वसईच्या घंटेचा शोध

सुज्ञ माणुस's picture
सुज्ञ माणुस in भटकंती
22 Apr 2013 - 12:21 pm

वसईचा किल्ला (Vasai Fort)

आजकाल जरा वेगळेच वेड लागले आहे. ट्रेक ला जाताना त्याचा पूर्ण गृहपाठ करायचा, म्हणजे इतिहास जाणून घ्यायचा आणि मग त्यात वर्णन केलेल्या ( आणि जादातर न केलेल्या) गोष्टींचा ठावठिकाणा शोधत हिंडत फिरायचे. मग अश्या वेळेस ठिकाण,अंतर, ऊन, इतर लोक ( आणि थोड्या फार प्रमाणात खर्च) या कशाचेही भान राहत नाही.

छोटेसे उदाहरण देतो, मागील खेपेस भीमाशंकर ला गेलो होतो. इसवी सन चौदाशे सालच्या मंदिराची पूर्ण पाहणी केल्यानंतर त्याचे अजून डिटेल मिळवण्यासाठी हम्पी ला जायचा प्लान झाला. ( का ते विचारू नका, उगाच हौस ) पण ते जास्तच लांब आणि सुट्टीची बोंब, म्हणून मग भीमाशंकर मंदिराच्या बाहेरील ५ टन वजनाची घंटा, जी चिमाजी आप्पा यांनी वसई वरून आणली होती, त्याचा हिशोब लावायचा खटाटोप चालू झाला.

ती घंटा वसई वरून आणली असे वाचून त्याचा काहीतरी उल्लेख वसई किल्ल्याशी निगडीत असावा म्हणून आमची स्वारी निघाली वसई किल्ल्याला. तसेही आम्हाला निमित्तच हवे असते.
चिमाजी आप्पा यांचा शोध पहिला घ्यायला हवा … अख्खं जग फेसबुकवर आहे म्हणून त्यांना शोधण्यासाठी तडक फेसबुकवर गेलो. निराश न होता म्हटले जाऊ स्वतःच आणि छडा लावू याचा.
तसे कशाचा कशाशीही संबंध नसतो, पण ठरवले तर सुतावरून स्वर्ग गाठता येतो .

सकाळची सिंहगड पकडून गेलो कल्याणला, यावेळी भूषण काही आला नव्हता, म्हणून मग फोनाफोनी करून त्याला बोलावले. मुंबईत गेले की माझ्यासारख्या माणसाचे अवघड होऊन जाते. स्वतःला तर काही माहीत नाही आणि दुसऱ्यांना विचारायचे तर काय विचारायचे ते हि माहीत नाही.

मग भूषणचा फोन आला,
"कुठे आहेस ? मग या प्रश्नाला मी प्लाटफोर्म वर आहे असे उत्तर दिले. "
"प्लाटफोर्म वर कुठे?"
"अरे जिथे वडापाव वाला माणूस उभा आहे तिथे."
असे बरेच निरर्थक प्रश्न उत्तरे झाली मग तो म्हणाला आहेस तिथेच थांब, मी शोधतो तुला.
मग थोड्या वेळाने भेट झाल्यानंतर आम्ही लगेच लोकल पकडून 'कोपर' ला जाण्यासाठी निघालो. भूषण ने सगळी माहिती काढलीच होती, आणि लोकल कुठून कशी जाणार हे हि त्याला माहीत होते.
साडे नऊ वाजेपर्यंत कोपर स्थानकावर पोहोचलो. तिथले रेल्वे स्थानक जरा वेगळेच आहे. एका स्थानकावरून, वसई कडे जाणाऱ्या गाडीच्या फलाटावर आम्ही येऊन थांबलो.
सव्वा दहा वाजता ट्रेन होती, जशी वेळ जवळ आली तशी गर्दीही वाढू लागली होती.
आता हि ट्रेन पकडून आम्ही पोहोचलो वसई रोड ला. तिथून मग महानगर पालिकेची बस पकडून निघालो वसई किल्ल्याला. बस मध्ये तरुण मंडळी जास्त होती. वाटले की तरुण पिढीला किल्ल्याविषयी वा इतिहासाविषयी अजूनही आस्था आहे. हे वाक्य भूषण ला सांगितले तर तो म्हणाला की,
"तसे नाहीये, "या" (म्हणजे बस मधल्या) तरुण पिढीची आस्था कशात आहे , हे तुला किल्ल्यावर गेल्यानंतर कळेल. नंतर मात्र मला ऐकवू नकोस की, कुठेही नेतोस मला तू म्हणून. "

ऐतिहासिक संदर्भ :
स.न. 1414 मध्ये भडारी-भेंगाळे नावाच्या सरदाराने हा उभारला. 1530 मध्ये गुजरातच्या सुलतानाने त्याच्याकडून घेतला. पुढे 1534 मध्ये तो पोर्तुगीजाकडे आला. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला.12 डिसेंबर 1780 रोजी किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. ( नंतर परत आपल्या ताब्यात आला आणि ३०० वर्ष भक्कम अश्या किल्ल्याची दुर्लक्ष केल्यामुळे वाट लागली. )

भौगोलिक संदर्भ :
ठाणे जिल्ह्यातील वसईजवळ असणारा हा भुईकोट किल्ला,जलदुर्ग व भुदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो.
किल्ला प्रचंड मोठा असून दशकोनी आहे व प्रत्येक कोपऱ्यावर एक बुरूज आहे. तटबंदी फार मजबूत असून तीस पस्तीस फूट उंच व पाच फूट रुंद आहे. या बुरुजांची बाहरी बुर्ज, कल्याण बुर्ज, फत्ते बुर्ज, कैलास बुर्ज आणि दर्या बुर्ज अशी नावे आहेत. तटबंदीच्या मधोमध बाहरी गढी आहे. किल्ल्याला एक समुद्राकडून व एक भूभागाकडून प्रवेशद्वार आहे. शिवाय चोर दरवाजेही आहेत. एका बाजूस समुद्र व बाकी तिन्ही बाजू दलदलीने व्याप्त आहेत.
किल्ल्याला एकूण दहा बुरूज आहेत. पोर्तुगीज काळात नोस्सा सिन्होरा दोरेमेदिया, रैस मागो, सेंट गोंसोले, माद्रद दीय, एलिफांत, सेंट पेद्रू, सेंट पॉल्स, सेंट सेबस्तियन आणि दहावा सेंट सेबस्तियन कावलिरो बुरूज, अशी या बुरुजांची नावे होती. (विकिपीडिया द्वारे)
.
वसई किल्ल्याचा पोर्तुगीजकालीन नकाशा:
सौजन्य : विकिपीडिया

येण्याजाण्याच्या वाटा:

पुण्याकडून जाताना कल्याण ला उतरून, पुढे कोपर पर्यंत दुसरी लोकल पकडून, अजून त्यापुढे कोपर पासून वासी रोड ला जाणारी ट्रेन पकडून नवघर स्थानकावर उतरावे. तिथून वसई किल्ल्याला जाणाऱ्या बऱ्याच बस मिळतात. त्या बस किल्ल्याच्या आत जाऊन सोडतात.

आमचा ट्रेक अनुभव :

बस मध्ये एक आजोबा म्हणाले की "हा किल्ल्याचा इतिहास आमची संस्कृती आहे". मग म्हटले जाऊयाच संस्कृती च्या मागे ( म्हणजे समाज संस्कृती च्या मागे). घंटेचे ही कारण होतेच जोडीला.
थेट बस असल्याने आम्ही किल्ल्याच्या समुद्राकडील प्रवेशद्वारापाशीच पोहोचलो. तेथे चौकशी करून सरळ किल्ल्याच्या वाटेने न जाता प्रवेशद्वारातून बाहेर जाऊन समुद्रकिनाऱ्याच्या वाटेला लागलो. तिकडची एकंदर गचाळ स्थिती पाहून परत फिरलो.

आता किल्ल्याची एक बाजू पकडून नुसतेच चालत सुटलो. तेथे एक कामगार भेटला. तो नाशकातील बागलाण तालुक्यातील होता. "आम्ही नुकतेच साल्हेर,सालोटा, मुल्हेर करून आलो बागलाण मधले" हे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यातला आमचा आदर वाढला. त्याने लगेच "मुल्हेर किल्ल्याची उंची ३६४७ मीटर आहे" असे वाक्य टाकल्यावर मग आम्ही आमच्या बाता मारणे बंद केले. आम्हाला कळले की हा पण "कसलेला खिलाडी" आहे. तो २२ वर्षे बागलाण मध्ये वनविभागात कामाला होता. आणि त्याने महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व किल्ले आणि प्रदेश अक्षरशः पिंजून काढले होते.
त्याच्याकडून माहिती काढून पुढे गेलो. तटबंदी वर चढून त्या वाटेने हिंडायला लागलो. पहिलेच समुद्राचे आणि बंदराचे दर्शन घडले.
.
किल्ल्याची भक्कम अशी तटबंदी आणि पोफळीची, नारळाची झाडे दूरवर पसरली होती. हा हिरवळ दिसणारा परिसर दलदलीने वेढलेला आहे .
.
बिचारी एकाच बोट भर उन्हात काय करत होती देव जाणे, पण मस्त फोटो आला.
.
भक्कम अश्या तटबंदी मधून तोफा मारण्याची सोय कशी असेल हे बघण्यासाठी आम्ही अजून आत आत जात राहिलो.
कोपऱ्या-कोपऱ्यात लपून अनेक प्रेमवीर आपल्या "प्रेमलीला" करण्यात मग्न होते. सार्वजनिक ठिकाणी आहोत याचेही भान त्यांना उरले नसावे. पोर्तुगीजांनी छोटे छोटे खंदक बांधून या प्रेमवीरांची चांगली सोय केली होती.
या" (म्हणजे बस मधल्या) तरुण पिढीची आस्था कशात आहे , हे तुला किल्ल्यावर गेल्यानंतर कळेल. ह्या भूषण च्या वाक्याचा मला अर्थ कळला.
मगाशी 'हा किल्ल्याचा इतिहास आमची संस्कृती आहे" असे म्हणणाऱ्या आजोबा बऱ्याचं वर्षात येथे फिरकले नसावे .

मस्त कैऱ्यांनी फुललेले भलेमोठे झाड बघून तेथेच जेवायला बसलो. जेवण झाल्यानंतर थोड्या कैऱ्या पडून घेतल्या.
.
थोडे खाली उतरून मग आम्ही किल्ल्याचे अवशेष बघायला आलो.
.
जेवण करून आम्ही किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराशी पोहोचलो. भक्कम दगडी बुरुजांमध्ये लपवल्यासारखे बांधलेले ते अजस्त्र प्रवेशद्वार बघून त्या काळच्या राजांच्या कल्पकतेची प्रचीती आली.
.
जमिनीवरचा दरवाजा

परत मागे फिरून वाट फुटेल तिकडे आम्ही हिंडत बसलो. कुठेही खोपदडात आम्ही जात होतो. आमच्या हातातील कॅमेरे बघून प्रेमवीरांची मात्र तपश्चर्या भंग पावत होती. आम्ही मात्र संपूर्ण किल्ला पालथा घालायचाच अश्या निश्चयाने हिंडत होतो.

थोडं पुढे जाऊन नारळीची, सुपारीची असंख्य झाडे, कोंकणाची चाहूल देत होती.
.
जवळ जवळ पूर्ण किल्ला २ तासात पाहून होईल म्हणून आम्ही संध्याकाळी बोरिवली च्या राष्ट्रीय उद्यानात जायचे ठरवले होते. पण किल्ला इतका मोठा होता की संध्याकाळचे ५ वाजून गेले.

तटबंदी वरून असेल फिरत एका पडक्या भागाशी आलो. बघतो तर काय, हे काका चक्क झाडावर चढून मस्तपैकी उभे राहून ताडी काढण्यासाठी मडके लावत होते.
.
बाकी जीवनाची लढाई कोणाला चुकली नाहीये हेच खरे.
.
तेवढ्यात, भूषण ने चतुर मोठ्या चतुरीने टिपून घेतला.
https://plus.google.com/u/0/photos/104678855081644041237/albums/58626566...
आता बरेच अंतर फिरून आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाशी आलो. तेथे भली मोठी वास्तू खरोखरच अचंबित करणारी होती. बरीच पडझड झाली असली तरी त्याचा साचा आणि आर्किटेक्चर बरेच शिल्लक आहे.
येथे पूर्वी ख्रिस्त लोकांची दफनभूमी असावी असे वाटत होते. पूर्ण जागेत चौकोन करून त्यावर इंग्लिश सारख्या भाषेत काहीतरी लिहिले होते. St. Anthony's यांचे चर्च म्हणून हे ओळखतात.
येथे पुढील बाजूने पाहिल्यास फक्त एक सूर्यकिरण तटबंदीतून बाहेर पडलेला दिसतो . याला रे ऑफ होप ( Ray of Hope) म्हणतात.
.
जरा विश्रांती घेऊन मग आम्ही परत हौसेने फोटोग्राफी चालू केली. फोटो काढण्यासाठी उपयुक्त असा प्रकाश पडल्याने प्रकाशाची रंगसंगती जुळून आली.

उगाच हौस करून एका भुयारातून जाऊन बघितले. नशिबाने हा रस्ता वरती जात होता, ( वरती म्हणजे वरच्या मजल्यावर, "वर" नाही हा स्मित )
वर जाऊन बघितले तर मागच्या चर्च ची वास्तू दिसत होती.

तेव्हाच्या काळी या किल्ल्यामध्येच संपूर्ण नगर वसवले असावे. असे वाटत होते.
त्याकाळी किल्ल्यात ३ चर्च, दवाखाना. न्यायालय तसेच राजवाडा सदृश्य वस्तू होत्या. त्याकाळची स्थापत्य कला किती अवगत होती याची प्रचीती येते.
.
.
मराठे आणि पोर्तुगीज यांच्यातला जो ऐतिहासिक वसई चा तह झाला तो येथे प्रमाणित झाला असे आंतरजालावरील माहितीवरून कळते.
.
पूर्ण किल्ल्याभर अशीच स्थापत्य रचना दिसत होती. सगळीकडे दारे आणि त्यावर दारे असेच दिसले.

सगळ्यात शेवटी आम्ही येथे येऊन पोहोचलो. येथे चर्च होते असा उल्लेख आढळतो. बाकीच्या अवशेषांपैकी हेच जर बऱ्या स्थितीत होते.
.
.
दर्शनी भागातील कोरीवकाम खरंच लक्षणीय होते. इतके बारकावे आणि सुंदर नक्षीकाम करायला किती वेळ लागला असावा या विचारातच आम्ही पुढे निघालो. याच द्वारावर वरती सूर्य आणि चंद्र यांच्या प्रतिमाही कोरलेल्या होत्या. एकंदर रचना हि पोर्तुगीज रचनेसारखी भासत होती. पोर्तुगीजांनी हा किल्ला काबीज करून येथे ३ चर्च बांधली होती. हे त्यापैकीच एक होते.
.
या पायऱ्यांची घडण वेगळीच भासली. एकाच दगडात कोरून केलेल्या वाटत होत्या. किती अचूक मोजमाप त्या काळीही अवगत होते हा विचार करून आमचे डोके चक्रावले.
.
जवळपास संपूर्ण किल्ला पाहून आम्ही चिमाजी आप्पांच्या स्मारकापाशी पोहोचलो. आता परत दुसऱ्या बाजूला जायचे त्राण उरले नव्हते.लांबूनच तेथील तटबंदी चे फोटो काढून आम्ही चिमाजी आप्पांच्या स्मारकापाशी निघालो.

चिमाजी आप्पांचा घोड्यावरचा ब्राँझ चा पुतळा लांबूनच लक्ष वेधून घेत होता.
.
चिमाजी आप्पा ऊर्फ चिमणाजी आप्पा (इ.स. १७०७ - इ.स. १७४१) हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली. सदाशिवराव भाऊ हे त्यांचे पुत्र होत.

काही काळ येथेच टेकून आता मात्र निघायची तयारी चालू झाली. आता या सगळ्या प्रकारात त्या घंटेचा विषय राहिला बाजूलाच. आमची मात्र मस्त चैन झाली.

किल्ल्यामध्ये वर्षानुवर्षे राहण्यार्या काही लोकांना त्या घंटे विषयी विचारले पण कोणाला काहीच माहीत नव्हते. मग थोडा खटाटोप केल्यावर माहिती मिळाली.

1534 मध्ये हा किल्ला पोर्तुगीजाकडे आला. किल्ल्यामध्ये त्यांनी ३ मोठी चर्च बांधलेली होती. त्या चर्च ला लावण्यासाठी त्यांनी १७२१ साली ३ घंटा युरोप वरून आणल्या होत्या. त्या घंटा वैशिष्ट्य पूर्ण असून त्या पंचधातू पासून बनविलेल्या होत्या. ह्या घंटा नेहमीच्या पितळी घंटा पेक्षा वेगळ्या आणि मोठ्या होत्या. त्यांचे वजन काही टनामध्ये होते. कॉपर म्हणजे तांबे आणि लीड म्हणजे शिसे यांचे मिश्रण आणि गन मेटल नावाच्या धातू पासून या बनविलेल्या होत्या. कॉपर मुळे यांचा रंग काळसर पिवळा असा आहे. त्या घंटांचा घंटानाद संपूर्ण किल्ल्याच्या परिसरात ऐकू जायचा असे कळते. युद्धप्रसंगी धोक्याची सूचना ह्या घंटांनी दिली जायची.
बरेच वर्षे पोर्तुगीजांकडे असलेल्या या किल्ल्यावर १७३७ ते १७३९ या काळात मराठ्यांनी बरीच आक्रमणे केली. इ.स. 1738 मध्ये चिमाजी आप्पाने मोहीम आखून हा किल्ला घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2 मे 1739 रोजी मराठ्यांनी किल्ला सर केला. त्यानंतर त्या तीनही घंटा चर्च वरून काढून मराठ्यांनी विजयाचे प्रतीक म्हणून हत्तीवरून नेल्या.
आजही या तीन घंटा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरात आढळतात. एक भीमाशंकर येथील १४०० सालच्या पुरातन मंदिरासमोर लावलेली असून तिचे वजन ५ टन एवढे आहे.यावर अव्हे मरिया ही ख्रिश्चन प्रार्थना, क्रॉस आणि १७२१ साल कोरलेले दिसून येते. दुसरी एक घंटा "नारो शंकर दाणी" याने नाशिकला नेऊन तेथे गोदावरीकाठीच्या मंदिरास अर्पण केली. नाशिक मधील नारोशंकराच्या मंदिरात असून ती बघावयास मिळते. हि घंटा आतून काळी असून त्याचा व्यास ( diameter ) हा एक मीटर एवढा आहे. यावरूनच त्या घंटेची भव्यता लक्षात येऊ शकेल. तिसरी घंटा जेजुरी येथील शिखर शिंगणापूर मंदिरात असून याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही.
या तिन्ही घंटा चर्च वरून मंदिरात लावण्यापूर्वी त्यांचे शुद्धीकरण केले गेले असावे. त्यावर कोरलेले 'क्रॉस' चे चिन्ह लेप देऊन मिटवायचा प्रयत्न दिसतो.

.
वसई किल्ल्याचे १७८० मधले रेखाटलेले चित्र.
संदर्भ : ( ब्रिटिश लायब्ररी)
http://www.webcitation.org/query?url=http://www.geocities.com/unitedit/v... )

अधिक छायाचित्रे आणि घंटेच्या फोटोसह येथे वाचता येईल.
http://sagarshivade07.blogspot.in
सागर

प्रतिक्रिया

इरसाल's picture

22 Apr 2013 - 12:40 pm | इरसाल

कॉपर म्हणजे जस्त आणि लीड म्हणजे शिसे यांचे मिश्रण आणि गन मेटल नावाच्या धातू पासून या बनविलेल्या होत्या.

मला शंका आहे.

नुसत्या लिंक देण्याएवजी फोटो चिकटवलेले अधिक चान राहील.

सुज्ञ माणुस's picture

22 Apr 2013 - 2:14 pm | सुज्ञ माणुस

तुमची शंका रास्त असेलही :)
भीमाशंकर येथील घंटा जी मी माझ्या डोळ्यांनी पहिली आहे त्याचा अभ्यास आणि इतर संदर्भ मिळवून हे लिहिले आहे. ( माझ्या बुद्धीला उमजले तेवढे :) )
अजून काही वेगळे असण्याची शक्यता नाकारत येत नाही

बॅटमॅन's picture

22 Apr 2013 - 5:49 pm | बॅटमॅन

तेच तर. कॉपर म्हंजे तांबे. जस्त म्हंजे झिंक.

सुज्ञ माणुस's picture

25 Apr 2013 - 5:21 pm | सुज्ञ माणुस

बरोबर आहे दुरुस्ती करून टाकतो :)

प्रसाद गोडबोले's picture

22 Apr 2013 - 1:00 pm | प्रसाद गोडबोले

ऐकीव माहीती नुसार तिसरी घंटा वाई जवळील मेणोली (आपल्या नानां फडणवीसांचे गाव हो ) गावातील मेणेश्वर शिव मंदीरात आहे .

प्रसाद गोडबोले's picture

22 Apr 2013 - 1:02 pm | प्रसाद गोडबोले

लिन्क सापडली : http://en.wikipedia.org/wiki/Menawali

प्रसाद गोडबोले's picture

22 Apr 2013 - 1:06 pm | प्रसाद गोडबोले

ghanTa

बाकी बरेच दिवसांनी ट्रेजर हंट खेळत असल्या सारखा फील आला . त्याबद्दल विशेश धन्यवाद :)

सुज्ञ माणुस's picture

22 Apr 2013 - 2:11 pm | सुज्ञ माणुस

गिरीजा, अनेक धन्यवाद तुम्हाला, तुम्ही लगेच ती घंटा शोधून फोटोही दिलात. तुमच्या उत्साहाला सलाम
हि असू शकेल. फोटोतल्या घंटे मध्ये भीमाशंकर येथील घंटे शी बर्यापैकी साधर्म्य आहे.
हा फोटो आपण काढला आहात का? असेल तर हा मी माझ्या या लेखात ( पर्यायाने ब्लॉग वरही )टाकू शकतो का ?

प्रसाद गोडबोले's picture

22 Apr 2013 - 2:14 pm | प्रसाद गोडबोले

फोटो मी काढलेला नाही , खालील ब्लॉगवर सापडला ...
http://ramrao.abajirao.com/travel/menavali/

सुज्ञ माणुस's picture

22 Apr 2013 - 2:22 pm | सुज्ञ माणुस

नक्षी आणि वर्ष सेम वाटतंय भीमाशंकर येथील घंटे सारखे :)

नि३सोलपुरकर's picture

22 Apr 2013 - 1:06 pm | नि३सोलपुरकर

१००% सह्मत आहे इरसाल यांच्या मताशी.

राही's picture

22 Apr 2013 - 1:46 pm | राही

लेख आणि फोटो छान आहेत.मराठे-पोर्ट्युगेझ यांमधल्या वसईच्या लढ्याचे एक वेगळ्या दृष्टीकोनातून वर्णन करणारे 'साष्टीची बखर' या नावाचे एक पुस्तक वाचनीय आहे. वरसईकर गोडसे भटजी यांच्या 'माझा प्रवास' या पुस्तकाप्रमाणेच हेही पुस्तक इतिहासाच्या दृष्टीने विश्वासार्ह मानले जात नाही. पण ऐतिहासिक घटनांमागची तत्कालीन सोशिओ-जिओ-पुलिटिकल परिस्थिती समजायला मदत होते. विशेषतः या पुस्तकाची प्रस्तावना ज्ञातिसंस्थेच्या अभ्यासकांनी जरूर वाचावी.
मला पुस्तक आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे यात वसई आणि साष्टी प्रांतातल्या अनेक स्थानांची जुनी रूपे सापडतात. उदा. अंजूर-अणजूर,बाभई-बापभुई,गोरेगाव-पहाडी वगैरे.

सुज्ञ माणुस's picture

22 Apr 2013 - 2:39 pm | सुज्ञ माणुस

राही धन्यवाद
'साष्टीची बखर' या नावाचे एक पुस्तक वाचनीय
आता मला कळले कि वसई भागाला तेव्हा साष्टी बेट असा उल्लेख का आहे ते :)

सुज्ञ माणुस's picture

22 Apr 2013 - 3:17 pm | सुज्ञ माणुस

हि माहिती २२ ऑक्टोबर २००२ च्या times मध्ये या विषयी लेख आला होता.
http://timesofindia.indiatimes.com/city/pune-times/For-whom-the-bells-to...?
इतिहास विभागात काम करणाऱ्या एकाशी मी याबद्दल मेलामेली केली तेव्हा हीच माहिती कळली.
बाकीच्या घंटा या पोर्तुगीजकालीन असाव्यात पण त्या वसई किल्यातील चर्च च्या नसाव्यात.

प्रचेतस's picture

22 Apr 2013 - 5:42 pm | प्रचेतस

छान लिहिलंय.
या विषयावरील महेश तेंडुलकर यांचे हिंदु देवालयातील पोर्तुगिज घंटा हे पुस्तक वाचनीय आहे.

सुज्ञ माणुस's picture

23 Apr 2013 - 9:29 am | सुज्ञ माणुस

२२ ऑक्टोबर २००२ च्या times मध्ये या विषयी लेख आला होता.
http://timesofindia.indiatimes.com/city/pune-times/For-whom-the-bells-to...?
हा लेख हि मंगेश तेंडूलकर यांचाच आहे. त्यातून बरीच माहिती मिळाली. बाकी पुस्तक आता मिळवलेच पाहिजे हे नक्की :)

पैसा's picture

22 Apr 2013 - 6:08 pm | पैसा

एकूण लिखाण, फोटो आणि माहिती शोधण्याची तुमची खटपट सगळेच कौतुक करण्यासारखे आहे. पण फोटो इथे टाकण्याची प्रॅक्टिस करा राव! दर वेळेला गुगलवर जाऊन बघायला वेळ लागतोय आणि मधे मधे लिंक जातेय!

टवाळ कार्टा's picture

22 Apr 2013 - 8:42 pm | टवाळ कार्टा

भारी

आमच्या वसईच्या किल्ल्याबद्दल इतके छान लिहीलेत तेही एवढा अट्टाहास करून घेऊन तिथे जाऊन!
सलाम तुम्हाला!

- (एकेकाळचा वसईकर) सोकाजी

शिद's picture

23 Apr 2013 - 11:22 am | शिद

मस्त लेख.

-- ३० वर्षांत फक्त २ दाचं वसईचा किल्ला पाहिलेला विरारकर.

सुहास झेले's picture

22 Apr 2013 - 9:50 pm | सुहास झेले

वसई किल्ल्याबद्दल इत्यंभूत माहिती हवी असेल तर, किल्ल्याच्या परिसरात कोणालाही विचारा श्रीदत्त राऊत यांचे घर कुठे आहे. तुम्हाला त्यांच्या घरी नेऊन सोडतील. ह्या माणसाचे मला फार कौतुक वाटते. ह्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी त्याने खूप खूप मेहनत घेतली आहे... बाकी ते फोटो धाग्यात टाकले असते तर छान वाटले असते.. :)

फोटो पिकासा लिंक येथे दिली होती. काल दिवसभर फोटो दिसले नाहीत. आज कसे दिसायला लागले देवच जाणे.
ब्लोगर सारखी नुसते पेस्ट करायची सुविधा येथे असावयास पाहिजे होती. ५० पेक्षा जास्त फोटो लेखात असले कि पहिले चार पाच पिकासा वर जाऊन लिंक हुडकून येथे योग्य त्या ठिकाणी टाकण्यातच अर्धा हुरूप मावळतो :)

घंटेचा शोध आवडला. घंटे विषयीचे आकर्षण आणि त्या निमीत्ताने केलेली भटकंती थक्क करणारी आहे.

श्या.. मुंबईकर असून कधी अजवर इथे जाणे झाले नाही... किल्ल्याचे फोटो पाहता आता नक्की कधीतरी जाणारच..

शिलेदार's picture

23 Apr 2013 - 1:01 pm | शिलेदार

माहीती खुपच सुन्दर माडलेली आहे. मी अजुन हा किल्ला पहिलेला नाही पण आता पहायला जाताना या माहीतीचा उपयोगी पडेल. खुप खुप आभार. अजुन अपेक्षा वाढल्या आहेत.

गणपा's picture

23 Apr 2013 - 1:29 pm | गणपा

फोटो छान आहेत. माहितीही आवडली.
मी गेलो की नुसता भटकुन येतो, माहिती द्यायला कुणी नसतं बरोबर. दोन-चार वर्षांपुर्वीच पुन्हा जाण्याचा योग आला होता.
मिनी सासुरवाडीच तिथे आहे म्हटल्यावर बरेच वेळा फेर्‍या झाल्यात किल्ल्यावर. :)

धन्यवाद सर्वाना.
असे अजून शोध तुम्हाला वाचायला मिळतील पुढील 'स्थापत्यकलेचे अद्भुत आविष्कार' या लेखात :)
लवकरच :)

चित्रगुप्त's picture

15 May 2013 - 3:08 pm | चित्रगुप्त

लेख आणि फोटो खूप आवडले.
'स्थापत्यकलेचे अद्भुत आविष्कार' या लेखाची वाट बघत आहे. प्रकाशित केल्यावर व्यनि करून दुवा कळवा, म्हणजे (अधून मधून खूप दिवस मिपावर येणे जमत नसल्याने) हुडकणे सोपे.
नाशीकची 'नारोशंकरी घंटा' ती यापैकीच का?

शिल्पा नाईक's picture

23 Apr 2013 - 4:25 pm | शिल्पा नाईक

"पुण्याकडून जाताना कल्याण ला उतरून, पुढे कोपर पर्यंत दुसरी लोकल पकडून, अजून त्यापुढे कोपर पासून वासी रोड ला जाणारी ट्रेन पकडून नवघर स्थानकावर उतरावे. तिथून वसई किल्ल्याला जाणाऱ्या बऱ्याच बस मिळतात. त्या बस किल्ल्याच्या आत जाऊन सोडतात."

इथे कोपर पासुन वसई ला जाणारी ट्रेन पकडून वसईला उतरावे अस हवय. नवघर हे स्थानक या मार्गावर नाही. ते बस स्थानक आहे.

सुज्ञ माणुस's picture

23 Apr 2013 - 4:54 pm | सुज्ञ माणुस

बरोबर,
वसई रोड स्टेशन ला उतरून नवघर बस स्थानकावर यावे असे असावयास पाहिजे होते.
दुरुस्ती करून टाकतो :)

भावना कल्लोळ's picture

23 Apr 2013 - 5:14 pm | भावना कल्लोळ

आमच्या वसई बद्दल एवढी छान माहिती आणि लेख लिहिल्याबद्दल आपले शतशः आभार.

सुज्ञ माणुस's picture

24 Apr 2013 - 10:13 am | सुज्ञ माणुस

धन्यवाद वसईकर :)

मन१'s picture

25 Apr 2013 - 5:56 pm | मन१

माहिती चांगली.
वर कुणीच एका गोष्टीचा उल्लेख न केलेला पाहून आश्चर्य वाटले.
पुण्याजवळ बनेश्वर येथे एक शंकर मंदिर आहे. पुण्याहून सातार्‍याला जाताना सुमारे पंचवीस तीस किलोमीटारवर हे दाट झाडीने वेढलेले देउळ लागते.(नारायणपूर बालाजी किंवा केतकवळीला दत्तमंदिरास पोचायच्या थोडे आधी, कापूरहोळ गावापोसून राइट टर्न मारावा. दोनेक किलोमीटर आत हे ठिकाण लागेल. चांगली ग्रीनरी मेन्टेन केली आहे.)
तर हे मंदिर नानासाहेब पेशव्याने १७५५ च्या आसपस बांधले (का त्याचा जीर्णोद्धार का काहीतरी) म्हणतात.
त्या मंदिरातही शेम टू शेम अशीच पोर्चुगीज घंटा आहे. त्यापुढे तपशीलाचे फलकही दिले आहेत.(मंदिरासआठी नानासाहेब पेशव्याने किती खर्च केला वगैरे. घंटा कुठली आहे वगैरे.)
.
बादवे, विहिरीत पव टाकला की गडबडून जाणारी मंडळी, "पांढर्‍या लोकांच्या स्पर्शाने बाटलेली" घंटा आणत का असावीत? आणणारे कै बाटत वगैरे नसत काय? धर्म वगैरे बुडत नसे काय तेव्हा?

सुज्ञ माणुस's picture

26 Apr 2013 - 5:36 pm | सुज्ञ माणुस

परवा रविवारी तेथूनच जाणार आहे. जाऊन बघूनच येतो.
माहिती बद्दल धन्यवाद :)

बाकी धर्माचे, बुडण्याचे तुम्ही म्हणता तसे खरेही असेल. आणि म्हणूनच अश्या प्रथांमुळे पोर्तुगीज आणि नंतर ब्रिटीश आपल्या लोकांना फोडून काढत असावेत.

चित्रगुप्त's picture

15 May 2013 - 7:03 pm | चित्रगुप्त

बनेश्वर येथील मंदिराबद्दल वाचून उत्सुकता वाटत आहे.
तुमच्याजवळ तिथले (इंदुरी भाषेत 'तिथल्ल्ले') फोटो असल्यास दाखवा की.

मन१'s picture

16 May 2013 - 1:20 pm | मन१

बर्‍याचदा गेलोय. पण सत्य, अस्तेय ह्यापेक्षाही अपरिग्रह ह्या तत्वाचे आम्ही कंजूस लोक व्रताचरण करत असल्याने आमच्याकडे स्वतंत्र क्यामेरा नाही, क्यामेरा असलेला मोबाइलही नाही. (नोकिया ६०३० सात वर्षापासून वापरतोय.)
तस्मात्,क्षमस्व. फटु नाहित.

सुरेख लेखन आणि उत्तम माहिती.

सुज्ञ माणुस's picture

15 May 2013 - 10:49 am | सुज्ञ माणुस

मुंबई कडून गुजरात कडे जाणार्या रस्त्यावर एका गावात ( र वरून नाव आहे, मी नाव विसरलो बहुतेक रंजनाथ) येथे चिमाजी अप्पांचे अजून एक स्मारक आहे. असे कळले. माझे एक दूरचे नातेवाईक ते बघून आले आहेत. वसई सारखाच पुतळा तेथे असून तेथे अजून एक पोर्तुगीज घंटा आहे असे कळले.
एकंदरीत, लेखात ३ घंटाचा शोध लावायला गेलो तर ६ घंटा सापडल्या.

विजुभाऊ's picture

15 May 2013 - 6:53 pm | विजुभाऊ

एकंदरीत, लेखात ३ घंटाचा शोध लावायला गेलो तर ६ घंटा सापडल्या.

ते बहुतेक फावल्या वेळेत घंटांचा संग्रह ( अल्बम) करीत असावेत अशी शंका येतेय

सुज्ञ माणुस's picture

16 May 2013 - 12:58 pm | सुज्ञ माणुस

बरोबर आहे. आणि फावल्या वेळेत नाही काय, हपिसातूनच हे काम चालते :) ( आणि हापिस वाल्याला पण ते माहित असावे:))

पैसा's picture

15 May 2013 - 12:13 pm | पैसा

रत्नागिरीजवळ काळबादेवी नावाचे गाव आहे. मी लहान असताना त्या गावातल्या रामेश्वराच्या जत्रेला नेहमी जात असे. त्या देवळात एक अशीच वैशिष्ट्यपूर्ण आकाराची आणि वेगळीच अक्षरे कोरलेली पोर्तुगीज घंटा पाहिल्याचे आठवते. अर्थात मी तेव्हा लहान असल्याने त्या घंटेवर काय अक्षरे आहेत हे आता आठवत नाही. पण तिला पोर्तुगीजांची घंटा म्हणतात हे नक्की. पुढच्या रत्नागिरी भेटीत फोटो मिळवायचा प्रयत्न करते.

या काळबादेवी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे भंडारी जमातीची वस्ती आहे. त्यांची आडनावे मयेकर, नार्वेकर, बोरकर वगैरे गोव्यातल्या गावांच्या नावावरून आहेत. तेव्हा तिथल्या एका म्हातार्‍या आजोबांनी आमचे पूर्वज होड्यांतून इथे आले असे सांगितल्याचे आठवते. रामेश्वर सुद्धा गोव्यातल्या देवांप्रमाणेच आहे.

काळबादेवी गाव बसणी गावसमुहाचा भाग आहे. बसणीत महालक्ष्मी आणि रवळनाथाची प्रमुख देवळे आहेत. जी गोव्यातही आहेत. बसणी गावात लोककथांप्रमाणे महालक्ष्मी ही १२ वाड्यांची देवता समजली जाते. यावरून सहजच गोव्यातल्या बार्देशाची आठवण येते. महालक्ष्मीच्या जत्रेत बगाड वगैरे काही वैशिष्ट्यपूर्ण प्रथा आहेत, ज्या गोव्यातल्या गड्यांच्या जत्रेत असल्याचे नंतर खूप काळाने समजले. या सर्व गोष्टींचा नेमका काय आणि कसा संबंध आहे याचा कोणीतरी शोध लावायला पाहिजे.

सुज्ञ माणुस's picture

15 May 2013 - 2:15 pm | सुज्ञ माणुस

म्हणजे एकंदरीत ७ घंटा सापडल्या. अजून किती आहेत देव जाणे :)

तुम्हाला फोटो मिळाल्यास मला जरुर मेल करा.

बाकी प्रतिसाद मस्तच :)

मनराव's picture

15 May 2013 - 1:10 pm | मनराव

उत्तम माहिती.... आणि सफर.....

पुढच्या सफरी पासुन मि पण असेच करण्याचा प्रयत्न करणार........

अजून एक पोर्तुगीज घंटा मिळाली. पण महाराष्ट्राबाहेरील :)
एस्तोरियन मेरीटाइम म्युजियम, टल्लीन, इस्टोरिया (Estonian Maritime Museum, Tallin, Estonia)
( फिनलंड जवळचा देश)
.

यात एक माणूस जाऊ शकतो एवधी ती मोठी आहे.

प्रसाद गोडबोले's picture

16 May 2013 - 1:32 pm | प्रसाद गोडबोले

फावल्यावेळेत आम्ही काय करत असतो ऑफीसात ? काम ? >>घंटा !

=))