मे महिना सरत चाललाय. उन्हाळा जाणवतोय परंतु मधूनच २-४ काळे ढग आकाशात दिसतात. पुढच्या ट्रेक ला लवकरच जायचंय असा दिलासा देऊन जातात. ऑफिसात काम करत असतानाही अचानक राजगडाचा चोर दरवाजा आठवतो, मनातले विचार कीबोर्डपर्यंत पोचतात आणि मग इमेल लिहिताना चुकून 'Dear Rajgad' असं लिहिल्यावर मी जीभ चावतो आणि बॅकस्पेस दाबतो. धीर धर ना राव! असं स्वत:लाच सांगतो.
मग फावल्या वेळात फेसबुक वर जाण्याऐवजी ट्रेकवर्णनं वाचतो. ब्लॉग वाचतो. रतनगड, तोरणा, साल्हेर, मुल्हेर, हरिश्चंद्रगड... अशा माझ्यासाठी डिझायर्ड डेस्टिनेशन्स चे फोटो गूगल वर बघून मी इथे असेन तेंव्हा काय करेन, मला काय वाटेल, मी कसा फोटो काढेन.. याचा विचार करत बसतो.
याचं कारण तो अनुभव. एखाद्या ट्रेक ला जाण्याच्या आधी रिसर्च करणं, ट्रेक ला जायच्या आदल्या दिवशी सॅक मधे सामान भरणं, मित्रांना फोन करणं, गाडी धुवून पुसून साफ करणं, तिथे जाणं, वाट शोधत शोधत निघणं, अधे मधे चुकणं, गमती जमती, विनोद, आठवणी काढणं, हे असं सग्गळं करून अखेर गडाचा माथा गाठणं.... तिथे जाऊन नि:शब्द पणे स्वत:भोवती गिरकी घेऊन तो आजूबाजूचा निसर्ग बघताना जे वाटतं ते केवळ अतुलनीय असतं. अंगावर शहारा येतो, अॅड्रेनलाईन रश होतो आणि तत्क्षणी जो मिळतो तो अनुभव. स्वर्गीय अनुभव. एखाद्या डोंगरकडेच्या कातळावर शांतपणे बसून रहाण्याचा अनुभव, ते अफाट चित्र डोळ्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करण्याचा अनुभव, मुख्य दरवाज्याच्या कमानीतून पहिलं पाऊल गडावर टाकतानाचा अनुभव, या गोष्टी केवळ अवर्णनीय आहेत.
आणि त्यांचंच हे गुरुत्वाकर्षण आहे की मला पुन्हा पुन्हा तो अनुभव घ्यावासा वाटतो; ट्रेक ला जावंसं वाटतं. त्यामुळे आता कधी एकदा पुढचा ट्रेक ठरतोय असं झालंय !
प्रतिक्रिया
27 May 2013 - 6:06 am | स्पंदना
मस्त फोटो.
अगदी कवि वर्णतात तो चातक असाच भाव जपत असेल मनात.
निघा! निघा बॅकपॅक भरुन.
27 May 2013 - 8:14 am | यशोधरा
असेच म्हणते.
27 May 2013 - 9:36 am | सुज्ञ माणुस
मस्त लेख आणी फोटो सहीच :)
मी संपलाय आणी सध्या वातावरण जरा बरे आहे. फक्त एक पाऊस पडला की ………:)
27 May 2013 - 9:37 am | सुज्ञ माणुस
मस्त लेख आणी फोटो सहीच :)
मे संपलाय आणी सध्या वातावरण जरा बरे आहे. फक्त एक पाऊस पडला की ………:)
27 May 2013 - 9:39 am | सौंदाळा
छान मुक्तक!
27 May 2013 - 9:40 am | पैसा
आता ट्रेकला निघा लौकरात लौकर!
27 May 2013 - 11:37 am | वेल्लाभट
सगळ्यांना उद्देशूनः
धन्यवाद....
आणि मोहीम ठरलेली आहे. काही दिवसांचा अवधी आहे. मग फोटो, माझ्या परीने केलेलं वर्णन पोस्ट करेनच.
27 May 2013 - 12:16 pm | उदय के'सागर
तुमच्या वाक्य-वाक्याशी सहमत. अगदी असंच होतं बघा हे ढग भरुन आले की...
ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात.....
(बाकी ते वाक्य वाचून काळजात एक नाजूक कळ आली बघा. "मित्रांना फोन करणं, "... च्यायला आमचे बरेच मित्रं एकतर पैश्याच्या मागे हात धुवून लागली आहेत नाहीतर संसार-मुलाबाळांमधे पार बुडालेली आहेत, जे काय ४-५ उत्साही मंडळी होती ती ही भारताबाहेर किंवा महाराष्ट्राबाहेर आहेत...त्यामुळे आमच्या मनात असे 'ट्रेकींग' चे विचार आज काल आले तरी ते मनातल्या मनातच मारुन टाकावे लागतात ... पण जे काही तुमच्यासारखी मंडळी उत्साहाने जातात ते पाहून/वाचून खुप छान वाटतं, त्यामुळे तुमचे 'ट्रेकवर्णन' जरुर येऊ द्या, कंटाळा न करता :) )
27 May 2013 - 9:40 pm | दशानन
सुंदर लिहिले आहे...
27 May 2013 - 11:45 pm | मोदक
मंडळी.. आपल्या मिपावरचे अनेक जण वीकांताला डोंगरदर्या पालथे घालत असतात. त्यापेक्षा कित्येकपटीने जास्ती गणसंख्या अशा कार्यकर्त्यांची भरेल की ज्यांना ट्रेकला जाण्याची प्रचंड इच्छा आहे परंतु सोबत कोणी नाही म्हणून ट्रेक होत नाहीत.
मिपावरचाच एक ग्रूप करायचा का..? कांही महत्त्वाचे नियम मान्य करण्यास सर्वजण तयार असतील तर सांगा.. आपण एक ग्रूप तयार करूया.
पुणे - मुंबईपासून एकाच दिवसाचे ट्रेक (ही सवलत बिच्चार्या विवाहित मेंब्रांसाठी द्यावी लागते!) करण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत.
आत्ता लगेच आखणी सुरू केली तर मजा येईल.. पावसाळा तोंडावर आला आहे!!!!
(मी ग्रूपची नियमावली लिहून काढू शकतो - कोणाची हरकत नसेल तर ;-))
28 May 2013 - 2:13 am | आदूबाळ
मोदकराव, उत्तम कल्पना. :)
मी पुण्यात असतोच असं नाही, पण असल्यास यायला नक्की आवडेल.
सो आय ईज.
28 May 2013 - 7:05 am | सखी
वेल्लाभट - खरचं असं होत हो... आणि आम्ही भारतात नसल्याचा सल परत परत जाणवतो आणि भारतात असलेल्यांचा खरच हेवा वाटतो. वर्णन आणि फोटो खूप मस्त आलाय, राजगड खरच स्पेशल आहे. भरपूर फिरा आणि आमच्यासाठी असेच लेख लिहीत रहा त्यातच आम्ही समाधान मानु.
मोदकः प्लिज अस काही सुरु केले तर फार छान होइल, ब-याच होतकरु मंडळींनाही सहभागी होता येईल. मुलं सहभागी झाली तर चालेल का? म्ह्णजे अगदी लहान नाही (५ वर्षाच्या आतील) पण १०-१२ वयाची असतील जी त्यांची ती चालु शकतील. आणि जूनमध्ये काही जमत असेल तर नक्की कळवा, राजगड जमुन आला तर क्या कहेने!
28 May 2013 - 9:54 am | मोदक
"१०-१२ वयाची असतील जी त्यांची ती चालु शकतील" अशी मुले शक्यतो त्यांच्या घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीसोबत किंवा आई (आणि / किंवा) वडीलांसोबत असावीत..
बाकी अशा मुलांसोबत ट्रेक करणे हाही एक अनुभव असतो.. हे छोटे शक्तीमान काय प्रश्न विचारून आपली विकेट घेतील सांगता येत नाही! ;-)
28 May 2013 - 9:59 am | उदय के'सागर
अगदी मनातलं बोललात मोदकराव ... मी सहमत ह्या कल्पनेशी... :)
28 May 2013 - 11:08 am | चेतन माने
हो मोदाकराव आपली आयडिया फारच ढासू आहे …… जाम आवडली :)
1 Jun 2013 - 5:12 pm | बाबा पाटील
मोदकराव आपला नंबर लावुन ठेवा....
28 May 2013 - 11:05 am | चेतन माने
अगदी खरय
लेखकाच्या भावनांशी १००% सहमत.
28 May 2013 - 6:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
एकदम भावलं.
@ मोदक : उत्तम कल्पना आहे मोदकराव. ताबडतोप प्राथमीक नियमावली लिहून इथे टाका. मिपावर भरपूर ट्रेकोच्छूक आहेत असे दिसते. नक्कीच मस्त ग्रूप बनेल. माझ्या एखाद्या सुट्टीत एकादा ट्रेक जमून आला तर खरंच मजा येईल !
28 May 2013 - 6:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
एकदम भावलं.
@ मोदक : उत्तम कल्पना आहे मोदकराव. ताबडतोप प्राथमीक नियमावली लिहून इथे टाका. मिपावर भरपूर ट्रेकोच्छूक आहेत असे दिसते. नक्कीच मस्त ग्रूप बनेल. माझ्या एखाद्या सुट्टीत एकादा ट्रेक जमून आला तर खरंच मजा येईल !
28 May 2013 - 7:48 pm | वेल्लाभट
कल्पना नक्कीच उत्तम ! प्रतिसाद निश्चित मिळणार ! अनेक जण उत्सुक आहेत...
28 May 2013 - 7:58 pm | वेल्लाभट
कल्पना नक्कीच उत्तम ! प्रतिसाद निश्चित मिळणार ! अनेक जण उत्सुक आहेत...
1 Jun 2013 - 4:39 pm | नाखु
नक्की का?
1 Jun 2013 - 9:29 pm | कंजूस
अगदी मनातलं शब्दांत उतरवलत सर्व डोंगरभटक्यांच्या ,वेल्लाभट .फक्त माझा my dear राजमाचि आणि भिमाशंकर नी ढाक आहे उन्हाळ्यात मे महिन्यातही .मात्र कोकणातून काही गड चढतांना त्यांचे कडे छाताडावर येतील असे वाटत राहाते ,धबधबे रौद्र वाटतात पण घाटाकडून आल्यास अगदी गावामागच्या टेकड्या वाटतात .तरीही मागच्या भटकंतीची आठवणीची वाट विरून जाण्याअगोदरच पुन्हा कधी एकदा जातो असे होते .