गेल्या आठवड्यात 'उत्सुकतेने मी झोपलो' वाचले.. आणि या प्रश्नाचा किडा डोक्यात वळवळू लागला.. तसा आधी पण हा प्रश्न पडायचा.. या वेळेस तो जास्त तीव्रतेने जाणवला म्हणून मांडतोय..
या पुस्तकाबद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकले होते.. पण शेवटची कथा सोडली तर बाकी पुस्तक दर्जाच्या बाबतीत ठीक ठीक देखील वाटले नाही.. मग प्रश्न पडला की इतक्या लोकांनी का त्याला नावाजले असेल ? की चार समीक्षकांनी चांगले म्हटले म्हणून बाकीचे म्हणत आहेत ?
बऱ्याच चित्रांच्या बाबतीत पण हीच गोष्ट, म. फी. हुसेन (अथवा तसाच कोणीही नावाजलेला चित्रकार) यांचे चित्र आहे हे सांगण्याची का गरज पडावी.. आणि मग त्याला कोट्यावधी रुपयांचे मूल्य कशाबद्दल ? मग मूल्य चित्राचे की चित्रकाराच्या नावाचे.. मग ती विकणारे, विकत घेणारे अथवा त्यावर भरभरून लिहिणारे 'कलेचे जाणकार' कसे म्हणावेत?
आमचा एक मित्र म्हणे की 'म. फी. हुसेन' यांनी कागदावर पानाची पिंक टाकली तरी तिला 'मॉडर्न आर्ट' म्हणून लोक करोडो रुपये देउन विकत घेतील आणि समीक्षक त्यात काय काय दिसते आहे ते जड जड शब्दात लिहीत बसतील.. मग याही बाबतीत जगाची दांभिकता जास्त वाटत नाही का ?
मी पिकासोची, Vincent van Gogh किंवा Renoir या सारख्या प्रसिद्ध चित्रकारांची प्रदर्शनातली चित्रे पहिली आहेत आणि तेव्हा देखील जरी हे अद्वितीय चित्रकार असले तरी काही चित्रे फक्त त्यांच्या नावावर तिथे येउन बसली आहेत असे वाटत राहते..
'काफ्का' सारखा ताकदीचा लेखक देखील ढीगभर भरकटलेला दिसतो बऱ्याच ठिकाणी.. तरीही त्याला 'अगम्य' असं तर्क विवेचन देत लोक justify करू लागतात तेव्हा ती आंधळी भक्तीच नाही का ठरत.. तेच मराठी लेखकांच्या (व कलाकारांच्या ) बाबतीत ही म्हणता येईल..
मग प्रश्न उठतो की एकदा चांगला कलाकार म्हटले की त्याच्या कलेला खराब म्हणणे हा फक्त निवडक समीक्षकांचा अधिकार उरतो का? मग उच्च अभिरुची आणि इतर असेही भेद हे लोक ठरवणार काय ?
इथे एक कथा समोर ठेवावीशी वाटते..
एकदा एका पुजाऱ्याने जाहीर केले की उद्या सकाळी देव स्वतः प्रकट होणार आहे मंदिरात.. पण अट एकच, फक्त पुण्यवान लोकांना तो दिसेल.. पापी लोकांना नाही..
मग काय दुसऱ्या दिवशी मंदिरात आलेल्या सगळ्याच लोकांना देव दिसला.. त्याचे पितांबर आणि मुकुट याच्या चर्चा सुरु झाल्या..
थोडक्यात काय तिथे सर्वच जण पुण्यवान ठरण्याची धडपड करत असल्यावर नसलेला देव पण दिसणार.. आणि ज्यांना नाही दिसला ते पापी ठरणार..
मग तसेच इथे जर एखादी कलाकृती चांगली नाही म्हटले तर 'अरसिक' ठरू, कलेच्या प्रांतातले अडाणी ठरू या भीतीपायी तर बऱ्याच कलाकृतींना hype केले जात नसेल काय ?
या क्षेत्रातही मग देव, काही बडवे आणि मग स्वतंत्र विचाराना बंधने (अप्रत्यक्षपणे अर्थात! ) अशी व्यवस्थाच होतेय नाही का?
कदाचित मला चर्चा विषय नीट मांडता आला नसेल.. जे मनात आलेय ते लिहिले आहे..परंतु भावार्थ घ्यावा..
प्रतिक्रिया
13 Feb 2012 - 12:03 am | चेतनकुलकर्णी_85
आमचा एक मित्र म्हणे की 'म. फी. हुसेन' यांनी कागदावर पानाची पिंक टाकली तरी तिला 'मॉडर्न आर्ट' म्हणून लोक करोडो रुपये देउन आणि समीक्षक त्यात काय काय दिसते आहे ते जड जड शब्दात लिहीत बसतील..विकत घेतील
+++१०००००००००००० % सहमत
हे सोडून बाकीचे काहीच नाही कळले बघा... :D
13 Feb 2012 - 12:43 am | अस्वस्थामा
हेच म्हणायचे आहे.. लोक हुच्च अभिरुची म्हणतात तो दांभिकपणा फार वाटतो.. 'उत्सुकतेने मी झोपलो' हे पुस्तक वाचल्यावर पण अशीच भावना झाली ती इथे मांडली आहे..
13 Feb 2012 - 12:12 am | ५० फक्त
एक मराठी खेडवळ पद्धतीचं जेवण शहरी पद्धतीनं देणारं हाटेल आहे, धायरी जवळ पुण्यात, हल्ली तिथं एक मॉल अन सिनेमा थिटेर पण झालं आहे.
कधी जायचं बोला ?
13 Feb 2012 - 8:34 am | प्रचेतस
कधीपण. आपण तयार आहोत.
13 Feb 2012 - 9:59 am | पक पक पक
ओ ५० फक्त राव ते हुरड्याचा सिझन संपला काय..?नसेल तर लवकर ठरवा मि पण येइन...
13 Feb 2012 - 12:34 pm | ५० फक्त
तोफेच्या तोंडी जायची तयारी असेल तर हुरडा खायला मिळेल अशी शक्यता आहे.
13 Feb 2012 - 1:10 pm | पक पक पक
नगरी 'मुलुखमैदान' तर मागेच शांत झालि ना....? ;) कि आजुन फुत्कार चालुच आहेत..? :)
13 Feb 2012 - 12:45 am | दादा कोंडके
मस्त धागा.
मॉडर्न आर्ट आणि फोटोग्राफी बद्दल माझी टोकाची मतं आहेत आणि मी चारचौघात मांडायला बिचकत नाही.
एका प्रोफेशनल फोटोग्राफरनं आणि माझ्यासारख्या फोटोग्राफीमधलं _ट कळत नसलेल्या माणसानं काढलेल्या फोटोमधला फरक कळत नसेल तर काय उपयोग? मॉडर्न चित्रकलेची पण तीच गत.
13 Feb 2012 - 10:03 am | पक पक पक
आपल्याला आवडेल ते उच्च अभिरुचिचे आहे असे समजतो आम्ही.... ;)
13 Feb 2012 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार
'अस्वस्थामा' म्हणजेच देशमुख साहेब आहेत काय ? कारण हे लेखन त्यांच्या ब्लॉगवरती आधी वाचलेले आहे.
बाकी अभिरुची म्हणजे 'खूप पूर्वी काही मिपाकर हळदी-कुंकू करायचे ती जागा' म्हणून आम्हाला माहिती आहे.
13 Feb 2012 - 4:20 pm | अस्वस्थामा
माननीय परा साहेब..!! ठार उडालो आम्ही.. मान्य आहे, आमच्या ब्लॉग वर आम्ही हे टाकले आहे.. मी इथे नवीन आहे.. आणि परंतु ते बऱ्यापैकी अप्रसिद्ध आणि व्यक्तिगत ठिकाण आहे असा आमचा समज आहे.. (आणि फक्त आम्ही तिथे भेट देतो.. ! ) पहिल्याच फटक्यात तुम्ही आम्हाला (सार्वजनिकरीत्या) उघडे पाडलेत राव..
u r great..!! तुमच्या पंख्यानच्या लिष्टमध्ये आमची भर....!! :)
13 Feb 2012 - 4:24 pm | परिकथेतील राजकुमार
असे काय नाय हो.
इकडे मिपावरती कितीही उपदव्याप केले, तेजोभंग केले तरी चांगले लिखाण आम्ही शोधून शोधून वाचतो हे नक्की. :)
सदस्यांच्या संख्येवरती जौ नका. सदस्यत्व न घेता देखील आमच्यासारखे अनेक वाचक असणार हे नक्की.
13 Feb 2012 - 4:58 pm | अस्वस्थामा
धन्यवाद परा साहेब .. पण आता लपायला नवा आय डी शोधावा लागणार असे दिसतेय.... :)
14 Feb 2012 - 1:25 am | Nile
लिंक दे! मेल्या आम्हाला कशाला शोधायला लावतोस?
14 Feb 2012 - 4:34 am | बहुगुणी
अलकेमिस्ट
14 Feb 2012 - 5:37 am | Nile
धन्यवाद. दुवा शोधला हो, पण पर्याला जरा वळण लावत होतो. ;-)
13 Feb 2012 - 12:06 pm | कॉमन मॅन
हे आवडले..! :)
13 Feb 2012 - 12:08 pm | नगरीनिरंजन
नुकतीच एक गोष्ट वाचून असेच विचार मनात आले होते.
वॉशिंग्टन मध्ये एका दिवशी एक प्रयोग करण्यात आला. एका मेट्रो स्टेशन वर एक माणूस व्हायोलिन वाजवत होता. येणारे जाणारे त्याच्याकडे पाहायचे आणि आपापल्या कामाला लागायचे. कोणीही एक मिनिटभरापेक्षा जास्तवेळ त्याच्या समोर उभे राहिले नाही. त्याच्यासमोर काही लोकांनी पैसे मात्र टाकले. बराचवेळ वाजवल्यावर त्याच्या समोर साधारण ३२ डॉलर्स जमले.
हा व्हायोलिन वादक कोणी साधासुधा नसून ग्रॅमी अॅवॉर्ड जिंकणारा जोशुआ बेल हा संगीतकार होता ज्याच्या कॉन्सर्टमध्ये कमीतकमी तिकीट बहुधा १०० डॉलर्सचे असेल.
उद्या जर कोणी उलटा प्रयोग केला आणि स्टेशनवरच्या भिकार्याला चांगले कपडे घालून भव्य स्टेजवर वाजवायला लावले आणि योग्य ती प्रसिद्धी करवली तर लोक शेकडो डॉलर्सचे तिकीट काढून येतील यात काय संशय?
13 Feb 2012 - 8:09 pm | शुचि
आई शप्पत काय काय नामी प्रयोग करतात हे लोक :)
13 Feb 2012 - 9:34 pm | मराठे
पीबीएस वर बघितलंय हे. थोड्या वेळानंतर एक बाई तिथे येऊन त्याला ओळखते (कारण आदल्या दिवशीच त्याचा प्रोग्रॅम तिने पाहिलेला असतो) आणि 'अरेरे काय ही वेळ आली' असं म्हणून त्याच्या थाळीत वीस डॉलर टाकते. (नंतर ते तिला परत केले जातात).
13 Feb 2012 - 1:16 pm | गवि
मा. श्री. गायतोंडे यांची चित्रं त्यांच्या मरणोत्तर कोटींच्या किंमतीला घेतली गेली आहेत. त्यातील एक पावणेसहा कोटीला गेलं आहे.
निम्ननिर्दिष्ट चित्र (पेंटिंग) श्री. गायतोंडे यांनी काढलेलं आहे.
या खालील पर्टिक्युलर चित्राची मत मला नेमकी माहीत नाही पण कोटींमधेच आहे. लाखात नव्हे हे नक्की. त्यांच्या कलाकारीविषयी माझ्यासारख्या सरळ रेष न काढता येणार्याने आणि तेही त्यांच्या मरणोत्तर बोलणं अनुचित ठरतं म्हणून अधिक बोलत नाही. पण तुम्हापैकी कोणाला यात कोटीकोटींची काही खास बात समजली असल्यास प्लीज सांगा.
13 Feb 2012 - 4:18 pm | Maharani
आहो हा कागद खराब झाला आहे..चित्र स्पष्ट दिसत नाहिये! १९२४ मधे काढलेले असावे...काळाच्या ओघात होते असे ............................................................................................................................................... [यात कुणाचा अपमान करायचा हेतु नाही...मी जाणकार नसल्या कारणाने माझ्या सामान्य डोळ्यांना जे दिसले ते लिहीले...कॄपया जाणकारांनी explain करावे जेणेकरून अम्हा सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर पडेल ]
13 Feb 2012 - 5:17 pm | गवि
जन्मत :च.. वयाच्या शून्याव्या वर्षी??
मग कौतुकास्पद आहे खरं....
( मला वाटलं होतं की त्यांनी पेंटिंग्ज काढताना ब्रश पुसायला / टिपायला फडक्या ऐवजी हा कॅनव्हास ठेवला असावा.. मग नंतर पेंटिंग समजून तो प्रसिद्ध झाला असणार.. )
13 Feb 2012 - 5:29 pm | वपाडाव
मला वाटायचं की अम्रिकनच ***० असतात... असो गैरसमज दुर केल्याबद्दल धन्स...
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी खवत भेटा... ;)
13 Feb 2012 - 2:20 pm | नंदन
मलाही ननिंनी उल्लेख केलेला प्रयोग आठवला होता. ह्या संदर्भात हा दुवाही रोचक ठरावा - http://www.npr.org/blogs/13.7/2012/02/10/146645622/why-we-like-what-we-like
13 Feb 2012 - 11:00 pm | पैसा
या विषयावर काही मत असण्याएवढी "हुच्च" मी अजून झालेली नाही! पण एक सामान्यज्ञान म्हणून इतकंच म्हणते की आजचा बंडखोर, उद्याचा प्रस्थापित! आणि आजच्या लोकप्रिय कलाकाराला शिव्या दिल्या की तुम्ही हुच्चभ्रू, अभिरुचीपूर्ण झालाच पाहिजेत!
त्याचवेळी बर्याच चित्रांबद्दल यात ग्रेट काय आहे हे मला कळत नाही हेही खरंच!
13 Feb 2012 - 11:55 pm | बिपिन कार्यकर्ते
विषय ऑलमोस्ट नीट मांडलाय की! काहीच गडबड नाही. तुम्हाला नक्की काय म्हणायचंय / विचारायचंय ते पोचतंय वाचकांपर्यंत, म्हणजेच सक्सेसफुल.
अभिरूची वगैरे बद्दल जास्त कळत नाही ब्वॉ आपल्याला. पण अभिरूची ही अशी डिफाइन करता येईल याबद्दल मी साशंक आहे. या गोष्टी खूपच सापेक्ष असतात. व्यक्तिसापेक्ष तर असतातच, पण त्यापेक्षाही जास्त एकाच व्यक्तिच्या जीवनप्रवासात त्या बदलूही शकतात. एखादी गोष्ट पूर्वी आवडली ती आज आवडेलच असं नाही. माणूस जसजसा अनुभव घेत जातो, संपन्न होत जातो... आणि मुख्य म्हणजे त्या अनुभवांकडे डोळसपणे बघून त्यातून काही काही गाठीस बांधत जातो तसतशी रुची / अभिरूची इत्यादी बदलत जाऊ शकते. नव्हे ती बदलणे अपरिहार्यच ठरते.
आणि कोणाला काय आवडेल / काय आवडावं यावर सर्वस्वी त्याच व्यक्तीचा अधिकार आहे. मला स्वतःला काही गोष्टी पूर्वी समजत नव्हत्या (म्हणून आवडत नव्हत्या). पण प्रयत्नपूर्वक काही गोष्टी समजून घेतल्या आणि किंचित कळायलाही लागल्या. आता त्याच गोष्टी मला आवडत नाहीत असं म्हणवणार नाही मला... अॅट लीस्ट पूर्वी इतक्या ठामपणे मी त्या गोष्टींना belittle नाही करणार.
14 Feb 2012 - 9:46 am | सोत्रि
अगदी,
शब्दाशब्दाशी सहमत !
- (काळाच्या ओघात अभिरूची बदलत गेलेला) सोकाजी
14 Feb 2012 - 10:45 pm | जाई.
+१
संपूर्ण पणे सहमत
14 Feb 2012 - 10:22 pm | मराठी_माणूस
वर उल्लेख केलेल्या बर्याच चित्रकांरा पैकी रस्त्यावर अत्यंत तुट्पुंज्या साहित्याच्या आधारे चित्र काढणारे ग्रेट वाटतात.
15 Feb 2012 - 12:40 am | धनंजय
नाही आवडले, तर नाही आवडले म्हणावे. सोडून द्यावे.
वेगवेगळ्या लोकांची रुची वेगवेगळी असते खरी.
(बिपिन कार्यकर्ते यांनी लिहिल्याप्रमाणेच...)
आता हेसुद्धा खरे की वय वाढत आहे, अनुभव वाढत आहेत, तशी माझी रुची बदलत गेलेली आहे. अगदी खाण्यापिण्यातसुद्धा. मला लहानपणी कांदा मुळीच आवडत नसे. आता आवडतो. लहानपणी नुसती साखर चमचा-चमचा मी खात असे - आवडीने. अजून नुसती साखर खाऊ शकतो, पण अगदी आवडीने नाही.
ही रुची बदलल्याबाबत काहीतरी समाधान वाटते. आदल्या रुचीपेक्षा हीच हवी, असे वाटते.
हीच बाब काही पुस्तकांबाबत आहे. तरुणपणी न-आवडली असती अशी काही पुस्तके मला आता आवडतात. गुंताड्या-असमाधानकारक, कोणाचे-चूक-ते-नीट-कळून-न-येणार्या, शेवटी सुद्धा टांगून राहिलेल्या प्रेमकथा मला आजकाल वाचायला आवडतात. तरुणपणी अशा कथा आवडल्याचे मला आठवत नाही.
अशा प्रकारच्या अनुभवामुळे बदलणार्या रुचीला मी "अभिरुची" म्हणतो. पटले तर बघा.
- - -
थुंकण्याचे काय घ्या, अँडी वॉरहॉल या चित्रकाराने धातुमय रंगांच्या कॅनव्हासवर मुतून बनवलेल्या "ऑक्सिडेशन" चित्रांची मालिका प्रसिद्ध आहे. या चित्रांपैकी काही मी बघितलेली आहेत. चित्रे चांगली वाटली. (विकत घेण्याइतकी नाही. परवडली असती तरी.*)
- - -
*किंमत : चित्रांची किंमत आणि अभिरुचीचा संबंध थेट नसून आडवळणी आहे. किंमत ठरवते, ती बाजारपेठ. येथे पैसे नसलेल्या रसिकाच्या आवडी-नावडीने फरक पडत नाही. समीक्षकांच्या आवडी-निवडीचा परिणामही पूर्ण नसतो. काही थोडे श्रीमंत संग्राहक लिलावात किंमत कमी-जास्त करू शकतात.
- - -
> (कोणीही नावाजलेला चित्रकार) यांचे चित्र आहे हे सांगण्याची का गरज पडावी..
याबाबत एक कारण आहे - ते चित्र त्या चित्रकाराच्या अन्य चित्रांच्या संदर्भात बघितले तर पुष्कळदा काही अधिक समजून येते. हीच बाब पुस्तकांबाबत.
15 Feb 2012 - 6:34 pm | चिंतातुर जंतू
अगदी सहमत. आजकाल बाजारपेठेचा प्रभाव फार जास्त झाला आहे आणि त्यामुळे लोकांना अभिरुचीसारख्या विषयात बाजारभावाला इतकं महत्त्व द्यावंसं वाटत असावं.
अशा पद्धतीच्या लिखाणाला मराठी आंतरजालावर जितकं उचललं जातं ते पाहता या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं ठामपणे देता येईल. एखादी रसिकमान्य कलाकृती आपल्याला आवडली नाही हे (आणि एवढंच) परस्परांना अहमहमिकेनं सांगण्याऐवजी ती न आवडण्यामागचं कारण काय हे शोधून काढण्याचा प्रयत्न करणं कधीकधी अधिक रोचक ठरतं असा व्यक्तिगत अनुभव मात्र आहे. त्या विशिष्ट कलाकृतीविषयीची आणि एकंदर समज वाढण्याची शक्यता अशा (नावडीमागचं मूळ शोधण्याच्या) कृतीत असते, पण 'अमुक लेखक/चित्रकार कसा हुच्चभ्रू लोकांना(च) आवडतो आणि आपल्याला काही कळत नसेलही ब्वॉ पण त्यातच आपण कसे आनंदी आहोत' हे समविचारी लोकांना आग्रहानं सांगत राहिल्यामुळे केवळ किंचित क्षणिक आनंद सोडता फार काही हाती लागत नाही असं वाटतं.
असो. जो जे वांछील तो ते लाहो.
16 Mar 2016 - 5:42 pm | मन१
http://www.dailymail.co.uk/news/article-2677048/Britains-expensive-bed-T...
.
.
ही बातमी वाचली अशातच.
29 Mar 2016 - 2:54 pm | अस्वस्थामा
एग्जॅक्टली.. :))
30 Mar 2016 - 5:39 pm | सोनुली
काही चित्रातून चित्रकाराला विशेष आशय व्यक्त करायचा असतो. चित्रकलेतले जाणकार याबाबत मार्गदर्शन करू शकतात.