संडे स्पेशल (खव्याच्या पोळ्या)

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
11 Jun 2008 - 4:27 pm

खव्याच्या पोळ्या
साहित्यः
१/२ किलो खवा
२ वाट्या कणिक, कणिक भाजायला ३ टे.स्पून तूप
२ मोठे चमचे खसखस
७-८ वेलदोड्याची पूड
४ वाट्या पिठीसाखर

४ वाट्या कणिक, १ चिमूट मीठ
१ वाटी मैदा
१ वाटी बारीक रवा
१२ टे.स्पून तेल
तांदुळाची पिठी

१.प्रथम कढईत खवा गुलाबी रंगावर भाजावा.
२.२ वाट्या कणिक तुपावर खमंग भाजावी.
३.खसखस भाजून कुटून घ्यावी.
४.वरील सर्व,पिठीसाखर,वेलदोडा पूड घालून चांगले मळावे.
५.कणिक, मैदा,बारीक रवा तेलाचे कडकडीत मोहन घालून भिजवणे,(फार घट्ट नको). २ तास कणिक भिजल्यावर मळून घ्यावी.
६.कणकेचा लिंबाएवढा गोळा घेऊन, हाताने वाटी करून त्यात तेवढाच खव्याच्या सारणाचा गोळा त्यात भरून तोंड बंद करावे.
७.तांदुळाच्या पिठीवर हलक्या हाताने पोळी लाटून तव्यावर मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजावी.

टीपः
१.गुळाच्या पोळीप्रमाणे केली तरी चालते.( दोन पार्‍या करून).
२.खवा मंद आचेवर भाजल्यावर कोमट असताना हाताने गाठी मोडून मळून घ्यावा. गार झाल्यावर खव्यात गाठी होतात.या गाठी मोडल्याच नाहीतर खवा पुरण यंत्रातून काढून घ्यावा. नाहीतर पोळी फुटते.
३.सारण भरपूर गोड हवे.
४.खव्याच्या सारणात कणिके ऐवजी तांदुळाची पिठी वापरतात.
४.वरील साहित्यात १८ ते २० पोळ्या मध्यम आकाराच्या होतात.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

11 Jun 2008 - 5:25 pm | विसोबा खेचर

७.तांदुळाच्या पिठीवर हलक्या हाताने पोळी लाटून तव्यावर मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजावी.

अहो स्वातीताई, का असा छळ मांडला आहात? अहो नुसती पाकृ वाचूनच जीवाला खूप त्रास झाला!

बाय द वे, आमची म्हातारीही या पोळ्या फार सुरेख करते बर्र का! आता सांगतोच तिला करायला...! :)

असो,

स्वातीताई, आपल्या उत्तमोत्तम पाकृंमुळे मिपा अधिकाधिक श्रीमंत व्हावे, हीच इच्छा! :)

तात्या.

गिरिजा's picture

11 Jun 2008 - 6:15 pm | गिरिजा

अहो स्वातीताई, का असा छळ मांडला आहात? अहो नुसती पाकृ वाचूनच जीवाला खूप त्रास झाला!

सहमत.. :P

--
गिरिजा..

लिहिण्याची हौसच लई... माझा ब्लॉग
-----------------------

अमोल केळकर's picture

11 Jun 2008 - 5:33 pm | अमोल केळकर

माझी आवडती डिश
याला काही ठिकाणी साटोरी पण म्हणतात का?

शितल's picture

11 Jun 2008 - 5:35 pm | शितल

स्वाती ताई तुमचे मनःपुर्वक आभार.
मला हवी असलेली पाककृती आपण मला सा॑गितलीत.
मला ह्या पोळ्या प्रच्॑ड आवडतात.
पण सध्या एक प्रश्न आहे इथे (अमेरिकेत )खवा मिळेल काय ? कि॑वा खवा मला घरी बनवता येईल काय.(असेल तर मला सा॑गा )

स्वाती राजेश's picture

11 Jun 2008 - 6:31 pm | स्वाती राजेश

मी घरी खवा बनवून पेढे केले होते पण पोळ्या काही केल्या नाहीत...
पण त्याची तुला रेसिपी देते, पण खूप वेळखाऊ काम आहे.
४ कप होलमिल्क दुध घे,मध्यम आचेवर सतत ढवळत राहा, पहिले १ तास ३-४ मिनिटाच्या अंतरावर ढ्वळ पण नंतर सतत ढवळत राहा. साधारण तीन तासांनी दुध घट्ट होऊन १ कप झाले कि, त्यात १ कप साखर टाकते.

रिकोस्टा चिज वापरून पण करतात असे कुठेतरी वाचले आहे आंतरजलावरच...:)मिळाले कि तुला शेअर करेन...:)

प्रभाकर पेठकर's picture

11 Jun 2008 - 6:45 pm | प्रभाकर पेठकर

मोठ्ठा तवा गरम करत ठेवायचा. डाव्या बाजूला 'डबल फॅट' दूध पातेल्यात घ्यायचे. उजव्या हातात कलथा तयार ठेवायचा. तवा व्यवस्थित तापला की छोट्या वाटीने एक वाटी दूध तव्यावर ओतायचे. उजव्या हातातील कलथ्याने ते भराभर परतून त्यातील पाण्याचा अंश काढून टाकायचा. दूध घट्ट झाले (पाणी आटून गेले)की कलथ्याने ते काढून घ्यायचे. पुन्हा दुसरी वाटी दूध तव्यावर ओतायचे. ही प्रक्रिया वापरून पातेल्यातील सर्व दूध संपवायचे. की झाला 'घरगुती खवा' तयार. काम त्रासाचे आहे. आणि इथे तयार खवा मिळत असल्यामुळे वरील प्रक्रिया घरी करून पाहिलेली नाही. (वाचलेली आहे.).

वरदा's picture

11 Jun 2008 - 7:30 pm | वरदा

करुन पाहिलाय घरी खवा करुन पोळ्या... आनोडाईज्ड नॉन स्टीक च्या कढईसारख्या मोठ्या पसरट भांड्यात केला की लवकर होईल आणि खाली लागणार नाही...तरीही सतत ढवळावा मात्र लागतोच....आणि पोळ्या करण्यासाठी चांगला सुकवावा लागतो ..मोदकांसाठी किंचित मऊ राहीला तरी चालतो.....
अगं तू न्यु जर्सीत येतेस ना शितल? ओक ट्री रोड वर सुखाडीया आहे (भवानी च्या बाजूचं हिल्टॉप जवळचं नाही) तिथे झक्कास मिळतो तयार खवा...

स्वाती मस्त रेसिपी मी सेम अश्शाच केल्या होत्या...सह्ही एकदम्....

रिकोस्टा चिज वापरून पण करतात असे कुठेतरी वाचले आहे आंतरजलावरच...:)
माझ्या मते हितगुज वर वाचलय्...पण एका मैत्रीणीने ट्राय केलं होतं चवीत खूप फरक पडतो....
(खवाभक्त) वरदा

स्वाती राजेश's picture

11 Jun 2008 - 5:47 pm | स्वाती राजेश

वरील कृती ही साटोरीची अर्धी रेसिपी आहे...
वरील प्रमाणे पोळ्या कराव्यात पण पो़ळीवर डाग पडू देऊ नये.
नंतर तुपामधे त्यापोळ्या तळाव्यात किंवा शॅलो फ्राय कराव्यात....
तळल्या तर जास्त दिवस टिकतात या साटोर्‍या...:)

स्वाती दिनेश's picture

11 Jun 2008 - 6:49 pm | स्वाती दिनेश

खव्याच्या पोळ्या मस्तच ग स्वाती..

चतुरंग's picture

11 Jun 2008 - 7:45 pm | चतुरंग

खव्याच्या पोळ्या खाऊन खूप दिवस झाले. आता योग कधी ते बघायला हवे!

(अवांतर - अहमदनगर हे उत्तम खव्यासाठी प्रसिद्ध आहे. कधी गेलात तर चितळे रोड विचारा - नवीपेठ आणी चितळे रोड ह्याच्या कॉर्नरला खव्याचे दुकान आहे (आत्ता नाव आठवत नाहीये). सकाळी ७.३० पासून सकाळी ११-११.३० वाजेपर्यंत मिळतो. त्यानंतर शक्यता कमी. खरपूस भाजलेल्या खव्याचा रंग किंचित तांबूस असतो. सुपारीएवढा खाऊन पहावा किंचित गोडुस, तुपट चव लागायला हवी.)

चतुरंग

मदनबाण's picture

11 Jun 2008 - 7:47 pm | मदनबाण

अरे व्वा... नुसता खवा खायलाच इतकी मजा येते तर खवापोळी खायला किती मजा येईल..... :)

(घरी खवा आणल्यावर आधी ताव मारणारा)
मदनबाण.....

जयवी's picture

15 Jun 2008 - 7:05 pm | जयवी

स्वाती.......मज्जा आली खव्याच्या पोळ्यांची रेसिपी वाचून. मला प्रचंड आवडतात. आयत्या खायला जास्त आवडतात ;)

शितल, आम्हाला आखातात पण खवा मिळत नाही गं...... म्हणून आम्ही एक उपाय शोधून काढलाय. इथे Nedo म्हणून Milk Powder मिळते. त्यात दूध घालून इडलीच्या पीठासारखं पातळ करायचं आणि मायक्रोवेव्ह ओव्हन मधे २-२ मिनिटं फ़िरवायचं. साधारण गोळा झाला मी बारीक किसणीनं किसून कढईत खमंग भाजून घ्यायचं...... मस्त खवा तयार होतो. आम्ही खव्याच्या करंज्या, मोदक वगैरे अशाच खव्याचे करतो पण अजून पोळ्या मात्र नाही करुन बघितल्या.