किल्ले शिवनेरी

saumitrasalunke's picture
saumitrasalunke in भटकंती
21 Nov 2012 - 7:42 pm

दिनांक: शनिवार, ०३ नोव्हेंबर २०१२

दुर्गस्थ: सौमित्र आणि सुनिता साळुंके

पहाटे ०६ वाजता माळशेज मार्गे जाणारी कुर्ला नेहरूनगर–जुन्नर गाडी पकडून निघालो. मुरबाडच्या पुढे आल्यावर जीवधन–खडा पारशी–नानाचा अंगठा याचं सुरेख दर्शन झालं. या मार्गावर आम्ही दोघेही प्रथमच येत होतो तेव्हा डावीकडे हरिश्चंद्रगड, पिंपळगाव जोगा जलाशय बघून भान हरपलं.

साधारण ११ च्या सुमारास जुन्नरला पोहोचलो. शिवनेरी एका दिवसात करण्याजोगा आहे मात्र मुक्काम करावयाचा असल्यास लॉजिंगची व्यवस्था आहे. मात्र त्याचं बुकिंग वगैरे करूनच यावं.

थोडी विश्रांती घेऊन आम्ही साडेतीन वाजता गडाकडे प्रयाण केले. जुन्नर बस स्थानकापासून बरोबर ०३ किलोमीटरवर गडाच्या चढाचा प्रारंभ बिंदू आहे. इथवर आपण चढ्या डांबरी रस्त्याने येऊ शकतो. राजमार्गाने शिवनेरीवर जाणे अतिशय सुखद आहे. वनविभागाने अत्यंत सुंदर पद्धतीने गडाची देखभाल केली आहे. जागोजागी बागा, बसण्याची व्यवस्था आहे. एक ७०-८० चे आजोबा सुद्धा डोक्यावरचं पागोटं हातात घेऊन गड चढत होते. महादरवाजा, पीर दरवाजा, परवानगीचा दरवाजा, फाटक दरवाजा, कुलूप दरवाजा, शिपाई दरवाजा आणि हत्ती दरवाजा अश्या सात दरवाजांची मालिकाच या गडावर आहे. हे सर्व दरवाजे एकमेकांच्या माऱ्यात आहेत. या ऐसपैस मार्गावरून जात असताना अधूनमधून लहान लहान शॉर्टकट सुद्धा आपण घेऊ शकतो. मजा येतो.

लोखंडी खिळे असलेल्या लाकडी शिपाई (शिवाबाई?) दरावाज्यानंतर डावीकडची किल्ल्यावर जाणारी वाट न घेता आपण उजवीकडची वाट घ्यायची आणि शिवाईदेवीच्या दर्शनाला जायचं. महाराजांचं नामकरण आई शिवाई देवीवरून झालं हे आपल्याला ठाऊकच आहे. मंदिरातल्या पूर्णाकृती मूर्तीपुढे असलेली नाकडोळे कोरलेली स्वयंभू मूर्ती हि मुळ मूर्ती. आम्ही इथे शिरसाष्टांग नमस्कार केला. आऊसाहेब आणि स्वतः बाल शिवाजी कित्येकदा इथे आले असतील नाही?! कड्यात कोरलेल्या आणि प्रशस्त सभामंडप असलेल्या या मंदिरात आपण निशब्द होतो...

ज्या ठिकाणाहून आपण हि उजवीकडची वाट घेतली तिथे परत येऊन डावीकडच्या वाटेने गड चढू लागायचा. यानंतर मेणा आणि कुलूप दारावाज्यांतून पार होत आपण किल्ल्यावर प्रवेशतो. डावीकडे अंबरखान्याची (धान्यकोठी) इमारत आहे. रेलिंगच्या बाजूने जात राहिलं की पुढे गंगा आणि जमुना अशी कड्यात कोरलेली पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहेत. इथे त्या पाण्यात आम्हाला मिनरल वॉटरच्या काही बाटल्या तरंगताना दिसल्या. हे असं का होतं किंवा काही लोक असं करू शकतात या विचाराने मन खिन्न होतं. मग शेजारीच असलेल्या “शिवकुंज” या शासनाने बांधलेल्या वास्तूत राजमाता आऊसाहेब आणि बालपणीच्या शिवरायांची पंचरशी धातूंमध्ये घडवेलेलं सुरेख शिल्प आहे. जिजाऊमातांची तेजस्वी मुद्रा संस्कारांच महत्व अधोरेखित करते. इथे खूप सकारात्मक भावना मनात निर्माण होते.

शिवकुंजापुढे आहे कमानी मस्जिद. यावर फारसी (?) लेख आढळतो. याला लागूनच कमानी टाके आहे. (शिवकुंजाच्या मागच्या बाजूने साखळीची चित्तथरारक वाट खाली उतरते).

इथून थोडंसं पुढे गेलो की आपल्याला सुंदर अशी दगडी इमारत दिसते. हि काही सामान्य वास्तू नव्हे. स्वराज्य सूर्याचा जन्म पाहिलेली हि मूर्तिमंत नशीबवान वास्तू आहे. याच्या तळघरात मराठी अस्मितेच्या सर्वोच्च मानबिंदूचा जन्म झाला... इथे साक्षात शिवप्रभूंनी जन्म घेतला. आपण या ठिकाणी आजही साक्षात सूर्याने झोके घेतलेला पाळणा बघण्याचा अवर्णनीय आनंद घेऊ शकतो. १९२५ साली करवीरच्या राजर्षी श्री. शाहू छत्रपतींच्या प्रेरणेने मुंबई प्रांताचे तत्कालीन शिक्षण अधिकारी श्री. भास्करराव जाधव यांनी या वास्तूचा जीर्णोद्धार केला. निश्चल आणि निस्तब्ध होऊन जाण्याची गडावरचे हे दुसरे ठिकाण. जिन्याने आपण पहिल्या मजल्यावर जायचे. प्रशस्त दिवाणखाना आणि पूर्वाभिमुख असलेला सज्जा आणि तिथून जुन्नर गाव पाहायचे. या वास्तूला लागूनच दक्षिणेला काही वास्तुंचे भग्नावशेष व जोते दिसतात. आपण जिना उतरून समोरच्या बदामी तलावाकडे जायचं. हा प्रशस्त तलाव आता बऱ्यापैकी कोरडाच आहे. इथून पुढे उत्तरेला कडेलोट टोक आहे. इथून जुन्नर गाव तसेच आजूबाजूचा बराच मुलुख न्याहाळता येतो. समोरच लेण्याद्रीचा डोंगर दिसतो.

इथून पुन्हा मागे शिवकुंजापर्यंत येऊन आपण बालेकिल्ल्यावर चढायचं. अंदाजे पाच एक मिनिटे लागतात. समोर इदगाह आणि त्याच्या मागे कोळी चौथरा आहे. १६५० साली मोगलांनी हजारो कोळ्यांची डोकी उडवली तो हा कोळी चौथरा.

आम्ही बालेकिल्ल्याहुनच सूर्यास्त पाहिला. आणि शिवकुंजापर्यंत उतरून आलो. पहिल्या दरवाज्यापासून ते इथपर्यंतच्या गडभ्रमंतीसाठी निवांतपणे म्हटलं तर ०३ तास पुरेसे आहेत.

आमच्या बाबतीत काही थरारक होणं मात्र बाकी होतं. ट्रेकिंगचे शूज घातले नसल्याने मी पुन्हा राजमार्गाने गड उतरायचा विचार केला होता मात्र सौंच्या इच्छेखातर साखळीचा मार्ग आहे कसा ते बघायला गेलो. गडाच्या पूर्व बाजूस कातळात कोरलेल्या या पायऱ्या येईपर्यंत आमचं उतारावर बऱ्यापैकी चालणं झालं होतं. पायऱ्यांच्या जवळ गेल्यावर आता मागे फिरण्यात “पॉईंट” नाही हे जाणवलं. मघाशी म्हटल्याप्रमाणे हि गडाची पूर्व बाजू असल्याने अंधार लवकर जाणवू लागला. शेवटी धीर करून आम्ही पायऱ्या उतरू लागलो. कलावंतीण प्रमाणे याही खेपेला ओढणीचा दोरासारखा अतिशय योग्य वापर करता आला. अर्थात हे केवळ वेळ निभावून नेण्यापुरतं. दोराला कुठलाही पर्याय नाही हे निश्चित. या वाटेवरून चढताना किंवा उतरताना पाठपिशवीचं ओझं वर ओढायला किंवा खाली सोडायला दोर असल्यास उत्तमच. आमच्या साध्या चपलांना ग्रीप नसल्याने त्या सारख्या पायऱ्यांवरून निसटत होत्या. भितीदायक प्रकार. सात मिनिटांचा तो थरारक खेळ संपला आणि थराराचा दुसरा अध्याय चालू झाला. समोर जुन्नर मध्ये दिवे लखलखू लागले. अंधार पडल्याची खुणच. अजून अर्धा तासाची गर्द जंगलातून उतरणारी वाट शिल्लक होती. आता मात्र मी विजेरी बाहेर काढली आणि आम्ही वेगाने उतरू लागलो. पूर्वेला निवाऱ्याच्या जागा असल्याने आणि पाण्याचे स्त्रोत असल्याने मला वन्य श्वापदांची अवचित अवेळी गाठ-भेट टाळायची होती. त्यामुळेच वन विभागाच्या जंगलाची हद्द असणाऱ्या भिंतीपर्यंत लवकरात लवकर पोहोचणे आवश्यक होते. बिबळ्यांच्या परिसरात वावरताना वाकणे, बसणे असे प्रकार टाळावेत. शक्यतो ताठ चालावं.

शेवटी पुढच्या पंचवीस मिनिटांत साधारण ०६.४० च्या सुमारास आम्ही भिंत क्रॉस केली आणि पुढच्या दहा मिनिटांत डांबरी रस्त्याला लागलो. या अर्ध्या तासात मी तीन वेळा पाय घसरून पाठीवर पडलो होतो. रस्त्यावर पोहोचल्यावर मागे वळून गडाकडे पाहिलं तर अंधारगुडूप... पाऊणे सात वाजता. फक्त बाह्यरेषा दिसत होती. आपल्या तेजस्वी इतिहासाची पहाट पाहिलेल्या त्या शिवनेरीस त्रिवार मुजरा करून आम्ही दोघे अंधारलेल्या रस्त्यावर जड पावलांनी चालू लागलो.
--------------------------------------------------------------------------------------
* पाटबंधारे व वनखात्याची पूर्वपरवानगी असल्यास जुन्नरच्या ८ किलोमीटर वायव्येस असलेल्या अनुक्रमे माणिकडोह (शहाजी सागर जलाशय) धरण व बिबट निवारा केंद्र या ठिकाणांना भेट देता येईल.
* जुन्नर डेपो ते शिवनेरी पायथा बस सेवा आहे (एक मार्गी रु. १०). या बसेस शिवनेरी मार्गे वडज, कुसूर तसेच अन्य गावांत जाणाऱ्या आहेत. डेपोत चौकशी करावी. तसेच ऑटो केल्यास एक मार्गी रु. ५०-६० होतात.
* शिवनेरीच्या पायथ्याला असलेलं हॉटेल शिवनेरी हलक्या न्याहारी / जेवणासाठी वगैरे उत्तम आहे. याच ठिकाणी जुन्नर डेपोत जाणाऱ्या व येणाऱ्या एस. टी थांबतात.
* जुन्नर शहरात शंकरपुरा पेठेत असलेल्या श्री. साठे यांचे “श्री” भोजनालय हे अत्यंत उत्कृष्ट आहे. इथे जेवायलाच हवं. खरं तर इथेच जेवायला हवं.
* शंकरपुरा पेठेतून डेपोला येताना जुन्या जुन्नरची दगडी तटबंदीची वेस गतकाळाची साक्ष देत विदिर्णावस्थेत उभी आहे.

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

21 Nov 2012 - 7:52 pm | आशु जोग

वर्णन आवडले.

तुम्ही अगदी प्रथमच गेला होतात क शिवनेरीला ?
बादवे
कुणाकडे शिवनेरीचे जुने १५, २० वर्षापूर्वीचे फोटो असतील तर कॄपया पाठवा, शेअर करा.

काही याहून वेगळ्या गोष्टी सांगायचे मनात आहे, ज्याची शिवप्रेमींनी अवश्य दखल घ्यावी.

saumitrasalunke's picture

21 Nov 2012 - 7:59 pm | saumitrasalunke

हो प्रथमच गेलो होतो. याआधी बऱ्याचदा जाऊन यावे असा विचार होता. बहुधा सौं सोबत जाण्याचाच योग होता. खूप प्रसन्न वाटतं गडावर.

ऑर्कुटवर आहेस का? असल्यास येथे मिळतील.
पवित्र शिवनेरी

(या राम खरमाळेच्या अलबममधे अनेक गडकोटांचे फोटो अलबम मिळतील)

प्रचेतस's picture

22 Nov 2012 - 9:36 am | प्रचेतस

छान लिहिलंय.
पण फोटोंची जोड हवीच.

वल्ली म्हणतात तसं फोटोंची जोड हवीच, मात्र तुमचं प्रामाणिक लिहिणं त्याची कमतरता काही प्रमाणात जाणवु देत नाही.

मी जेव्हा जाईन तेव्हा या वर्णनाची प्रिंटाउट घेउनच जाईन..
पण पुण्यावरुन जायचं असेल तर न ते ही २ व्हीलर वर तर कसं कसं जावं लागेल.. हे सांगू शकाल का?

चिंतामणी's picture

22 Nov 2012 - 10:30 am | चिंतामणी

नारायण गावापाशी जुन्नर फाटा आहे.

बाकी वर्णन वरती आले आहेच.

प्रवासवर्णन उत्तम लिहिले आहे.फोटोंची जोड असती तर निश्चितच अजुन रंगत आली असती.पुढ्च्या लेखनासाठी शुभेच्छा!

मोदक's picture

22 Nov 2012 - 11:57 am | मोदक

>>>कलावंतीण प्रमाणे याही खेपेला ओढणीचा दोरासारखा अतिशय योग्य वापर करता आला.

थोडे सांभाळून...

बाकी वॄत्तांत भारी... :-)

धन्यवाद. पर्यायी साधनांचा वापरसुद्धा मर्यादित असतो त्यामुळे दु:साहस करत नाहीच.

"बिबळ्यांच्या परिसरात वावरताना वाकणे, बसणे असे प्रकार टाळावेत. शक्यतो ताठ चालावं."

saumitrasalunke's picture

22 Nov 2012 - 2:37 pm | saumitrasalunke

जुन्नर आणि आजूबाजूच्या परिसरात अजूनही बिबळे आढळतात. प्रमाण अतिशय अल्प असलं तरी प्रमाण आहे हे निश्चित. मी काही वन अधिकाऱ्यांशी "बिबळे" या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. मुळात बिबळे आक्रमण करताना समोरचा प्राणी आपण आडवा करू शकतो का, आपला तो घास आहे का याचा आधी नीट अंदाज घेतात. एक दोघे जण सोबत असल्यास किंवा एखादा मनुष्य चालत असल्यास त्याच्या एकूण उंचीवरून शक्यतो ते आक्रमण करत नाहीत. मात्र आपण वाकलेल्या स्थितीत किंवा बसलेल्या स्थितीत असल्यास "हा प्राणी" आपण मारू शकतो याची खात्री त्यांना वाटू शकते. हा नियम अन्य प्राण्यांनाही बऱ्यापैकी लागू आहे. बसलेलो असल्यास सुद्धा झाडीकडे पाठ न करता तोंड करून बसावे.
...हे सगळं करून सुद्धा त्याने हल्ला केलाच तर समजावं कि मी हे जे काही लिहिलं ते बिबळ्यांनी वाचलं नाही:-)

चिखलू's picture

22 Nov 2012 - 8:00 pm | चिखलू

धन्यवाद.

किसन शिंदे's picture

22 Nov 2012 - 2:43 pm | किसन शिंदे

दुर्गभ्रमंतीचं लेखन तुम्ही छानच लिहिता.

शिवनेरी किल्ल्यातील पाळणा खरच शिवाजी महाराजांचा आहे का? त्याचे फोटो काढणे चालते का?
मला तर सिंहगडा पेक्षाही शिवनेरी किल्लाच खूप आवडला. येथील व्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न चांगला आहे.

पुण्याहून जायचे तर जुना पुणे मुंबई रोड, नाशिक फाटा,
नारायणगाव- जुन्नर असे जावे लागते

जुन्नर ही सातवाहनांची राजधानी होती.
इथे पाहण्यालायक असंख्य गोष्टी आहेत.
पायथ्याशी पंचलिंगाचे शंकराचे देऊळ आहे.
पुढे पाताळेश्वर आहे. अंबा अंबिका अंबालिका लेण्या आहेत.
जवळ लेण्याद्री, ओझर अशी गणेशस्थाने आहेत.
यादी आणखी मोठी होइल.
शिवनेरीवर आणि जुन्नर परिसरात अनेक गोष्टी एक्सप्लोअर करता येण्यासारख्या आहेत.

पण

आता अनेक गोष्टींची वाट लावणे सुरू आहे.

असो

प्लॅन कराल तेव्हा सांगेन

दीपा माने's picture

28 Nov 2012 - 8:15 am | दीपा माने

फारच छान लिहीलंत. अशा ठिकाणांना भेट देताना जी भावना मनात बळावते त्याचे आपण नेमकेच वर्णन केले आहे.

महिति उत्तम आहेतच , पण फोटो असण जरा आवश्यक

अत्रुप्त आत्मा's picture

11 Dec 2012 - 11:02 am | अत्रुप्त आत्मा

भटकंतित नैत फोटू,ती भटकंती कटू... :-/

इरसाल's picture

11 Dec 2012 - 11:28 am | इरसाल

वर वल्लींनी म्हटल्याप्रमाणे छायाचित्र हवेतच. तुम्हीही काही काढले असतीलच. जास्त पर्सनल नसतील तर टाकु शकता.