कुठून डोक्यात आलं होत काय माहित पण राजगडला जावं अस शुक्रवारी वाटलं. कदाचित आंबोली भ्रमंती नंतर पावसाळी ट्रेकची इच्छा अपुरीच राहिली होती. जळगावच्या पाटलांनी उत्साह दाखवला म्हणून शिराळ्याच्या पाटलांकडून माहितीची विचारणा केली. दोघांनीही पाटीलकीला स्मरून ऐन वेळी ठेंगा दाखवला :D
तरीपण जुजबी माहिती मिळाली होती आणि मग मिपा/नेट वर बघितलं तर चिक्कार माहिती होती, ती वाचून तर जायची इच्छा प्रबळ झाली!
सकाळी उठून पण तळ्यात-मळ्यातच होत. शेवटी २ पराठे घेतले बांधून आणि म्हटलं एकटा तर एकटा निघू! ह्या अगोदर गेलो नसलो तरी परमुलुखात स्वारीला थोडेच जायचं होत, आणि नदी पार करायला पूल पण होता, यवनांसारखे अडथळे नव्हते पार करायचे! मग शेवटी १० वाजता किक मारली!(अरे हो, गाडीची बॅटरी बदलायची आहे बरेच दिवस :P)
खेड-शिवापूर च्या लूट-नाक्या(spelling mistake झाली वाटत :P) पर्यंत छान रेहमान ऐकत बऱ्याच दिवसांनी मस्त गाडी चालवायला मिळाली पण तिथे पाऊस आला आणि लक्षात आले, घात झाला! बहुधा पूर्ण दिवस ओलेत्याने जाणार. रस्ता विचारत, राजेंचे वारसदार नव्हे (स्वयंघोषित) राजेच जणू आणि त्यांचे खंदे समर्थक यांच्या बेलगाम ड्रायव्हिंग पासून सांभाळत वेल्हा रस्त्याने गुंजवणे या पायथ्याच्या गावी पोचलो. त्याच्या थोडंस आधी एक अप्रतिम नजारा होता! समोरच राजगड आहे हे माहित नव्हत आणि धुक्यामुळे लक्षात पण आलं नाही. नागमोडी रस्ता, सगळीकडे पसरलेली हिरवाई, धुक्यात हरवलेले डोंगर आणि मधून वाहणारी नदी! वाह... ७० किमी आल्याचं सार्थक वाटत होत, मग पुढे जे काही असेल ते तर बोनस :)
१२ वाजण्याच्या सुमारास गाडी लावल्यानंतर एक चहा ढकलला आणि रस्ता शोधत असताना खोचीकर पाटलांचा एक मित्र दिसल्यासारखे वाटले म्हणून बघितलं तर एक मराठमोळा ग्रुप होता. ते पण पहिल्यांदाच निघाले होते आणि जेवणाची सोय लावत होते. त्यांना विचारलं परत येणार ना संध्याकाळी, तर त्यांचा विचार होता! म्हटलं बघू येताना पण आता ह्यांच्या सोबतच निघू. तिथल्या हॉटेल मध्ये गडावरच्या असंख्य मावळ्यांच्या क्षुधाशांतीच काम असल्यामुळे त्यांनी बराच वेळ घेतला आणि मग १२:३० च्या दरम्यान निघालो. थोड्याच वेळात पावसाने पुन्हा हजेरी लावली. जर्किन घालावं तर गरम होत नाहीतर पाऊस कोसळतोय! अधिक महिन्यामुळे पावसाला पण confuse झाल होत त्यामुळे कधी मोठी सर यायची तर कधी श्रावणासारख्या हलक्या सरी आणि कधी उघडीप! थोड्या वेळाने कळेना की घामाने भिजलोय की पावसाने आणि नंतर तर पावसाचे काहीच वाटेना झाले! :)
चिखलातून वाट काढत असताना लक्षात आले होते की जगप्रसिद्ध Woodland shoes चा काही उपयोग नाही! ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी गत झाली होती! :)
आता हळू हळू ग्रुपमधल्या इतरांशी चांगल्या गप्पा चालू होत्या, असल्या अतरंगी मोहिमेचा म्होरक्या कोण यावरून कौतुकसोहळा चालू होता आणि पुन्हा असल काही न करण्याचा निश्चय निम्म्या वाटेत पोचायच्या आधी झाला होता :)
खालच्या गावातून गडावर जेवण पोचवणारे एक मामा आम्हाला एकदा म्हणाले अजून १५ मिनिटे आहे, आणि पुढच्या १५ मिनिटात ते मधून परत आले वर जाण्यासाठी तर म्हणाले हे काय १५ मिनिटावर. आणि त्यानंतर अर्ध्या तासानी आम्ही पोचलो... तरीपण त्यांनी सांगितलेल्या दीड तासाच्या अंदाजापेक्षा १५ मिनिटेच जास्त घेतली आम्ही :)
बहुंताश वाट खूप चढणीची नाही आणि ऊन नाही त्यामुळे वेळ लागत असला तरी अजून धीर सुटला नव्हता. चोर दरवाज्याचा शेवटचा टप्पा थोडा चढणीचा आहे अस ऐकल होत आणि मग बघितल्यावर कळलं की तो ‘थोडा’सा अवघड रेलिंग मुळे झालाय. नाहीतर आम्हाला अशक्यच होता! दगडांमधल्या खोबनीला पायरी म्हणायचे आणि एकावेळी एक माणूस जाऊ शकेल अशा रीतीने रेलिंगला पकडून वार सरकायचे. तो पार केल्यावर समोर येतो तो ‘चोर’ दरवाजाच! आणि त्यात नावाप्रमाणे एकदम वाकून जावं लागत. इथे पोचल्यावर सगळे एकदम खुश झालो कारण बऱ्यापैकी वेळेत पोचलो होतो. पायऱ्यांनी थोड वर आल्यावर तटबंदी दिसतानाच बहुधा तळ आहे अस वाटलं. त्याच्या कडेन जाताना धुक्यामुळे नीट नव्हत दिसत; पाउस तर एकदम दिमाखात कोसळत होता आणि एकदम लोभसवाणा वाटत होता. अजून वरती गेल्यावर पर्यटक निवासासमोर उभ राहिल्यावर पद्मावती तळ्याचा विस्तार बघून वाटलं की एवढ्या वरती अस तळ म्हणजे चमत्कारच आहे!
पोचेस्तोवर कसाबसा कड काढला होता त्यामुळे आधी पेटपूजा क्रमप्राप्त होती! पद्मावती मंदिर, रामेश्वर मंदिर एकदम भरलेले होते, त्यामुळे पर्यटक निवासाच्या व्हरांड्यात उभं राहून केलेल्या जेवणाची लज्जत वाढवली ती गडावर मिळालेल्या घट्ट दह्याने! पागोळ्यांच्या पाण्याने हात धुवून मंदिरात जागा मिळते का बघितली सॅक ठेवण्यासाठी. पण लक्षात आलं की इथली मंदिरं एकतर प्रोफेशनल ग्रुप्स किंवा राजगड सारख्या पवित्र ठिकाणी वेगळीच ‘नशा’ अनुभवण्यास आलेल्यांनी स्थानिक लोकांना हाताशी धरून काबीज केली होती.
वेळ कमी असल्यामुळे सगळा किल्ला बघून होणे शक्यच नव्हते. त्यामुळे ‘प्रमुख आकर्षण’ असलेला ‘भव्य’ बालेकिल्ला तरी बघून घ्यावा अस ठरलं. तिघेजणच तयार झालो. गडावरचे उरलेले अवशेष बघत निघालो होतो. भन्नाट वारा, मस्त धुक ह्यामध्ये काही दऱ्यांमध्ये फेकलेला प्लास्टिक/थर्मोकोल चा कचरा टोचणी लावत होता...
थोडा वेळ चालल्यानंतर मग सुरु झाली खरी परीक्षा! आधीच्या पेक्षा खडा चढ! एक गोष्ट चांगली होती म्हणजे धुक्यामुळे उंचीचा काही अंदाज येत नव्हता नाहीतर काही खरे नव्हते :) त्या एवढ्याश्या वाटेतून पाणी वाहत होते आणि नंतर तर रेलिंग चा पण आधार नव्हता एका ठिकाणी! एकदम रोमांचकारी अनुभव होता! वेळ अपुरा असल्यामुळे इथूनच परताव का असा विचार चालू होता. तरीपण थोड पुढे जाऊन बघितलं आणि बुरुज, दरवाजा दिसला! मग उरलेलं अंतर झटक्यात पार केलं आणि खरंच गड सर केल्याचा खूपच आनंद झाला! वाटत नव्हत की इथेपर्यंत पोचू म्हणून 8-)
ह्या दरवाज्यापासून अजून वरती गेल्यावर एक तळ आणि मंदिर आहे. तळ्याच्या गार पाण्याने तोंड धुतल्यावर सगळा शीण निघून गेला! धुक्यामुळे काहीच दिसत नव्हत नाहीतर इकडून खूप भारी दृश्य दिसेल अस वाटत. काही हरकत नाही, Trial run झाला आता! परत येणे होईलच तेव्हा बघू सर्व नीट!
आता परतीच्या वाटेवर कळू लागले की ‘उतरणे अवघड’ का आहे आणि विशेषतः पावसात! मघाशी जिथून चढून आलो होतो त्या पायऱ्या(?) बघून विश्वास बसत नव्हता की आपण चढून आलोय हे! आणि इथून कसेबसे उतरल्यावर confidence आला की आता खालच्या वाटेची चिंता नाही!
त्या मस्त धुंद, गूढ वातावरणाचा आनंद घेत चहा घेतला आणि खाली निघालो. विशेष म्हणजे एकदा पण कुठे धडपडलो नाही. पण चढायला लागला तितकाच वेळ लागला!
आता कधी एकदा घरी पोचतोय असे झाले होते. भिजलेले शूज, सॉक्समुळे माझे पाय पहिल्यांदा एवढे गोरे(!) दिसत होते :D
हायवेला पोचेपर्यंत अंधार पडला होता आणि वरुणराजा घरापर्यंत पोचवायला येणार असे दिसत होते! रात्रीची वेळ आणि पाउस म्हणजे आम्हा चार-डोळे वाल्यांसाठी ‘आधीच मर्कट, त्यात मद्य प्यायला’ अशी अवस्था! त्यात ठिकठिकाणचे खड्डे, रस्त्यावर आलेली माती यामुळे पुरती वाट लागली वाकडला पोचे पर्यंत.
सगळ अंग दुखत होत, पायांची आग होत होती पण डोक्यात विचार चालू होता – हिवाळ्यात परत कधी जायचं, राजांच्या गडावर! :)
प्रतिक्रिया
12 Sep 2012 - 2:38 pm | sagarpdy
मस्त
12 Sep 2012 - 2:45 pm | स्पा
"लैच भारी" लिहिलंय..
फोटो मस्त :)
12 Sep 2012 - 3:11 pm | मी_आहे_ना
आम्हीही पावसाळ्याच्या आसपास गेलेलो इथे (१० वर्षांपूर्वी), त्याच्या आठवणी जाग्या झाल्या...सही एकदम.
12 Sep 2012 - 3:22 pm | स्वप्निल घायाळ
खरच राजगड हा गडांचा राजा आहे !!
माझा सगळयात पहीला ट्रेक राजगड होता...
फोटो मस्त आहेत ...
12 Sep 2012 - 3:41 pm | अत्रुप्त आत्मा
झकास................................................................................! :)
12 Sep 2012 - 4:08 pm | झकासराव
एकटाच... मानल बॉ.. :)
जगातल्या कोणत्याही शुजचा काही उपयोग नाही भारतात ट्रेकीन्गसाठी.
तेथे हवेत अॅक्शन ट्रेकिन्ग शुजच. ७००-८०० रुपयवाले शुज पण रिबॉक / वुडलॅन्ड सगळ्याला भारी पडतात ट्रेकिन्गला. :)
12 Sep 2012 - 4:57 pm | प्रभो
>>तेथे हवेत अॅक्शन ट्रेकिन्ग शुजच. ७००-८०० रुपयवाले शुज पण रिबॉक / वुडलॅन्ड सगळ्याला भारी पडतात ट्रेकिन्गला.
सहमत :)
12 Sep 2012 - 5:49 pm | सुकामेवा
अॅक्शन ट्रेकिन्ग शुजच १ नंबर.
14 Sep 2012 - 8:21 pm | sagarpdy
12 Sep 2012 - 4:09 pm | प्रचेतस
माफ करा पण राजगडावर तटबंदी, बुरुज, जंघ्या दरवाजे, चोरदिंडी, पाण्याची टाकी, सदर, तळे, राजवाड्याचे अवशेष, शिबंदीची घरटी, भुयारी मार्ग, चिलखती बुरुज, चिलखती वाटा आणि इतरही बरेच काही असूनही फोटोत यापैकी काहीच दिसले नाही.
12 Sep 2012 - 4:29 pm | लई भारी
पाउस खूप असल्यामुळे बराच वेळ कॅमेराफोन बाहेर काढता आला नाही. धुक्यामुळे बर्याच गोष्टी नीट दिसत पण नव्हत्या.
दुसरे म्हणजे फक्त एक तृतीयांश किल्लाच फिरून झाला असेल, त्यामुळे बरीच ठिकाणे राहून गेली.
पुढच्या वेळी नक्की :)
12 Sep 2012 - 5:06 pm | चेतन माने
वाह!!! आमचा कळसुबाईचा ट्रेक आठवला , अगदी शब्दश: अशीच धमाल आली होती... खूपच मस्त लिहिलंय !
छायचित्र पण फारच सुंदर आली आहेत आवडली .
12 Sep 2012 - 5:54 pm | पैसा
वर्णन आणि फोटो छान आहे. पण वल्ली म्हणतोय तसं पुढच्या वेळी संपूर्ण येऊ द्या!
12 Sep 2012 - 6:54 pm | गणेशा
लई भारी..
पावसात राजगड म्हणजे मज्जाच असेन नाही..
छान लिहिले आहे.. फोटो मात्र अजुन हवे होते.. पण धुक्यात ते धुसरच आले असते.
मागिल उन्हाळ्यात राजगड ला गेलो होतो ( http://www.misalpav.com/node/20849 )
मस्त अनुभव एकदम.
13 Sep 2012 - 8:40 pm | सचिनमय पाटील
आम्ही पण नोव्हेंबर २०१० मध्ये राजगड बाईक ट्रेक केला होता..दुपारी ठाण्यावरून निघून रात्री पुण्यात मुक्कामी..दुसरया दिवसी सकाळी गुडलक कैफे मध्ये पोट्पूजा करून ११ वाजेच्या सुमारास गडावर डेरेदाखल झालो होतो.. एकंदर गडाचा विस्तार खुपच मोठा आहे. त्यामुळे संपूर्ण गड बघण्यासाठी किमान पुर्ण १ दिवस तरी हाताशी हवाच..राजगड्च्या बालेकिल्ल्याची भर पावसाळ्यातील चढाई तर थरारकच म्हणायला हवी..वेळेअभावी आम्हाला अद्वितीय बांधणीच्या संजीवनी माचीला भेट देता आली नाही.. राजगडावरील पद्मावती देवीचे मंदीर,अजोड असा बालेकिल्ला,भक्कम बांधणीच्या संजिवनी आणि सुवेळा या माच्या,पाली - गुंजवणी-अळू दरवाजाच्या दर्शनाने ही मन आणि शरीर दोन्ही रोमांचित होतात. वातावरण साफ असेल तर गुंजवणी आणि कानंदी नद्यांची खोरी, सिंहगड, कोकणातील रायगड्,तोरणा इ.गड आणि वीर-भाटघर धरणे असा चौफेर मुलूख नजरेत येतो.
14 Sep 2012 - 2:34 pm | स्पंदना
पावसाळ्यात अन एकट?
अवघड आहे राव राजगड. सुखरुप परत आल्याबद्दल हाबीनंदन
14 Sep 2012 - 10:11 pm | बापू मामा
मी ही एकटाच ३० वर्षांपूर्वी राजगडी गेलो होतो. त्यावेळी ट्रेकिंगचे खूळ नव्हते.
साध्या चपला होत्या. केवळ भक्तिभाव होता
गुंजवण्याला ग्रामदैवताची यात्रा सुरु होती. तमाशाचा फड भर दुपारी रंगला होता.
गडावर चिटपाखरुही नव्हते.आज गडांचे बियर बार झालेले वाचून खिन्नता आली.
15 Sep 2012 - 2:58 am | नेत्रेश
या ट्रेकिंग वाल्यांमुळे आपल्या गड किल्ल्यांची परीस्थीती सुधारायची आशा आहे.
16 Sep 2012 - 10:50 am | ज्ञानराम
वर्णन छान केलयंत, राजगडावर जाऊन आल्याबद्दल अभिनंदन.. !
पुढच्या वेळेस जातना हंटर शूज सोबत घेऊन जा .
पुढच्या ट्रेक साठी शुभेच्छा ...!
17 Sep 2012 - 8:44 pm | भाग्या
सुन्दर!
खूप छान फोटो.
धुक्यात हरवल्याचे feeling आले.
21 Sep 2012 - 11:54 am | जातीवंत भटका
सुंदर फोटो आणि मस्त भटकंती !