'मखमलाबाद'स्पेशल मिसळ

प्रास's picture
प्रास in भटकंती
31 Jan 2012 - 11:23 am

आम्ही ज्यांना आमचे आंतरजालिय मित्र मानतो, त्या श्रीमान् पाषाणभेद उर्फ दगडफोड्या यांनी मिसळपाववर कोणत्यातरी धाग्यात प्रतिसादादरम्यान मखमलाबादच्या स्वादिष्ट मिसळीचा उल्लेख केलेला होता, तो आमच्या जन्मजात खादाडी वृत्तीमुळे कुठेतरी डोक्यात फिट्ट झालेला. त्यामुळेच की काय, आत्ताच्या २६ जानेवारीला कामानिमित्त नाशिकच्या पेठ रस्त्यावरून जाताना मखमलाबाद फाटा आणि मखमलाबादची दिशादर्शक खूण दिसताच त्या मिसळीच्या उल्लेखाने उचल खाल्ली आणि नकळतच आम्ही त्या दिशेने वळलो. दुपारच्या जेवणाची वेळ झाली नव्हती पण मिसळ खायला वेळेचं बंधन थोडीच असतंय?

पेठ रस्त्यावरच्या मखमलाबाद फाट्यावरून साधारण २ - ३ किलोमीटरवर मखमलाबाद गाव आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त गावात खूप गजबज होती. जागोजागी पांढर्‍या गणवेशातले विद्यार्थी होतेच पण त्याबरोबरच मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही झुंबड होती. मखमलाबादमध्ये शाळा, ज्युनिअर कॉलेज असल्याने झेंडावंदनाचा कार्यक्रम नुकताच पार पडलेला होता आणि बहुतेक म्हणूनच अनेकांनी आपला मोर्चा 'हॉटेल सुदर्शन'कडे वळवलेला. किमान १५ - २० मिनिटांचं वेटिंग होतं.

रामभाऊ पिंगळ्यांच्या घरातच त्यांचं 'हॉटेल सुदर्शन' आहे आणि त्यांच्या पत्नी आणि मुलांसह ते सगळी व्यवस्था बघतात. पडवीमध्ये त्यांनी टेबलं टाकली आहेत आणि बाहेरच्या खोलीतही. जागा कमी पडू लागली तर आतल्या खोलीमध्ये भारतीय बैठकीत मिसळ-पार्टी रंगते. त्र्यंबक रोडवरून पेठ रोडकडे येणार्‍या जोड-रस्त्यावर मखमलाबाद आहे. हा जोड-रस्ता अनेकांच्या मॉर्निंग वॉकचा नेहमीचा मार्ग आहे. मग वॉकत, आपलं चालत, मखमलाबादपर्यंत आल्यावर भूक लागल्याने सकाळी सकाळी रामभाऊंची मिसळ 'मस्ट' होऊन जाते असं सांगून वेटिंग दरम्यान भेटलेल्या (आणि बहुदा स्वतःही तसंच करणार्‍या) रोजच्या मॉर्निंग वॉकराने माझ्या ज्ञानात भर घातली.

रामभाऊंचा अंदाज पक्का होता आणि साधारण २०व्या मिनिटाला मला टेबल मिळालं. भरपूर गर्दी असल्याने मिसळ समोर यायला आणखी थोडा उशीर झाला पण जेव्हा ती समोर आली तेव्हा डोळ्यांची भूक मात्र लगेच भागली. मिसळ, कांदा-कोशिंबीर, गरम गरम कट (रस्सा), पाव आणि तळलेले पापड असा सगळा जामानिमा एकसाथच रामभाऊंच्या मुलाने माझ्यापुढे ठेवला.

मिसळ चवीला छान होती. ना जास्त तिखट, ना अतिमसालेदार. सगळं कसं आवश्यक तेवढंच. मला आवडली. नाशिकच्या सकाळच्या थंडीत मिसळीवर गरम गरम कट घेऊन खाणं हे काय सुख असतं ते फक्त तसं खाणार्‍यालाच कळेल. आपण तर बाबा त्यावेळी दोन मिसळींसोबत ६ - ८ पाव आणि फोटोत दिसतोय तो अख्खा मग भरून कटाचा फडशा पाडला.

जाता-येता जेव्हा शक्य होईल तेव्हा रामभाऊंच्या हॉटेल सुदर्शनची मखमलाबाद स्पेशल मिसळ आपण नक्की रेकमन्ड करू!

प्रतिक्रिया

आहाहा...जबरी फक्कड मिसळ दिसतेय रे भाऊ..

या जळजळीला पूरक अधिक सूड अशा दुहेरी उद्देशाने अशी आमच्या भटकंतीसंग्रहातील एका मिसळीचे छायाचित्र इथे डकवीत आहे..

दूरशेत फॉरेस्ट लॉज..

प्रचेतस's picture

31 Jan 2012 - 12:25 pm | प्रचेतस

मस्त हो प्रासभौ.
मखमलाबादेची मिसळ खूप पूर्वी खाल्ली होती. पण चव एकदम झकास.
नाशिकची पंचवटीजवळची काळा रश्श्याची अंबिका मिसळ पण एकदम झकास. पाथर्डी फाट्यालगतच्या 'गारवा'ची मिसळ पण एकदम मस्त आहे.

मी-सौरभ's picture

31 Jan 2012 - 12:41 pm | मी-सौरभ

आता एवढ्यासाठी मखमलाबाद ला जायला पाहिजेच...

प्रचेतस's picture

31 Jan 2012 - 12:42 pm | प्रचेतस

त्याआधी इथे काटाकिर्रला तर जाउन येऊ.

वेगळी आणि काटा किर्र पेक्षा चांगली असते तिथली मिसळ

मोहनराव's picture

1 Feb 2012 - 6:26 pm | मोहनराव

मुनीजी तुम्हीच लिहा बरं!!

गवि's picture

31 Jan 2012 - 12:43 pm | गवि

नाशिकच्या कोंडाजी चिवडेवाल्यांच्या मखमली चिवड्याचा या मिसळीशी काही संबंध आहे काय?? मखमली चिवडा झक्कास असतो एकदम.. परतलेला कांदा वगैरे असतो कुरकुरीत..

प्रास's picture

31 Jan 2012 - 2:02 pm | प्रास

नाशिकच्या कोंडाजी चिवडेवाल्यांच्या मखमली चिवड्याचा या मिसळीशी काही संबंध आहे काय??

नाय बा. कोंडाजींच्या जन्माआधीपासूनचं हे गाव आहे तेव्हा तसा काही संबंध नसावा.

बाकी कोंडाजींच्या चिवड्याबाबत तंतोतंत सहमती आहे.... :-)

गणप्याच्या धाग्यावर मिळणारी मिसळ आठवली. ;)

आम्ही बी बदला घेनार. ;)

प्रास's picture

31 Jan 2012 - 2:01 pm | प्रास

तुम्ही आम्हाला खायला घाला तुमची ही असली पापं नि आम्ही तुम्ही केलेल्या त्या पापाचा बघा कसा फडशा पाडणार ते.... ;-)

(खातपापेश्वर) प्रास

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Jan 2012 - 12:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे

प्रास भाऊ, हे असे फोटो टाकून अन्याय करता आहात. मला आत्ता मिसळ पाहिजेच. आज रात्री प्रकाश चे नक्की करायचे का ? :-)

प्रास's picture

31 Jan 2012 - 1:58 pm | प्रास

नेकी और पूछ पूछ?

'मिसळ' के लिये हम हमेशा तैय्यार रैते हैं..... :-D

दादरास उतरल्या उतरल्या फोनवा..... :-)

यकु's picture

31 Jan 2012 - 12:55 pm | यकु

मखमलाबाद! व्वा प्रासशेठ.
राळेगण फाट्याच्या जवळपास नगर-पुणे हायवेवर एक नवनाथांचं मंदीर आहे. त्याच्या शेजारी असलेल्या हॉटेलमध्‍ये पण भारी मिसळ मिळते.

उदय के'सागर's picture

31 Jan 2012 - 1:22 pm | उदय के'सागर

व्वा व्वा... अता नाशिकला जाईन तेव्हा "सुदर्शन" जाणे हे "टू डु" मधे सगळ्यात वरती :)

बाकि "शामसुदंर (सातपुर)", "विहार(गंगापुर रोड)", "तुषार(कॉलेज रोड)" ह्या ठिकाणच्या मिसळहि फाफार छान असतात, विशेष म्हणजे तुम्हि लिहिल्या प्रमाणे "ना जास्त तिखट, ना अतिमसालेदार" अश्या असतात. :) ... त्यातल्या त्यात शामसुदंर ला मिसळिसोबत मिळणारे पाव हे हि खुप मस्तं / फ्रेश/ टम्म फुगलेले मोठे असतात - असं वाटतं अत्ताच ताजे ताजे बेकरीच्या भट्टीतुन आणले आहेत.

(कोल्हापुर नंतर मिसळच्या(तर्रि वाल्या) बाबतित नाशिकचाच नंबर असावा असे म्हणणे वावगे ठरु नये)...

होय.
शामसुंदरचे पाव एकदम भारी असतात शिवाय ते तेलात किंचित परतलेले असतात त्यामुळे काहीसा खरपूसपणा येऊन एकदम खुसखुशित लागतात.

कॉमन मॅन's picture

31 Jan 2012 - 1:46 pm | कॉमन मॅन

छानच..

प्रभाकर पेठकर's picture

31 Jan 2012 - 2:02 pm | प्रभाकर पेठकर

मखमलाबाद, पंचवटी, पाथर्डी, काटाकिर्रर्रर्रर्र, राळेगणफाटा (नीट वाचा, गैरसमज नकोत), सातपुरे, गंगापूर रोड, कॉलेज रोड.. अशी, नामवंत मिसळीची कितिक ठिकाणे नव्याने समजली.

मिसळीसाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा.

स्मिता.'s picture

31 Jan 2012 - 2:06 pm | स्मिता.

का असे फोटो आणि वर्णनं देवून आम्हाला जळवता??
मला आत्ताच्या आत्ता मिसळ हवीये....

मखमलाबाद हे नाशिक शहरातील 'एक गाव' आहे. सांगतो.

मोठ्या शहरांत लहान लहान गावे समाविष्ट होत असतात, त्याच प्रकारे मखमलाबाद हे गाव नाशिक शहरात समाविष्ट झालेले आहे. जरी ते आता कागदोपत्री शहरात आलेले असले तरी त्या गावाचा तोंडवळा एखाद्या टुमदार खेड्यासारखा अजूनही आहे. माझे हे आवडते गाव आहे. (तेथे एक तवली टेकडी येथे एक प्लॉटही घेतलेला असल्यामुळे ते माझे गाव झाले आहे.)
तवली टेकडी (तवली हिल म्हणतात बिल्डर लोकं!) येथे महादेवाचे मंदीर आहे. श्रावणात नागपंचमीच्या दिवशी मखमलाबाद मध्ये यात्रा भरते. तिला शहरीपणा नसून टिपीकल ग्रामिण टच असतो. अजूनही या गावाच्या आसपास भरपुर शेतीवाडी पिकते. गोदावरीने येथील जमीन समृध्द केली असल्याने द्राक्ष, उसमळेवाले बागाईतदार येथे आहेत. गावाची शाळा- शिवाजी हायस्कूल (मराठी माध्यम बरं का) -चांगली आहे. या गावाला पेहेलवानकीचा शौक असून गावातून कुस्तीगीर बाहेर पडतात. यात्रेमध्ये मातीतल्या कुस्त्या खेळल्या जातात. गावात दोन एक मित्र आहेत पण मला शहरीकरणाचा वास लागल्याने भेट होत नाही की तेथे जाणे होते नाही. एकुणच ज्याला ग्रामिण भागाचा आस्वाद घेणे आवडते त्याला हे गाव आवडेलच.

अजूनही मात्र मी 'हॉटेल सुदर्शन' ची मिसळ चाखलेली नाही. हा लेख वाचून आता तोंडाला पाणी सुटले आहे. आता तेथे जावेच लागेल. प्रासभाउंचे लेख टाकल्यामुळे आभार.

जय हिंद जय महाराष्ट्र.

प्रास's picture

31 Jan 2012 - 8:05 pm | प्रास

पाभे, म्हणजे 'मखमलाबाद' स्पेशल मिसळ 'हॉटेल सुदर्शन'खेरिजही आणखी कुठे मिळते की काय?

कृपया खुलासा करावा म्हणजे पुन्हा वाट वाकडी करून मुख्यतः मिसळ हादडण्यासाठी निमित्त बरं ;-)

चेतनकुलकर्णी_85's picture

31 Jan 2012 - 7:21 pm | चेतनकुलकर्णी_85

काय राव... मिसळी बरोबर पाव भाजी चा ब्रेंड देणे हा भारतीय तिरंगा उलटा लावण्या सारखा अपमान आहे ..

मिसळी बरोबर "पाठीचा"पाव लागणारा मिसळ प्रेमी... :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Jan 2012 - 7:54 pm | विश्वनाथ मेहेंदळे

काय राव... मिसळी बरोबर पाव भाजी चा ब्रेंड देणे हा भारतीय तिरंगा उलटा लावण्या सारखा अपमान आहे ..

मग मुंबईत चुकूनही मिसळ खाऊ नका. मुंबईत तोच ब्रेंड(??) देतात नेहमी. आणि आम्हीही तो अपमान न मानता खातो गपचूप. तुम्ही कुठचे म्हणायचे ??

बाय द वे, मिपाच्या मुखपृष्ठावर हाच पाव लावला आहे ;-)

प्रभाकर पेठकर's picture

1 Feb 2012 - 7:00 pm | प्रभाकर पेठकर

मिसळ पाव बरोबर 'पाव' हाच अपेक्षित असतो. खास देशी प्रकार (कोणे एके काळी पिठ पायाने मळून करायचे म्हणून 'पाव').
'स्लाईस' हा ब्रेडचा प्रकार सँडविच साठी वापरावा/वापरतात.

मिसळपाव, वडापाव, पावभाजी, मटणपाव ह्या सर्व प्रकारात 'पाव' आणि 'पाव'च वापरतात.
अन्यथा त्या पदार्थांना 'मिसळस्लाईस', 'वडास्लाईस', 'स्लाईसभाजी', 'मटणस्लाईस' असे म्हणावे लागेल.

बर्गरसाठी वापरायचा तो 'बर्गर ब्रेड' किंवा 'रोल'. सर्वसाधारणपणे, तो तीळ लावलेला असतो. पण बिनतिळाचाही चालतो. पण, स्लाईसमध्ये बर्गर बनवितात का? नाही. त्याला बर्गर ब्रेड किंवा रोलच पाहिजे.

सगळे पावाचेच (मराठीत) किंवा ब्रेडचेच (इंग्रजीत) प्रकार परंतु कुठल्या पाककृतीसाठी काय वापरायचे ह्याचे काही सर्वमान्य नियम आहेत त्यानुसार त्यांचा वापर होतो आणि त्यानुसार पदर्थांना नांवे पडली आहेत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Feb 2012 - 8:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे

चला, व्यावसायिकांचे मत आमच्या बाजूला आहे. व्वा व्वा !!!! ;-)

नावाचे राहू देत आणि परम्परेचेही राहू देत. मला स्वतःला वरील सर्व प्रकारात पावच आवडतो. मिसळपाव, पावभाजी, मटणपाव आणि खिमापाव हे सर्व दोन्ही प्रकारच्या पावाबरोबर खाल्ले आहे. मला व्यक्तिश: पाव जास्ती आवडतो. शेवटी ज्याला जे आवडेल ते त्याने खावे, ते परंपरेत नाही बसले तर चालेल की.

खाद्य परम्परेवरून आठवले, पिडां काका दिसत नाहीत हल्ली. त्यांचे या विषयावरचे मत जाऊन घ्यायला आवडेल.

प्रभाकर पेठकर's picture

2 Feb 2012 - 1:56 am | प्रभाकर पेठकर

ज्याला जे आवडेल ते त्याने खावे, ते परंपरेत नाही बसले तर चालेल की.

ते तर खरेच आहे. आवड ज्याची त्याची.
तसेही, मिसळी सोबत पोळी, तंदुर, रोटी, नान, अप्पम, दावणगीरी डोसा काहिही खावे मिसळीच्या स्वाद सौंदर्यात उणेपणा येत नाही.

रेवती's picture

1 Feb 2012 - 9:07 pm | रेवती

पिठ पायाने मळून करायचे
ईईईईई....
आता पाव खाताना हे आठवायला नको.

पैसा's picture

1 Feb 2012 - 9:11 pm | पैसा

पूर्वीचं ते! बरं ते राहू दे. साबुदाणे कसे करत असत ते माहिती आहे तुला?

नका गं असे तोंडचे घास काढून घेऊ!;)
बैलाची चरबी की काहीतरी ऐकून आहे.
नुकताच किलोभर साबुदाणा आणलाय.
तो संपला की मग विचारते.;)

वपाडाव's picture

1 Feb 2012 - 9:23 pm | वपाडाव

पिठ पायाने मळून करायचे

पेठकरकाका, करायचे नै काइ...अजुनही करतात... कधीतरी चुकुन रात्रीच्या जागरणात भुक लागली अन तेव्हा अक्कल माती खायला गेलेली असल्याने एका बेकरीत शिरलो होतो... तिथं चालु असलेला उपद्व्याप पाहुन "भुक गेली खड्ड्यात" पण इथुन आधी बाहेर पडु दे रे देवा... असं वाटत होतं...

हे बरंय ब्वा,
पायाने द्राक्ष तुडवून बनवलेली वाईन आवडीने चाखता पण पिठास मात्र नाकं मुरडता.

श्रावण मोडक's picture

1 Feb 2012 - 9:42 pm | श्रावण मोडक

चालायचंच. पाय कोणाचे हे महत्त्वाचे. ;)

मराठे's picture

1 Feb 2012 - 10:50 pm | मराठे

पायाने मळून की मळलेल्या पायांने ?

पैसा's picture

31 Jan 2012 - 7:28 pm | पैसा

मी फोटो पाहिले नाहीत. गोव्यातल्या लोकांना मिसळ करता येत नाही, त्यामुळे मी कित्येक वर्षात चांगली मिसळ खाल्ली नाही. असले धागे काढल्याबद्दल तुम्ही लोक कुठे फेडाल हे पाप?

चेतनकुलकर्णी_85's picture

31 Jan 2012 - 8:16 pm | चेतनकुलकर्णी_85

मुंबईत अनेकदा खाल्लाय...किंबहुना त्यामुळेच मुंबई सोडली असे म्हणा न... ;)
बाकी मिसळ पावच्या मुख्पृष्टाबद्दल आपेक्ष घेण्य इतपत आम्ही इथे बुजुर्ग नाही आहोत... :P

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Feb 2012 - 5:22 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मुंबईत अनेकदा खाल्लाय...

म्हणजे उलट्या झेंड्याला सलाम ठोकलाय असे म्हणा ना. "सौ चुहे खाके.." वाला प्रकार दिसतो. ;-)

किंबहुना त्यामुळेच मुंबई सोडली असे म्हणा न...

ह्या ह्या ह्या !!! पण मग पुण्यात पण खाऊ नका, तिथे पण काही ठिकाणे सोडली तर उलटेच झेंडे असतात. मी फक्त बेडेकर मध्ये स्लाईस खाल्लेला आठवतो. तुमच्या कोल्हापूरला मला वाटते स्लाईसच असतो सगळीकडे.

बाकी मिसळ पावच्या मुख्पृष्टाबद्दल आपेक्ष घेण्य इतपत आम्ही इथे बुजुर्ग नाही आहोत...

त्यात काय आहे? बुजुर्ग असा वा नसा, आक्षेप घेत राहा. किंबहुना आक्षेप घेतल्याशिवाय बुजुर्ग होता येत नाही.

प्रास's picture

1 Feb 2012 - 6:18 pm | प्रास

तिन्ही मुद्दे

रेवती's picture

31 Jan 2012 - 8:25 pm | रेवती

का असे धागे काढून जळवता हो?
जगबुडी होते ती यामुळेच!
आता आम्ही कधी मखमलाबादला जाणार आणि मिसळ खाणार?
मागच्या विकांताला केली होती.
आमचे पोट भरले आहे, अजिबात हात लावणार नाही म्हणत सगळ्यांनी खाल्ली, कमी पडली.
आता पुन्हा मटकी भिजत घालते.

चौकटराजा's picture

7 Feb 2012 - 9:25 am | चौकटराजा

आज खरेतर मिसळीचे दिवस काही खास नाहीत. निदान शहरात तरी. म्हणजे " मी मिसळ बोलतेय.... असा आत्मकथनात्मक निबंध पोरांना लिहायला लावला तर मिसळीचे रडगाणे बरीच पोरे लिहितील. कारण मिसळ, खमंग काकडी, भजी , पाव सँपल ई पदार्थांची जागा
शहरात हळूहळू मसाला डोसा , उतापा, यानी घेउनही बरीच वर्षे लोटली. आता तर डोसा मागाविणे हे ही जरा बिलो लेव्हल समजले जाते. पण गावाकडे अजून या अजब पदार्थाने जम बसविल्याचे दिसते.

माझ्या लहानपणी मिसळीत फरसाण हा पदार्थ नसे. तर शेव चिवडा, कांदा, टमाटो, लिंबू, कच्या पोह्याचा चिवडा, व बटाटे कांद्याचा रस्सा किंवा वाटाण्याची उसळ अशी रेसिपी होती. मटकीची उसळ हा पदार्थ बहुदा घरी मिसळ करणार्‍या महिलानी घुसडला असावा. मी अनेक प्रकारची मिसळ खाल्ली आहे, उपासाची, बिरड्याची उसळ घालून केलेली. पापडाचे भाजलेले तुकडे टाकलेली, फरसाणाचा ऐवजी बुंदी टाकलेली, बटाट्याची सुकी भाजी टाकलेली, कांदेपोहे टाकलेली( या मिसळीत कान्देपोहे हे रश्याशी एकरूप होऊन गिलावा तयार होतो) .
अशी मिसळीची अनेक रूपे.

पुण्याजवळील तळेगाव येथे " रानडे" यांची प्रसिद्ध मिसळ होती. सकाळी फक्त १ तास दुकान उघडे. एकदा माझ्या एका मित्रास मिसळ आवडली म्हणून त्याने आणखी एक अशी ऑर्डर दिल्यावर रानडे यानी खुष व्हावे की नाही ? तर रानडे आजोबा विचारते झाले " पोट दुखेल ना.. डबल मिसळ खातोस लेका.... आईला येऊन सांगू का ?

आजही मज कडे न चुकता तर रविवारी सकाळची न्याहारी म्हणजे मिसळ पाव ठरलेला आहे. एक फरसाणाचे लहान पाकिट , आठ पावाची एक लादी , कांदे बटाटे रस्सा , टमाटोचे तुकडे, कोथिंबीर ई घेऊन सर्व जणांच्या सहभागाने मिसळ तयार होते.