेंडरं, डाय-या आणि पेनं काढली. तिथल्या वायफाय ची आयमाय झाली होती त्यामुळे जीपीआरएसचाच आधार घेऊन रिसर्च सुरू केला. सुमारे १०-१२ किल्ले आधीच यादी करून आणले होते त्यामुळे त्यातील एक एक नाव, काठिण्य पातळी, लागणारा वेळ, आणि जाण्याची उत्सुकता या निकषांच्या आधारे कॅलेंडरवर मांडलं. मोहीम जंगी ठरली. सुरुवात कशाने? तर जवळच असलेला, त्यातल्या त्यात सोपा म्हणवला गेलेला असा पेठ चा किल्ला. म्हणजेच कोथळीगड!
कर्जत पासून सुमारे २० किमी अंतरावर आंबिवली हे किल्ल्याच्या पायथ्याचं गाव आहे. कर्जत मुंबईपासून लोकल ने जोडलेलं असल्याने लोकलनेच जाऊ यावर एकमत झालं. कर्जत वरून जामरूख च्या एसटी ने तिथे जाता येतं. पण आम्ही बसवर अवलंबून न रहाता टमटम ने जायचं असं आधीच ठरवलं. मग काय! एसएमएस, फेसबुक, फोन या माध्यमातून चढवय्यांना निरोपरूपी आमंत्रणं धाडली. हो नाही करता करता साधारण ८ जण येतील अशी शक्यता वाटू लागली. आकडा ८ ते ५, ५ ते २, आणि २ ते ४ असा बदलला, आणि कहानीत ट्विस्ट आला. लोकलची जागा ‘लेगसी कंटिन्यूज...आल्टो’ ने घेतली. निघण्याची वेळ ४:३० वरून ५ झाली. डन !
फायनल टीम अशी झाली:- आमच्या ग्रूपमधला अॅंग्री यंग मॅन, म्हणजेच प्रसन्न उर्फ काका. कुठल्याही ट्रेक ला एव्हर रेडी असलेला, परेश; माफ करा, ‘द परेश’ उर्फ आमचा लोहपुरुष. या वेळी आमच्यासोबत पहिल्यांदाच येत असलेला चिंचवडचा निलेश. आणि मी.
आदल्या दिवशी ऑफिसमधे अंमळ उशीरच झाला. घरी आलो ते जवळजवळ जेवणाच्या वेळेला. एक दिवसाचा ट्रेक असल्याने फार तयारी नव्हती करायची, पण तरीही माझी घाई चालू होती. सॅक मधे कपड्यांचा जादा जोड, विंडचीटर, जुजबी क्रीमं, गोळ्या, ग्रूप मधे फेमस झालेले सुवासित टिश्यू, सर्च लाईट आणि कॅमेरा असं सामान भरलं. आणि शार्प पाच वाजता गाडीला स्टार्टर दिला. काकांकडे पोचायला मला ५:४५ वाजले. आणि कहानीला आणखी एक ट्विस्ट आला. पोलिसांना चकवा द्यायला हिंदी सिनेमातले गुंड जशा गाड्या बदलतात, तशी आम्ही आमची गाडी ऐन वेळी बदलली. आता आमचं वाहन होतं व्हाईट स्टॅलियन वेर्ना.
लोहपुरुषाला पिकप केलं तेंव्हा ’मी फार कॅज्युअल वाटत नाहीये ना?’ या त्याच्या प्रश्नातलं गूढ आम्हाला कळलं नाही. आम्ही एक साधंसं उत्तर देऊन त्याला बगल दिली आणि निघालो. डोंबिवली ते कर्जत हा गाडीसाठी अतिशय खडतर असा प्रवास करायला तासभराहून जास्त वेळ लागला. रस्ता प्रचंड वाईट आहे. बदलापूर नंतर ठीक आहे परंतु तिथपर्यंत .... कठीणच. चौथा गडी, निलेश, चिंचवडहून येऊन कर्जत ला आम्हाला भेटणार होता. कर्जत स्टेशन वर मी त्याला पिकप केलं, आणि स्टेशनाबाहेर आलो. ‘वडे चांगले मिळतात इथे!’ चारी माना डोलल्या, पुन्हा आम्ही दोघं स्टेशनात गेलो आणि ५ वडापाव ४ वडे असं फ्युएल घेऊन आलो. ट्रेक मधे नव्यांच्या जुन्यांना, आणि जुन्यांच्या नव्याने ओळखी व्हायला वेळ लागत नाही. वडापाव संपेपर्यंत आमच्यामधला ‘ओळख’ नावाचा ‘ओपन’ अॅक्शन पॉइंट ‘क्लोज’ झाला होता. गाडी आंबिवलीच्या दिशेने सुटली. चाळीस एक मिनिटात आंबिवली टच्च केलं. पायथ्याच्या हॉटेल कोथळीगड मधे चहा प्यायला आणि तिथेच व्हाईट स्टॅलियन ला पार्क करून निघालो.
हॉटेल कोथळीगड च्या बाजूनेच किल्ल्याची वाट सुरू होते. ही वाट सुमारे १० फूट रूंद असून चढाची आहे. वाट समतल नसून दगड गोट्यांची आहे त्यामुळे चालणं जरासं कठीण होतं. काही मीटर चालल्यावर एक वाट मुख्य रस्त्याला सोडून डावीकडे वळते. त्या वाटेने जावं. आम्ही दोन तीनशे मीटर चाललो असू, आणि एवढ्यातच सगळे घामाघूम झालो. श्वास धडधडत होते. रूंद रस्ता असला तरी चढाचा असल्याने अपेक्षेपेक्षा जास्त दम लागणार आहे हा अंदाज आला. ढगांचं दाट छप्पर अवघ्या परिसरावर पसरलं होतं पण पावसाचाच काय वा-याचाही लवलेश नव्हता. त्यामुळे दमछाक होण्यात अजून भर पडली. सुमारे ४ किमीचा हा असा रस्ता पार करून पेठ ला जायचं होतं.
आता लोहपुरुष रंगात येत होता. जिथे आम्हा सर्वसामान्यांना दरी दिसत होती तिथे याला शॉर्टकट दिसत होते. ‘अरे इथून चला इथे शॉर्टकट आहे!’ असं तो म्हणाला की आम्ही तिघे एकमेकांकडे बघायचो आणि पुढे चालायला लागायचो. एक वेळी म्हटलं बघू तरी काय म्हणतोय हा. मग एका ठिकाणी आम्हीही त्याच्याबरोबर पुढे सरसावलो. सर्रळ सरळ उतार दिसत होता, पण त्याच्या मते तो शॉर्टकट होता. ओके! मी आणि काका ‘आम्ही पुढे जाऊन रस्ता बघतो’ असं म्हणालो. जपत जपत पुढे गेलो तर खरंच निघाला की राव शॉर्टकट. थोडा बि‘कट’ असला तरी शॉर्टकट होता. ‘आहे आहे रस्ता आहे ! ’ असं ‘युरेका युरेका’ करून आम्ही मागे वळलो. आणि थक्क! लोहपुरुष एका दगडावर उभा होता. आमच्या दोघांच्याही सॅक एका हातात; त्याची सॅक पाठीवर. आम्हाला म्हणाला ‘घ्या’. आम्ही त्याच्या पायाकडेच बघत होतो. ‘अरे हे काय घातलंयस तू ***च्या?’ ‘काय?’, असं तो शांतपणे म्हणाला. ‘अरे स्लीपर काय घातल्यास??’ ‘हां! बूट खराब झालेले अरे. मी म्हटलं पण ना तुम्हाला की मी फार कॅज्युअल वाटतोय का ते...’ काही काळ सन्नाटा आणि मग संस्कृतमिश्रित हशा !
पुढे मग रमत गमत निघालेले आम्ही एका पठारावर आलो. इथून पेठच्या किल्ल्याचं, कोथळीगडाचं पहिलं दर्शन होतं. लांबवर हा किल्ला दिसतो आणि मधे दिसते ती अर्धवर्तुळाकार दरी. इथला परिसर अप्रतिम आहे. त्या दिवशी मात्र पावसाळा नुकताच सुरू झाल्याने परिसर म्हणावा तितका हिरवागार झालेला नव्हता. फोटो काढत आम्ही किल्ल्याच्या ‘अप्पर बेस’ ला पोहोचलो. ‘पेठ’ हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं सुमारे ६००-७०० लोकसंख्या असलेलं छोटंसं गाव. मुख्यत्वे भातशेती हा इथल्या लोकांचा उद्योग. इथे जेवायची खायची सोय छानपैकी होऊ शकते. भैरवनाथ हॉटेल मध्ये आम्ही आमच्या जेवणाची ऑर्डर दिली, कोकम सरबत ढोसलं, आणि किल्ल्यावर निघालो. इथे गावातल्या कुत्र्यांनी आमच्यावर यथेच्च भुंकून आपली रखवालदाराची भूमिका चोख पार पाडली. पण आम्ही बधत नाही म्हटल्यावर ते मागे सरले.
वाटेत, पुढे येणा-या ट्रेकर बांधवांना मदत, म्हणून आम्ही दगडांवर दिशादर्शक बाण मारण्याचा उपक्रम करत चाललो होतो. ‘टू गिव्ह समथिंग बॅक’ हा त्यामागचा विचार. किल्ल्याची चढाई सोपी आहे. नवख्यांनाही फार त्रास न घेता जमेल अशी. पेठ पासून किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत जायला पाउण एक तास पुरे होतो. दरवाजा भग्नावस्थेत आहे. त्या भग्न दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच एक भैरोबाचं देऊळ, आणि एक पाण्याचं टाकं लागतं. डावीकडे वळल्यावर भैरोबाची प्रशस्त गुहा आहे. गुहेत कोरीवकाम केलेले खांब आहेत, व एक दोन मूर्ती आहेत. गुहेतील जमीन सपाट आहे त्यामुळे वास्तव्यास ही जागा सोयीची आहे. गुहा तशी स्वच्छ आहे. कुणीतरी सत्कार्य केलेलं दिसतं इथे येऊन. गुहेत थोडावेळ टेकतो, तोच लोहपुरुष एका कळशीत टाक्यातलं फ्रीज ला लाजवणारं पाणी घेऊन आला. त्याने रिफ्रेश मारलं, आणि बिस्किटं, मफिन खाऊन आम्ही गडफेरीला निघालो. एव्हाना एक वाजला होता.
या गडाची खासियत म्हणजे ही गुहा, आणि कातळात खोदलेला वर्तुळाकार जिना जो आपल्याला किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर घेऊन जातो. हा जिना एक बघण्यासारखी चीज आहे. किल्ल्याच्या टोकावरून सभोवतालचा परिसर अजून छान दिसत होता. इथून दिसणारे डोंगर म्हणजे भीमाशंकर, नागफणीचा डोंगर; असं काय काय वाचलं होतं पण मला काही ते ओळखता येत नव्हतं. वरती एक भगवा होत्या नव्हत्या वा-यावर फडकत होता. इथेच एक मोठा तलावही आहे. मग फोटोसेशन झालं, पंजे लावून झाले, ट्रॅश टॉक झालं, निसर्ग डोळ्यात, कॅमेरात भरून घेतला, आणि परत गुहेत आलो.
सभोवतालचा परिसर
उफळी तोफेचा एक भाग
जाम भुका लागलेल्या. फटाफट पेठ गावात उतरलो, भुंक-या कुत्र्यांना टुक टुक करून भैरवनाथ हॉटेल मालकांकडे पोचलो, आणि जेवणावर ताव मारला. श्रीराम सावंत यांचं हे हॉटेल आहे. (मो: ९२०९२ ६७४३३). आम्ही पोळीभाजी भात आमटी असं साधं जेवण मागवलं होतं. जेवण चविष्ट होतंच, पण दमून आल्यावर ते अजूनच भारी लागलं. इथेच बाहेर पंचधातूच्या उफळी तोफेचा एक भाग ठेवलेला आहे. त्या तोफेची स्टोरी सावंतांकडून ऐकली, आणखी थोड्या गप्पा मारल्या, आणि परतीच्या वाटेला लागलो. आता सगळे आपापल्या सोयीच्या वेगात निघाले. लोहपुरुष एक्सप्रेस अपेक्षित रित्या पहिले पोहोचली. मग काका आणि ‘२०१३ चा पहिला आणि लग्नाआधीचा शेवटचा ट्रेक असलेला’ निलेश, आणि सर्रवात मागून माझी पॅसेंजर.
गावात भेटलेले बोलके चेहरे
परत येताना आकाशात निसर्गाने काढलेली अॅबस्ट्रॅक्ट रांगोळी
२०१३ चा ओपनिंग ट्रेक संपन्न झाला होता. पाऊस मिळाला नसला तरी हा पावसाळी ट्रेक होता. व्हाईट स्टॅलियन गरगरवली आणि निलेश ला कर्जत ला सोडून काकांच्या घरी परतलो. वाटेत पेब ला धावतं ‘आत्ता दमलोय, पण नेक्स्ट टाईम नक्की’ म्हणून आलो.
मोठ्या आकारातील फोटो बघण्यास या लिंक वर जावे.
http://www.flickr.com/photos/23099850@N04/sets/72157634040518530/
प्रतिक्रिया
13 Jun 2013 - 10:40 pm | पैसा
खूप छान वर्णन आणि फोटो तर अप्रतिम सुंदर आलेत!!
14 Jun 2013 - 10:26 am | तुमचा अभिषेक
छान खुसखुशीत वर्णन... फोटो निव्वळ अप्रतिम..
पुढील ट्रेकला शुभेच्छा.. :)
14 Jun 2013 - 7:42 pm | वेल्लाभट
@ अभिषेक आणि @ ज्योती
कौतुकाबद्दल अनेक आभार!
14 Jun 2013 - 3:21 pm | सुज्ञ माणुस
मस्त लेख आणि भटकंती

कोथळीगड खरच मस्त आहे. बेस पर्यंत चालत येऊनच जीव गेला होता आमचा.
तुम्ही हि तोफ बघितलीत का ? हे जरा वाटेच्या बाजूला आहे त्यामुळे शकतो स्किप होते.
शिखराच्या उलट्या लोटी सारख्या भागातही चढून जाता येते
सरड्याचा फोटो तुफान आलाय . आवडला
14 Jun 2013 - 7:40 pm | वेल्लाभट
येस ऑफकोर्स ! बघितली की. फोटो नाही टाकला इतकंच.
धन्यवाद !
14 Jun 2013 - 3:28 pm | नि३सोलपुरकर
मस्त......
छान वर्णन आणि अप्रतिम फोटो !!
अवांतर :तुम्हा सगळ्याचांही एक फोटो टाकायला हवा होता राव...
पुढील ट्रेकला शुभेच्छा.. smiley
14 Jun 2013 - 8:20 pm | वेल्लाभट
जरूर. शक्यतोवर मी पब्लिक साईट वर कुण्या व्यक्तींचे फोटो टाकत नाही. पण तुम्ही म्हणालायत म्हणून इथे टाकतो आहे.

बाकी तुम्हाला लेखन, फोटो आवडले वाचून आनंद झाला.
15 Jun 2013 - 9:28 am | प्रचेतस
छान लिहिलंयस रे वेल्लाभटा.
दरवाजाची रचना तर हडसर, जीवधनच्या दरवाजांसी प्रचंड मिळतीजुळती आहे. सातवाहनकालात हा किल्ला बांधला गेला असावा हे नक्कीच. बहुधा रानशीळ, गणपती घाटाचा कोकणातला पहारेकरी.
15 Jun 2013 - 11:04 am | रोहन अजय संसारे
खूप छान लिहिले आहे .
२०१३ पावसाच्या खूप खूप शुभेचा .
वाचनातू न आसे कळले कि तुमी सगळे मुंबईतलेच आहात .
खूप चं छान GROUP आहे.
TRECKING मला पण खूप हौस आहे, पण आता कामाचा रागाद्यात वेळ मिळत नाही.
जर तुमची हरकत नसेल तर मी तुमचा बरोबर TRECKIN ला येऊ सकतो का.
15 Jun 2013 - 11:53 am | आदूबाळ
वेल्लाभटांनो, एक नंबर वर्णन!
कर्जत गावात एक आमराई चौक आहे. (तिथे कडावकडे जाणार्या टमटम मिळतात.) पुढच्या वेळेला तिथला वडापाव चाखून पहा.
या कडावकडच्या टमटमच भीमाशंकरला नेणार्या "त्या" दोरखंडाच्या वाटेकडे घेऊन जातात.
15 Jun 2013 - 1:57 pm | कंजूस
पावसाळयाच्या तोंडावर केलेला ट्रेक फारच मजेदार असतो आणि त्यात कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला नवीन गाडया बदलून केला खुपच धमाल .थोडक्या वेळात जास्त मजा . वरती पेठेच्या वाडीत खवा मिळत होता का ? आंबिवली पुढे वनविहारात राहाण्या जेवणाची (माफक)छान सोय आहे ,लेणी आणि नदीपण आहे .
15 Jun 2013 - 2:09 pm | स्पा
जे ब्बात
15 Jun 2013 - 2:30 pm | यशोधरा
मस्त लिहिलं आहे, आवडलं :)
15 Jun 2013 - 6:12 pm | वेल्लाभट
@वल्ली, रोहन, आदूबाळ, कंजूस, स्पा, यशोधरा
सगळयांचे आभार ! तुम्हाला आवडलं हे जाणून खूप आनंद झाला.
@ रोहन संसारे : नक्कीच येऊ शकतोस तू. स्वागतच आहे.
15 Jun 2013 - 7:32 pm | अत्रुप्त आत्मा
वे...ल्ला....भट ! फोटू १ नम्बर भट! लैच मंजे लैच जबरी ...भट! :)
16 Jun 2013 - 8:08 pm | वेल्लाभट
थँक्यू हो !
16 Jun 2013 - 10:02 pm | जॅक डनियल्स
सुंदर ! जुन्या आठवणीचे मोहोळ उठले.
मी हा ट्रेक टाकला होता, तेंव्हा आम्ही मेणबत्या न्यायचे विसरलो होतो. मुसळधार पावसात गुहेत बसून उदबत्त्यांच्या प्रकाशात स्वयंपाक केला होता. संध्याकाळी गुहेमध्ये डोक्यावरून शेकड्याने पाकोळ्या उडत होत्या, पण एक पण धडकली नाही.