वैजनाथ-आरोग्यभवानी

श्रीमान's picture
श्रीमान in भटकंती
2 Apr 2013 - 1:41 pm

दत्त संप्रदायात नरसिंह सरस्वती यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ठिकाणांमधे औदुंबर, नरसोबावाडी आणि गानगापूर या ठिकाणांचा प्रामुख्याने समावेश होतो. गुरुचरित्रात उल्लेख असणार्या ठिकाणांमधे गुप्तरुपाने गुरुंचे वास्तव्य जेथे १२ वर्षे होते अशा ठिकाणाची माहिती मात्र फारशी प्रचलित नाही. हे ठिकाण आह्रे कोल्हापूर - बेळगाव सिमेवरील देवरवाडी गावातील वैजनाथ आरोग्यभवानी मंदिर.
गुरुचरित्र पाठ करताना आज अनेक वर्षे त्यात पुढिल श्लोक वाचनात येई.

ऐसेपरी सांगोनी !! श्रीगुरु निघाले तेथोनी !!
जेथे असे आरोग्यभवानी !! वैजनाथ महाक्षेत्र !! (अध्याय १४)

आज पर्यंत हे ठिकाण म्हणजे परळी वैजनाथ असावे असेच वाटत होते. परंतु नरसिंह सरस्वतींचे जीवन कार्य व वास्तव्य असणार्या ठिकाणांशी स्थान समिपता, प्राचिनता तसेच उल्लेखित आरोग्यभवानी देविचे मंदिर ( परिसर दुर्मिळ वनौषधिंसाठि देखिल प्रसिद्ध आहे )आणि तेथिल दत्त पादुकांचे स्थान इ. पाहतामात्र हे वर उल्लेख केलेले ठिकाणच असावे असे वाटते.

वैजनाथ आरोग्यभवानी मंदिर कोल्हापूर - बेळगाव सिमेवरच् कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत आहे. महाराष्ट्रात फारसे प्रसिद्ध नसणारे हे मंदिर कर्नाटकात मात्र अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर महिपालगड किल्ल्याच्या पायथ्याशी निसर्गाच्या कुशित वसलेले असून परिसर रमनिय व शांत आहे. आरोग्य आणि स्वास्थ विषयक नवसाला पावणारा देव अशी देवाची येथे ख्याती आहे.

Vaijanath temple

मंदिरा विषयी स्थानिक माहिती अशी कळाली कि मंदिर साधारण पणे हजार वर्षा पुर्विचे असुन बांधणि हेमाड्पंथि आहे. सध्या मात्र मंदिर तैल-रंगानि रंगविलेले आहे. मंदिराचा मागिल थोडा भग जमिनित गाड्ला गेला असावा असेही वाट्ले. वैजनाथ व आरोग्यभवानी हि स्वतंत्र मंदिरे असुन सध्या मात्र मधील जागेत बांधकाम केलेले दिसुन आले.

Temple

Nandi

मंदिरात नंदी शेजारी एक छोटा नंदी आहे. त्या बद्दल मनोरंजक माहिती अशी कळली की वैजनाथाला नवस बोलणार्याने नवस बोलल्यानंतर हा नंदी हलवून पहायचा नंदी जर हलका लागला आणि हलला तर नवस नक्की पुर्ण होतो.

वैजनाथ मंदिर:
Inside

आरोग्यभवानी मंदिर:

Aarogyabhawani

भक्तांच्या आरोग्य विषयक कामना आरोग्यभवानी पुर्ण करते. मुर्ती दोन हात उंचिची अष्ट्भुजारुप आहे, तसेच चेहर्यावरील भाव थोडेसे उग्र आहेत. (मंदिरात आतून छायाचित्रे घेता आली नाहित) मंदिरातील दगडी फरशी वर पूर्ण् पणे गुळ्गुळीत फरशी बसवलेली आहे. ही फरशी कर्नाटकातील कोणत्यातरी प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्याने (नाव विसरलो) नवस पुर्ण झल्या बद्दल बसवून दिली आहे म्हणे.

दत्त पादुका:

Paduka

धुनि:

Dhuni

मंदिर परिसरात दत्त पादुकां समोर एक लहान कुंड असून, मंदिरा मागे एक मोठे कुंड आहे.

K1

k2

गुरुचरित्रा मधिल स्थानाचा उल्लेख दर्शविणारा फलक:

Gch

मंदिर परिसरातूनच महिपाल गडाचे दर्शन होते.मंदिरा पासून गड ३ कि.मी. अंतरावर आहे. वाटेवरील रस्त्यात गुहा आहेत असे ऐकले. जाताना थोडे हुड्कल्यावर ठिकाण सापड्ले.

Guha

गुहा ऐसपैस गुहेत गारवा सुद्धा जबरदस्त जाणवत होता. दर्शनी गुहे खाली आणखि एक गुहा असून तेथे जाण्यासाठि दोन छोटे मार्ग देखिल होते. खालील गुहेत वर्ष भर पुरेल इतका पाणी साठा असतो अशी माहिती मंदिरातून निघताना मिळाली होती. अंधार असल्याने खाली मात्र गेलो नाही.
वाटेत मोठा पठारा साऱखा प्रदेश लागला, जिथे भारतीय सैन्याचा वर्ष भर युद्ध अभ्यास चालतो म्हणे. ( जाताना वाटेत अनेक सैन्य वाहने व जवान पाहून शंका आलीच होती.)

:महिपालगड:

महिपाल राजाने बांधलेला म्हणून महिपालगड् हे नाव गडाला मिळाले. गडावर पहाण्यास तट्बंदीचे अवशेष, पाण्याचे खोल टाके, शिवाजी महाराजांचा पुतळा, ढासळलेले बुरुज इ. गोष्टी आहेत.

गडावरील खोदीव टाके:

Take

टाके खोल असून तळाचा अंदाज येत नाही.( विहीर ही संज्ञा ही येथे चालू शकेल) तसेच आत वाकून पाहताना जिवाचा थरकाप उडतो. या गडाला खरेतर हे टाके पाहण्यासाठीच भेट दिली पाहिजे. गड दुचाकीवरुन आरामात पाहता येतो. महिपालगड हे पुर्ण गावच गडावर वसलेले आहे, त्या मुळे इतर सांगने नलगे.

(गडाची सखोल माहिती व इतिहास आंतरजाला वर उपलब्ध आहे)

गडाच्या बुरुजा वरून घेतलेले परिसराचे छायाचित्र:

V1

परतिच्या मार्गावर देवरवाडी गावातून परिसराचे घेतलेले छायाचित्र:

v2

कसे जावे:

महामार्ग क्र.४ ने बेळगाव गाठावे - तेथून सावंतवाडी रस्ता पकडावा (याला तेथे बॉक्साईट रोड असेही म्हण्तात) - साधारणतः १२ कि.मी. अंतरावर आपण पुन्हा कोल्हापूर हद्दीत येतो - तेथे शिनोळी गावातून उजव्या हाताला देवरवाडी फाटा लागतो. - तेथे ३ कि.मी. वर वैजनाथ मंदिर व परत ३ कि.मी. वर महिपालगड लागतो.

(आमच्या प्रवासात पुणे कोल्हापूर रस्त्या पेक्षा कोल्हापूर बेळगाव रस्ता दर्जा, सोई आणि टोल (रक्कम ५० रू. जाता येता) पाहता निशित पणे उजवा वाटला)

( महिपालगडा पुढेही अनेक गावे आहेत पण एकही लाल ड्बा इकडे जात नाही. बेळगावातून कर्नाट्कची मात्र इकडे गडा पर्यंत बस सेवा आहे. परिसरातील महाविद्यालयात शिकणार्या मुलांना महाराष्ट्रातील महाविद्यालयात शिकण्यासाठी रोज ८ ते १० कि.मी. अंतर चालावे लागते असे कळले पण सिमावादाच्या गप्पा मारणार्यांना त्याचे काय पड्ले आहे म्हणा )

जवळची पाहण्यासारखी इतर ठिकाणे:

कर्नाट्कातः बेळगाव किल्ला, कलावतीआई मंदिर, पंत बाळेकुंद्री महाराज मंदिर, सुळेभावी येथील देविचे मंदिर (मुर्ती अतिशय देखनि आहे), गोकाक धबधबा
महाराष्ट्रात: सामानगड, कलानिधीगड (पु.ल. देश्पांडेंचे पुर्वज इथे गडकरी का किल्लेदार होते म्हणे),पारगड

श्री पंत बळेकुन्द्री महाराज मंदिरः
Balekundri

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

2 Apr 2013 - 2:06 pm | प्रचेतस

टिपिकल चालुक्य शैली.

धनुअमिता's picture

2 Apr 2013 - 3:07 pm | धनुअमिता

छान.
फोटो आणि वर्णन आवडले.

मनराव's picture

2 Apr 2013 - 3:56 pm | मनराव

उत्तम माहिती......वाचनखुण साठवल्या गेली आहे....

राही's picture

2 Apr 2013 - 5:22 pm | राही

या थोड्याशा अप्रसिद्ध ठिकाणाची माहिती आवडली. गुरुचरित्राशी संबंधित आणखी एक स्थान सध्या प्रकाशात येऊ लागले आहे. ते म्हणजे कर्णाटकातले कडगंची. (तालुका आळंद,जिल्हा गुलबर्गा). येथे सरस्वतीगंगाधर यांचे पूर्वज सायंदेव यांच्या जुन्यापुराण्या वाड्याची डागडुजी करून सायंदेवांची एक सुंदर मूर्ती अलीकडे प्रतिष्ठापित केली आहे. गाणगापूरला येणारे काही भाविक थोडी वाकडी वाट करून येथे येऊ लागले आहेत. येथे पाहाण्यासारखे फारसे काही नाही. रस्ते सोलापुरपेक्षा थोडेसेच बरे आहेत पण सोलापुरच्या ऊसज्वारीच्या हिरवाईनंतर येथे फारच रखरखाट जाणवतो.

यशोधरा's picture

2 Apr 2013 - 5:36 pm | यशोधरा

माहिती आवडली.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Apr 2013 - 6:08 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह वाह वाह्. छान. गुरुचरित्रातील एका छान परंतु अप्रसिद्ध ठीकाणाची सुंदर ओळख.

मूकवाचक's picture

4 Apr 2013 - 11:01 am | मूकवाचक

+१

स्पंदना's picture

6 Apr 2013 - 12:18 pm | स्पंदना

बेळगावातून निघुन अर्ध्या तासात वैजनाथला जातो आम्ही. जास्ती करुन उन्हाळ्यात जायच कारण गडावरच्या करवंदाच्या जाळ्या. हात पाय खरचटुन पोटभर करवंद खायची. एव्हढ महत्वाच ठिकाण असेल अस माहित नव्हत. ते म्हणतात ना घर की मुर्गी..... काही हरकत नाही पुढच्या वेळी पुण्यही जमा करुन येउ.