जूनचं पहिलं दोन आठवडं गेलं तरीबी पावसाचा तप्पास नव्हता. कोल्हापूरात कवा धरनं घुटमळत्योय पन पुन्याकडं सरायचं काही नाव नाय पठ्ठ्याचं. त्यो इतका रग्गेलपना दावतोय तर म्या म्हनलं, या बारीला आपणच जावं सातार्या पतुर ! चंदन - वंदन वर जाऊन लई दिस झालं होतं तवा या बारीला त्यांना भेटायचं नक्की क्येलं. पावसाचीबी गाठ पडायला म्हनलं तेव्हडचं निमित !
बेलमाची गावातून दिसणारा चंदन किल्ला
चंदन-वंदन मधलं बेचकं
पायथ्याचं मंदीर, मागे वंदन गडाचा पसारा
दुपारला अडीचला पुनं सोडलं आन् गाड्या भुईंज कडं हाकल्या. आवंदाच्या टायमाला आमच्या मंडळी त्यांच्या धाकल्या बहीनीसंगट आल्या व्हत्या. आप्पांच्या गावचा म्हंजी तळेगावच्या जोश्यांचा हृषीकेश होता, श्रीकांत त्याच्या कुटुंबाला घेऊन हाजीर व्हता आनी पुन्यातूनच वृंदा आनी मैत्रयीनी वर्दी दिली व्हती. शिवापूरला च्या पिऊन घेतला आन गाड्यातनी तेलं भरून घेतली. पुढला च्या वाई फाट्यावर घ्येतला. भुईंज मधून गाड्या डाव्या अंगाला बेलमाची गावाकडं जानार्या वाटंवर घातल्या न घातल्या तोच पावसाची बारीक सर आली. पठ्ठ्या अखेरीस भेटलाच तर ! गाड्या वरच्या बेलमाचीत लावल्या अन् सरल खिंडीकडं निगालो. समदी मंडळी फोटू काडत काडतच चालली व्हती.
फोटू सेशन
मावळतीच्या अंगाला वैराटगड डोस्कं ढगात टाकून बसला व्हतां. कदी मदी त्याच्या टकूर्यावर मावळतीचं सोनं दिसत व्हतं. त्याच्या मागल्या बाजूनं महाबळेशराचं पठार. लैच झ्याक नजारा ! तिथंन पावलं काय निघना. मदीच आभालाच्या घोंगडीला भोकसं पडून त्यातनं सुर्व्याची किरनं जिमिनीवर सांडत व्हती. फोटू काढत अन् करंवंद खात खात चंदन-वंदनच्या मधल्या टापावरं पोचलो.
वैराटगड अन् आजूबाजूला सांडणारी किरणे
आभाळाला पडलेली ठिगळं
आभाळाला पडलेली ठिगळं
मावळतीच्या सोनसळी रंगात न्हाऊन निघालेलं बेलमाची
वैराटगडावर पसरलेलं मावळतीचं सोनं
वंदनची वाट तर लगेच घावली. चंदनकडं जानारी वाट गडाच्या भिताडाला वळसा मारून जानारी व्हती. म्या अन् श्रीकांतनं थोडं म्होरल्या अंगाला जाऊन बघितलं, पर लैच घसारा ! म्हागारी फिरलो. अंधारायला झालं व्हतं तवा बिगी बिगी पावलं उचलीत वंदन गडावरला दर्गा गाठला. भणाभणा वार्याचं फटकं बसत व्हतं अन् पाऊस उगा गोमुत्र शिंपडल्यावानी पडंत व्हतां.
चंदनच्या डोक्यावर चाललेला ढगांचा खेळ
मपलं बारदान अन् मागं चंदनचा कडा
वंदनचा बुरूज
अखिल डोंगरयात्रा महिला मंडळ - एका मावळत्या क्षणी
चंदन जवळच्या टापावरून दिसणारा वंदनचा पसारा
श्रीकांत एका निवांत क्षणी (फोटो : हृषीकेश जोशी )
चंदनची वाट शोधाताना मी आणि श्रीकांत
दर्ग्याच्या अंगनात, घरनं बांधून आनलेलं जेवान सोडलं आनिक समदी खान्यावर तुटून पडली. कवाधरनं पोटात कावळं वरडत व्हते. समदं संपवून नवाच्या काट्याला सगळी दर्ग्यात पार आडवी ! मंग आमच्या मंडळींच्या आर्जवावर गान्याच्या भेंड्या सुरू झाल्या. दोन तीन घंटे गळे फाटूस्तवर आम्ही आरडत व्हतो. पावसाचा शिडकावा अन् भनाननारा गार वारा ! थंडी लागली नाय तर नवल ! सगळी मंडळी गप गुमान पडली.
वृंदाने काढलेला हादडीचा फोटो
पहाटं पाचच्या टायमाला म्या सुमडीत दर्ग्यासमोरल्या तळ्याकडं बसून आलो. लईच काकडं भरलं व्हतं. सातला मंडळी उठली अन् धुकाटातच मागल्या कड्यावरं जमली. ढगांची लै दाटी झाली व्हती. उगवतीला चंदनच्या अंगाखाद्यावरून मधल्या खिंडीत येत ढगांच्या आंघुळी चालल्या व्हत्या. दोन चार पवनचक्क्या पल्याडल्या टापावरून आपल्या माना वर काढून हा सारा खेळ न्याहाळीत व्हत्या. ढगांवर मधिच सूर्व्याची किरणं पडून चमकित व्हती. सकाळ्च्या पारी लैच झ्याक दिसत व्हतं सारं. फोटू काढून सामानाची बारदानं बांधली.
ढगांचा खेळ
ढगांमधून माना वर काढून पहाणार्या पवनचक्क्या
:)
ढगांमधून माना वर काढून पहाणार्या पवनचक्क्या
चंदन-वंदनच्या मधल्या बेचक्यात तयार होणारे ढग
ढगांमधून माना वर काढून पहाणार्या पवनचक्क्या
धुकाटात हरवलेला वंदनचा बुरूज
गडावर प्यायच्या पान्याचा ठनठनाट व्हता तवा च्या खाली गावातच घेनार व्हतो. बारदानं पाठीला मारून गडावरच्या धुकाटात शिरलो. अजून एक भली थोरली दर्ग्यागतच इमारत पाहिली. एक तीन दरवाज्याचं बैठ कोठारबी हाय. पर दरवाजात लैच गचपण माजलं व्हतं. एका दरवाजातून आत डोकावलो तर वाघळाच्या मुताच्या वासाची घान उठली होती. तसाच मागं फिरलो एक दोन फोटू काढलं आन परतीच्या वाटेवर निघालो. वाटेत अजून एक दोन तळी लागली. अन् पडक्या वाड्यांची जोती बी दिसली. महाराजांच्या काळात गडावं मोप राबता असनार. दरवाजाकडं दगडी जिनं उतरतं झालो. वरच्या दरवाज्यावर एक फारसी भासेतला शिलालेख घावला. आतमदी पहारेकर्याच्या देवड्याबी हायेत. त्यामधूनच वरच्या बुरजावर जायला भिताडातून एक बोळकांडं आहे. त्याच्याबी तोंडावर लैच गचपण. खालच्या ढासळलेल्या तटबंदीतून दरवाज्याकडं गेलो. या दरवाज्यावर मात्र गणेशाची मूर्ती अन् कमळं कोरली व्हती. फोटू काढलं अन बेलमाचीची वाट धरली.
रानभुली
दर्ग्यासमोरच्या तळ्याकडे जाणारी कमान
रानभुली
अजून एक दर्गा
रानमेवा-डोंगरची मैना
कोठारं
रानभुली
दगडी पायर्या
पहारेकर्यांच्या देवड्या
दरवाजा
फारसी शिलालेख
दरवाज्याची कमान
दुसरा दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत
दरवाज्याजवळच्या बुरूजावरील गणेश मुर्ती आणि कमळ
डोंगरयात्राचे शिलेदार परतीच्या वाटेवर
माझ्या जिवाभावाच्या मैतराशी भेट झाली अन् जीवाला कशी शांतता लाभली व्हती. आम्हास्नी सोडाया पार पुन्यापत्तुर साथ केली पावसानं. पावसाची सुरूवात तर लैच झ्याक झाली हाय. आता म्होरल्या भटकंतीचे बेत आखाया आम्ही मोकळं !
--
जातीवंत भटका
अवांतर : लेख ब्लॉगवर पुर्वप्रकाशित
छायाचित्रांसाठी वापरलेला कॅमेरा - कॅनन ७ डी आणि लेन्स - कॅनन २८-१३५ एम.एम.
प्रतिक्रिया
20 Jun 2012 - 5:08 pm | sneharani
नशिबवान आहात एवढं फिरायला मिळतयं अर्थात आवड असणं महत्वाचं !!
मस्त फोटो अन् वर्णन सुध्दा ज्या गावठी भाषेत केलय ना ते वाचताना मजा आली.
:)
20 Jun 2012 - 5:19 pm | स्पंदना
शेवटाला आनलासा तर पाउस!
बर भटकु जरा पाय दे तुझ हिकड , आन ती कॅमेरा चालवायची नजर बी आन, मिठ मोहरी उतरु दे बाबा, नजर नगो लागायला कुणाची.
काय फोटो हायती? धागा काय सोडवना बग प्रतिसाद लिवायला.
भले शाब्बास!
20 Jun 2012 - 5:22 pm | गणपा
.....आणि पावसाळी सहलींचा नारळ फुटला. :)
फोटो एकाहुन एक देखणे. मस्तच.
20 Jun 2012 - 7:31 pm | मेघवेडा
तंतोतंत.
फोटो निव्वळ दर्जेदार आहेत! वाटच पाहत होतो. और आन्दो! :)
20 Jun 2012 - 5:25 pm | रानी १३
मस्त!!!!!!!!!!!!!! :) खुपच सुरेख......... हेवा वाटतो तुमचा...........
20 Jun 2012 - 5:33 pm | चौकटराजा
ह्ये फटू पावसाच्या वातावर्नात घेउन् शान ग्येल्ये. त्यामूळं न्हाय आता पाउस तर न्हाय असं वाटाया लागलया. आपल्या वर्ननाच्या ष्टाईलीनी आमच्या वडलाच्या "भाटगरची टारीप " या
गोष्टीची आटवन करुनशान धीली. त्ये आंदरमावळतली सात आट टकुरी इस्नूला म्हंजी आमच्या वडलाला भेटाया भ्रोरास्नी येत्यात आशी ष्टुरी आसायाची .
ली ब्येस धागा हाय रं रंग्या !
20 Jun 2012 - 5:44 pm | मस्त कलंदर
फोटू आणि सहल दोन्हीही सॉल्लीड!!
20 Jun 2012 - 6:00 pm | प्रास
भटक्याशेठ, मस्त फोटू आणि सुंदर लिखाण.
नेहमीप्रमाणेच आवडलं.
21 Jun 2012 - 12:36 am | मोदक
+१ हेच बोल्तो...
20 Jun 2012 - 6:03 pm | बॅटमॅन
लै भारी. जिकलासा कंप्लीट!!! :)
20 Jun 2012 - 6:10 pm | श्रावण मोडक
काही प्रचि देखणीच आहेत.
20 Jun 2012 - 6:25 pm | सोत्रि
फोटो क्लासच आहेत. तो वॊटरमार्क तेवढा कोपर्यात टाकलास तर अजुन मजा येइल असे वाटते.
असो, तुझ्याबरोबर भटकंती कशी जमवावी ह्याचा प्रश्न पडला आहे...
-( भटक्या) सोकाजी
20 Jun 2012 - 6:25 pm | sagarpdy
मोदकराव आहात कुठे?
20 Jun 2012 - 6:30 pm | गोंधळी
भटकंति आवडली.
छायाचित्र मस्त.
20 Jun 2012 - 6:37 pm | सूड
झकास !!
20 Jun 2012 - 7:17 pm | स्वाती दिनेश
मस्त भटकंती!
फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले,
स्वाती
20 Jun 2012 - 7:24 pm | बिपिन कार्यकर्ते
असो. :(
20 Jun 2012 - 7:48 pm | अत्रुप्त आत्मा
जेवडं फोटू झ्याक,तेवढच त्यांना टिपनारं तुमचं डोळं बी तैय्यार हायती... वर्णन तर गुळखोबर्या सारक जुळून आलय... मनलं ब्वॉ तुमास्नी... शॅल्युट आमचा... :-)
20 Jun 2012 - 8:35 pm | जाई.
सुंदर फोटोज आणि लिखाण
20 Jun 2012 - 8:43 pm | पैसा
बावन्नकशी फोटो आणि लिखाण! आम्हाला पावसाळ्याची मस्त भेट दिलीस भटक्या!
20 Jun 2012 - 11:09 pm | जेनी...
आई शप्पथ... असले फोटो आहेत की क्षणभर तरी सगळच जिवंत वाटलं....
एकेक फोटो अस्तित्वाच्या खुणा ठेवुन जाणारा....
आभासाच्या पलि़कडचं वातावरण जपणारा
एकदम भारी .....
20 Jun 2012 - 9:26 pm | मुक्त विहारि
अजून लिहा...
20 Jun 2012 - 11:16 pm | निनाद मुक्काम प...
लिहित रहा. आम्ही वाचत ,पाहत राहतो.
20 Jun 2012 - 10:25 pm | jaypal
ढगांचे फोटो तर...........................................आपली बोलती बंद (विमानातुन काढले आहेत असे वाटते.) :-)
20 Jun 2012 - 11:06 pm | प्रचेतस
भटक्या फोटू आणि वर्णन लैच भारी रे. ढगांचे लोट तर क्या कहने.
बाकी चंदन - वंदन शिलाहार भोज राजांनी बांधलाय. पन्हाळा, पांडवगड, वैराटगड, कमळगड, कल्याणगड, हे किल्ले पण त्यांचीच निर्मिती.
20 Jun 2012 - 11:24 pm | सर्वसाक्षी
फोटो आणि वर्णन दोन्ही मस्त
21 Jun 2012 - 3:01 am | स्वच्छंदी_मनोज
मस्तच रे,
आमच्या पण ५ वर्षांपुर्वीच्या चंदन-वंदन ट्रेकची आठवण झाली ... आमचीही चंदन-वंदनची अशीच पावशाची पहीली भेट होती... पन आता बराच बदल झालेला दिसतोय...
चंदनच्या दरवाजातून आत गेल्यावर दगडांची एक नैसर्गिक विशेष रचना दिसते...तसेच पायथ्याच्या किकली गावातले शिलाहार कालीन प्राचीन शंकर मंदीरपन अगदी बघण्यासारखे आहेच...
माझ्याकडेही ह्याचे असेच्काही जोरदार फोटो आहेत... प्रची इथेच टाकायची जोरदार ईच्छा होतेय....
21 Jun 2012 - 10:14 am | जातीवंत भटका
आम्हालाही पाहूद्यात की ...
21 Jun 2012 - 11:17 pm | स्वच्छंदी_मनोज
वानगीदाखल काही टाकलेत... खालील प्रतीसाद पहा
21 Jun 2012 - 7:58 am | किसन शिंदे
सगळेच फोटो मस्त आहेत.
एखादा तरी ट्रेक तुझ्यासोबत पक्का. :)
21 Jun 2012 - 10:16 am | जातीवंत भटका
तुम्हा सगळ्यांच्या या प्रेमामुळे आणखी लिहायची प्रेरणा मिळते...
मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचे ...
21 Jun 2012 - 10:42 am | मृत्युन्जय
देवा रे देवा. काय फोटो आहेत रे भटक्या. जीव गेला. अप्रतिम.
21 Jun 2012 - 11:09 am | दिपक
तुमच्या भटकंतीला, फोटुला, निसर्गाला __/\__
21 Jun 2012 - 3:21 pm | पियुशा
आयला भारी झाला ट्रे़क :)
पण पावसाळ्यात ट्रे़क वैगेरे धाडसी प्रकार आहे हा !
21 Jun 2012 - 5:38 pm | श्यामल
अस्सल गावरान भाषेतलं वर्णन आणि देखणी छायाचित्रे...... वाह! दिल खुश हुआ |
21 Jun 2012 - 6:33 pm | खुशि
नमस्कार,
चन्दन्-वन्दन लई झ्याक.
21 Jun 2012 - 11:15 pm | स्वच्छंदी_मनोज
हे काही फोटो माझ्याकडून,

१. वंदनचा दरवाजा
२. वंदनवरून चंदन

३. चंदनवरून वंदन

४. चंदनवरील नैसर्गीक आणी वैशिष्ट्यपुर्ण मांडणी असलेले दगड

22 Jun 2012 - 3:55 pm | जातीवंत भटका
यावेळेला वेळेअभावी चंदन हुकला पण या पावसाळ्यात एकदा तरी नक्कीच चक्कर होणार तिकडे...
23 Jun 2012 - 3:40 pm | RUPALI POYEKAR
काय भारी लिवलय हो आनी फटू पन लय झ्याक
मस्तच
23 Jun 2012 - 4:12 pm | चित्रगुप्त
वाहवा. दाद देतो तुमच्या भटकंतीला.
24 Jun 2012 - 6:08 pm | समर्थिका
सुंदर फोटो आणि माहीति :)
25 Jun 2012 - 3:30 pm | यशोधरा
माची कधी?
26 Jun 2012 - 10:44 am | जातीवंत भटका
जूलैच्या शेवटाला
27 Jun 2012 - 7:04 am | यशोधरा
ओके. धन्यवाद :)
फोटो आणि वर्णन भन्नाट. खास करुन सकाळच्या वेळचे फोटो अ फा ट!
25 Jun 2012 - 11:12 pm | अर्धवटराव
अंगातलं त्राण असं सत्कारणी लावावं... असं आयुष्य भोगावं.
जियो.
फोटो किती अप्रतीम आहेत वगैरे सांगण्यात अर्थ नाहि. निव्वळ खल्लास.
अर्धवटराव