लाल भोपळ्याच्या पुर्‍या (घारगे)

रेवती's picture
रेवती in अन्न हे पूर्णब्रह्म
10 Apr 2013 - 7:04 am

साहित्य: लाल भोपळा, कणीक, तांदूळ पिठी, गूळ, वेलदोडे, हळद, मोहनासाठी व पुर्‍या तळण्यासाठी तेल.

कृती: पारंपारिक पद्धतीमध्ये लाल भोपळा किसून घेत. त्यात हळद व तेल घालून मिश्रण शिजवून घेत असत.
मी मायक्रोवेव्हचा वापर केल्याने पद्धत थोडी वेगळी आहे.
लाल भोपळ्याची मोठी फोड सालासकट मायक्रोवेव्ह सुरक्षित भांड्यात ठेवून त्यावर पाणी शिंपडावे.
आता हा भोपळा पाच मिनिटे मायक्रोवेव्हमध्ये झाकण ठेवून उकडावा.
दोन मिनिटे तसाच ठेवून नंतर भोपळ्याची वरची बाजू खाली करून पुन्हा पाच मिनिटे उकडावा.
कोमट झाल्यानंतर गर चमच्याने काढून घेता येईल. तो गर वाटीने मोजून घ्यावा.
उकडलेल्या भोपळ्याचा गर १ मोठी वाटी झाला.
त्यात एक अष्टमांश चमचा हळद व तेलाचे मोहन दोन मोठे चमचे घातले.
आता हे मिश्रण दोन मिनिटे मायक्रोवेव्ह करावे.
बारीक तासलेला एक मोठी वाटी गूळ त्यात मिसळावा.
गूळ विरघळल्यावर त्यात सात आठ वेलदोड्यांची पूड घालावी व एक वाटी तांदूळ पिठीही मिसळावी.
या मिश्रणाचा गोळा तयार होईल इतपत म्हणजे मावेल तेवढी कणीक घालावी.
साधारण दोन ते सव्वादोन मोठ्या वाट्या कणीक लागते. हा गोळा पंधरा मिनिटे झाकून ठेवावा.
तळणी तापत घालावी. तेल तापले की भिजवलेल्या पिठाच्या दोन ते तीन पुर्‍या जाडसर लाटून तळणीत सोडाव्यात. मध्यम आचेवर खरपूस तळाव्यात. अश्याप्रकारे सर्व पुर्‍या तळून, गार झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात.
हा पदार्थ पाच ते सहा दिवस टिकतो.

a

टिपा: १)मोहनाचे तेल गरम करण्याची गरज नाही.
२)जास्त गोड आवडत असल्यास सव्वा वाटी गूळ घेता येईल.
वरील प्रमाणाने पुर्‍या बेताच्या गोड होतात.
३)पुर्‍या देताना बरोबर ताजे लोणी, कैरीचे लोणचे द्यावे.

प्रतिक्रिया

एकदम मस्त कृती दिलीत रेवतीताई. नक्कीच करुन बघेन.

तर्री's picture

10 Apr 2013 - 7:28 am | तर्री

अप्रतिम. पाकृ आणि फोटो !
अत्यंत आवडता पदार्थ. हया पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात.

किसन शिंदे's picture

10 Apr 2013 - 7:32 am | किसन शिंदे

मस्त लागतात ह्या पुर्‍या, बर्‍याच वेळा खाल्या आहेत.

शिद's picture

10 Apr 2013 - 11:25 am | शिद

मिपा वर पुर्‍या सप्ताह सुरू आहे की काय?
बाकी, पाकृ मस्तच.

रामदास's picture

10 Apr 2013 - 11:40 am | रामदास

तिळ घालावे का ?

अक्षया's picture

10 Apr 2013 - 11:41 am | अक्षया

फोटो एकदम मस्त. :)

अभ्या..'s picture

10 Apr 2013 - 12:30 pm | अभ्या..

मस्त. एकदम पारंपारीक पाकृ नव्या स्टाइलने.

दिपक.कुवेत's picture

10 Apr 2013 - 12:43 pm | दिपक.कुवेत

पुर्‍या एकदम सहि. मला खुप आवडतात. एक प्रश्नः आपण नेहमी तेलाचे मोहन का संबोधतो? या मागे काहि कारण?

अभ्या..'s picture

10 Apr 2013 - 1:00 pm | अभ्या..

आपण नेहमी तेलाचे मोहन का संबोधतो

तेवढेच देवाचे नाव :)
राम मिसळत जावा, पदार्थ चवी आला असे काहीतरी आहे ना संतांनी म्हणलेले, तसेच.

गणपा's picture

10 Apr 2013 - 12:47 pm | गणपा

खंग्री दिसतायत पुऱ्या. :)

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ! ;)
छान दिसते हो पुरी ! :)

बाकी...मायक्रोव्हेव खाणे आरोग्यास चांगले नाही असे म्हणतात...शिवाय त्याच्या जवळ इभे राहिल्यामुळे देखील शरिरास रेडिएशन मिळते. तेव्हा याचा कमीत कमी वापर करावा.

श्रीरंग_जोशी's picture

11 Apr 2013 - 12:16 am | श्रीरंग_जोशी

हिच माहिती एका दक्षिण भारतीय सहकार्‍याच्या तोंडून ऐकले होते तेव्हा जालावर याबद्दल शोधायचा प्रयत्न केला होता. पण नेमकेपणाने काही मिळाले नाही. काही चर्चा दिसल्या पण ठोस असे काही निष्पन्न झाले नाही.

आपणाकडे काही माहिती असल्यास कृपया त्यावर लिहा.

पाककृती रोचक वाटत आहे :-).

सुधीर's picture

10 Apr 2013 - 1:34 pm | सुधीर

घारगे हा शब्द नवीन आहे. पण घरी याला वडे म्हणतात. लाल भोपळ्याएवजी त्यात तोवसं(मोठी काकडी) वा चिबुड घालतात. गौरी-गणपतीत असले वडे अन काळ्या-वाटाण्याच सांबार असा बेत असतो. फोटो छान आहे.

प्रचेतस's picture

10 Apr 2013 - 1:48 pm | प्रचेतस

मस्तच.
नवरात्रात करतात त्या कडकण्या ह्याच का?

अभ्या..'s picture

10 Apr 2013 - 2:04 pm | अभ्या..

काय पण वल्ली? कडाकण्या वेगळ्या घारगे वेगळे.
ये उद्या घारगे खायला. कडाकण्या तुला नवरात्रात दाखवतो. अगदी तुळजापुरच्या जंबो कडाकण्या पण. :)

प्रचेतस's picture

10 Apr 2013 - 2:06 pm | प्रचेतस

ओक्के.
सोलापूर वारीत करूच की रे तो प्लान.

अन्या दातार's picture

15 Apr 2013 - 9:13 pm | अन्या दातार

नवरात्रात करतात त्या कडकण्या ह्याच का?

यापेक्षा अधिकमासात करतात त्या कडाकण्या याच का? असा प्रश्न जास्त आवडला असता. ;)

अभ्या..'s picture

17 Apr 2013 - 4:21 pm | अभ्या..

त्या खूप आवडल्या की मिसळीत चुरुन घालतात त्याच ना? ;)

सस्नेह's picture

10 Apr 2013 - 2:09 pm | सस्नेह

भोपळ्याच्या घार्‍या खूप आवडतात. पण आतापर्यंत अंदाजे प्रमाण होते.
आज नेमके समजले. धन्स रेवती. a

सूड's picture

10 Apr 2013 - 2:10 pm | सूड

मस्त !! यासोबत तांदळाची खीर झकासच लागेल (काकडीच्या घारग्यांसोबत तांदळाच्या खिरीचं कॉम्बिनेशन झकास जमत, त्यामुळे यासोबत पण चालायला हरकत नाही असा आपला अंदाज ;)), फक्त त्यात दूध न घालता नारळ वाटून घालायचा. काही लोक तांदळाच्या खिरीत पण दूध घालतात आणि मग पार मातेरं होतं त्या खिरीचं.

प्यारे१'s picture

10 Apr 2013 - 2:14 pm | प्यारे१

मस्तच!
घार्‍या म्हणतो आम्ही.
घरी लाटत नाहीत, थापतात छोट्या छोट्या.
खीरीबरोबर मस्त लागतात!

मी_देव's picture

10 Apr 2013 - 2:16 pm | मी_देव

आवडता पदार्थ! मस्तच...

अत्रुप्त आत्मा's picture

10 Apr 2013 - 2:18 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.freesmileys.org/smileys/smiley-eatdrink015.gif

जयवी's picture

10 Apr 2013 - 2:32 pm | जयवी

सही........!!
ए ह्यालाच घार्‍या म्हणतात का गं ?

nishant's picture

10 Apr 2013 - 2:32 pm | nishant

मस्त दिसतायत पुर्या..

सानिकास्वप्निल's picture

10 Apr 2013 - 3:16 pm | सानिकास्वप्निल

छान दिसत आहे :)
मायक्रोव्हेवमध्ये ही बनवता येईल हे कधी सुचले नाही, मस्तं कल्पना.
खीरीबरोबर पण छान लागतात.

कच्ची कैरी's picture

10 Apr 2013 - 5:07 pm | कच्ची कैरी

छान ,नक्कीच करुन बघेल .

अनन्न्या's picture

10 Apr 2013 - 6:44 pm | अनन्न्या

सुंदर झालेत घारगे!! आता नुसते पाहणे अशक्य आहे.

मस्त दिसतायत पुर्‍या.. आमच्याकडे पण ह्याला भोपळ्याचे घारगे म्हणतात.

सर्व प्रतिसादकांचे आभार.
रामदास, तीळ घालता येतील की नाही माहित नाही. आम्ही भज्याच्या पिठात तीळ घालतो ते चांगले लागतात.
सूड, तांदळाच्या खिरीत दूध घालत नाहीत हे माहित नव्हते. आमच्याकडे तांदळाच्या रव्यात आटवलेले दूध घालून श्राद्धाची खीर करतात हे बघितले होते.
जयुताई, माझ्या माहेरी या पुर्‍यांना घार्‍या म्हणतात पण सगळ्यांकडे घारगे म्हणताना ऐकले आहे. माझ्या सासरी तर शिजवलेल्या भोपळ्याच्या किसात गूळ, हळद, तेल, नारळ घालून रवा व तांदूळ पिठी घालतात. त्याचे वडे थापून तळल्यावर त्याला भोपळवडे किंवा घारगे म्हणतात.
सानिके, किसणीवर कडक भोपळा किसताना बरेचदा खरचटते ते मायक्रोवेव्ह प्रकरणाने सोपे होते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Apr 2013 - 11:50 pm | निनाद मुक्काम प...

मला खुप आवडतात.
हा धागा पाहून
Big Drooling

फोटोतल्या पुऱ्या बघून तोंडाला पाणी सुटले !
पुर्यांच्या ऐवजी तेवढ्याच आकाराची थालीपीठे लावली तर?

कोणी हा प्रयोग केला आहे का?

धन्यवाद श्रीरंगपंत, निनाद जर्मनकर व अलगूज.
अलगूज, उपासाची गोडाची थालिपिठे असतात त्यात लाल भोपळा व गुळाचे पाणी वापरतात. पुर्‍यांचे पीठही चालेल असे वाटते.
दिपक कुवेतकर, मोहनाला मोहन का म्हणतात हे माहित नाही पण हिंदी भाषिक याला मुएन म्हणताना ऐकले आहे.

स्पंदना's picture

11 Apr 2013 - 3:54 pm | स्पंदना

तांदळाच पिठ का घालायच? त्यामुळे कुरकुरीत होतात का? माझ्या सासुबाई कायम करतात घार्‍या, पण त्यात तांदळाचे पिठ किंवा मोहन, अथवा हळद खरच काही नसत अस वाटतय. नुसत्या भोपळा, गुळ अन कणिकेच्या वडे थापुन तळलेल्या घार्‍या खाल्लेत.
आता या नविन प्रकारच्या करुन पहाते. फोटो मस्त.

हो अपर्णा, तांदळाच्या पिठीने घार्‍या खुसखुशीत होतात. एरवी माझी आईही आधी फक्त कणीक, भोपळा, गूळ अश्या करीत असे पण हा बदल केला आहे आता.

शिल्पा ब's picture

12 Apr 2013 - 6:44 am | शिल्पा ब

करुन बघते. याचं थालिपीठ चांगलं लागतं का? तेवढंच हेल्दी खाणं होईल.

शिल्पा ब's picture

12 Apr 2013 - 6:53 am | शिल्पा ब

अजुन एक....याच्या तिखट मिठाच्या पुर्‍या होतात का? कशा करायच्या?

याच्या तिखटमिठाच्या पुर्‍या केलेल्या कधी ऐकल्या नाहीत. आपल्या नेहमीच्या तिमिच्या पुर्‍या कणिक, थोडा रवा, थोडे डाळीचे पीठ, तिखट, मीठ, तीळ, जिरेपुड (किंवा ओवाही घालतात), धुरावलेले मोहन अगदी (कणकेचा)मुटका वळेपर्यंत (मी तेवढे घालत नाही) अश्या करतात. आणखी वेगळी पाकृही असू शकेल.

सही है !!! काय सुंदर दिसतायत पटदिशी तुकडा मोडून खाव्याशा वाटतायत.

सुहास झेले's picture

12 Apr 2013 - 12:33 pm | सुहास झेले

मस्त दिसतायत..... आवडली पाककृती :) :)

ऋषिकेश's picture

12 Apr 2013 - 2:01 pm | ऋषिकेश

थेट वाचनखुणेत!

स्मिता.'s picture

12 Apr 2013 - 2:11 pm | स्मिता.

पुर्‍या एकदम मस्त दिसत आहेत. आधी कधी पाहिला नव्हता हा प्रकार.

यात गूळ, वेलदोडे न घालता तिखट-मीठ घालून पण करता येतिल ना?

अपर्णा, शिल्पा, शुचितै, सुहास झेले, ऋषिकेश, स्मिता प्रतिसादाबद्दल आभार.
स्मिता या प्रकारे तिमिच्या पुर्‍या करता येतील की नाही माहित नाही.

पिलीयन रायडर's picture

12 Apr 2013 - 7:06 pm | पिलीयन रायडर

मस्त होतात..
मी थोडे जिरे, ओवा आणि (उगाच गंमत म्हणुन आमचुर) घालुन करुन पाहिल्या..पराठे हा जास्त हेल्दी पर्याय आहे.

घारगे मस्तच!!!

त्रिवेणी's picture

12 Apr 2013 - 8:22 pm | त्रिवेणी

या गोड पुर्‍या आणि आंब्याचे लोणचे. अतिशय आवडता प्रकार.
बाकी फोटो बघून आजीच्या पुर्‍या आठवल्या.

कवितानागेश's picture

12 Apr 2013 - 11:34 pm | कवितानागेश

अत्यंत आवडता पदार्थ! :)

पैसा's picture

13 Apr 2013 - 7:38 pm | पैसा

फोटो एक लंबर आलाय! लागतातही झक्कास. मायक्रोवेव्हची आयडिया आवडली. वेळेची बचत!

धनुअमिता's picture

15 Apr 2013 - 2:18 pm | धनुअमिता

तोंपासु