पहेले 'मार' का पहेला गम!

मराठे's picture
मराठे in जनातलं, मनातलं
29 Jan 2012 - 7:51 am

'शाळा' नुकतंच वाचून संपवलं. तसंच त्यावरचा चित्रपटही नुकताच प्रदर्शीत झालाय. सगळीकडे चित्रपटाची आणि पुस्तकाची चर्चा चालू आहे. पेपरांमधे आणि आंजावर रिव्यू येत आहेत. एकूण सगळं वातावरण शाळामय झालंय. अशात कित्येकांना आपल्या शाळेची, शिक्षकांची, शाळेतल्या मित्रांची (काही भाग्यवंतांना मैत्रीणींची), खोड्यांची आणि विशेषतः शाळेत खाल्लेल्या माराची आठवण झाली नाही तरच नवल. तर या वाहत्या गंगेत हात धूउन घ्यावेत ह्याच एकमेव हेतुने हा धागा काढतोय.

जे सत्तर ऐंशीच्या दशकात शाळेत होते त्यांच्यासाठी शाळेत मार खाणं (शिक्षकांकडून.. इतर पोरांकडून नव्हे) हा अगदी सर्वसाधारण मामला होता. (नंतरचं मला माहित नाही. आमच्या चिरंजीवांवर हात उगारण्याची काहि सोय नाहीये). तर शाळेच्या आठवणीं उगाळताना, आपण शाळेत प्रथम कधी मार खाल्ला? हा विचार आला.. आणि तो दिवस डोळ्यांपुढे जसाच्या तसा उभाच राहिला.

स्थळ : इ. पहिली ब. कोनकर बाईंचा वर्ग
वेळः सकाळी सकाळी हजेरी घेण्याच्याही आगोदर.
मी कोनकर बाईंच्या पुढे डावा हात पुढे करून उजव्या हाताने डोळे पुसत होतो.
मारकुटेपणाच्या बाबतीत कोनकर बाई आमच्या शाळेत नंबर दोनवर होत्या. (पहिल्या नंबरवर मोडकबाई.. त्या अगदी नावाप्रमाणे हात मोडायच्या त्वेषानेच मारायच्या.. असो)
"एकट्यानं जायचंय घरी? जायचंय आत्ता? आण रे त्याचं दप्तर"
हे ऐकल्यावर वर्गातला योगेश सोमण टुण्णकन उठला आणि माझं दप्तर घेऊन आला. त्याचा अशा वेळचा चपळपणा वाखाणण्यासारखा असतो.

तर झालं काय होतं, तर आदल्या दिवशी मला शाळेतून घेण्यासाठी बाबांना थोडा उशीर झाला होता. नेहमी आई यायची पण तिला बरं नव्हतं. मी बाबांची थोडा वेळ वाट बघितली आणि सरळ रस्त्याला लागलो. तशी आमची शाळा घरापासून फार लांब नाही पण मधे एक मेन रोड ओलांडावा लागतो. एवढाच काय तो धोका. अर्थात त्यावेळी आमच्या ठाण्यात इतकी रहदारी नव्हती म्हणा.

मी आरामात घरी पोहोचलो. काका, काकू, नाना, आजी आम्ही सगळे एकत्रच राहात असल्याने मी आल्यावर दप्तर टाकून खेळायला गेलो तरी आईला पत्ता नव्हता. थोड्या वेळाने बाबा घरी आले आणि मग त्यांनी मला बोलावलं. सर्वांदेखत माझी साग्रसंगीत पूजा झाली. त्या दिवशी बाबांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी प्रथम पाहिलं. सगळा प्रकार झाल्यावर प्रत्येकाने माझ्यावर येथेच्छ तोंडसुख घेतलं. मारण्याचा कोटा बाबांनीच संपवला होता.

दुसर्‍या दिवशी शाळेत गेल्यावर कोनकरबाईंसमोर रिपीट टेलिकास्ट झालं. बाबांनी बहुतेक बाईंनापण चांगलं झाडलं असणार. सटासट पाच पट्ट्या हातावर बसल्या. मुसमुसत मी पट्ट्या खाल्या पण भोकाड पसरलं नाही. (तसा मी पहिल्यापासूनच सोशिक हो!). दप्तर उचलून जागेवर जाऊन बसलो.

त्यादिवशी शाळेतल्या प्रदीर्घ कारकिर्दीतल्या पहिल्या गुन्ह्याची पहिली शिक्षा मी भोगली होती. पहिल्या प्रेमासारखी पहिल्या माराची आठवणसुध्दा जन्मभर राहाते. अर्थात उर्वरीत आयुष्यात असे प्रसंग चिक्कार आले (प्रेमाचे नव्हे... मार खाण्याचे). पण त्याविषयी पुन्हा कधीतरी.

तुम्ही शाळेत कधी ना कधी मार खाल्ला असेलच. कधी सामुदायिक धुलाई तरी कधी कधी स्पेशल वॉश?

(काल्पनिक? मुळीच नाही)

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

अशोक पतिल's picture

29 Jan 2012 - 8:25 am | अशोक पतिल

>पहिल्या प्रेमासारखी पहिल्या माराची आठवणसुध्दा जन्मभर राहाते. मी इयत्ता आठवीत असताना एकदा गणिताचा गॄहपाठ केला नव्हता म्हणून छडी खालेली आठवते. छडी म्हणजे गोल काळा रूळ होता , त्या नतर पुर्ण शालेय जीवनात परत कधी मार खाल्याच आठवत नाही.

सुधीर's picture

29 Jan 2012 - 12:07 pm | सुधीर

चौथीच्या स्कॉलरशिपच्या वर्गात असताना ताम्हाणे बाई (आता त्या पाटकर गुरुजी शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत) दररोज गृहपाठाला गणितं घालायच्या, आणि दुस-या दिवशी शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याला गणित चुकलंय की बरोबर आहे ते बघायला सांगायच्या. ज्यांची गणितं चुकायची त्यांना बाई "उभी पट्टी" मारायच्या. मला हमखास पट्टी मिळायची. पट्टी खाताना हात बाजूला केला आणि मार चुकला तर दुस-या वेळी जोरात पट्टी मिळायची. पण दर वेळेला पोटात भितीचा गोळा यायचा. नंतर मात्र मी लबाडी करायचो. उत्तर अगोदरचं तपासून ठीक करायचो. अर्थात बाजूच्यांना पटवून. नंतरच्या इयत्तेत माझ्या वर्गात फार क्वचित कोणाला मार खावा लागला असेल.

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2012 - 12:22 pm | प्रभाकर पेठकर

नाही बॉ, मार नाही खावा लागला कधी. आणि पहिलीतल्या गोष्टी/घटना मला अजिबात आठवत नाहीत. माझी स्मरणशक्ती तेवढी दणकट बांध्याची नाही. परंतु, हं, चवथी-पाचवीपासूनच्या काही घटना तुरळक आठवतात. त्या नुसार एक दोनदा वर्गाबाहेर उभे राहण्याची शिक्षा भोगली आहे पण कधी मार खावा लागला नाही.

आमची मेमरी भलतीच स्ट्रॉंग हॉ, सगळं लक्षात राहत आमच्या (अभ्यास सोडून! ;) )
आम्चा पण बालवाडीच्या "बाईंच्चा माराचा" किस्सा अस्साच हाय. त्या कंदी बी इसरायच्या न्हाय त्येला! आ...हं मार न्हाय काय खाल्ला आमी कधी त्येंचा!
आमीच बालवाडीत असताना त्येंच्याच झिंज्या पकडून हानल व्ह्तं त्येंना!

म्हणुन शान म्हन्लं- "त्या कंदी बी इसरायच्या न्हाय त्येला!!!"

-आगावू कार्टा! ;)

पक पक पक's picture

29 Jan 2012 - 6:54 pm | पक पक पक

१० वित असताना शाळेच्या पहिल्या दिवसापासुन पंडीत नावाच्या इन्ग्लीश च्या मास्तराने माझ्यावर असा काही राग धरला होता , कि तो रोज त्याच्या तासाची सुरुवात माझा हात त्याच्या डाव्या हाताने पिळुन उजव्या हाताने माझ्या पाठीत रपाटा घालुन करत असे.

(त्या मास्तरांची मुलगी खुप सुंदर होती , मला खुप आवडाय्ची...)

वपाडाव's picture

31 Jan 2012 - 6:42 pm | वपाडाव

(त्या मास्तरांची मुलगी खुप सुंदर होती , मला खुप आवडाय्ची...)

सध्या भाचे किती हो तुम्हाला...

>>(त्या मास्तरांची मुलगी खुप सुंदर होती , मला खुप आवडाय्ची...)<<

राग धरल्याचं कारणं तुम्हाला माहित होतं :)

मोझेस's picture

29 Jan 2012 - 11:46 pm | मोझेस

ज्या वर्षी शाळेत मार खाल्ला त्याकाळात वर्गात आत्मविश्वास कमी झाला हे निश्चित .
आता दिवस बदलले आहेत. प्रसंगी शिक्षकांवर मार खाण्याची वेळ येऊ शकते.

आम्हाला गणित शिकवायला झोडगे नावाचे सर होते. धडा सुरुवात होतानाचं सोडलं तर फार काही समजावून न सांगता एकसामयिक समीकरणांची ती उतरंड अखंड रचत जायचे. मला कधी गणितातलं काही म्हणजे काहीच समजलं नाही.
गणितं चुकायची (चुकायची कसली, यायचीच नाही) .. मग ते बेक्कार मारायचे.. छट्या, चापटा, डस्टर, काही नसलंच तर कानाचा चुरा करायचे..
झोडगे सरांचा तास सुरु होण्‍याआधी भूकंप होऊन शाळा पडली तर बरं असं वाटायचं. बरं, सहावीपासून सगळ्या वर्गांना तेच ‍गणित शिकवायचे. आम्ही गणितशत्रु मुलांनी हे सगळं दहा‍वीत येईपर्यंत सहन केलं. मग पुढे गाढवाचे कान फुटल्यावर टारगट पोरांशी हातमिळवणी करुन हेडमास्तरांकडे झोडगे सरांविरुद्ध अर्ज दिला. अर्जलेखक मीच ;-) असे धंदे करण्यात आपण पहिल्यापासून पटाईत. अर्जात लिहिलं की
की हे फार मारतात.. यांना योग्य ती समज द्यावी..
झोडगेसरविरुद्धच्या सगळ्या पोरांच्या त्या अर्जावर सह्या घेतल्या. गणितात हुशार असलेल्या पोरापोरींनी सह्या केल्या नाहीत.
हेडमास्तर नवेच होते त्यामुळे त्यांनी आम्हाला काही म्हटलं नाही पण तो अर्ज झोडगे सरांकडे दिला.
सरांनी तो अर्ज वाचून आमच्या वर्गात मारणं बंद केलं. या माराचं महत्त्व तुम्हाला तुमचे पोरंबाळं झाल्यावर कळेल, आता गणितात अडकून दहावी फेल झालात तरी मला काही घेणंदेणं नाही म्हणाले..

दहावीत गणितामुळं अडकलो नाहीत, पण झोडगे सरांची गणितं हातच्या मळासारखी सोडवणारी सोबतची पोरं आता इंजिनियरींग, मेडीकल करुन विदेशातून फेसबुक स्टेटस अपडेट करताना दिसली तेव्हा झोडगे सरांची आठवण येतेच.. :(

प्रभाकर पेठकर's picture

30 Jan 2012 - 4:01 pm | प्रभाकर पेठकर

हे फार मारतात.. यांना योग्य ती समज द्यावी..

अर्जात असे लिहिण्याऐवजी वेळीच जरा वेगळ्या आडनांवाचे सर आम्हाला गणित शिकवायला द्या. असे लिहिले असते तर कदाचित हा 'झोडण्याचा' प्रकार कमी झाला असता असे वाटते.

मोदक's picture

31 Jan 2012 - 1:14 am | मोदक

:-D

वपाडाव's picture

31 Jan 2012 - 6:40 pm | वपाडाव

अर्जात असे लिहिण्याऐवजी वेळीच जरा वेगळ्या आडनांवाचे सर आम्हाला गणित शिकवायला द्या.

आपणही गणिताचेच शिक्षक वाटतं !!!

अनिल हटेला's picture

31 Jan 2012 - 1:59 am | अनिल हटेला

नेमकं आठवत नाही पहील्यांदा कधी मार खाल्ला.
पण त्याबाबतीत तेंडुलकर होतो आम्ही....
:-)

वपाडाव's picture

31 Jan 2012 - 6:42 pm | वपाडाव

मार खाल्याने गम-बिम काही झालं नाय... उलट दिवसेंदिवस निगरगट्ट जाहलो...
एकदा मारता मारता बाइंची छडी तुटल्याचं आठौतंय... अख्खा वर्ग "धाय मोकलुन" हसत होता..

धमाल मुलगा's picture

31 Jan 2012 - 6:53 pm | धमाल मुलगा

इतकं आठवतंय?
नक्कीच शाळेत असताना शाणं शाणं बाळ होता आपण.

आपल्यालातर तिच्यायला, कुठल्या मास्तरानं कधी आणि कितींदा कुटला ह्याची मोजदाद करायची म्हणलं असतं तर तेव्हाच एखादा मुनिम बसवावा लागला असता चोपडी घेऊन. :D

हां, आता एखाद्या मास्तराला कुटलं, पाळत ठेऊन लफडं उघडकीला आणून बदला घेतला, शाळेत दत्ता सामंत होऊन संपाची ओळख करुन दिली वगैरे विषय असतील तर द्या निबंध ल्ह्यायला. :D

रेवती's picture

31 Jan 2012 - 9:02 pm | रेवती

माझ्याकडे बघून कोणी मार देण्याचे धाडस केले नाही.
उगा हाय खाऊन पोर्गी मेली बिली तर काय घ्या म्हणून.
तरी एकदा सगळ्यांना पालथ्या हातावर डस्टराचा फटका मिळत होता.
बुवा मारायला येईपर्यंत मी इतकी रडले की ते सरळ पुढे निघून गेले.
आणि आमची फक्त मुलींची शाळा, बहुतेकवेळा बाईच असत.
सर नावाचे प्राणी तसेही एकटेच पडलेले असत.
सगळ्यांना दिसले तसे 'शाळा' सिनेमातले गोड प्रसंग आम्हाला कधी दिसले नाहीत.
एक मुलगी तरीही मुलाशी बोलताना दिसली. आम्ही आश्चर्याने थक्क!
नंतर समजले की तो तिचा सख्खा भाऊ होता.
एवढीच काय ती शालेय जीवनातील कथा.

सगळ्यांच्या रम्य आठवणी मस्त आहेत! माझं दुर्दैव काय सांगू तुम्हाला? माझे वडील शाळेचे हेडमास्तर, आई शिक्षिका आणि एक जरा लांबचे काका काकू अशी चार मंडळी आमच्या शाळेत शिक्षक असताना काय करू शकणार होते मी? आदर्श विद्यार्थिनी होणं भागच पडलं! :(