तिरंगा भात.

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in अन्न हे पूर्णब्रह्म
15 Aug 2012 - 2:01 am

Tiranga Bhat

हा तिरंगा भात टोमॅटो भात, साधा पांढरा भात आणि पालक भात ह्यांच्या एकमेळातून (combination) बनविला आहे.

साहित्यः

तांदूळ ३ वाट्या
टोमॅटो ७-८ नग
पालक एक मोठी जुडी.
हिरव्या मिरच्या ३
काश्मिरी तिखट चवीनुसार.
कांदे ३ मोठे
लसूण पाकळ्या ७-८,
आलं २ इंच
कोथींबिर एक मुठ
मोहरी १ लहान चमचा (टीस्पून)
धणे पावडर १ मोठा चमचा (टेबलस्पून)
कसूरी मेथी एक लहान चमचा
मीठ चवीनुसार
खायचा सोडा चिमुटभर
तुप ३ डाव
काळीमीरी सजावटीसाठी.

आधी एका पातेल्यात पाणी तापत ठेवून ते उकळले की त्यात टोमॅटो टाका. २-३ मिनिटे टोमॅटो उकडून, उकळत्या पाण्यातून काढून लगेच थंड पाण्यात टाका. त्याने टोमॅटोची साले निघतील. ती काढून टोमॅटोचा गर मिक्सर मधून काढून त्याची मुलायम पेस्ट करून घ्या.

त्याच पाण्यात पालकाची धुतलेली पाने टाका. अर्धा चमचा मीठ आणि चिमुटभर खायचा सोडा टाकून झाकण न ठेवता पालक शिजवून घ्या. पालक शिजला की तोही उकळत्या पाण्यातून काढून थंड पाण्यात टाका. नंतर रोळीत काढून निथळून घ्या आणि त्याचीही मुलायम पेस्ट बनवून घ्या.

कांदा, लसूण, आलं, कोथींबिर बारीक चिरून घ्या.
हिरव्या मिरच्या बारीक चिरुन घ्या.

भात मोकळा शिजवून घ्या. एका परातीत सर्व भात काढून जरा थंड होऊ द्या. त्या भाताचे एकूण ३ भाग करा.

कढईत एक डाव तुप घ्या. ते नीट तापले की त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की चिरून ठेवलेल्या पैकी अर्धे आले, लसूण, कांदा आणि कोथींबिर कढईत टाकून नीट परतून घ्या.

आलं-लसुणाचा मस्त खमंग वास आला की त्यावर टोमॅटोची मुलायम पेस्ट, काश्मीरी तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून परतत राहा. टोमॅटो पेस्ट नीट शिजून त्यातील पाणी आटून तुप सुटले पाहिजे. असे झाले की त्यावर एक भाग भात टाकून परतून, व्यवस्थित मिसळून घ्या. भात कुठेही पांढरा दिसता कामा नये. चव पाहून आवश्यकता असल्यास मीठ घाला. तुप कमी आहे असे वाटल्यास थोडे टाकून परता. भाताला छान पैकी चकाकी येईल. हा टोमॅटो भात कढईतून काढून ठेवा.

कढई धुवून, पुन्हा गॅसवर ठेवा. एक डाव तुप गरम करून त्यावर उरलेला कांदा, आलं-लसूण, हिरवी मिरची आणि कोथींबिर घालून आलं-लसुणाचा खमंग वास सुटेपर्यंत परतून घ्या. आता त्यावर पालकाची मुलायम पेस्ट, धणे पावडर, कसूरी मेथी पावडर टाकून परता. पालकातील पाणी आटून तुप सुटले पाहिजे. तसे झाले की त्यात एक भाग भात टाकून परता. नीट मिसळा. भात कुठेही पांढरा दिसता कामा नये. आवश्यकता भासल्यास जरा तुप मिसळा. भात नीट मिसळाला गेला की काढून ठेवा.

पुन्हा एकदा (शेवटची) कढई धुवून घ्या. त्यात एक डाव तुप टाकून तापवा. तुप तापले की उरलेला भात त्यावर टाकून परतून घ्या. ह्या भाताला फक्त चकाकी आणायची आहे. ती आली की चवीनुसार मीठ घालून मिसळा आणि उतरवून ठेवा.

आता एका काचेच्या पसरट चौकोनी भांड्यात, तिन रंगांचे भात, भारतीय ध्वजाच्या स्वरुपात मांडून मधल्या पांढर्‍या भागावर काळीमीरीच्या साहाय्याने अशोकचक्राची नक्षी काढा.

हे काचेचे भांडे असेच्या असे जेवणाच्या टेबलावर ठेवा.

जयहिन्द.

शुभेच्छा....!

प्रतिक्रिया

सिद्धार्थ ४'s picture

15 Aug 2012 - 2:13 am | सिद्धार्थ ४

Happy independence day to all

सुनील's picture

15 Aug 2012 - 2:16 am | सुनील

दिसते आहे छान आणि विशेषतः पालक-भात तर रुचकरच लागेल यात शंका नाही!

अवांतर १ - पालक शिजवताना झाकण न लावण्याचे कारण काय?
अवांतर २ - ह्या नविन बुधवारी उपक्रमाबद्दल संबंधिताचे आभार!

प्रभाकर पेठकर's picture

15 Aug 2012 - 3:09 am | प्रभाकर पेठकर

पालक शिजवताना झाकण न लावण्याचे कारण काय?

कुठलीही पालेभाजी शिजवताना झाकण ठेऊ नये. त्याने पातेल्यात उष्णता कोंडली जाऊन उच्च तापमानात पालेभाज्यांमधील जीवनसत्वे मरतात (असं वाचलंय) आणि मुख्य म्हणजे रंग काळवंडतो. पालकचा रंग मस्त तजेलदार राहावा असे वाटत असेल तर किंचित मीठ आणि चिमुटभर खायचा सोडा घालून झाकण न ठेवता पालक माफक शिजवावा. जास्त शिजवल्यास रंगात आणि चवीत फरक पडतो.

का कोणास ठाऊक पण पंजाबी धाब्यांवर पालक काळापडण्या इतपत शिजवतात. मला तरी अशा पालकाची चव (ती उरतच नाही) आणि रंग आवडत नाही.

तळटीपः ह्यात कुठलाही खायचा 'रंग' वापरलेला नाही.

सुनील's picture

15 Aug 2012 - 3:19 am | सुनील

धन्यवाद! ह्यापुढे पालेभाजी शिजवताना लक्षात ठेवले पाहिजे.

तळटीपः ह्यात कुठलाही खायचा 'रंग' वापरलेला नाही.
तुमच्या पाकृत खायच्या रंगाचा उल्लेख नाही, तेव्हा रंग नैसर्गिक (टोमॅटो/पालक) आहेत हे अध्याहृतच आहे! :)

सुहास झेले's picture

15 Aug 2012 - 2:53 am | सुहास झेले

आज हापिसात हाचं तिरंगा भात आहे स्पेशल मेन्यू म्हणून... :) :)

भारताचा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो ....

मोदक's picture

15 Aug 2012 - 2:47 am | मोदक

झ्याक..... :-)

शिल्पा ब's picture

15 Aug 2012 - 3:41 am | शिल्पा ब

मस्त.

रेवती's picture

15 Aug 2012 - 5:20 am | रेवती

पाकृ आणि फोटू एकदम छान!
जयहिंद!

भडकमकर मास्तर's picture

15 Aug 2012 - 6:04 am | भडकमकर मास्तर

मस्त पाकृ

भारत माता की जय... :)

मन१'s picture

15 Aug 2012 - 7:21 am | मन१

छान.

सुनील's picture

15 Aug 2012 - 7:33 am | सुनील

केवळ ह्याच धाग्यावर प्रतिक्रिया "शेवटची प्रथम" अशा का येत आहेत?

मिपा तंत्रज्ञ यात लक्ष घालतील?

पैसा's picture

15 Aug 2012 - 9:37 am | पैसा

कृती, फोटो सगळंच मस्त! याच्यासोबत काय खावे? टोमॅटो सार? रायते? सॅलड?

प्रकल्पाची सुरुवात तर मस्तच झाली!

मदनबाण's picture

15 Aug 2012 - 10:22 am | मदनबाण

झक्कास्स्स्स... :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2012 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय कल्पकता आहे. मस्तच.

-दिलीप बिरुटे

सानिकास्वप्निल's picture

15 Aug 2012 - 12:07 pm | सानिकास्वप्निल

झकास दिसत आहे तिरंगा भात काका
पाहूनच तोंडाला पाणी सुटले :)

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Aug 2012 - 12:20 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्रतिम! कृत्रिम रंग वापरले नाहीयेत हे वाचून विकेट पडली आहे! दंडवत!

दादा कोंडके's picture

15 Aug 2012 - 4:20 pm | दादा कोंडके

कृत्रिम रंग वापरले नाहीयेत हे वाचून विकेट पडली आहे! दंडवत!

टोमॅटो आणि पालकाच काय?
ही पाकृ महान भारतात केली असेल तर हे विधान फार धाडसाचं होइल! :)

अवांतरः पाकृ मस्तच! जै हिंद.

प्रभाकर पेठकर's picture

15 Aug 2012 - 6:33 pm | प्रभाकर पेठकर

ही पाकृ महान भारतात केली असेल तर हे विधान फार धाडसाचं होइल!

तर मग, ह्यात जास्तीचे कृत्रीम रंग वापरलेले नाहीत असे वाचावे.

ही पाकृ मस्कतात म्हणजे आखाती प्रदेशात केली आहे. इथे (अजून तरी) 'तशी' समस्या दिसत नाहिए.

नंदन's picture

16 Aug 2012 - 9:15 am | नंदन

अप्रतिम! कृत्रिम रंग वापरले नाहीयेत हे वाचून विकेट पडली आहे! दंडवत!

सहमत आहे. शिवाय प्रत्येक दाणा सुटा, स्वतंत्र दिसतो आहे.

जाई.'s picture

15 Aug 2012 - 12:23 pm | जाई.

झकास

मस्त काका... एकदम तिरंगा ;)

गणपा's picture

15 Aug 2012 - 1:22 pm | गणपा

मानवंदना आवडली. :)

मोहनराव's picture

15 Aug 2012 - 1:47 pm | मोहनराव

वाह वाह...

प्रेरणा पित्रे's picture

15 Aug 2012 - 2:05 pm | प्रेरणा पित्रे

धन्यवाद ...

जय हिंद..

ज्योति प्रकाश's picture

15 Aug 2012 - 2:54 pm | ज्योति प्रकाश

अतिशय रंगबिरंगी ,मस्त सुरुवात.

स्मिता.'s picture

15 Aug 2012 - 3:43 pm | स्मिता.

एवढा कलरफुल तिरंगा राईस एकदम मस्त दिसतोय. चवीलाही छान असेल यात शंकाच नाही.

क्या बात है! तुस्सी छा गये!

धनंजय's picture

15 Aug 2012 - 7:35 pm | धनंजय

दिसायला सुंदर. चवही मस्तच असणार.
पालक झाकण न-ठेवता शिजवायची कानगोष्ट मला उपयोगी पडेल.

प्रचेतस's picture

15 Aug 2012 - 8:16 pm | प्रचेतस

खूपच सुरेख झालीय पाककृती.

विकास's picture

15 Aug 2012 - 11:20 pm | विकास

दिसायला मस्त आहेच पण खाताना पण चविष्ट असणार याची खात्री आहे!

मराठे's picture

15 Aug 2012 - 11:34 pm | मराठे

वा: ! मस्तच .

अत्रुप्त आत्मा's picture

16 Aug 2012 - 8:38 am | अत्रुप्त आत्मा

इरसाल's picture

16 Aug 2012 - 9:23 am | इरसाल

जबरदस्त आहे तिरंगा भात.
मस्त एकदम मस्त.

मानले तुम्हाला.

नाना चेंगट's picture

16 Aug 2012 - 1:13 pm | नाना चेंगट

जबरा !

नि३सोलपुरकर's picture

16 Aug 2012 - 4:11 pm | नि३सोलपुरकर

एकदम ..मस्त

पेठकर सर , भन्नाट रेसिपी झाली आहे. एकदम सुरेख.

डावखुरा's picture

16 Aug 2012 - 11:02 pm | डावखुरा

खल्लास...!

पिवळा डांबिस's picture

17 Aug 2012 - 5:17 am | पिवळा डांबिस

भात मस्त दिसतोय. अभिनंदन.
आणि ह्यापी पंधरा ऑगस्ट टू ऑल मिपाकराज.

आता एक शंका: हा असा सजवलेला भात आता पानात वाढण्यासाठी म्हणून डाव वापरून विस्कटला तर तो राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ शकतो का?

अर्धवटराव's picture

17 Aug 2012 - 8:46 am | अर्धवटराव

पळी खुपसुन ( भाताचे तुकडे तर पडत नाहि... मग काय म्हणावं बरं ? आयला .. काय हे भाषीक दारिद्र्य... ) या भाताला प्लेटमध्ये घेणं आपल्याच्याने होणार नाहि. कुठल्याही शेंदुर फासलेल्या दगडापुढे झुकणारे मागासलेले मन आमचे... तिरंग्याबद्दल तर विचार देखील करवत नाहि.

अर्धवटराव

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2012 - 10:52 am | प्रभाकर पेठकर

हा राष्ट्रध्वज नाही. राष्ट्रध्वजाची मोजमापं आणि अशोकचक्रातील मधल्या रेषांबद्दल ठोस नियम आहेत. त्यात हा बसत नाही. प्रतिकृति म्हणता येईल.

स्वातंत्र्यदिनाच्या समारंभांमध्ये काही गोष्टींचा समावेष सर्वमान्य आहे, तो खालील प्रमाणे:

In popular cultureOn the Independence Day and the Republic Day, patriotic songs in Hindi and regional languages are broadcast on television and radio channels.[40] They are also played alongside flag hoisting ceremonies.[40] Patriotic films are broadcast on television channels.[17] Over the decades, according to The Times of India, the number of such film broadcast has decreased as channels report that too many patriotic films would overwhelm the audience who want popular entertaining films to enjoy the holiday.[41] The population cohort belonging to the Generation Next often combine nationalism with popular culture during the celebrations. Outfits displaying the three colours of the national flag—saffron, green and white; use of food colours to make savouries and delicacies resembling the tri-colour; cloth-designs reflecting ideas gleaned from the cultural traditions of India are example of such mixtures.[21][42]

वरील भात चमच्याने वाढून घेण्याने राष्ट्रध्वजाचा अपमान होईल असे मला वाटत नाही. 'अन्न हे पूर्णब्रह्म' असे म्हणताना अन्नाला आपण देव मानत असतो. आपला राग, निषेध व्यक्त करताना राष्ट्रध्वजाला जाळणार्‍या काश्मिरी अतिरेक्यांपेक्षा राष्ट्रध्वजाच्या प्रतिकृतीलाही देवत्व बहाल करून त्याचे सेवन करणे हा त्या ध्वजाचा सन्मान आहे, असे मला वाटते.

अर्धवटराव's picture

17 Aug 2012 - 8:04 pm | अर्धवटराव

तुम्ही राष्ट्रध्वजाचा अपमान करणारं काहिही करणार नाहि याची १०१% खात्री आहे. आमचे सेण्टीपण आड येते बाकी काहि नाहि.

अर्धवटराव

प्रभाकर पेठकर's picture

18 Aug 2012 - 2:04 am | प्रभाकर पेठकर

धन्यवाद. वाचून बरं वाटलं.

दिपक's picture

17 Aug 2012 - 11:21 am | दिपक

काका... मस्तच

एस's picture

19 Aug 2012 - 2:25 am | एस

अशाच पद्धतीने कोथिंबिर, बीट व मुळा वापरून तिरंगी वड्या करता येतील का?

प्रभाकर पेठकर's picture

19 Aug 2012 - 12:46 pm | प्रभाकर पेठकर

सिद्धार्थ ४, सुनील, सुहास झेले, मोदक, रेवती, भडकमकर मास्तर, मन१, पैसा, मदनबाण, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सानिकास्वप्निल, बिपिन कार्यकर्ते, दादा कोंडके, नंदन, जाई., Mrunalini, गणपा, मोहनराव, प्रेरणा पित्रे, ज्योति प्रकाश, स्मिता., शुचि, धनंजय, वल्ली, विकास, मराठे, अत्रुप्त आत्मा, इरसाल, नाना चेंगट, नि३सोलपुरकर, निश, डावखुरा, पिवळा डांबिस, अर्धवटराव, दिपक, स्वॅप्स सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद.

@पैसा

याच्यासोबत काय खावे? टोमॅटो सार? रायते? सॅलड?

तशी काही आवश्यकता नाही कारण तुपावर परतलेला साधा भात, टोमॅटो भात आणि पालक भात ह्यांची मिश्र आणि वेगवेगळी चव अप्रतिम लागते.
तरी पण टोमॅटो सार, रायते ह्यांच्या पेक्षा मला खमंग काकडी आणि तळलेला पापड, लोणचे जास्त आवडेल.

@स्वॅप्स,

अशाच पद्धतीने कोथिंबिर, बीट व मुळा वापरून तिरंगी वड्या करता येतील का?

होSSSS! का नाही? जरूर प्रयत्न करा आणि लवकरात लवकर मिपावर सादर करा.

आश's picture

21 Aug 2012 - 7:39 pm | आश

फोटो तर खुपचं छान! मी पण असा भात करते.अशोकचक्रासाठी मी ब्लुबेरीज वापरते.

Madhubala's picture

23 Oct 2012 - 10:32 pm | Madhubala

When I sign into this account I am unable to read the recipes. Please help. I have newly joined Misalpav and whenever I click on the recipe I cannot get to read this recipe. I can only read the comments made by other members related to this recipe. Kindly solve my problem. Thanks. Madhubala.

सावकार स्वप्निल's picture

29 Oct 2012 - 12:03 am | सावकार स्वप्निल

झक्कास्स्स व्यंजन आहे...
येत्या २६ जानेवारी अनि १५ आगस्टला आस्वद घ्यावा म्ह्णतो..धन्यवाद