श्री ज्ञानेश्वरी. नवरसांनी परिपूर्ण असलेले काव्य. अनेकोविध शब्दरत्नांचे भांडार. जणू काही बहराला आलेला काव्य वृक्ष. प्राकृत भाषेचे सामर्थ्य जाणवून देणारा हा ग्रंथ, ह्यात काय नाही? वाड्.मयीन दृष्टीने पहायचे झाले तर ठायीठायी सापडणार्या एकाहून एक सुरेख दृष्टांत आणि उपमा, ऐहिक जगातील व्यवहाराधिष्ठित भूमिकेचा उहापोह आणि त्याचबरोबर तत्वज्ञानावर आधारीत अशा विचारधारांचा घेतलेला परामर्ष येथे आहे, तसेच अध्यात्मिक अनुभूतींतील शांत आणि उदात्त भावांचे दर्शनही येथे घडते. श्री भगवद्गीता जनमानसासाठी विषद करुन सांगताना माऊलींनी जनसामान्यांशी साधलेला हळूवार संवाद, मोठ्या मायेने आणि अपूर्वाईने उलगडलेले जिवीचे हितगुज म्हणजे हा ग्रंथ.
ग्रंथारंभी माऊलींनी गणरायाचे फार सुंदर आणि चपखल वर्णन केले आहे. बुद्धीदाता म्हणून ज्याला ओळखले, मानले जाते, त्या गणेशाला नमन करताना, त्याचे वर्णन करताना, त्याच्या रुपाची वेद वाड्.मयाबरोबर, साहित्य, कला आणि काव्याबरोबर सांगड घालण्याची मार्मिक, तरल आणि अचूक प्रतिभा अजून कोणापास असणार!
माऊली गणपतीचे वर्णन करताना त्याला वेदांनी वर्णिलेला, आदि, स्वयंप्रकाशमान, सर्वांच्या बुद्धीला ज्ञान प्रदान करणारा ॐकार स्वरुप, आपल्या आत्मरुपाने जो सर्वव्यापी बनून राहिला आहे, असे संबोधतात. माऊली सांगते, वेद वाड्.मय ही जणू श्रीगणेशाची मूर्त आणि स्वर व्यंजने गणपतीचे शरीररुप. स्मृतीं गणपतीचे अवयव, तर वाड्.मयाचे अर्थसौंदर्य म्हणजे जणू श्रीगणेशाचे लावण्यसौंदर्य! अठरा पुराणे ही गणेशाची रत्नजडित आभूषणे, तर त्यातील छंदोबद्ध पद्यरचना ती आभूषणांमधील तत्व सिद्धरत्नांची कोंदणे! लालित्यपूर्ण काव्य हे जणू गणपतीचे वस्त्र तर साहित्यातील शब्द आणि अर्थालंकार म्हणजे ह्या वस्त्राचा तलम असा उजळ पोत!
काव्य आणि नाटके जणू गजाननाच्या पायांमधील रुणझुणत्या लहान, लहान घंटा आणि त्या काय नाटकांचा अर्थ म्हणजे जणू त्या घंटांचा मंजूळ नाद! व्यासादिक श्रेष्ठांची काव्यप्रतिभा हेच त्या गजाननाचे कटीवस्त्र आणि त्यावरील तेज:पुंज मेखला. सहा शास्त्रे वा षड्दर्शने गणपतीचे सहा हात आणि ह्या शास्त्रांमधील मतभिन्नता हीच त्यां हातामधींल वेगळी आयुधे. तर्कशास्त्र हा परशू, तर न्यायदर्शन हा जणू अ़ंकुश. वेदांत हा रसभरीत मोदक, बौद्धमत हा गणेशाच्या हातातील तुटलेला दात. ब्रह्मविषयक वाद हा त्याचा वरदहस्त आणि धर्मप्रतिष्ठा हा अभयकर. गजाननाच्या सोंडेला निर्मळ, योग्य - अयोग्य अश्या विवेकपूर्ण विचाराची उपमा देताना माऊली त्यांच्या दंतपंक्तीला परस्पर संवादाची आणि दंतपंक्तीच्या शुभ्रतेला नि:पक्षपाताची (नि:पक्षपाती संवाद) उपमा देतात.
गणेशाचे बारीक डोळे म्हणजे अंतःस्फूर्तीने होणारे ज्ञान जणू. अशा ह्या विघननाशकाचे दोन कान म्हणजे धर्ममीमांसा आणि ब्रह्ममीमांसा. गजाननाच्या गंडस्थलांतून मद वाहतो आहे - तो मद आहे ज्ञानाचा आणि ह्या ज्ञानाच्या शोधात असणार्या विद्वद जनांना माऊलींनी मद प्राशन करणार्या भुंग्यांची चपखल उपमा दिली आहे. ही गंडस्थळे तरी कसली? तर ती द्वैत आणि अद्वैत, ही. या गंडस्थळांवरील प्रवाळरुपी आभूषणे म्हणजे विविध ग्रंथातून मांडली गेलेली तत्वविषयक प्रमेये आणि सिद्धांत. गणेशाच्या मुकुटावर दहा उपनिषदरुपी फुलें, आपल्या ज्ञानरुपी मकरंदासह शोभून दिसत आहेत.
अकार - उकार - मकार ह्या तीन मात्रा एकत्र मिळाल्या असता जो ॐकार उत्पन्न होतो, त्या ॐकाराची अकारमात्रा म्हणजे जणू गणेशाचे चरण युगुल, उकार म्हणजे विशाल उदर आणि मकार हे त्याचे मुखरुप. ह्या तीनही मात्रा एकत्र येऊन जेथे शब्दब्रह्माची निर्मिती झाली, तेच हे आदिबीज. ह्यातच सारे साहित्यविश्व सामावलेले.... ह्या आदिबीजाला आपल्या सद्गुरुकृपेने जाणून घेऊन प्रत्यक्ष माऊलीही त्यापुढे नतमस्तक होतात.
ज्ञानियाने आपल्या प्रज्ञेने जाणियेल्या आणि सुभगरीत्या वर्णिलेल्या ह्या अनादि आदिबीजाला माझाही नमस्कार. माऊलीना जसा त्यांचा गणराय दिसला, जाणवला आणि भेटला, तसाच तुम्हां आम्हां सर्वांना आपापल्या बुद्धी शक्ती कुवती नुसार भेटो अणि त्याच्या कृपेचा वरदहस्त सर्वांवर अखंड राहो, हीच त्या बुद्धीदात्या गजाननापाशी प्रार्थना.
.
.
प्रतिक्रिया
24 Sep 2012 - 6:15 am | स्पंदना
सुरेख यशोधरा. ज्ञानेश्वरीचा आढावा घेण ही एक अतिशय अवघड गोष्ट आहे. पण नुसता थोडाफार उल्लेखही मनाला ताजतवान करुन जातो.
24 Sep 2012 - 11:10 pm | पैसा
ज्ञनियांच्या राजाचे शब्द, वर्ण्यविषय साक्षात श्रीगणेश! आणि त्याचं रसग्रहण इतकं सुरेख केलंस यशोधरा, की लतादीदींच्या आवाजातले ते सगळे अप्रातिम शब्द कानात रुणझुणायला लागले!
24 Sep 2012 - 11:55 pm | एस
अवांतर- याच अलंकापुरीतच जन्मलो, वाढलो आणि शिकलो तरी वृत्तीने शुद्ध नास्तिक. त्यामुळे श्री ज्ञानोबारायांबद्दल प्रचंड आदर असूनही मतभेद. :)
25 Sep 2012 - 2:56 am | नंदन
लेख आवडला. लेखात म्हटल्याप्रमाणे कठोर अशा तर्क आणि न्यायशास्त्राला परशु आणि अंकुशाची उपमा देऊन झाल्यावर, रसाळ वेदान्ताला मोदकाची उपमा देणे निव्वळ थोर :) [तरी तर्कु तोचि फरशु | नीतिभेदु अंकुशु | वेदान्तु तो महारसु | मोदकु मिरवे] फक्त निरनिराळ्या उपमांकरता, केवळ एक काव्य म्हणूनही ज्ञानेश्वरी वाचायला हवी.
25 Sep 2012 - 1:00 pm | गणपा
लेख छानच झालाय ग यशो ताय.
25 Sep 2012 - 1:12 pm | स्पा
असेच म्हणतो.. उत्तम लिखाण झालंय
25 Sep 2012 - 1:23 pm | प्रचेतस
उत्तम आणि सहजसुंदर लिखाण.
1 Oct 2012 - 11:12 pm | चित्रा
>>फक्त निरनिराळ्या उपमांकरता, केवळ एक काव्य म्हणूनही ज्ञानेश्वरी वाचायला हवी.
असेच म्हणते.
8 Oct 2012 - 9:14 pm | धनंजय
असेच म्हणतो.
25 Sep 2012 - 5:56 am | किसन शिंदे
अतिशय सुंदर लेखन!
25 Sep 2012 - 11:43 am | नगरीनिरंजन
सुरेख!
25 Sep 2012 - 11:45 am | सुहास..
बोर्डावर यशो दी ला पाहुन आनंद झाला.
शक्य तशी भर घालेनच !
25 Sep 2012 - 12:46 pm | नाना चेंगट
उत्तम.
25 Sep 2012 - 1:15 pm | मनीषा
कला आणि विद्येचा अधिपती श्री गणेश, आणि त्याचे सुंदर स्वरूप शब्दात साकारणारे ज्ञानदेव .. यालाच मणी-कांचन योग म्हणत असावेत.
25 Sep 2012 - 4:13 pm | मेघवेडा
वा वा!
"बोधमदामृत अलि सेविती" झालेलं आहे आमचं. :) :)
25 Sep 2012 - 7:47 pm | श्रावण मोडक
उत्तम. शांतपणे पुन्हा वाचणार आहे!
25 Sep 2012 - 8:03 pm | रेवती
सुंदर वर्णन आहे.
लेख खूपच आवडला.
वाचताना उपमा किती योग्य दिल्यात याची जाणीव होत राहते.
मस्तच!
25 Sep 2012 - 9:39 pm | कवितानागेश
छानच लेख.
खूप आवडला.
लिहित रहा....
25 Sep 2012 - 10:31 pm | बापू मामा
लेख सुरेख आहे.
25 Sep 2012 - 11:20 pm | पिवळा डांबिस
ज्ञानियांचा राजा, योगी महाराज!
_/\_
26 Sep 2012 - 9:50 am | मूकवाचक
उत्तम लेख!
26 Sep 2012 - 1:26 pm | सस्नेह
सुरेख लेख.
1 Oct 2012 - 7:52 pm | शुचि
खरं पाहता शृंगार रस हा सर्व रसांचा राजा मानला जातो परंतु ज्ञानेश्वरी या ग्रंथरूपाने, शांतीरसाने शृंगाराच्या माथ्यावर पाय ठेवला असे म्हटले जाते.
1 Oct 2012 - 11:20 pm | अत्रुप्त आत्मा
--^--
5 Oct 2012 - 7:30 am | यशोधरा
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे मनापासून आभार.
ज्ञानेश्वरीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही ह्याची जाणीव आहे आणि अध्यात्माच्या दृष्टीने तर बोलायचे धाडसही करणार नाही. अध्यात्म बाजूला ठेवले तरीही, एक काव्य म्हणूनही ज्ञानेश्वरीचं महत्व कमी नाहीच. तीत वापरलेल्या चपखल उपमा, दृष्टांत आणि प्रासादिक, कोमल भाषेमुळे तिचा गोडवा अवीट आहे. भाषा समजायला कधी कधी कठीण वाटली तरी समजावून घेण्याचा कंटाळा मात्र येत नाही. :)
बुद्धीदाता आणि विद्या, कला ह्यांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणार्या गणेशाच्या रुपाची वेद वाड्.मयाबरोबर, साहित्य, कला आणि काव्याबरोबर सांगड घालण्याची ज्ञानोबामाऊलींची कल्पकता आणि तरल बुद्धीमत्ता, त्याचे स्मरण करण्याचा हे लिखाण म्हणजे एक छोटासा प्रयत्न होता.
5 Oct 2012 - 10:53 am | अर्धवटराव
अमृताशी पैज जिंकणारे काव्य रचणारी माऊली त्याचे श्रेय मात्र मराठी भाषेच्या सौंदर्याला, गोडव्याला देते. तोच गोडवा नेमका पकडलाय तुमच्या लेखात. खुप आवडलं.
अर्धवटराव
7 Oct 2012 - 12:11 am | स्वाती दिनेश
यशो, किती छान लिहिले आहेस ग,
स्वाती
8 Oct 2012 - 5:31 pm | अभ्या..
छानच.
हे गणरायाचे वर्णन फक्त शब्दातच व्यक्त होऊ शकते.
ते शब्द सरस्वतीचे वरदानच.
आमच्यापर्यंत पोहोचविले तुम्ही. धन्यवाद यशोधरातै.