गुरूवारच्या टाईम्स मध्ये पानभर जाहीरात बघून उत्सुकता चाळवली गेली असताना ऑफीसमधल्या मित्रांनी रविवारी जाण्याचे नक्की केले.
दहा / साडेदहा वाजता पोहोचण्याचे ठरले असल्याने फारशी गडबड न होता एक्स्प्रेस वे ने सर्वजण मार्गस्थ झालो.
एक्स्प्रेस वे
खालापूर टोल नाक्यानंतर पालीच्या दिशेने जाणार्या रस्त्यावरून तीन किलोमीटर अंतरावर हे पार्क वसलेले आहे.
अचानक चित्रविचित्र आकाराचे लोखंडी सांगाडे व कमानी दिसू लागल्या.. एक भलामोठ्ठा काहीतरी प्रकार घड्याळाच्या लंबकासारखा भयानक रीतीने फिरत होता, त्या राईडमध्ये बसलेल्या लोकांच्या किंकाळ्या दूरपर्यंत ऐकू येत होत्या!
पार्किंग लॉटमधून..
इमॅजिका..
प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असणारी कडेकोट तपासणी व्यवस्था.
तब्बल १६०० एकर मध्ये पसरलेल्या पार्कमध्ये असलेल्या वेगवेगळ्या राईडस्, खाण्यापिण्याची ठिकाणे, खरेदीसाठी असलेली दुकाने व इतर माहिती असणारा नकाशा तिकीटांसोबत मिळाला.
संपूर्ण पार्क कलात्मकतेने वसवला आहे.
हा जरी पुतळा असला तरी या प्रकारचे एक वाद्य असते.. याचे नाव माहिती आहे का..?
ऊन जाणवू लागल्याने राईड्सचा विचार बाजूला ठेवून आम्ही इनडोअर शो कडे मोर्चा वळवला.
१) आय फॉर इंडीया
या शोमध्ये आपण बसतो ती खुर्ची जमिनीपासून २५ / ३० फुट वर उचलून समोर असलेल्या ९० फुटी भव्य पडद्यावर भारतातील विविधतेची हेलीकॉप्टर सवारी केली जाते.
ताज महाल, सुवर्ण मंदिर, हंपी, राजस्थान, जोग फॉल्स, गंगोत्री, पॅगाँग त्सो लेक, दल सरोवर, गेट वे ऑफ इंडीया, जामा मशीद, राम सेतू, लेक पॅलेस उदयपूर अशा अनेक ठिकाणांची झलक पहावयास मिळते. निव्वळ अप्रतीम!
२) मिस्टर इंडीया
एका प्रचंड मोठ्या सिम्यूलेटरवर आपण बसून ही थरारक राईड अनुभवतो.
(अमरीश पुरी, अनिल कपूर व श्रीदेवी च्या मिस्टर इंडीयामधला मोगॅम्बो पुन्हा जिवंत होतो व पुढे....)
३) प्रिन्स ऑफ द डार्क वॉटर्स
एका प्रचंड मोठ्या डोम स्क्रीन वर हा शो दाखवला जातो..
डोम स्क्रीन
४) राजासॉरस
डायनोसॉरस असलेल्या एका जंगलामधील झर्यातून आपण बोटीने पाच मिनीटे संथ प्रवास करतो व अचानक..
५) अलीबाबा आणि चाळीस चोर
या राईडमध्ये आपण एका कारमध्ये बसून व्हिडीओ गेम प्रमाणे हातात लेसरची बंदूक घेवून गोळीबार करत पॉईंट्स कमवायचे व शक्य झाले तर बक्षीस घेवून जायचे!
संपूर्ण पार्कमध्ये फिरण्यासाठी शटल.
पायी चालण्यासाठी संपूर्ण पार्कमध्ये प्रशस्त रस्ते व जागोजागी तत्पर मार्गदर्शक नेमले आहेत.
रेन डान्स
लहान मुलांसाठी..
वॉटरफ्रंट
पोटपूजेसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.. जगाच्या विविध भागामध्ये मिळणार्या अन्नपदार्थांसाठी वेगवेगळी चित्तवेधक ठिकाणे तयार केली आहेत.
१) (हे एक रेस्टॉरंट आहे!)
२)
३)
आम्ही जेवलो ते ठिकाण.. येथे दाक्षिण भारतीय व इटालियन पदार्थ मिळत होते. (खालच्या फटूमध्ये तिथली उत्साही मुले कसरतीचे प्रयोग करत होती.
(आम्ही जेवलो तेथे गर्दीमुळे व्यवस्था कोलमडली होती.. कुपन घेण्यासाठी व नंतरही बराच वेळ थांबावे लागले.)
जेवण झाल्यानंतर थोडावेळ टीपी केला, ऊन कलल्यानंतर राईडस ला सुरूवात केली..
या राईडमध्ये आपण एका कपबशीमध्ये बसून गोल गोल फिरतो.. फिरण्याची गती आपण नियंत्रीत करू शकतो.
(थोडासा बालीश प्रकार होता किंवा लहान मुलांसाठी असेल आणि आम्ही घुसखोरी केली असावी ;-))
वाईल्ड वेस्ट काऊंटी गोल्ड रश ही एक रोलर कोस्टर आहे.. वळणावळणाचे साधारण एक किमी अंतर व धडकी भरवणार्या तीन चार जागा आहेत.
सगळ्यात पुढच्या कारमध्ये.. मग मागच्या कारमध्ये, मधल्या कारमध्ये आतील बाजूस, बाहेरील बाजूस अशा वेगवेगळ्या ठिकाणी बसून चार पाच वेळा यातून फेर्या मारल्या. ;-)
या रोलर कोस्टर चा मार्ग..
या D2 लिहीलेल्या टॉवर भोवतीही वाईल्ड वेस्ट काऊंटी रोलर कोस्टर चा मार्ग आहे.
D2 - Dare to Drop यामध्ये वर दिसणार्या १३२ फुटी टॉवरवर आपण क्षणार्धात ७३ किमी च्या गतीने जातो.. व अचानक त्याच वेगाने खाली येतो.. थरारक. उंचीला दृष्टी सरावेपर्यंत आपण पुन्हा त्याच वेगाने खाली येतो.. व थोडे स्थिरस्थावर होईपर्यंत पुन्हा त्याच उंचीवर पोहोचतो!
जाहिराती मध्ये दाखवलेले एक जायंट रोलर कोस्टर (दोन लूप असलेले) अजून सुरू झालेले नाहीये. :-(
स्क्रीम मशीन..
चार पायांवर तोलल्या गेलेल्या या स्ट्रक्चरमधून रवीसारखा दिसणारा भाग लंबका सारखा फिरतो.. भयानक बाब म्हणजे संपूर्ण भाग लंबगतीने फिरत असताना खालचे चक्र स्वत:भोवती गोल फिरते.. प्रचंड वेगाने.
ज ह ब ह रा अनुभव होता.. आपण नक्की कोणत्या दिशेने फिरत आहोत हे लवकर लक्षातच येत नाही.
आणखी काही राईड्स
हे सर्व होईपर्यंत संध्याकाळ झाली होती. भेटवस्तूंची खरेदी आवरून सर्वजण बाहेर पडलो व बॅक टू पुणे.
***************** महत्त्वाची माहिती *****************
१) संपूर्ण पार्कमध्ये फिरताना उन्हापासून संरक्षणासाठी गॉगल व टोपी शक्यतो बाळगावी.
२) शो साठी वेटींग १५ ते २० मिनीटे व मुख्य शो १० ते २५ मिनीटांचा आहे.
३) राईड्स मोकळ्या होत्या.. फारसे वेटींग नव्हते.
४) संपूर्ण पार्क अत्यंत स्वच्छ व नीटनेटके राखलेले आहे.
५) बाहेरचे अन्नपदार्थ आतमध्ये न्यायला बंदी आहे.
६) पुण्यापासून अंतर ९० ते १०० किमी.
***************** खर्च *****************
१) कार पार्किंग रू १००/- व दुचाकी रू ५०/- (कव्हर्ड पार्किंग नाहीये.)
२) प्रवेशाचे तिकीट - रू १५००/- एका व्यक्तीसाठी.
एकदा प्रवेश घेतल्यानंतर सर्व राईड्स व शो साठी कोणताही चार्ज नाही.
३) जेवण चवीच्या दृष्टीने ठीकठाक होते.
दर - इडली ९० रूपये प्लेट, पावभाजी १६० रू प्लेट, बाटलीबंद पाणी ६० रू लिटर हे व असे रेट होते.
***************** *** *****************
फोटो जास्ती मोठे वाटत असतील तर जरूर कळवा.. सवडीने नीट करतो.
प्रतिक्रिया
23 Apr 2013 - 3:26 am | श्रीरंग_जोशी
गरिबांचे डिझ्नीलँड (उपरोध नाहीये प्रेमाने म्हणतोय) रोचक वाटत आहे.
बर्याच सजावटी / रचना कल्पक आहेत.
शेवटी दिलेली माहितीबद्दल विशेष धन्यवाद.
हो चित्रे प्रमाणापेक्षा मोठी झाली आहेत. लांबी रूंदीचे गुणोत्तर न बदलता लहान करावीत ही विनंती.
23 Apr 2013 - 3:36 am | मोदक
चालेल.. चित्रे लहान करतो उद्या परवा.
सद्यस्थितीला ब्राऊजरचा झूम छोटा करून चित्रे बघावीत! ;-)
23 Apr 2013 - 9:37 am | jaypal
फोटो,वर्णन आणि माहिती आवडली.
फोटोची साईझ मला तरी बरोबर वाटते आहे, (लहान केल्यास राईड्सची भव्यता टिपण्याच्या किंवा दाखव्ण्याच्या प्रयत्नास बाधक ठरेल असे वाटते)
23 Apr 2013 - 5:45 pm | श्रीरंग_जोशी
लेखन पहिल्यांदा प्रकाशित झाले तेव्हा त्यातले फोटोज फारच मोठे होते. उजव्या बाजूच्या घोषणा, दुवे यांनाही पार्श्वभूमी मिळाली होती. नंतर लेखकाने लहान करवून घेतल्याने ती परिस्थिती राहिली नाही.
बाकी सद्यपरिस्थितीमध्ये (दुष्काळ) या पार्कने पाण्याचा जपून वापर केल्याने हिरवळ नसेल तर ती स्पृहणीय बाब आहे.
24 Apr 2013 - 1:03 am | मोदक
नंतर लेखकाने लहान करवून घेतल्याने ती परिस्थिती राहिली नाही.
हे मी नाही करवून घेतले.. पण फोटो लहान झाले आहेत. ज्या कुणी अज्ञात संपादकांनी हे काम केले आहे त्यांना माझे शतश: धन्यवाद!
24 Apr 2013 - 1:06 am | मोदक
नंतर लेखकाने लहान करवून घेतल्याने ती परिस्थिती राहिली नाही.
हे मी नाही करवून घेतले.. पण फोटो लहान झाले आहेत. ज्या कुणी अज्ञात संपादकांनी हे काम केले आहे त्यांना माझे शतश: धन्यवाद! :-)
24 Apr 2013 - 1:51 am | श्रीरंग_जोशी
अज्ञात संपादकांच्या ज्ञात सत्कॄतीबद्दल धन्यवाद.
आशा आहे मोदक पुढल्या वेळी संपादकांना अतिरिक्त कष्ट करायला लावणार नाही.
23 Apr 2013 - 3:35 am | गणपा
त्याचे हार्प ऐसे नाव.
बाकी अम्युझमेंट पार्क आवडले.
आपल्याकडेही अशी पार्क तयार होऊ लागल्याचे पाहुन बरे वाटले.
23 Apr 2013 - 4:04 am | जेनी...
च्यामारी .. एकदम फ्लोरीडाच्या डीझनीवर्ल्ड मध्ये फीरुन आल्यागत वाटलं ...
मस्त आहे एकदम !!!!
23 Apr 2013 - 5:10 am | स्पंदना
पुण्यापासुन ९० १०० किमी. ठिक्केय.
मस्त वाटले फोटो पण असल्या पार्कमध्ये मी फकत फिरत असते, एकही राइड मला जमत नाही. जीव कंठाशी येउन तो तोंडावटे बाहेर पडतो की काय अस होतं मला. मी आपली खाउन पिउन मस्त जमिनीवरुन फिरत राहेन.
23 Apr 2013 - 6:40 am | नंदन
बराचसा युनिव्हर्सल स्टुडिओजचा प्रभाव जाणवला (हिरवा माज :))
23 Apr 2013 - 6:47 am | वेल्लाभट
व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग ! मजा येते बाबा थीम पार्क्स मधे.
माहितीबद्दल आभार!
23 Apr 2013 - 8:41 am | स्मिता चौगुले
फोटो दिसत नाहीत
23 Apr 2013 - 8:52 am | नगरीनिरंजन
छान आहे; पण जरा जास्त झाडं का लावत नाहीत तिथे? सगळं ओसाड दिसतंय.
23 Apr 2013 - 11:15 am | लॉरी टांगटूंगकर
मज्जा करा राव,!!!!!!!!मी पावसाळ्यात जावुन बघावे अशा वि४रात आहे.
23 Apr 2013 - 9:30 am | मृत्युन्जय
सगळा रखरखाट वाटतो आहे. कृत्रिम वाटले खुप. पुरेश्या नियोजनाअभावी पार्क सुरु केले आहे असे वाटले. एवढी मोठी उपकरणे यंत्रे बसवली आहेत तर बराच वेळ गेला असणार. एवढ्या वेळात हिरवळ तयार करणे, झाडे लावणे अशक्य नव्हते. अंतर्गत रस्त्यांवर रखरखाट जाणवतो आहे. पुरेसे आडोसे, कमानी, छप्परं, सावलीची झाडे आदी तयार करुन हा त्रास कमी करता आला असता. जपानी / मुघल शैलीची उद्याने करुन जरा नेत्रसुखद आभास निर्माण करता आला असता. या सर्व गोष्टींमध्ये हे उद्यान मार खाते. शिवाय तिकीट दर भरघोस आहे. यापेक्षा तिकीट दर कमी करुन काही राइड्स मोफत आणि काही सशुल्क केल्यास जास्त बरे पडेल. असो. या सगळ्यामागेही बराच खर्च आला असणार आणि सध्यातरी हे उद्यान प्रचंड तोट्यात असणार त्यामुळे प्रवेशशुल्काबाबत जास्त बोलत नाही. नैसर्गिक संरचनेबद्दल मात्र आक्षेप आहेच.
23 Apr 2013 - 9:34 am | मोदक
तिकीट दर भरघोस आहे. यापेक्षा तिकीट दर कमी करुन काही राइड्स मोफत आणि काही सशुल्क केल्यास जास्त बरे पडेल
बहुदा १ मे पासून तिकीट दर साधारण ५०० रू ने वाढवला जाणार आहे. सौजन्य - इमॅजिका कस्टमर केअर.
23 Apr 2013 - 8:45 pm | मराठी_माणूस
सगळा रखरखाट वाटतो आहे.
तुमच्या प्रतिसादाने माझे टंकण्याचे कष्ट वाचले. फोटो पाहून माझेही तसेच मत झाले.
24 Apr 2013 - 2:42 am | जेनी...
चल्ता हय यार .... रखरखित असेनाका ... राइड्स मध्ये मज्जा येते न. ... मग झालं तर !
अॅपकॉट असचे ... रखरखित .... तरी मज्जा आली होती .... :D
24 Apr 2013 - 4:46 am | श्रीरंग_जोशी
सी वर्ल्ड अन युनिवर्सल अन ६ झेंडे पण असेच, तरी मज्जा आली होती :-).
23 Apr 2013 - 9:47 am | अक्षया
वा छान. माहीती बद्दल धन्यवाद. :)
23 Apr 2013 - 10:12 am | तर्री
उपयुक्त मस्त माहिती ! एकदम पसंत ! सुट्टीत पोरांना /भाच्यांना// पुतण्यांना सैर घडवतो येथे आणि काका / मामा म्हणून कॉलर कडक करून घेतो म्हटले - मनोमन आभार !
हल्ली "मेनू कार्डवर " आणि "मिपा" वर "मोदक" दिसला की अती आनंद होतो.
23 Apr 2013 - 10:21 am | कोमल
बाप्रे.. फोटु बघुनच भिती वाटली.. सॉलिड एक्सिप्री असणार.. पण नक्कि जाउन येणार आहे.. बंगळूरुच्या "वंडर ला"ची हटकून आठवण झाली.. :)
23 Apr 2013 - 11:11 am | प्रचेतस
झकास थीम पार्क दिसतेय. पण लैच महाग आहे राव. परवडणार नाय आपल्याला. :(
23 Apr 2013 - 11:20 am | स्पा
लैच हुच्च
ओसाड गाव वाटतंय.. रेट बघून तरराईड मध्ये न बसताच भोवळ आली, इडलीचे दर बघून पोट तुडुंब भरलं
ओसाड गावाला भरपूर शुभेच्छा
सदर पैशात अक्खी कोकण वारी बाईक वर होईल माझी
- मध्यमवर्गीय इस्पा
23 Apr 2013 - 11:49 am | मोदक
सदर पैशात अक्खी कोकण वारी बाईक वर होईल माझी
कोकणवारीच्या तारखा आणि ठिकाण कळव रे..
तुमच्यातलाच ;-) - मोदक.
23 Apr 2013 - 1:30 pm | मालोजीराव
कॅनोन DSLR, सुम्संग ची हायएंड मोडेल आणि परदेशी किंडल वापरणार्यांनी असे प्रतिसाद दिल्याने ड्वोले पाणावले…हल्ली दुष्काळ असल्याने डोळेहि पाणावत नाईत (हे अजितदादांच्या टोन मध्ये वाचावे) :P
23 Apr 2013 - 2:12 pm | स्पा
अरारारा =))
23 Apr 2013 - 2:33 pm | प्रचेतस
मारता काय राजे आता. =)) =)) =))
अहो त्या गोष्टी हौसेपैकी आहेत तर थीम पार्क ही चैन आहे. :)
23 Apr 2013 - 3:48 pm | सूड
अगदी अगदी!!
23 Apr 2013 - 11:14 am | दिपक.कुवेत
एस्सेल वर्ल्डला पर्याय निघाला. एक शंका...तिकिटाच्या दरात ज्या राईड्स आहेत त्या आपण कितिहि वेळा घेउ शकतो का? शिवाय सगळ्या मोठ्यांसाठि आहेत कि बच्चे कंपनीला पण वाव आहे?
23 Apr 2013 - 11:23 am | मोदक
तिकिटाच्या दरात ज्या राईड्स आहेत त्या आपण कितिहि वेळा घेउ शकतो का?
हो.. कितीही वेळा कोणतीही राईड..
शिवाय सगळ्या मोठ्यांसाठि आहेत कि बच्चे कंपनीला पण वाव आहे?
बच्चे कंपनीला वाव आहे. फक्त उंचीचे बंधन आहे - ठरावीक उंचीपेक्षा कमी मुलांना काही राईडमध्ये प्रवेश नाही वगैरे..
23 Apr 2013 - 11:18 am | सुहास झेले
हम्म्म्म.... भारी आहे :)
23 Apr 2013 - 11:36 am | मन१
फटु दिसत नाहियेत हापिसात.
एस्सेल वर्ल्ड मुंबै ला पाचशे रुपयात गेलो होतो. त्याची आठवण झाली.
हे त्याहून भारी आहे का?
23 Apr 2013 - 11:46 am | लाल टोपी
जवळच आहे!! छान माहिती.
23 Apr 2013 - 11:49 am | पिलीयन रायडर
पण मी वॉटर पार्क, मुंबई ला गेले होते, ते मला जास्त छान वाटलं. पाणी असल्याने थंड, स्वच्छ, भरपुर झाडे असल्याने सावली होती.. ऊन लागले नाही.. (इथे थोडा रखरखाट वाटतोय..) शिवाय तिकीटही ६००/- होते. मला तरी पार्क पैसा वसुल वाटले. आतले जेवणाचे रेट्स पण अत्यंत साधारण होते. चवही ठिक होती. इथे जेवणही महाग वाटत आहे. एस्सेल वर्ल्ड पहीलेले नाही त्यामुळे खर तर त्याची आणि ह्याची तुलना जस्त योग्य ठरली असती..पण करु शकत नाही..
पण पुण्याच्या जवळ हा प्लस पॉईंट आहे इमॅजिकाचा..
23 Apr 2013 - 11:51 am | पिलीयन रायडर
वॉटर पार्क नाही तर वॉटर किंगडम...
23 Apr 2013 - 1:07 pm | तिमा
आमी, सा पोरं आन दोगं धरुन आट! १५०० परमानं किती व्हतात हो आट शीटांचे ? न्हाय बा न्हाय परवडनार !
23 Apr 2013 - 2:24 pm | प्यारे१
तरी सा घरी ठिवनार न्हवं? ;)
आमाला पन नाय परवड्नार ब्वा!
- रायडी बघूनच प्राण कंठाशी आलेला प्यारे
23 Apr 2013 - 2:00 pm | अजया
घराजवळच आहे माझ्या हे पार्क. रखरखाट पाहुन सध्या जायची इच्छा नाही. खरेच त्याहून एस्सेल वर्ल्ड बरे वाटले!
23 Apr 2013 - 2:14 pm | पैसा
१५०० रुपयांत सगळ्या राईड्स आणि शो हे तसे महाग नाही. पण १२ रुपयाची पाण्याची बाटली ६०/- आणि इडली ९०/- हे कै च्या कै आहे.
23 Apr 2013 - 3:23 pm | Mrunalini
पार्क ठिक वाटले. एवढे नाही आवडले. म्हणजे राइड्स चांगल्या आहेत पण खुप ओसाड वाटते आहे पार्क.
23 Apr 2013 - 4:38 pm | गवि
सहमत. ओसाडपणा आधी डोळ्यात भरतो. नुसते फोटो पाहतानाच प्रचंड उष्णता असेल असं जाणवतं.
राईड्स , फूड जॉईंट्स वगैरे सर्व उत्तम असूनही ओसाडपणामुळे ठिकाण एकदम नीरस होऊन जातं. आर्थिक गणित करुनच हा पार्क बांधला गेला असेल पण, तरीही एक अंदाज असा आहे की हे दीर्घकाळ सांभाळण्यासाठी फार मोठं आणि व्यापाचं ठिकाण आहे. व्यावसायिकदृष्ट्या फायद्याच्या दृष्टीने यात दीर्घकालीन क्षमता दिसत नाही.
ठिकाण मुख्य शहरांपासून फारच दूर आहे. सुखाने जायचे तर दृतगती महामार्गाला पर्याय नाही. म्हणजे टू व्हीलरवाल्या कुटुंबवत्सल गटाला तर हे आवाक्याबाहेरच आहे. (प्रवास आणि तिकीट दोन्हीदृष्ट्या)
फोर व्हीलर असली तरी अंतर, वेळ अन जातायेता एक्स्प्रेसवे टोल आलाच. त्यामुळे रिपीट ग्राहक मिळणे कठीण. (जो एस्सेलवर्ल्ड / वॉटरकिंगडमला असतो)
१६०० कोटींचा प्रोजेक्ट आहे असं आंजावर असलेल्या माहितीतून दिसतं. अशा वेळी प्रचंड आकर्षक (सुखद, कंफर्टेबल अशा अर्थाने आणि दरही आकर्षक) असल्याखेरीज फार काळ टिकणे कठीण. केवळ जमीन स्वस्तात पडली म्हणून कितीकाळ तग धरणार?
त्यांच्या वेबसाईटवरही फार आकर्षक असं काही नाही. नियमच फार आहेत.
इत्यादि शुभ बोल संपवतो.
23 Apr 2013 - 3:44 pm | मालोजीराव
मोदका पार्क नादखुळा आहे,
पार्क च्या नकाश्यात दाखवल्यात त्याप्रमाणे सगळ्या राईड्स,इमारती (Splash Ahoy,Curse of Salimgadh,Wrath of God,Imagica capital वगैरे ) चालू झाल्या आहेत का? नसल्यास कधी होतील माहित आहे का?
23 Apr 2013 - 9:29 pm | मोदक
चार ते सहा महिन्यात चालू होतील असा (तिथल्या गाईडचा) अंदाज आहे.
24 Apr 2013 - 11:38 am | मालोजीराव
मोदका 'हि' हिरवळ नव्हती म्हणून फटू रखरखीत वाटतायत, पण जरा 'ती' हिरवळ कॅमेरात टिपली असतीस तर 'बर्याच' सदस्यांनी रखरखीतपणाबद्दल जास्त आक्षेप नोंदवला नसता असं अनुमान आहे
24 Apr 2013 - 11:42 am | मोदक
हे मृत्यूंजयाला उद्देशून आहे का..? :D
23 Apr 2013 - 4:55 pm | नाखु
धन्यवाद आप्ल्या सारख्या "मिपा श्रेष्ठींबरोबर " आम्हा वाचकांचे नाव आले.(मालोजी राव कुर्निसात)
23 Apr 2013 - 5:33 pm | अत्रुप्त आत्मा
@अॅडलॅब्ज इमॅजिका>>>

@अॅडलॅब्ज इमॅजिका>>> अॅडलॅब्ज इमेजि----------------का???...!!!
23 Apr 2013 - 7:28 pm | रेवती
हामेरिकन पार्कांच्या धर्तीवर तयार केले दिसते. मला तश्याही त्या राईडस भीतीदायक वाटतात. एकदा गेले होते आणि पुन्हा जाणार नाही हे ठरवून बाहेर पडले. लोक रोलर कोस्टर राईड घेताना हात सोडून कसे हसू शकतात हे समजत नाही (माझा नवरा व मुलगाही). तिकीट बरेच आहे, त्यामानाने अजून सोयी असायला हव्यात.
लेखन व चित्रे तरीही आवडली.
23 Apr 2013 - 8:10 pm | गणामास्तर
हुच्चभ्रु मोदक चा हुच्चभ्रु धागा.. ;)
बघू पुढे कधी तरी पर्सनल लोन काढून जाईन म्हणतो.. :)
23 Apr 2013 - 9:20 pm | मोदक
गपा की लेको.. बाजार उठवता का..? :-D
खल्लास अॅनॅलिसीसबद्दल सर्वांचे आभार.
दोन लूपवाले जायंट रोलर कोस्टर सुरू झाल्यानंतर आणखी एकदा इमॅजिकाला नक्की भेट देण्याचे ठरविणारा - मोदक.
24 Apr 2013 - 3:09 am | रेवती
हेच ते पयशे वाया घालवणं म्हणते मी! जायंट सुरु झाल्यावर जाणार, हिरवळ लावली की जाणार, तळे तयार झाले की जाणार. अरे लेका, तुझ्यासारख्यांसाठीच तर बांधलय नव्हे का!
23 Apr 2013 - 9:01 pm | मुक्त विहारि
तिकिटाचे दर वाचले आणि न जाण्याचे ठरवले आहे..
24 Apr 2013 - 9:44 pm | सूड
>>प्रवेशाचे तिकीट - रू १५००/- एका व्यक्तीसाठी.
एकदा प्रवेश घेतल्यानंतर सर्व राईड्स व शो साठी कोणताही चार्ज नाही.
३) जेवण चवीच्या दृष्टीने ठीकठाक होते.
दर - इडली ९० रूपये प्लेट, पावभाजी १६० रू प्लेट, बाटलीबंद पाणी ६० रू लिटर हे व असे रेट होते
हे जरा जास्तच वाटतंय.
23 Nov 2013 - 1:23 am | मोदक
आजच आणखी एकदा इमॅजिकाला भेट दिली..
३६० डिग्रीचे दोन लूप आणि असेच २ / ३ भन्नाट ट्विस्ट असलेले NITRO नावाचे जायंट रोलर कोस्टर आणि बाकी सर्व राईड्स व शो सुरू झाले आहेत.
23 Nov 2013 - 3:19 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्त पार्क आहे. हा धागा अगोदर कसा नजरेतून सुटला ? सुट्टीत एकदा जायला पाहिजे.
मात्र अजून झाडे लावायला पाहिजेत हे खरे. या नविन फोटोत याबाबतीत सुधार दिसतोय.
6 Feb 2014 - 11:05 pm | पियू परी
रोलर कोस्टरचा अपघात झाला ते हेच का?
7 Feb 2014 - 5:51 am | मोदक
हो हेच. Bandits of robin hood नावाची राईड.
7 Feb 2014 - 3:04 pm | चिरोटा
बात्मी दाबायला पत्रकार लोक बर्यापैकी घेतात. महिन्या दोन महिन्यांपूर्वी, मुकेश अंबानीच्या मुलाने पेडर रोडवर आपली अॅस्टन मार्टिन गाडी दोन गाड्यांवर आपटवली व दोन्ही गाड्यांचा जवळपास सत्यानाश केला.त्याचीही बातमी वा चर्चा चॅनेलवर नाही.एक व्हिडियो उपलब्ध आहे त्याचा. एरवी अरेरावी करणारे पोलिस व्हिडियोत मान खाली घालून काम करताना दिसतात.
टाईम्सवाल्यांनी बातमीत 'रिलायन्स्'चा उल्लेख 'एक मोठी कंपनी' असा केला होता.काही दिवसांनी ती बातमीच काढून टाकण्यात आली.गाडी चालवत होता मुकेश पुत्र पण शेवटी रिलायन्सच्या बन्सीलाल जोशी(वय ५५) नावाच्या ड्रायवरला पुढे करण्यात आले व केस निकालात काढली. मुंबई पोलिस नेहमीप्रमाणे शोध घेत आहेत.
7 Feb 2014 - 5:44 pm | मोदक
ही बातमी अगदी युद्धपातळीवर दाबली गेली.
ज्या दोन गाड्यांना रिलायन्सची गाडी धडकली त्या मालकांना त्यांच्या गाड्या पूर्ण दुरूस्त करून दिल्या + त्याच मेक मॉडेलच्या आणखी एक एक नव्या कोर्या गाड्या दिल्यानंतर त्यांनी अपघाताच्या तक्रारी मागे घेतल्या (किंवा तक्रारींमध्ये "गाडी कोण चालवत होते पाहिले नाही" टाईप्स फाटे फोडले.)
7 Feb 2014 - 6:40 pm | आनंदराव
शिवाय पन्नास पन्नास लाख रुपये दिले ते वेगळे
7 Feb 2014 - 7:01 pm | मोदक
पन्नास लाख..??? =O
हे माहिती नव्हते.
7 Feb 2014 - 8:52 pm | चिरोटा
मोडलेल्या गाड्या दुरुस्त करून दिल्या व वर एक गाडी बक्षिस दिली(तोंड बंद ठेवायला) हे वाचले होते.
8 Feb 2014 - 1:26 am | मदनबाण
या... अपघाताचे फोटु व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. यापुढे सोशल नेटवर्कची ताकद अजुन वाढणार आहे,कारण रेकॉर्ड अॅड शेअर ची प्रोसेस फास्ट झाली आहे.
अवांतर:- सध्या मी व्हॉट्सअॅप वरुन टेलिग्रामवर स्विच होण्याचा विचार करत आहे,कारण :-
१)एंड टु एंड एनक्रिप्शन { हा पर्याय फक्त सिक्रेट चॅट मधेच आहे बहुतेक}
२) स्पीड
३) २०० लोकांचा ग्रुप करता येण शक्य.
कोणी हे वापरुन पाहिले आहे का ? असल्यास परफोर्मन्स कसा वाटला ? यावर कोणी वेगळा धागा काढला तरी उत्तम !
8 Feb 2014 - 1:29 am | मदनबाण
अपघाताचे फोटु व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत
अपघाताचे म्हणजे रोलर कोस्टरच्या ! नाहीतर उगाच अंबानी पुत्राच्या पराक्रमाचे फोटो माझ्याकडे कसे आले असा प्रश्न निर्माण व्हायचा ! ;)