व्यायाम आणि प्रथिनांची आवश्यकता

शैलेंद्रसिंह's picture
शैलेंद्रसिंह in काथ्याकूट
16 Dec 2012 - 10:47 am
गाभा: 

वजन कमी करण्यासाठी व्यायाम गरजेचाच आहे. त्याला पर्याय नाही. पण त्याच्या सोबतीला योग्य आहार गरजेचा आहे. भारतीय आहारामधे प्रथिनांची खुप कमतरता असते. शाकाहरी असेल तर विचारुच नका.
उदाहरण द्यायचं झाल्यास एका अंड्यामधे फक्त ३-४ ग्राम प्रोटीन्स असतात. आणि आपल्या शरीराच्या किलोग्राम वजनाइतके ग्राम प्रथिन आहारात हवीच रोज. म्हणजे तुमचं वजन ८० किलो असेल तर रोज ८० ग्राम प्रथिनं खाणं गरजेचं आहे. प्रथिनांमुळे शरीरातील पेशींची निर्मीती होते. प्रथिनंच शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत असं म्हणायला हरकत नाही.

दुसरं म्हणजे तुमच्या शरीरातील चरबीचं प्रमाण. पुरुषांसाठी १८-२२% च्या वर असेल लठ्ठ समजले जातात. तर स्त्रियांसाठी २५-३०% च्यावर. तुमच्या शरीरातील चरबीचं प्रमाण मोजता येतं. एक गुगल सर्च करा अनेक वेबसाईट मिळतील. घरी बसल्या माहित करुन घ्या चरबीचं प्रमाण. बॉडी मास इंडेक्स हे लठ्ठपणा मोजण्याचे योग्य परिमाण नाही. हे लक्षात घ्या. सलमान खानचा बॉडी मास इंडेक्स पाहिला तर तो लठ्ठ ठरेल. पण तसं नाहीये. त्याच्या हाडांचं-स्नायुंचे वजन चरबीपेक्षा जास्त आहे.

जास्त सॅलड्स वगैरे खाण्यामुळे शरीराला प्रथिनं कमी मिळतात, कॅलरीज कमी मिळतात. त्याचा परिणाम शरीराच्या मेटाबॉलिझ्मवर होतो. ते मंदावले की आणखी चरबी जमा व्हायला लागते. त्यामुळे शरीराला मिळणाऱ्या कॅलरीज कमी करणे ही बॅड आयडिया आहे.

शरीरातील स्नायुंच प्रमाण वाढवल्यास, मेटाबॉलिझ्म वाढतं. पण त्यासाठी नुसते धावणे उपयोगाचे नाही. स्ट्रेंग्थ ट्रेनिंग करायला हवी. तोच एक कायमस्वरुपी उपाय आहे. पंचविशी-तिशीनंतर शरीराचे मेटाबॉलिझ्म थंडावते व लोकं जाड व्हायला लागतात. ते जर पुर्ववत करायचे असेल तर स्ट्रेंग्थ ट्रेनिंगला पर्याय नाही. पण स्ट्रेंग्थ ट्रेनिंगला पुरक असा आहार म्हणजे प्रथिनयुक्त आहार गरजेचा असतो नाहीतर स्ट्रेंग्थ ट्रेनिंगने त्रासच अधिक होतो.

ह्या सगळ्याबरोबर काही गैरसमज सार्वत्रिक आहेत. एकतर स्निग्ध पदार्थांबद्दल. अनेक तेल शरीराला गरजेची असतात आणि त्यांच्यात चांगले कॅलेस्टोरल बनवायची क्षमता असते आणि खराब कॅलेस्टोरल कमी करायचीही. तेव्हा त्यांच्यातुन जास्त कॅलरीज मिळतात म्हणुन ते टाळणे चुकीचे. अतिरेक प्रत्येक गोष्टीचा वाईटच. तेव्हा गरजेपुरते तेल-तुप खाणे योग्य. तळलेले तेल आणि वनस्पती तुप मात्र घातक असते.
दुसरा गैरसमज म्हणजे आहारातील प्रथिनांबद्दल. दुध, पनीर, अंडी ह्यामधे मधे खुप प्रोटीन्स असतात असं समजलं जातं. हा समज चुकीचा आहे. गुगल करुन कुठल्या पदार्थात किती प्रोटीन्स आहेत हे एकदा चेक करावे. तपशीलात जास्त जात नाही. तांदुळ, गहु, ज्वारी, बाजरी ह्या सगळ्या धान्यांमधेही खुप कमी प्रोटीन्स असतात. तसंच आपण हे पदार्थ शिजवुन खात असल्याने त्यांच्यात पाण्याचं प्रमाण अधिक असतं. शेंगदाणे, चणे, डाळी ह्यांच्यात बऱ्यापैकी जास्त प्रोटीन असतं. चणे शेंगदाणे हे आपण सुके खात असल्याने १०० ग्रॅम मधे आपल्याला जवळपास २०-२३ ग्राम प्रथिनं मिळतातच. डाळी मात्र आपण उकडुन आमटी करुन खातो, तेव्हा प्रथिनं कमी होत जातात.
तिसरा गैरसमज म्हणजे शाकाहरी अन्नातील प्रथिनांबद्दल. शाकाहरी अन्नातील प्रथिनांमधे सगळे अमिनो ऍसिड्स नसतात. त्यामुळे त्यांना पुर्ण प्रथिने मानली जात नाहीत. तीन वेगवेगळे गट आहेत. एक आहे धान्याचा , दुसरा कडधान्य, डाळी आणि शेंगदाण्याचा आणि तिसरा असतो तो बदाम, काजु अशा नट्स चा. ह्या तीन गटापैकी किमान दोन गटांचा आहारात समावेश झाला तरच संपुर्ण प्रथिनं मिळु शकतात.
सोयाबीन हे एकच शाकाहरी अन्न आहे ज्यात संपुर्ण प्रथिनं असतात. पण त्यातुन इस्ट्रोजन (स्त्री हार्मोन) हे हार्मोन निर्माण व्हायला मदत होते, त्यामुळे पुरुषांनी ते शक्यतो खाऊ नये. त्याने त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनपेक्षा (पुरुष हार्मोन) इस्ट्रोजन वाढते आणि त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. स्त्रियांसाठी सोयाबीन उत्तम.
आपण दुध हे शाकाहरीच मानत असलो तरी ते प्राणिज आहे. दुधांच महत्व आपल्यासाठी खुप आहे. पण १ लिटर दुधात आपल्याला फ़क्त ३० ग्रॅम प्रथिनं मिळणार असतात हे लक्षात घ्या. त्यामुळे भरपुर दुध प्या. दुधामधल्या भेसळीच्या प्रमाणामुळे दुध पिणं रिस्कि झालंय मात्र. दुधातील प्रथिनं हि सगळ्यात लवकर शरीर पचवु शकते. ६-८ ग्रॅम दुधाची प्रथिनं दर तासाला शरीर ऍबसॉर्ब शकते, त्याखालोखाल अंड्याचा क्रमांक आहे. आणि फ़क्त १ ग्राम अंड्याचं प्रथिन शरीर एका तासाला ऍबसॉर्ब शकते. बाकींबद्दल बोलायलाच नको इतका कमी वेग असतो. म्हणुन व्यायाम केल्या केल्या दुध पिणे किंवा व्हे प्रोटीन (दुधातील प्रोटीन पावडर) खाणे उत्तम.

भारतीय व्यायाम पद्धती जोर-बैठका-डबलबार उत्तमच. पण ह्या व्यायामाला पुरक आहार असावाच लागतो. आपल्या आखाड्यांमधे व्यायाम करणाऱ्यांना खुप खायला सांगितले जाते. खुप खा..खुप व्यायाम करा आणि खुप झोपा. हा मंत्र आहे. जेव्हा आपण व्यायाम करतो. तेव्हा आपल्या स्नायुंच्या पेशी मरतात. आणि जेव्हा आपण आराम करतो तेव्हा जर योग्य प्रथिनांचा पुरवठा असेल तर शरीर नवीन पेशी बनवतं जे आधीपेक्षा अधिक मजबुत असतात (उत्क्रांतीचा नियम). त्यातुनच स्नायु मजबुत होतात. म्हणुन व्यायामाबरोबर खाणे आणि आराम करणे हे गरजेचे. आठवड्यातुन प्रत्येक स्नायुचा एकदाच व्यायाम करावा आणि जेव्हा करावा तेव्हा मात्र जोरदार करावा. १ आठवड्याचा आराम त्या स्नायुला रिकव्हर व्हायला लागतो.

व्यायाम करायचे म्हणुनच तंत्र असते. खुप जास्त इंटेंसिटीचा व्यायाम जे करतात त्यांच्यासाठी हे तंत्र सांभाळणे गरजेचे असते नाहीतर इजा होऊ शकते. शरीराच्या वरच्या भागातले स्नायु म्हणजे चेस्ट, बॅक, शोल्डर, नेक, बायसेप्स, ट्रायसेप्स, फ़ोर-आर्म्स. ज्या व्यायामामुळे आपल्याला काही ढकलावे लागते ते पुश एक्सरसाईजेस...त्यांच्यामुळे तुमच्या चेस्ट, फ़्रंट शोल्डर आणि ट्रायसेप्सचा व्यायाम होतो. ते ह्या स्नायुंचे व्यायाम एक दिवस करावेत. दुसऱ्या दिवशी उरलेल्या स्नायुंचे करावेत, ते सगळे पुल चे म्हणजे ओढायचे व्यायाम असतात. उदाहरणार्थ पुल-अप्स..रोविंग, डेडलिफ़्ट इत्यादी . तिसऱ्या दिवशी पायाचे व्यायाम करावेत. चौथ्या दिवशी पोटाच्या स्नायुंचे. हे सगळे व्यायाम करायला रोजचे ३० मिनिटं पुरेसे होतात. योग्य वजनं वापरावीत. आणि आपल्या क्षमतेला रोज वाढवायचा प्रयत्न करावा. चार दिवस आठवड्याचा व्यायाम केल्यावर इतर तीन दिवस आराम करावा किंवा इतर खेळ किंवा कार्डियो (धावणे, चालणे, दोरीच्या उड्या) वगैरे कराव्यात. व्यायामाच्या आधी स्ट्रेचिंग करावी.

अशा प्रकारे फ़क्त रोजचा ३०-४० मिनिटं व्यायाम आणि भरपुर खाऊनही योग्य शारिरिक क्षमता मिळवता येते. भरपुर खाण्याचं पथ्य म्हणजे सकाळी भरपुर खा. दुपारीही भरपुर खा. मात्र रात्री फ़क्त खुप प्रोटिन्स असलेलंच खा. रात्री झोपेत शरीर आराम करत असतं...नवीन पेशी बनवत असतं तेव्हा प्रथिनांची गरज खुप असते. इतर अनावश्यक कॅलरीज मात्र चरबीत रुपांतरीत होत असतात. त्यामुळे फ़क्त रात्रीच्या जेवणांच पथ्य पाळा.

प्रतिक्रिया

बर्‍यापैकी माहिती देणारा लेख, याबद्दल आणखी वाचायला आवडेल.

सस्नेह's picture

16 Dec 2012 - 2:07 pm | सस्नेह

भारतीय आहारामधे प्रथिनांची खुप कमतरता असते
कोण म्हणतं ? परंपरागत आहार तुम्ही घेता का ? पोळी, भाजी, डाळ घातलेल्या पालेभाज्या, कोशिंबिरी, चटण्या, सांडगे, पापड, घट्ट वरण, भात, लिंबू इ. सर्व , इतकंच नव्हे तर जेवणानंतर कात-चुन्यासहित तांबुल ही दररोजच्या आहारात घेत असाल तर मुळीच कशाची कमतरता होणार नाही..

शैलेंद्रसिंह's picture

16 Dec 2012 - 2:23 pm | शैलेंद्रसिंह

तुम्ही सर्वसाधारण भारतीयांच्या रोजच्या आहारातील प्रत्येक पदार्थाच्या प्रथिनांची बेरीज करुन बघा. प्रथिनं तर सोडाच..विटॅमिन्स आणि मिनरल्सचा कोटाही पुर्ण होत नाही. फ़क्त कार्बोहायड्रेट्स आणि फ़ॅट्सचाच कोटा पुर्ण होतो. भारत मधुमेहाची जागतिक राजधानी बनलाय.
बहुतेक तरुण स्त्रियांमधे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते.
अमेरिकन जिम मधे काही ग्रुप एक्सरसाईज प्रोग्राम्स होतात. तिथे तर भारतीय तरुणांचीही दमछाक होतांना दिसते अमेरिकन स्त्रियांच्या आधी. एकुणच भारतीय मध्यमवर्गीयांची शारिरिक क्षमता इतकी कमी झालेली दिसतेय. त्यात पोट वाढेल म्हणुन आहारातही कपात सुरु झालीय. आणि ह्या आहार कपातीमुळे किती नुकसान शरीराचं होतं ह्याचा कोणी विचार करतांना दिसत नाही.

सस्नेह's picture

16 Dec 2012 - 4:24 pm | सस्नेह

तुम्ही म्हणता ते खरे असेल, नव्हे असावेच.
म्हणजे तुम्ही असे म्हणायला हवे की ‘सध्या भारतीयांच्या आहारामधे प्रथिनांची खुप कमतरता असते’
अमेरिकेच्या तुलनेत भारतीयांच्या बऱ्याच कशाकशामध्ये सध्या कमतरता आहे खरी !
शाकाहारातही प्रथिने भरपूर मिळू शकतात. एक अंड्याऐवजी एक वाटी घट्ट वरण प्रथिनाच्या प्रमाणात चालू शकावे असे आहारशास्त्राच्या पुस्तकात वाचल्याचे आठवते.
बाकी अमेरिकन अन भारतीय आरोग्यमानात फरक असल्याबद्दल सहमत.

पैसा's picture

16 Dec 2012 - 2:09 pm | पैसा

खूप माहिती देणारा लेख आहे. यातील काही गोष्टींबद्दल आपाआपल्या डॉक्टर, आहारतज्ञाशी बोलून आपले आहार आणि व्यायामप्रकार ठरवलेले बरे.

इष्टुर फाकडा's picture

16 Dec 2012 - 2:34 pm | इष्टुर फाकडा

सोयाबीन हे एकच शाकाहरी अन्न आहे ज्यात संपुर्ण प्रथिनं असतात. पण त्यातुन इस्ट्रोजन (स्त्री हार्मोन) हे हार्मोन निर्माण व्हायला मदत होते, त्यामुळे पुरुषांनी ते शक्यतो खाऊ नये. त्याने त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनपेक्षा (पुरुष हार्मोन) इस्ट्रोजन वाढते आणि त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. स्त्रियांसाठी सोयाबीन उत्तम.

चुकीची माहिती आहे. सोय मध्ये आयसोफ्लावोन्स (फ्लावोन्स चा Conformer किंवा भाऊ) हे सेकंडरी मेटाबोलाइट्स असतात जे इस्ट्रोजेन हार्मोन बरोबर इंटरअक्ट करतात. आयसोफ्लावोन्स हे इस्ट्रोजेन चे प्रमाण वाढवत नाहीत. आणि एक पेपर सांगतो कि आयसोफ्लावोन्स हे फक्त इस्ट्रोजन चा परिणाम कमी जास्त करू शकतो. याहि प्रत्यायाबाबत शास्त्रज्ञांमध्ये दुमत आहे. पुढील संशोधन चालू आहे.

शैलेंद्रसिंह's picture

16 Dec 2012 - 3:12 pm | शैलेंद्रसिंह

ही लिंक बघा. मी तर म्हणतो उगाच रिस्क कशाला घ्यायची ना?

http://www.menshealth.com/nutrition/soys-negative-effects?fullpage=true

इष्टुर फाकडा's picture

16 Dec 2012 - 3:38 pm | इष्टुर फाकडा

असल्या लिंक देवू नका हो. हे लोकांचं इंटरप्रीटेशन असतं शास्त्रीय प्रमेयांच. चीन, जपान, इंडोनेशिया हे देश दिवसाला १५० ग्राम पर्यंत सोयाचे पदार्थ खातात. यातून त्यांना १५० मिलीग्राम पर्यंत आयसोफ्लावोन्स मिळतात. याउलट पाश्चात्यांमध्ये हेच प्रमाण १ मिलीग्रामपेक्षाही कमीच असते.
लिंक वाल्यांच्या न्यायाने अख्खा इंडोनेशिया कधीच वांझ व्हायला हवा होता.
हे वाचा,

Our recent studies show that rats and mice are
typically exposed multigenerationally to doses of isoflavones in
the range 90–150 mg/kg body wt, far higher than the doses
consumed by humans habitually consuming soy foods (0.5–1.5
mg/kg body wt). Plasma concentrations of isoflavones in rodents
are 30,000- to 60,000-fold higher than estradiol concentrations,
yet veterinarian and animal husbandry establishments
do not appear to experience overt problems in breeding rodents
under these conditions.

स्त्रोत : http://intl.jacn.org/content/20/suppl_5/354S.full.pdf+html

इष्टुर फाकडा's picture

16 Dec 2012 - 3:14 pm | इष्टुर फाकडा

शिवाय शाकाहारी-अन्डाहारी लोकांनी एकाच पदार्थातून सगळी प्रथिने मिळवायला हवीत असा तुमचा एकूण लेखात सूर दिसतो. प्रोटीन फोकस्ड संतुलित आहाराची जास्त गरज आहे. ज्यामध्ये दुध, अंडी, कडधान्य आणि डाळी यांचा समावेश असावाच.
हे सगळे करूनही पाश्चात्यांपेक्षा भारतीय शरीर क्षमता किंवा रेट ऑफ मसल मास बिल्डींग हे कमी असू शकते याला कारण क्रिएटीन नावाचे प्रोटीन आहे. हे प्रोटीन फक्त दहा नंबरच्या मटणात मिळते. बहुतांश भारतीय गाय किंवा बैल खात नाहीत याउलट पाश्चात्य बीफ बकाबक हाणतात. म्हणूनच ज्यांना सिरियस मसल मास ट्रेनिंग करयचे आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्रिएटीन जरूर घ्यावे.

शैलेंद्रसिंह's picture

16 Dec 2012 - 3:22 pm | शैलेंद्रसिंह

तीन वेगवेगळे गट आहेत. एक आहे धान्याचा , दुसरा कडधान्य, डाळी आणि शेंगदाण्याचा आणि तिसरा असतो तो बदाम, काजु अशा नट्स चा. ह्या तीन गटापैकी किमान दोन गटांचा आहारात समावेश झाला तरच संपुर्ण प्रथिनं मिळु शकतात.
हे लिहिलेलं आहे मी.

सर्वसाधारण शारिरिक मेहनतीला लागेल एव्हढे क्रिएटीन आपलं शरीर बनवतेच. त्यामुळे तुम्हाला शरिरसौष्ठव स्पर्धेत भाग घ्यायचा नसेल तर क्रिएटीन सप्लिमेंटची गरज नाही. त्यामुळे तुम्ही कोणाच्या मागेही पडत नाहीत. कारण ते शरीरात गरजेपुरतं बनतंच.

इष्टुर फाकडा's picture

16 Dec 2012 - 3:42 pm | इष्टुर फाकडा

प्रश्न क्रिएटीन concentration चा आहे. जर आहारात ते असेल किंवा तुम्ही ते बाहेरून घेत असाल तर स्नायू पेशींना उर्जा जास्त पुरवली जाते आणि बिल्डींग वेगाने होते हा साधा हिशोब आहे.

शैलेंद्रसिंह's picture

16 Dec 2012 - 9:46 pm | शैलेंद्रसिंह

क्रियेटीनने निश्चितच बॉडी बिल्डींग वेगाने होते. त्याच्या सप्लिमेंट्सही मिळतात. पण सर्वसाधारण कार्डियो-सर्किट ग्रुप एक्सरसाईझमधे भारतीय तरुण अमेरिकन तरुणींच्याही मागे पडायचं कारण ते नसावं कारण त्या व्यायामांमधे जितक्या क्रियेटिनची आवश्यकता असते तितकं शरीर निश्चितच बनवत असतं.

शैलेंद्रसिंह's picture

16 Dec 2012 - 9:41 pm | शैलेंद्रसिंह

सोयाबीन्स मधे आयसोफ़्लेविन्स हे फ़ायटो-इस्ट्रोजन असतात. फ़ायटो म्हणजे वनस्पतींमधील. शरीरात टेस्टेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचा एक बॅलंस असतो. व्यायाम करतांना टेस्टेस्टेरॉन वाढते. म्हणजे बॅलंस जरा टेस्टेस्टेरॉनच्या बाजुने अधिक कलतो. ह्यावेळा सोयाबीन्समधले फ़ायटो-इस्ट्रोजन मात्र मानवी इस्ट्रोजन बरोबर बॉंड करतात आणि इस्ट्रोजनची लेवल वाढवल्यासारखी होऊन बॅलंस पुन्हा निर्माण केला जातो. हेच नको असते, व्यायाम करणाऱ्याला टेस्टेस्टेरॉन हार्मोन अधिक लागते. त्याने एक रग निर्माण होते. सोयाबीन खाणाऱ्यांमधे ती रग निर्माण होत नाही हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे.
नपुंसकतेविषयी अजुनही वाद आहेत. पण प्रत्येक जिम ट्रेनर, फ़िजिकल ट्रेनर पुरुषांना सोयाबीन असलेली प्रोटीन पावडर घ्यायला मनाई करतांना दिसतो (निदान इथे अमेरीकेत तरी तसं आहे). कदाचित ते चुकीचंही असेल. मी तज्ञ नाही त्या विषयावर, पण स्वत:चे बॉडी फ़ॅट मी २४% वरुन १६% वर आणले होते २००८-२००९ मधे. तेव्हा जे वाचन केले होते त्यावरुन लिहितोय. मी तेव्हा पुर्ण शाकाहरी होतो. सोय हे काही भारतीयांचे स्टेपल फ़ुड नाहीये, तेव्हा भारतीयांचे शरीर सोयला किती रिसेप्टीव आहे हे माहीत नाही. पण इतर पर्याय असल्याने मी तर सोयाबीनला टाळतोच.

हे सगळं ठीक आहे. काही गोष्टी पटल्याही. एक विनंती सगळ्यांनाच कराविशी वाटते. जेंव्हा हिरोरीनं प्रतिसाद, उपप्रतिसाद देणारे सदस्य पाहण्यात येतात तेंव्हा त्यांनी त्या त्या क्षेत्रातले तज्ञ असणे किंवा त्यातील शिक्षण घेतल्याचे नमूद केलेत तर आम्हाला विश्वास ठेवायला, प्रश्न विचारायला सोपे जाईल.

शैलेंद्रसिंह's picture

17 Dec 2012 - 3:07 am | शैलेंद्रसिंह

मी ह्या विषयातला तज्ञ असल्याचा दावा करत नाही. पण २००८-२००९ च्या दरम्यान मी माझे वजन ९६ किलो वरुन ८३ किलो पर्यंत कमी करु शकलो आणि फ़ॅट परसेंट २४% वरुन १६% पर्यंत. त्याकाळात मी जे वाचन केलं, त्यातुन जी माहिती जमवली, अनेक जिम ट्रेनर्स, फ़िजिओथेरपिस्ट्स ह्यांच्याशी बोललो व प्रत्यक्ष कृतीही केली, त्या अनुभवातुन हा लेख लिहिलेला आहे.

तेव्हा मी संपुर्णपणे शाकाहरी होतो. अंडंही खायचो नाही. मी हे प्रयोग अमेरिकेत सुरु केले होते, जिथे मला खाण्याचे (विशेषत: प्रोटीनयुक्त) भरपुर परवडण्यासारखे ऑप्शन्स होते..तिथे फ़ोर्टीफ़ाईड फ़ुड बऱ्याच प्रमाणात उपलब्ध आहे. प्रोटीन-विटॅमिनच्या चॉकलेट्स पासुन ते सकाळच्या कॉर्नफ़्लेक्स पर्यत अगणित व्हरायटी मिळतात. प्रत्येकावर कॅलरीज, न्युट्रीयंट स्पष्टपणे लिहिलेले असतात. त्यामुळे योग्य आहार ठेवता यायचा. तसेच तिथे वेळही भरपुर मिळायचा.

काही महिन्यांनी मी भारतात आलो आणि इथे तेच ऑप्शन्स परवेडेनासे झालेत. भारतातही मिळतात त्या सगळ्या गोष्टी, पण परवडत नाही. त्यामुळेच भारतात मला पुन्हा नव्याने काय खावे आणि न खावे ह्याचा अभ्यास करावा लागला. जिमला जाण्याइतका वेळही भारतात मिळत नाही इतक्या वेळ काम करावं लागतं. त्यातुन व्यायामाच्या सवयीही बदलाव्या लागल्या. पण तरीही मी सगळं करु शकलो.

चिर्कुट's picture

17 Dec 2012 - 11:48 am | चिर्कुट

आमच्या सध्याच्या जिव्हाळ्याच्या विषयावर असल्याने धागा अत्यंत उपयुक्त. आभार्स.

शैलेंद्रसिंह's picture

17 Dec 2012 - 11:56 am | शैलेंद्रसिंह

व्यायामाच्या सगळ्या प्रकारांची आणि डायट-न्युट्रीशनची माहिती इथे उपलब्ध आहे.
http://exrx.net/

जिन्क्स's picture

17 Dec 2012 - 12:44 pm | जिन्क्स

लेख आणि प्रतिसाद आवडले...
व्हे प्रोटीनचे दुश्परिनाम पण आहेत अस बरच वाचलं आहे... आपलं ह्यावर काय मत आहे??

परिकथेतील राजकुमार's picture

17 Dec 2012 - 12:56 pm | परिकथेतील राजकुमार

भांचूत हा देश सगळ्याच बाबतीत मागासलेला आहे.

अर्थात असे असूनही काही दिड शहाणे अजून इथेच तंबू ठोकून का राहतात हा एक प्रश्नच आहे.

व्यायामतज्ञ
धर्मेद्रसिंह