साहित्यः
उकडलेली अंडी २ नग.
डालडा (किंवा तत्सम) तूप १/२ कप.
मध्यम आकाराचे कांदे २ नग.
दही १-१/२ (दिड) कप.
आलं पेस्ट १ मोठा चमचा (टेबल स्पून).
धणे पावडर १ मोठा चमचा.
जीरे पावडर १ चहाचा चमचा (टी स्पून).
बडिशोप पावडर १ चहाचा चमचा.
मसाला वेलची (बडी इलायची) २ नग.
काळीमिरी २० नग.
लवंग १० नग.
दालचीनी १० इंच.
केशर चिमुटभर. (थोड्या गरम पाण्यात भिजत घाला.)
केवडा वॉटर (ऐच्छिक) १ मोठा चमचा.
कोथिंबीर सजावटीसाठी
कृती.
कढईत तुप तापवून त्यावर कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या. तेलातून काढून थंड हो द्या. नंतर थोडे पाणी घालून त्याची पेस्ट करून घ्या.
दही फेटून घ्या.
वेलची, काळीमिरी, लवंग, दालचीनी ह्यांची पावडर करून घ्या. त्यात धणे पावडर,जीरे पावडर, बडीशोप पावडर मिसळून त्यातच दही, कांद्याची पेस्ट, केशर, केवडा वॉटर मिसळा.
आता कढईतील तुप पुन्हा तापवून त्यात हे वरील मिश्रण घालून मंद आंचेवर परतत राहा. मसाला शिजून तुप वर आले की आवश्यकतेनुसार पाणी घालून रश्याचा दाटपणा नीट करून घ्या. रस्सा फार पातळ नसावा. छायाचित्रात दिसतो आहे त्यापेक्षा थोडा पातळ केला तर चालेल.
आता त्यात उकडून ठेवलेली अंडी प्रत्येकी दोन उभे भाग करून मिसळा. गॅसवरून उतरवून कोथिंबीरीने सजवा.
शुभेच्छा...!
प्रतिक्रिया
2 Jul 2012 - 4:04 pm | sagarpdy
चला, आज रात्रीची भोजन व्यवस्था झाली!
2 Jul 2012 - 4:21 pm | कुंदन
पेठकर काका, दुबैत कधी काढताव तुमचे हाटेल ?
संध्याकाळी हापिस सुटल्यावर गल्ला सांभाळायला पण मी मदत करीन ना तुम्हाला.
2 Jul 2012 - 4:30 pm | प्रभाकर पेठकर
दुबईत एका आधीच मित्राचे, भागिदारीत उपहारगृह चालविण्यासाठी, आमंत्रण आहे. येणार आहे मी त्याला भेटायला दुबईत.
तेंव्हा कांही भक्कम चर्चा होईल असे दिसते आहे.
3 Jul 2012 - 3:25 am | शुचि
शुभेच्छा!!
3 Jul 2012 - 3:41 am | प्रभाकर पेठकर
धन्यवाद, शुचि.
3 Jul 2012 - 6:13 pm | बॅटमॅन
काकांना आपल्या अनेकोत्तम शुभेच्छा! दूर अटकेपार आपल्या व्यवसायाचा आणि खाद्यसंस्कृतीचा झेंडा ठामपणे रोवणारे खंदे कर्ते म्हणून आपल्याबद्दल मनात नितांत आदर आहे.
2 Jul 2012 - 4:43 pm | पियुशा
आओ सिखाये तुम्हे अंडे का फंडा ;)
जियो काका जियो :)
2 Jul 2012 - 4:28 pm | गणपा
अंडा सप्ताहाच्या निमित्ताने मिपाच्या आद्य बल्लवाची पाकृविभागत हजेरी लागली.
बाकी पेठकर काकांच्या पाककृती बाबत म्या पामराने काय बोलावे.
बास नाम ही काफी है. :)
2 Jul 2012 - 4:38 pm | प्रभाकर पेठकर
म्या पामराने काय बोलावे.
काहीच बोलायचे नाही. स्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळा असते. ह्याच पाककृतीवर कांही वेगळे संस्कार करून नविन पाककृती 'मार्केटात' आणावी, ही विनंती.
2 Jul 2012 - 5:06 pm | चिंतामणी
सहमत.
अंड्याविषयीचे इतर धागे या धाग्यामुळे विसरता येतील.
2 Jul 2012 - 4:33 pm | सानिकास्वप्निल
मिपावर सध्या सगळीकडे अंडंमय वातावरण झाले आहे :)
वेगवेगळ्या पण इंट्रेस्टींग अश्या अंड्याच्या पाकृ मिळाल्या आहेत :)
मस्तचं पाकृ आहे नक्की करुन बघणार :)
2 Jul 2012 - 4:36 pm | पिंगू
सगळेच अंड्याचे फंडे सांगत सुटलेत आज.. बाकी ही पण जबरी आहे..
2 Jul 2012 - 6:43 pm | शुचि
सुरेख. करून बघणार.
___________________
केली केली :) मस्त झाली आहे. फक्त केशर लंच टाईममध्ये आणेन आणि संध्याकाळी घालेन. उद्या सगळे पॉट्लकला हीच डीश खाणार आहेत. किंचीत आंबट झालेय कारण मी दही थोडं जास्त घातलं पण फार नाही. बेअरेबल.
केवडा एस्सेन्स नाही मिळणार बहुधा. धन्यवाद पेठकर जी.
___________________________
१२ अंडी घातल्यानंतर आंबटपणा एकदम गेलेला आहे :)
2 Jul 2012 - 7:04 pm | कुंदन
>>>सुरेख. करून बघणार.
___________________
केली केली
ही पाठोपाठची दोन्ही वाक्ये एकाच व्यक्तीची आहेत. कदाचित दोन वाक्यांमध्ये एक घोट घेतला असावा काय ? ;-)
2 Jul 2012 - 5:14 pm | सहज
मिपाच्या डॉक्टरांनी सांगावे की डालडा (किंवा तत्सम) तूप १/२ कप ओके आहे तर लगेच करायला घेउ म्हणतो :-)
पाकृ भारी असणार त्यात वाद नाही पण इतके तूप नक्की चालावे काय?
2 Jul 2012 - 5:26 pm | कुंदन
आला हा अनिवासी आहारतज्ञ....
सहज राव तुम्ही इनो मध्ये केले तरी चालेल.
2 Jul 2012 - 7:13 pm | प्रभाकर पेठकर
इतके तूप नक्की चालावे काय?
चवीसाठी आवश्यक. आवडीनुसार, गरजेनुसार कमी घातले तरी चालेल.
पण इतके तुप घातल्यावर नक्की चालावे...
2 Jul 2012 - 7:16 pm | शुचि
खी: खी:
2 Jul 2012 - 5:31 pm | सुहास झेले
वाह... मस्त मस्त !!
मिपावर पाककृतींचासुद्धा पाऊस पडतोय. लगे रहो :) :)
2 Jul 2012 - 5:53 pm | jaypal
सोप्पी तरी पण खमंग वाटतेय.
>>>स्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळा असते.
१०,०००% सहमत.
>>> ह्याच पाककृतीवर कांही वेगळे संस्कार करून नविन पाककृती 'मार्केटात' आणावी
याच ग्रेव्ही मधे पनीर /प्रॉन्स / चिकन(बॉईल्ड) /बटाटा /ओले काजु कसे लागतील याचा विचार करतोय. नक्की करुन बघेन. वाचनखुण म्हणुन साठवली आहे.
2 Jul 2012 - 6:09 pm | पिंगू
हीच तर बेसिक ग्रेव्ही आहे. ह्यात बटाटा / मशरुम / ओले काजू / सुरण / सोयाबीन घालून बहार येईल..
2 Jul 2012 - 6:46 pm | स्पंदना
आम्ही स्वर्गस्थ आहोत.
जरा? जरा दया? एका पाठोपाठ एक , अन एका पेक्षा एक सरस.
2 Jul 2012 - 7:11 pm | मराठमोळा
खल्लास!!!!!!!!!!!!
याला म्हणतात पाककृती..असं म्हंटल तर मी अतिशहाणा आहे आणि मुद्दाम बाकी पाकृंना कमी लेखतो असे ग्रुहीत धरले जाईल. म्हणून नको.
प्रत्येकाला सन्मान देऊन त्याच्या/तिच्या पाकृ कौश्ल्याचे/प्रयत्नांचे कौतुक करणे हा प्रामाणिकपणा आहे आणि पेठकर काकांसारख्या महाबल्लवांच्या "स्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळा असते" या डाऊन टु अर्थ" वाक्याला प्रामाणिक सलाम. :)
2 Jul 2012 - 7:55 pm | मुक्त विहारि
ओमानला किंवा दुबईला जॉब शोधणे आले..
2 Jul 2012 - 8:12 pm | योगप्रभू
डिश मस्त, पण पेठकरांनी सजावटीत काटकसर केल्याने डिशचे पूर्ण पैसे देणार नाही (आधीच सांगून ठेवतो). डिशमध्ये बाजूने गाजर, टोमॅटो, कांदा यांचे दोन पातळ काप आणि दोन हिरव्या मिरच्या खोचून ठेवल्या असत्या तर बिघडलं असतं का? नुसत्या कोथिंबिरीवर भागवलंत ते. :)
2 Jul 2012 - 9:44 pm | प्रभाकर पेठकर
श्री. योगप्रभूसाहेब,
पेठकरांनी सजावटीत काटकसर केल्याने डिशचे पूर्ण पैसे देणार नाही (आधीच सांगून ठेवतो).
पाककृती विनामुल्य आहे. नि:शंक मनाने उपभोग घ्यावा, ही विनंती.
3 Jul 2012 - 12:59 am | योगप्रभू
फुकटचं खाण्याची सवय नसल्याने आपल्या विनंतीस मान देता येत नाही, याचा खेद आहे. कदाचित 'आत बसणारी माणसे' आणि 'बाहेर उभी राहणारी' माणसे यांना आपण एकच समजत असाल, पण कुणाच्याही घरी गृहिणीच्या हातचा स्वयंपाक आणि देवस्थानात श्रद्धेने घेतलेला प्रसाद याखेरीज अन्यत्र परान्नाची किंमत नेहमी चुकवण्याचा शिरस्ता आहे माझा. तुमच्या 'विनामूल्य' पाककृतीचे किंचित 'मूल्यवर्धन' करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि अर्थातच गंमतीने लिहिल्याबद्दल क्षमस्व.
3 Jul 2012 - 1:54 am | प्रभाकर पेठकर
अन्यत्र परान्नाची किंमत नेहमी चुकवण्याचा शिरस्ता आहे माझा.
अतिथी देवो भवः| तरीपण तुमच्या तत्वांशी तुम्ही फारकत घ्यावी असे मी चुकुनही म्हणणार नाही. आपण किंमत चुकवावी आम्ही ती देवाचा प्रसाद म्हणून स्विकारू.
तुमच्या 'विनामूल्य' पाककृतीचे किंचित 'मूल्यवर्धन' करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आणि अर्थातच गंमतीने लिहिल्याबद्दल क्षमस्व.
गमतीने लिहायचे त्यात क्षमा कसली मागायची? माझा प्रतिसादही गमतीच्या मनःस्थितीतच वाचावा ही विनंती.
2 Jul 2012 - 8:41 pm | जाई.
खल्लास !!!
_/\_
2 Jul 2012 - 8:45 pm | राही
दोन अंड्यांसाठी दहा इंच दालचिनी जरा जास्त नाही वाटत? रुंदीला ती कमीतकमी पाव सें.मी. तर असेलच. त्यातून ती भारतीय दालचिनी असेल तर जरा तरी मंद वासाची असेल पण चिनी कॅशिआ किंवा अमेरिकेत मिळणारी असेल तर थोडी उग्र होईलसे वाटते.(पण वर शुचीने करून बघितलीय आणि मस्त झालीय लिहिलेय म्हणजे प्रमाण बरोबरच असेल. तसेही पेठकरांचे साहित्याचे प्रमाण चुकणार नाही याची खात्री आहेच.)
2 Jul 2012 - 8:48 pm | शुचि
राही पण मी मसाला थोडा फेरफार केला - परंपरा एग करी मसाला वापरला ...... :P
2 Jul 2012 - 9:04 pm | प्रभाकर पेठकर
मी दिलेले प्रमाण भारतीय दालचिनीचेच आहे.
रुंदीला ती कमीतकमी पाव सें.मी. तर असेलच.
एक पदरी, १/२ सें.मी. रुंदी आहे. इतर मसाल्याच्या प्रमाणात दालचीनी जास्त नाहीए.
तरीपण वरील पाककृतीतील कुठल्याही मसाल्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करण्यास हरकत नाही.
2 Jul 2012 - 9:06 pm | शुचि
परत येथे लिहीते -
केशरामुळे सुगंध/रंग/चव यापैकी काय काय येईल? आत्ता लंच टाईम मध्ये जाऊन घेऊन येण्याचा विचार आहे. संध्याकाळी किंचित गरम पाण्यात घालून नीट मिसळून अंडकरीत घालेन. केशराने चवीत,फरक पडतो का?
2 Jul 2012 - 9:14 pm | प्रभाकर पेठकर
ख व त उत्तर दिले आहेच. परत इथे देतो....
केशराने रंगात सोनेरी छटा वाढते. चव वेगळीच (अर्थात छान) येते पण केशर जास्त होता कामा नये. मुख्य म्हणजे केशर आणि केवडा वॉटर (एसेन्स नाही) मुळे पदार्थाला 'मुघलाई' टच येतो
2 Jul 2012 - 9:20 pm | शुचि
वा वा !!! क्या बात है!!! आत्ताच चौकशी केली आमच्या इथल्या "हिमालयन बझार" मध्ये केवडा वॉटर ही आहे आणि केशरही आहे. :)
धन्यवाद पेठकर जी!!!
2 Jul 2012 - 9:18 pm | सुनील
अ प्र ति म !!!!!!!
फोटोतर कातील आहे :)
नुसती आले पेस्ट नाही, आले-लसूण मिक्स पेस्ट आहे. चालेलसे वाटते. तसेच, धने आणि जीरे अशा वेगवेगळ्या पावडरी नाहीत. एकच मिश्र पावडर आहे. तेही चालेलसे वाटते.
तुपाचे प्रमाण किंचित कमी करून किंवा तूप + तेल असे मिश्रण केल्यास चवीत फार फरक पडू नये.
करून बघणारच.
2 Jul 2012 - 9:40 pm | प्रभाकर पेठकर
तुपाचे प्रमाण किंचित कमी करून किंवा तूप + तेल असे मिश्रण केल्यास चवीत फार फरक पडू नये.
तुपाचा वास/चव आवडत नसेल तर वरीलप्रमाणे बदल करण्यास हरकत नाही. नुसते तेल वापरले तरी चालेल.
तुप आणि तेल ह्यात उष्मांकाच्या (कॅलरीज) संदर्भात काही फरक नाही. १ ग्रॅम (तेल किंवा तुप) = ९ उष्मांक (कॅलरीज). संपृक्त चरबी (सॅच्युरेटेड फॅट्स) संदर्भात मात्र तुपात त्याचे प्रमाण कितीतरी अधिक आहे.
3 Jul 2012 - 12:11 am | शुचि
पेठकर साहेब, १२ अंड्यांकरता किती केवडा वॉटर घालू? - ५ चमचे? वगैरे किती?
_____________________________
अंदाजे घातले. छान आली चव.
3 Jul 2012 - 2:01 am | प्रभाकर पेठकर
अंदाजे घातले. छान आली चव.
कुठल्याही पाककृतीत आपल्या अनुभवानुसार, चवीनुसार, जवळ असणार्या कच्च्या सामग्रीच्या दर्जानुसार मात्रा कमी जास्त करावीच लागते. शेवटी उद्देश काय अंतिम पदार्थ चविष्ट व्हावा. तो झाला म्हणजे यश प्राप्त झाले.
धन्यवाद.
3 Jul 2012 - 3:20 pm | मृगनयनी
सुरेख!!
जीवन करी जीवित्वा..
अन्न हे पूर्णब्रह्म..
उदरभरण नोहे...
जाणि जे- "यज्ञकर्म"...
जय जय रघुवीर समर्थ!!!! :)
- एजिटेरियन नयनी' :)
2 Jul 2012 - 9:54 pm | मराठे
'नर्गीसी' कबाब, 'मुघलाई' अंडा मसाला!
शेवटी मोघलांचं वैदिकांवर आक्रमण झालंच म्हणायचं ! आपल्याला काय, पुरणपोळीही आवडते आणि मुघलई मटण सुद्धा! त्यामुळे 'विन-विन' सिच्वेशन!
2 Jul 2012 - 10:02 pm | सुनील
शेवटी मोघलांचं वैदिकांवर आक्रमण झालंच म्हणायचं
संस्कृतीद्वेष्टे आहात! ;)
2 Jul 2012 - 11:00 pm | रेवती
छान पाकृ व फोटू.
2 Jul 2012 - 11:13 pm | पैसा
अप्रतिम! काय सुरेख रंग आलाय आणि किती छान रस्सा दिसतोय! वा!
2 Jul 2012 - 11:48 pm | चतुरंग
बरेच दिवसांनी मिपावरच्या पाकृ विभागात पुनःश्च हजेरी लावल्याबद्दल प्रथम पेठकर काकांचे आभार!
फोटू तर एकदम जीवघेणा दिसतो आहे आणि मी अंडे खातो त्यामुळे ही पाकृ करुन बघायलाही वाव आहे! :)
करुन कळवतो इथेच.
(घरगुती प्रयोगशाळेत लुडबुडणारा) रंगा
3 Jul 2012 - 2:15 am | वीणा३
घरात फक्त बडीशोप पावडर आणि केवडा पाणी नाहीये. तरीपण ते वगळून एक दोन दिवसात नक्की करून बघेन.
3 Jul 2012 - 2:18 am | प्रभाकर पेठकर
sagarpdy, कुंदन, पियुशा, गणपा, चिंतामणी, सानिकास्वप्निल, पिंगू, शुचि, सहज, सुहास झेले, jaypal, aparna akshay, मराठमोळा, मुक्त विहारि, योगप्रभू, जाई., राही, सुनील, मराठे, रेवती, पैसा, चतुरंग.
आपण सर्वांनी 'मुघलाई अंडा मसाला' ह्या माझ्या पाककृतीस नावाजल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
एक टिप सर्वांना देऊ इच्छितो. ज्या कुठल्या पाककृतीत दही असते त्या त्या वेळी ते ताजे आणि कुठलाही दर्प न येणारे असावे. दही पदार्थाच्या रश्यात मुख्य भूमिका निभावत असते. तेच जर चांगले नसेल तर आख्खी पाककृती बिघडू शकते.
शुभेच्छा....!
3 Jul 2012 - 6:57 am | कौशी
अतिशय सुंदर, आवडली.
3 Jul 2012 - 9:03 am | वीणा३
माझ्या कडे बडीशोप पावडर आणि केवडा पाणी नाहीये. त्याच्याशिवायच करून बघेन.
3 Jul 2012 - 9:47 am | मृत्युन्जय
सकाळी सकाळीच सडकुन भूक लागली आहे ही पाकृ बघुन. सिम्पली जबरदस्त
3 Jul 2012 - 10:05 am | दिपक
जबरी पाकृ आणि जिवघेणा फोटो.
3 Jul 2012 - 10:29 am | प्रेरणा पित्रे
मी अंडं खात नाही..पण ही पाककृती बघुन लगेच बनवुन खाण्याची इच्छा झाली..... नक्कीच करुन बघणार... :)
3 Jul 2012 - 10:33 am | प्रेरणा पित्रे
मी अंडं खात नाही..पण ही पाककृती बघुन लगेच बनवुन खाण्याची इच्छा झाली..... नक्कीच करुन बघणार... :)
3 Jul 2012 - 10:56 am | स्वाती दिनेश
सॉलिडच दिसत आहे मुघलाइ अंडा मसाला!
मस्तच,
स्वाती
3 Jul 2012 - 1:25 pm | गवि
वा वा.. क्या बात..
एका कट्ट्याला तुम्ही स्वत:च्या हाताने उत्तमोत्तम पदार्थ करुन वाढले होतेत त्याच्या खमंग आणि स्वादिष्ट आठवणी पॉप टेट्स कट्ट्यावरील ज्येष्ठ भरभरून काढत होते आणि मला मानसिक त्रास देत होते..
आता की पाककृती पाहिल्यावर हाच विचार मनात येतोय की हमारा नंबर कब आयेगा?
केवडा सोडता सर्व घटकपदार्थ मिळवण्यास तसे सोपे असल्याने हा पदार्थ आम्ही करुन पाहूच हो, पण तुमच्या हाताची खास चव कुठली यायला..?
3 Jul 2012 - 6:14 pm | प्रभाकर पेठकर
श्री. गवि साहेब,
पाककृत्या करून पाहणे आणि मित्रमंडळींमध्ये बसून त्यांचा आस्वाद घेणे ह्या सारखे परमसुख नाही. भारतात रजेवर आल्यावर कधी तरी योग जुळून येईलच, नव्हे जुळवून आणूया. धन्यवाद.
3 Jul 2012 - 2:54 pm | मराठमोळा
मी आताच बनवून पाहिली.. चव खतरा आली आहे पण रंग काही जमला नाही बुवा. :(
केशर नव्हते घातले म्हणून असे झाले असेल का?
3 Jul 2012 - 6:02 pm | प्रभाकर पेठकर
केशराने छान सोनेरी रंग येतो (तेही केशराच्या दर्जावर अवलंबून आहे). तेल/तुप कमी असेल तर तेल-तुपाने येणारी 'चमक' कमी होते. पण आता तुम्हाला ह्या पाककृतीची अपेक्षित चव आणि रुपाचा अंदाज आला आहे. तेंव्हा आपल्या आवडीनुसार, चवीनुसार साहित्य कमी-जास्त करून पाककृतीचे 'ट्यूनिंग' करावे.
धन्यवाद.
3 Jul 2012 - 4:32 pm | निश
प्रभाकर पेठकर सर , अप्रतिम सुंदर रेसीपी.
खरच आता उद्या करुनच बघीन.
मराठमोळा साहेब तुमची ही रेसीपी व फोटो एकदम भारी.
3 Jul 2012 - 4:38 pm | मोहनराव
वा वा.. मस्त!
3 Jul 2012 - 6:08 pm | प्रभाकर पेठकर
कौशी, वीणा३, मृत्युन्जय, दिपक, प्रेरणा पित्रे, स्वाती दिनेश, गवि, मराठमोळा, निश आणि मोहनराव तुम्हा सर्वांच्या प्रेरणादायी प्रतिसादांबद्दल अनेकानेक धन्यवाद.
4 Jul 2012 - 1:25 pm | सस्नेह
व्वा ! डिश तर एकदम बहारदार दिसतेय.
पण एक शंका अशी, की डिशमधली ग्रेव्ही तर खुपच दाट दिसते. नुसते गरम मसाले वापरून इतकी दाट ग्रेव्ही बनत नाही. आणखी काही घातले काय ?
4 Jul 2012 - 1:52 pm | प्रभाकर पेठकर
नुसते गरम मसाले वापरून इतकी दाट ग्रेव्ही बनत नाही.
सहमत.
आणखी काही घातले काय ?
हो आहे नं! गरम मसाल्या व्यतिरिक्त खालील साहित्य त्या ग्रेव्हीत आहे:
उकडलेली अंडी २ नग.
डालडा (किंवा तत्सम) तूप १/२ कप.
मध्यम आकाराचे कांदे २ नग.
दही १-१/२ (दिड) कप.
आलं पेस्ट १ मोठा चमचा (टेबल स्पून).
केशर चिमुटभर.
केवडा वॉटर (ऐच्छिक) १ मोठा चमचा.
कोथिंबीर.
पाककृती वाचून, आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
4 Jul 2012 - 5:11 pm | sagarpdy
पदार्थ मस्त जमला होता अगदी रंगसकट! साजूक तुपात करण्यात आल्यामुळे उत्तम चंव प्राप्त झाली. रंग आणि वासामुळे फोटो देखील काढण्यास थांबलो नाही :D
5 Jul 2012 - 7:56 pm | स्वाती२
मस्त पाकृ! ग्रेवीची बेसिक रेसिपी एकदम किपर आहे.
6 Jul 2012 - 4:20 pm | नेहरिन
मस्त पाककृती . करुन बघण्यात येइल.(लवकरात लवकर.)
11 Jul 2012 - 12:54 am | अर्धवटराव
इतकी छान डिश आपल्या हातुन काहि जमणार नाहि. "पेय" स्पोन्सर करुन एखाद्या बल्लव मित्राकडुन करुन घेतो आणि हाणतो :)
बरेचदा ग्रेव्ही थीक व्हायला उकडलेल्या अंड्याचा पिवळा भाग मिसळतात, शिवाय उकडलेले अंडे तळुन मग ग्रेव्हीत सोडतात. या डीशच्या बाबतीत असलं काहि केलं तर ताजमहालला हातभट्टीतल्या वीटा लावल्या सारखं होईल काय?
अर्धवटराव
11 Jul 2012 - 5:08 pm | बॅटमॅन
पाककलेच्या कसबापेक्षा बल्लवाची मैतरकी अधिक गोडीची ;)
11 Jul 2012 - 1:21 am | प्रभाकर पेठकर
sagarpdy, स्वाती२, नेहरिन, अर्धवटराव प्रतिक्रिये बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
अर्धवटराव,
या डीशच्या बाबतीत असलं काहि केलं तर ताजमहालला हातभट्टीतल्या वीटा लावल्या सारखं होईल काय?
अजिबात नाही. कुठल्याही पाककृतीत आपल्या आवडीनुसार बदल जरूर करून पाहावेत. 'काहीतरी नविन' हा ध्यासंच एखादा नवा ताजमहाल उभारू शकेल.
16 Nov 2012 - 12:44 am | दीपा माने
पेठकर, तुमच्या पाकृची मी निष्ठावाचक आहे. सर्वच पाकृ सुंदर आणि चवदार आहेत.
18 Nov 2014 - 5:23 pm | विजुभाऊ
वाह.मजा आला.......