Skip to main content

कांद्याचा भात

लेखक रेवती यांनी बुधवार, 12/09/2012 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: तांदूळ १ कप, उभा जाडसर चिरलेला कांदा अडीच कप , हरभरा डाळ १ टेबलस्पून , मोहरी अर्धा टीस्पून, मेथ्या एक अष्टमांश टीस्पून, हिंग एक अष्टमांश टीस्पून, हळद पाव टीस्पून, कढीलिंबाची एक काडी, धणेपूड एक टीस्पून, जिरेपूड अर्धा टीस्पून, काळीमिरीपूड पाऊण टीस्पून, लिंबूरस १ टेबलस्पून, तांदळाच्या दुप्पट आधणाचे पाणी, थोडे तूप, कोथिंबीर व खोबरे, मीठ. कृती: तांदूळ धुवून निथळत ठेवावेत. कांदा जाडसर चिरावा. फोडणीचे साहित्य तयार असावे. पाणी तापण्यास ठेवावे. पातेल्यात नेहमीपेक्षा थोड्या जास्त तेलाची मोहरी, हिंग, हळद, मेथ्या घालून फोडणी करावी. कढीलिंब व हरभरा डाळ घालून थोडे परतावे. त्यात चिरलेला कांदा घालावा व परतावे. त्यास एक वाफ आणून धुतलेले तांदूळ घालावेत व हलक्या हाताने परतावेत. तांदळाचा रंग किंचित बदलला की आधणाच्या पाण्यापैकी निम्मे पाणी त्यात घालावे. नंतर धणे, जिरे व मिरेपूड, मीठ घालावे. पाणी आटत आल्यानंतर उरलेल्यापैकी निम्मे पाणी घालावे व झाकून शिजू द्यावे. मधेच एक दोनदा हलवावे. त्यावेळी लिंबूरस घालावा. लागल्यास आणखी पाणी घालून मंद आचेवर भात अगदी मऊ व मोकळा शिजायला हवा. किंचित पाणी त्यात असतानाच साजुक तूप कडेने सोडून झाकून ठेवावे व आंच बंद करावी. वाफ मुरल्यावर भात वाढावा. वरून ओले खोबरे व कोथिंबीर घालून उपयोगात आणावा. याबरोबर आमसुलाचे गोडसर ताक द्यावे. टीपा: १. तांदूळ कोणत्याही प्रकारचा वापरता येतो. २. कांदे शिजून कमी होत असल्याने जास्त घ्यावेत व जाड चिरावेत म्हणजे शिजून गाळ होत नाही. ३. काळी मिरीचा वापर तब्येतीस झेपेल त्याप्रमाणे करावा. ४. पाणी लागेल तसे थोडे थोडे घालावे. ५.यात गूळ, साखर घालू नये. कांद्याचा गोडसरपणा पुरतो. ६. आमसुलाचे गोडसर ताक करण्यासाठी, नेहमीप्रमाणे ताक करून घेणे. त्यात आमसूलाचे पाणी अथवा आगळ घालावे. आगळ गोड असल्याने साखर नाममात्र घालावी. फक्त आमसूलाचे पाणी /अर्क असल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे. कोथिंबीर घालावी. मीठ, हिरवी मिरची, आले व एक लसणाची पाकळी यांचे वाटण घालून ताक तयार होते. त्यास फोडणी नाही. पावसाळी हवेत या भाताचा आस्वाद चांगल्या प्रकारे घेता येतो. एखाद्या पावसाळी संध्याकाळी, सौ. आई हा भात करीत असे. 074

वाचने 72850
प्रतिक्रिया 51

प्रतिक्रिया

साधा असला तरी टेस्टी असेल याची खात्री वाटते आहे. साधेच पदार्थ बर्‍याचदा खूप टेस्टी असतात. बादवे. तंबिटाचे लाडू ?!

वा.. मस्तं पाककृती. छायाचित्र तर, एखाद्या इंग्रजी मासिकातील छायाचित्राप्रमाणे, एकदम आकर्षक आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

छायाचित्र तर, एखाद्या इंग्रजी मासिकातील छायाचित्राप्रमाणे, एकदम आकर्षक आहे. छायाचित्राला विशेष गुण दिले आहेत. सजावट, छायाचित्र, छायाचित्रात येणारी भांडीकुंडी हे जालीय पाककृत्यांचे आत्मे असतात. यांच्यावर बर्‍याचदा पाककृत्यांचे यश असते. मलाही लै पाककृत्या टाकायच्या असतात पण आमची भांडीकुंडी साली आडवी येतात. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाही लै पाककृत्या टाकायच्या असतात पण आमची भांडीकुंडी साली आडवी येतात.
डिट्टो! ;)

In reply to by इरसाल

मी मूळची कानडी असले तरी हा टारगटपणा केला नव्हता. ;) हे मराठी संस्थळ असल्याचे लक्षात ठेवले होते. ;)

अगदी वेगळा प्रकार वाटतोय भाताचा. चवीची कल्पना केल्यावर तोंपासु. रेवतीतै, अगदी बारीक सारीक तपशील दिल्याबद्दल धन्स.

मश्त मश्त पाकृती. ( वस्तुंचे प्रमाण अष्टमांश हा गेलेल्या गोकुळष्टमीचा प्रभाव काय ?)

मला वाटते, हरभर्‍याच्या डाळी बरोबर शेंगादाणे, मटार हेपण छान लागतील.

मस्तंच. आमसुलाचे ताक हां नवाच प्रकार ऐकला. चवीत फरक असला तरी दिसायला सोलकढी सारखंच दिसत असेलं नै?

आमच्या सोलकढीतच मुळात ताक/दही असते. त्यामुळं आमसुलाचं ताक हा प्रकार किती कातिल असू शकतो याची कल्पना आहे! :) पाकृ झकासच!

कांदेभात आवडला. आमसुलाचे ताकही उत्तम. न खाताच आलेली ही प्रतिक्रिया आहे!

कांदेभात आवडला , वेगळा प्रकार आहे करून बघेन :) आमसुलाच्या ताकाची पाककृती खासकरुन जास्त आवडली रंगही छान आलाय आणी फोटो तर खल्लास :)

पण एक दूरूस्ती करायची आहे. "आगळ गोड असल्याने साखर नाममात्र घालावी. ". आगळ गोड नसते. त्यात साखर नसतेच. साखर कोकम (सरबतासाठीचे) मधे असते. आगळात फक्त मिठ आणि कोकमचा अर्क असतो.

In reply to by चिंतामणी

आपले म्हणणे बरोबर आहे पण आजकाल सरबतासाठी जे कॉन्सट्रेट मिळते त्यावर आगळ छपल्याकारणाने माझा दोनदा गोंधळ उडाला होता. पाकृ टंकतानाही मी इथेच अडले पण बाजारात ज्या नावे मिळते तसे लिहिल्यास वाचकांना सोपे जाईल म्हणून लिहिले व अर्काचा उल्लेखही करून ठेवला.

In reply to by रेवती

छापणा-याने चुकीचे छापले असणार. असो. इथे सविस्तर माहिती मिळेल.

In reply to by चिंतामणी

चिंतामणींशी १००% सहमत. कोणी 'कोकम सरबताचा' अर्क (अमृत कोकम) 'आगळ' म्हणून विकत असेल तर ती गिर्‍हाईकाची दिशाभूल आहे. 'ग्राहक मंचा'वर तक्रार देता येईल.

फोटो फारच सुरेख! आणि सोप्पी पाकृ. नक्की करून बघेन. मला आधी वाटलं की कच्चा कांदा घालून एक उन्हाळ्यासाठी थंड भाताची पाकृ आहे तशी की काय! पण हा भात एकदम वेगळाच निघाला.

डोळ्यांच समाधान झाले.. आता पोटाचे समाधान कोण करणार? मायला मला पण मनोबासारखे प्रश्न पडायला लागलेत की काय.. :D

पाकृ भारी. फोटो भारी. टेस्ट पण भारीच असणार पण.. रेवतीतै मी कांदा खातच नाही हो. :-( कोबी किसून ट्राय करू का?

आमसुलाच ताक माहिती आहे. अगदी न सांगता खाल्ल तर सोलकढीच. बाकि भात अन सजावट अतिशय सुरेख. आज करुन पाहिला जाइल.

मस्त पाककृती !!! सोलकढी तशी माझी आवडतीच आहे म्हणुन आमसुलाचे ताकही करुन बघेल तेही आवडेल अशी खात्री आहे :)

फोटुच इतका सुंदर आलाय तर भात देखील झकास असणारच ! ;) याबरोबर आमसुलाचे गोडसर ताक द्यावे. हा प्रकार कधी प्यायला नाहीये,ट्राय मारायला हवा ! :)

सर्व प्रतिसादकांचे आभार. गवि, तंबीटाच्या लाडवांचे लक्षात आहे. किस्ना, भाताचा फोटू पोह्यांसारखा वाटतोय ती माझ्या फटुग्राफीची कमाल समजावी. ;) फोटो टाकताना वापरण्याची भांडीकुंडी याबाबत लेख लिहिण्यास सानिकाताईंना प्रोत्साहन द्या. ज्यांनी चव न घेताही पाकृचे कौतुक केले त्यांना घरी आमंत्रण आहे. भात करून वाढला जाईल. शुचितै, आमसुले इंड्यातून आणावीत नाहीतर पराकडे चौकशी करावी. तो अश्या वस्तू शोधत फिरतो. ;) पेठकरकाकांनी व चिंतुकाकांनी आगळ व अर्क यावर चर्चा केल्याने आता लक्षात ठेवते.

आगळ म्हणजे कोकमच्या सालात मीठ मिसळून काढलेला अर्क आणि गोडसर असते ते कोकम सिरप ज्यापासुन सरबत केले जाते. आगळ सोलकढी साठी वापरतात. आगळ नसेल तर आमसूले पाण्यात भिजत घालून तो अर्क वापरावा.

मस्तच !! ए याला "रावणभात" म्हणतात का गं ? माझ्या सासूबाई सुद्धा असा भात करायच्या.

In reply to by जयवी

नाही. रावणभात हा खूपच तिखट असावा असे वाटते. हा किंचित मसालेदार असतो. धन्यवाद.