बँक, खाजगी माहिती व आपण

देवदत्त's picture
देवदत्त in काथ्याकूट
29 Oct 2007 - 12:14 am
गाभा: 

प्रसंग १: वेळ रात्री ८ च्या सुमारास.
स्थळ: मी रिक्शातून रेल्वे स्टेशन वरून घरी येतोय.
मोबाईल वाजतो. समोरून एका गॄहस्थाचा आवाज.
गृ: नमस्कार. देवदत्त का?
मी: हो.
गॄ: मी xxxx बँकेतून बोलतोय.
(फोन नं चेन्नईचा होता म्हणून मी संभाषण पुढे सरकू दिले)
आपले जे हे क्रेडिट कार्ड आहे, त्याचे स्टेटमेंट वेळेवर येते का?
मी: मागील स्टेटमेंट आले. ह्यावेळचे माहित नाही.
गॄ: ठिक आहे. बँकेने आता तक्रार निवारणाकरता फोनवर नवीन सुविधा चालू केली आहे. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.
मी: धन्यवाद.
गॄ: तुमचा पत्ता पडताळून पाहायचाय. तुम्ही सांगू शकता का?
मी: नाही. मी अशा गोष्टी फक्त ग्राहक सेवा केंद्रालाच देतो.......
गॄ: तुम्हाला माझा विश्वास नाही आहे वाटते. मी XXXX च्या मुख्य कार्यालयातून बोलत आहे.
मी: आता नाही आहे. तुम्ही मला रात्री ८ ८:१५ ला फोन करताय. पुन्हा तुम्ही माझी माहिती विचारताय. जी मी फक्त ग्राहक सेवा केंद्रालाच देतो आणि मी फोन केल्यावरच.
(माझ्याकडून थोडेफार रागाचे आणि मग निर्वाणीचे बोलून संभाषण बंद)

प्रसंग २: वेळ सकाळी ११ च्या सुमारास.
स्थळ: कार्यालयात मी काम करण्याच्या प्रयत्नात ;)
मोबाईल वाजतो. समोरून एका गॄहस्थाचा आवाज..

गृ: नमस्कार. देवदत्त का?
मी: हो.
गॄ: मी xxxx बॆंकेतून बोलतोय. तुमचे हे XXXX कार्ड आहे. त्याबाबत बोलायचे आहे. (माझ्याकडे ते कार्ड आहे म्हणून मी संभाषण पुढे सरकू दिले)
मी: मग?
गॄ: बँकेने तुमच्याकरीता नवीन क्रेडिट कार्ड मान्य केले आहे.
मी: मला गरज नाही आहे.
गॄ: अहो, तुम्हाला काही कागदपत्रे द्यायची गरज नाही. तुम्ही फक्त स्वत:ची माहिती द्या . जन्मतारीख, पॅन नंबर, पत्ता वगैरे. तुम्हाला २२ दिवसांत क्रेडिट कार्ड मिळून जाईल.
मी: मी ती माहिती देणार नाही. तुम्हाला पाहिजे तर मला ईमेल पाठवा. मी विचार करून त्याला उत्तर देईन.
गॄ: बहुधा तुमचा माझ्यावर विश्वास नाही. तुम्ही माझे नाव व फोन नंबर घेऊन बँकेतून खात्री करू शकता.
मी: ती खात्री करायला मी केव्हाही करू शकतो. तुमचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये आलाच आहे. पण मी तुम्हाला माहिती देऊ इच्छित नाही.मी अशा गोष्टी फक्त ग्राहक सेवा केंद्रालाच देतो. आणि मी फोन केल्यावरच. तुम्हाला पाहिजे तर मला इमेल पाठवू शकता.
(माझ्याकडून निर्वाणीचे बोलून संभाषण बंद)

मी त्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला फोन करून ह्याबाबत माहिती दिली.
मला उत्तर मिळाले की तुम्हाला क्रेडिट कार्ड मान्य झाले आहे का ह्याबाबत आमच्यकडे माहिती नाही.
बाकी खाजगी माहिती विचारण्याबद्दल सांगण्यात आले की काही एजंट ही माहिती मागू शकतात.

असेच भरपूर संवाद झाले आहेत. मी कोणालाही स्वत:ची माहिती देत नाही. ग्राहक सेवा केंद्राला फोन लावल्यानंतर ही माहिती काही वेळा द्यावी लागते (फोनमध्ये, कोणाही माणसाला नाही). उदा. कार्ड क्रमांक, PIN क्रमांक.पण पुढेही काही वेळा सारखी सारखी माहिती मागितल्यास त्यांच्यावरही डाफरलो आहे.

माझे सदस्यांना असे विचारणे आहे की
मी योग्य केले का?
तुम्हाला जेव्हा असे फोन येतात तेव्हा तुम्ही काय करता?
बँक जर वेळोवेळी सांगते की तुमची माहिती अनोळखी इमेल किंवा फोनवर देऊ नका तर ग्राहक सेवा केंद्रातील त्या मुलीचे म्हणणे, की काही एजंट ही माहिती मागू शकतात, बरोबर मानावे का?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

29 Oct 2007 - 12:36 am | विसोबा खेचर

देवदत्तराव,

तुम्ही वर्णन केलेले अनुभव मलाही नेहमीच येत असतात आणि मीदेखील असे कुठलेही दूरध्वनी 'मी तुम्हाला कोणतीही माहिती देऊ इच्छित नाही, मला तुमच्याशी काहीही बोलायचे नाही' असे सडेतोड उत्तर देऊन डिस्कनेट करतो...साले हे असले फोन कॉल म्हणजे सगळी चोराभामट्यांची नसती कटकटच झाली आहे!

माझे सदस्यांना असे विचारणे आहे की
मी योग्य केले का?
तुम्हाला जेव्हा असे फोन येतात तेव्हा तुम्ही काय करता?

अगदी योग्य केले आहे. समोरचा माणूस अशी कुठलीही फालतू माहिती मला विचारू लागला की त्यातला फोलपणा माझ्या लगेच लक्षात येतो आणि मग मी तर त्या माणसाला माझी 'भ'काराची भाषा अगदी मनमुराद सुनावतो! शेवटी तोच कंटाळून फोन ठेवून देतो... :)

बँक जर वेळोवेळी सांगते की तुमची माहिती अनोळखी इमेल किंवा फोनवर देऊ नका तर ग्राहक सेवा केंद्रातील त्या मुलीचे म्हणणे, की काही एजंट ही माहिती मागू शकतात, बरोबर मानावे का?

मुळीच नाही.. माझ्या मते ह्या सगळ्या गोष्टी फक्त 'फ्रॉड' या एकाच सदरात मोडतात! भेंचो...., असल्या फोन कॉल्सची आणि इमेल्सची पार आईमाई करून टाकायची असते एवढंच मला माहिती आहे. देवदत्तराव, एका ताप,संताप, वैताग आणणार्‍या विषयाला येथे मिसळपाववर वाचा फोडल्याबद्दल आपले आभार...

आपला,
(ह्या फोनकॉल्सवाल्यांच्या बाबतीत कमालीचा शिवराळ असलेला!) तात्या.

किमयागार's picture

14 Nov 2007 - 7:19 am | किमयागार (not verified)

मा. साहीत्य संमेलन अध्यक्ष (ललित लेखनवाले),
भकाराची भाषा मनमुराद सुनवायला तुम्हाला असल्या फोनची काय गरज?
-किमयागर

विसोबा खेचर's picture

14 Nov 2007 - 8:29 am | विसोबा खेचर

मा. साहीत्य संमेलन अध्यक्ष (ललित लेखनवाले),

सा सं अध्यक्ष? मी तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभा राहिल्याचं मला आठवत नाही! आपण कुणाबद्दल बोलताय? तात्या अभ्यंकर की हातकणंगलेकर? :)

बाय द वे, 'ललित लेखनवाले' हे आवडले...:)

भकाराची भाषा मनमुराद सुनवायला तुम्हाला असल्या फोनची काय गरज?

हम्म, तेही खरंच म्हणा! :)

आपला,
(संमेलनाध्यक्ष) तात्या.

नंदन's picture

29 Oct 2007 - 9:19 am | नंदन

तुम्हांला आलेला फोन कॉल्सचा अनुभव असो किंवा नामांकित संस्था किंवा बँकांच्या संकेतस्थळावरून पाठवल्या गेल्या आहेत असं भासवणार्‍या इमेल्स, दोन्ही फिशिंग या सदरात मोडतात. येनकेनप्रकारेण पत्ता, दूरध्वनी किंवा क्रेडिट कार्ड क्रमांक काढून घ्यायचा हा यामागचा उद्देश असतो. थोडी अधिक माहिती येथे आणि येथे.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

देवदत्त's picture

29 Oct 2007 - 11:59 am | देवदत्त

तात्या,
आपण लिहिलेले ताप,संताप, वैताग आणणारे फोन कॉल्स ,जे आपली क्रेडीट कार्ड व कर्ज देण्याकरिता असतात ह्या प्रकारात मोडतात का?
त्यात दुसर्‍या प्रकाराची भर पडली आहे. जी नंदन यांनीही सांगितले आहे.

नंदन,
दुव्यांबद्दल धन्यवाद.
मला फिशिंग ह्या प्रकाराबद्दल आधी फक्त ऐकून माहित होते. प्रत्यक्षात ते मी वरील प्रकारे अनुभवले असे मला वाटले म्हणून वाटले की इथे लिहून इतरांचे अनुभव ही लक्षात घ्यावे. कोणाला असे कॉल अजून आले नसतील तर एक उदाहरण म्हणून घेऊ शकतात. जर इतरांना काही वेगळे अनुभव आले असतील तर ते मला ही कळतील, जेणेकरून मला आणखी सावध राहता येईल.

विसोबा खेचर's picture

30 Oct 2007 - 1:08 am | विसोबा खेचर

तात्या,
आपण लिहिलेले ताप,संताप, वैताग आणणारे फोन कॉल्स ,जे आपली क्रेडीट कार्ड व कर्ज देण्याकरिता असतात ह्या प्रकारात मोडतात का?

हो.

तात्या.

राजे's picture

29 Oct 2007 - 9:36 pm | राजे (not verified)

असे फोन मला आले तर मी दोन गोष्टी करतो..

समोरील व्यक्ती हा पुरुष असेल तर तात्यांची भाषा.

समोरील व्यक्ती स्त्री / मुलगी असेल तर..
कुठे भेटणार पासून ते सरळ डिस्क मध्ये येण्याचे निमत्रंण ;} काय तात्या मी बरोबर जात आहे ना ?

हा हा,,,,
बाकी फिशिंग हा शब्द मला आवडतो... पण त्या पेक्षा जास्त "मासेमारी" आवडतो.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

विसोबा खेचर's picture

30 Oct 2007 - 1:06 am | विसोबा खेचर

समोरील व्यक्ती हा पुरुष असेल तर तात्यांची भाषा.
समोरील व्यक्ती स्त्री / मुलगी असेल तर..
कुठे भेटणार पासून ते सरळ डिस्क मध्ये येण्याचे निमत्रंण ;} काय तात्या मी बरोबर जात आहे ना ?

समोरील व्यक्ति स्त्री असेल तर मीही शिव्या देत नाही, की तिला डिस्कलाही बोलावत नाही. थोरले आबासाहेब मध्ये येतात त्यामुळे अजून ती हिंमत होत नाही!!

मी फक्त त्या स्त्रीला रागाने 'मला स्वारस्य नाही' असं उत्तर देतो...

तात्या.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2007 - 10:09 pm | प्रकाश घाटपांडे

पोलिसांनी जरी सायबर क्राईम सेल काढला असला तरी यासाठी लागणारी संगणक साक्षरता व सक्षमता ही पोलिसांकडे नाही, त्यामुळे हे गुन्हे संपुर्णपणे पोलिसांनी हाताळावेत ही अपेक्षा लोकांनी करु नयेत. किंबहूना ते पोलिसांकडे देउच नयेत. आयटी सेक्टर च्या मदतीशिवाय ही गोष्ट अशक्य आहे. नाही तर आमचा एखाद्या पोलिस ठाण्याचा इन्स्पेक्टर डेटा चोर शोधायला अमेरिकेला जायचा. मुद्देमाल जप्त करताना मॉनिटर जप्त करायचा.सिम्बोयसिस च्या एका कार्यक्रमात त्यावेळ्चे सीआयडी प्रमुख व आताचे पुण्याचे पोलिस आयुक्त श्री जयंत उमराणीकर यांनी आपल्या हलक्या फुलक्या शैलीत हे सांगितले तेव्व्हा श्रोत्यांमधे हशा झाला. मी स्वतः क्रेडीट कार्ड व नेट बँकिंग करत नाही असे ही त्यांनी सांगितले.
प्रकाश घाटपांडे

बेसनलाडू's picture

12 Nov 2007 - 11:24 pm | बेसनलाडू

केवळ बँकाच नव्हे तर अन्य टेलिमार्केटिंग कंपन्यांकडून होणारा अशा प्रकारचा ताप थांबवण्यासाठी आपला भ्रमणध्वनी क्रमांक नॅशनल डू नॉट कॉल रेजिस्ट्रीमध्ये नोंदवावा.
अधिक माहितीसाठी हे वाचा.
सध्यातरी लँडलाइनच्या बाबतीतही ही सुविधा उपलब्ध आहे का, याबाबत या बातमीत काही सविस्तर माहिती नाही. परंतु ग्राहकांच्या हितसंरक्षणाच्या दृष्टीने हे पाऊल उचलले गेले आहे, हे ही नसे थोडके.
(ग्राहकहितवादी)बेसनलाडू

ashwini's picture

13 Nov 2007 - 11:18 am | ashwini

आनावश्यक फोन करुन त्त्रास देनार्या कअम्पन्यान काय् देशिर धदा शिकविला पहिजे,
आपन सगल्यानिच या प्रकार् च्या फोन्स ना आजिबातच रेस्पोन्स देऊ नये.