गाव: विजयदुर्ग
ग्रामपंचायत: विजयदुर्ग
जवळचे पर्यटन स्थळ: गिर्ये गाव, पवन चक्की, देवगड शहर, रामेश्वराचे देऊळ
देवगड व्हाया कात्रादेवी रस्त्यामार्गे अन्तर सुमारे ३८७ कि.मी. (पनवेल ते विजयदुर्ग)
जवळचे बस स्थानक: विजयदुर्ग
जवळचे रेल्वे स्टेशन: कणकवली
महाद्वारातील तोफ
विजयदुर्ग किल्ला
हा किल्ला शिलाहार घराण्यातील राजा भोज याने सन ११९५ ते १२०० या कालावधीत बांधला. त्यावेळी हा किल्ला “घेरीया” नावाने ओळखला जात होता. कालांतराने हा किल्ला यादवांनी ताब्यात घेतला नंतर तो विजयनगरच्या राजाच्या ताब्यात गेला. १४३१ साली बहमनि सुलतान अल्लाउद्दीन अहमदशाह याने तो ताब्यात घेतला. सन १४९० ते १५२६ या काळात बहमनी राज्याचे पाच तुकडे झाल्याने हा किल्ला विजापुरकरांकडे आला, तो १२५ वर्षे त्यांच्या अमलाखाली होता. सन १६५३ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्यात अनेक सुधारणा केल्या.
हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेला तसेच गोव्याच्या उत्तरेला असून किल्याच्या बाजूने ४० किमी लांबीची विजयदुर्ग नावाची खाडी आहे. हे एक उत्कृष्ठ बंदर आहे. काही वर्षांपूर्वी मुंबई ते विजयदुर्ग असा जल प्रवास करणारी जहाजे प्रवाशांसाठी उपलब्ध होती, कारण त्याकाळी बस तसेच रेल्वे सुरु झालेली नव्हती. किल्ल्याचे क्षेत्रफळ १७ एकर १९ गुंठे असून तटाची उंची ३६ मीटर एवढी आहे.
समुद्राकडील तटबंदिबाहेर उभी असलेली मच्छिमारी नौका
तटबंदितील बुरुज
समुद्राच्या बाजूची तटबंदी
शिवाजी महराजांनी ३ उंच तटबंद्या, टेहळणी बुरुज तसेच सुटसुटीत अश्या अंतर्गत इमारती बांधून किल्ल्याचे मजबुतीकरण केले. किल्याच्या प्रवेशद्वारात मारुती मंदिर, अंतर्भागात महादेव मंदिर असून भवानी मातेच्या मंदिराचे अवशेषही दृष्टीस पडतात.किल्याला एकूण २० बुरुज असून मध्यभागी घोड्यांच्या पागा आहेत.
किल्ल्याचे रेखाचीत्र (ट्रेकक्षितीज वरून साभार)
पाण्याच्या प्रचंड टाक्या, पिराची सदर, नगारखाना, खलबत खाना, साहेबाचे ओटे तसेच दोन भुयारी मार्ग अशी पाह्ण्यासारखी ठिकाणे आहेत. पाण्याखाली बांधलेली भिंत ही ह्या किल्याची खासियत असून ही भिंत शत्रूच्या मोठ्या जहाजांपासून किल्याची राखण करत होती.
किल्यातील भुयार किवा धान्य साठवणीची जागा
किल्यावरुन दिसणारा माडबन गावचा समुद्रकिनारा
इंग्रज, पोतुगीज, डच ह्यांच्यासारख्या परकीयांनी जिब्राल्टर असा ह्या किल्ल्याचा उल्लेख केला होता. मराठ्यांच्या काळात कान्होजी आंग्रे, संभाजी आंग्रे व नंतर आनंदराव धुळप यांच्यासारखे तेजस्वी आरमार प्रमुख होऊन गेले.
किल्याचे विहंगम दृश्य
सध्या ह्या किल्ल्याच्या पायथ्याशी छोटस बंदर तसेच S.T. महामंडळाचा डेपो आहे. किल्ल्यापासून जवळच ६-७ किमी च्या अंतरात श्रीदेव रामेश्वराचे जमीन पोखरून तयार झालेल्या जागेत बांधलेले भव्य मंदिर आहे. देवी चौडेश्वरी मंदिर देखील ह्याच परिसरात आहे, ह्या मंदिराचे हल्लीच नुतनीकरण करण्यात आले आहे. जवळच गिर्ये गावात स्थित असलेल्या पवनचक्क्या देखील पाहण्यासारखे ठिकाण आहे.
किल्यामागील विजयदुर्ग गावचा समुद्रकिनारा
पांगेरे गावातून निघणारा समुद्र मार्ग
समुद्र रस्ता
रत्नसिंधू प्रकल्पांतर्गत बांधलेल्या पुलामुळे रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा आता अर्ध्या तासाच्या अंतरावर आले आहेत. ह्या किल्यावर राजापूर तालुक्यातील मिठगवाणे गावाजवळील पंगेरे गावातील जेटीवरून होडीनेदेखील जाता येते, तेवढीच समुद्र सफर.
काय मग जाताय का विजयदुर्ग भ्रमंतीला?
(नोंद: हा माझा लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न असल्याने काही तृटी राहिल्या असतील, तेव्हा जाणकारांनी आवश्यक ते मार्गदर्शन करावे हि विनंती)
प्रतिक्रिया
30 Dec 2012 - 10:08 pm | पैसा
हल्लीच विजयदुर्गावर गेले होते. किल्ला अजून खूपच चांगल्या अवस्थेत आहे. किल्ल्याच्या समोरच्या डोंगरावर एक फसवा किल्ला (फक्त दिखाऊ तटबंदी) देखील आहे. शत्रू येणार असे कळताच किल्ल्यात अंधार करून या फसव्या किल्ल्यावर दिवट्या लावून शत्रूला फसवायची योजना वापरली जात असे.
मिपावर स्वागत. असेच आणखी लिहा. अजून बरेच फोटो असणार तुमच्याकडे. अजून जास्त फोटो आवडले असते.
30 Dec 2012 - 10:15 pm | मेघनाद
धन्यवाद ज्योती,
आपण दिलेल्या माहितीमुळे ज्ञानात भरच पडली आहे.
तसे अजून फोटो आहेत, चांगले निवडून लेखाच्या शेवटी नक्कीच समाविष्ट करतो.
30 Dec 2012 - 10:15 pm | एस
तुम्ही ट्रेकक्षितिज च्या संस्थळावरील नकाशा इथे टाकण्याआधी ट्रेकक्षितिज ची परवानगी घेतली होती का? किमान कॉपीराइट चा तरी उल्लेख करायला हवा होता असे वाटून गेले. त्यांच्या स्थळावर कॉपीराइटेड आहे असा स्पष्ट उल्लेख आहे.
हे खटकले कारण अशा प्रकारचे नकाशे करायला किती कष्ट उपसावे लागतात हे स्वतः आमच्या क्लबच्या संस्थळासाठी काही नकाशे तयार केल्यामुळे माहीत आहे.
बाकी माहिती चांगली. विजयदुर्गाबाबत अजूनही प्रकाशचित्रे व भरपूर माहिती देता आली असती. लिहित रहा.
30 Dec 2012 - 10:26 pm | मेघनाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद,
लेखनाबाबतीत तसा नवीनच असल्यामुळे "कॉपीराइट" बाबतीत तशी काही फार माहिती नव्हती, परंतु आता "ट्रेकक्षितिज वरून साभार" असे नमुद केले आहे.
31 Dec 2012 - 12:38 pm | अत्रुप्त आत्मा
छान लिहिलय...पण किल्ल्याचे अजून फोटू हवे होते.
1 Jan 2013 - 12:54 pm | मेघनाद
नवीन छायाचित्रे समाविष्ट केली आहेत....वाचकांनी एकदा पुन्हा भेट द्यावी हि विनंती
1 Jan 2013 - 1:02 pm | पैसा
छान!
1 Jan 2013 - 1:54 pm | बॅटमॅन
उत्तम फटू. आउर भी आंदो.
1 Jan 2013 - 2:21 pm | किसन शिंदे
सह्हीच!!
गड-किल्ल्यांवरच्या भटकंतीवरचे असेच लेख आणखी येऊ द्या.
1 Jan 2013 - 2:29 pm | मृत्युन्जय
मस्त लिहिले आहे की. पहिला प्रयत्न इतका चांगला असेल तर कशाला कोण बोलतय. अजुन येउ द्यात.
1 Jan 2013 - 3:21 pm | मदनबाण
माहिती आणि फोटु आवडले. :)
असेच लिहीत रहा... :)
जाता जाता :---
बाकी तुमच्या आयडीवरुन उगाच आठवले की रावणाचा पुत्र इंद्रजीत याचे खरे नाव मेघनाद होते. :)
1 Jan 2013 - 5:54 pm | मेघनाद
प्रतिक्रिया वाचून एक वेगळाच हुरूप आलाय.....लवकरच दुचाकीवरून केलेल्या कोंकण पर्यटनाचे भाग टाकायचा विचार आहे तेही छायाचित्रांसकट!
1 Jan 2013 - 5:55 pm | मेघनाद
मदनबाण..: अगदी बरोबर.
1 Jan 2013 - 6:02 pm | अनन्न्या
आमच्या कोकणाबद्द्ल कोणी लिहीले की धन्य धन्य वाटते हो!! रत्नागिरीकरांकडून विशेष आभार!!!!!
1 Jan 2013 - 6:10 pm | मेघनाद
अनन्न्या: धन्यवाद....
पुढे लिहिणार असलेल्या कोकण प्रवासाच्या भागांमध्ये "गणपतीपुळे व्हाया आरे-वारे" अशी एक पोस्ट असणार आहे.
1 Jan 2013 - 8:03 pm | प्रचेतस
फोटो आणि वर्णन अतिशय सुरेख.
बड्या साहेबिणीचे एक छोटे जहाज वेंगुर्ला येथील बंदरात धरून (३ नोव्हें १६६४) शिवाजीच्या नौका ते खारेपाटणला घेऊन गेल्या आणि त्याच्यातील माल उतरवून तो गिर्याच्या किल्यात (विजयदुर्ग) साठवून ठेवण्यात आला. असा उल्लेख वेंगुर्ल्यातील डच वखारीच्या प्रमुखाने पौर्वात्य देशांमधील डच वसाहतींच्या गव्हर्नर जनरला पाठवलेल्या २२ जानेवारी १६६५ च्या आपल्या एका पत्रात केला आहे.
याच सुमारास शिवाजी राजांनी विजयदुर्गची दुरुस्ती आणि त्याची अधिक भक्कम बांधणी केली असावी.
महाराजांनी केलेल्या १६७१-७२ च्या जाबित्यांत किल्ल्यांवरील बांधकामाचा त्या वर्षीचा अर्थसंकल्प दिला आहे. त्यात सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि विजयदुर्ग या किल्ल्यांकरीता प्रत्येकी दहा हजार होनांची तरतूद केलेली आहे.
संदर्भः शिवछत्रपतींचे आरमार (ले. गजानन मेहेंदळे, संतोष शिंत्रे)
4 Jan 2013 - 11:44 pm | नन्दादीप
अजून थोडी माहीती :
विजयदुर्ग येथील समुद्रात "महाराजांच्या काळात, सरखेल आंग्रे यांनी (?)" एका दगडी भिंतीचे बांधकाम केले. जेणेकरून शत्रुची जहाजे या भिंतीलाच आपटून नष्ट व्हावीत....
तसेच किल्ल्याचे जुने नाव घेरिया असे होते.
अवांतर :
बाकी कोकण म्हटल की आपली छाती अंमळ जास्तच फुगते.... त्यात देवगड म्हणजे माझी जन्म आणि शिक्षण भूमी. त्यामुळे कॉलेजमधे असताना विजयदुर्ग वार्या अपरिमीत झाल्यात. आमच्या घेरिया ला ३०० वर्ष पूर्ण झाली तेव्हा तर २ दिवस तिथेच तळ थोकून होतो, माझ्या दैवताच दर्शन घ्यायला.. (मा. बाबासाहेब पुरंदरे - अक्षरशः शिवाजी महाराज जगलेला एकमेव माणूस)
बाकी रत्नागिरी म्हणजे कर्मभूमी आणि दोन्हीकडून आजोळ. त्यामुळे आनंदी-आनंद.
5 Jan 2013 - 11:58 am | सुहास झेले
मस्तच... सागरी किल्ले हे नेहमीच माझ्यासाठी विशेष आकर्षण आहे. लवकरच भेट देईन इथे :) :)
5 Jan 2013 - 12:08 pm | मेघनाद
सुहास: नक्की भेट द्या, जाताना थोडा वेळ घेऊन जा, पूर्ण किल्ला फिरायला २-२:३० तास लागतील. किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी माहिती उपलब्ध आहे. छायाचित्रांसाठी मुबलक ठिकाणे आहेत.
5 Jan 2013 - 10:14 pm | मुक्त विहारि
झक्कास..