अंतिमत: पाकिस्तान मधल्या निवडणूक निकालांचे सूप वाजले आणि नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज ही पार्टी छोट्या पक्षांसामावेत आघाडी करून १३७ हा बहुमताचा जादुई आकडा गाठणार असे दिसतेय. पण लाख टके का सवाल है कि -नवाज शरीफ किती दिवस टिकणार ?
मुशरर्फ प्रणीत लष्कर (मिलित्रि)त्यांना जास्त दिवस टिकू देईल असे वाटत नाही.
आणि भारताबरोबर त्यांनी (खरोखरच) शांतता, सलोखा प्रस्थापित करायचा प्रयत्न केला तर त्यांची गच्छन्ति निश्चित आहे. अर्थात ते पण लवकरात लवकर मुशरर्फला लटकवायचा पूर्ण प्रयत्न करतील. ISI चे पंख छाटणेदेखील तितकेच आवश्यक आहे. ISI आणि लष्कर -ए - तोयबा यांची अभद्र युती भारतासाठी डोकेदुखी ठरते आहेच. अर्थात आतंकवाद प्रामाणिकपणे कमी करण्याचे प्रामाणिक प्रयत्न कोणत्याही पाकिस्तानी राज्याकर्त्याकडून होतील असे वाटत नाही तरीही पाकिस्तान आणि भारतालाही एकंदरीत शांतता हवी असेल तर पाकमध्ये लोकशाही बळकट करण्यावाचून पर्याय नाही. आणि जरा स्वत:च्या तुंबड्या भरण्याबरोबर जनतेचा विकास वैगेरे पण बघा म्हणा म्हणजे जिहाद च्या नावाखाली तरुणांची माथी भडकणार नाहीत.
पाकिस्तानात लोकशाही?
गाभा:
प्रतिक्रिया
13 May 2013 - 11:14 pm | आशु जोग
> मुशरर्फ प्रणीत लष्कर (मिलित्रि)त्यांना जास्त दिवस टिकू देईल असे वाटत नाही
याचा आधार काय ?
मुशरर्फ प्रणीत लष्कर - म्हणजे काय
मुशरर्फ तुरुंगातून लष्कर चालवतायत का ?
14 May 2013 - 12:55 am | सचिन कुलकर्णी
मुशरर्फचा अजूनही तिथल्या मिलीत्रीवर चांगलाच प्रभाव आहे . त्याच्यावरच्या खटल्याच्या वेळेस मिलिटरीने त्याला ज्या प्रकारे पळून जायला मदत केली होती ते बघता हि बाब सिद्ध होते. लष्करी अधिकार्यांना / सैनिकांना नेहमीच डेरिंगबाज सर्वोच्च अधिकार्याबद्दल extra respect हा असतोच. कारगिल च्या वेळेस मुशरर्फ स्वत: १ १ किमी आत आला होता, याचे भारतीय अधिकार्यांना पण आश्चर्य वाटले होते.
पाकिस्तानी घटनेप्रमाणे लष्करावर सत्ताधारी पक्षाचा पूर्ण कंट्रोल नाहीये (जसे भारतात आहे). शिवाय पाकिस्तानचा इतिहास आपणास माहित असेल तर आपल्या लक्षात येईल कि लष्कराची बंड करायची सवय फार जुनी आहे आणि म्हणूनच या देशात लोकशाही अजूनही establish झालेली नाही. ही सर्व पार्श्वभूमी बघता वरील statement केलेले आहे.
पूर्वानुभव, इतिहास यांच्या विश्लेषणावरून 'नवाज शरीफ किती टिकतील' असा प्रश्न निर्माण होतो - वरील विधानांना देखील हाच आधार आहे .
बाकी हा धागा मी तरी सिरीयसलीच काढला आहे...
14 May 2013 - 5:51 am | स्पंदना
परवाच बातमीत मुशररफ यांच्यावरची बंदी सुप्रीम कोर्टाने काढुन घ्यावी म्हणुन लष्कर प्रमुखांनी कोर्टाला धमकावलयाचे वाचले होते.
14 May 2013 - 11:20 am | सचिन कुलकर्णी
बरोबर आहे अपर्णाताई . लष्करातल्या स्वत:च्या प्रभावामुळेच मुशरफ़्ने परत पाकिस्तानात यायची हिम्मत केली असावी.
अन्यथा फाशी अटल असताना परत तिथे पूल टाकणे म्हणजे आत्मघातच..
14 May 2013 - 11:29 am | सचिन कुलकर्णी
*अटल = अटळ आणि पूल = पाऊल. आभार .
14 May 2013 - 5:52 am | स्पंदना
नवाज शरिफनी स्वतःची पंतप्रधान्की मतमोजणी व्हायच्या आधीच जाहिर केलीय.
एकुण औरंगजेबाचे कायदे वापरले जाताहेत अस वाटत्य.
14 May 2013 - 6:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकिस्तानात लोकशाही येवो नैतर ठोकशाही येवो. भो तुम्ही सुखानं जगा आणि आम्हाला सुखानं जगू दया.
-दिलीप बिरुटे
14 May 2013 - 11:23 am | सचिन कुलकर्णी
+१ बिरुटेसाहेब. पण नेमके हेच होणे मुश्किल आहे. :(
14 May 2013 - 11:19 am | नीलकांत
पाकिस्तानाबद्दल प्रत्येक भारतीयाचं एक मत नक्की असतं. चांगलं, वाईट, भावनिक, व्यवहारीक अगदी कसंही असो प्रत्येकाचं एक मत असतंच. त्यामुळे अश्या चर्चांना प्रतिसाद हा मिळतोच. :) असो मग मला माझं मत असायला काय हरकत आहे?
माझ्या मते पाकिस्तानात लोकशाही रूजणं आणि पाकिस्तानची आर्थिक भरभराट होणं, त्यापुढे जाऊन पाकिस्तानची आर्थिक भरभराट थोड्या प्रमाणातका होईना भारतावर अवलंबून असणं हे भारत-पाक मधील तणावावर येत्या काळातील उत्तर असू शकतं.
आपण काहीही विचार केला तरी पाकिस्तान आपल्या शेजारी आहे हे नाकारू शकत नाही. त्याचे स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी त्याला भारताशी सलोख्याने रहायला प्रवृत्त करण्याची ताकद केवळ अर्थकारणात आहे असं मला वाटतं. अन्य पर्याय सध्या तरी उपयोगाचे नाहीत.
पाकिस्तानचा प्रदेश म्हणजे पुर्वी भारताचा वायव्य प्रदेश. हा प्रदेश कायम लढाई , आक्रमणं यात राहीलेला आहे. त्यामुळे आजही त्या भागात सैन्याचं आकर्षण आहे. आणि लोकांच्या प्रतिक्रिया फार प्राथमिक असल्याचं लक्षात येतं. एखादा समाज जेवढा प्रगत होत जातो तेवढा त्याचं भावनिक अभिव्यक्तीच्या छटा वाढत जातात. त्या समाजात सगळंच ब्लॅक अॅण्ड व्हाईट मानलं जात नाही. अनेक पैलुंचा उहापोह होत असतो. अश्या वेळी पाकिस्तानच्या बहुतांश जनतेच्या आवडी अजूनही 'प्राथमिक रंगात' आहेत असं मला वाटतं, त्यामुळे पाकिस्तानचा आर्थिक विकास आणि त्यासोबतच मध्यमवर्गाची लोकसंख्या वाढणे हे चांगले लक्षण असेल आणि यातून पुढे लोकशाहीचा विकास शक्य आहे.
जनतेच्या ह्या प्राथमिक आवडी निवडी जेव्हा अनेक छटांमध्ये रूपांतरीत होतील म्हणजेच जेव्हा पाकिस्तानमध्ये सैन्याचं आकर्षण कमी होईल तेव्हाच लोकशाही टीकू शकते. आज करीअर करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे सैन्य आहे. त्याच्या शिवाय सैन्यात जाण्याचे त्या समाजात अन्य फायदेही आहेत. सैन्य म्हणजे केवळ शक्ती नाही तर सत्ता असं सुत्र आहे त्यामुळे जो पर्यंत असे आहे लोकशाही कधीही पिंजर्यात टाकणे शक्य आहे. आपण हे नाकारून चालणार नाही की अमेरिकेच्या तंबीमुळे मुशर्रफयांनी सत्तेहून मागे येण्याचा पर्याय स्विकारला आहे. आता सुध्दा कयानीवर अमेरीकेचा दबाव आहेच.
आयएसआय आणि अन्य देशांच्या गुप्तहेर संघटनांमध्ये एक मोठा फरक आहे. तो म्हणजे अन्य देशांच्या गुप्तहेर संघटना ह्या आर्थिक स्त्रोतासाठी त्या त्या देशाच्या सरकारवर अवलंबून असतात. आणि त्यांचं नियमन वरच्या पातळीवर तरी
सरकारकडून होत असतं. आयएसआय मात्र आर्थिक बाबतीत स्वयंपुर्ण आहे. पाकिस्तान आणि अफगाणीस्तानात भरपुर अफु शेती करून आणि अन्य मार्गाने सुध्दा आयएसआय पैसा मिळवते. त्यामुळे अवलंबित्व नाही तर उत्तरदायीत्व नाही अशी सरकारप्रति भूमिका असते. तसेच आयएसआयचा प्रमुख हा माजी सेनाधिकारीच असतो त्यामुळे आयएसआय ही सरकारपेक्षा सैन्याला प्रामाणिक असते यात नवल नाही. भारतात आपल्याला सध्या असलेली रचना सवयीची असल्यामुळे नवलाईची वाटत नाही. पाकिस्तानात चित्र खुप वेगळं आहे.
- नीलकांत
14 May 2013 - 11:25 am | सचिन कुलकर्णी
अर्थातच आपल्या मताचे स्वागतच आहे. आपला प्रतिसाद वाचण्याआधीच कळतेय कि तो (नेहमीप्रमाणेच) अभ्यासपूर्ण आहे. पूर्ण वाचून मग बोलतो. धन्यवाद.
14 May 2013 - 11:46 am | राही
जसजशी अर्थव्यवस्था वाढेल, उत्पादन आणि सेवा क्षेत्रे वाढतील तसतसा लोकांचा वावर अनेक अपरिचित क्षेत्रांमध्ये होऊ लागेल. बुरसटलेली समाजव्यवस्था मोकळा श्वास घेईल, नृत्य, गायन, अभिनय यांच्या प्रति मुस्लिम क्लर्जी कदाचित अधिक उदार धोरण घेईल, मनोरंजनाचे मार्ग अधिकृतपणे मोकळे होतील, महिलांना अधिक मोकळीक मिळेल, नागरिक निर्भयतेने बोलू शकतील..... कदाचित, कदाचित असे घडूही शकेल...आपण आशा करू या.
केवळ ब्लॅक अँड व्हाइट्च दिसणे आणि मतांमध्ये प्राथमिकता येणे ही भारतीय द्वीपकल्पाची विशेषता आहे. समतोलपणे विचार करणारे कमीच. पाकिस्तानात (आणि भारतातही) समतोल लोकांची संख्या वाढेल, समंजसपणा वाढेल ही आणखी एक आशा..
14 May 2013 - 5:58 pm | सचिन कुलकर्णी
अत्यंत माहितीपूर्ण आणि अभ्यासांती आलेला प्रतिसाद. धन्यवाद नीलकांतजी.
14 May 2013 - 11:30 am | सौंदाळा
नवाज शरिफना आपल्याकडुन आमंत्रण पण गेले म्हणे!!
आता ते येणार, कोणत्यातरी दर्ग्यावर चादर अर्पण करणार, काश्मिर प्रश्न सामंजस्याने सोडवू असे म्हणणार, शाही खाना चापुन जाणार.
हि आमंत्रणे भारतीय मुस्लीम लोक, मुस्लीम नेते यांना खूष करण्यासाठी असतात का?
14 May 2013 - 11:37 am | सचिन कुलकर्णी
मतपेट्यांचे मोठ्ठे राजकारण आहे या मागे. पण बर्याचदा किमत आपले सैनिक(कारगिल)किन्वा सामान्य जनता चुकवते (१२ मार्च ९३ पासून २६/११ पर्यंत कैक घटना)..
14 May 2013 - 11:50 am | पिंपातला उंदीर
पाकिस्तानी पंतप्रधान ला भारतात बोलवल्याने भारतीय मुस्लिम का खुश होणार? त्यांच्या काय संबंध त्यांच्याशी? काही स्पष्टीकरण? नसेल तर या विधानाला वेड्गळ म्हणावे लागेल.
14 May 2013 - 11:56 am | सौंदाळा
भारत्-पाक क्रिकेट मध्ये पाकिस्तान चा विजय झाल्यवर वाजणारे फटाके, छोटा पाकिस्तान नावचे मुम्बैतील पत्ते, काही ठिकणी खुलेआम साजरा होणारा पाकिस्तानचा स्वातन्त्रदिन हे माहेत असेल तर "पाकिस्तानी पंतप्रधान ला भारतात बोलवल्याने भारतीय मुस्लिम का खुश होणार?" हा प्रश्न पडण्याची गरज नसावी असे वाटते.
14 May 2013 - 12:07 pm | गब्रिएल
असले प्रश्न वाचुन कुणितरि फार्फार पुर्वि लिवलयः
"झोपि गेलेल्याला उठवता येते. झोपेच सोन्ग घेतलेल्याला नाहि."
14 May 2013 - 12:09 pm | गब्रिएल
असले प्रश्न वाचुन कुणितरि फार्फार पुर्वि लिव्हलयः
"झोपी गेलेल्याला उठवता येते. झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही."
14 May 2013 - 1:00 pm | सचिन कुलकर्णी
.
14 May 2013 - 12:33 pm | श्रीगुरुजी
>>> आता ते येणार, कोणत्यातरी दर्ग्यावर चादर अर्पण करणार, काश्मिर प्रश्न सामंजस्याने सोडवू असे म्हणणार, शाही खाना चापुन जाणार.
आणि मग ते परत गेल्यावर काही दिवसातच पाकिस्तानी सैनिक गोळीबार करून २-३ भारतीय सैनिक मारून त्यांच्या मृतदेहाची विटंबना करणार, त्यांनी भारतात पाठविलेले अतिरेकी किंवा भारतातले स्थानिक अतिरेकी काही ठिकाणी बॉम्बस्फोट करणार आणि भारतातले निधर्मांध नेहमीप्रमाणे सांगणार की "भारत-पाकिस्तान शांतता चर्चेला बाध आणण्याचा हा डाव आहे. या डावाला बळी पडून शांतता प्रक्रिया थांबवू नका. दोन्ही देशांना शांतता हवी आहे. भारत-पाकिस्तान मैत्री अमर रहे!"
14 May 2013 - 12:07 pm | सचिन कुलकर्णी
आपल्या सरकारांनी हा प्रश्न भावनिक पण केला आहे (देशहिताकडे दुर्लक्ष करून). त्यांना वाटते एकमेकांच्या नातेवाईकांना खुले आम इथे फिरू दिले म्हणजे त्यांचे रुपांतर मतांमध्ये होईल पण सध्या वाचलेल्या काही अनुभवावरून हे पण समजले आहे कि पाकिस्तानी जनतेला इतिहास देखील चुकीचा शिकविला जातोय त्यामुळे त्यांच्यात (ही) भारत विद्वेष नसानसात भिनलाय.
14 May 2013 - 12:40 pm | श्रीगुरुजी
भारताला पाकिस्तानची कणभरही गरज नाही. पाकिस्तान हा एक हिंसाचाराला चटावलेला रक्तपिपासू धर्मांधांचा देश आहे. पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे व तो कायम भारताचा नि:पात करण्याचाच विचार करून त्याप्रमाणेच कृती करणार हे लक्षात घेतले पाहिजे. पाकिस्तानशी मैत्री तर सोडाच साधे व्यावहारीक संबंध देखील अशक्य आहेत. असिफ अली जाऊन नवाज शरिफ आला किंवा उद्या मुशर्रफ परत आला किंवा नवीनच कोणतरी आला तरी भारताला कणभरही फरक पडणार नाही. पाकिस्तानचे भारताशी शत्रुत्व सुरूच राहील.
पाकिस्तान हा भारताचा शत्रू असल्याने, शत्रूबरोबर जसा व्यवहार करतात तसाच व्यवहार भारताने पाकिस्तानबरोबर करणे आवश्यक आहे. बससेवा, रेल्वेसेवा, व्यापार, क्रिकेट इ. सर्व क्षेत्रात पाकिस्तानशी संबंध तोडून भारताने या देशाशी राजनैतिक संबंध तोडणे आवश्यक आहे.
14 May 2013 - 12:59 pm | सचिन कुलकर्णी
पूर्ण सहमत श्रीगुरुजी. पण सत्ताधारी (यात सर्व पक्षीय आले) जेव्हा एकगठ्ठा मतांकडे लक्ष न देता देशहिताला प्राधान्य देतील तो सुदिन..
14 May 2013 - 1:46 pm | नीलकांत
आपण भारतीय पाकिस्तानला आपला शत्रु मानण्याची चुक कायम करत आलो आहोत. खरं तर त्या देशाची ती क्षमताच नाही. आणि प्रत्यक्षात तो देश एक प्यादं असल्याचं कायम जागतीक पटलावर दिसत आलं आहे. प्रत्यक्षात अमेरीकेच्या मुख्य भूमीवर हल्ला झाला आणि अमेरीकेची जागतीक भूमीका सोयीपुरती बदलली आणि मग जगात आमच्या सोबत किंवा आमच्या विरूध्द अशी दंडेलशाही विभागणी जेव्हा केली तेव्हा पाकिस्तानला सोबत घेऊन अमेरीका चालली. जो पर्यंत पाक सैन्याची गरज होती तो पर्यंत मुशरर्फ चालले. आणि जेव्हा जगात लोकशाहीवादी देश म्हणून मिरवायचं आहे असं लक्षात आलं तेव्हा ताबडतोब सत्ता राजकीय नेत्यांच्या हाती देण्यात आली. गिलानी काय किंवा झरदारी काय हे केवळ प्यादे आहेत असं माझं मत आहे.
पाकिस्तानातील सर्वच उच्च वर्ग जगातील अन्य कुठल्यातरी देशाचे नागरिकत्व घेऊन आहेत. मला तर हे सुध्दा आठवतं की पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने किमान पाकिस्तानचा केंद्रीय गृहमंत्री तरी दुसर्या देशाचा नागरीक (इंग्लंड) असू नये असे ताशेरे ओढले होते. अश्या प्रकारे पाकीस्तान हे राष्ट्र अद्याप आपल्या पायावर उभे राहीलेले नाही त्या राष्ट्राला आपण आपल्या बरोबरीचा शत्रु मानने हे केवळ न्युनगंडाचे लक्षण आहे. आपण शत्रु म्हणून उभे राहीले पाहिजे ते चीनच्या विरूध्द !
आज ना उद्या चीनशी आपले युध्द होणारचं , आता ते युध्द प्रत्यक्ष रणांगणात होतं , बाजारपेठेत होतं की देशांच्या सत्ता पालटात होतं हे समजायला ती वेळच यावी लागेल. मात्र चीन सोबत शत्रु म्हणून तयारी करायला खुप मेहनतीची गरज आहे. ती करायची आपली तयारी आहे का?
पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र मानल्यास आपल्याला होणारा फायदा काहीच नाही उलट चीनला आपल्या पश्चिम सीमेवर उत्तम मित्र मिळतो. मात्र आपण आपला दृष्टीकोण बदलल्यास आणि पाकिस्तानला आपल्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबित्व पत्करण्यास लावल्यास (याला आधीच्या काळी मांडलीकत्व असे म्हणायचे) आपल्याला प्रगतीस सोईस्कर असे वातावरण तयार होईल.
आपण परराष्ट्र धोरण या विषयात फार कच्चे आहोत. हे नक्की. त्याला वर 'राही' म्हणतात त्या प्रमाणे भारतातील सुध्दा प्राथमिक रंग प्रेमी लोक कारणीभूत असू कदाचित. मात्र एवढीच देवा जवळ प्रार्थना आहे की आमच्यात आमची विजीगिषू वृत्ती परत जागी कर. पाकिस्तानशी लढणे आणि जिंकणे कठीण नाही हे आधीच आपल्याला ठाऊक आहे. त्यामुळे आपल्या क्षमतेत आहे त्याच कार्याची आखणी करणे म्हणजे क्षमता विस्तार नाही हे लक्षात येईल, तो सुदिन !
14 May 2013 - 1:59 pm | आदूबाळ
नीलकांत आणि राही, दोन्ही प्रतिसाद अत्युत्तम.
एक प्रश्न आहे: तुम्ही पहिल्या प्रतिसादात म्हणाल्याप्रमाणे पाकिस्तानात सैन्यदलात जाणे हे "करिअर ऑफ चॉईस" आहे. त्यातून चीनचे उघड आणि अमेरिकेचे छुपे लष्करी पाठबळ पहाता पाक लष्कराला मानव संसाधन आणि युद्धसामुग्री या दोन्ही आघाड्यांवर कमी लेखून चालणार का?
काही दिवसांपूर्वी मिपावर (बहुदा) अमोल उद्गीरकरांचा धागा आला होता. त्यात पाक लष्कराच्या सैनिकी तयारीबद्दल उत्तम माहिती होती.
14 May 2013 - 2:02 pm | गवि
एकदम सेन्सिबल प्रतिसाद. ए-१.
14 May 2013 - 2:18 pm | सचिन कुलकर्णी
<<पाकिस्तानला आपल्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबित्व पत्करण्यास लावल्यास >> सध्या तरी फक्त पंजाबी संस्कृती( दूरदर्शनद्वारे) 'त्यांच्यावर' थोपविण्यात आपण थोडेफार यशस्वी झालो आहोत.
राहता राहता तो शत्रुत्त्वाचा प्रश्न : पाकिस्तान आपला मुख्य शत्रू नाही . १०० % मान्य. पण हा देशही अणु सज्ज आहे ही चिंतेची बाब आहे आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्याप्रमाणे स्वतःहून अण्वस्त्र वापरणार नाही अशी शपथ घेतली नाहीये.
14 May 2013 - 2:45 pm | सुनील
पाकिस्तानची २/३ लोकसंख्या पंजाबी असल्यामुळे त्यांच्यावर पंजाबी संस्कृती थोपवण्याचा प्रश्नच येत नाही.
बाकी २ टक्के भारतीय पंजाब्यांनी उरलेल्या ९८ टक्क्यांवर आपली संस्कृती थोपवली आहे, हे मात्र खरे ;)
14 May 2013 - 3:37 pm | राही
अजूनपर्यंत महाराष्ट्रीय बायका संकष्टी चतुर्थीच्यादिवशी 'छतपर' जाऊन चाळणीच्या जाळीतून चंद्र कशा काय पाहू लागल्या नाहीत याचेच नवल वाटते. (करवाँ चौथ पंजाबी हिंदूंतही असते ना?)
14 May 2013 - 3:50 pm | राही
आम्ही बळजबरी तर करीत नाही आहोत ना? जर ते स्वखुशीने आमच्या वाहिन्या/चित्रपट बघत असतील आणि त्याचे अनुकरण करत असतील तर त्यात वावगे ते काय? उलट 'टीवी चित्रपटांतून दाखवली जाणारी संस्कृती ही आमची खरी संस्कृती नव्हेच' अशी तक्रार आपण करीत असतो. मग ही 'आमची नसलेली वाइट्ट' संस्कृती तिकडे हातपाय पसरतेय त्यांना खच्ची करतेय हा आमचा मोठाच विजय मानायला हवा. पण हा विजय आक्रमणाने आणि लढाईने मिळवलेला नाही म्हणून काही जणांच्या लेखी तो खरा विजयच नाही असे असेल बहुधा. म्हणजे गनिमी कावा सतराव्या शतकातच संपला म्हणायचा.
14 May 2013 - 3:53 pm | राही
हा प्रतिसाद सचिन कुलकर्णी यांच्या प्रतिसादावर होता.. जागा चुकली.!
14 May 2013 - 6:02 pm | सचिन कुलकर्णी
Thanks to our media then. RAW owes to them in that case. ;)
14 May 2013 - 3:55 pm | ऋषिकेश
प्रतिसाद आवडला.
मात्र मला प्रश्न असा पडतो की आपला मित्र कोण आहे? भारताचे मित्रराष्ट्र कोणते जे प्रसंगी भारतास कोणत्याही थराला, वेळेला जाऊन मदत करेल? रशिया एकेकाळी बराच जवळ होता तरी बांगलादेश युद्धात त्याने साथ दिली नाही.
परराष्ट्रनिती ठरवताना फक्त शत्रु राष्ट्रांचाच विचार करून भागत नाही. एकतर इतके समर्थ असावे की मित्रांची गरज नाहि नाहितर इतके दिलदार की वेळप्रसंगी चार मित्र धाऊन आले पाहिजेत. आपल्याकडे अजूनतरी दोन्ही नाही. :(
14 May 2013 - 3:58 pm | धर्मराजमुटके
असेच म्हणतो.
14 May 2013 - 6:12 pm | सचिन कुलकर्णी
यालादेखील फसलेली पर राष्ट्रनीती जबाबदार असावी . एकेकाळी रशियाची कास धरली होती तो तर डूबला पण जाता जाता तिथल्या शस्त्रास्त्र दलालांना अजून श्रीमंत करून गेला. तिकडे गरीब पाकिस्तान अमेरिकेकडून अत्याधुनिक अस्त्रे घेऊन तोडीस तोड बनला आहे. त्यामुळे पाकिस्तानच काय चीनबरोबरच्या युद्धात पण भारताने कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता स्वबळावर लढावे हे उत्तम . (आत्ताच्या चीनबरोबरच्या संघर्षात अमेरिकेने चीनविरोधात ब्र पण काढला नव्हता , याची आठवण ठेवावी).
14 May 2013 - 7:32 pm | नीलकांत
भारताला आंतरराष्ट्रीय राजकारणात विश्वासु म्हणावा असा मित्र नाही. १९९१ पुर्वी सोव्हियत रशिया आपण अमेरिकेच्या जवळ नाही म्हणून आपल्याशी मैत्री ठेवून होता. तो काळ तसाच होता. जग दोन देशांमध्ये विभागलं होतं. त्यामुळे पाकिस्तान अमेरीकेकडे असेल तर भारत रशियाकडे असने त्या काळी नैसर्गीक मानल्या जाई. रशियाचे तुकडे झाल्यावर आता भारताला जवळचा म्हणावा असा मित्र नाही.
मित्र सोडा आपल्या शेजार्यांसोबतही आपण चांगले संबंध ठेवलेले नाहीत. याला कारण असे की आपल्याला परराष्ट्र नीती अशी नाहीच. सुरूवातीच्या काळात नेहरूंनी आंतरराष्ट्रीय राजकारणात तिसरा ध्रुव निर्माण करून अलिप्तराष्ट्र संघटना तयार केली त्यावेळी भारताला जगात काही मित्र होते. जसे इजिप्त वगैरे. मात्र काळ जस जसा पुढे गेला आपण या सर्वांपासून दुरावलो. अनेक वेळा आपली परिस्थिती अशी झालेली दिसून येते की जगात किंवा आपल्या शेजारी राष्ट्रांत घडणार्या घडामोडींबाबत आपले काही मतच नसते. हे आश्चर्यकारक आहे. आणि आज जेव्हा आपण महासत्ता वगैरेच्या गोष्टी करायला लागतो तेव्हा तर जास्तच आश्चर्यकारक आहे. जगात एक महत्वाचा रोल प्ले करायचा असेल तर माझा मते जगात कुठेही काहीही घडत असू दे, भारताला ते दखलपात्र वाटायला हवे आणि त्यावर आपला एक विचार व कार्यक्रम ठरलेला असला पाहिजे. अगदी त्या तिकडे पलिकडे दक्षिण अमेरीकेत चिली आणि आर्जेंटीनामध्ये काही घडले तरी आपण जाहीर नको मात्र गोपनीय दखल तरी घेतली पाहिजे. तशी ती घेतली जातेय याची खात्री आहे मात्र त्यावर प्रक्रिया होऊन त्याचे रूपांतर आपल्या धोरणांत झाल्याचं मला एक सामान्य नागरीक म्हणून तरी दिसत नाही.
हे असं का होतंय ? याचा विचार केल्यास स्वतंत्र भारताच्या वाटचालीत त्याची बीजे दिसून येतील. दुसर्या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. सोबत फाळणी झाली. त्यावेळी इंग्लंड व पुढे अमेरीका पाकिस्तानला शितयुध्दातील प्यादे म्हणून वापरायला लागलं. आपण स्वतंत्र झालो. फाळणीची जखम भळभळत होती. राज्यकारभार स्वकीयांकडे आला. त्यामुळे आता भारताला समृध्द करायचा आपला प्राधान्यक्रम होता. त्यावेळी रशियाला आदर्श मानून आपण पंचवार्षीक योजना राबवल्या. याकाळात आपण भारताच्या औद्योगीक प्रगतीची पायाभरणी करीत होतो सोबतच जागतीक पातळीवर एक दिशा देणारं राष्ट्र, असे सुध्दा इतर जगाला वाटावं अशी परिस्थीती होती. पुढे नेहरूंचं परराष्ट्र धोरण चीन बाबत फसलं आणि आपण स्वत:मध्येच गुरफटलो. अमेरिकेने पाकिस्तानला मदत देऊन भारताचं युध्द घडलं. अमेरीकेच्या मदतीवर पाकिस्तान लढला मात्र त्यावेळीपासून आपला संरक्षण खर्च वाढला. खरं तर भारत पाकिस्तान मध्ये युध्द घडावं असं काही कारण नव्हतं (१९६५). ते झालं आणि आपलं धोरण संरक्षणाबाबत सक्रिय झालं.
इंदीरागांधींच्या वेळी सुध्दा आपण १९७१ ला पाकिस्तान सोबत युध्द करून बांग्लादेश वेगळा केला. खरं तर अभूतपुर्व यश होतं हे. मात्र याचा भारताला फायदा मुळीच करून घेता आला नाही.
पाकिस्तान आपला शत्रु मानून आपण कायम वागत आलो आहोत. बांग्लादेश सुध्दा आपण आपला मित्र देश बनवू शकलो नाही. अफगाणीस्थानात काय घडतंय याच्याशी आपल्याला २५ डिसेंबर १९९९ पर्यंत (विमान अपहरण) काहीही संबंध नव्हता. श्रीलंका हे आपल्या फसलेल्या परराष्ट्र धोरणाचं उत्तम उदाहरण आहे. नेपाळ काल परवा पर्यंत आपला उत्तम सहकारी 'होता' असं म्हणायची वेळ आली आहे. मालदिव जगतंय आपल्या पैश्यावर आणि वर आपल्यावर डोळे उगारतंय. भूतान वगळता कुणी आहे का आपलं? आणि आपलं म्हणावं यासाठी आपण दरवर्षी भूतानवर कितीतरी पैसा खर्च करतोय याचं भान ठेवूया.
जगातील एक देश आपल्याशी १९४८ पासून आपण दोघे समदु:खी म्हणून मैत्री करू पाहत होता. त्याचे नाव इस्त्रायल मात्र आपण त्याच्याशी कायम फटकून वागत होतो. वाजपेयी सरकार येईपर्यंत आपण त्यांचं अस्तीत्वच नाकारत होतो. त्याला कारण नेहरू जेव्हा आंतरराष्ट्रीय राजकारणात होते तेव्हा इजिप्तचा नासर आणि नेहरुंची चांगली मैत्री होती आणि पॅलेस्टाइनचा यासर अराफात सुध्दा नेहरूंचा मित्र होता म्हणून आम्ही इस्त्रायलला दूर ठेवला. ही चुक आम्ही उशीरा सुधारली.
खरं तर आपलं परराष्ट्र धोरण गेल्या विस वर्षांत बरंच सुधारलं आहे. आता आम्ही दखल घेतोय मात्र ती पुरेशी नाहीये. सर्वात महत्वाचं म्हणजे मला कायम असं वाटतं की १९९१ च्या सुधारणांनंतर भारतात दाखल झालेल्या जागतीकीकरणाच्या वार्यांनी आपण फार वहावलो आहोत.
मी कायम १९४७ पुर्वीचा भारत आणि १९४७ नंतरचा भारत तसेच १९९१ पुर्वीचा भारत आणि १९९१ नंतरचा भारत अशी विभागणी करत असतो.
नेहरू काळापासून चालत आलेली बंद द्वार पध्दती सरकारने बदलली आणि देश जगासाठी तसेच जग देशासाठी मोकळं केलं.
१९९१ पुर्वी भारताला सोने गहाण ठेवण्याच्या नामुष्कीपासून ते आज तुडूंब भरलेल्या गंगाजळी पर्यंत आपण प्रवास केला आहे. आता जेव्हा भारताला पुरेसा निधी उपलब्ध आहे आणि जगातील व्यापारी राष्ट्रीनी आपला इगो सुखावण्यासाठी केलेल्या जागरहाटीमुळे जरी आपल्याला महासत्ता बनण्याचे स्वप्न पडत असतील तरी, असे होणे एवढ्यात तरी शक्य नाही. कुठलाही देश २० / ३० वर्षांत महासत्ता बनू शकत नाही. भारताला १९९१ पुर्वी आपण असं काही होऊ असं स्वप्नातही वाटत नव्हतं. भारताला आपला देश चालवायला पैसा नव्हता आणि पेट्रोल आयात कशी करावी असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आपल्याला हे लक्षात येईल की १९९१ पुर्वी भारताला नेहरूंचा काही काळ आणि इंदीरा गांधींचा काळ वगळता आंतरराष्ट्रीय राजकारणात गतीच नव्हती. त्याकाळी आपल्याला परराष्ट्र धोरण नव्हतं; होती ती परराष्ट्र नीती, आणि ती सुध्दा सक्रिय नव्हती तर प्रतिक्रियात्मक होती.
१९९१ नंतर जेव्हा पुरेसा पैसा हातात खेळायला लागला तेव्हा भारताला जागतीक राजकारणातीचे स्वप्न पडायला लागले आहेत. मात्र आता २२ वर्षांनंतरही भारताने नवीन असे मित्र तयार केले असे दिसत नाही. आणि त्याचवेळी शेजारी मात्र दूरावून ठेवलेले दिसत आहेत. नाही म्हणायला अफगाणीस्तानात आपण पाय रोवतो आहे मात्र ते किती दिवस टिकेल हे आपल्याला सुध्दा ठाऊक नाही.
एकंदरीत हा खुप मोठा विषय आहे. यावर अधिक बोलता येईल. जाता जाता एक उदाहरण सांगतो जेव्हा आग्नेय आशियातील देशांनी आशियान संघटना बांधली तेव्हा भारताने त्यात सदस्यं व्हावे अशी विनंती केली होती. तेव्हा आपण ती विनंती आम्ही आग्नेय आशियात येत नाही म्हणून नाकारली. आज काहि वर्षांपुर्वी वेळ अशी आली की आपण त्यांना सदस्यत्व देण्याची विनंती केली तर त्यांनी ती नाकारली मात्र निरिक्षक म्हणून बसायची परवानगी दिली. आपला प्रवास कसा वर-खाली झाला हे यावरून लक्षात यावे.
- नीलकांत
14 May 2013 - 8:25 pm | श्रीगुरुजी
>>> जाता जाता एक उदाहरण सांगतो जेव्हा आग्नेय आशियातील देशांनी आशियान संघटना बांधली तेव्हा भारताने त्यात सदस्यं व्हावे अशी विनंती केली होती. तेव्हा आपण ती विनंती आम्ही आग्नेय आशियात येत नाही म्हणून नाकारली.
नेहरूंच्याच काळात सिंगापूर, मलेशिया इ. देशांनी भारत आपला संरक्षणकर्ता म्हणून वागावे अशी इच्छा प्रदर्शित केली होती. या देशांशी कोणी युद्ध करून लागल्यास भारत अधिकृतरित्या त्यांच्या बाजूने युद्धात उतरून या देशांचे संरक्षण करेल असा अधिकृत करार करून भारतासारख्या प्रचंड मोठ्या देशाने आपले संरक्षण करावे अशी या देशांची इच्छा होती. अमेरिकेचा असाच करार अजूनही जपानबरोबर आहे. या कराराच्या बदल्यात भारताने या देशांचे नौदल, भूदल वगैर्र उभारून द्यावे, प्रशिक्षण द्यावे व वेळप्रसंगी आपल्या बाजूने युद्धात उतरावे व त्या बदल्यात भारताला सवलती, मलेशियाच्या आखातात मुक्त संचार, त्या देशांच्या भूमीवर लष्करी तळ इ. गोष्टी देऊ अशी या देशांची भूमिका होती.
पण असा करार केला तर आपल्याला आक्रमक समजले जाईल या भ्रामक समजूतीने नेहरूंनी या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या व एक ऐतिहासिक संधी घालविली.
14 May 2013 - 8:41 pm | सचिन कुलकर्णी
Historic blunder समजले पाहिजे.. :(
14 May 2013 - 9:17 pm | सचिन कुलकर्णी
पुन्हा एकदा सुंदर विश्लेषण.
15 May 2013 - 9:12 am | ऋषिकेश
चांगला प्रतिसाद. हेच म्हणायचे होते. फक्त इतका टंकनोत्साह नव्हता :)
14 May 2013 - 8:29 pm | श्रीगुरुजी
>>> आपण भारतीय पाकिस्तानला आपला शत्रु मानण्याची चुक कायम करत आलो आहोत. खरं तर त्या देशाची ती क्षमताच नाही. आणि प्रत्यक्षात तो देश एक प्यादं असल्याचं कायम जागतीक पटलावर दिसत आलं आहे.
पाकिस्तानची भारताचा मित्र तर सोडाच पण शत्रूदेखील व्हायची लायकी नाही. खरं तर भारताने पाकिस्तानशी संबंध ठेवावे इतपत पाकिस्तानची पात्रता नाही.
परंतु आपण जरी पाकिस्तानला शत्रु मानले नाही तरी तो देश कायम शत्रुत्वभावना मनात ठेवून त्रास देत राहतो. पाकिस्तानच्या कारवायांकडे भारताला दुर्लक्ष करणे शक्य नाही. त्यामुळे लायकी नसताना सुद्धा भारताने पाकिस्तानला धडा शिकविणे आवश्यक आहे.
दुसरं असं की जरी पाकिस्तान प्यादं असलं तरी जर प्यादं त्रासदायक ठरत असेल तर ते वेळीच मारणं आवश्यक आहे. अन्यथा ८ व्या घरात पोचल्यावर त्याचा वजीर होईल.
14 May 2013 - 8:40 pm | श्रीगुरुजी
>>> पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र मानल्यास आपल्याला होणारा फायदा काहीच नाही उलट चीनला आपल्या पश्चिम सीमेवर उत्तम मित्र मिळतो. मात्र आपण आपला दृष्टीकोण बदलल्यास आणि पाकिस्तानला आपल्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबित्व पत्करण्यास लावल्यास (याला आधीच्या काळी मांडलीकत्व असे म्हणायचे) आपल्याला प्रगतीस सोईस्कर असे वातावरण तयार होईल.
पाकिस्तान हे शत्रुराष्ट्र मानल्यास शत्रुचा नि:पात करण्याच्या दृष्टीने भारत प्रयत्न करेल व त्यातून पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांना पायबंद बसू शकेल. पाकिस्तानला शत्रुराष्ट्र माना अथवा न माना, तो देश कायमच शत्रुत्वाने वागून त्रास देणार. त्यामुळे पाकिस्तानविरूद्ध कारवाई करून तो त्रास थांबविणे गरजेचे आहे.
पाकिस्तान भारतावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहणे शक्य नाही कारण पाकिस्तानला सौदी अरेबिया, अमेरिका, आखातातले देश इ. कडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळते. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानला साखरेची मोठ्या प्रमाणावर गरज होती. त्यावेळी भारत कमी दरात साखर पुरवेल असे शरद पवारांनी जाहीररित्या सांगितले होते. पण पाकिस्तानने भारताकडून कमी दराने साखर घेण्याऐवजी ब्राझील व इतर देशांकडून महागड्या दराने साखर घेतली. कारण भारताला पाकिस्तान कायमच शत्रु मानतो व शत्रुकडून साखर घेणे म्हणजे शत्रुच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्यासारखे आहे. भारताने पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन दर्जा दिला तरी पाकिस्तानने असा दर्जा भारताला दिलेला नाही. भारत-पाकिस्तान व्यापार अतिशय थोडा असून त्यात सुद्धा भारताची आयात जास्त व निर्यात कमी अशी स्थिती आहे.
त्यामुळे भारत पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या आपल्यावर अवलंबून ठेवणे शक्य नाही. तशीच वेळ आली तर पाकिस्तान जगाकडे भीक मागेल किंवा महागड्या दराने जगाशी व्यापार करेल, पण भारताशी व्यापार करायला पाकिस्तानला अजिबात प्राधान्य नसेल. याचे कारण उघड आहे. पाकिस्तान भारताला उघडउघड शत्रु मानतो. भारत मात्र ताकाला जाऊन भांडे लपवितो.
14 May 2013 - 9:05 pm | सचिन कुलकर्णी
'ते' आपल्याला शत्रू मानतात आणि मानत राहणारच.
14 May 2013 - 9:40 pm | lakhu risbud
मुळात पाकिस्तानला एक एकसंध समाज (unique entity) समजणे चुकीचे आहे. तिथे सर्वात मोठा रोजगार देणारी संस्था लष्कर आहे. आणि त्यांच्या लष्कराचे अस्तित्वच मुळात भारतद्वेष या कार्यकारण भावावर आधारित आहे. भारताशी शत्रुत्व नको असे मानणारे लोक जरी तिथे जास्त असले तरी त्यांचा तिथल्या व्यवस्थेवरच प्रभाव कमी आहे. जोपर्यंत तिथे लष्कराचा प्रशासन आणि राजकारणावर वरचष्मा राहणार तोपर्यंत लष्कर आपल्याला शांतपणे जगू देणार नाही. आत्ता नवाझ शरीफ जरी लोकशाही मार्गाने सत्तेवर आले असले ते लष्कराच्या प्रभाव कमी होईल अशी कृती करणार नाहीत. तो अलिखित करारच असणार (not minding each other business
14 May 2013 - 2:47 pm | सुनील
राही आणि नीलकांत यांचे प्रतिसाद आवडले.
14 May 2013 - 5:50 pm | रमेश आठवले
नवाझ शरीफ आणि मनमोहनसिंग यांची मादरे जबान एकच( पंजाबी) असली तरी सुद्धा सिंग यांनी नवाझ यांच्याशी गल करण्याची घाई करू नये.
पाकिस्तानी लोक आणि त्यांचे राज्यकर्ते यांच्या मनात काश्मीर आणि त्या देशाच्या विभाजनास भारताने लावलेला हातभार, यांच्याविषयी कायमसाठी सल आहे. ते लोक धर्मनिष्ठ असल्याने ही सल येत्या काही पिढ्या तरी जाणार नाही.
नवाझ शरीफ आले म्हणजे फार तर दगडापेक्षा वीट मऊ असे म्हणता येईल.
बाकी तुपात तळले किंवा साखरेत घोळले तरी कारले कडूच रहाणार.
14 May 2013 - 8:44 pm | राही
मग ह्या कडू कार्ल्याचे करावे तरी काय?
कसे काय हे कारले इतके कडू बनतेय तेच पाहून घेतो म्हणत त्याची खांडोळी करून (म्हणजे नक्की काय करून?)ती तिथेच ठेवावीत?
की, छे, हे कारले फारच कडू बुवा, आपल्याला नकोच ते, म्हणून दृष्टी इतरत्र वळवावी?
की कारल्याचा कडूपणा घालवून टाकण्यासाठी (आणि तोंडले नावाचे फळ निर्माण करण्यासाठी) पिढ्यानपिढ्यांच्या जेनेटिक खटपटीला लागावे?
की, असेना कडू, मधुमेही लोक वापरतातच ना? असे म्हणून हवे तितकेच वापरून सोडून द्यावे?
की, कारल्यापेक्षाही जहरकडू असे दुसरे फळ शेजारी असल्यास,'त्या कारल्यापेक्षा हे कारले फारच कमी कडू आहे हो' असे म्हणून सुटकेचा निश्वास टाकावा?
14 May 2013 - 9:07 pm | सचिन कुलकर्णी
चीन हे कारले आणि पाक करटुले असे म्हणूयात का? ;)
15 May 2013 - 11:13 am | रमेश आठवले
चीनशी भारताचे काही बाबतीत मतभेद आहेत परंतु त्यामुळे चीन पक्का वैरी देश आहे असे मानता येत नाही. याच्या उलट पाकिस्तान हा देश त्याचा जन्म झाल्यापासून गेली ६५ वर्षे भारताचा दुस्वासच करत आला आहे.
14 May 2013 - 8:48 pm | कपिलमुनी
भारतात येइल तो सुदिन !!
14 May 2013 - 9:10 pm | सचिन कुलकर्णी
अमेरिकेतल्या लोकशाही पेक्षा भारतात Genuine लोकशाही आहे. फक्त ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने राबविली जातेय.
14 May 2013 - 10:47 pm | विनोद१८
वरील चर्चेत काही बाबी लक्षात घ्याव्या लागतील..
एक म्हणजे पाकिस्तानची निर्मीतीचे मूळ हे 'हिन्दू द्वेष' म्हनूणच 'भारताचा कायम द्वेष'.. ह्यावर आधारीत आहे, हे जर लक्षात घेतले व आजवरचा इतिहास व अनुभव पाह्ता, तो कधीतरी आपला एक चान्गला 'शेजारी वा मित्र' होइल असे समजणे म्हणजे आपली अक्कल गहाण पडली आहे असे नक्की समजावे, हे एक कायम स्वप्नच राहिल हे नक्की.
करण तो एक कट्टर धार्मीक देश असल्यानेच आपल्या वयाचा असुनसुद्धा अतिशय मागासलेला, कायम दरीद्री ( सामाजिक, आर्थीक, सान्स्क्रुतिक व राजकीय द्रुष्ट्या ) तसेच तेथे समाजिक प्रगल्भता नसल्याने व सतत लश्कराच्या अमलाखाली असलेली तेथील राजकीय व्यवस्था म्हणजेच तिथली तथाकथीत लोकशाही ( तेथील सैन्यापुढे हतबल ) (??) तो देश आपला 'हितचिन्तक शेजारी' कसाकाय होउ शकेल ?? हे कोणी सान्गेल का ???
' पान्ढरी कबुतरे ' उडवुन, क्रिकेट खेळुन, नाचगाणी करुन आणि 'मिपावर' चर्चा करुन तो जर सुधारणार असेल तर त्याचे स्वागत असो...!!!!
विनोद१८
15 May 2013 - 12:41 am | नीलकांत
मिपावर चर्चा करून पाकिस्तानात लोकशाही टिकणार असे कुणीही म्हणत नाहीये.
मी प्रयत्न करतोय तो एका पुर्वग्रहीत दृष्टीकोणाच्या वर येण्याचा.आणि तेच माझे मत इतरांना समजावून देण्याचा.
माझ्या मते पाकिस्तान आज भारताच्या खूप मागे पडलाय. कारणे तुम्ही दिली आहेतच. तर असे असताना त्याला शत्रु म्हणून कुरवाळण्याची गरज काय? आपण त्यापेक्षा खुप पुढे आलोय. आज पाकिस्तानच्या पल्याड सुध्दा आम्ही पाहणार आहोत का नाही?
कुणी अश्या दिवास्वप्नात असेल की उद्या भारत पाकिस्तान मध्ये युध्द होईल आणि पाकिस्तान नामशेष होईल तर त्या सर्वांना विनंती आहे की जागे व्हा ! आजच्या जगात तरी अश्या प्रकारे देश नामशेष होण्याची शक्यता नाही. यापुढे देश नामशेष न होता कमी क्षमतेचे करता येतील मात्र नामशेष करता येणार नाही. कमी क्षमतेचे म्हणजे काय ते बघायचं असेल तर पुर्वीचा सोव्हियत संघ आणि त्याचे अमेरीकेने केलेले रशीया, हे उदाहरण पुरेसे बोलके आहे. किंवा आधीच्या पाकिस्तानचे आताचे पाकिस्तान व बांग्लादेश हे सुध्दा उदाहरण आहे. १९७१ ला चाललेली युध्दाची पध्दत १९९१लाच काल बाह्य झाली असं म्हणूया. आता मात्र अधीक क्षमतेने आणि मोठ्या आखणीने काम करायला पाहिजे. उद्या पाकिस्तान नष्ट झाल्यावर भारताच्या समस्या संपणार नाहीत.
शेजारच्याचं जळतं घर जर आपण पाडलं तर त्याच्या शेजारचा वणवा लागलीच आपल्या घरापर्यंत पोहोचेल. आता उपाय हा आहे की आपल्यामध्ये जो पर्यंत त्या वणव्याला सक्षमपणे तोंड देण्याची क्षमता येत नाही तोपर्यंत शेजार्याचे घर टिकले पाहिजे. याला कधी कधी बफर असा शब्दप्रयोग सुध्दा केला जातो.
पाकिस्तान कायम आपल्याला शत्रु समजतो. त्यांच्या राज्यकर्त्यांच्या तश्याच थाटाच्या वल्गणा असतात. भारताचे तुकडे पाडणार... काश्मिर जिंकून घेणार... वगैरे... असे केल्यावर त्यांना देशाची प्रगती वगैरे करण्याची गरज नाही. त्यांची सत्ता टिकते.... सैन्याचं महत्व टिकते... आयएसआय चे महत्व कायम राहते... लोकांना सुध्दा अन्य काही केल्याशिवाय अतिशय भावनिक मुद्दा चर्चा करायला मिळतो. आणि देशात प्रगतीच्या नावाने उजेड पडत असला तरी सरकार टिकून जाते. त्यामुळे त्यांच्या देशात अश्या वातावरणाची निर्मीती झालेली आहे. त्यांनी मान्य करो अथवा नको ते लोक या मुर्खपणाची किंमत मोजत आहेत. भिक मागून जगण्याची वेळ त्यांच्यावर आहे.
उत्पादनक्षम क्षेत्राची त्यांची प्रगती फार मंदावली आहे. आपले आशियातील भौगोलीकस्थान कॅश करून अमेरीकेपासून पैसा घेऊन ते जगताहेत. किंवा सौदीकडून पैसा घेऊन अधिकाधीक मदरसे बांधल्या जात आहेत. ह्या सर्वांतून पाकिस्तान कुठे जाईल ते माहिती नाही. भारताने आणि किमाण आपण जे लोक विचार करू शकतो त्यांनी तरी पाकिस्तान पेक्षा पुढे जाऊन विचार करायला पाहिजे. त्यासाठी भावनिक होण्याची गरज नाही.
वेळ आल्यास उत्तर देण्यास आपली संरक्षण क्षमता आहे. मात्र राजकीय किंवा कूटनितीत आपण कमी पडतो हे नाकारून चालणार नाही.
आज जेव्हा इस्त्रायल रामल्लात रणगाडे घालतं तेव्हा अमेरीका त्याची बाजू उचलून धरते... भारताला अमेरीका सोडा पण आशियातील किंवा आफ्रिकेतील दोन देश... युरोपातील एखादा देश... किमान शब्द तरी बोलेल का?
१९७१ आपल्या पंतप्रधान इंदीरा गांधीना युध्द करण्याआधी जगभर फिरून सांगावं लागलं की पुर्व पाकिस्तानातील बेदलीमुळे भारतात आलेल्या निर्वासितांमुळे भारताच्या नैसर्गीक व सामाजिक संसाधनांवर ताण येतोय. असं साधारण वर्षभर केल्यावर मग आपण युध्द पुकारले. आज २०१३ मध्ये परिस्थिती खुप काही बदलली आहे असं नाहीये. आपण जगात निर्णायक नाही आहोत. मात्र जगासाठी आश्वासक तरी असू शकतो ना? त्यासाठी प्रयत्न करायचा की जगाच्या राजकारणापेक्षा पाकिस्तान हा मोठा आहे असं म्हणून त्यात अडकायचं ते आपलं आपण ठरवूया.
- नीलकांत
15 May 2013 - 1:49 am | अर्धवटराव
भारताला पाकिस्तान शत्रु वाटतो... पण शत्रुबाबत देखील ग्राऊण्ड रिअॅलीटीवर आधारीत भान ठेवावे लागते हे भारत विसरतो. चालायचच.
अर्धवटराव
15 May 2013 - 12:31 pm | राही
मला हे कळत नाही की पाकिस्तानला नष्ट करायचे किंवा चारी मुंड्या चीत करायचे म्हणजे नक्की काय करायचे? आतापर्यंतच्या सर्व युद्धांत आपण त्यांचा पराभव केलेला आहे; निदान आपण तरी असे मानतो. मग आणखी एका युद्धविजयाद्वारे त्या भूभागात आपले शासन, आपली सत्ता लादायची का? तिथले पंधरा कोटी मुसलमान ही सत्ता सुखासुखी मानतील? त्यांच्याच सरकारविरुद्ध किंवा एका समाजगटाविरुद्ध आज तिथे प्रचंड हिंसाचार चालू आहे. त्यांना नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी आपले किती सैन्य तिथे तैनात करावे लागेल? आणि आधीच घरचे झाले थोडे अशी गत असताना हे पंधरा कोटींचे नसते व्याह्याचे घोडे आपण का घरात घ्यावे? आणि सैन्याच्या जोरावर कोणताही प्रदेश दीर्घकाळ ताब्यात ठेवता येत नाही हे अनेक ठिकाणी सिद्ध झालेले आहे. तेव्हा अशी दिवास्वप्ने किती दिवस बघत रहाणार?
कोणताही गाजावाजा न करता आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक आघाडीवर पडद्याआड केलेल्या हालचाली हाच यावरचा इलाज आहे. आणि आपण तो करीत आहोत. आज पाकिस्तानी लोकांत निर्माण झालेली लोकशाहीबद्दलची आस हे त्याचेच फलित आहे. अर्थात अमेरिकन दट्ट्याचाही भाग आहेच, पण पाकिस्तानी विचारवंतांमध्ये भारताच्या प्रगतीचे, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे उघड कौतुक आहे, त्यांचा दबाव सतत असतो.
परराष्ट्रनीतीविषयी म्हणायचे तर फाळणीच्या वेळी आपल्याकडे रशिया किंवा अमेरिका असे दोन पर्याय होते, आपण सोविएत यूनिअन निवडले. मिनू मसानी आणि माजी राजेरजवाडे यांचा एक स्वतंत्र पार्टी या नावाचा उजवा पक्ष होता, स.का. पाटीलांसारखे तुरळक वजनदार लोक अमेरिकेच्या बाजूने होते. अमेरिकेने त्यांना विशेषतः स.का. पाटलांना बळ देऊन ते नेहरूंनंतर पंतप्रधान बनतील असा प्रयत्न करूनही पाहिला पण लोकांमध्ये त्यांना स्थान नव्हते. स.का.पाटलांच्या होमटर्फ वरच त्यांचा संयुक्त महाराष्ट्र समिती आणि आचार्य अत्र्यांची मुलुखमैदान तोफ यांमुळे 'जायंट किलर' जॉर्ज फर्नँडीझकडून दारुण पराभव झाला. उजवी चळवळ जोम धरू शकली नाही. पुढे शिवसेनेद्वारे अमेरिकेने मुंबईत पाय रोवण्याचा प्रयत्न केला त्याला कम्यूनिस्टांना खतम करण्यापुरते नॉमिनल यश मिळाले. (एकेकाळी यूसिस मध्ये काम करणारे लोक मुंबईत शाखाप्रमुख/उपशाखाप्रमुख होते.) असो.
अमेरिकेला भारतीय भूमीवर सैनिक तळ हवे होते, ही आपल्या सार्वभौमत्वाला धक्का पोचवणारी गोष्ट आपण मान्य केली नाही. पाकिस्तानने पेशावर देऊन टाकले आणि शीतयुद्ध आपल्या घरात ओढून घेतले. त्याबदल्यात अमेरिकेने आर्थिक मदतीच्या कुबड्या देऊन पाकिस्तानला परावलंबी करून टाकले. शिवाय बाहुले लष्करशहा आणि अस्थिर राजवटी हे बोनस दिले. भारताने मात्र या सापळ्यात न अडकता 'डावीकडे झुकलेला मध्यम मार्ग' स्वीकारून रशियाच्या सहाय्याने पहिल्या पंचवार्षिक योजनेतच भिलाई, रूरकेला अशा अवजड उद्योगांची पायाभरणी केली. जिथे साधी सेफ्टी पिन आणि सुईसुद्धा आयात होई तिथे नौका, रेल इंजिने, विमानांचे भाग बनू लागले. नंतर क्रमाक्रमाने शेती आनि सेवाक्षेत्रांवर भर देत देत भारताने आजची प्रगती साधली आहे.
प्रत्येक देश आपापले सामर्थ्य आणि मर्यादा ओळखून असतो. जपान सारखा प्रगत देशही चीनशी तुटेपर्यंत ताणत नाही. त्याम्चेही भूप्रदेशावरून आपापसात वाद आहेत पण अमेरिकेच्या सहाय्याने ते युद्धखोरीने सोडवण्याचा प्रयत्न जपान करीत नाही कारण अमेरिकेशी कितीही मैत्री असली तरी या युद्धात गुंतून चीनशी शत्रुत्व पत्करण्याचा मूर्खपणा अमेरिका कधीही करणार नाही हे जपानला ठाऊक आहे.
जगात फक्त इंग्लंड, फ्रान्स, स्पेन पोर्तुगाल असे मोजकेच देश आहेत की ज्यांनी आपल्या मूळ भौगोलिक प्रदेशापेक्षा कितीतरी मोठ्या प्रदेशावर साम्राज्ये स्थापली. जर्मनीनेही तशी ईर्ष्या बाळगली. सोविएत यूनिअन हेही त्यातलेच. पण शेवटी ही सारी साम्राज्ये स्वतःच्याच भाराखाली कोसळली. केंद्रापासून दूरवरचा भूभाग कशाही तर्हेने,कोणत्याही महासत्तेच्या सहाय्याने फार काळ ताब्यात ठेवता येत नाही हे अगदी अलेक्झांडरच्या काळापासूनचे सत्य आहे.
इस्झ्राएलचे उदाहरण नेहमी दिले जाते. त्यांच्यात जिद्द आहे हे खरेच. पण समजा अमेरिकेचा पाठिंबा काही कारणाने कमी झाला तर ते चिमुकले राष्ट्र तग धरू शकेल काय? अमेरिकेचे हित आहे तोवरच अमेरिका इझ्राएलची किंवा कुणाचीही मित्र आहे. अमेरिकेचे स्वारस्य संपले की पुढे काय? जगात कुणीही आपला स्वार्थ असल्याशिवाय कुणाच्याही मदतीला उगीच धावून जात नाही. बोस्निया-हर्झेगोविना, बैरुत, सूदान येथे कित्येक वर्षे यादवी सुरू होती. शेकडोहजारो माणसे मेली. शेवटी अगदीच गळ्याशी आले तेव्हा इतर राष्ट्रांनी हस्तक्षेप केला. असो.
हुश्श्य! प्रतिसाद बराच लांबला. आता वाचकांचा अधिक अंत न पहाता थांबावे हे बरे.
15 May 2013 - 2:08 pm | ऋषिकेश
राहि तै.. उत्तम प्रतिसाद.
आम्रिका, शिवसेना, सका पाटिल वगैरे इतकं पष्ट लिहायच नस्त वो! ;)
15 May 2013 - 2:14 pm | बॅटमॅन
प्रतिसाद उत्तमच, पण ते शिवसेना-आम्रिका आणि स का पाटील- आम्रिका ही लिंक अंमळ ओढूनताणून लावलेली वाट्टे.
15 May 2013 - 2:39 pm | सुनील
स का पाटील हे मुंबई केंद्रशासीत ठेवण्याबाबत आग्रही होते हे ठाऊक होते. पण त्यांना अमेरिकेने बळ देऊ केले होते ही माहिती नवी आणि रोचक आहे!
शिवसेना आणि काँग्रेसच्या मधूर संबंधाबाबत कधीच शंका नव्हती! उगाच नाही वसंतराव नाईकांच्या काळात तिला "वसंतसेना" असे संबोधीत! पण तिथेही अमेरिकेचा संबंध ठाऊक नव्हता.
सहमत.
15 May 2013 - 4:55 pm | नितिन थत्ते
सहमत आहे.
स का पाटील आम्रिका लिंक ऐकलेली नाही. पण सिंडिकेटमधले बरेच जण अमेरिकाधार्जिणे होते हे ऐकले आहे. पुढे (नेहरूंच्या कार्यकालातच) जयप्रकाश नारायण वगैरे अनेक समाजवादी म्हणवणारे लोक काँग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम नावाच्या संस्थेशी जोडलेले होते. साम्यवादी देशातील स्वातंत्र्याच्या अभावाविरोधात ही संस्था प्रचारकार्य करीत होती. तिला अमेरिका आर्थिक पाठबळ पुरवत असावी. (हे कमल पाध्ये यांच्या आत्मचरित्रात वाचले आहे).
15 May 2013 - 12:34 pm | श्रीगुरुजी
>>> त्यासाठी प्रयत्न करायचा की जगाच्या राजकारणापेक्षा पाकिस्तान हा मोठा आहे असं म्हणून त्यात अडकायचं ते आपलं आपण ठरवूया.
जगाच्या रा़जकारणापेक्षा पाकिस्तान मोठा आहे असे समजून त्यातच गुंतुन रहायचं असं कोणीच म्हणत नाहीय्ये. पाकिस्तान हे एक अयशस्वी राष्ट्र आहे किंवा अंतर्गत राजकारणामुळे पाकिस्तानचे लवकरच विभाजन होईल अशा समजुतीत अल्पसंतुष्ट न राहता, पाकिस्तान हा आपला शत्रु आहे हे लक्षात घेऊन पाकिस्तानशी मैत्री, शांतता चर्चा, कलाकारांची देवाणघेवाण, दोन्ही देशांतील नागरिकांचा सुसंवाद, १४ ऑगस्टच्या मध्यरात्री सीमेवर जाऊन मेणबत्त्या लावणे अशा गोष्टी करण्यापेक्षा पाकिस्तानशी एखाद्या शत्रुप्रमाणेच व्यवहार केला पाहिजे. हे करण्यासाठी युद्ध करण्याची गरज नाही. पण पाकिस्तानने आगळीक केल्यास दोन तडाखे हाणले पाहिजेत. दोन्ही देशातले दळणवळण, व्यापार, चर्चा इ. बंद करून, जिथे शक्य असेल तिथे सीमा सीलबंद करून सर्व व्यवहार तोडले पाहिजेत. पाकिस्तानशी सर्व संबंध तोडले तर इतर देशांबरोबर व्यवहार करण्यासाठी भारताला जास्त वेळ व संधी मिळेल.
15 May 2013 - 12:53 pm | श्रीगुरुजी
>>> मला हे कळत नाही की पाकिस्तानला नष्ट करायचे किंवा चारी मुंड्या चीत करायचे म्हणजे नक्की काय करायचे? आतापर्यंतच्या सर्व युद्धांत आपण त्यांचा पराभव केलेला आहे; निदान आपण तरी असे मानतो. मग आणखी एका युद्धविजयाद्वारे त्या भूभागात आपले शासन, आपली सत्ता लादायची का? तिथले पंधरा कोटी मुसलमान ही सत्ता सुखासुखी मानतील?
एका वेगळ्या धाग्यात मी याविषयी माझे मत लिहिले होते. पाकिस्तान ताब्यात घेऊन तो भारताचा भूभाग बनविणे किंवा तिथे राज्य करणे अशक्य आहे. तसे करायला गेलो तर एक नवीन डोकेदुखी मागे लागेल.
त्याऐवजी पाकिस्तानची अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, रणगाडे वगैरे ताब्यात घेऊन व तिथल्या अणुभट्ट्या नष्ट करून पाकिस्तानला लष्करीदृष्ट्या दुर्बल बनविणे, काश्मिरसीमेवरील महत्त्वाची शिखरे ताब्यात घेणे, तिथली अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे उध्वस्त करणे, जमेल तितक्या अतिरेक्यांना ताब्यात घेणे व नंतर सीमा सीलबंद करून भारतात होणारी घुसखोरी थांबविणे इ. उपाय भारत अधिक सुरक्षित करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
15 May 2013 - 12:59 pm | यशोधन वाळिंबे
पाकिस्तानात लोकशाही
15 May 2013 - 2:23 pm | सचिन कुलकर्णी
धन्यवाद वाळिंबे साहेब.
16 May 2013 - 4:43 am | यशोधरा
नीलकांत, प्रतिसाद अतिशय आवडले.
16 May 2013 - 10:30 am | चिगो
निलकांत, राही ह्यांचे प्रतिसाद नेहमीसारखेच उत्तम.. संतुलित आणि माहितीपुर्ण.. पाकिस्तानशी युद्ध करुन त्याला जिंकून, आपल्याशी जोडून 'पैसे देऊन गँगरीन जोडून घेण्यात' (साभार : गवि) काय हशिल आहे? पाकिस्तानशी आर्थिक संबंध स्थापित करुन , त्यांना आर्थिकदृष्ट्या भारतावर. अवलंबित ठेवावे लागेल. चीन आपला शत्रू नाही का? तोही ईशान्य भारतात राष्ट्रविरोधी करायला मदत करतोय. नक्षलवाद्यांना सहाय्य करतोय, आणि भारताच्याच सीमेत 'एकतर घुसखोर, वर शिरजोर' बनतोय.. एवढं असुनही आम्हाला अगदी 'मेड इन चायना' गणपतीपण चालतो, आणि पाकिस्तानशी संबंधच नकोत.. का? चायनावाल्या गोष्टी स्वस्त असल्याने देशप्रेम थोडावेळ बाजुला ठेवल्या जातं ना? मग हेच धोरण भारताने पाकिस्तानसोबत राबवायला लागेल, जर चीनने आपल्याला त्यात आधीच पछाडलं नसेल तर..
16 May 2013 - 2:14 pm | राही
नेमकी मांडणी, नेमके विश्लेषण. नेहमीप्रमाणेच.
16 May 2013 - 7:48 pm | नीलकांत
राही म्हणतात त्याप्रमाणे नेमकी मांडणी, नेमके विश्लेषण. सहमत आहे.
@राही - तुमचे प्रतिसाद आवडले.
- नीलकांत
16 May 2013 - 12:18 pm | मालोजीराव
FATA ह्या भागाला फाट्यावर मारल्याशिवाय पाकिस्तानात सुधारणा होईल असे वाटत नाही, अजूनही संपूर्ण पाकिस्तान तेच लोक कंट्रोल करतायेत
16 May 2013 - 11:10 pm | सचिन कुलकर्णी
पण FATA नाही समजले. समजावून सांगता का प्लीज. धन्यवाद.
16 May 2013 - 11:30 pm | श्रीरंग_जोशी
विकी दुवा
16 May 2013 - 1:40 pm | निनाद मुक्काम प...
वैधानिक मार्गाने होणारी संथ उत्क्रांती कितीही क्लेशकारक असेना का ती रक्तरंजित क्रांती पेक्षा परवडते.
सध्या पाकिस्तान त्याच्या मार्गावर हळूहळू वाटचाल करू लागला आहे , त्यांच्या मार्गात लष्कर ,कट्टरपंथी , ह्यांच्यासारखे खाचखळगे आहेत.
पण पाकिस्तानी तालिबानचा पाकिस्तान ला पडलेला विळखा व त्यांच्या जाळ्यात अडकलेला पाकिस्तानी अशिक्षित ,गरीब वर्ग ह्यांच्या विरुद्ध पाकिस्तान मधील मध्यम व श्रीमंत वर्गाने लोकशाहीला प्राधान्य दिले.
कारण लष्कराचे कट्टरपंथी कनेक्शन त्यांच्या जनतेला चांगलेच माहीत आहेत.
लष्कराचे पाकिस्तानी समाजात झालेले अवमूल्यन हे ह्या निवडणुकीचे ठळक वैशिष्ट्य आहे.
कयानी ह्यांना अनेकदा संधी असून सुद्धा त्यांनी सत्ता हातात घेतली नाही.
ह्यांचे प्रमुख कारण हक व मुशरफ ह्यांना अमेरिकेकडून जसा निधी व मदत मिळत गेली ज्याद्वारे पाकिस्तानी प्रस्थापित वर्गाला अर्थकारण सुलभ होत गेले तशी मदत मिळणे शक्य नव्हते. म्हणजे ढासळलेली अर्थव्यवस्था पूर्व पथावर आणण्याचे अजून कोणताही मार्ग त्यांच्याकडे नव्हता.
अमेरिकेला द्रोण हल्ले बंद करा हे सांगण्याची कुवत लष्कराकडे नाही. त्यात लादेन प्रकरणाने तर त्याची अजून नाचक्की झाली आहे. ह्यामुळे सत्तेवर आल्यावर अमेरिकेच्या दांडगाई ला उत्तर देणे शक्य नसल्याने कट्टर पंथीय व सामान्य जनतेचा रोष ओढवून घेणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यातच पाकिस्तानी लष्कर आपली बहुतांशी शस्त्र खरेदी ही अमेरिकेच्या ऐवजी चीन कडून करते त्याचवेळी भारत अमेरिकेकडून शस्त्र विकत घ्यायला सुरवात करत आहे. ह्यामुळे अमेरिकेचा मुक्त वरदहस्त पाकिस्तानवर पूर्वी सारखा असणार नाही. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे ह्या शस्त्र खरेदीत अनेक अधिकारी , सत्ताधारी व प्रशासकीय अधिकारी गुंतले असतात त्यामुळे त्यांचे चीन शी मिंधे होणे व त्यांच्या इशाऱ्यावर नाचणे क्रमप्राप्त आहे.
ह्यामुळे त्याचसोबत अमेरिकेचे भारताशी सर्व स्तरावर मैत्री व सहकार वाढत असल्याने त्याला उत्तर म्हणून चीन व पाकिस्तान ह्यांची नैसर्गिक मैत्री जशी अमेरिका व भारताची आहे होणे साहजिकच आहे.
कयानी ह्यांना हक सारखे पैगंबरवासी किंवा मुशरफ सारखे हतबल ,निष्क्रिय होण्यापेक्षा सन्मानाने निवृत्त होणे व निवृत्त होऊन सन्मानाने पाकिस्तानात राहणे जास्त पसंद होते. ह्यामुळे ह्या निवडणुकीत लोकशाही मार्गाने सरकार निवडून येणे अपरिहार्य होते.
पाकिस्तानी जनतेपुढे उत्तर प्रदेश सारखे दोन समर्थ पर्याय होते.
त्यांनी कसे मायावती मग अखिलेश असे आलटून पालटून दोन्ही खाऊ पक्षांना समान खाऊ खाण्याची संधी देतात तसे येथे येथील जनता पी पी पी व मुस्लिम लीग ला समान संधी देत असतात.
ह्या निवडणुकीचे अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे पठाणांचा मसीहा म्हणून इम्रान चा उदय व कराची मध्ये मुजाहीर पक्षाची हुकमत असलेल्या एम एक्यू एम ला समर्थ पर्याय म्हणून निवडून येणे व छोट्या का होईना प्रांतात आपले सरकार बनवणे शक्य झाले हे आहे.
इम्रान चा खर्या अर्थाने ह्या निवडणुकीतून पाकिस्तानी राजकारणात बस्तान बसू लागले आहे.
पाकिस्तान मध्ये लोकशाही म्हणजे भारताच्या दृष्टीने काय हे पुढील वेळी जमेल तसे लिहीन
16 May 2013 - 11:07 pm | सचिन कुलकर्णी
निनाद्जी,अभ्यासपूर्ण विश्लेषण. धन्यवाद.