221 ब, बेकर स्ट्रीट- बहुधा जगातील सर्वात प्रसिध्द पत्ता! शेरलॉक होम्स या पत्त्यावर १८८१-१९०४ या काळात राहत असे आर्थर कोनन डॉयल यांच्या साहित्यात वर्णन आहे.
शेरलॉक होम्स कथा वाचताना आपल्या मनात एक काल्पनिक वातावरण तयार होते..मागच्या शतकाच्या सुरुवातीचा काळ, जुने रस्ते, विक्टोरिया, पावसाळी कुंद वातावरण आणि शेरलॉक होम्स आणि इतर पात्रांचे स्टायलीश संवाद. खिळवून ठेवणारे कथानक. त्याचे अजब तर्क आणि वेगळा विचार करायची पद्धत! काल्पनिक आहे माहित असून कधीतरी पहायला हवे असे वाटणे. हेच ऑर्थर कोनन डॉयल चे वैशिष्ट्य. रहस्यकथा वाचायची आवड असलेल्या प्रत्येकाला कधीतरी शेरलॉक होम्स वाचायचे चे वेड लागतेच. मग इतकं वेड जगभरातल्या लोकाना आहे तर असे एक घर तयारच का करू नये? झालं कल्पना सुचली आणि अमलात पण आली. आणि साकारलं एक सुंदर संग्रहालय..
१९९० साली हे सुरु झालं असलं तरी २२१ ब हा (खरा तिथला नसलेला )पत्ता मिळवायला निर्मात्यांना बराच त्रास पडला. मुळात हे घर २३७ आणि २४१ क्रमांकाच्या घरांमध्ये आहे. शेरलोक होम्स आणि डॉ. वाटसन हे मिसेस हडसन च्या गेस्ट हाउस मध्ये भाडेकरू होते असे लिहिले गेले होते. गेली ऐंशी वर्षे शेरलोक होम्स साठी येणारी जगभरातली पत्रं Abbey National ही बँक पहात असे. कारण हा त्यांचा खरा पत्ता ! हल्ली ही पत्रे थेट संग्रहालयाला मिळतात.रॉयल मेल अर्थात ब्रिटीश पोस्टाने लोकप्रियता पहाता ते मान्य केले
एकदा या प्रसिद्ध पत्त्यावर भेट द्यायची खूप इच्छा होती. जालावर समजलं की नाताळ चा दिवस सोडून वर्षभर साडेनऊ ते सहा हे संग्रहालय सुरु असते. मादाम तुसाद्स संग्रहालयामागे चालताना अगदी समोरच हेही संग्रहालय आहे. एकदा पहावेच असे सन्ग्रहालय आहे.
एकदा बेकर स्ट्रीट ला गेल्यावर विचारायला पण लागत नाही. महाशय आपला तोच पाईप घेऊन स्टेशन समोर स्वागताला उभे! इथून अवघ्या दोनशे पावलांवर २२१ ब बेकर स्ट्रीट!
शेरलॉक होम्स यांचे कार्ड…त्यावर फोन नंबर नाही!
या जुन्या घराच्या तळमजल्यावर प्रवेशिका घेऊन रांगेत उभे राहिलो. सगळीकडे पारंपारिक इंग्रजी वेषातील कर्मचारी पाहून छान वाटते.
घराबाहेरच एक गार्ड स्वागतासाठी उभा आहे. हाच तिकिटे पाहून आत सोडायचे काम करतो.
हे एक जुने घर असल्याने एकाच दारातून आत बाहेर जावे लागते. एका वेळी फक्त दहा-पंधरा व्यक्ती आत जातील हे तो पहातो. त्यामुळे पंधरा मिनिटे रांगेत वाट पहावी लागते.
मग प्रवेश मिळाला अन एक खजिनाच उघडल्याचा भास झाला. पहिल्या मजल्यावर मूळ कथेतील घराप्रमाणे खोल्या सजवल्या आहेत. त्यावर दोन मजले तत्कालीन इतर वस्तू , व्यक्ती आणि प्रसंगांवर आधारित आहेत.
इथे तर डॉ वाटसन किंवा शेरलॉक होम्स येऊन 'हेलो! इथे काय करतोयस?'’ विचारतील असे वाटले.
गुप्तहेराची छोटीशी प्रयोगशाळा
जमवलेले पुरावे
आर्थर कोनन डॉयल यांचे हस्तलिखित
'Man with twisted lip’ डॉयल यांची एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा.. मेणाच्या पुतळ्याच्या रुपात...
काही वेळा केवळ तीन मजले भरायचे म्हणून उगाचच काही वस्तू गोळा केल्या असे वाटते अन तेव्हढेच खटकते. उदा. शिवण यंत्र , व्हायोलीन वगैरे!
या घराच्या तुलनेत जे होम्स पट आले त्यात बऱ्यापैकी मोठी घरे दाखविली आहेत आणि ती कथेला अनुरूप पण वाटतात. पण अधिकृत घर मात्र असं आहे.
शेवटी आपल्याकडे असे संवर्धन का करून ठेवले जात नाही हा प्रश्न पडतोच. व्यवस्थित तिकीट विकत घेऊन पहायला लोक तयार असतात. पण आधी ते तयार तर केले पाहिजे ना?
भारतात मोजके सन्माननीय अपवाद वगळता संग्रहालय म्हणजे केवळ पुरातन अवशेष दाखवले जातात. काही नवीन भर टाकून ते चांगले करता येईल. पुण्यातले केळकर म्युझियम आणि रेल्वे म्युझियम असे वैयक्तिक संग्रह सोडले तर आवर्जून पहावे असे काही निर्माण झाले नाही. आणि इथे तर अस्तित्वात नसलेल्या, केवळ साहित्यिक अस्तित्व असलेल्या व्यक्तित्वाचे, त्यातल्या पात्रांचे संग्रहालय बनवले आहे! आणि त्यासाठी वेड असावं लागेल नव निर्मितीचं ..
प्रतिक्रिया
13 Jun 2012 - 4:34 pm | अत्रुप्त आत्मा
बरें लिव्हलाव हो!
13 Jun 2012 - 9:27 am | जाई.
२२१B ची भटंकती एकदम आवडेश
13 Jun 2012 - 10:50 am | मृत्युन्जय
आवडले. कधीन राणीच्या देशात जाण्याचा योग आला तर बघेन म्हणतो. :)
13 Jun 2012 - 11:46 am | हरिप्रिया_
मस्त!!!
धन्यवाद ह्या सुंदर सफरीबद्दल.
बघु कधी खरोखर बघायचा योग येतो.
13 Jun 2012 - 12:03 pm | ऋषिकेश
राणीच्या देशांत गेलो की (तर) ज्या गोष्टी नक्की करणार आहे असे मनाशी ठरवले आहे त्या यादीत ही वारी आहेच!
आभार!
13 Jun 2012 - 12:46 pm | यकु
वावावा !
बसल्याजागी आमच्या आवडत्या शेरलॉकचे संग्रहालय दाखवलेत.. फोटो आणखी असतील तर टाका.
अवांतर: डॉयल साहेबांनी लिहिलंय शेरलॉक (अर्थात फिक्शन) स्कॉटलंड यार्डचा 'कन्सल्टींग डिटेक्टीव्ह' होता. सदानंद मोरेंच्या 'लोकमान्य ते महात्मा' मध्ये मोरेंनी लिहिलंय स्कॉटलंड यार्डचा 221 बी बेकर स्ट्रीटवर रहाणारा हा डिटेक्टीव्ह, लंडनमध्येच असलेल्या 'इंडिया हाऊस' मध्ये सावरकरांची रहाण्याची व्यवस्था झाल्यानंतर (लोकमान्य टिळकांचे श्यामजी कृष्ण वर्मांना पत्र) स्वातंत्र्यवीर सावरकर करीत असलेल्या ब्रिटीश राज विरोधातील कारवायांचा छडा लाऊ शकला नाही असे म्हणून मोरेंनी विनोदाचा एक क्षीण प्रयत्न केला आहे.
वास्तवात देखील इंडिया हाऊसवर स्कॉटलंड यार्डची नजर होतीच, यासाठी स्कॉटलंड यार्डमधल्या अनुभवी अधिकार्यांची एक स्पेशल ब्रँच स्थापन करण्यात आली होती. पण इंडिया हाऊसमध्ये होणार्या बैठकीत युरोपियनाला फक्त आमंत्रित केले असेल तरच प्रवेश मिळत असे, म्हणून इंडिया हाऊसमध्ये ब्रिटीश राज विरोधात शिजत असलेल्या कटांची माहिती यार्डपर्यंत पोहोचू शकत नसे. मग यासाठी स्कॉटलंड यार्डने किर्तीकर नावाचे एक मराठी एजंट नेमले. हे महाशय लंडनला वैद्यकिय शिक्षणासाठी गेले होते म्हणे - आणि यांनी लंडन हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय शिक्षणाबाबत काही चौकशी केली तेव्हा स्कॉटलंड यार्डने यांना सावरकरांचं अंतवर्तुळ भेदण्यासाठी फितवलं असावं, असा एक अंदाज. (पहा: इंडिया हाऊसबाबतच्या विकी पानावरील स्कॉटलंड यार्ड हा परिच्छेद). अर्थात हे किर्तीकर स्कॉटलंड यार्डचे घुसखोर आहेत हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नजरेतून सुटलं नाहीच - मग एका रात्री सावरकरांनी लावलीन् या किर्तीकरांच्या छातीला पिस्तुल - आणि खरं काय आहे ते वदवलं, अर्थात पिस्तुल लाऊन झाल्यानंतर सावरकरांनी योग्य ती समज दिली असेलच. मग हे किर्तीकर सावरकरांचे स्कॉटलंड यार्डविरोधातील क्रॉस एजंट म्हणून काम करु लागले - आणि किर्तीकरांचे स्कॉटलंड यार्डला जाणारे रिपोर्ट खुद्द सावरकरच छाननी करुन पाठवू लागले ;-) एमपीटी आचार्य नावाचे आणखी एक एजंट किर्तीकरांनी दिलेल्या रिपोर्टमधील माहिती (अर्थातच सावरकरांनी छाननी करुन ;-) ) खरीखुरी आहे हे स्कॉटलंड यार्डला भासविण्यासाठी व्हीव्हीएस अय्यर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी नेमले.
13 Jun 2012 - 12:49 pm | बॅटमॅन
कीर्तीकरांबद्दल प्रथमच वाचलं आज. हे म्हंजे मज्जाच मज्जा आहे नुस्ती. मस्त माहिती हो यकु.
13 Jun 2012 - 12:56 pm | खेडूत
छान! नवीनच माहिती. धन्यवाद!
13 Jun 2012 - 12:43 pm | बॅटमॅन
आईच्या गावात!!!! एक नंबर हो खेडुतसाहेब!!!!!!
13 Jun 2012 - 1:30 pm | प्रचेतस
काल्पनिक पात्राचं असं संग्रहालय उघडणं हे भन्नाटच.
13 Jun 2012 - 2:42 pm | संजय क्षीरसागर
मनःपूर्वक धन्यवाद! मस्त काम केलय.
13 Jun 2012 - 2:45 pm | कलंत्री
शेरलॉक होम्सच्या संग्रहालयाची चित्ररुप मेजवानी दिल्याबद्दल आभार.
या लेखाने माझ्या बर्याच जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. नागपूर मध्ये असतांना आम्ही शेरलॉक होम्स अभ्यास मंडळ नावाची संस्था चालवत असू. दर बुधवारी १ तास आम्ही होम्सच्या छोट्या गोष्टीवर चर्चा करत असू. आमचे हे मंडळ जवळ जवळ ४७ / ४८ आठवडे चालले होते.
आमच्या पैकी एकाकडे वरच्या प्रवेशिकेचे पत्रही होते ( ते प्रवेशपत्र आजही माझ्या कडे सुरक्षितपणे आहे).
ही गोष्ट अंदाजे २००४ च्या सुमारातील असावी.
13 Jun 2012 - 2:58 pm | सुधीर
फोटो अन माहिती आवडली.
काही वेळा केवळ तीन मजले भरायचे म्हणून उगाचच काही वस्तू गोळा केल्या असे वाटते अन तेव्हढेच खटकते. उदा. शिवण यंत्र , व्हायोलीन वगैरे!
शक्य आहे! पण व्हायोलीन त्यात येउ नये. खरं तर व्हायोलीन एकायला एवढं छान वाटतं हे "जर्मी ब्रेट" ची सिरियल पाहिल्यावरच कळलं. इथं एका. त्या सिरियल मधे, त्याचं खिडकीत उभ राहून ती व्हायोलीनची आर्त धून वाजवण्याने उदासवाणा क्षण अधिकच गडद व्हायचा.
बाकी अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तर्कवेत्ता असलेला शेरलॉक होम्स हुबेहुब साकारणारा जर्मी (वर चित्रात दिसणारा) मात्र सामान्याहून कमी बुद्धिमत्तेचा होता हे वाचून विचित्र वाटलं. एनी वे, पण जर्मी ने शेरलॉकची भूमिका अजरामर केली.
13 Jun 2012 - 3:22 pm | यकु
कुठे वाचलंत?
He conducted extensive research on the great detective and Sir Arthur Conan Doyle himself, and was very attentive to discrepancies between the scripts he had been given and Conan Doyle's original stories.
http://en.wikipedia.org/wiki/Jeremy_Brett
जेरेमी जर सामान्य बुद्धीमत्तेचा माणूस होता तर त्याने खुद्द सर आर्थर कॉनन डॉयल यांच्याबाबत, आणि त्यांनी निर्माण केलेल्या शेरलॉक होम्स या पात्रावरदेखील संशोधन करुन ग्रॅनडा प्रोड्यूसर्सनी त्याला दिलेल्या पटकथेत राहिलेल्या विरोधाभासावर त्याने सामान्य बुद्धीमत्तेच्या बळावर लक्ष दिलं असेल असे वाटत नाही. सबब सुधीर काळे यांचे हे विधान पटले नाही.
जेरेमीबाबत एक अपघात निश्चित झाला होता. तो शेरलॉक होम्स या काल्पनिक पात्रात अतिशय गुंतला होता, एवढा की जेरेमीचं वास्तविक जीवन त्यामुळे विस्कळीत झालं.
It became difficult for him to let go of Holmes after work. He had always been told that the only way for an actor to stay sane was for him to leave his part behind at the end of the day, but Brett started dreaming about Holmes, and the dreams turned into nightmares.[15] Brett began to refer to Sherlock Holmes as "You Know Who" or simply "HIM": http://en.wikipedia.org/wiki/Jeremy_Brett
13 Jun 2012 - 4:40 pm | सुधीर
हो मान्य पण तो त्यांच्या आयुष्याचा नंतरचा काळ आहे. त्यांच बालपण मात्र वेगळ होतं
he claimed to have been an "academic disaster", attributing his learning difficulties to dyslexia. म्हणून म्हटलं होतं. (कदाचित मोठ्या लोकांबाबत हे कॉमन असावं, तो एडिसनच ना, ज्याला शाळेतून काढून टाकलं होतं?)
दुसरं म्हणजे मी सुधीर काळे (कदाचित ते जकार्तावाले आहेत) नाही. मी सुधीर कुळये आहे.
13 Jun 2012 - 4:48 pm | यकु
:)
थँक्स.
चुकीच्या आडनावाबद्दल सॉरी.
बूचं करोती वगैरे वगैरे.. ;-)
13 Jun 2012 - 2:58 pm | मोहनराव
चांगली सफर घडवलीत. धन्यवाद.
15 Jun 2012 - 9:20 am | सहज
मधे हॅरी पॉटर विषयक एक फिरते संग्रहालय बघायचा योग आला. लहान मुलांसाठी पर्वणी होतीच. पण एक एक वस्तु बघताना, ते सिनेमा बनवताना किती मेहनत घेतली गेली आहे ते दिसते. तसेच जे के रोलींगच्या अदभूत कल्पनाविश्वाचे खरेच कौतुक वाटते.
कथेतल्या प्रत्येक पात्राची जादूची छडी त्यावरचे नक्षीकाम, हॅग्रीडची कुटी, डोलेरस अंब्रीजचे नेटके सुबक नक्षीदार टेबल, हॉरक्रक्स, गॉब्लेट, ट्रायविझार्ड कप, स्निच, भिंतीवर चालती बोलती चित्रे, मेजवानीचे पक्वान्न असलेला ग्रेट हॉल, दृक्श्राव्य माध्यमातुन पॉटर विश्वाची सफर मनोरंजक होती. नंतर डिसगस्टींग चव असलेले जेली बिन्स खाताना धमाल आली.
जेरमी ब्रेटवाल्या दूरचित्रवाणी मालिकेने अशीच भूरळ घातली होती. तुम्हाला हे संग्रहालय बघताना किती मजा आली असेल याचा अंदाज आहे.