केरळ भ्रमंती ५ - पेरियार जंगलात निसर्गभ्रमंती

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in भटकंती
31 Jul 2012 - 11:32 pm

nadi 1

सकाळी सहाला उठुन पटापट आवरुन सगळ्यांनी चहा घेतला. जंगलात तीन तास भटकायला जायचे म्हणजे येताना घामाघुम होणारच तेव्हा दूरदर्शीपणे अंघोळी केल्या नव्हत्याच. साडेसहाला गाडी काढली. पुन्हा एकदा जंगलाच्या प्रवेशद्वारावर तिकिटांची रांग मग तिथुन आंत अडीच-तीन किलोमिटरचा प्रवास मग पुढे एक किलोमिटर पायी चाल असे करत सात वाजुन गेल्यावरच आम्ही वनाविभागाच्या कचेरीत पोचलो. तिथल्या माणसांनी आमची पावती तपासली, सगळ्यांना नजरेखालुन घातलं आणि कुणी लहान मूल बरोबर नसल्याची खात्री करुन घेतली. मी पावती जमा करताच मला एका नोंदवहीत नांव पत्ता दूरध्वनी क्रमांक नोंदविण्यास सांगितले गेले. तिथल्या प्रमुखाने ’बाबु’ अशी हाक देताच एक काळा सावळा पण तरतरीत आणि उत्साही वनऱक्षक हजर झाला. ’हा बाबु, हा आज तुम्हाला जंगलात फिरवुन आणेल’ प्रमुखाने ओळख करुन दिली. आमच्याकडे पाहुन स्मितहास्य करीत बाबु आतल्या खोलीत गेला. पलिकडे चार फिरंग्यांचा एक गट आमच्यासारखाच निघायच्या तयारीत बसला होता. ’जंगलात जाण्यामधल्या जोखमीची कल्पना मला आहे आणि जंगलात काही विपरीत घडल्यास मी कुणालाही जबाबदार धरणार नाहे, मी स्वत:च माझ्या जोखमीवर जात आहे’ असा एक छापील मसुदा आमच्याकडुन सही करुन घेण्यात आला. सह्या होईपर्यंत बाबु खाकी बाडं घेउन बाहेर आला. बघतो तर काय, चक्क स्वच्छ धुतलेले परिटघडीचे खाकी विजारमोजे किंवा मोजाविजारी. गुडघ्यापर्यंत येणारे हे जाड खाकी मोजे प्रथम आपल्या पायात असलेल्या मोज्यांवरुन घालायचे, वर गुडघ्याखाली त्या मोजाला असलेली नाडी पायाभोवती घट्ट बांधायची. मग बूट चढवायचे.
moje

अरेच्चा! ह जामानिमा कशासाठी? तर हे संरक्षण होते जळवांसाठी. जंगलात आतल्या भागात दाट झाडीच्या पायथ्याला ओलसर जागी, पाचोळ्याखाली, ओहोळाच्या जवळ जळवा असण्याची दाट शक्यता. या अशा मोजाविजारी घातल्या की जळवा लागायची भिती नाही.

जंगलात फिरायला मी, माझा मेहुणा, माझा मुलगा, भाची आणि मेव्हण्याचा पुतण्य़ा असे आम्ही पाचजण उत्सुक झालो होतो. थैले पाठिवर लावत, कॅमेरे/ हॅण्डिकॅम हातात घेत पाय जागीच हलवत मोजे नीट बसल्याचे आजमावीत आम्ही बाहेर आलो. बाहेर ढगाळ हवा होती. पावसाची लक्षणे नव्हती पण दूर डोंगरांवर ढग उतरलेले दिसत होते. एकुणच मस्त धुंद हवा होती. समोर खोल गेलेली पेरियार नदी दिसत होती. जरा खडबडीत भाग उतरताच मस्त लुसलुशीत हिरवळ लागली. दोन्हीबाजुंना पात्र पसरत गेलेले होते. दोन्ही काठांना दाट जंगल. उजव्या बाजुला जंगलापलिकडे डोंगर आणि त्यावर उतरलेले पांढरे शुभ्र ढग. सगळ्या हिरवळीला रंगीत करणारा मधेच एखादा गुलाबी बहर.
Gulabi
कुठे पाने गळलेल्या वा विरळ फांद्या असलेले उंच वृक्ष. मुळातच प्रसन्न असलेल्या वातावरणांत शिळ घालणारे, नाना आवाज काढणारे पक्षी अधिकच भर घालत होते.उजवी कडे मधेच भूभाग होता आणि त्यापलिकडे नदीचे पात्र होते. उजव्या बाजुने आलेल्या पात्रात एक बोट निघालेली दिसली. कालची चुकलेली ती साडेसातची फेरी हीच असावी.
boat
आम्ही मात्र पदभ्रमंतीला नदीच्या पलिकड्च्या बाजुला जाणार होतो. नदीच्या पात्राजवळ येताच समजले की पाणी उथळ असले तरी सरळ पलिकडे जाता येणार नाही. मात्र कसे जाणार हे दिसत होते. आमच्या जरा पुढे निघालेला एक फिरंग्यांचा गट व त्यांचा वनरक्षक वाटाड्या एका लाकडी तराफ्यावरुन सरकत होते. त्या उथळ पात्राला ओलांडण्यासाठी हा तराफा सोडला होता. त्याच्या दोन्ही टोकांना दोऱ्या बांधल्या होत्या आणि त्या दोऱ्यांची टोके तीरावर खुंट्याला बांधली होती. ज्या दिशेला जायचे त्या बाजुने दोर आपल्याकडे खेचायचा की आपण त्या काठाकडे जातो. मग पलिकडे चिखल चुकवुन कडक भूभागावर पटकन उडी मारायची. ते लोक पलिकडे उतरताच बाबुने दोर ओढला आणि तराफा आमच्याकडे आणला. आम्ही तराफ्याचे सुकाणु हातात घेतले म्हणजे जायच्या दिशेने तोंड करुन दोर आपल्याकडे ओढायला सुरुवात केली. अर्थात तराफा मधे थांबवुन फोटो घेतलेच.
tarafa
पलिकडे उतरलो आणि गप्पा मारत बाबुच्या मागोमाग चालायचा सुरूवात केली. एक अर्धगोलाकार वळसा घालुन आम्ही मोठ्या हिरवळीवर आलो आणि समोरच्या दिशेने चालु लागलो. मधे एका टेपाडावर अरुंद वाटेने जात आम्ही मोठ्या सपाट भागावर आलो. हिरव्या गालिच्यांवर चालायला मजा येत होती. मधेच हिरवळीवरच्या लाल ठिपक्याने माझ्या भाचीचे लक्ष्य वेधले आणि तीने मला थांबवले. मी खाली पाहिले तर गवतातुन एक काळे ठिपके असलेला लाल किडा तुरुतुरु चालला होता.याचे रुपडे काही वेगळेच होते. अंडाकृति पाठ लाल रंगाची होती आणि पाठिवर दोन ठिपके व काळ्या रेषा होत्या. जणु काही एखाद्या व्यंगचित्रकथेतल्या गॉगलवाल्या नायकाचा चेहरा.
Periyar6
त्याला टिपुन मागे वळलो तर लक्ष त्या महाशयांकडे गेले. एक मस्त पैकी रंगित बेडुक गवतात दबा धरुन बसला होता. काळसर अंगावर लाल ठिपके आणि कातडीवर पाण्याचे थेंब. अगदी स्तब्ध बसला होता. त्याला टिपला आणि सगळे पुढे निघालो.
beduk
पलिकडे एका डबक्याजवळ अनेक पाणपक्षी जमले होते. इबीस, इग्रेट्स, स्टॉर्क वगैरे वगैरे. एकाला टिपला तर दुसऱ्याला टिपता टिपता तो झेप घेऊन पेरूच्या बागेकडे गेला.
peru
त्या पठारावरची ती असंख्य पेरूची झाडे पाहुन फारच गंमत वाटली. बाबुने सांगितले की ती मुद्दाम लावलेली बाग नाही तर आपोआप उगवलेली झाडे आहेत. ऐकावे ते नवलच. आता माळ संपून जरा जंगलाचा भाग जवळ दिसु लागला. पलिकडे सळसळ ऐकताच बाबुने उंच झाडाच्या शेंड्याकडे बोट दाखवत निलगिरी लंगुर दाखविले, मात्र कॅमेरा रोखेपर्यंत ते दाट झाडीत दिसेनासे झाले. आमचे मार्गक्रमण सुरू झाले. उंच झाडांच्या तळातुन पडलेल्या पचोळ्याला तुडवत आम्ही आत शिरलो.
pachola
जरा पुढे जाताच डावीकडे आम्हाला भली मोठी हाडे दिसली. बाबुने ते अवशेष हत्तीचे असल्याचे सांगितले. त्याच्या अंदाजानुसार तो हत्ती सहा ते सात वर्षांपूर्वी मरण पावला असावा. जरा पुढे जाताच कवटी व जबड्याची हाडे दिसली. हत्तीचे दाखवायचे दात नेहेमीच आपण पाहतो. मात्र खायचे दात पाहायची आमची तरी ही पहिलीच वेळ. जंगलातुन भटकणे हा अनुभव काही निराळाच.
hee vaaTa dura jaate

नाना आकाराची रंगांची अनेक झाडे, अनेक आकार. कुठे एखाद्या झाडावर स्वत:ची पाने गळुन केवळ बांडगुळी नेच्याचे राज्य होते.
neche
मधेच कुठे झाडे सुकुन उन्मळुन पडली होती तर कुठे अजस्त्र झाडांनी आमचा रस्ता आडवला होता आणि आम्हाला वळसा घालुन जावे लागत होते.
rasta band
पुढे एक सुकलेला मोठा ओढा लागला. चांगला चार पाच फूट खोल. पलिकडे जाण्यासाठी पूल म्हणुन केवळ सलग बांधलेली दोन बांबुइतक्या खोडांची झाडे होती.
pool
बाबुने लिलया, पोरांनी मजेत तर मी व मेव्हण्याने मोठ्या कसरतीने तो पूल पार केला. पलिकडे पुरुषभर गवतातुन वाट काढत माळावर आलो आणि पुन्हा गर्द वनराईत शिरलो. वाटेत बाबुने आम्हाला जंगली कढिलिंब दाखवला त्याला नेहेमीच्या वासाबरोबर लिंबाचा वास होता मात्र तो खायचा नाही असे बाबुने बजावले. लागुनच नेहेमीच्या कढिलिंबाचे झाड होते. पुढे एका झाडावर मिऱ्याचा वेल पसरला होता.आणि अचानक आम्हाला ते सुंदर कवक दिसले. अगदी ब्रह्मी टोपीसारखे.
maushroom
त्याची छबी उतरवुन पुढे आलो तर चिरंजीवांनी हाक मारत ’ही बघ गंमत’ असे म्हणत एक गोलांट्या उड्या मारणारा गांडुळसदृश काळसर किडा दाखवला. ’मूर्खा, अरे ती लूप टाकत चाललेली जळु आहे!’ माझे ते उद्गार ऐकताच बच्चे कंपनीची प्रचंड तारांबळ उडाली. अखेर त्यांना मोकळ्या जागेत नेले. आमच्या सगळ्यांच्या बुटांवर आणि खाकी मोज्यांवर जळव्या फिरत होत्या. त्यांना चावता येत नव्हते पण त्यांनी सोडले नव्हते. अनेक जळवा मोजा आणि बूटाच्या फटीत शिरल्या होत्या. थांबा, स्वस्थ उभे राहा, सर्वांच्या जळवा काढु असे सांगत असतानाही मुले बावरुन काड्यांच्या सहाय्याने जळवा इकडे तिकडे उडवु लागली. बाबुने सांगितले की आता आपण जंगला बाहेर पुन्हा माळावर आलो आहोत तेव्हा जळवा भले बूटांवर असल्या तरी कोरड्यावर त्या चावु शकत नाहीत वा जगुही शकत नाहीत तेव्हा त्या आपोआप गळुन पडतील. सर्व साफसूफ करून आम्ही निघालो. या भटकंतीत अडीच तास कसे गेले समजलेच नव्हते. अजुन आलो तेवढे अंतर परत जायचे होते. सर्वांनी नाराजीने त्या वनराईला हात हलवुन दाखवत परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. तो लांबवर पसरलेला हिरवागार माळ आणि त्यातुन नागीणीगत सळसळत गेलेली ती पायवाट अजुनही डोळ्यापुढे तश्शीच आहे.
paaywat
नदी ओलांडताना पुन्हा फोटो झाले, आता प्रकाश वेगळा होता, दिशा वेगळी होती आणि नदीचे रूपही वेगळे होते.
nadi last
पलिकडे पोचताच नजर बारक्या बारक्या पांढऱ्या फुलांनी सजलेल्या हिरवाईवर खिळुन राहिली. असा वॉलपेपर शोधुन मिळणार नाही. ते दृश्य अर्थातच कॅमेऱ्यात बंदिस्त केले.
Galicha
आम्ही वनखात्याच्या कचेरीवर परतलो, मोजे काढले. काही जळवा अजुनही वळवळत होत्या मात्र रक्त शोषण्याइतका जीव त्यांच्या अंगात नव्हता. त्या मरायला टेकल्या होत्या. बाबुचे भाकित खरे होते. ’यांनी आम्हाला घाम फोडला आता यांना सोडणार नाही’ असे म्हणत मुलांनी त्या सर्व जळवा एकत्र करुन त्यांना मूठमाती दिली. आम्ही बाबुचे आभार मानले आणि त्याला बक्षिस देऊन त्याचा निरोप घेतला.

परिसरातली अक्षरश: शंभर फूट उंचीची झाडे बघता बघता आम्ही परिसर ओलांडुन वाहनतळापाशी कधी आलो समजलेच नाही. निसर्गाचा कैफच असा होता की आम्हाला रिकामे पोट आणि तीन तासांची पायपीट याचे भानच नव्हते. मात्र गाडीत बसताच भूक जाणवली. ’सजी, बाबा आता गाडी गावात एखाद्या साध्या पण फक्कडसे डोसे आणि कडक कॉफी देणाऱ्या उपाहारगृहात घेउन चल’ असे सांगताच सजीने गाडी कुमळीच्या बाजारपेठेतील आरिया भवनात लावली. डोसे, कॉफी यांचा फडशा पाडत आणि दुष्काळातुन आल्यागत पाणी पिऊन आम्ही ढेकरा देत बाहेर आलो. गाडी विश्रामगृहाकडॆ वळली. माझी पत्नी व बहिण घरीच थांबल्या होत्या, त्या आवरुन व नाश्ता करुन तयार होत्या. मग आम्हाला अर्थातच अंघोळीचे फर्मान निघाले. नेहेमीप्रमाणे मी व चिरंजीव यांच्यात तू जा तू जा असा प्रेमळ आग्रह सुरू होताच पत्नीने मला हुकुम सोडला. अंघोळिचे कपडे व टॉवेल जमा केले. अंघोळीला जायला म्हणुन शर्ट काढला आणि पत्नी व चिरंजीव हादरले. त्याचे शब्द बाहेर पडायचा आंत बोटे माझा छातीवर रोखली गेली होती. मी नजर खाली घेतली तर एखाद्या चित्रपटात शोभावा असा माझा बनियन गोळी लागल्यागत रक्ताने भिजला होता!
rakta
झटपट प्रथमोपचार साहित्य काढले. मात्र रक्त हळु हळु अगदी थेंबाने पण येतच राहीले. लक्षात आलेच की हे त्या जळवांचे प्रताप असणार. घाबरलेल्या पोरांनी जेव्हा काड्या घेऊन जळवा उडवायला सुरूवात केली तेव्हा एखादी जळु टी शर्टातुन आत गेली असावी. त्याकडे दुर्लक्ष करुन बॅण्ड एड लावली आणि आंघोळ केली. बाहेर येते तो बहिणीचा फोन, मेव्हण्याच्या मांडीवर अगदी वर असाच प्रकार होता रक्त आणि थांबायचे नाव नाही. मग आठवले खालच्या बाजुला स्पा जवळ एक डॉक्टर असतो. तिथे गेलो तर डॉक्टरची विचारणा करताच डॉक्टरीणबाई हसतमुखाने बाहेर आल्या. ’नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया आंत्रोळकर’ मघाशी तुम्हा लोकांना मराठी बोलताना ऐकले होते. बोला कशासाठी डॉक्टरला शोधत होतात? मी जळु प्रकरण व रक्तस्त्रावाविषयी सांगताच त्या हसुन म्हणाल्या, ’ काही काळजी करू नका. जळवा फक्त अशुद्ध रक्त पितात, बरे झाले तुमचे रक्त आता शुद्ध झाले. विनोदाचा भाग वेगळा पण यात काही घाबरण्यासारखे नाही. जखम स्वच्छ धुवा’ पुढे डॉक्टरांनी अफलातुन माहिती दिली. ’जळु पकड घेताना रक्त शोषायला सुरूवात करण्यापूर्वी हिरुडीन नामक विकर रक्तात सोडते आणि त्यामुळे रक्त घट्ट होत नाही व तिला रक्त पिणे सोपे जाते. यावर तोडगा अगदी साधा आहे. हिरुडीन चा प्रतिउपाय (ऍण्टीडोट) म्हणजे चिमुटभर हळद. नुसती जखमेवर काही सेकंद दाबुन धरा’. आणि खरोखरच तसे केल्यावर काही क्षणात रक्तस्त्राव पूर्ण थांबला. तर एकदाचे ते जळु प्रकरण संपले. मात्र आमच्या निसर्गभ्रमणाचा तो एक अविभाज्य भाग होता आणि त्याने रंग आणला हे खरे.

प्रतिक्रिया

नंदन's picture

1 Aug 2012 - 1:45 am | नंदन

निसर्गदृश्यांचे फोटो सुरेख आलेत.

प्रचेतस's picture

1 Aug 2012 - 9:04 am | प्रचेतस

हाही भाग अप्रतिम.

५० फक्त's picture

1 Aug 2012 - 9:07 am | ५० फक्त

लई भारी रे, मजा आली फोटो पाहुन.

असले अफाट आलेत फोटू.. आणि वर्णनही नितांत सुंदर
जळवांचा किस्सा भारीच

इरसाल's picture

1 Aug 2012 - 9:13 am | इरसाल

छान

(पेरियार नदीच्या काठावरचा तात्पुरता रहिवासी ) इरसाल

झकासराव's picture

1 Aug 2012 - 9:48 am | झकासराव

फोटो खुप छान आहेत. :)

प्यारे१'s picture

1 Aug 2012 - 10:41 am | प्यारे१

शेवटचा फटु सोडून बाकी सगळे मस्तच....! :)

कपिलमुनी's picture

1 Aug 2012 - 1:15 pm | कपिलमुनी

छान वर्णन

विजुभाऊ's picture

1 Aug 2012 - 1:21 pm | विजुभाऊ

वा सुंदर........
झकास फिरवुन आणलेत

सहज's picture

1 Aug 2012 - 2:18 pm | सहज

फोटो व वर्णन दोन्ही!!

प्रभाकर पेठकर's picture

1 Aug 2012 - 7:06 pm | प्रभाकर पेठकर

व्वा.. सर्वसाक्षीजी, मस्त छायाचित्र आणि भ्रमंतीवर्णन.
जळवांनी बाकी अंगावर शहारा आला.

निशदे's picture

1 Aug 2012 - 8:26 pm | निशदे

फोटो आणि वृत्तांत दोन्ही आवडले.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Aug 2012 - 3:24 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त सफर घडवलीत :-)