स्वीट एन स्पाईसी मँगो करी

मनिष's picture
मनिष in पाककृती
30 Apr 2013 - 7:36 pm

आंब्याच्या दिवसात आवर्जुन करावी अशी सोपी पण चविष्ट पाककृती, २-३ वर्षापुर्वी फेसबुकवर वाचली आणि तेंव्हापासून आंब्याच्या दिवसात 'मस्ट' असलेली पाककृती.

साहित्य -
२ घट्ट गराचे पिकलेले गोड आंबे फोडी करुन (बदामी, लंगडा किंवा हौस असल्यास हापूस, पण पायरी किंवा तत्सम रसाचे आंबे नको)
३-४ सुक्या लाल मिरच्या
५-६ टेबलस्पून तीळ
१ कप चिंचेचा कोळ
थोडा गुळ (२-२.५ टेबलस्पून) - साखर नको. ह्याची खरी खुमारी
मीठ चवीनुसार
१ लहान चमचा हिंग
२ लहान चमचे मोहरी
१ लहान चमचा मेथी दाणे
१ लहान चमचा कढीपत्ता
आणि २ टेबलस्पून तेल किंवा साजूक तूप (चव तुपातच मस्त लागते)

आधी पॅनमधे तीळ आणि लाल मिरच्या खमंग भाजून घ्या. तीळ ब्राऊन झाले पाहिजे पण जळायला नको. मिरच्या आणि भाजलेले तीळ ह्याचा मस्त खमंग वास आला पाहिजे! मिरच्या आणि भाजलेले तीळ मग मिक्सरच्या छोट्या जार मधे काढुन घ्या.

मिरच्या आणि भाजलेले तीळ

मग पॅन किंवा कढईत २-२.५ कप पाण्यात कापलेले आंबे मंद आचेवर शिजत ठेवा. थोडे पाणी गरम झाले की त्यात गुळ टाकून शिजू द्या. पिकलेला आंबा आणि गुळ ह्याला एक मस्त तृप्त करणारी चव देतात.

हे शिजत आहे तोवर मिक्सर मधे मिरच्या आणि भाजलेले तीळ ह्यांची बारीक पेस्ट बनवून घ्या. त्यात हळूहळू चिंचेचा कोळ घालून जाड/घट्ट अशी पेस्ट बनवा. (मी चुकून पाणी जास्त घातले, म्हणून पेस्ट अशी पातळ झाली) उरलेला चिंचेचा कोळ करीत टाकता येतो.

आता ही तिखट पेस्ट आंबे शिजत असलेल्या पाण्यात टाकून चांगलीच मिक्स करा. उरलेला चिंचेचा कोळ आता टाकता येईल.

चव घेऊन पहा, गोड आणि आंबट चवीबरोबरच एक खमंग तिखट चव लागली पाहिजे. आता ह्यात मीठ आणि हवे असल्यास थोडे तिखट घालून शिजू द्या.

ह्याला उकळी येईपर्यंत एका लहान कढईत २ चम्चे तूप तापवून त्यात मोहरीची फोडणी तयार करा, मोहरी तडतडली की गॅस बंद करून मेथी दाणे, हिंग आणि कढीपत्ता टाकून ही फोडणी उकळत्या करीत टाका. गरमागरम 'स्वीट एन स्पाईसी मँगो करी' तय्यार!

ह्याची आंबट-गोड आणि खमंग तिखट चव जिभेवर मस्त रेंगाळत राहते. पोळी किंवा त्याहीपेक्षा गरम हातसडीच्या (ब्राउन राईसच्या) भाताबरोबर भन्नाट लागते (हा फोटो जरा गंडलाय, करीच्या घमघमाटाने पोटात कावळ्यांचा हिमेश रेशमिया झाला होता).

दुपारी जेवायला गरम भात आणि ही करी, आणि मग मस्त कुलरच्या/ए.सी. च्या थंड हवेत पुस्तक वाचत लोळणे - उन्हाळ्यातला रविवार असा छान सत्कारणी लागतो! (शिवाय, "मी नाही का रविवारी ती मस्त मँगो करी केली होती?" असा बायकोवर (किवा नवर्‍यावर) एक पॉईंटही सर होतो त्याचे सुख वेगळेच! ;-))

ता.क. - मिपावर एकाहून एक बल्लवाचार्य, सुगरणी असतांना थोडं बिचकतच मी ही पाककृती घेऊन बर्‍याच दिवसांनी लिहीता झालोय, (आता आंब्याचीच पाककृती असल्याने) गोड मानून घ्याल अशी आशा आहे!

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

30 Apr 2013 - 8:04 pm | सुहास झेले

व्वा... एकदम हटके पाककृती, पण आंब्यासोबत तिखट बघवत नाय :) :)

मलाही असेच वाटले होते, पण एकदा करून पहा. :-)

जेनी...'s picture

30 Apr 2013 - 8:09 pm | जेनी...

भन्नाट !!!!!
शेवटुन दुसरा पोट्टो मस्तच ...... पण भातासोबत खाण्यापेक्षा मस्त उचलुन
पिण्यासारखी करी म्हणजे आम्टी ... रस्सा अश्याप्रकारात मोडतेय असं वाटतय पोट्टो
बगुन .....
गुर्जिंकडची जिभळ्या चाटणारी स्मायली मिळाली तर सार्थकी लावीन म्ह्न्ते :P

सूड's picture

30 Apr 2013 - 8:43 pm | सूड

मस्त !!

अत्रुप्त आत्मा's picture

30 Apr 2013 - 8:52 pm | अत्रुप्त आत्मा

बोले तो,,,एकदम झका............................स!!! :)

श्रीरंग_जोशी's picture

30 Apr 2013 - 9:45 pm | श्रीरंग_जोशी

जोरदार आहे पाकृ, सादरीकरण आवडले.

आमच्याकडे जो मेथांबा बनतो तो जवळजवळ असाच असतो.

मेथांबा वेगळा - तो कच्च्या कैरीचा बनतो, खूप मेथी दाणे असतात आणि तीळ नसतातच त्यात. त्याच्या आणि ह्याच्या चवीत बराच फरक आहे.

श्रीरंग_जोशी's picture

30 Apr 2013 - 10:11 pm | श्रीरंग_जोशी

एकाच वेळी प्रतिसाद टंकल्याने खालचा प्रतिसाद आला आहे.

श्रीरंग_जोशी's picture

30 Apr 2013 - 10:10 pm | श्रीरंग_जोशी

मेथांबा जरा गोडवा येऊ लागलेल्या कैरीची केला जातो. बाकी दोन्ही पाकॄमध्ये बरेच साम्य आहे.

हो, पाकॄमध्ये बरेच साम्य आहे पण चवीत नाही. इथे गुळ फक्त नावालाच - मेथांबा आमच्याकडे बराच गोड होतो! असो! :-)

मुक्त विहारि's picture

30 Apr 2013 - 10:12 pm | मुक्त विहारि

बायकोला सांगतो करायला..

बॅटमॅन's picture

1 May 2013 - 12:25 am | बॅटमॅन

जोर्दार अन हटके पाकृ आहे तेच्यायला!! मस्तच. :)

गणपा's picture

1 May 2013 - 12:52 am | गणपा

मस्तच.
आंबट गोड तिखट सगळ्या चवींच मिश्रण.
रसनेवर कारंज फुलले. :)

छान पाकृ! चवीची कल्पना लगेच आली. ;)
हिमेश रेशमिया होणे हे भारीच!

खादाड's picture

1 May 2013 - 10:13 am | खादाड

आणि सोप्पी !! :)

अनन्न्या's picture

1 May 2013 - 10:54 am | अनन्न्या

आंबा मात्र थोडा तयार पण पूर्ण न पिकलेला असा घ्यावा तर त्याला तिखट चव चांगली लागते.

विसोबा खेचर's picture

1 May 2013 - 11:09 am | विसोबा खेचर

लै भारी...

दिपक.कुवेत's picture

1 May 2013 - 11:21 am | दिपक.कुवेत

छान आहे करी. शेवटचा फोटो तोंपासु.....आंबा कसाहि, कुठल्याहि प्रकारात आवडतो.

निवेदिता-ताई's picture

1 May 2013 - 12:10 pm | निवेदिता-ताई

अहाहा...................मस्तच... करुन पाहिली पाहिजे..

प्रतिक्रिया देणार्‍या सगळ्यांनाच धन्यवाद. स्वतः गणपाची प्रतिक्रिया धन्य झालो. @अनन्न्या - मला पुर्ण पिकलेला आंबाच आवडतो ह्या करीत, त्याचा गर मिळून येतो ह्या करीत आणि गुळाबरोबर त्याची गोड चव आणी भाजलेल्या तीळाची+मिरच्यांची खमंग तिखट चव, शिवाय चिंचेची आंबट चव - ह्या सगळ्याची लज्जत पिकलेल्या आंब्यानेच येते, असे मला वाटते. अर्थातच प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते! :-)

चव आली तोंडात करीची. मिळेल तो आंबा घेउन केली जाइल.

सानिकास्वप्निल's picture

1 May 2013 - 9:19 pm | सानिकास्वप्निल

करीचा रंग बघूनचं चवीचा अंदाज आला:)
सोप्पी व चविष्ट पाककृती

आंबा (कैरी) आणि चण्याची डाळ त्याचा जे बनवतात (मला नाव माहित नाही) आणि हळदी कुंकूत देतात त्याची पाककृती कोणी मिपा वर टाकेल का?

त्याला कैरीची डाळ म्हणतात. पाककृती इथे सापडेल -

http://www.misalpav.com/node/7150 :-)
http://www.globalmarathi.com/BlogDetails.aspx?BlogId=5320357128771356157...

jaypal's picture

9 May 2013 - 6:37 pm | jaypal

नक्की करुन खाणार

पैसा's picture

9 May 2013 - 10:21 pm | पैसा

फोटो पण छान आलाय एकेक!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 May 2013 - 7:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त..

-दिलीप बिरुटे