गाभा:
आज मराठी राजभाषा दिन. या दिवसाचे औचित्य साधून आपल्या मायमराठी बाबत काही चर्चा व्हावी म्हणून या धाग्याचा प्रयत्न
मराठी भाषा नामशेष होते आहे काय ही चर्चा नेहमीच सुरु असते पण आज जगात सर्वाधिक बोलल्या जाणा-या भाषांमध्ये मराठी एकोणिसावी आणि भारतात चौथी आहे सुमारे साडेसात कोटी लोक मराठी बोलतात. आजवर जरी मराठीच्या वाट्याला तीनच ज्ञानपिठ पुरस्कार वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर आणि विंदा करंदीकर यांच्या रुपाने मिळाले असले तरी ही संख्या निश्चितच मोठी असायला हवी होती असे वाटते
माय मराठीला मानाचा मुजरा
प्रतिक्रिया
27 Feb 2013 - 12:36 pm | पैसा
मराठी दिनाच्या निमित्ताने धागा लिहिल्याबद्दल धन्यवाद! मराठी लेखकांची परंपरा फार जुनी असली तरी ज्ञानपीठ पुरस्कार कमी आहेत ही गोष्ट खरी. परंतु ज्ञानपीठ फक्त लेखन या एकाच निकषावर दिले जाते असे वाटत नाही. उदा. कोंकणीचा भाषा म्हणून स्वीकार झाल्यानंतर एका तरी कोकणी लेखकाला ज्ञानपीठ द्यावे म्हणून रवींद्र केळेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला. त्यांची पुस्तके बघाल तर "कोंकणीच कित्याक" वगैरे अशा प्रकारची आहेत. त्याचवेळी मराठी आणि कोंकणी दोन्ही भाषांमधे भाषाप्रभू असलेल्या अशा बाकीबाब बोरकरांना मात्र नाही. तीन ज्ञानपीठ पुरस्कार ज्या मराठी दिग्गजांना मिळाले आहेत त्यांच्याबद्दल कोणतेच वाद व्हायचं कारण नाही.
प्रत्येकाने शक्य तेवढा मराठीचा वापर करावा मग मराठीची पीछेहाट का वगैरे प्रश्न उभेच रहाणार नाहीत.
27 Feb 2013 - 1:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठीच्या वाटेला तीनच ज्ञानपीठ आले ही भाषेची उणीव नसावी. मराठी भाषेतील लेखन भारतातील सर्व भाषेत अनुवादित होऊन पोहचले पाहिजे. मराठीतलं लेखन किती समर्थ आणि समृद्ध आहे त्याची ओळख सर्वांना झाली पाहिजे, अनुवाद प्रक्रियेत असं म्हटल्या जातं की लोकजीवनात रुढ झालेल्या म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, कोडी, बोलीतल्या शिव्या, हे अनुवाद करतांना त्याचा आशय नीटपणे वाचकांपर्यंत पोहचत नाही. उपमा, रुपकं, यांचे नीटपणे आकलन होत नाही. पशुपक्षी, प्राणी, भाज्या, लग्न-विधी, सण-उत्सव या विविध सांस्कृतिक गोष्टी अनुवादातून नीटपणे येत नाही, अशी खंत अनेक साहित्यभ्यासकांनी अनुवादाच्या निमित्ताने बोलून दाखवलेली आहे. बलुतेदारांच्या व्यवसायाच्या निमित्ताने आलेले शब्दांचा संग्रह वाढवावा, बोलींवर संशोधन व्हावे, अभ्यास व्हावा. भाषिक व्यवहारात भाषेते नवनवीन शब्द यावेत, विज्ञान आणि इतर शाखेतील अभ्यासक्रम मराठी भाषेतून शालेय, पदवी, पदव्युत्तर स्तरावर राबविण्यात यावा. सर्वच व्यवहार मराठी भाषेतून व्हावे यासाठी आग्रह धरावा. इतर भाषा आणि संस्कृतीची देवाण-घेवाण झाली तर मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होईल त्याचा परिणाम लेखनावर होईल आणि मला वाटते ज्ञानपीठ पुरस्कारांची संख्याही वाढेल.
-दिलीप बिरुटे
27 Feb 2013 - 1:45 pm | लाल टोपी
सर, आपल्याशी सहमत आहेच परंतु इतर भाषांना मिळालेले पुरस्कार पहा: हिंदी-९, कन्न्ड-८, बंगाली-५, उर्दू- ४ वेळा इतर भाषांना अगदीच कमी संख्या आहे; त्यामुळेच वर ज्योती ताई म्हणतात त्याप्रमाणे लेखना शिवायही इतर निकष लावले जात असावेत अशी शंका घ्यायला नक्कीच वाव आहे.
27 Feb 2013 - 1:11 pm | तर्री
पुल आणि जी.ए. ह्यांना ज्ञानपीठ मिळायला हव होते.
27 Feb 2013 - 1:34 pm | राही
तेंडुलकरांना हा पुरस्कार मिळायला हवा होता ही खंत गिरीश कर्नाडांसारख्या पुरस्कारविजेत्यानेही जाहीर बोलून दाखवली होती.
बाकी कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळावे यासाठी साहित्यरसिकांना दिल्लीत कसे लॉबीइंग करावे लागले होते याविषयी श्री.दत्तप्रसाद दाबोलकर यांचा एक सुरेख लेख वाचल्याचे आठवते. कुसुमाग्रजांसारख्या दिग्गजाला जे आपणहून मिळायला हवे होते,त्यासाठी वाङ्मयप्रेमींना इतका खटाटोप करावा लागला हे वाचून वाईट वाटले होते.
27 Feb 2013 - 2:17 pm | बॅटमॅन
मराठीला तीनच ज्ञानपीठ आहेत हे साहित्याचे निर्देशक नसून लॉबीइंग उणी पडल्याचे निर्देशक आहे. अन्य भाषांतील साहित्य काही आभाळातून पडलेले नाही. पण जे आपापल्या भाषेत उत्तम लिहिणारे लेखक आहेत त्यांच्यासाठी सतत लॉबीइंग करण्याबाबत दाक्षिणात्य राज्यांचा आदर्श खरंच घेण्यासारखा आहे.
27 Feb 2013 - 2:20 pm | लाल टोपी
फक्त कन्नड-९ वेळा बाकी ते ही नगण्यच आहेत
27 Feb 2013 - 2:40 pm | बॅटमॅन
हर्कत नै. जे चांगले अस्तीन त्यांचा आदर्श घ्या! कन्नड असो नैतर बांगला. लॉबीइंगमध्ये महाराष्ट्र उणा पडतो ही खरीच गोष्ट आहे.
27 Feb 2013 - 2:22 pm | तर्री
अन्य भाषांतील साहित्य काही आभाळातून पडलेले नाही.
"साहित्य" म्हणजे कादंबरी नव्हे तरीही मराठीच्या तूलनेत कन्नड , बांगला कादंबरी अधिक उजवी आहे.
27 Feb 2013 - 2:38 pm | वेल्लाभट
अभिमान तर आहेच. पण जी सद्यस्थिती आहे मराठी भाषेची, त्याबद्दल खेद, राग आणि निराशा आहे. `शिक्षनात' मराठीची वाट आहे. त्यामुळे लोकांची मराठी शाळांप्रती निरास्था आहे. मग मुलांचा स्टडी, आणि त्यांचं एज्युकेशन, इंग्रजीतून झालं, की `फ्यूचर' मधे आनंदच आहे. हे दुष्टचक्र आहे.
काय मराठी बोलतात लोकं ! कानाला टोचतं नुसतं. असो. हा विषय वेगळा आहे.
मराठी भाषेला मानाचा मुजरा !