काही महिन्याखाली रोममध्ये जायचं होतं म्हणून आंतरजालावर मराठी काही माहिती आहे का ते शोधत होतो. अपेक्षेप्रमाणे एक-दोन ब्लॉग तेही युरोप पर्यटनावर सोडले तर काहिच मिळालं नाही. दुसरं म्हणजे पुर्वी जाउन आलेल्या ठिकाणाबद्दल कुणी काही माहिती विचारली तर फोटो सोडले तर माझ्याजवळ काहीच नसतं. मग ठरवलं की आपल्या संदर्भासाठी आणि आठवणीसाठी (इमोशनल कॉलबॅक, यु नो! :)) प्रवासवर्णनं लिहुन ठेवायची. आता लिहिलंच आहे तर मिपावर टाका म्हणून टाकतोय. :)
१. शाफहाउसन
खूप दिवस कुठे फिरायला गेलो नव्हतो, त्यामुळे ह्या विकांताला कुठेतरी जायचं ठरवलं. जवळपासची सगळी ठिकाणं फिरून झाली होती. आणि खरंतर माझ्यासारख्याला सगळी युरोपिअन शहरं सारखीच वाटतात. तेच ते धबधबे, त्याच त्या इमारती, चर्चेस, कॅसल्स आणि बागा. थोडसं दूर जावं म्हटलं तर वेळ कमी होता आणि ऐनवेळी सगळं बूकींग केलं तर प्रकरण खर्चीक होतं हा स्वानुभव होताच. त्यामुळे कुठे जावं हा प्रश्न होता. तेव्हड्यात कुणीतरी सांगितलं की शाफहाउसन नावचं बॉर्डरवर स्वीस मधे एक शहर आहे. तिथले र्हाईनफॉल्स बघण्यासारखे आहेत आणि ४-५ तास मजेत जाउ शकतात. मग आदल्यादिवशी आंतरजालावरून सगळी माहिती काढली, रेल्वेचं वेळापत्रक बघितलं. आमचं कुटूंब जरा घरगुती प्रकरण असल्यामुळे साबुदाण्याचे थालिपीठ, तिखट शंकरपाळ्या, पोहे वगैरे करायलं घेतले. :)
सकाळी फोडणीचा भात खाउन सव्वासातच्या बसने ट्रेन स्टेशनवर पोहोचलो. ते ठिकाण स्वीस मध्ये असलं तरी "बाडेन व्युटेमबर्ग" तिकीटात तिथपर्यंत जाता येणार होतं. तिथून मग लगेचच असलेली ट्रेन पकडली आणि दोन तासांच्या प्रवासानंतर सिंगेनला पोहोचलो. तिथून दुसरी ट्रेन बदलून १५-२० मिनिटात शाफहाउसनला आलो.
बघेल तिकडं भारतीय लोकं एकमेकांची तोंडं चुकवत चालली होती, त्यावरून स्वीझर्लंड मध्ये असल्याची खात्री पटली. :)
रेल्वे स्थानकासमोरच बशी उभ्या होत्या. र्हाइनफॉल्स पर्यंत जाउन यायल्या माणशी ५ युरो तिकीट लागणार होतं. पण काही गृप पास आहे का म्हणून "इंफॉरमेशन" असं लिहिलेल्या खिडकीवर जाउन विचारणा केली. पण मला जर्मन ओकीठो येत नसल्यानं "आइन मोमेंट बिटे" म्हणून परत जाउन बायकोला घेउन आलो. तिनं कसबसं त्या बाईला सांगितलं आणि असं कुठलंही गृप तिकिट नाही हे कळलं. आणि पाच युरोची तिकिटं घेउन थांब्यापर्यंत येईपर्यंत बस क्र. १ आलीच. बस मध्ये बसल्यावर समोरच्या स्क्रीनवरच थांब्याचं नाव येत होतं त्यामूळे 'नोए हौसेन झेंट्रूम' हा थांबा आल्यावर उतरलो आणि "र्हाइनफॉल्स" असं लिहिलेल्या चॉकलेटी रंगातल्या दिशादर्षकाच्या मदतीनं र्हाइन नदीपर्यंत येउन पोहोचलो.
वरतीच दोन बाकडे टाकले होते, तीथं सुटलेल्या पोटाची पूजा करून खाली उतरलो.
१. लांबून दिसणारे र्हाईनफॉल्स
त्या धबधब्या मध्येच एक सुळका तयार झाला होता. तीथं काही लोकं दिसत होती. आपणही तिथं जायचं असं ठरवून खाली उतरलो आणि बोटराइडची चौकशी केली. वेग-वेगळ्या टूर्स होत्या. बाकिच्या टूर्स मध्ये बोटीतच बसून रहावं लागणार होतं म्हणून त्या सुळक्यापर्यंत जाण्याचं आणि येण्याचं (हे महत्वाचं :)) तिकीट (माणशी ७ युरो) घेउन त्या बोटीची वाट बघत थांबलो. बोट आल्यावर आत शिरणार तितक्यात भारतिय १०-१५ वर्षेवयोगटातल्या मुला-मुलींचा घोळका आरडा-ओरडा, धक्का-बुक्की करत आत शिरला (एका हुचभ्रू शाळेची ट्रीप आली होती). आणि आम्हाला अगदी टोकाची जागा मिळाली. :(
त्या धबधब्याचा प्रचंड आवाज येत होता म्हणून ते पाणी आहे असं वाटत होतं नाहितर धुराचे लोळ येत आहेत असच वाटलं असतं. तीथं सुद्धा अरूंदश्या पायर्यांवर वरती जाण्यासाठी रांग होती. वरती फार फार तर सात-आठ जणांना फक्त उभं रहाण्यासाठी जागा होती. पण भारतीय लोकं इतर लोकांची पर्वा न करता आरामात वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढून घेत होते. काही दिवसांनी एशियन लोकांसाठी जास्त तिकीट ठेवल्यानंतर आश्चर्य वाटायला नको! :) अर्थात हा फक्त इथला अनुभव नाहिये, पण स्विझर्लंडचं बॉलीवूडनी व्यवस्थीत मार्केटींग केलंय त्यामूळे इथं लोकं जास्त दिसतात एव्हडच.
आणि मिळेल ते ओरबाडून-झगडून घेण्याची वृत्ती (इथल्या एकुणच सिस्टीममुळे) भिनलेली असते. अश्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण त्याविषयी नंतर.
३. सुळक्यावरून दिसणारं द्रुष्य.
४. पायर्यांवरून दिसणारा धबधबा
परत आल्यानंतर मग नदीच्या बाजूने फेरफटका मारून (तंगडतोड करून) एका पुलावरून दुसर्याबाजूला आलो.
५. पूलावर इष्टाईल मारत काढलेला फोटू
६. दुसर्याबाजूनं दिसणारा सुळका
इथं मोकळी जागा दिसली रे दिसली की लोकं फुलझाडं लावतात असं वाटतं. बघेल तिथं वेगवेगळ्या रंगाची, आकाराची फुलंचफुलं!
७. दोन डोळे आणि मिश्या सारखा पॅटर्न असलेली वेगवेगळ्या रंगाची फुलं.
तिथून बस थांब्यावर आलो आणि बसने परत हाउप्टबानहोफला आलो.
स्टेशनवर आल्यावर घडाळ्यात फक्त साडेतीन वाजले होते. परतीची रेल्वे पावणेपाचला होती. मग तीथल्याच एका मार्केट मध्ये फेरफटका मारला. बायकोनं यथेच्छ विंडोशॉपींग केलं :)
पावणेपाचच्या रेल्वेनं परत त्याच राउटने घरी आलो. घरी येइपर्यंत साडेआठ वाजले होते.
वाचकांना आवडलं नाही तरीही पुढील भाग, २. रोझ गार्डन (बाडेन-बाडेन) :)
प्रतिक्रिया
3 Jun 2012 - 9:39 pm | मुक्त विहारि
पण अजून फोटो हवे होते.रेल्वेचे वगैरे.
3 Jun 2012 - 10:52 pm | अत्रुप्त आत्मा
+१
3 Jun 2012 - 9:56 pm | अभिजीत राजवाडे
बघेल तिकडं भारतीय लोकं एकमेकांची तोंडं चुकवत चालली होती, त्यावरून स्वीझर्लंड मध्ये असल्याची खात्री पटली.
:)
हे वाक्य मनापासुन आवडले. भारताबाहेर दोन भारतीय समोरासमोर भेटले कि नजर चुकवतात, ह्याचे नक्की कारण काय आहे, हे आज पर्यंत समजले नाही.
प्रवासवर्णन आवडले.
4 Jun 2012 - 11:40 am | बॅटमॅन
हे विचित्र आहे यात शंकाच नाही. पण रसेल पीटर्स या कमीडिअनने याचे कारण सांगितले आहे मजेत का होईना. त्याच्या मते, कुठल्याही भारतीयाला परदेशात गेल्यावर दुसरा भारतीय पाहिला की वाटते, की "I thought I was the only one (Indian)!!!" हे झाले मजेचे. त्याचा नेमका कुठला शो ते विसरलो, पण त्यात असे दिलेले आहे. ( मी परदेशात कधी नाही राहिलो - आधीच सांगतो :) जितके आठवले तितके सांगितले बस्स.)
3 Jun 2012 - 10:47 pm | पैसा
वर्णन, फोटो सगळंच मस्त! फक्त जीन्स घातलेले दादा बघून जरा चकित व्हायला झालं!! :D
4 Jun 2012 - 9:01 am | प्रचेतस
मस्त फोटो.
आवडले.
4 Jun 2012 - 10:05 am | ५० फक्त
मस्त वर्णन, फोटो टाकायला का कंजुषी केली समजले नै.
4 Jun 2012 - 11:35 am | शिल्पा ब
छान. निसर्गाचेच फटु टाकत चला, ते छान आहेत.
मार्केट भारीच स्वच्छ दिसतंय.
4 Jun 2012 - 2:30 pm | स्मिता.
धबधब्याचे फोटो छान आहेत. निसर्गाचे आणखी जास्त आणि थोडे मोठे फोटो टाकले तर आवडतील. तसेच जे ठिकाण आहे त्याची थोडक्यात पर्यटन विषयक माहिती दिल्यास इतरांना त्याचा उपयोग होईल.
लोल! हे अगदी मस्त निरिक्षण बरं का. त्यांच्याबद्दल आमचा तर्क असा की त्यांना उगाच वाटत असतं की इथपर्यंत येणारे आपणच पहिले (संदर्भः बॅटमॅन यांचा प्रतिसाद) आणि मग जिकडे-तिकडे सगळे भारतीय पाहून मग त्यातल्या-त्यात आपला तोरा मिरवण्याचा प्रयत्न असावा.
4 Jun 2012 - 3:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दादा, अजून येऊ द्या. फोटो आणि वर्णन दोन्ही झकास.
-दिलीप बिरुटे
4 Jun 2012 - 4:49 pm | पियुशा
मस्त फोटु़ज :)
4 Jun 2012 - 6:30 pm | किलमाऊस्की
लेखन आवडलं :-)
4 Jun 2012 - 11:06 pm | अर्धवटराव
मस्त आलेत फोटु
अवांतरः इतक्या छान प्रवासवर्णनात भारतीयांच्या गोंधळ खड्यासारखा रुततो. ते तसं आहे हे तर जगजाहीर आहे... मग कशाला आपल्या आनंदात माती कालवा?
अर्धवटराव
5 Jun 2012 - 10:58 am | मृत्युन्जय
छान वर्णन. जर कधी इतर भारतीयांपासुन तोंडे लपवायला स्वित्झर्लंडला गेलो तर तुम्हाला नक्की व्य नि करेन :)
5 Jun 2012 - 10:58 am | मृत्युन्जय
छान वर्णन. जर कधी इतर भारतीयांपासुन तोंडे लपवायला स्वित्झर्लंडला गेलो तर तुम्हाला नक्की व्य नि करेन :)
6 Jun 2012 - 10:52 am | संजय क्षीरसागर
तुमची लेखनशैली प्रामाणिक आहे ती अत्यंत भावली, लिहित रहा. २. रोझ गार्डन (बाडेन-बाडेन) च्या प्रतिक्षेत!
6 Jun 2012 - 11:28 am | jaypal
फोटो नं. ३ व ४ आवडले
7 Jun 2012 - 2:15 am | बहुगुणी
हे ठिकाण नेमकं कुठे आहे ते जालावर शोधलं तर या दुव्यावर हे प्रकाशचित्र सापडलं, ही तीच जागा आहे का?
तीच जागा असेल तर त्या अरुंद पायर्यांच्या जिन्याने वर जातांना चढता-उतरतांना मस्त वाटलं असणार!
(तुम्ही 'सिंगेन'हून ट्रेन घेतली म्हणता तर तुम्ही जर्मनीतून या ठिकाणी गेलात का? तुमच्या पहिल्या वाक्यातील रोमच्या उल्लेखाने थोडं गोंधळायला झालं म्हणून विचारतोय.)
7 Jun 2012 - 12:46 pm | कुंदन
हाउप्टबानहोफ चा उल्लेख आहे म्हणजे फा फु ( जर्मनी) च असणार.
बाकी जाणकार मार्गदर्शन करतीलच.
7 Jun 2012 - 1:29 pm | दादा कोंडके
@मुक्त विहारि आणि अत्रुप्त आत्मा: धन्यवाद. पुढच्यावेळी आणखी फोटो टाकेन
@अभिजीत राजवाडे आणि बॅटमॅनः प्रतिसादासाठी धन्यवाद
@पैसा: :) धन्यवाद
@वल्ली: प्रतिसादासाठी धन्यवाद
@५० फक्तः धन्यवाद. पुढच्यावेळी कंजुषी करणार नाही. :)
@शिल्पा ब: धन्यवाद. इथली लोकं घराबाहेरील जग सुद्धा घरातल्या इतकच स्वच्छ ठेवतात. :)
@स्मिता: प्रतिसादासाठी धन्यवाद. पुढच्यावेळी पर्यटनविषयीपण माहिती द्यायचा प्रयत्न करतो. खरं आहे. मी पुर्वी भारतीय लोकं दिसली की त्यांच्याकडं बघून हसत असे. (स्माइल देत असे) पण खूपजणं 'ह्यात काय विशेष आम्ही नेहमीच येतो किंवा इथच रहातो' अशा नजरेनं बघत. तेंव्हापासून कानाला खडा. :)
@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे: प्रतिसादासाठी धन्यवाद
@पियुशा: धन्यवाद
@हेमांगीके: प्रतिसादासाठी आभार
@अर्धवटरावः धन्यवाद. 'हे आहे हे असं आहे' असं कित्येक वेळा मनाला समजावून सुद्धा मला प्रत्येकवेळी या गोष्टींचा एक भारतीय म्हणून त्रास होतो. :(
आपल्याकडं सगळ्यागोष्टींसाठी 'करा किंवा मरा' परिस्थिती असते पण इथं आल्यानंतरदेखिल माणसं असं का वागत असतील? एक उदाहरण म्हणजे, मी जिथं रहातो तिथल्या बस मध्ये कधीच गर्दी नसते. बसस्टॉप वर रांग अशी नसते, पण तिथं उभी असलेली लोकं क्रम लक्षात ठेवतात आणि बस आली की तशीच चढतात. ही गोष्ट माझ्याबरोबर असलेल्या एकाही भारतीयाच्या लक्षात येत नाही. प्रत्येकवेळी बस आली की पहिला घुसण्याची धडपड असते.
@मृत्युन्जयः धन्यवाद. जरूर.
@मृत्युन्जयः धन्यवाद. जरूर. :)
@संजय क्षीरसागरः प्रतिसादासाठी अनेक धन्यवाद
@जयपालः धन्यवाद
@बहुगुणी: बरोबर, ती हीच जागा आहे. हो. जिन्यावर गेल्ल्यावर छान वाटतं. अंगावर तुषार उडत असतात, पाण्याचा प्रचंड आवाज असतो आणि प्रवाह खवळलेला असला तर थोडीशी भितीपण वाटते. :)
हो मी जर्मनीतच पण फ्रान्स बॉर्डर वर रहातो. आणि "युरोप इज द साइझ ऑफ इस्टवूड मॉल, वी कॅन ऍक्च्युअली वॉक टू बर्लीन फ्रॉम देअर"* :)
*युरोट्रीपमधून साभार.
7 Jun 2012 - 4:46 pm | बिपिन कार्यकर्ते
भारी हो!
7 Jun 2012 - 5:44 pm | मदनबाण
चक्क "दादा"लिहते झाले,हे पाहुनशान लयं आनंद झाला बघा ! :)
बाकी फोटोतले दादा पाहुन त्यांच्या वया विषयी मी केलेला अंदाज पार चुकला च्यामारी ! ;)
9 Jul 2012 - 7:33 pm | निनाद मुक्काम प...
दादा मस्तच लिहले आहे. फोटो पण मस्त
तोंड चुकवणे प्रकार जबरा
माझे ह्यावर मत असे आहे. की मी जेव्हा २००१ साली पहिल्यांदा लंडन मध्ये आलो. तेव्हा ऑर्कुट नुकतेच वापरायला सुरुवात केली. म्हणजे २००३ मध्ये बहुदा पूर्वी तेथे गाडीत ,बस मध्ये जर मराठी आवाज नकळत कानावर पडला तर कान टवकारले जायचे. व जर व्यक्ती समोरच बसला असेल तर मग विचारपूस व्हायची. पहिले आडनाव मग काय करत आहे वगैरे अंदाज मग समोरील व्यक्ती आपल्याच साच्यातील असेल तर मग फोन नंबर ची देवाणघेवाण अश्या कितीतरी ओळखी मंडळात सुद्धा व्हायच्या. मात्र सोशल नेटवर्किंग मुळे आपण आपल्या आप्त व भारतातील मित्र मैत्रिणींशी सतत संपर्कात असल्यामुळे की काय अलीकडे असे प्रकार घडत नाहीत. असे मला वाटते.
पुलावरील फोटो इतर फोटो समवेत झकास
चेहरा नीट दिसला असला तर कधी फ्रेंच बोर्डर च्या आसपास फिरतांना तुम्हाला मी आणि मला तुम्ही दिसला तर तोंड न चुकवता आपली भेट होईल.
मागच्या वर्षी झालेल्या भारत वारीत मुंबई विमानतळावर एका व्यक्तीने तुम्ही निमुपज
आहात ना ? असे विचारून मला चकित केले. सदर इसम मिपा चा अनेक वर्ष मूक वाचक होता. ( मला ओळखणे त्याला अवघड गेले नसावे. )
व म्युनिक मध्ये राह्यला आल्यावर मिपाकर धुमाळे कुटुंबीयांनी माझ्याशी संपर्क साधला. ते मिपाकर दिनेश ह्यांचे जुने सहकारी होते हे मागाहून कळले.
मला व केट ला ओळखायला त्यांना अजिबात वेळ लागला नाही.
जगभरात सक्रीय मिपाकर व मुकवाचक आकाशात पसरलेल्या अगणित तार्यांसारखे पसरले आहेत.
व त्यांना आपण जर आपल्या लेखनासोबत फोटो टाकल्याने माहीत असू तर ते आपल्याशी नक्की संपर्क साधतात.
आता जर आपण मुंबईत आलो आणि एका मिपा कट्याला जायचे म्हटले तर
एखाद्या उपहारगृहात गेल्यावर मिपाकर आता दादा व मला लगेच ओळखतील.
असे मला वाटते
10 Jul 2012 - 12:30 am | खेडूत
झकास, अजून येऊ द्या.
(फ्युसेनजवळ चा नोये श्वानस्ताईन चुकवू नये असा आहे.)