गेल्या विकांताला सहज म्हणून स्मृतिचित्रे हातात घेतले. आणि कितव्यांदातरी वाचु लागलो. नेहमीप्रमाणे याहीवेळी जरावेळ वाचु म्हणून हातात घेतलेलं हे पुस्तक संपवल्याशिवाय खाली ठेवलं नाही. आणि दरवेळी नव्याने काहितरी शिकवणार्या या पुस्तकातून नवे प्रश्न समोर उभे रहातात. यावर याधी पुस्तकविश्व वर इथे लिहिलं होतंच. तेच पुन्हा उधृतही करतो आणि त्यात पुनर्वाचनानंतर काही वाढीव प्रश्न त्यात वाढवतो आहे.
इथेही त्यावर साधकबाधक चर्चा होईल अशी आशा आहेच
=======
कराचीला एक जहाज निघते.. त्यात अनेक प्रवाशांपैकी एक असतात 'श्रीमती' लक्ष्मीबाई टिळक.. लक्ष्मीबाई लिहितात की त्यांच्यापुढे मुंबई छोटी होऊ लागते आणि बोट कराचीकडे निघते.. टिळकांची स्वतंत्रता कविता त्यांना आठवते आणि लक्ष्मीबाईंनी लिहिलेले आत्मचरित्र संपते! पण खरं तर इथे फक्त पुस्तक केवळ लौकिकार्थाने संपते.. वाचकाच्या मनात अनेक तास, दिवस, आठवडे ते वेगवेगळ्या प्रसंगांत रूंझी घालत असते. काहींची आत्मचरित्रे स्फूर्ती देतात, काहि आत्मचरित्रे हुरूप देतात, काही आशा देतात तर काहि आत्मचरित्रांतून जिद्दीला सलाम करावासा वाटतो. मात्र स्मृतिचित्रे वाचले आणि ह्या आत्मचरित्राने मला आत्मपरिक्षण करायला भाग पाडले!
केवळ स्वतःचे आयुष्यच नव्हे तर एक अख्खा काळ लक्ष्मीबाई आपल्यापूढे उभ्या करतात. त्या काळातील समाज, राहणीमान, पुरूषप्रधानता, स्त्रीदाक्षिण्य, खोलवर रूजलेला जातीभेद, भंगिणींपासून ते ब्राह्मणांपर्यंतच्या रिती, आचार, विचार ह्या अश्या सगळ्या गोष्टी सहज म्हणून टिपल्या आहेत. आणि ह्या सहज झालेल्या टिप्पणीतून चित्रपट बघावा तसा काळाचा तुकडा आपण बघतो. केवळ बघत नाहि तर स्तिमीत होतो.
सभोवतालच्या वर्णनाइतकेच लक्षणीय आहे त्यांची भाषा. जुन्या वळणाची असली तरी इतकी गोड व चित्रदर्शी भाषा क्वचितच वाचायला मिळते. छोटी परंतू नेमक्या शब्दांतली ती वाक्ये म्हणजे निव्वळ आनंद! नानांना, म्हणजे माझ्या वडिलांना "सोवळे" झाले होते. ह्या पहिल्या पानावरील वाक्याने जे लक्ष वेधून घेतले ते शेवटपर्यंत अनेक वाक्यांनी-शब्दांनी मनात घर केले.
ह्या पुस्तकात काय आहे, काय नाहि हे ज्याने त्याने ठरवावे, तेवढी माझी कुवत नाही. मात्र हा प्रपंच करतो आहे ते पुस्तक वाचून माझ्या मनात उठलेल्या तरंगांना शमवण्यासाठी. सध्या आपण कित्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून केवढे काळजीत पडतो. कित्येक गोष्टींवरून वाद घालतो. साधी सर्दी झाली तरी केवढा उपचाराचा मारा करतो, किंवा अभ्यास/कामे म्हणजे जगात आपल्यालाच आहेत असे अनेकदा वागतो. लक्ष्मीबाईंचे हे आत्मचरित्र वाचून मला माझ्याच काहि वागण्याची गंमत, लाज, आश्चर्य वगैरे वगैरे सारे काही वाटते आहे. जगात एका व्यक्तीरोबर जे जे काही पिडादायक होऊ शकते ते ते लक्ष्मीबाईंनी सोसूनही त्या कधीही नियतीच्या नावाने, झालेल्या कष्टाच्या नावाने बोटे मोडताना दिसत नाहीत ही केवढी मोठी शिकवण आहे. स्वतःच्या आयुष्यात सारे काही आलबेल असूनही त्यांच्या लेखनातून जाणवणारी अर्धी शांतताही माझ्या मनाला का मिळू नये ही टोचणी म्हणा हा प्रश्न म्हणा, मनाला सतत भेडसावतो आहे.
- हल्लीच्या 'इस्टंट लाईफ' मुळे, त्या वेगामुळे ही अस्वस्थता आली आहे असे वाटते का?
- सारी गणिते विपरीत असूनही विचारांत - आचारांत 'पॉसिटिव्हनेस' दाखवणारी माणसे अजूनही आपल्या भोवती क्वचित का होईना पण दिसतात. त्यांना ही उर्जा कशी मिळत असेल? का सध्याच्या 'घाऊक' आनंद शोधण्याच्या काळात आपण आनंद देणार्या छोट्या गोष्टींचे मोल आणि त्या वेचण्यासाठी करायच्या कष्टांची तयारी विसरत चालले आहोत?
- की त्या काळी स्त्रिया इतका विचार करत नसत? त्यांना दिलेली वागणूक 'हे असेच असते-असायचे' असा त्यांचा समज-विश्वास असल्याने (करून घेतल्याने-तत्कालिन समाजाने करवल्याने) त्यांना ह्या गोष्टी सोसताना त्या काही सोसताहेत हे त्यांना कधी जाणवलंच नाही?
- लक्ष्मीबाईंनी सामना केलेल्या तमाम प्रसंगांतील एखादा जरी माझ्यावर गुदरला तरी तितक्या शांतपणे -प्रसंगी इतक्या समंजसपणे- मी त्याचा मुकाबला करू शकेन का हा प्रश्न मलातरी अस्वस्थ करतो. विचित्र वडील, विक्षिप्त सासरे आणि सर्वांवर कडी म्हणजे लहरी व अव्यवहारी नवरा असूनही त्या कधीच इतरांनी काय करावे असा उपदेश करताना दिसत नाहीत. स्वतः करता येईल तितके करावे ही वृत्ती अनुकरणीय का पारतंत्र्याचे लक्षण म्हणून दुर्लक्षणीय?
- सध्या एकूणच आत्मप्रियता, स्वातंत्र्यप्रियतेचा कधीतरी अतिरेक होतो असे वाटते का?
डोक्यात असंख्य विचार आहेत त्याची उलट सुलट उत्तरेही आहेत.. थोडक्यात काय तर हे नितांतसुंदर पुस्तक पचायला बरेच जड आहे.. बराच विचार-रवंथ करावा लागेलसे दिसते!
प्रतिक्रिया
17 Aug 2012 - 2:46 pm | प्रभाकर पेठकर
पुस्तक वाचल्याशिवाय काय मतप्रदर्शन करणार? पुस्तक वाचले पाहिजे.
17 Aug 2012 - 4:27 pm | मन१
वाचल्याशिवाय बोलण्यात अर्थ नाही.
माझे सध्याचे मत ह्यामंडळींबद्दल(ना वा टिळक आणि लक्ष्मीबाई टिळक) चांगले नाही. ख्रिश्चन बनण्याचे खूळ ह्यांच्या डोक्यात का भरले असावे हे "अगदि स्टेप बाय स्टेप" माहीत झाले तर बरे.
मला धार्मिकांबद्दल तर्कार नाही तशीच नास्तिकांबद्दल, वैचारिकांबद्द्ल, सुधारकांबद्द्ल अजिब्बात तक्रार नाही(आगरकर , र धो वगैरे).ते सगळ्यांनाच मूर्ख म्हणतात.
.
पण एकाला मूर्ख म्हणून दुसर्याकडे जाणार्याबद्दल आश्चर्य वाटतं.
.
18 Aug 2012 - 1:25 pm | प्रसाद प्रसाद
स्मृतिचित्रे वाचून माझ्या अल्पमतीला झालेले आकलन असे -
लक्ष्मीबाईंच्या माहेरचा विचार करता त्यांचे वडील सोवळे झालेले त्यामुळे ते मीठ सुद्धा धुवून खात असा उल्लेख आहे. इकडे टिळकांकडे ही जरी कोणी सोवळे वगैरे झालेले नसले तरी 'शिवू नका' परंपरा त्या वेळेप्रमाणे होतीच.
याउलट टिळकांचा स्वभाव होता असे दिसते, त्यांना गरीबांना मदत करावी असे सतत वाटे ह्यात फक्त गरीब ब्राह्मणच नसून हर जातीधर्माचे लोक होते. स्मृतिचित्रे वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे लक्ष्मीबाईना शिवाशिव वगैरे प्रकारात फारसा रस नव्हता किंवा असे अनुमान काढता येते की अगदी लहानपणापासून अतिप्रमाणात पाहिलेल्या 'शिवू नका' प्रकारामुळे त्यांच्या मनात ह्या एकूण प्रकाराविषयीचा फोलपणा लक्षात आला होता. (तत्कालीन धार्मिक शिवाशिवीचे पूर्ण संस्कार मात्र एकदम त्यांच्यातून गेलेले दिसत नाहीत, ते हळूहळू कमी होताना वाचनात येतात).
स्मृतिचित्रात टिळकांचे आणि काही प्रमाणात लक्ष्मीबाईंचे असे मत वाचावयास मिळते की दीनदुबळ्यांना, आजारी लोकांना (इथे माणसाचा धर्म विचारात न घेता) मदत करणे हे फक्त ख्रिश्चन मिशनरींचे काम आहे का, आपल्या लोकांचे नाही का?
गरीब आणि दीनदुबळ्यांना मदत करण्याची आत्यंतिक इच्छा आणि याविरुद्ध तत्कालीन धर्माची आलेली बंधने यामुळेच टिळकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असावा असे वाटते. अक्षरशः अंगावरचे सोडून देऊन मदत करणे हा टिळकांचा स्वभाव लक्ष्मीबाईंनी वर्णन केला आहे (आणि ह्या पराकोटीच्या मदत करण्याच्या भावनेबद्दल अनेकदा त्यांच्याशी भांडण ही झाले हे ही लक्ष्मीबाई नमूद करतात).
लक्ष्मीबाईंनी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला ह्याला मात्र अनेक पैलू असू शकतात. एक तर लक्ष्मीबाईंना आयुष्यभर सांभाळायची तसेच त्यांच्या मुलाचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या बहिणीच्या नवऱ्याने (पेंडसे) स्वीकारण्याची पूर्ण तयारी दाखवली होती. अशीच तयारी इतर अनेकांनी दाखवली होती, त्यामुळे नवऱ्याशिवाय कोणी राहिले नाही त्यामुळे धर्मांतर केले असा विषय येथे नाही. पण एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ह्या थोड्या काळात लक्ष्मीबाईंना टिळकांचा धर्मांतरामुळे राग आला आहे पण त्यांनी असे का केले असावे ह्या विषयीही त्या चिंतन करतात (त्रासही करून घेतात). त्यांच्या मनातील अनेक द्वंद्वे आणि समाज विचार यावेळी पुस्तकात येतात. टिळक धर्मात परत यावेत यासाठी त्या अनेक उपायही करतात अगदी मारुतीच्या मूर्तीच्या डोक्यावर दगड ठेवणे , मारुतीच्या मूर्तीवर रामनामाच्या चिठ्ठ्या चिकटवणे इथपर्यंत.
लक्ष्मीबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तो ही अगदी मनापासून. नवऱ्याला प्रत्येक सामाजिक कामात मदत करणे हा बनलेला
स्वभाव आणि टिळकांबरोबर इतकी वर्षे राहिल्यानंतर त्यांच्याही मनात वाढलेली इतरांना मदत करण्याची इच्छा तसेच रामापेक्षा (किंवा इतर हिंदू देव) येशू आवडला (हे वाक्य माझे) म्हणून नवऱ्याने धर्मांतर केलेले नाही तर ख्रिश्चन धर्मात राहिल्याने सेवाभाव वाढवता येईल, समाजसेवा अधिक खुल्या रीतीने करता येईल हे काहीसे लक्षात आल्याने लक्ष्मीबाईंनीही बाप्तिस्मा घेतला असे वाटते.
मूळ पुस्तकातील ओघवती भाषाशैली आणि काहीशा त्रयस्थपणे प्रसंग सांगण्याची हातोटी यामुळे स्मृतिचित्रे अजूनही वाचावेसे वाटते.
(मन१ आपण जरूर स्मृतिचित्रे वाचावे, निदान रेव्हरंड टिळक आणि लक्ष्मीबाई यांच्या धर्मांतराविषयीचे जे आपले मत चांगले नाही ते बदलेल असे वाटते)
19 Aug 2012 - 11:40 am | ऋषिकेश
अनेक आभार प्रसाद! छान प्रतिसाद !
स्पृश्यास्पृश्यतेचा फोलपणा लक्षात आल्यावर लक्ष्मीबाई जेव्हा पहिल्यांना महार स्त्रीच्या जाऊन-खाऊन येतात तेव्हा रे. टिळक त्यांना "तु तर माझ्याही पुढे गेलीस" असे प्रशस्तीपत्रकच देतात हा भाग माझ्या सर्वात आवडीचा आहे
19 Aug 2012 - 12:08 pm | मन१
कधी हाताला लागले तर आता नक्कीच वाचावे म्हणतो.
"एकापेक्षा दुसरा श्रेष्ठ " अशी भावना नाही, तर सद्य स्थितीत इष्ट ते काम करण्यास येणार्या अडथळ्यांचा विचार करुन घेतलेला निर्णय असे दिसते. वाचेन. मगच अधिक बोलेन.
आभार.
ऋ चा हाही धागा त्यामुळं कामाचा ठरला म्हणायचा.
17 Aug 2012 - 2:52 pm | नाना चेंगट
>>>हल्लीच्या 'इस्टंट लाईफ' मुळे, त्या वेगामुळे ही अस्वस्थता आली आहे असे वाटते का?
शक्यता नाकारता येत नाही.
>>> सारी गणिते विपरीत असूनही विचारांत - आचारांत 'पॉसिटिव्हनेस' दाखवणारी माणसे अजूनही आपल्या भोवती क्वचित का होईना पण दिसतात. त्यांना ही उर्जा कशी मिळत असेल? का सध्याच्या 'घाऊक' आनंद शोधण्याच्या काळात आपण आनंद देणार्या छोट्या गोष्टींचे मोल आणि त्या वेचण्यासाठी करायच्या कष्टांची तयारी विसरत चालले आहोत?
शक्यता नाकारता येत नाही.
>>> की त्या काळी स्त्रिया इतका विचार करत नसत? त्यांना दिलेली वागणूक 'हे असेच असते-असायचे' असा त्यांचा समज-विश्वास असल्याने (करून घेतल्याने-तत्कालिन समाजाने करवल्याने) त्यांना ह्या गोष्टी सोसताना त्या काही सोसताहेत हे त्यांना कधी जाणवलंच नाही?
ऐतिहासिक कालखंडाबद्दल विचार करतांना त्या काळातील होऊनच विचार करावा, आजचे मापदंड लाऊ नयेत असे आमचे एक गुरु आम्हास सांगत असत. त्यामुळे आज स्वयंपाकघरात गॅस आहे तेव्हा किती धुराचा त्रास असेल नै असे कुणी म्हटले की आम्ही फक्त गालात हसतो. उद्या अजून काही सुधारणा झाल्या, शोध लागले की लोक म्हणतील काय बै सिलिंडर आणा न्या किती कटकट होती नै ! असो.
>>> लक्ष्मीबाईंनी सामना केलेल्या तमाम प्रसंगांतील एखादा जरी माझ्यावर गुदरला तरी तितक्या शांतपणे -प्रसंगी इतक्या समंजसपणे- मी त्याचा मुकाबला करू शकेन का हा प्रश्न मलातरी अस्वस्थ करतो. विचित्र वडील, विक्षिप्त सासरे आणि सर्वांवर कडी म्हणजे लहरी व अव्यवहारी नवरा असूनही त्या कधीच इतरांनी काय करावे असा उपदेश करताना दिसत नाहीत. स्वतः करता येईल तितके करावे ही वृत्ती अनुकरणीय का पारतंत्र्याचे लक्षण म्हणून दुर्लक्षणीय?
कोणतीही अंगिकारलेली वृत्ती ही त्या व्यक्तीचा स्वतःचा निर्णय असतो. त्यावर भाष्य अनावश्यक.
>>> सध्या एकूणच आत्मप्रियता, स्वातंत्र्यप्रियतेचा कधीतरी अतिरेक होतो असे वाटते का?
अर्थातच. आणि कधीतरी नाही तर बर्याच वेळेस. अर्थात हा एकंदर मुबलक प्रमाणात बाजारात फिरणार्या पैशाचा परिणाम आहे. असो.
>>>>डोक्यात असंख्य विचार आहेत त्याची उलट सुलट उत्तरेही आहेत.. थोडक्यात काय तर हे नितांतसुंदर पुस्तक पचायला बरेच जड आहे.. बराच विचार-रवंथ करावा लागेलसे दिसते!
ऋषिकेशासारख्या माणसाने असे लिहिल्यावर खरे तर चुप्प बसायला हवे होते. पण उपजत वृत्तीला शमवणे अजून जमले नाही याचाच पुरावा म्हणजे हा प्रतिसाद.
17 Aug 2012 - 2:58 pm | तर्री
मस्त प्रकटन !
त्या महर्षी कर्वे कुटुंबीय आणि ही टिळक मंडळी - आपल्याला झेपणारी नाहीत. बुद्धी , ध्येयवाद , विक्षिप्तपणा ह्यांची जुळणी करताना धाप लागते !
17 Aug 2012 - 4:14 pm | llपुण्याचे पेशवेll
>> सध्या एकूणच आत्मप्रियता, स्वातंत्र्यप्रियतेचा कधीतरी अतिरेक होतो असे वाटते का?
ऋष्या हा प्रश्न तुला पडावा हे पाहून अचंबित झालो.
बाकी पुलंच्या पेस्तनजींचे वाक्य आठवले "गॉड इज़ सफरिंग".
पूर्वीच्या पिढीत माणसे बिनधास्त नोकरीसाठी परगावी राहत सप्ताहातून, महीन्यातून एकदा घरी येत. तरीही त्यांच्यातला प्रेम जिव्हाळा कधी कमी झाला नव्हता. किंवा लैंगिक कुचंबना झाल्याची बोंब उठत नव्हती. अथवा अशा व्यक्ती सरसकट व्यभिचार करताना दिसत नव्हत्या. (व्यभिचार नव्हताच असे नाही; परंतु आता इतका सार्वत्रिक नव्हता)
उठून हक्काने एखादं माणून घरी आलं तर खाजगीपणावर हल्ला होत नव्हता.
असो, गेला तो जुना काळ.
17 Aug 2012 - 4:22 pm | मन१
अथवा अशा व्यक्ती सरसकट व्यभिचार करताना दिसत नव्हत्या. (व्यभिचार नव्हताच असे नाही; परंतु आता इतका सार्वत्रिक नव्हता)
चांगलय की मग. संधीचा फायदा का घेत नाहीस?
Dear pessimist and optimist while you were discussing whether the glass is half filled or half empty, I drank that beer!
यंजॉय.........
A pessimist thinks that today's era is bad. people; specially women have no ethics and they engage in extramarital affairs.Pessimist thinks they all are bad. An optimist thinks they should be!!
;)
17 Aug 2012 - 5:42 pm | llपुण्याचे पेशवेll
चांगलय की मग. संधीचा फायदा का घेत नाहीस?
???
१. इथे फायदा घेण्या न घेण्याचा प्रश्नं कुठे येतो मनराव? गल्ली चुकले काय?
२. संधी का घेत नाहीस? आम्ही सेकन्डहॅन्ड गाडी चालवत नाही.
असो पुढील चर्चा मुद्द्याला धरुन होईल अशी अपेक्षा.
17 Aug 2012 - 5:48 pm | नाना चेंगट
>>>लैंगिक कुचंबना झाल्याची बोंब उठत नव्हती. अथवा अशा व्यक्ती सरसकट व्यभिचार करताना दिसत नव्हत्या
बहुधा त्याकाळी लैगिक कुचंबना असा काही प्रकार असतो हा विचार प्रचारात नसावा, किंवा समाजाने हे असेच असते असेच असायचे असा प्रचार करुन दिला असावा त्यामुळे लैगिक क्रियांचे (अति)उदात्तिकरण झाले नसावे आणि काहीही करुन ते आयुष्यात (सतत) मिळवलेच पाहिजे असा अट्टाहास नसावा असे वाटते.
17 Aug 2012 - 5:51 pm | llपुण्याचे पेशवेll
बहुधा त्याकाळी लैगिक कुचंबना असा काही प्रकार असतो हा विचार प्रचारात नसावा, किंवा समाजाने हे असेच असते असेच असायचे असा प्रचार करुन दिला असावा त्यामुळे लैगिक क्रियांचे (अति)उदात्तिकरण झाले नसावे आणि काहीही करुन ते आयुष्यात (सतत) मिळवलेच पाहिजे असा अट्टाहास नसावा असे वाटते.
बोल्ड केलेल्या भागाशी सहमत.
17 Aug 2012 - 5:52 pm | मन१
कुचंबणा ह्याऐवजी वखवखलेपणा, हपापलेपना, प्राणिज्/पाशवी/रानटी प्रबळ इच्छा हे शद्ब घातले तर मान्य.
तेव्हा माणसारखं वागायचे सगळे. हपापलेल्या जनावरासारखं नाही.
17 Aug 2012 - 5:59 pm | पैसा
लक्षुंबाईंची भाषा अतिशय सुरेख. घरातल्या आजीने नातवंडा पतवंडांना भोवताली जमा करून गोष्टी सांगाव्यात अशी. माणूस या गोष्टींमधे वाहून जातो. पहिला अर्धा भाग इतक्या गमतीजमतीनी भरलेला आहे की खरं तर पुढचा भाग वाचू नये असं वाटतं. पण लक्षुंबाईंनी अनेक प्रसंगांचा धैर्याने सामना कसा केला हे वाचणं अनिवार्य आहे.
रे. टिळक तरूण वयात कोणा मिशनर्यांच्या संपर्कात आले आणि त्यांनी धर्म बदलला. लक्षुंबाईंची अवस्था विचित्र होऊन बसली. ना सधवा, ना विधवा. त्या काळात अशा स्त्रीने काय करायला हवं होतं? एक साधी संसारी बाई समाजाच्या विरुद्ध तर जाऊ शकत नव्हती. मग त्यांनीही नवर्याच्या बरोबर ख्रिस्ती व्हायचं ठरवलं. त्या काळातली गोष्ट वाचताना आपण आजच्या काळातले निकष लावू शकत नाही. पुस्तक वाचायचा आनंद घ्यायचा एवढंच आपल्या हातात आहे.
17 Aug 2012 - 8:42 pm | ऋषिकेश
खरंय! त्यातही कित्येक काळ त्यांनी स्वतः धर्म बदलला नाही.
बाकी माझी चलबिचल या धर्मबदलापुरतीच सिमीत नाही. मला ती नीट शब्दात पकडताही येत नाहीये बहुतेक.
मान्य. आणि तसा उद्देशही नाही. मात्र कळत नकळत तुलना होते. तुलनेने आजच्या काळात अतिशय जास्त प्रगती, मोकळे विचार वगैरे सारे असून त्याकाळच्या पेक्षा अधिक सोडा तितके समाधानही दृष्टीस पडत नाही बघितल्यावर आपण नक्की काय मिळवले वगैरे प्रश्न पडायला लागतात? आणि मग आपणच पॉझिटिव्ह नाही की काय? अशी वाटणारी शंका अधिक बोचु लागते :(
छ्या! पॉझिटिव्हीटिने भरलेले हे पुस्तक वाचकाला मात्र विचारांच्या गर्तेत टाकते :(
17 Aug 2012 - 7:25 pm | रेवती
पुस्तक वाचणारच. यादीत लिहून ठेवते.
तुझे लेखन नेहमीच आवडते.
तुला पडलेले प्रश्नही पटले म्हणून आवडले.
काहींची उत्तरे कधीतरी डोक्यात येऊन जातात पण ती उघड बोलण्याइतपत माझी पात्रता नाही असेही वाटते.
17 Aug 2012 - 8:46 pm | ऋषिकेश
स्तुतीबद्दल धन्यु! बरं वाटले. :)
ते पुस्तक वाचल्यावर माझी प्रश्न विचारण्याचीही पात्रता नाही असे वाटु लागले असताना, प्रश्न विचारायचे धाडस केले आहे. तेव्हा आता तुम्हीही डोक्यात आहे ते टंकाच एकदाचे! होऊन जाऊ दे लाऊड थिंकींग! :)