पाकिस्तानची निर्मिती ही धर्माधिष्ठित असली तरी प्रत्यक्षात त्या भागात एकाच प्रकारची संस्कृती नव्हती. किंबहुना भारताइतकेच प्रांताप्रांतात असणारे चालीरीतीतील बदलच नव्हे तर भाषा, आचार, विचार याबाबत संपूर्ण पाकिस्तानात वेगवेगळे मतप्रवाह, जनसमुदाय होते - आहेत. भारताला जसे एका घटनेने (संविधानाने या अर्थी) बांधले आहे तसे पाकिस्तानचा 'बायंडिंग फॅक्टर' हा धर्म वाटला, असला तरी त्यांहून मुख्य फॅक्टर होता 'भिती'. मुळात पाकिस्तानचा जन्म, त्याला दोन्ही बाजूंच्या उजव्या संघटनांनी सत्याचा विपर्यास करून दिलेले रंग, नेहरू-शास्त्रींचे मुस्लिम धोरण, इंदिरा गांधी आणि त्यापुढील काँग्रेसचे बदललेले मुस्लिम धोरण वगैरे गोष्टींवरही यात विचार झाला पाहिजे परंतु अवांतराच्या भयाने केवळ गोष्टींचा उल्लेख करून पुढे जात आहे. कारण आताच्या लेखनाचा विषय आहे, पाकिस्तानातील सद्यस्थिती आणि त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद. सध्या पाकिस्तान एका वेगळ्याच परिस्थितीत आहे. एकाच वेळी तिथे तीन महत्त्वाचे लढे चालू आहेत आणि ते परस्परपूरक नाहीत. हे तीनही लढे स्वतंत्ररीत्या इतक्या ताकदीचे आहेत की एकेका प्रश्नावर मोठी उलथापालथ व्हावी मात्र एकाच वेळी तिन्ही आघाड्या उघडलेल्या असल्याने कोणत्याच पक्षाला प्रत्यक्षात अपेक्षित फायदा होताना दिसत नाहीये.
पहिली आघाडी आहे, तालीबान विरोधक विरुद्ध तालिबानी + तालीबान समर्थकांची. अफगाणिस्तानला लागून असलेला हा भाग अतिशय कडवा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात एक सरहद्द-गांधींच्या प्रभावकाळाचा अपवाद वगळला तर या भागात मुस्लिम लीग सकट कोणताही 'अधिकृत' राजकीय पक्ष सत्ता 'गाजवू' शकलेला नाही. तिथे निवडणुका होतात, सरकार निवडले जाते मात्र प्रत्यक्षात अधिकार धार्मिक नेते आणि तालीबानकडेच आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानात हल्ला केल्यानंतर या भागात अमेरिकेने आघाडी उघडली आहे. इथे पाकिस्तानला कोणतीही भूमिका थेट घेणे टाळण्याची कसरत करावी लागत आहेच, आणि प्रत्यक्षात अमेरिकेला पाठिंबा देऊन आपले सैनिक मरत असतानाच, लोकांचा रोषही ओढवला जात आहे.
दुसरा संघर्ष आहे पाकिस्तानातील सत्ताकेंद्रांमधील अंतर्गत संघर्ष. हा संघर्षही पाकिस्तान इतकाच जुना आहे. मात्र एरवी राजकीय पक्ष आणि लष्कर अशी पात्रे असणाऱ्या या संघर्षात आता अजून एक पात्र सामील झाले आहे - सर्वोच्च न्यायालय. या तीन सत्ताकेंद्रांपैकी ज्या सत्ताकेंद्राचा प्रभाव वाढेल त्यानूसार पाकिस्तानच्या धोरणात बदल होताना दिसतील.
तिसरा आणि सगळ्यात प्रभावी संघर्ष आहे, जनता विरुद्ध सरकार यांत. अनेक देशांप्रमाणे सध्याचे विराजमान सरकार आपल्या भल्याचे काही करू शकेल यावर जनतेचा विश्वास उडालेला आहेच पण अधिक धोका असा की सध्याच्या उपलब्ध इतर संघटनांपैकी दुसरे कोण? या प्रश्नाचेही उत्तर जनतेत असेल असे दिसत नाही. त्यातच गेल्या काही दिवसांत परदेशस्थ पाकिस्तानी काद्री यांचा उदय झाला आहे. त्यांनी सरकार बरखास्त करण्याची मागणी केली असून त्यासाठी सरकारला दिलेली मुदत आज, १५ जानेवारी सकाळी ११वाजेपर्यंत दिलेली वेळ संपली आहे आणि लवकरच पार्लमेंटवर प्रचंड मोठा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा इजिप्तच्या ताहरीर चौकाप्रमाणे एक मोठे आंदोलन असेल असे काद्रि यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे बलुचिस्तानातील शिया नागरिकांनी नव्याने संघर्ष सुरू केला आहे आणि आजच तिथे राज्यपालांची राजवट लागू करावी लागली आहे. (या आंदोलनाची दखल इतक्या लगेच आणि अश्या प्रकारे घेतल्याने नव्या इराण-पाकिस्तान समीकरणाची तत्कालिक फलनिष्पत्ती असा रंग देता येईल का याचाही विचार झाला पाहिजे. ते असो. )
आता चर्चेचे प्रश्नः
-- काद्री यांचे आंदोलन यशस्वी होऊन पाकिस्तान (बहुदा पहिल्यांदाच) लष्कराव्यतिरिक्त एखादे आंदोलन किंवा मग न्यायालय सरकारला पदच्युत करू शकेल असे वाटते काय?
-- काद्रि यांना मिळणारा पाठिंबाच नव्हे तर एकूणच अराजकता भारतासाठी फायद्याची ठरेल का तोट्याची असे वाटते?
-- सध्याच्या परिस्थितीत जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न म्हणून सध्या चाललेल्या भारत-पाक चकमकींकडे बघणे संयुक्तिक ठरावे का?
-- सध्याचा पाकिस्तान हा राजकीय तुलनेने कमकुवत वाटतो आहे का? आणि अमेरिकेप्रमाणेच चीन, इराण, अफगाणिस्तान आणि भारत या कमकुवतपणाचा फायदा घेत आहेत असे म्हणता येईल का?
-- यापुढे पाकिस्तानात कोणत्या राजकीय उलाढाली होतील असा अंदाज तुम्ही कराल?
काही रोचक दुवे:
बलुचिस्तानातील गव्हर्नर्स रुलची बातमी
काद्रींचे आव्हानः द हिंदू मधील लेख, डॉनमधील ताजी बातमी,
पाकिस्तानातील अंतर्गत शिया-सुन्नी चकमकींवर आधारीत एक लेख
=========
पुरवणी:
काल हा लेख लिहून झाल्यावर लगेच न्यायालयाने पंतप्रधानांना अटक करायचे आदेश दिले असल्याची बातमी आली. तेव्हा न्यायालयाचे एक नवे 'पॉवर सेंटर' म्हणून उदयास येणे हा दुसर्या संघर्षाच्या चिकित्सेतील निष्कर्ष योग्य वाटतो आहे.
प्रतिक्रिया
16 Jan 2013 - 9:58 am | शैलेंद्रसिंह
भारत-पाक सीमेवरील चकमकी वाढवुन...कदाचित भारताशी कारगिलसदृश छोटेखानी युद्ध करुन जनतेचे लक्ष वळवायचा...तसेच भारतद्वेषावर आधारित असलेल्या राष्ट्राला पुन्हा एक करायचा प्रयत्न व्हायची शक्यता आहे. भारताने म्हणुनच हि परिस्थिती खुप सामंजस्याने हाताळायची गरज आहे. कारण भारताने आक्रमक पवित्रा घेणे हा पाकिस्तानच्या व्युहनितीचाच विजय असेल.
पाकिस्तानात जर मौलवींचे सरकार आलं तर ते भारताला अधिकच त्रासदायक ठरु शकतं, पण पाकिस्तानच्या दृष्टीकोनातुन पाहिल्यास त्यामुळे तिथे स्थिरता येऊ शकते. पाकिस्तान हे एक failed state समजलं जातं. तिथे सत्तांतरण घटनात्मक मार्गाने होईलच असं नाही. पाकिस्तानी लष्कराची भुमिका त्यामुळे महत्वाची ठरते. "कुरानिक कंसेप्ट ऑफ़ वॉर" च्या आधारावर पाकिस्तानी लष्कर हे गेल्या ३० वर्षात नव्याने बांधणी केले गेले आहे. धार्मिक नेत्यांच्या सरकारला लष्कराची सहानुभुतीच मिळेल. आजच्यासारख्या लष्कर-सरकार ह्या कुरबुरी राहणार नाहीत. त्यांच्यातील सुसुत्रतेतुन ते बलुचिस्तानातील फ़ुटीरतावाद्यांना काबुमधे आणु शकतील.
नॉर्थवेस्ट फ़्रंटीयर रिजन मधल्या टोळ्यांवरील अमेरीकेच्या हल्ल्यांबाबत मात्र ही मंडळी आज भरपुर बोलत आहेत, पण जर त्यांना सत्ता मिळाली तर ते नक्की अमेरिकेला कसे परावृत्त करतील हे बघावं लागेल.
17 Jan 2013 - 12:34 am | आदूबाळ
अगदी सहमत!
16 Jan 2013 - 12:12 pm | ऋषिकेश
वाचाळ अग्रलेख आणि भावनेच्या भरात येत असलेल्या प्रतिक्रीयांच्या गदारोळातही शांतपणे विचारपूर्वक लिहिलेला द हिंदु चा सम्यक अग्रलेख वाचनीय आहे
16 Jan 2013 - 1:30 pm | श्रीगुरुजी
पाकिस्तानात अराजकाची परिस्थिती यापूर्वी अनेकवेळा निर्माण झाली आहे. यावेळीही पूर्वीपेक्षा काही वेगळे होईल असे वाटत नाही. मार्च २०१३ मध्ये निवडणुका आहेत. त्या पार पडून नवीन सरकार येईल असे वाटते. सद्यपरिस्थितीत एखादा लष्करी अधिकारी बंड करून सत्ता हातात घेईल असे वाटत नाही. इम्रानखानचा पक्ष मागील निवडणुकीपेक्षा यावेळी तुलनेने बरी कामगिरी करेल असे वाटते.
एखादा हुकूमशहा आला किंवा निवडणुकीत सध्याचेच पक्ष पुन्हा सत्तेवर आले किंवा एखादा नवीन पक्ष सत्तेवर आला तरी पाकिस्तानच्या भारतद्वेषी धोरणात सुतरामही बदल होणार नाही आणि भारताच्या पाकिस्तानप्रेमी धोरणातही अजिबात बदल होणार नाही.
पाकिस्तानात कोणीही सत्तेवर आले तरी भारताशी शत्रुत्व सुरूच राहील, भारतात अतिरेक्यांना पाठविणे व अतिरेकी कारवाया करणे सुरूच राहील, भारतीय सैनिकांचे शिरच्छेद सुरूच राहतील आणि त्याचवेळी भारत कोणताही कणखर प्रतिकार न करता निषेध खलिते पाठवत राहील व आपला शांततेचा मंत्रघोष सुरूच राहील. क्रीडा, कला यात राजकारण आणू नये असे भारतीय नागरिकांना डोस पाजत पाकिस्तानी खेळाडूंना, कलाकारांना पायघड्या घालणे सुरूच राहील.
एकूण काय पाकिस्तानमध्ये काहीही झाले तरी दोन्ही देशांकरता "बिझनेस अॅज यूज्वल" सुरूच राहील. त्यामुळे काळजी नसावी.
16 Jan 2013 - 5:36 pm | ऋषिकेश
अजून एक रोचक दुवा. हे जे लाँग मार्च काधणारे काद्री आहेत ते गुजरातचे सरकारी पाहुणे होते आणि त्यांनी मुसलमान जनतेला गुजरात दंगलींना मागे सारून पुढे जाण्यास सांगितले होते.
त्यांचा भारतीय उलेमा आणि बहुतांश मुस्लिम संघटनांनी निषेध केला होता.
ही बातमी आणि त्याखालचे प्रतिसाद वाचनीय आहेत ;)
आता बोला
17 Jan 2013 - 12:40 am | आदूबाळ
पाकिस्तानात सर्वोच्च न्यायालय इतकं प्रबळ का होत आहे हे एक कोडंच आहे. म्हणजे न्यायमूर्तींना सत्तेची हाव असणं वगैरे ठीक आहे, पण राजकीय पक्ष आणि लश्कराच्या तुलनेत त्यांचं बळ (वाचा: भाईगिरी करण्याची क्षमता) कमीच असणार ना? म्हणून असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाच्या पाठीमागे कोणा आंतरराष्ट्रीय हत्तीचं पाठबळ तर नाही ना!
17 Jan 2013 - 9:42 am | ऋषिकेश
सर्वोच्च न्यायालयाचे माहित नाहि पण सद्य स्थिती बघता कादरी हे परकीय प्यादे आहेत असा अंदाज करणे सुरक्षित असावे. हे प्यादे कोणी पुढे केले आहे ते सांगणे मात्र कठिण आहे.
17 Jan 2013 - 9:46 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
पाकिस्तान मधे लश्कराची सत्ता आली तर भारताच्या द्रुश्टीनी चांगल घडेल. कमीत कमी उघड पणे तरी वैर घेतील. एक्दाच काय तो निकाल लागेल. :)
17 Jan 2013 - 10:02 am | ऋषिकेश
माझ्या अंदाजाने असे होणार नाही. पाकिस्तानमध्ये सैन्याने हा प्रयोग आधीच तीनदा केला आहे. आता ते काहितरी वेगळं ट्राय करतीलसे दिसते. ज्या अर्थी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्वराज, जेटली यांना भेटल्यावर विरोधकांनीही टोकाची भुमिका घ्यायचे टाळले आहे त्या अर्थी पाकिस्तानात काहितरी मोठे शिजतेय असे दिसते. भारतातर्फे काही खेळी असतील तर त्या कधीही बाहेर येणार नाहीत (येऊ नयेत).
या घटनेनंतर कालांतरानी (काहि वर्षांनी) अधिक माहिती समोर आल्यावर आपल्याला सत्य काय होते त्याचा अंदाजकरता यावा.
17 Jan 2013 - 4:23 pm | ५० फक्त
भारतातर्फे काही खेळी असतील तर त्या कधीही बाहेर येणार नाहीत (येऊ नयेत). +१०० आणि आपल्या अर्धवट मिडियावाल्यांनी आम्हाला फार कळालं समजलं असल्या बातम्या देत राहु नये.
17 Jan 2013 - 10:39 am | रमेश आठवले
पाकिस्तानला सध्या, निदान आर्थिक बाबतीत तरी, फेल्ड स्टेट, म्हणतात . पाकिस्तानचे आर्थिक आणि पर्यायाने सामाजिक व राजकीय निर्णय हे यामुळे त्यांना अत्यावशक असलेले आर्थिक सहाय्य करणारे देश म्हणजे मुख्यत्वे अमेरिका व काही प्रमाणात काही युरोपमधील देश आणि जपान यांच्या मतांवर अवलंबून राहील. त्यांच्या अनुमती शिवाय कोणत्याही पक्षाचे आणि प्रकाराचे सरकार तेथे येण्याचा संभव नाही.
17 Jan 2013 - 10:50 am | ऋषिकेश
आर्थिकच काय अनेक बाबतीत सहमत आहे.
सद्यस्थितीत या देशांपेक्षा चीन बरीच मोठि भुमिका गाजवेल. त्याच बरोबर अमेरिकेचा भरवसा नसल्याने तेलाच्या अखंड पुरवठ्यासाठी इराणचे मत लक्षात घेणे (मान्यता गरजेची नसली तरी) आवश्यक आहे.
अमेरिका आदी देश भारताचा पर्याय मिळु लागल्याने, आणि आर्थिक फायदा नसल्याने पाकिस्तानमधुन काही प्रमाणात अंग काढून घेतीलसे वाटते.
17 Jan 2013 - 11:47 am | मदनबाण
सद्यस्थितीत या देशांपेक्षा चीन बरीच मोठि भुमिका गाजवेल. त्याच बरोबर अमेरिकेचा भरवसा नसल्याने तेलाच्या अखंड पुरवठ्यासाठी इराणचे मत लक्षात घेणे (मान्यता गरजेची नसली तरी) आवश्यक आहे.
अमेरिका आदी देश भारताचा पर्याय मिळु लागल्याने, आणि आर्थिक फायदा नसल्याने पाकिस्तानमधुन काही प्रमाणात अंग काढून घेतीलसे वाटते.
अमेरिकेला अजुन पाकड्यांची गरज आहे,त्यामुळे त्यांच्या मदतीचा ओघ काही थांबणार नाही !
संदर्भ :-
Pentagon to Reimburse Pakistan $688 Million
Backed by John Kerry, US aid to Pakistan flows again
जाता जाता :-
USAID program

17 Jan 2013 - 12:31 pm | ऋषिकेश
२०१० आणि आज यामध्ये बरेच पाणी वाहून गेले आहे. याशिवाय सध्या दिली जाणारी मदत ही पाकिस्तानमध्ये अमेरिकन सैनिकांना लक्षात घेऊन आहे. २०१४ मध्ये अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यावर पाकिस्तानची गरज अधिकच कमी होईल.
दुसरे असे की ही मदत पाकिस्तानच्या 'गरजे'पोटी नसून अण्वस्त्रसज्ज पाकिस्तानला मदत दिली नाहि तर काय या भितीतीन आहे. आणि या अधिकृत साईटवर बघितले तर बरिचशी मदत ही सामाजिक कार्यांसाठी दिसते. लष्करी मदत ही पाकिस्तानी सैन्याला न होता पाकिस्तानी-अमेरिकन एकत्रित सैन्याला होते आहे आणि भारताने बरर्याच आधी उठवलेल्या आवाजामुळे ही मदत आतंकवाद्यांपर्यंत व भारताविरूद्ध कारवायांसाठी पोहोचवता येणार नाही अशी सोय अमेरिकेने केली आहे. (आपल्याकडे कमी घालेल्या घुसखोरीमागे असणार्या अनेक कारणआंपैकी हे कारणही आहेच).
आता अमेरिका दिलेल्या मदतीचे नुसते ऑडिट करत नाहितर त्याचे निष्कर्ष जाहिरही करते आहे.
बाकी पाकिस्तानला मदत का करावी लागते आहे यासंबंधी जॉन केरी यांची ही मुलाखत वाचनीय आहे.
केरी यांच्या पुढाकाराने सादर झालेल्या बिलाचा जो दुवा वर दिला आहे त्यासंबंधीची अधिकृत माहिती इथे मिळेल. गैरमार्गासाठी हे पैसे वापरले जाऊ नयेत यासाठीचे उपाय तिथे वाचता येतील. त्यावतिरिक्त अमेरिकन मिडीयाचेही या मदतीवर बारीक लक्ष आहे
17 Jan 2013 - 3:23 pm | मदनबाण
२०१० आणि आज यामध्ये बरेच पाणी वाहून गेले आहे.
हो का ? किती क्युसेक पाणी वाहुन गेल बरं ?आपल्याला त्याची फळ काय मिळाली ?
दुसरे असे की ही मदत पाकिस्तानच्या 'गरजे'पोटी नसून अण्वस्त्रसज्ज पाकिस्तानला मदत दिली नाहि तर काय या भितीतीन आहे.
अरे बापरे ! पाकिस्तानात घुसुन लादेनला पैंगबरवासी बनवणार्या अमेरिकेला अणवस्त्रसज्ज पाकिस्तानची भिती वाटते ? काय राव जरा वेगळा विनोद सांगा की ! ;)
लष्करी मदत ही पाकिस्तानी सैन्याला न होता पाकिस्तानी-अमेरिकन एकत्रित सैन्याला होते आहे आणि भारताने बरर्याच आधी उठवलेल्या आवाजामुळे ही मदत आतंकवाद्यांपर्यंत व भारताविरूद्ध कारवायांसाठी पोहोचवता येणार नाही अशी सोय अमेरिकेने केली आहे.
हॅहॅहॅ...च्यामारी इतके वर्ष पाकडे अमेरिकेचे पैसे आणि शस्त्रास्त्रे भारताच्या विरोध वापरतोय हे जग जाहीर आहे.आता त्यांच्या या वर्तनात बदल होईल हा पोकळ आशावाद कसा करता येईल ? (ओबामा यांनी देखील त्यांच्या मुलाखतीत हे मान्य केले होते की पाकिस्तान त्यांच्या मदतीचा उपयोग हिंदुस्थानच्या विरोधात युद्धात वापरतो.)बरं पाकिस्तानचा सज्जनपणा इतका आहे की त्यांच्या आयएसआय मार्फत मिलियन डॉलर्स अमेरिकेत लॉबिंगसाठी दिले.बाकी कोण कोणाला कुठल्या कारणासाठी मदत करत आहे ते येणार्या काळात कळेलच... तुर्तास त्या मदतीचा आपल्या विरोधात वापर होणार नाही ही भाबडी आशा मला फोल वाटते.
जाता जाता :---
सापाला कितीही दूध पाजले तरी तो अमॄत देणार नाही,तो गरळच ओकणार !
काही संदर्भ :-
India again denounces U.S. military aid to Pakistan
Pakistan lobbied illegally, FBI says
17 Jan 2013 - 4:30 pm | ऋषिकेश
:)
अण्वस्त्रधारी पाकिस्तानला घाबरत नसून अण्वस्त्रधारी पाकिस्तानमध्ये अधिक अनागोंदि माजली तर ती शस्त्रे आतांकवाद्यांच्या हातात जातील अशी ती भिती आहे. (आधी दिलेल्या केरी यांच्या मुलाखतीत त्यांनी तसे म्हटलेही आहे)
बाकी, आधी पाकिस्तान हे पैसे भारतविरोधी कारवाईसाठी वापरत असे हे मान्यच आहे. (आणि ते सांगणारे २०११पूर्वीचे असे कित्येक पेपर्स उपलब्ध आहेतच) मात्र आता नव्या बिलान्वये दिल्या जाणार्या मदतीवर बराच ऑडिट चेक आहे म्हणून हा आशावाद! (नुकतेच आपल्या लषकरप्रमुखांनी हे वक्तव्य केले आहे की बदललेल्या परिस्थितीत भारतात आतंकवादी घुसवता येत नसल्याने आलेल्या फ्रस्ट्रेशनमधुन पाकिस्तान असे कृत्य करत आहे. २०११च्या आधी सरसरी ११० घटना नंतर ५२ वर आल्या. अशी काय परिस्थिती बदलली आहे? ती ही की या घुसखोरांना द्यायला पाकिस्तानकडे विपुल पैसे नाहित + भारताने आपली सीमा अधिक सुरक्षित केली आहे.)
हा आशावाद आहे हे बकुल. फक्त तो भाबडा आहे असे वाटत नाही. आपले सैन्य हा आशावाद फोल गेल्यास उद्भवणार्या युद्धासाठी तयार असेलच आणि तशा परिस्थितीत आपले संरक्षण करण्यास सक्षम असेल याचीही खात्री आहे (आणि त्याच जोरावर हा आशावाद बाळगणे परवडते आहे)
17 Jan 2013 - 2:58 pm | रमेश आठवले
आत्तापर्यंत कोणत्याही मुस्लिम प्रबल देशात communist सत्तेवर येऊ शकलेले नाहीत. चीन फक्त भारतावर लगाम म्हणून पाकिस्तानला मदत करतो आहे. आभाळ फाटल्यावर गवसणी घालता येईल एवढे सहाय्य चीन पाकिस्तानला करेल असे वाटत नाही.
अमेरिका ceto cento वगैरे करारांच्या नावाखाली पाकिस्तानला सुरवातीपासून मदत करत आला आहे. पूर्वी निमित्त रशिया विरोधाचे होते आणि आता आतंकवाद्यांचे आहे. म्हणून अफघाणिस्तान मधून निघून गेल्या नंतरही अमेरिकन मदतीचा ओघ चालूच राहील असे वाटते.
17 Jan 2013 - 3:15 pm | ऋषिकेश
सहमत आहे.
मात्र सध्या तरी चीन पाकिस्तानला जेवढे गोंजारतो आहे तितका कोणताच देश नाही. अमेरिका मदत करत असली तरी जनतेच्या मर्जीविरूद्ध किती दिवस ती तशी करू शकेल ही शंका आहेच. म्हणूनच पाकिस्तानच्या धोरणांवर 'ऑल वेदर फ्रेन्ड' असे म्हटला गेलेला चीन सोडल्यास इतरांचा प्रभाव तितका (चीनइतका) नसेल असे वाटते.
17 Jan 2013 - 3:31 pm | गणपा
युद्ध बरेचदा युरोप-आशिया या खंडातच का खेळवली जातात हे ज्या दिवशी या खंडातल्या देशांना कळेल तो सुदिन.
तिकडे चीन आणि जपान मध्येही तणाव वाढत आहे. आणि चीन वर वचक म्हणुन अमेरिकेने-जपानच्या मदतीने सराव चालू केला आहे.
17 Jan 2013 - 11:52 pm | अर्धवटराव
चिनी, जापानी, अरबी वगैरे भाषांमध्ये छान तिळगुळाच्या रेसीपी टाकल्या असत्या तर एव्हाना सगळेच गोड गोड बोलायला लागले असते ना :)
अर्धवटाराव
17 Jan 2013 - 7:05 pm | नाना चेंगट
काय ठरलं मग ? ;)
17 Jan 2013 - 8:41 pm | ऋषिकेश
ते आमाला काय विचारते कोणा घाटीला विचार ने! ;)