1.
कधी तरी दुपारी हे चक्र सुरू झालं. एका अप्लीकेशनच्या चाचणीसाठी काही वाद्यधून हवी होती. ती शोधण्यासाठी काही सुरावटी ऐकत होतो. तेव्हाच बहुदा हे डोक्यात शिरलं असावं.
---
गाणं निवांतपणी ऐकायचं नसतं. मन भरगच्च असतानाच गाणं ऐकावं. ते निवांतपणा देतं.
बहुदा गाण्याचा आस्वाद मेंदूच्या एका विवक्षीत भागातून होत असावा. आणि तो भाग नेहमीच गाण्यासाठीच असावा (ही अपेक्षा नाही. ही व्यवस्था आहे, अशा अर्थानं हे वाक्य). कायम आसुसलेला.
त्या भागाचे बंध इतर भागांशी असावेत. तो भाग गाणं ऐकत जातो तसा इतरांवर प्रभाव टाकत जातो आणि तिथंही निवांतपणा येतो.
---
आत्ता या क्षणी मी हे सांगतोय, तेव्हा इतर कुणाशी काही बोलू शकणार नाही; पण त्याच तन्मयतेनं गाणं मात्र ऐकू शकतो. किंवा गाणं ऐकताना निवांतपणे हे सांगू शकतोय.
ही गाण्याची करामत असावी. मघापासून लिहायचं म्हटलं तरी काही व्यक्त होतच नव्हतं. आता ही जी गत ऐकतो आहे, बासरी आणि संतूरची, ती मेंदूला, किंवा मनाला, इतकी जागं करते आहे की, बास्स!
तिला आंदोलनं आहेत. वलयं आहेत. तसंच विचारचक्र चाललंय.
मग हे शब्द बाहेर येतात.
आणि विशेष म्हणजे हे जे लिहितोय तेच मनात आहे. मन दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी नाही, किंवा मनात दुसरं काहीही नाही.
अद्वैत.
दुसरा कसलाही विचार नाही.
जे लिहितोय तेच फक्त.
ही गत कशी चालली आहे?
विस्तीर्ण मैदानावर आपण उभे आहोत. एक छानशी नागीण संथ गतीनं मैदान कापत निघाली आहे.
आपल्या दृष्टीचा पल्लाही लांबवरचा आहे. खूप लांबचा.
तितकं अंतर ती नागीण कापतीये ते आपल्याला दिसतंय.
शांतपणे. सळसळ नाही, काही नाही.
फक्त तिच्या अंगाची ती बाकदार वळणं.
संथ गतीतली.
डोळे मिटले तर हेच दिसेल. किंवा... आणखी एक दिसेल. पहाडावर उभे रहा. समोरून वळणं घेत जाणारी नदी.
संथ नदी.
नागीण म्हटलं की थोडं नकोसं वाटू शकतं. तर नदी.
नदी की नागीण याला महत्त्व नाही.
त्या वळणांना, त्या लयीला, त्या गतीला महत्त्व.
आणि त्याच्या दोहो बाजूंना महत्त्व.
ती गती अनुभवावी. ती अशी लिहिता येत नाही. रुपकं तरी कसली देणार! तो शब्दातीत अनुभव असतो.
तोच घेतला, घेतोय.
---
काही तरी ललित लिहावं असं वाटलं होतं. पण सुचेनाच. वैतागून मी अल्बम लावला. 'द व्हॅली रिकॉल्स'. ऐकत बसलो. पहिल्या पाचही धून तशाच ऐकल्या. शेवटची गत ऐकताना काही झालं आणि जे झालं ते लिहित सुटलो. तेच हे वर लिहिलं ते. ते लिहिताना दुसरं काही मनात नव्हतं अशी वेगळी एकात्मता. कशी आली, माहिती नाही. कशाला माहिती करून घ्यायची!
आता मला तो आरंभीचा साक्षात्कार कळला आहे.
"गाणं निवांतपणी ऐकायचं नसतं. मन भरगच्च असतानाच गाणं ऐकावं. ते निवांतपणा देतं.
बहुदा गाण्याचा आस्वाद मेंदूच्या एका विवक्षीत भागातून होत असावा. आणि तो भाग नेहमीच गाण्यासाठीच असावा (ही अपेक्षा नाही. ही व्यवस्था आहे, अशा अर्थानं हे वाक्य). कायम आसुसलेला.
त्या भागाचे बंध इतर भागांशी असावेत. तो भाग गाणं ऐकत जातो तसा इतरांवर प्रभाव टाकत जातो आणि तिथंही निवांतपणा येतो."
हे कळलं, त्याचं सूत्र होईल का?
हा माणसाचा पराभव असतो साला. जे अनुभवलं तेच, तसंच हुकूमी अनुभवता यावं याचा सोस. मग त्याचं सूत्र करण्याचा खटाटोप सुरू.
आत्ता या क्षणी मी वेगळंच काही तरी ऐकतोय.
मला सांगीतिक भाषेत लिहिता येत नाही हे बरं आहे! नाही तर मी 'सारेगमप'च्या भाषेत लिहित बसेन. त्यातून नुसते सूर कळायचे. सूर मनात-अंगात भिनायचे कधी?
आत्ता जे ऐकतोय, त्यात मघाची गती नाही. ही वेगळी धून. आरंभीची आलापी आहे. आलाप अजून आकारलेला नाही. त्यामुळं तो तसा समोर येत नाहीये.
ठिपक्यांची रांगोळी काढायला आपण सुरवात करतो तेव्हा आधी फक्त ठिपके मांडतो. तसे हे ठिपके दिसताहेत. पण गंमत म्हणजे, हे ठिपकेच मला तो माणसाचा पराभव दाखवताहेत.
ठिपके मी मनातल्या मनात जोडले की आकार येतोय, पण एरवी तिथं खरं तर फक्त ठिपकेच आहेत.
दृष्यांकन करण्याची क्षमता कामी येते, पण वास्तवात ते दृष्य अद्याप उभं नाहीये.
मी एक हुकूमत निर्माण करण्याचा खटाटोप करू लागलो होतो. तेव्हा, त्या ठिपक्यातून, त्यांचा अंगभूत कसलाही आकार 'असूनही' समोर नसल्याने, मला तो पराभव दिसू लागला.
शरणागत.
प्लेयरकडं माझं लक्ष गेलं. राग भूपाली.
शब्दांमध्ये आपण सूत्रं बांधतो का? निदान मनोव्यापारात तरी नक्कीच. भूपाली... म्हणजे सकाळचा प्रहर ना! ही तर मध्यरात्र. तरी त्या भूपालीच्या आलापी रूपरेखात्मतेतून मला सूत्रबद्धतेच्या मानवी अट्टहासाचा पराभव दिसतो! पराभवच.
मघाचा राग कोणता माहिती नाही, तेव्हाची गती आत्ता नाही, वळणंही नाहीत. ठिपके मांडत जाणं आहे फक्त. ठिपके...
आता त्या ठिपक्यांना जोडण्याचं काम सुरू झालं आहे. बासरी. स्पष्ट अगदी. पार्श्वभूमीवर काही शेवटच्या ओळीतले ठिपके संतूर. मग दोघंही गती घेतील... हो पुढं जोड आहे. प्लेयर तसं दाखवतोय...
---
एका कोपऱ्यात मेंदूत कुठं तरी हा व्यापार सुरू झालाय.
ठिपक्यांची रांगोळी. आधी फक्त ठिपके, ओळींत मांडून ठेवायचे. फक्त त्या ठिपक्यातून आकार गवसतो. मग ते ठिपके जोडत जायचं... आकार भरीव होत जातो. सजीव!
दीर्घ काळानंतर हे अनुभवलं. थोडं संदिग्ध, थोडं स्पष्ट...
तुमचाही मेंदू प्रवास करतो का एखाद्या मैदानातून? करत असावा! नाही तर ही वळणं, ही गती, ही लय कुठं भेटायची?
---
2.
भाषा म्हणजे काय, हा प्रश्न गणेश देवींना कधीही विचारू नये. म्हणजे, विचारायचा असेल तर आपल्याकडे किमान दोनेक तासांची निश्चिंती असली तरच विचारावा. 'आपल्याकडे' याला महत्त्व. अशा प्रश्नावर कदाचित त्यांचे दोनेक तास देण्यास गणेश देवी तयार असतील. आपल्याकडे तेवढी निश्चिंती आणि तेवढा दमसास नसेल तर हा प्रश्न त्यांना विचारू नये. परवा मी त्यांचं मनोगत ऐकलं.
भाषा म्हणजे काय, या प्रश्नाचे उत्तर देण्यास देवी सुरवात करतात तेव्हा ते कित्येक कोटी वर्षं मागे गेलेले असतात. म्हणजे, आज 'आपल्याला ज्ञात असलेल्या विश्वाचा जन्म झाला' तो क्षण ते आज अखेरपर्यंतचा कालखंड असा हा प्रवास असतो. प्रवासाचे टप्पे असतात. तसे इथेही टप्पे असतात. सूर्यमाला घडणे, त्यातील सजीवांचे स्थान म्हणून पृथ्वी घडणे, पृथ्वीवरील तशी सजीवसृष्टी घडणे हे टप्पे. तिथून अर्थातच माणसाचा जन्म. पाठीचा कणा घेऊन माणूस दोन पायांवर उभा राहू लागला आणि त्याचे हात मोकळे झाले, त्यातून दगडाचा माणसाने हत्यार म्हणून प्रथम वापर केला हा एक मैलाचा दगड असणारा टप्पा. तिथून भाषेच्या जन्माकडे अलगद येताना मध्येच पाश्चात्य (प्रामुख्याने ग्रीक) विचारविश्व आणि भारतीय (किंवा खरे तर पौर्वात्य) विचारविश्व यांची नाळ गवसलेली असते. ग्रीक विचारविश्वात तारे म्हणजे प्रकाश टाकणारे झरोके आहेत, आणि त्याचप्रमाणे अंधार फेकणारेही झरोके आहेत (म्हणजे होते). या प्रकाश-अंधाराच्या खेळात सावली नामक एक प्रकार असतो तो ग्रीक विचारविश्वात दुश्चिन्ह, भयचिन्ह मानला जायचा. तर, हे ग्रीक विचारविश्व बहिर्मुखी आहे.
पौर्वात्य विचारविश्वात सावली दुश्चिन्ह किंवा भयचिन्ह नाही. तिथं सावलीतही काही असतं असं मानलं गेलं आहे.
गणेश देवी हे सांगत शून्याकडं येतात. शून्य हे पौर्वात्य विचारविश्वात 'शून्य' नसतं, तर त्यात सारं काही असतं (आता हे सांगता सांगता ते आपल्या नोकरशाहीवर एक मिश्कील टिप्पणी नेहमीच्याच सुरात करताना म्हणतात की, आपल्याकडचं शुन्याचं हे तत्वज्ञान म्हणजेच 'माणूस हजर नसला तरी हजर आहे' असं मानणं असतं...). तर या सावलीचं, किंवा आपल्या पर्यावरणातील प्रत्येक गोष्टीचं अस्तित्त्व सांगण्यासाठी ती गोष्ट सांगणं यासाठी उच्चार आला. उच्चारातून भाषा जन्माला आली... गणेश देवी सांगत असतात. (मी इथं हे त्रोटक मांडलं. ते त्यांच्याच तोंडून ऐकलं पाहिजे... म्हणून दोनेक तासांची निश्चिंती हवी).
तर मग, भाषा म्हणजे काय? भाषेचं मूळ संगीतात आहे. संगीत आणि भाषा यातलं आधी काय? अजून तरी त्याचं निश्चित उत्तर सापडलेलं नाही. ते कधीतरी गवसेल माणसाला, असं ते सांगतात. तितकी वैज्ञानिकता त्यांच्याकडे आहे. हे संगीत कोणतं? तर माणसानं हे पारिसरिक व्यक्त करण्यासाठी केलेले, काढलेले, ऐकलेले आवाजच. ती भाषा, अशी काही मांडणी ते करत असतात. मग त्याच ओघात वाचा ही इतर प्राणीविश्वापेक्षा माणसाला वाढीव देणगी आहे, असं माणसाला वाटतं... असं ते सांगतात तेव्हा पुन्हा एकदा त्यांनी त्या भाषेचीच पंचाईत केली असते. एकाच वाक्यात दोनदा 'माणसाला' हा शब्द ते उगाच योजत नाहीत. त्यात बोलण्याचे दोन सूर असतात. त्या सुरावरून दुसऱ्यांदा आलेला 'माणसाला' हा शब्द आपल्याला वेगळा कळतोच कळतो...
कदाचित, भाषा म्हणजे संगीत हे असंही असावं...
---
3.
'उत्तररात्र' हा रॉय किणीकरांचा काव्यसंग्रह (खरं तर, त्याच्या पोटात 'रात्र'ही आहे). किणीकरांच्या या सगळ्या कविता म्हणजे एक विलक्षण अनुभव आहे. मला हे दोन कवी फारसे न वाचूनही डोकं फिरवणारे वाटले आहेत - बोरकर आणि किणीकर. किणीकरांचं वैशिष्ट्य - कविता गूढ वाटतात, कळतातही, कळल्यासारख्या तर निश्चितच वाटतात... त्यातून थोडं पुढं गेलं की कळतं 'निसटलं काही तरी...' आपण परत मागे कवितेकडे जातो. ती अधिकच गूढ वाटते. तर ते वाटो. त्यांचंच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या कविता चार ओळींच्याच आहेत. चारोळ्या नव्हेत.
घे शब्दकोश, ई - ईश्वर शोधुनी काढ
तो आत्मा दडला कुठल्या शब्दाआड
अर्थाला असते बंधन का शब्दांचे
कोसळून पडले इमले अक्षरतेचे
हे का आठवलं? मघाचा सूत्रबद्धतेच्या आग्रहाचा पराभव, मग 'माणसाला' या शब्दावरून झालेल्या करामतीतून दिसलेली वळणं, आणि आता अक्षरतेचे इमले कोसळून पडणं. या तिन्हीमध्ये एक लय आहे. नातंही आहे. बरं, पुन्हा अक्षरतेवरच किणीकर थांबतात का? नाही. त्यांनी शब्दच चॅलेंज केला आहे. शब्द म्हणजे, माझ्या मते, शब्दाची सुप्रीमसी. अर्थाचं सूत्र म्हणजे शब्दच ना? शब्दाला ते आव्हान देतात कारण त्यांना आत्मा 'पहायचा' आहे. त्यासाठी ते ईश्वराचं प्रमाण आधी तपासून पाहताहेत. तिथं शब्दकोश संपतो बहुदा. निदान, माझ्या मते, किणीकरांनी तो या ओळीत संपवला आहे.
आणखी एक. केवळ मुद्याच्या बळकटीसाठी.
हे स्वरूप चिन्मय देहापुरते नसते
हे स्वरूप चिन्मय देह जाळता उरते
देहात वितळते कणकण स्वरूप जेव्हा
ना सरते उरते स्वरूप चिन्मय तेव्हा
मला अधिक लिहिता येणार नाही. कारण या चार ओळींत मी तो मघा लिहिलेला गूढ, कळलेला, न कळलेला, निसटलेला अनुभव घेतो. नेहमीच. मला ही कविता कोणाकडून उकलून घेता येईलही. पण गरज नाही.
ना सरते उरते स्वरूप चिन्मय तेव्हा... एवढेच पुरे आहे! पूर्ण आहे. त्यात कशाची भर टाकली तरी ते पूर्णच असेल. त्यातून काही काढून घेतले तरी पूर्णच उरेल...
---
4.
"गणपतीच्या आकारात / रूपात असं काय आहे की अनेक कलावंतांना तो आवाहन करतो? या एकाच form मधे इतकं वैविध्य (material and form) आणि इतकी सर्जकता आणि कशी काय आणि का होते?" असा प्रश्न पडला होता (किंवा आहे) फेसबुकवर. आनंद थत्ते यांचा.
गजू तायडे यांच्या त्यावर दोन पोस्ट आहेत.
"गणपती देव वगैरे बाजूला ठेवलं तरी नुसतं त्याच्या दृष्य रूपाबद्दल बोलायचं झालं तर तो एक आगळा-वेगळा फॉर्म आहे. त्यात एकाच वेळी सौष्ठव, मार्दव, लालित्य आणि सौंदर्य आहे. किंवा द. ग. गोडश्यांना स्मरून सांगायचं तर त्याचं सौष्ठव हेच त्याचं सौंदर्य आहे. दुसरा असाच एक फॉर्म म्हणजे नंदी... सौष्ठवपूर्ण सौंदर्य!" त्यापु़ढं एका पोस्टमध्ये तायडे लिहितात, "गणपती कुणीही - अगदी चित्रकार नसलेल्या व्यक्तीने - चितारला तरी त्याचा मारुती होत नाही."
तायडे यांनी जे लिहिलं तेच थोड्या अधिक सकारात्मक शब्दांतून माझ्या एका मैत्रिणीनं लिहिलं. आपण अश्रद्ध आहोत, असं तिचं म्हणणं आहे (कदाचित ती तिची डोळस श्रद्धा असावी - म्हणू तसं...). निदान, सोपस्कार, पूजाअर्चा यात श्रद्धा नाही हे तरी नक्की. घरच्या गणपतीची सजावट झाली. त्यात तिचा सहभाग होता. तिनं लिहिलं, "मखर खूप सुंदर झालंय. खरं सांगायचं तर रात्री ते मखर खूपसं हंपीच्या देवळांसारखंच दिसत होतं. सुंदर; पण भकास, निर्जीव."
दुसऱ्या दिवशी काही झालं. काय वाटलं तिला?
"... मी हॉलमध्ये निवांत बसले होते दहा मिनिटं, आणि सहज मखराकडे नजर गेली, आज मला ते मखर एकदम जिवंत आणि चैतन्यमय वाटत होतं. कोणीतरी जीव फुंकला का त्यात? ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसणार्या मला असं का वाटावं? मग थोडा विचार केला, काल ते मखर रिकामं होतं, ती स्पेस गणपतीच्या सुबक मूर्तीने भरून काढली म्हणून, असं वाटलं असावं मला."
'सुबक' हा शब्द ओघवताच आलेला आहे या कथनात. रिकामं मखर भकास वाटत होतं, भरलेलं मखर सजीव वाटलं. सुबक मूर्तीनं पोकळी भरून काढली म्हणून? सौष्ठवपूर्ण सौंदर्यानं तिथं नेमकं काय केलं? आपल्या नजरेत रुतून बसलेल्या गोष्टीसारखी गोष्ट दिसल्याचा तो परिणाम आहे, असं म्हणता येतं.
फॉर्म? सूत्रबद्धता? की, मुळात वि-लक्षण रूप-स्वरूप असूनही त्यात माणसानं शोधलेल्या, आणि त्याच्या नजरेत रुतलेल्या, सूत्राचं यश?
---
5.
अलीकडेच वसंत पळशीकरांचं थोडं लेखन नव्या संदर्भात पुन्हा वाचण्याची संधी आली. अजून ते चालू आहे. वाचता-वाचता चर्चाही सुरू असते दोघा-तिघांशी. तर त्या दिवशी असंच बोलत असताना मी एकदम म्हणालो, जगण्यासाठी, जगणं सुकर करण्यासाठी, त्यातील प्रश्न कमीतकमी करून जगण्यासाठी आयडियॉलॉजीची गरजच काय?
अर्थात, उत्तर 'नाही' असंच आलं.
मी काही हे वेगळं आणि नवं सांगत नव्हतोच. खुद्द ज्यांच्यासंदर्भात बोलताना हे झालं, त्या पळशीकरांनी वेगळं काही सांगितलेलं मला तरी आठवत नाही. ते असो.
चर्चा पुढं सरकली, पळशीकरांना डावे आणि उजवे अशा दोघांनीही बाजूलाच सारलेलं आहे, असा मुद्दा आला. एकूण मराठीतील विचारविश्वात 'गाजणारी' नावं पाहिली तर त्यात पळशीकर नसतात, असं चित्र निदान आजच्या काळात तरी आहे, हे ध्यानी घेता तो मुद्दा वाजवीच आहे. तसं घडलेलंही असावं.
पळशीकरांनी एके ठिकाणी लिहिलंय -
"जगातील सर्व घडामोडींचे, विशेषतः मानवी व्यवहारांचे सर्वस्वी इहलौकिक स्पष्टीकरण शोधण्याच्या प्रयत्नांमधून उत्पन्न झालेली (ही) समाजशास्त्रीय जाण व दॄष्टी पायाखालची वाळू सरकती ठेवणारी आहे, कायम अस्थिरता उत्पन्न करणारी आहे. जगाचे नियंत्रण व संचालन करणारी पारलौकिक शक्ती आहे अशी ज्यांची श्रद्धा आहे, वा असा ज्यांचा 'साक्षात्कार' आहे त्यांची बैठक, ती श्रद्धा वा 'साक्षात्कार' टिकून असेपर्यंत अढळ राहते, राहू शकते. कारण या जगन्नियंत्या व जगच्चालक शक्तीकडून अमुक एक विचार व आचारप्रणाली प्राप्त झालेली आहे, ही धारणा त्या श्रद्धेचा वा साक्षात्कारी ज्ञानाचाच एक भाग असते. अशा शक्तीचे अस्तित्व नाकारणार्यांना ते स्वतःपुढे ठेवीत असलेल्या विचारप्रणालीविषयी देखील सापेक्षतावादी भूमिका मान्य करण्यावाचून गत्यंतर उरत नाही."
आता असं लिहिणाऱ्या पळशीकरांना 'उजवे' कसे स्वीकारतील, हा प्रश्न एकांना पडला.
पळशीकरांनी मार्क्सचं विश्लेषण करताना मार्क्सचं सौंदर्य दाखवतच एका लेखात त्याच्या मर्यादा इतक्या सडेतोड उभ्या केल्या आहेत की 'डावे' त्यांना नाकारणारच.
जे पळशीकरांचं, तेच गणेश देवींचं होतंय, असं मी परवा म्हणालो; पण देवी असोत वा पळशीकर, असं का व्हावं?
'मध्ये' काही आहे, असं नसतं का? पेच आहे, खरं तर.
विविध वादांच्या (थेअरी या अर्थाने) चौकटीतून जगरहाटीकडं पाहून तिच्यातील प्रश्नांची मांडणी करायची आणि त्या चौकटीतूनच उत्तरं सांगायचा प्रयत्न करायचा आणि मग मानवी व्यवहाराची व्यामिश्रता त्यात सामावली न गेल्याने जी फसगत होते, ती निस्तारण्यासाठी नवी वाद-चौकट निर्माण करण्याचा खटाटोप करायचा अशी ही किनाऱ्यावरची स्थिती. प्रवाह तर 'मध्ये'च आहे.
किनाऱ्यावरून प्रवाह दिसतो खरा; पण खोली कळेलच असे नाही, हे कळले पाहिजे.
---
6.
तर्क करायचा की नाही? विपश्यना करायला गेलो होतो. (सत्यनारायण गोयंका यांच्या पद्धतीच्या) विपश्यनेत आधी हे सांगितलं जातं की, तर्क करायचा नाही. "सांगितलं जातं ते करायचं".
विपश्यना करताना तर्कवितर्क-कुतर्क जागे नव्हते का? होते. तरीही, मी एकदम विपश्यना हा भंपकपणा आहे असं ठरवू शकलो नाही. कारण एका मर्यादेनंतर (माझ्या) तर्कबुद्धीला काही प्रश्नांची उत्तरं मिळेनाशी झाली.
मी विपश्यनेला पूजा 'केलं' नाही, की विपश्यनेचा 'दगड'ही ठरवला नाही. आपली-आपली मर्यादा स्वीकारलेली बरी.
पण हा प्रश्न येतोच. तर्क करायचा की नाही?
तर्कानुसारचाच एक पेच आहे.
आरंभीच्या तुकड्यात मी लिहिलं, भूपाली हा सकाळच्या प्रहाराचा राग, मी मध्यरात्री ऐकत असूनही माझ्या चित्तवृत्तींवर प्रभाव पडला आणि तो सकारात्मक होता. तर्कबुद्धी म्हणते, म्हणजे काय झालं सांग? मला सांगता येत नाही. टँजिबली दाखवता येत नाही इतकं तर नक्कीच. ते असो. प्रश्न वेगळाच आहे.
रागाचे सूर आणि काल यांचं नातं खरोखर आहे का? म्हणजे सुरांमध्ये अंगभूत असं काही आहे का की ज्याचं नातं दिवसाच्या प्रहरांशी असावं? या प्रश्नाचं तर्कसंगत उत्तर 'नाही' असं येतं. पण तेही पूर्ण पटत नाही. या उत्तरानुसार हा काही तरी स्मृतींशी संबंधित मामला असतो. स्मृतींशी संबंधित मामला म्हणजे सकाळी काही ऐकलेल्या गोष्टींशी सुरांचं नातं. पण हे नातं त्या गोष्टींमुळं अंगभूत होतं की सुरांच्या रचनेमुळं? गोष्टी बदलल्या आणि सूर तेच राहिले तरी अनुभवाची जातकुळी तीच असेल तर नातं सुरांमुळं अंगभूत होत असावं. पण मग स्मृतींचा संबंध संपतो आणि तर्क हरतो.
भूपाली या सकाळच्याच प्रहराशी नातं सांगणाऱ्या रागात मी काही स्तोत्रं वगैरे ऐकली आहेत असं स्मृती सांगतात आणि म्हणून तसंच काही ऐकलं की सकाळच्या प्रहराशी जोडलं जातं असं काही होतं का? तर्कानुसार, हो. पण स्तोत्र आणि विरहाची व्याकुळता यात फरक असतो. 'भैरवी'तून ती व्याकुळताही व्यक्त होते. तिचं काय करायचं? हे सापेक्ष आहे, अर्थातच. त्यामुळं, आपण मूर्ख आहोत, असं म्हणून हा प्रश्नांचा धांडोळा थांबवलेला बरा.
---
7.
अॅबसेन्स ऑफ प्रूफ इज प्रूफ ऑफ अॅबसेन्स, असं म्हणतात. मानायचं की नाही हे ज्याच्या-त्याच्यावर अवलंबून. अर्थातच मी मानत नाही. असले निर्णायक काही मला झेपत नाही.
कदाचित, यामुळंच, शास्त्रोक्तदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही याचा अर्थ ते 'नाही', असा होत नाही, असं आपण मानलं पाहिजे. म्हणजेच, ती गोष्ट 'नाही' यापेक्षा 'सिद्ध झालेली नाही' किंवा 'अ-सिद्ध आहे' असं म्हणता यावं. पण अॅबसेन्स ऑफ प्रूफ इज प्रूफ ऑफ अॅबसेन्स असा एक नियम मांडला की हा असा विचार करण्याची संधी किंवा अवकाशही संपून जातो.
साचा, सूत्र (फॉर्म, फॉर्म्यूला) यातच सारं आहे, असं एक गृहितक मांडायचं आणि मग त्यात सारं काही बसवायचा प्रयत्न करायचा असं करत जाणारेही नंतर हरतात, असं होत असावं. फक्त ते मान्य करणं अवघड जात असावं. पण हेही एक निर्णायक विधान होतंय. म्हणूनच, तीही एक शक्यता आहे असं म्हटलं पाहिजे.
मग, साचा, सूत्र याच्यापलीकडे जाता यावं का? कोणी गेलं तर ते सिद्ध होत नसल्याने 'तसं नाहीच' असं म्हणून ते निकालात काढायचं की, तशीही एक शक्यता आहे असं मानायचं?
काही नास्तिक असे आहे की ते आस्तिकता निकालात काढतात. पण काही नास्तिक असेही मानतात की आस्तिकता हीही एक वेगळी जीवनपद्धती आहे. या मोकळीकीला आवाहन केलं पाहिजे सातत्यानं.
एरवी, 'बंदीवान' तर असतोच माणूस.
साचा आणि सूत्र याच्या आग्रहातूनच सारं काही समजलं पाहिजे, असा एक आग्रहही जन्माला येत असावा.
आपल्या भोवतीच्या साऱ्यावर प्रभुत्त्व असावं असं वाटत असावं. त्यावर हुकुमी सार्वभौमत्त्व हवं असं वाटत असावं.
'समजलं' आणि 'समजलं नाही' यांच्या मध्ये काही असतंच. 'मध्ये' काही आहे, हे स्वीकारण्यासाठी 'समजलंच पाहिजे'चा आग्रह सोडावा लागतो बहुदा.
पण, आग्रह सोडण्याच्या आग्रहाचं काय? तो सुटला की माणसं 'योगी' होत असावीत.
प्रश्नांची उत्तरं तूर्त सापडणार नाहीत हे नक्की.
प्रतिक्रिया
29 Sep 2012 - 12:35 pm | नंदन
स्फुट अतिशय आवडले. 'न आकळलेलं काही'ची आठवण करून देणारे.
'मौनराग'मध्ये एलकुंचवारांनी 'सर्व कलांना संगीत व्हायचं असतं' असं म्हटलंय, ते या संदर्भात अगदी नेमकं ठरावं.
कविता कदाचित त्या उद्दिष्टाच्या अधिक जवळ जात असावी.
'असे काहीसे होईल अशी होती फार आशा;
असे काहीसे झालेले पाहताच थिजे भाषा'
सारखं काहीसं.
बाकी सारे काही सूत्रात बसवण्याच्या धडपडीबद्दल वाचून आईनस्टाईनने त्याच्या अखेरच्या वर्षांत 'युनिफाईड फिल्ड थिअरी'/'थिअरी ऑफ एव्हरीथिंग' शोधण्याचा ध्यास घेतला होता, ते आठवून गेलं.
29 Sep 2012 - 12:41 pm | बिपिन कार्यकर्ते
आह्ह!
29 Sep 2012 - 1:15 pm | सुहास..
केवळ महान !!
एखाद्या आयुष्याविषयीच्या चित्र-प्रदर्शनात चित्रकार त्याची सुंदर रंगरंगती असलेली चित्रे उलगडुन सांगतो आहे असा भास झाला.
29 Sep 2012 - 1:17 pm | प्रचेतस
खूप छान लिहिलंय.
29 Sep 2012 - 4:10 pm | कवितानागेश
अप्रतिम! :)
29 Sep 2012 - 4:34 pm | रश्मि दाते
आवडले
29 Sep 2012 - 8:58 pm | ढब्बू पैसा
तुमचं ललित लेखन म्हणजे पर्वणीच असते. रॉय किणीकरांचा उल्लेख असलेला तुकडा विशेष आवडला. कोलाज म्ह्टलंत तरी एक कॉमन कॅन्वास आहेच सगळ्या तुकड्यांना जोडणारा :)
29 Sep 2012 - 9:03 pm | पैसा
कोलाजमधून फक्त सौंदर्याचा अनुभव डोळ्यांना घेता येतो. यात काहीतरी गोधडीसारखे आहे. तुकड्यांना जोडून उबदार वाटायला लावणारे. तसंच कॅलिडोस्कोपची आठवण करून देणारे. काचांचे तुकडे जरा हलवले की वेगळेच आकृतीबंध तयार होतात. तसाच परिस्थिती बदलली की माणूसही वेगवेगळा दिसू लागतो. असो. लेखन आवडले.
29 Sep 2012 - 9:26 pm | मन१
पण सुरुवातीचे दोनेक परिच्छेद वाचून यकुनी श्रामोंचा आयडी हॅक केलाय असं वाटू लागलं होतं.
29 Sep 2012 - 11:35 pm | चिंतामणी
पण विस्ताराने प्रतिक्रीया काय द्यायची हे मला समजत नाही.
30 Sep 2012 - 12:08 am | सोत्रि
झक्कास, पैसातैने म्हटल्याप्रमाणे एकदम कॅलिडोस्कोपिक!!
- (तुकड्या-तुकड्यांत विखुरलेला) सोकाजी
30 Sep 2012 - 12:10 am | सोत्रि
>> 'समजलं' आणि 'समजलं नाही' यांच्या मध्ये काही असतंच. 'मध्ये' काही आहे, हे स्वीकारण्यासाठी 'समजलंच पाहिजे'चा आग्रह सोडावा लागतो बहुदा.
>> पण, आग्रह सोडण्याच्या आग्रहाचं काय? तो सुटला की माणसं 'योगी' होत असावीत.
कडक! खासंच एकदम !!
- (आग्रही) सोकाजी
30 Sep 2012 - 12:42 am | साती
किती कठिण लिहिता हो. समजलं वाटतंय तोवर कळेनासं होतंय.
गणेश देवींवर एक मोठा लेख लिहा बघू.
30 Sep 2012 - 11:40 am | सहज
हेच ते प्रोफेसर देवी ना?
30 Sep 2012 - 1:07 am | प्रभाकर पेठकर
वाचलं. काही कळलं, काही नाही. लेखन उच्च प्रतीचे असल्याने माझ्या समज कक्षेबाहेर आहे, की माझ्या समज कक्षेबाहेर असल्याने 'उच्च' वाटत आहे, ह्यावर निर्णय होत नाहीए. असो. पुन्हा पुन्हा वाचावे लागेल असे दिसते आहे.
30 Sep 2012 - 10:24 am | ५० फक्त
+१००
30 Sep 2012 - 4:28 am | रेवती
धन्यवाद. तुमच्या लेखनावर याउप्पर प्रतिक्रिया देऊ शकत नाही.
कधी काही वाचून, ऐकून त्याच्याशी संबंधित नसलेल्या वेगळ्याच प्रश्नाचे उत्तर मिळून जावे तसे माझे झाले आहे. प्रश्नही फार गंभीर वगैरे नसतो पण मनात अडकून बसलेले काहीसे......... त्याचे उत्तर मिळाले.
30 Sep 2012 - 7:34 am | सहज
ह्या गणपती उत्सवात अगदी मेजवानी आहे. एकसे एक मोठे लोक भारी भारी लिहत आहेत...
---------------
हम ने देखी है उन खयालोंकी महेकती खुशबू, तर्कसे बांध के उसे सुत्रोका नाम ना दो, सिर्फ एहसास है रुह से मेहसूस करो.
30 Sep 2012 - 11:50 am | स्वाती दिनेश
कॅलिडोस्कोपिक कोलाज आवडले,
स्वाती
30 Sep 2012 - 6:01 pm | राजेश घासकडवी
काव्यमय लेखन. संगीत, विचार, जीवन यांच्या असण्या-नसण्याचा टोकदार (टोकांचा) ऊहापोह. पटला नाही, पण जमून आला आहे. (काहींना पटेलही, पण पटण्यासाठी तो समजून घेतला आणि सूत्रबद्ध झाला तर काय घ्या? :) )
उदाहरणार्थ रॉय किणीकरांच्या खालील ओळी
अर्थाला असते बंधन का शब्दांचे
कोसळून पडले इमले अक्षरतेचे
जमून आलेल्या आहेत. शब्दांच्या इमल्यांची 'अक्षर'ता या श्लेषातूनच खूप काही साधलं आहे. हा अर्थ मांडायला त्यांना प्रभावी का होईना पण शब्दच वापरावे लागले यातही आणखी बरंच येतं.
>>अशा शक्तीचे अस्तित्व नाकारणार्यांना ते स्वतःपुढे ठेवीत असलेल्या विचारप्रणालीविषयी देखील सापेक्षतावादी भूमिका मान्य करण्यावाचून गत्यंतर उरत नाही.
यातही एकतर सर्व सापेक्ष किंवा सर्वच निरपेक्ष असा द्वैती विचार इथे दिसतो. कुठल्यातरी काल्पनिक शक्तीला 'ही माझी घट्ट जमीन आहे' असं म्हटल्याने वाळू सरकायची थांबत नाही.
सूत्र, साचा विरहित अनुभूती असेल कदाचित. पण विचार असतील का? हाही प्रश्न रहातोच.
का पटलं नाही याची कारणं दिली म्हणून आवडलं नाही असं नाही हे पुन्हा नमूद करतो.
30 Sep 2012 - 10:20 pm | सुचेता
रॉय किणीकरांच्या कवितांचा परिचय प्रथम गोव्यात संपादक शरद कारखानीस यांजकडुन झाला, विलक्शण तकदीच लेखन, कधी कळतेय असे वाटे वाटे पर्यंत काही तरी निसटतेच.
1 Oct 2012 - 11:47 am | ऋषिकेश
आज वेळ काढून आरामात वाचलं.. अपेक्षेप्रमाणे अतिशय आवडलं!
एटला सो हाय क्लास!
1 Oct 2012 - 12:05 pm | सुबक ठेंगणी
परत एकदा डेरिडा, लाका, बार्थच्या दुनियेत परत गेल्यासारखं वाटलं...
"Thus, complete meaning is always "differential" and postponed in language; there is never a moment when meaning is complete and total. A simple example would consist of looking up a given word in a dictionary, then proceeding to look up the words found in that word's definition, etc., also comparing with older dictionaries from different periods in time, and such a process would never end."
अर्थ कळला आहे असं म्हणू का? का नाही कळलाय असं म्हणू? का कदाचित कळलाय असं म्हणू?
आय डोन्ट नो...
2 Oct 2012 - 7:12 am | राजेश घासकडवी
यात दिलेला पॅराडॉक्स काल्पनिक आहे असं वाटतं. कारण शेवटी आपण एकमेकांशी संवाद साधतो, फारच थोड्या बाबतीत अर्थ न समजल्यामुळे विसंवाद होतो. याचा अर्थ डिक्शनरीतल्या शब्दांच्या पलिकडच्या पातळीवर आपल्याला अर्थाची जाण असते. 'चालणे' किंवा 'धावणे' या शब्दांचे अर्थ कृतींमधून व निरीक्षणांतून समजलेले असतात. या अर्थांच्या आधारे आपल्याला 'वेग' या शब्दाचा अर्थ लावता येतो. किंवा त्या संकल्पनेसाठी त्या शब्दाची गरज भासते, आपण तो वापरतो, आणि नंतर डिक्शनरीत लिहून ठेवतो. पण कुठच्याच पातळीला तो समजत नाही असं म्हणणं बरोबर वाटत नाही. किंवा सर्वमान्य व्याख्या करून डिक्शनरीत ती लिहून ठेवणं पूर्णपणे निरुपयोगी, हेही पटत नाही.
1 Oct 2012 - 12:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख आरामात आणि शांतपणे वाचला. दोनदा वाचला. . लैच जड गेलं कोलाज समजायला. एखादी कविता वाचल्यावर काही तरी समजतं, एखादी कथा वाचल्यावर काही तरी पोहचतं. तसं 'कोलाज' मधून काही नीटपणे पोहचलं का ? तर एक वाचक म्हणुन मला लेखनाचा आनंद लुटता आला नाही. नुसताच भिजलो आणि आतून कोरडा तसं. पण, असं तरी का ! अर्थात माझ्या आस्वादाच्या मर्यादा असाव्यात त्यामुळे तसं झालं असावं.
लेख संगीताबद्दल काही तरी सांगतोय, लेख कलेच्या अविष्काराबद्दल आणि सौंदर्याच्या शोधाबदल बोलतोय, लेख स्वर,व्यंजनाच्या आणि भाषेच्या निर्मितीबदल आहे का, लेख रॉय किणीकरांच्या ''या पाणवठ्यावर आले किति घट गेले, किति डुबडुबले अन बुडले वाहुनि गेले'' अशा कवितांचा शोध घ्यायला सांगत आहेत, गणेश देवी आणि त्यांचे विचार गुगलुन काढा असे सांगत आहेत. लेखकाला लेखनाच्या फॉर्मेट (आकृतीबंधाबद्दल) बद्दल काही बोलायचं आहे, मानवी मनाच्या गुंत्याबद्दल काही आहे, किंवा लेख मनोविश्लेषनवादी समीक्षेचा अभ्यास करायला सांगत आहे, कोलाजच्या निमित्तानं प्रश्न आणि प्रश्नच.
ग्रेसच्या लेखनासारखा उच्च आणि शब्दांच्या (गुढ ) पसार्यात माझ्यापूरता साला हा आस्वादाचा ' तिढा ' काही सुटला नाही.
-दिलीप बिरुटे
1 Oct 2012 - 12:41 pm | सुहास..
@ बिरूटेसर , तुमचे उत्तर धाग्यातच ..ईथे
जगातील सर्व घडामोडींचे, विशेषतः मानवी व्यवहारांचे सर्वस्वी इहलौकिक स्पष्टीकरण शोधण्याच्या प्रयत्नांमधून उत्पन्न झालेली (ही) समाजशास्त्रीय जाण व दॄष्टी पायाखालची वाळू सरकती ठेवणारी आहे, कायम अस्थिरता उत्पन्न करणारी आहे
1 Oct 2012 - 12:53 pm | प्रीत-मोहर
पॉशच.
1 Oct 2012 - 5:26 pm | प्रभो
मस्त!!
1 Oct 2012 - 11:31 pm | चित्रा
कोलाज लक्षात राहील असे आहे.
यावर काही लिहीणे म्हणजे एखाद्या चित्राला भिंग लावून पहाण्यासारखे आहे. ते करण्याचा मूड येईल तेव्हा नंतर लिहीन.
अवांतर -यशोधराचे आजचे लेखनही अशाच स्वरूपाचे वाटले. असो.
2 Oct 2012 - 10:18 am | चैतन्य दीक्षित
लेख छानच झाला आहे. वाचताना काही भाग कळला असे वाटेपर्यंत येणारं पुढचं वाक्य जरा 'बाउंसर' जात होतं.माझा अनुभव थिटा आहे असंही वाटलं काही वाक्यांबद्दल. आणि पुन्हा 'अनुभव हा अनुभव असतो, त्यात लहान मोठं काही नसतं, किंवा नसावं' असंही मनात आलं.
अनेक प्रश्न पडले..उत्तरे शोधायला हवीत. आणि हे ज्याचं त्यानी करायचं असतं हे ही नक्कीच. (शब्द चिमणे चिमणे, अर्थ मादी, बोले मिनिटा मिनिटा- विसंवादी- ही कविताही आठवून गेली).... तुमच्या लेखावर प्रतिक्रिया द्यायची म्हणजे जरा अवघडच काम खरं.
2 Oct 2012 - 12:15 pm | मस्त कलंदर
लेख विस्कळित खरा, पण त्या विस्कळिततेही व्यवस्थिपणा जाणवून देणारा. आधुनिकोत्तर म्हटलं की बर्याचदा मला अगम्य वाटतं. हा लेख त्याला अपवाद ठरावा. अर्थात असं "मारूततुल्य वेगानं धावणारं मनोजवं पकडण्याचं शिवधनुष्य श्रामोंनी समर्थपणे पेललं आहे असं म्हणून मी माझे दोन शब्द संपवते." ;-)
2 Oct 2012 - 1:01 pm | परिकथेतील राजकुमार
>>गाणं निवांतपणी ऐकायचं नसतं. मन भरगच्च असतानाच गाणं ऐकावं. ते निवांतपणा देतं.
श्रामोंच्या लिखाणाचे नेमके उलटे आहे. ते मन निवांत असतानाच वाचावे. ते मनाला भरगच्चपणा (आणि मेंदूचक्राला चालना) देते.
2 Oct 2012 - 1:55 pm | स्मिता.
लेख तर अप्रतिम आहेच पण पराचा प्रतिसादसुद्दधा त्याला साजेसाच आहे.
>>श्रामोंच्या लिखाणाचे नेमके उलटे आहे. ते मन निवांत असतानाच वाचावे. ते मनाला भरगच्चपणा (आणि मेंदूचक्राला चालना) देते.
+१११११
2 Oct 2012 - 2:32 pm | गणपा
'कोलाज' आवडले.
या लेखमालेच्या निमित्ताने लिहिते झालेल्या मान्यवरांना एक विनंती आहे.
या साहित्यिक मेजवानीसाठी, कृपया पुढल्या गणेशोत्सवापर्यंत वाट पहायला लावू नका.
:)
2 Oct 2012 - 9:45 pm | धनंजय
कोलाज आवडले.
शब्दांना "शक्ती" असते, ती नेमकी काय असते? (शक्ती म्हणजे तथ्याशी अर्थ-संबंध.) शब्दांना मुळीच अर्थ नसतो हे एक टोक. शब्दावेगळा अर्थच नसतो, हे दुसरे टोक. या टोकांच्या मध्यातले पूर्ण क्षेत्र कोण्या-कोण्या तत्त्वप्रणालीने धुंडाळले आहे. बहुधा प्रत्येक व्यक्ती या दोन टोकांमध्ये अधूनमधून डोलत असते.
भूतकाळातील प्रत्येक अनुभव एकमेवाद्वितीय असतो. शब्द मात्र परत-परत वापरता येतात. परत वापरता येईल अशा शब्दात एकमेवाद्वितीय अनुभव मावणे शक्यच नसते.
भविष्यातील अनुभव फक्त कल्पनेतच असतात, तपशिलांबाबत धूसर असतात. शब्द आणि तर्क धूसर भावी अनुभवांकरिता पुरेसे असतात. एका व्यक्तीचे भूतकाळातले अनुभव हे दुसर्या कोणाच्या भविष्यकाळातल्या अनुभवांना मार्गदर्शक होऊ शकतात. कदाचित श्रावण मोडकांनी भूतकाळात ऐकलेले "द व्हॅली रिकॉल्स" संगीत भविष्यकाळात मी ऐकेन. या भविष्यकाळातील अनुभवांना मार्गदर्शक म्हणून श्रावण मोडकांनी त्यांच्या भूतकाळातल्या अनुभवांचे केलेले वर्णन (ते लंगडे का असेना) मार्गदर्शक आहे.
प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक अनुभव एकमेवाद्वितीय असतो. पण तरी त्यातील काही अद्वितीय तपशील गाळले, आणि काही विलक्षण तपशील राखले, तर असे दिसते की वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या अनुभवांत "विलक्षण" साम्य आहे. सह-अनुभवाची ऊर्मी उपजत असते. या सह-अनुभवांकरिता शब्द आणि तर्क ही माध्यमे पुरेशी आहेत. अनुभवाचा काही भाग सह-अनुभव असतो, काही भाग एकमेवाद्वितीय असतो, हे लक्षात राहिल्यास अपेक्षा ठीकठाक राहातील. योग्य ठिकाणी शब्दा-तर्कांची अचाट शक्तीही जाणवेल, आणि योग्य ठिकाणी शब्दा-तर्कांचे नि:संदर्भ असणेदेखील अपेक्षितच असेल.
3 Oct 2012 - 1:22 pm | श्रावण मोडक
समस्तांचा कृतज्ञ आहे.
हे लेखन म्हणजे, एक विचारचक्राचा भाग आहे. त्यामुळं त्यात कोणतंही विधान नाही. भाषेची माझी मर्यादा आहे.
कोणत्याच प्रश्नाचे उत्तर मला मिळालेले नाही. त्यामुळे लेखन न पटण्याबद्दल आलेल्या प्रतिसादांचेही पूर्ण स्वागत. त्यातून माझ्याही विचारचक्राला काही गती मिळाली आहे. ती गती पुन्हा काही नव्या प्रश्नांना जन्म देऊन गेली, काही जुन्यांची उत्तरं देऊन गेली.
सूत्राचा, साच्याचा इन्कार करता येणार नाही, पण सूत्र आणि साच्यातच सारे बसवायचे ठरवले तरी त्यात लवचिकता इतकी लागेल की सूत्र आणि साचा या शब्दांची व्याख्याच चॅलेंज होईल *असा काही तरी* हा खेळ आहे. त्यामुळे धनंजयने शेवटी जे लिहिले शेवटच्याच परिच्छेदात ते तूर्त खरे... :-)
4 Oct 2012 - 8:35 pm | विलासराव
आवडले.
बरेचसे समजले असे वाटते आहे. पण तुम्ही म्हणाल काय समजले ते सांगा तर सांगणे अवघड आहे.
5 Oct 2012 - 1:25 am | राघव
मस्त वाटलं वाचून! पण तरी पुरेसं अनुभवलं नाही..
त्या विचारचक्राचा एक भाग होऊन तसं अनुभवणं कदाचित हवं ते देऊ शकेल. :)
एक शंका..
समजा कोणतीही आयडिऑलॉजी अस्तित्वातच नाही.. कसं जगू आपण त्यावेळेस्?
तिथं तर्क राहणार नाहीत. कारण तर्क आला म्हणजे आधीच्या कोणत्याही निष्कर्षावर अवलंबून राहणं झालं..
याचा अर्थ अनुभव हीच खात्री असा प्रकार होईल. पण पुढच्यास ठेच.. या उक्तीप्रमाणे पुढच्या पिढीत तेच अनुभव आयडिऑलॉजी म्हणून येणार नाहीत का?
8 Oct 2012 - 1:39 pm | यकु
ॐ सहनावतु सह नौ भुनत्तु सहवीर्यं करवावहै,
तेजस्विनां धीतमस्तु मा विद्विषावहै |
ॐ ब्रह्मार्पणं ब्रह्महविः ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतं |
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना |