अवचितगड...

सुहास झेले's picture
सुहास झेले in भटकंती
20 Aug 2012 - 6:38 pm

अनायसे १५ ऑगस्टला गोऱ्या साहेबांच्या मेहरबानीमुळे सुट्टी मिळाली. ही आयती संधी सोडणार तरी कशी? मग ट्रेकचा प्लान सुरु झाला. आधीच्या रविवारी पालघर इथला, कोहोज आयत्यावेळी रद्द केला. त्याला कारण तोच गोरा साहेब. अमेरिकेतून हे बेणं आलं आणि फुलं उखडावी तशी काही म्यानेजर मंडळी आणि माझ्या काही मित्रांना अलगतपणे उखडून, त्यांना निरोपाचे नारळ दिले. डोक्याचा पर भुगा झाला होता. कोहोज करायचा कंटाळा आला होता. तिथे रेल्वे आणि इतर प्रवासाची शाश्वती नाही. मग दुसरा कुठला किल्ला करता येतो का बघू लागलो.... केंजळगड आणि रायरेश्वर करायचे मनात होतं, पण वेळेवर गाडी कुठे शोधणार आणि मिळालीच तर अव्वाच्यासव्वा दर लावणार. मग हो-नाही करत आदल्यारात्री सकाळी अवचितगड करतोय असे नक्की झाले. :)

भल्यापहाटे ४:०७ ची गाडी पकडून दादर मग कुर्ला आणि मग पनवेल असे पोचलो. पनवेलहून दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी पकडली. गाडी नेहमीप्रमाणे भारतीय वेळेनुसार अर्धा तास तास उशिरा आली. प्रचंड गर्दी होती. आता मला जाण्याचा कंटाळा आला होता, कसे तरी वाट बघत उभा होतो. एकदाची गाडी आली आणि धडपडत गाडीत चढलो. बसायला काही मिळणार नाही याची शास्वती असल्याने, आपला भर आणि भार दोन्ही पायावर राहणार, याची मानसिक तयारी केलेली होती. गाडीत उभं राहून पायाची पार वाट लागली. दोन दिवस झोप न झाल्याने मी जमेल तिथे, "डोळे मिटण्याचा" असफल प्रयत्न करत होतो...पण गाडीत भाजीवाले, चिक्कीवाले, वडेवाले आणि चहावाले दर दोन मिनिटांनी येऊन ओरडत होते. साधारण १०:१५ ला रोह्याला उतरलो आणि रिक्षा करून पिंगळसई गावी पोचलो.

गडावर बघण्यासारखे जास्त काही नाही. अवचितगड करण्याचे मुख्य कारण म्हणजे, जुलै महिन्यात झालेलं दुर्गसंवर्धन कार्य. ह्यावेळी पनवेल येथील दुर्गमित्र, ह्या सह्याद्रीप्रेमींनी एक अभूतपूर्व काम केले. १५० फुट खोल दरीत पडलेली २ टन वजनाची तोफ गडावर सुखरूप आणून ठेवली. रोह्याच्या निसर्गभ्रमण ह्या ग्रुपने ती तोफ आहे त्याच दरीत एका ठिकाणी, सुखरूप हलवून ठेवली होती. पण सह्याद्रीचे हे वैभव तिथे खितपत पडून राहू नये, आणि गडाला एकेकाळी मजबुती देणाऱ्या तोफेला गडावर आणणे गरजेचे होते. ते कार्य दुर्गमित्र संस्थेने हिमतीने करून दाखवले. ( बातमी )

गडाची वाट सोपी आहे. गडावर जाण्यास तीन मार्ग आहेत. सर्वप्रथम मुंबईहून कोकण रेल्वेने रोह्याला पोचावे आणि तिथून पिंगळसई गावापर्यंत २० रुपये दराने शेअर रिक्षा मिळते. गावात शिरताच एक गणपतीचे सुंदर मंदिर आहे, पण आम्ही गेलो तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. काही उत्सव किंवा पूजा असावी. जर गाडी घेऊन जात असाल तर पिंगळसई पर्यंत जाण्याची गरज नाही, रोह्याच्या आधी ६-७ किलोमीटर अंतरावर मेढा नावाचे गाव आहे. गावाची तंटामुक्ती गाव म्हणून मोठी कमान डाव्या बाजूला दिसते. तिथून शंकराच्या मंदिराकडे जावे. वाटेत एक मोठी पुष्करणीदेखील आहे. मंदिरासमोरून एक छोटं रेल्वेचे फाटक ओलांडून पुढे निघालो की थोड्या अंतरावर एक भलीमोठी विहीर आहे आणि तिथून उजव्या बाजूने जंगलातून वाट आहे. तिसरा मार्ग नागोठणे पासून पुढे रोह्याच्या दिशेने निघाल्यावर आहे. तिथे एक बंद कागद कारखाना आहे. कारखान्याच्या मागून गडावर जाण्यास मार्ग आहे. तिसऱ्या मार्गाबद्दल जास्त माहिती नव्हती. पिंगळसई मार्गाने गड माथ्यावर पोचायला किमान एक-दीड तास लागतो. माझं डोकं दोन दिवस जागरण झाल्याने गरगरत होतं, तरी आस्तेकदम करत गडावर पोचलो. :) :)

साक्षात रायगड भोवतालच्या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या किल्ल्यावर होती. किल्ला जास्त मोठा नाही, पण तिथे प्रचंड महसूल ठेवला जात असे. राजधानी जवळ असल्याने ही व्यवस्था केली होती. त्यामुळे महाराजांच्या श्रीमंत किल्ल्यांमध्ये अवचितगडाचेसुद्धा नाव येते. गडाचे स्थान हे त्याच्या जमेची बाजू आहे. गर्द रानात एका उंच डोंगरावर किल्ला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवणे सहज सोप्पे जाते.

माझी तब्येत ठीक नसल्याने आधी फोटो काढत नव्हतो, मग दीपकने शाब्दिक सत्कार केल्यावर राहवले नाही ;-)

हे घ्या काही फटू :) :)

१. गावात पोचताच ही स्वच्छ पाण्याची विहीर दिसली, आत डोकावून बघण्याशिवाय पर्याय नव्हता. दीपक साहेबांनी सुचवलेली पोज..

२.

३.

४. किल्ल्याचा महादरवाजा

५.

६. युध्दशिल्प..

७. कुंडलिका

८. न्हाण्याचा हौद

९. हेच ते वैभव जे दरीत पडलेलं होतं...

१०. पाण्याच्या टाक्या..एकूण ६ आहेत आणि सगळ्या टाक्या भरल्याशिवाय पाणी बाहेर पडत नाही अश्यारीतीने एकमेकांना जोडलेल्या आहेत. पिंगळसईच्या देवीची घुमटी असलेल्या पहिल्या टाक्यात थोडं जास्त पिण्यायोग्य पाणी आहे... बारा महिने पाणी उपलब्ध असते.

११.

12. प्रतिबिंब...

१३. महादेव मंदिर..

१४. कदाचित म्हसोबा..

१५. :) :)

१६. दक्षिणेकडे असलेल्या बुरुजावर असलेला शिलालेख - श्री गणेशाय नमः श्री जयदेव शके १७१८ नलनाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा

१७. मेढा गावाच्या दिशेने असलेल्या छोट्या बुरुजा आधी ही तोफ आहे. बाजूनेचं चोर दरवाजा आहे, जो पूर्णपणे बंद आहे..

१८. कोकण रेल्वे...

१९. भगव्यासोबत तिरंगा ..

२०.

२१. कुठल्या मार्गाने खाली उतरावे, ह्यावर झालेलं चर्चासत्र (मागे दरी आहेचं) ;-)

२२. गडाचा नकाशा आणि सोबत सगळ्यांच्या सह्या..

२३. :)

गडाचे वैभव परत आणण्यासाठी केलेली मेहनत.... (साभार भूषण आसबे)

-------------------------------------------------------------------------------

- प्रचि 1,2,6,8,14,16 साभार अर्चना
- प्रचि २३ धुंडीराज
- प्रचि २२ आणि आयडियाची कल्पना दीपक परुळेकर (ब्लॉग - मनाचे बांधकाम)

- सुझे !! :) :)

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

20 Aug 2012 - 8:34 pm | प्रचेतस

गडाचे फोटो आणि वर्णन सुरेख.

अवचितगडावर जायलाच हवे आता.

पैसा's picture

20 Aug 2012 - 9:11 pm | पैसा

वर्णन, फोटो आणि व्हिडिओ पाहून डोळ्याचं पारणं फिटलं. मस्तच!

मदनबाण's picture

20 Aug 2012 - 9:50 pm | मदनबाण

मस्त रे सुझे...
विहीरीचा फोटो विशेष आवडला. :)

अत्रुप्त आत्मा's picture

20 Aug 2012 - 10:06 pm | अत्रुप्त आत्मा

क्लास.......!
सलाम...सलाम....सलाम...!

मस्त रे अण्णा... वृत्तांत, माहिती आणि फोटो तिन्ही.

मोदक's picture

21 Aug 2012 - 2:06 am | मोदक

वृत्तांत आवडला रे..

फटू आणि वर्णन मस्त. सुझे टच जाणवतो आहे.

मोदक's picture

21 Aug 2012 - 2:05 am | मोदक

वृत्तांत आवडला रे..

फटू आणि वर्णन मस्त. सुझे टच जाणवतो आहे.

किसन शिंदे's picture

21 Aug 2012 - 10:42 am | किसन शिंदे

वृत्तांत लय भारी रे सुझे अनं तो विहिरीचा फोटो तर त्याहूनही भारी! प्रथम दर्शनी असं वाटतं कि तो फोटो विहीरीत आत उतरून काढलाय.

स्पा's picture

21 Aug 2012 - 12:37 pm | स्पा

असेच म्हणतो
सर्व फोटू आणि वर्णन
अप्रतिम

नि३सोलपुरकर's picture

21 Aug 2012 - 4:08 pm | नि३सोलपुरकर

धन्यवाद, सु़झे
मस्त सफर घडवलीस,फटू आणि वर्णन मस्त

अप्रतिम ,
पहिला फोटो सर्वात जास्त आवडला ... प्रथमता तो विहिरीमध्ये उतरुन काढल्या सारखाच वाटला..

वृत्तांत पण मस्तच.

अप्रतिम ,
पहिला फोटो सर्वात जास्त आवडला ... प्रथमता तो विहिरीमध्ये उतरुन काढल्या सारखाच वाटला..

वृत्तांत पण मस्तच.

सागर's picture

22 Aug 2012 - 11:42 am | सागर

पहिला फोटो सर्वात जास्त आवडला ... प्रथमता तो विहिरीमध्ये उतरुन काढल्या सारखाच वाटला..

अगदी हेच वाटले :)

दिपक's picture

22 Aug 2012 - 10:18 am | दिपक

जबरी फोटो सुझे.

ह्या सह्याद्रीप्रेमींनी एक अभूतपूर्व काम केले. १५० फुट खोल दरीत पडलेली २ टन वजनाची तोफ गडावर सुखरूप आणून ठेवली

सॅल्युट त्या सह्याद्रीप्रेमींना.

बॅटमॅन's picture

22 Aug 2012 - 6:50 pm | बॅटमॅन

उद्देश आणि जिगर या दोन्हींसाठी सलाम त्यांना.

स्वच्छंदी_मनोज's picture

22 Aug 2012 - 8:59 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच फोटो..

दोन वर्षांपुर्वीच्या ह्याच महीन्यात केलेल्या अवचितगडाच्या आठवणी जाग्या झाल्या..

पिंगळसईला गेलात तर तिथले ऐतीहासीक उजव्या सोंडेच्या गणपतीचे मंदीर नाही पाहीलेत? हे मंदीर बर्वे घराण्याच्या खाजगी मालकीचे आहे आणी पुण्याच्या सारसबागेच्या गणपतीची हुबेहुब प्रतीमा आहे... आम्ही गेलो होतो तेव्हा बर्वे घराण्यातील वंशज तेथे पुजेला आले होते आणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या दोन्ही मुर्ती एकाच कारागिराने बनवल्या आहेत आणी एकाच कालखंडात घडल्या आहेत..कधी परत गेलात तर जरूर बघा