(बोध)कथा

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in विशेष
28 Sep 2012 - 10:52 am
श्रीगणेश लेखमाला २०१२

मला ना हा बोधकथा प्रकार खूप म्हणजे भयानकच आवडतो. घेतला तर बोध, नाही तर नुसती कथा म्हणूनही वाईट नाहीच. हो की नाही? तसंही बघितलेत का तुम्ही बोधबिध घेणारे लोक कधी? पण ते जाऊ दे. आपण लक्ष नाही द्यायचं. गणपती ही बुद्धीची देवता आहे की नै? मग आपण बाता तरी करू बोध वगैरे घ्यायच्या. तर म्हणून या काही (बोध)कथा. आणि या गणपती उत्सव पेश्शल असल्यामुळे प्रत्येकाने रूचेल पचेल तो बोध घ्यावा ही विनंती मात्र नक्कीच आहे.

पण ते ही एक असोच... (हे 'असोच' सुद्धा आम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या बोधांमुळेच बरं का!)

भानगड

तर एकदा काय झालं, विक्रम आजही असा नेहमीसारखा स्मशानातल्या झाडाखाली गेला. किर्र अंधार होताच. वेताळही वाटच बघत होता. (इतक्या वर्षांनानंतर, विक्रम आणि वेताळ एकमेकांना खूप युज्ड टू झालेत, यु नो!) मात्र आता विक्रम वेताळाला खांद्यावर वगैरे घेत नाही. दॅट्स सो ओल्डफॅशन्ड! ते दोघेही आता रात्रीच्या अंधारात मस्तपैकी शतपावली करतात. सुखदु:खाच्या चार गोष्टी बोलतात. रिस्पेक्टिवली, राणी आणि हडळीमुळे होणारा त्रास शेअर करतात एकमेकांशी. आणि स्वस्थपणे घरी जातात. किती वर्षं ते प्रश्न विचारायचे, डोक्याची शंभर शकलं करायची धमकी द्यायची? सो बोरिंग, यु नो!

पण, आज मात्र विक्रम खूपच अस्वस्थ होता. वेताळाच्याही ते लक्षात आलेच होते म्हणा. पण विक्रमाची ती ठसठस त्याने आपणहून व्यक्त करावी याची वाट बघत तो निवांतपणे गवताची काडी चघळत, इकडच्या तिकड्याच्या गप्पा मारत चालत राहिला. शेवटी विक्रम मुद्द्यावर आलाच. वेताळाच्या खांद्यावर हात टाकत तो म्हणला,

"यार वेताळ, काय साली ही दुनिया आहे राव! एक नंबर हरामखोर %&^#$^* !!!"

वेताळ जरा चपापला. मामला संगीन है! विक्रम एकदम अपशब्दांवर उतरला म्हणजे नक्कीच हे यडं काहीतरी उग्गाच मनाला लावून बसलंय.

"अबे! शिव्या काहून द्यायलास बे? काय झालं ते नीट वट्ट सांग भौ."

"यार आत्ता इथे येत असताना एक नवरा बायको आणि एक गाढव रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले बघ मला."

"आत्ता? इतक्या रात्री? साला हे स्मशान इथून जवळ आहे हे माहित नाही त्यांना? कमाले!"

'त्या नवराबायकोची थोडी गंमत करावी का?' या विचारात वेताळ पडला. विक्रमाला ते कळले.

"अरे छोड ना यार! आधीच बिचारे दु:खी वाटले. डोक्याला हात लावून बसले होते बघ. मी विचारायला गेलो तर बोलेचनात."

"च्याबायलीच्या, आस्सं? काय झालं काय असं?"

"अरे तेच विचारत होतो. खूप छेडलं तेव्हा कळली भानगड."

"काय ती?"

"तो त्या नदीपल्याडच्या गावातला कुंभार होता. सकाळी बायकोला घेऊन बाजाराला गेला होता. तिथे त्याने एक गाढव विकत घेतलं. आणि बाजार उरकून यायला लागले दोघे परत. गाढव होतंच बरोबर. उन्हाचा कडाका होता, तलखी लागत होती, दहा पावलं चालणं कठीण होत होतं म्हणून याने बायकोला गाढवावर बसवलं. तेवढेच श्रम कमी तिला."

"मग?"

"मग काय? तेवढ्यात समोरून काही पोरं आली. गावातली उनाड पोरं रे, काही काम ना धाम, उगाच लोकांची चेष्टा करत फिरणं हाच उद्योग. त्यांनी त्या बाईला म्हणलं की, 'बये, नवरा म्हणजे साक्षात परमेश्वर! त्याला पायी चालवतेस आणि स्वतः गाढवावर बसतेस? कुठे फेडशील हे पाप?'"

"अरारारा! काय बेनं रे हे? मग काय बाई उतरली का गाढवावरनं?"

"आता कोणती बाई हे असं झाल्यावर गाढवावर बसेल? उतरलीच ती. आणि आणाभाका घालून तिने नवर्‍याला गाढवावर बसवलं. पुढे चालू लागले तर वाटेत दुसरी काही माणसं भेटली त्यांना. ते तर त्या कुंभाराला मारायला धावले. त्यांचं म्हणणं की एवढ्या उन्हात बाईला पायी चालवून हा स्वतः मारे गाढवावर बसून चाललाय. त्यांनी त्याला उतरवलाच खाली."

"ही बलाच झाली म्हणायची की रे! मग पुढे?"

"पुढे काय! दोघंही वैतागले. त्यांनी ठरवलं की आपण दोघंही बसू गाढवावर. म्हणजे कोणी बोलायचा प्रश्नच नको. बसले की दोघेही गाढवावर. तर त्यांना अजून काही लोक भेटले रस्त्यात. त्यांनी तर अक्षरशः चार ठेवूनच दिल्या त्या कुंभाराला."

"आँ! आणि त्या का म्हणून?"

"म्हणे दोन माणसांचा भार त्या बिचार्‍या मुक्या जनावरावर टाकला ना रे त्यांनी... ते गाढव पार वाकलं होतं ओझ्याने. मग मार खाल्ल्यावर दोघेही हबकलेच. आता काय करावं हेच त्यांना समजेना बघ, मग त्यांनी ठरवलं की आता आपण दोघांनीही चालायचं, कोणीच बसायचं नाही गाढवावर."

"म्हणजे आधी जसं होतं तसं. बॅक टू स्क्वेअर वन!"

"हो! पण अजून थोड्या वेळाने त्यांना परत काही जण भेटले आणि त्यांनी तर यांना वेड्यात काढलं... हसायला लागले ते यांना. काय तर म्हणे, एवढं गाढव बरोबर असताना कोणीच त्याच्यावर बसलं नाहीये, एवढ्या ऊन्हात पायीच चालतायेत दोघं."

"हाहाहाहा! तूफान विनोदीच सिच्युएशन की!"

"तेव्हापासून ते दोघंही आता काय करावं म्हणून जे बसलेत रस्त्याच्या कडेला ते अजून बसले आहेत. काय करावं त्यांना कळत नाहीये. गाढवावर बसावं तरी पंचाईत, न बसावं तरी पंचाईत. मलाही विचारलं त्यांनी काय करू म्हणून. मला काहीच सुधरेना बघ. चूपचाप सटकलो तिथून. तूच सांग बा वेताळा! काय करावं त्यांनी? कोणाचं ऐकावं?"

"काय साला जमाना आलाय! आजकाल तूच मला गोष्टी सांगायलास बे! आणि उत्तरं पण एक्स्पेक्ट करतोस! हॅहॅहॅ!"

"जा बे, भाव नको खाऊ! नीट सांग. मी पण चक्रावलोय बघ. साला, जगात सल्लागारच सगळे. आणि एकाचं ऐकावं तर दुसरा नावं ठेवतो आणि दुसर्‍याचं ऐकावं तर तिसर्‍याला राग येतो. कटकटच आहे राव!"

"अरे बाबा! अगदी सोप्पंय रे, आय मीन, म्हणलं तर सोप्पंय. म्हणलं तर बेक्कार कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन. जगात शहाणे, दीडशहाणे, अतिशहाणे भरपूर भेटतात. जग म्हणजे वेड्याचा बाजार आहे. पण बेसिकली अशा परिस्थितीत दोन पर्याय असतात."

"कोणते?"

"सांगतो."

***

पर्याय.१

नेहमीप्रमाणे, एक राजा असतो आणि त्याचा एक प्रधान असतो. ऑफ कोर्स तो प्रधान अगदी विश्वासू, मित्रवत इ.इ. असतो. दोघे एकदा असेच गप्पा मारत असतात. तेवढ्यात राजवाड्यासमोरून एक साधू चाललेला असतो. राजा त्याला आत बोलावतो आणि त्याचा आदर सत्कार करतो. साधू खुश. तो राजाला म्हणतो,

"हे राजन! तू माझा इतका आदर केलास तर मी आता तुला काही देणं लागतो. तर ऐक, आजपासून बरोब्बर १५ दिवसांनी या गावात एक वादळ येणार आहे. ते जादूचं वादळ असणार आहे. त्याचं वारं ज्याच्या कोणाच्या कानात जाईल त्याला वेड लागेल." एवढं बोलून साधू निघून गेला. राजा आणि प्रधानाची जाम फाटली. आता काय करायचं? दोघांना काही सुचेना. शेवटी रिवाजाप्रमाणे प्रधानाला एक युक्ति सुचली.

"सरकार, आपण एक काम करू. आपण एक एकदम एअरटाइट खोली बांधू आणि आपल्या कुटुंबियांसमवेत त्यात वादळ यायच्या आधीच जाऊन बसू. वादळ थांबलं की बाहेर निघू. शिंपल!"

राजा खुशच खुश. खोली वगैरे बांधून झाली. ठरल्याप्रमाणे वादळ आलं. वादळाची चाहूल लागताच हे दोघे आपापल्या फ्यामिलीसकट खोलीत गेले आणि दार घट्ट लावून घेतलं. थोड्यावेळाने वादळ शमलं. सगळं काही स्थिरस्थावर झाल्याची खात्री करूनच राजा आणि प्रधान खोलीबाहेर पडले. बघतात तर काय, बाहेर राज्यातले बाकीचे सगळेच लोक वेडे झाले होते. नुसता धिंगाणा चालू होता. कुणी नाचत होतं, कुणी गात होतं, कुणी रडत होतं, कुणी कपडे फाडत होतं. हे दोघेही बघतच राहिले. खोलीत जाताना हे असं होईल हे लक्षातच आलं नव्हतं त्यांच्या. हताशपणे दोघेही बाकीच्या पब्लिककडे बघत बसले. एक दोघांना त्यांनी समजवायचाही प्रयत्न केला. काही फरक पडला नाही. उलट हे दोघे आपल्यासारखे वागत नाही म्हणून लोकच त्यांच्या अंगावर धावून आले. हे दोघे घाबरले आणि त्यांनी परत खोलीत धाव घेतली. दार आतून लावून घेतलं आणि विचार करू लागले. ऑफ कोर्स, आयडिया प्रधानालाच सुचली.

"हुजुर, आता एकच उपाय दिसतो आहे. सगळे जसं वागतायेत ना, आपणही तसंच वागायचं."

"म्हणजे! आपणही वेडं व्हायचं? काय बोलताय काय तुम्ही प्रधानजी? कळतंय का तुमचं तुम्हाला तरी?" राजा ओरडला.

"अगदी बरोबर, अगदी हेच म्हणतोय मी. आणि महाराज, शहाणपण म्हणजे तरी काय? चारचौघे जसे वागतात तसं वागणं म्हणजे शहाणपण. आज शहाणपणाची व्याख्याच बदलली आहे. आपण निमूटपणे ते नवीन शहाणपण मान्य करायचं आणि कातडी बचावायची."

"अहो पण..."

"आता पण नाही नी बिण नाही... जीव वाचवायचा असेल तर एकच मार्ग... एऽऽऽ नाचोऽऽऽ धत्तड तत्तड धत्तड तत्तड"

***

"वेताळा आलं बरं लक्षात! If you cant help it, then just jump in and enjoy it! त्रास नाही करून घ्यायचा, असंच ना?"

"करेक्ट! स्मार्ट आहेस."

"पण आता दुसरा काय ऑप्शन."

"अरे तो तर खूपच सोपा आहे. सांगतो. ऐक."

***

पर्याय.२

राजा, त्याचा तो मित्रासारखा प्रधान, राजवाडा, निवांत गप्पासेशन, साधू वगैरे वगैरे सेमच बरं का. मात्र इथे साधू रस्त्याने चूपचाप जायचं सोडून ओरडत चाललेला असतो,

"सुखी जीवनाचा मूलमंत्र, फक्त एक रूपयात! सुखी जीवनाचा मूलमंत्र, फक्त एक रूपयात!"

हे ऐकून राजा पेटतोच. च्यायला मी एवढा मोठा राजा आहे तरी अजून सुखी नाही आणि हा साधू चक्क सुखी होण्याचा मंत्र विकतोय, तोही फक्त एक रूपयात? तो साधूला बोलावतो आणि एक रूपया देतो.

"आता बोला बाबाजी, काय आहे तो मंत्र!"

"हे राजन, नीट ऐक... तो मंत्र आहे 'जो भी होता है भले के लिए होता है'... दॅट्स ऑल!"

साधू निघून जातो.

राजा चक्रावतो. पण काय करणार! एका रूपया अक्कलखाती गेला असं म्हणून तो गप्प बसतो.

बरेच दिवस जातात. राजा हे सगळं विसरूनही जातो. परत एकदा एका निवांत संध्याकाळी राजा अँड प्रधान अगेन रिलॅक्स करत असतात राजवाड्याच्या बागेत. फळं वगैरे पडलेली असतात समोर. गप्पा मारता मारता राजा एक सफरचंद घेतो कापायला आणि बोलायच्या नादात स्वतःचं बोट कापतो. ही धार लागते रक्ताची. बोटाचा तुकडाच पडलेला असतो. सगळीकडे बोंबाबोंब सुरू होते, गोंधळ होतो. राजा ओरडत असतो, विव्हळत असतो. कोणी मलम आणायला धावतो कोणी पट्टी आणायला धावतो. प्रधान राजाला शांत करायचा प्रयत्न करायला लागतो. आणि तो बोलून बसतो,

"महाराज, साधूने काय सांगितलं होतं? 'जो भी होता है भले के लिए होता है'. यातूनही काही चांगलंच होईल बघा. शांत व्हा!"

राज क्रोधायमान वगैरे होतो. साला मला एवढं लागलंय आणि हा असलं काय काय ज्ञान देतोय. प्रधानजीची रवानगी तडकाफडकी तुरूंगात होते. राजाची मलमपट्टीही होते. काही दिवसांनी त्याचं बोटही बरं होतं. रुटीन लाइफ सुरू होतं. आणि एक दिवस राजा शिकारीला जातो. हरणाचा पाठलाग करता करता तो भरकटतो आणि बरोबरच्या सैन्यापासून दूर जातो. अशा अवस्थेत तो जंगलात हिंडत असतो. तेवढ्यात काही आदिवासी त्याला पकडतात आणि त्यांच्या गावात त्याला घेऊन जातात. आपल्या नायकापुढे त्याला उभं करतात. नायक असा रूबाबदार माणूस बघून खुश होतो. नाही तरी देवीला बळी देण्यासाठी माणूस शोधतच असतो तो. हा मस्त भेटलाय! यालाच बळी देऊ, असा विचार करतो तो. मग काय, बळी द्यायची तयारी सुरू होते. बळी द्यायच्या आधी राजाच्या शरीराचं निरीक्षण होतं आणि त्यात नेमकं ते तुटकं बोट त्यांना दिसतं. खलास! असा बळी चालत नसतो. राजाला सोडून देण्यात येतं. राजा आपल्या राज्यात परत येतो, आणि थेट तुरूंगात जाऊन प्रधानाला मुक्त करतो. साधूचं म्हणणं त्याला पटलेलं असतं. प्रधानाची क्षमाही मागतो राजा.

"मित्रा, मला माफ कर. आता मला पटलं बघ, 'जो भी होता है भले के लिए होता है'! पण एक समजत नाहीये मला, इतके दिवस तू तुरूंगात खितपत पडलास त्यात तुझं काय भलं झालं? त्रासच झाला की तुला."

"हुजुर, असं कसं? हे बघा, मी तुमचा जिवलग मित्र आहे. तुमच्याबरोबर सावलीसारखा असतो. त्या दिवशी जंगलात आपण दोघे बरोबर असतो आणि दोघेही पकडले गेलो असतो. आणि माझं काही बोट वगैरे तुटलेलं नाहीये महाराज, तेव्हा तुमच्यानंतर माझाच नंबर लागला असता ना?"

***

"हाहाहा! ग्रेट! ग्रेट! वेताळा ही गोष्ट तर अप्रतिमच रे! जे चाललंय ते ठीकच चाललंय असं म्हणायचं आणि शांतपणे बघत रहायचं. दुनियेला करू दे काय फालतूपणा करायचा तो, आपण निवांत गंमत बघायची, असंच ना?"

"अगदी! अगदी! कळले तुला! मर्म कळले. अरे दुनिया बोलत राहणार, पाहिजे तसं वागत राहणार, आपण लोकांच्या वाटेला नाही गेलो तरी मुद्दाम येऊन टोचे मारणारे खूप असणार. आपण आपली शांती ढळू द्यायची नाही बघ. त्यांना हसून, गंमत बघायची. मनावर घ्यायचं नाहीच. उलट यातूनही काही चांगलंच निघेल असा भरवसा ठेवायचा."

"थँक्स वेताळा! आत्ता जातो आणि त्या कुंभाराला सांगून येतो."

"जरूर. पण एक अजून सल्ला... त्या कुंभाराला त्याने काय करावं ते न सांगता फक्त या दोन गोष्टी सांगून ये. मग तो आणि त्याची बुद्धी! जे काय करायचं ते त्याचं त्यालाच ठरवू देणे इष्ट! काय समजलास?"

"ऑफ कोर्स!"

विक्रम गावाकडे वळला आणि वेताळाने पिंपळाकडे झेप घेतली.

प्रतिक्रिया

स्पा's picture

28 Sep 2012 - 11:02 am | स्पा

जबराट :)

>>>>>"हाहाहा! ग्रेट! ग्रेट! वेताळा ही गोष्ट तर अप्रतिमच रे! जे चाललंय ते ठीकच चाललंय असं म्हणायचं आणि शांतपणे बघत रहायचं. दुनियेला करू दे काय फालतूपणा करायचा तो, आपण निवांत गंमत बघायची, असंच ना?"

"अगदी! अगदी! कळले तुला! मर्म कळले. अरे दुनिया बोलत राहणार, पाहिजे तसं वागत राहणार, आपण लोकांच्या वाटेला नाही गेलो तरी मुद्दाम येऊन टोचे मारणारे खूप असणार. आपण आपली शांती ढळू द्यायची नाही बघ. त्यांना हसून, गंमत बघायची. मनावर घ्यायचं नाहीच. उलट यातूनही काही चांगलंच निघेल असा भरवसा ठेवायचा.">>>>>>

कुंटे संचारले कि काय अंगात ?ऑ>

ओक्के! जुन्याच गोष्टी नव्या रुपात.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2012 - 11:33 am | प्रभाकर पेठकर

ह्म्म्म्म! ऐकलेल्या गोष्टी नव्या आणि सणासुदीच्या वेशात आवडल्या. बोध-बिध घ्यायचं काय ते पाहू नंतर.

निखिल देशपांडे's picture

28 Sep 2012 - 11:45 am | निखिल देशपांडे

बर्र्र्र्र्र्र्र्र

ज्ञानराम's picture

28 Sep 2012 - 11:47 am | ज्ञानराम

मस्तच ...

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2012 - 12:36 pm | परिकथेतील राजकुमार

अगदी योग्य वेळ निवडली आहेत हो ह्या बोधकथा सांगायला.

सांगीन बोधकर्ते

श्रावण मोडक's picture

28 Sep 2012 - 1:41 pm | श्रावण मोडक

गीतापठण!

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2012 - 1:54 pm | परिकथेतील राजकुमार

समोर अर्जुन आहे, का गाढव आहे?

मन१'s picture

29 Sep 2012 - 4:39 pm | मन१

प्रतिसाद टंकताना तरी समोर लॅपटॉप असण्याची शक्यता.
मोअर स्पेसिफिकली, मिपाकरांना समोर ठेवून प्रतिसाद दिलाय असे म्हणता यावे.

गणपा's picture

28 Sep 2012 - 1:58 pm | गणपा

मार्मिक !

नाना चेंगट's picture

28 Sep 2012 - 2:09 pm | नाना चेंगट

जेव्हा हवे तेव्हा आणि ज्यांना पाजायला हवे त्यांना बोधामृत पाजले नाही त्याचा परिणाम आहे. असो.

श्रीवेद's picture

28 Sep 2012 - 2:19 pm | श्रीवेद

छानच आणि टायमिन्ग सुद्धा उत्तम. पण...

चेतन's picture

28 Sep 2012 - 2:34 pm | चेतन

ममोंना पण हीच बोध कथा सांगितली काय ;-)

अवांतरः समंनी यातुन काहि बोध नाही घेतला म्हणजे मिळवले ;-)

अन्या दातार's picture

28 Sep 2012 - 2:40 pm | अन्या दातार

ओके.

सहज's picture

28 Sep 2012 - 3:05 pm | सहज

बोधकथेचा आत्मा बरोब्बर पकडला आहे!!

तो आत्मा हा की, वाचणार्‍याला बोधकथेत असलेल्या गाढवाप्रमाणे काही समजले नाही पाहीजे. बरं बोधकथा असे "सिद्धहस्त" लेखकाने लिहल्यावर काय भानगड, कसला बोध, कुंभाराला संध्याकाळपर्यंत आपले घर कसे सापडले नाही हे विचारायचीही चोरी!

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2012 - 3:19 pm | परिकथेतील राजकुमार

संपादक अथवा सल्लागारांच्या कुठल्याही लिखाणाला उगाच 'वाह वाह' करत बसणार्‍यांनी काही 'बोध' घ्यावा असाच हा प्रतिसाद आहे.

पैसा's picture

28 Sep 2012 - 4:03 pm | पैसा

दुसरी गोष्ट जास्त आवडली. गाढव होणे सोपे, कुंभार होणे कठीण, कारण कुंभाराला प्रश्न पडतात. तस्मात कुंभार व्हा, आणि जे होतंय ते बर्‍यासाठीच म्हणा! गाढवाला प्रश्न पण पडत नाहीत आणि ऑप्शन्स पण नसतात.

चतुरंग's picture

28 Sep 2012 - 4:10 pm | चतुरंग

धरला बोरु करी मी
गोष्टी खरडेन बोधप्रद चार!!

(डोंगरे बोधामृत प्यालेला)चतुरंग बोधनकर

प्रकाश घाटपांडे's picture

28 Sep 2012 - 4:12 pm | प्रकाश घाटपांडे

ल्वॉक काय दोनी तोंडानी बोलत्यात!

मैत्र's picture

28 Sep 2012 - 4:15 pm | मैत्र

"क्यों बिरबल कैसा सेब?"

-- "जंगल में जैसा देव..."

दोन्ही पर्याय मस्त आहेत... 'बोध कथा' जमली आहे.

"ते दोघेही आता रात्रीच्या अंधारात मस्तपैकी शतपावली करतात. सुखदु:खाच्या चार गोष्टी बोलतात. रिस्पेक्टिवली, राणी आणि हडळीमुळे होणारा त्रास शेअर करतात एकमेकांशी. आणि स्वस्थपणे घरी जातात."
हे विशेष आवडलं

सूड's picture

28 Sep 2012 - 5:31 pm | सूड

ह्म्म!!

सुहास..'s picture

28 Sep 2012 - 5:38 pm | सुहास..

वेगळेच

( संदर्भ लागला नाय, पण कळेल कधी ना कधी ! )

इरसाल's picture

28 Sep 2012 - 5:52 pm | इरसाल

हायी शे की लोके घोडावर बी बठु देतत नइ अन पाये बी चालु देतत नइ.
आठे जी केस लेल शे तेम्हा एक इसरि जायेल दिखी र्‍हायना ते अस शे की नवरा-बाय्को त्या गधडाले उचलिसन चालाले जोयजे व्हतात तव्हय गोट पुरी व्हवा नी मजा इ लागती

फ्यांसी कपड्यातील जुन्या कथा आवडल्या.
राजा, त्याचा तो मित्रासारखा प्रधान, राजवाडा, निवांत गप्पासेशन, साधू वगैरे वगैरे सेमच बरं का.
अश्या वाक्यांनी मजा आणली.
आता काय तो बोध घेतला आहे. श्री गणेश मालिकेतला लेख म्हणून प्रतिसाद देतिये. उगीच बप्पाचा कोप नको. एरवी मी नसता दिला तुझ्या धाग्यावर प्रतिसाद.

तुका म्हणे उगी राहावे. जे जे होईल ते ते पाहावे.

कवितानागेश's picture

28 Sep 2012 - 6:54 pm | कवितानागेश

या गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत.
आता दुसर्‍या गोष्टी सांगा. ;)

(%&^#$^* दुनियेतल्या बोधिवृक्षाखाली अगेन अँड अगेन रिलॅक्स करणारी) माउ

शिल्पा ब's picture

28 Sep 2012 - 8:09 pm | शिल्पा ब

गोष्टी आवडेश.

छोटा डॉन's picture

28 Sep 2012 - 8:38 pm | छोटा डॉन

गोष्टी कळाल्या, लहानपणापासुनच अशा बोधकथा ऐकत आलो आहोत त्यामुळे नाविन्य वगैरे वाटले नाही, बोध वगैरे घेण्याचा तर प्रश्नच नाही, पुर्वीपासुनच घेत नाही, नियमांना अपवाद नको, कसे ?
बाकी बोधकथा नेहमीच आकर्षक असतात, सांगण्यापुरता.

खरं सांगायचं तर बरेच संदर्भ कळाले नाहीत, ते ही चालायचेच.
पण निदान ह्या निमित्ताने कळफलकावरील 'माती' झटकली गेली ह्याचे सुख जास्ती आहे.

- छोटा डॉन

श्रावण मोडक's picture

28 Sep 2012 - 8:59 pm | श्रावण मोडक

दुवा द्यायचा राहिला का?

छोटा डॉन's picture

28 Sep 2012 - 9:01 pm | छोटा डॉन

कशाचा दुवा ?
आमच्या 'गाडाव' बोधकथेचा ? जाऊ द्या, हुडकावा लागेल, एवढे श्रम कोण घेणार ?

दादा कोंडके's picture

28 Sep 2012 - 9:08 pm | दादा कोंडके

(सगळ्याच गोष्टी कळल्या पाहिजेत असं थोडच आहे?)
पण श्री गणेश मालेत धाग्या टाकल्याबद्दल धपन्यवाद्स!

पिवळा डांबिस's picture

28 Sep 2012 - 11:20 pm | पिवळा डांबिस

चिक्कू हलवा!!!!!
:)

हाहा मला एक सिच्युअशन जाम आवडली - तो साधू ओरडत चाललेला असतो ते ऐकून राजा एकदम पेटतोच. =)) =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Sep 2012 - 8:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय संदर्भ असतील, नसतील, अशा बोध कथा का सांगाव्या वाटल्या असतील वग्रै. पण, मला मोकळं मोकळं वाटतंय. :)
बिकाची लेखनशैली खासच असते.

बोले तो '' एऽऽऽ नाचोऽऽऽ धत्तड तत्तड धत्तड तत्तड" हा पर्याय मलाही खासच वाटला.

-दिलीप बिरुटे

तिमा's picture

29 Sep 2012 - 10:22 am | तिमा

गाढवाच्या बोधकथेत एक राहिलं बिका.
त्या तिघांना आधी एक गाढव पण भेटलेलं असतं. ते त्यांच्या गाढवाला आधीच सांगतं की आता हे दोघे, लोक म्हणतील तसे तसे वागत जातील. पण जेंव्हा, ते तुलाच काठीला उलटं बांधून, उचलून नेण्याचा प्रयत्न करतील तेंव्हा दुगाण्या झाडून पळून जा, कारण वाटेत एक अरुंद पूल आहे!
बाकी, आमच्या आवडत्या वेताळाचं विडंबन केलेलं नाही आवडलं, त्यामुळे आमच्या 'पाशवी' भावना दुखावल्या गेल्या.

हरिप्रिया_'s picture

29 Sep 2012 - 11:08 am | हरिप्रिया_

:)
गोष्टी सांगायची स्टाईल आवडेश!!

jaypal's picture

29 Sep 2012 - 2:58 pm | jaypal

उपायाने प्रा.डॉ.दिलीप बिरुटें सारख मला पण मोकळ, मोकळ वाट्ट्ट्तय ;-)

साती's picture

29 Sep 2012 - 3:28 pm | साती

समयोचित कथा.
पण त्रिकालाबाधित सत्ये तशी कोणत्याही वेळेस समयोचितच ठरतात नै का?

श्रावण मोडक's picture

29 Sep 2012 - 5:46 pm | श्रावण मोडक

त्रिकालाबाधित सत्ये! इतकं स्पष्ट बोललंच पाहिजे का? ;-)

मन१'s picture

29 Sep 2012 - 4:41 pm | मन१

जुन्याच कथा नव्या ढंगात ऐकून छान वाटले.
एक्कही संदर्भ समजला नाही.

चिंतामणी's picture

29 Sep 2012 - 11:55 pm | चिंतामणी

आधूनीक (फॅन्सी) चांदोबा काढायला हरकत नाही.

सुबक ठेंगणी's picture

1 Oct 2012 - 12:11 pm | सुबक ठेंगणी

बोधकथा बोधक था....

जयनीत's picture

1 Oct 2012 - 5:17 pm | जयनीत

खुपच मस्त, लिखाण खुप खुप आवडलं.