नोव्हेंबर-डिसेम्बर महिन्याचे दिवस होते. जर्मनीत थंडीने काकडून गेलो होतो. तापमान 0 डिग्री च्या आसपास आसवे. अगदी वैतागाल्यासारखे झालेले. त्यामुळे जवळपास जास्त खर्चिक नसलेला पण थोडे उबदार हवामान असलेल्या आणि कमीत कमी वेळेचा प्रवास असणाऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार मनात घोळत होता. आणि अचानक एक छान वीक एंड ऑफ सिझन ऑफर सापडली. स्पेन देशातील भूमध्य समुद्रात असणाऱ्या मालोर्का बेटावर ३ दिवस दोन वेळचे खाणे आणि विमान प्रवासासह एकूण किंमत प्रवासी १९० युरो. मग काय पटकन बुकिंग केले आणि सपत्निक निघालो. माझ्या गावापासून न्युर्नबर्ग विमानतळावर येवून पोहोचलो. न्युर्नबर्ग वरून ११ वाजताचे विमान घेवून दुपारी पाल्मा विमानतळावर उतरलो. मालोर्का बेटावर तसे बस-सेवा इतकी उपयुक्त नाही वाटली आणि त्यात ऑफ सिझन म्हणून तिथे सिस्क्ट (sixt) कार रेंटल वाल्यांकडून गाडी ३ दिवसांसाठी भाड्याने घ्यायचे ठरवले. गाडी घेऊन तडक पागुएरा (Paguera) गावातले हॉटेल बेव्हेर्ली प्लाया (Beverly Playa) गाठले. संध्याकाळी समुद्रकिनारी एक फेरफटका मारला आणि एक नितांत सुंदर सूर्यास्त बघावयाला मिळाला.
सूर्यास्त
0 डिग्री तापमानातून एकदम १२ डिग्री मध्ये एकदम हायसे वाटले, त्यात समुद्र नेहमीपेक्षा थोडा खवळलेला आहे असे कळले. समुद्रकिनारी मनसोक्त फिरून रात्री शहरात फेर फटका मारायला निघालो. मालोरका बेटावर ऑफ-सिझन असल्याने बहुतेक दुकाने बंदच होती. तिथे एका दुकानात एक पंजाबी आणि सिंधी माणसांशी थोड्या वेळ गप्पा मारून मग रात्री हॉटेल मध्ये परतलो. हॉटेल मध्ये बुफ़्फ़ॆ पद्धत होती आणि नानाविविध प्रकारचे शाकाहारी आणि सी-फूड आईटमस ठेवलेले होते. जेवणावर यथेच्छ ताव मारला आणि निद्रिस्थ झालो.
दुसर्या दिवशी सकाळी न्याहारी करून दिवसभराचा प्लान तयार केला.आश्या हॉटेल मध्ये खाण्याची फारच छान सोय असते. न्याहारी आणि रात्रीच्या जेवणात नानाविविध पदार्थांची रेलचेल असते. आपण फक्त बुकिंग करतांना हे सर्व आपल्या ऑफर मध्ये अंतर्गत आहेत ना ह्याची खात्री करून घ्यावी. आज सकाळचे वातावरण ढगाळ होते. तापमान १० डिग्री ते १२ डिग्री असल्याने समुद्र किनार्यावर जाण्यात काही अर्थ नव्हता. त्यात गाडी दिमतीला असल्याने बेटाचे एकदम शेवटचे टोक काप दे फोर्मेंटोर (Cap de Formentor) बघायचे ठरवले. बेटाविषयी जास्त काही माहिती जमवली नव्हती. बेटाचा भूगोलही परिचित नव्हता. वाटले कि सरळ रस्ता असेल त्यामुळे तीन एक ठिकाणे बघून होतील. आणि रात्री मालोर्का ची मुख्य शहर पाल्मा हि बघायला जाता येईल. असा सर्व विचार करून गाडी हाणायला सुरवात केली. पोर्ट दे पोलेन्का (Port de Pollença) शहर ओलांडल्या नंतर मात्र डोंगर लागले. आणि मग शेवटपर्यंत नागमोडी रस्ते आणि हेअर पिन घाट. एका ठिकाणी रस्त्याच्या बाजुला पार्किंग दिसले. गाडी चालवून थकलो होतो आणि उत्सुकतेपोटी तिथे थांबलो. समोरचे दृश्य बघून एकदम आ वासून उभे राहिलो.
डोन्गर माथ्यावरून समुद्र
समोर अथांग पसरलेला भूमध्य समुद्र आणि बाजूला समुद्रातून उंच वर आलेले सुळके. तिथे थांबल्याचे चीज झाले असे वाटले. वारा अफाट वेगाने वहात होता. तिथे जो खडक होता त्या खडकावर वार्याने सुंदर कोरीव काम केले होते त्या पार्किंग प्लेस पासून ते शेवटच्या टोका पर्यंत खडकाला जसे काही रांजणखळग्याचे रूप प्राप्त झाले होते.
तुफान वार्यामुळे झिजलेला खडक
तिथून बाजूला वळून बघितले तर समोर जाणारा रस्ता नागमोडी वळणे घेत थेट खाली जातोय आणि पुन्हा दुसर्या बाजूने घाटावर चढत जातोय असे दिसले. मग लक्षात आले कि आता पुढचा रस्ता अजून जिकरीचा असणार, पण शेवट पर्यंत जायचे निश्चित असल्याने मागे हटायचे नाही असे ठरवले.
घाटातली वाट - वळणदार रस्ता
डोन्गराच्या माथ्यावरून
अगदी २० ते २५ किलोमीटर च्या वेगाने निघालो. पुढे चांगला रस्ता जाऊन खराब रस्ता लागला. थोड्यावेळ पुन्हा वाटले कि इथेच थांबावे कारण सोबत इतर गाड्याही दिसत नव्हत्या. तशीच गाडी पुढे चालवत राहिलो आणि पुन्हा चांगला रस्ता लागला. मग थोडा हुरुप आला आणि पुढच्या ३० मिनिटात आम्ही काप दे फोर्मेंटोर ला पोहोचलो. मालोर्काचा उत्तरेकडील शेवटच्या टोकावर...
काप दे फोर्मेंटोर -घाटातली वाट
हेअर्पिन घाट
इथे तू-नळी वर चित्रफीत बघू शकता - credits for youtube video: mallorcafotobox
काप दे फोर्मेंटोर
खाली खोल समुद्र आणि मागे डोंगर रांगा... तिथला अप्रतिम निसर्ग अथांग समुद्र खडकांचे सुळे मनात साठवले. दुपारच्या भोजनाचा कार्यक्रम तिथेच उरकला आणि थोडी विश्रांती घेतली. संध्याकाळ होण्याच्या आताच तो घाट मागे टाकायचे ठरवले. तिथून तडक घाट उतरत आणि मजल दरमजल करत पोर्टो क्रिस्तो (Porto Cristo) ला पोहोचलो. घड्याळात बहितलेतर दुपारचे ४ वाजलेले होते. सकाळीच हॉटेलमध्ये माहिती मिळवली होती कि तिथे एक नैसर्गिक गुहा आहे जी लवणस्तम्भांसाठी प्रसिद्ध आहे, कुएवास देस द्राख (Cuevas des Drach) असे तिचे नाव. साडेचारला शेवटचा प्रवेश होता. तो मिळवून ती गुहा बघितली. अतिशय म्हणजे अतिशय सुंदर असा अनुभव होता तो. ती गुहा समुद्राला समांतर असणाऱ्या खडकात होती. जिथे समुद्र सपाटी पेक्षा खोल जागाहोती तिथे समुद्राचे पाणी झिरपून निळ्या शार पाण्याची अनेक छोटी छोटी तळी त्या गुहेत तयार झाली होती. त्यातील एक तळे बर्यापैकी मोठे होते. त्या तळ्यात सर्वांना नावेने एक फेरी मारून पलीकडे नेण्यात आले. ते निळे पाणी आणि छतामधून खाली येणारे असंख्य निरनिराळ्या आकाराचे पिवळसर लवणस्तम्भ, त्यांचे पाण्यातील प्रतिबिंब..शब्द कमी पडतात ते सांगायला. तिथे फोटो काढायला मनाई होती. इच्छुकांनी गूगल फोटो सर्च नक्की करावा. जेव्हा मालोर्कात सिझन असतो तेव्हा तिथे नावेतून जातांना बाजूने दोन नावात कलाकार लोक गिटार वाजवून वातावरण निर्मिती करतात असे कळले. धन्य ते लोक ज्यांना ते अनुभवत आले.
Cuevas des Drach photo credit goes to http://www.cuevasdeldrach.com/design/images/show/show1.jpg
ती गुहा नजरेत साठवून आम्ही बाहेर आलो आणि आमचे पुढचे लक्ष्य काला मोण्ड्रागो (Cala Mondrago) गाठायला निघालो. इथे अनुभव कमी पडला.. कारण साडे पाच नंतर अंधार पडायला सुरुवात झाली होती. मग तो प्लान रद्द करून सरळ पाल्मा शहरात आलो..मार्केट मध्ये गाडी पार्क केली आणि कपड्याच्या दुकानात गेलो. झाले काय कि निघण्याच्या घाईत माझे कपडे घरीच राहिले होते. वेंधळेपणा दुसरे काय...खरेदी करून पुन्हा हॉटेल मध्ये आलो. रात्रीच्या जेवणाची वेळ कधीच संपली होती. मोठ्या मुश्किलीने एक चायनिस हॉटेल सापडले आणि जेवणाचा प्रश्न सुटला. दिवसभराचा प्रवास फक्त ३०० किलोमीटर आणि रात्री समाधानाची झोप.
दुसरा दिवसाचे स्वागत सुर्याकिरणाने झाले. नाश्ता करून हॉटेल चेक आउट करून दिवसभराचे प्लान्निंग केले. आता लक्ष्य होते ते सा कोलाब्रा (Sa Calobra) चा एक अतिशय नजर वेधक समुद्रकिनारा.. त्याचा फोटो बघितला आणि हॉटेलमध्ये त्याच्याविषयी माहिती करून घेतली. पुन्हा निघालो गाडी हाणीत..आज थोडे चक्कर आल्यासारखे वाटत होते..वाटले कि जर दूर जायचेय तर थोडी शक्ती हवी म्हणून एक-दोन केळी खाल्ली आणि पुढे निघालो. कालचा अनुभव पाठीशी होता..घाटाची मानसिक तयारी केली होती.. गाडीत इंधन टाकले आणि निश्चिंत होऊन पुढे निघालो. वाटेत सुरेख इमारती असलेली गावे लागत होती. आणि एकदाचा घाट सुरु झाला...
नैसर्गिक कमान
डोन्गरावरून समुद्राचे प्रथमदर्शन - सा कोलाब्रा
इथे तू-नळी वर चित्रफीत बघू शकता-credit for youtube video: Quentin Field-Boden
घाट
मध्ये अनेक सायकल स्वार भेटत होते. त्यांचा उत्साह बघून हुरूप वाढत होता..परिसर निसर्गसंपन्न होता. कालपेक्षा आजचा घाट जरा कठीणच होता. मजल दरमजल करत डोंगराच्या माथ्यावर आलो. थकवा जाणवत होता. समोर डोंगरातून समुद्राचे दर्शन झाले. थोडे पाणी पिउन पुन्हा पुढे डोंगर उतरत, चढत आणि पुन्हा उतरत असे निघालो आणि सा कोलाब्रा ला पोहोचलो. मनसोक्त फोटो काढले. समुद्राच्या पाण्याचा निळा रंग शब्दापालीकडचा होता. कितीही प्रयत्न केला तरी फोटोत नाही उतरला.
समुद्राच्या पाण्याचा रंग अप्रतिम - सा कोलाब्रा
तिथे आम्ही थोडे गंडलोच. आम्हाला वाटले कि हेच ते ठिकाण ज्याचे फोटो आम्ही पहिले होते. नंतर थोड्या वेळाने सहजच बाजूला फेरफटका मारायला गेलो तो एक रस्ता दिसला. तसेच पुढे गेलो आणि वाटले कि पुढे काहीतरी intersting असावे. पुढे एक बोगदा लागला आणि तो ओलांडल्यावर मात्र पुन्हा डोळे दिपून गेले.
खडकातून आरपार खोदलेला मार्ग
खडकातून बोगदा
बोगद्यातून बाहेर आल्यावर...
तीनही बाजूला उंचच उंच डोंगर मध्ये मोठी वाळू पसरलेली आणि समोरच्या बाजूला दोन उंच कड्यांच्या मध्ये फेसाळलेला समुद्र. हेच होते ते टोरण्ट दे पारेइस (Torrent de Pareis)... फोटोत बघितलेले...स्वतःला भाग्यवान समजून तिथली ती शांतता आणि त्यात होणारा लाटांचा आवाज कानात साठवला. पर्वतातून येणारा एक झरा/ओढा समुद्राला अगदी एका कोपर्यात येउन मिळत होता..तो गोड्या आणि खार्या पाण्याचा संगम पण मस्तच. जास्त फोटो काढता आले नाहीत कारण कॅमेरा ची बेटरी संपली...
टोरण्ट दे पारेइस-उन पडल्यावर काय मस्त दिसत असेल ना
दोन उंच पर्वतांमध्ये वसलेला समुद्र- टोरण्ट दे पारेइस
>इथे तू-नळी वर चित्रफीत बघू शकता-credits for youtube video: viajesylugares
टोरण्ट दे पारेइस
आता वातावरण ढगाळ झाले होते. उन नसल्यामुळे थंडी ही वाजत होती आणि जेवण राहिले होते त्यामुळे नाईलाजानेच परत निघालो. तिथे एका हॉटेलात डाळ-ब्रेड खायला मिळाली. सुरेख झाली होती डाळ. जेवणानंतर मग सरळ घाट उतरून संद्याकाळ होयीस्तोवर डायरेक्ट विमानतळावर आलो. गाडी परत देऊन रात्रीच्या विमानाने न्युर्नबर्ग ला माघारी आलो जिथे उणे दोन डिग्री तापमान आणि चिक्कार बर्फ आमची वाट बघत होता. पुन्हा त्या बर्फातून वाट काढत विमानतळावरून रात्री २ वाजता घरी पोहोचलो आणि गुडुप्प झोपलो. सकाळी ऑफिस होते ना...
प्रतिक्रिया
2 Jan 2013 - 5:28 am | कौशी
आणि फोटो तर अप्रतिमच..
2 Jan 2013 - 5:29 am | कौशी
आणि फोटो तर अप्रतिमच..
2 Jan 2013 - 7:52 am | स्पंदना
मश्त!!
2 Jan 2013 - 8:04 am | रेवती
सुरेख फोटू. नीळ्या रंगाची कमाल आहे.
चांगल्या हवेतून पुन्हा आपल्या गारठ्यात येण्याचे वर्णन ज्यांना लागू पडते त्यांनाच ते खरे समजेल.
लेखनही आवडले. लवणस्तंभाच्या गुहेतला फोटू मस्त आलाय. एरवी मी विश्वास ठेवला नसता पण मागल्यावर्षी अशीच गुहा (इतकी सुंदर नव्हती) पाहण्यात आली.
एक विचारायचे आहे. निसर्ग कमान आणि बोगद्यातून असलेला रस्ता हा एकेरी वाहतुकीचा आहे ना? बोगद्याच्या भिंतीलगत दिसतायत ते दिवे आहेत ना?
2 Jan 2013 - 5:58 pm | केदार-मिसळपाव
लावणास्थाम्भाच्या गुहा तिथे बर्याच आहेत. आम्हाला वेळेअभावी हि एकाच बघत आली. आणि तेथील लोकांकडून कळले कि हि बरीच प्रसिद्ध आहे म्हणून. ह्या गुहेचे वैशिष्ट म्हणजे पाणी झिरपून तयार झालेले तलाव आणि त्यातून नौकायान.
नैसर्गिक कमानीचा रस्ता दुतर्फी आहे आणि कमालीचा अरुंद आहे. कमानीत मात्र एका वेळेला एका दिशेतूनच वाहतुकीला प्राधान्य आहे. समोरून येणाऱ्या वाहनांना मात्र रस्ता मोकळा असेल तरच कमानीतून जाता येते.
बोगद्याच फोटोतील रस्ता हा पादचार्यांसाठी आहे. त्या परिसरात वाहतुकीस परवानगी नाही. बोगद्यात तीन ठिकाणी प्रकाशासाठी खिडक्या आहेत तरीही जमिनीवर दिवे लावले आहेत जेणेकरून त्या मार्गात पुरेसा प्रकाश असेल.
2 Jan 2013 - 6:14 pm | रेवती
आभार.
2 Jan 2013 - 8:13 am | आनन्दिता
वा... काय सुरेख रस्ता आहे... अशा देखण्या रस्त्यावरचा प्रवासही देखणाच असणार यात शंका नाही...!!
2 Jan 2013 - 6:02 pm | केदार-मिसळपाव
प्रवास खरच पैसा वसूल आहे. पण गाडीचालाकाला अतिशय काळजीपूर्वक गाडी चालवावी लागते. उन्हाळ्यात डोळ्याचे पारणे फिटेल इतके सुंदर असेल. अनुभव घेण्यासाठी तू-नळी वरील चीत्राफिल नक्की पहावी.
2 Jan 2013 - 8:43 am | किसन शिंदे
सगळेच फोटू ब्येष्ट आहेत.तुम्हाला फोटोत निळा रंग उतरवता आला नसला तरी जो फोटो टाकलाय त्यातही पाण्याचा निळा रंग तुफान भारी दिसतोय.
2 Jan 2013 - 6:10 pm | केदार-मिसळपाव
तो पाण्याचा रंग उन्हाच्या तीव्रतेमुळे सतत बदलत होता. उन सावलीच्या अदलाबदलीत त्याचा अनुभव अविस्मरणीय असा होता.
आणि विशेष म्हणजे त्या परिसरात वेगाने वारे वहात असल्याने समुद्राच्या मोठ्या लाटा वेगाने उसळत होत्या. तोही अनुभव मस्तच होता. समुद्र शांत असला कि तिथे मस्त बोटीत बसून शांत समुद्राचा आनंद उपभोगता येतो.
2 Jan 2013 - 9:46 am | अत्रुप्त आत्मा
लेखन फोटू दोन्ही प्रचंड अवडल्या गेले आहे.... घाट बघून अत्यंत बेचैन झालाय जीव.. कधी कधी मी जाऊ तिथे..अशी अवस्था झालीये..
2 Jan 2013 - 6:04 pm | केदार-मिसळपाव
आणी उन्हाळ्यात जा
2 Jan 2013 - 8:53 pm | केदार-मिसळपाव
मी ज्या चित्रफितीची तू-नळी वरची टिचकी दिली आहे "घाट" नावाने ती नक्की बघा..ती चित्रफित सायकल वरून चित्रित केली आहे आणि सायकल चा वेगाकडेही लक्ष द्या... कसला अनुभव असेल तो सायकल वर घाट चढायचा आणि उतरायचा...
2 Jan 2013 - 10:11 am | ह भ प
मानलं बुवा तुम्हाला.. एकदम सहीच..
2 Jan 2013 - 10:13 am | संजय क्षीरसागर
आणि अप्रतिम फोटो. मनःपूर्वक धन्यवाद!
2 Jan 2013 - 10:36 am | तर्री
एक नंबर वर्णन आणि फटू !
2 Jan 2013 - 10:49 am | स्पा
फोटू पाहून वारल्या एलो आहे.
- धन्यवाद्
2 Jan 2013 - 11:07 am | प्रचेतस
अतिशय सुंदर फोटो.
2 Jan 2013 - 12:15 pm | सस्नेह
फोटो व वर्णन आवडले.
2 Jan 2013 - 1:16 pm | गणपा
डोळ्यांचं पारणं फिटावं असं निसर्ग सौंदर्य.
2 Jan 2013 - 3:11 pm | पिंगू
झक्कास. मस्त निसर्गाचा आस्वाद घेतलाय तुम्ही..
- पिंगू
2 Jan 2013 - 3:44 pm | स्मिता.
निळाशार समुद्र कायमच मनाला मोहून टाकतो. तश्याच निळ्याशार आणि मोहक भूमध्य समुद्राचे फोटो खूप आवडले.
2 Jan 2013 - 4:07 pm | इष्टुर फाकडा
सुरेख वर्णन. मायोर्का आणि गोव्याची तुलना नकळत झाली. गोवा जिंकला हेवेसांनल ;)
2 Jan 2013 - 4:19 pm | गवि
तेरेखोल / रेड्डीच्या खाडीपासून विजयदुर्ग आणि पुढे भंडारपुळे-गणपतीपुळेच्या पट्ट्यात समुद्र असा एकदम उंच कड्यावरुन वळणावर समोर येऊन ठाकतो.. रत्नागिरीच्या किल्ल्यावरुन माझ्या लहानपणी यासारखं समुद्र दृश्य दिसायचं. ठराविक अँगलने कड्यावरुन डोकावलं तर ती समुद्रातली काळीशार गुहा लाटांच्या धडका खाताना दिसायची.
आता सुशोभीकरण म्हणून बाग करण्याच्या प्रयत्नाने रुद्रभीषणता कमी झालीय..
2 Jan 2013 - 9:21 pm | केदार-मिसळपाव
नक्कीच भारताच्या पश्चिम भागात अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत. मागे एकदा भुवनेश्वर जवळ पुरी येथे गेलो होतो तिथला समुद्र किनारा हि अप्रतिम आणि स्वच्छ होता.
इथे जे मालोर्का चे वर्णन आणि चित्रे आहेत ती फक्त मी त्या ३ हिवाळी वातावरणात काढलेली आहेत. उन्हाळ्यात मालोर्का अधिकच सुंदर असावा असे वाटले. आणि समुद्र किनार्याचे म्हणाल तर भारताचा किनारी भाग आणि भारतापलीकडेही एशिया पासिफिक भागात आणि हिंदी महासागरात अशी अनेक बेटे आहेत आणि देश आहेत कि ज्यांना केवळ अप्रतिम समुद्रकिनारा लाभला आहे. बघूया तिथे जाण्याचा योग कधी येतोय ते...
3 Jan 2013 - 1:48 am | इष्टुर फाकडा
संपूर्ण बेलेरिक आयलंड चा भागच तसा आहे. अजून तिथे जायचा योग आला नाहीये तरी कॅटेलोन्या मधल्या सीटजेस या अप्रतिम भागात जावून आलो आहे. पाल्मा आणि हा भाग साधारण सारखा आहे. पण तरीही मला गोवाच होवा :) गोवा जास्त आपला वाटतो म्हणूनही असेल कदाचित.
7 Jan 2013 - 4:16 pm | केदार-मिसळपाव
काटालोन्या एकदम झक्कास... सीटजेस बद्दल लिहा कि मग...इतर वाचकांना पण माहिती होईल..
5 Jan 2013 - 4:27 pm | केदार-मिसळपाव
मायोर्का असे लिहिलेत म्हणजे तुम्ही नक्की जर्मनीत राहतंय असे वाटते.
5 Jan 2013 - 9:17 pm | इष्टुर फाकडा
हो मी जम्मनीतंच राहतंय ;)
2 Jan 2013 - 4:15 pm | गवि
असे लेख अधिकाधिक संख्येने मिपावर यावेत अशी इच्छा आहे. परदेशात राहात असलेले असंख्य मिपाकर हा एक मोठा दरवाजा आहे जगाचं दार सर्वांना उघडून देणारा. आपापल्या परिसरातलं पर्यटन, संस्कृती, खाणेपिणे या आणि अशा विषयांवर असे धागे येत राहोत...
2 Jan 2013 - 4:37 pm | ह भ प
अगदी अगदी सहमत..
2 Jan 2013 - 7:38 pm | केदार-मिसळपाव
भटकंती आणि पर्यटन जगभरात कुठेही असो मीपा करांना त्याचे वर्णन वाचण्याची सदैव उत्सुकता असते.. मलाही इतर मिपा करांचे असे लेख वाचून खूप आनंद मिळतो.
2 Jan 2013 - 9:07 pm | अत्रुप्त आत्मा
@परदेशात राहात असलेले असंख्य मिपाकर हा एक मोठा दरवाजा आहे जगाचं दार सर्वांना उघडून देणारा.>>> भरपुर प्रचंड सहमत...
2 Jan 2013 - 4:59 pm | मेघनाद
आपण फारच छान फोटो आणि माहिती दिली आहे.....घरी बसल्या बसल्या भेट दिल्यासारखे वाटले.
2 Jan 2013 - 6:34 pm | तिमा
तुम्ही खरच नशीबवान आहात. फोटो बघितल्यावर ज्याला निसर्गाची खरी आवड आहे तो वेडाच होईल. वर्णन पण आवडलं. कारला टेकून स्वतःचा किंवा फॅमिलीचा फोटो टाकला नाहीत, यावरुनच तुमचा मोठेपणा आणि निसर्गाचे प्रेम दिसून आले.
धन्यवाद.
2 Jan 2013 - 7:41 pm | केदार-मिसळपाव
भारावून गेलोय..:P तुमच्या प्रतिक्रियेने जिंकलत अगदी जिंकलत
2 Jan 2013 - 6:59 pm | इनिगोय
मालोर्का हे वेगळं नाव बघून धागा उघडला आणि चीज झालं.. डोळ्याचं पारणं फिटलं असा लेख 'बघून' :)
तिमांशी सहमत.
अजून अशाच नवनव्या अनोळखी ठिकाणांबद्दल जरूर लिहा.
2 Jan 2013 - 7:18 pm | पैसा
लिखाण आणि फोटो मस्तच!
2 Jan 2013 - 9:16 pm | Mrunalini
खुपच मस्त....ऊन्हाळ्यात नक्कीच प्लॅन करायला पाहिजे... बहुतेक इथुन direct flight असेल...
2 Jan 2013 - 10:27 pm | मराठे
सोल्लेट! जायला पायजे (तेवढे पैसे साठेपर्यंत साठी आली नाही म्हणजे मिळवली!)
2 Jan 2013 - 10:35 pm | श्रीरंग_जोशी
नयनरम्य आहेत सर्व स्थळे.
सुरेख छायाचित्रे व ओघवते लेखन.
3 Jan 2013 - 8:51 am | ५० फक्त
मस्त मस्त फोटो आणि सगळ्यात भारी रस्ते, मी आणि माझी रेड मर्क्युरी.... सुख सुख सुख बाकी काही नाही..
3 Jan 2013 - 12:41 pm | बॅटमॅन
मालोर्काचे फोटो मस्त!!!!! साला भूमध्य समुद्र ही चीज बाकी औरच आहे यात संशय नाही. मेनोर्का नामक ठिकाण तिथून जवळच आहे असे गूगलबाबा म्हणतोय, तिकडे गेला होतात का?
5 Jan 2013 - 4:36 pm | केदार-मिसळपाव
होय, तिथे मेनोर्का आणि इबिझ्झा अशी अजून दोन बेटे आहेत. दोन्हीही सुंदर आहेत असे ऐकलेले. पण कसे होते ना कि अशा विशेष ऑफर्स फक्त एकाच ठिकाणासाठी आगमन आणि गमन विमान तिकिटसोबत येतात आणि आमचे वास्तव्य फक्त ३ दिवसांसाठीच होते त्यामुळे फक्त मालोर्काच बघितले. आम्ही शक्यतो पर्यटन करतांना बरीचशी ठिकाणे न करता एकाच ठिकाणी मुक्काम करतो आणि त्याचा पूर्ण आस्वाद घेण्याचा प्रयत्न करतो.
7 Jan 2013 - 1:02 pm | बॅटमॅन
हो बरोबर आहे. एकच ठिकाण बघितले तरी बेहत्तर, पण नीट बैजवार पहावे याशी १०००००००००००००००% सहमत!
3 Jan 2013 - 1:07 pm | सुकामेवा
केवळ अप्रतिम, दुसरे शब्दच नाही
3 Jan 2013 - 3:19 pm | सूड
मस्त !!
5 Jan 2013 - 4:35 pm | अनिल तापकीर
अप्रतिम ,
छान सफर घडविली
धन्यवाद
5 Jan 2013 - 9:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अतिशय सुंदर सफर. नियमित लिहित राहा.
-दिलीप बिरुटे