मासे ३७) घोळ

जागु's picture
जागु in पाककृती
6 Jan 2012 - 3:37 pm

घोळात घोळ नव्हे घोळ म्हणजे मासा

घोळीचे सर्वच भाग खाण्यासाठी वापरतात. मोठी घोळ चविष्ट असते. वरील फोटोपेक्षाही घोळीचा मोठा मासा असतो. घोळ माश्याला मोठी खवले असतात. ह्याच्या डोक्याला घबाड म्हणतात. हे डोकेही चविष्ट म्हणून खास कालवणासाठी डोके मासेखाऊ नेतात.

घोळीचा मधला काटाही कालवणासाठी वापरतात. (माझा फेव्हरेट लहानपणापासुन) हा काटा उखळीप्रमाणे असतो. ह्याच्या मधले जॉइंट काढले की त्यात रस मिळतो तो प्यायचा हा पुर्वीपासूनचा छंद. काट्याच्या म्हणजे मणक्याच्या बाजूला थोडे मांस असते.

घोळीचा पिसारा म्हणजे प्रराकडचा मांसल भाग. ह्याचे कालवण करतात.
घोळीच्या मधल्या भागाच्या तुकड्या तळण्यासाठी व कालवणासाठीही वापरतात.
चविला हा मासा मध्यम, म्हणजे कोणालाही आवडेल असाच. अती चविष्ट नाही व मुळमुळीतही नाही.

साहित्यः
घोळ माश्याच्या ५-६ तुकड्या
ओल खोबर, आल, लसुण, मिरची, कोथींबीर वाटण
हिंग चिमुटभर
हळद पाव चमचा
मसाला २ चमचे
लींबाएवढ्या चिंचेचा कोळ
चवीपुरते मिठ
४-५ लसुण पाकळ्या ठेचून
१ किंवा २ छोटी पळी तेल

पाककृती:
१) घोळीच्या तुकड्या तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्याव्यात.
मी वरच्या पेक्षा जास्त प्रमाणात घेतल्या आहेत.

२) भांड्यात तेल गरम करून त्यावर लसुणाची फोडणी द्यायची.
३) त्यातच लगेच हिंग, हळद, मसाला घालून पटकन ढवळून लगेच वाटण घालायचे. जर पटापट जमत नसेल तर वाटण घातल्यावर मसाला घाला त्यामुळे मसाला करपणार नाही. पण जर तेलातच घातलात तर कालवणाला चांगला लाल रंग येतो.
४) आता त्यात चिंचेचा कोळ, घोळिच्या तुकड्या, मिठ, गरज असेल तेवढेच पाणी घालून ढवळून उकळवत ठेवा
५) उकळी आल्यावर साधारण ७-८ मिनीटांत गॅस बंद करा.
झाले घोळीचे कालवण.हाकानाका?

अधिक टिपा:
घोळीच्या कालवणात शेवग्याच्या शेंगा, टोमॅटोही चांगला लाग्तो. शेंगा घालायच्या असतील तर चिंचेचा कोळ व तुकड्या घालण्याआधी शिजवून घ्याव्यात.
हे कालवण जास्त दाट न करता पातळच करावे म्हणजे वाटणाची चव न येता खरी माश्याची चव त्यात उतरते. काहीजण वाटण न घालताही हे कालवण करतात.
तुकड्या तळण्यासाठी नेहमीसारखेच हळद, मसाला, मिठ लावून तळाव्यात.

प्रतिक्रिया

+१०००००००

घोळीच्या खार्‍यापेक्षा घोळीचा काटा (मणका) ब्येस्ट.

आणि कधी कधी वांगं / मुळा घालुनही घोळीचं कालवण असं लागत म्हाराजा की काय सांगाव.

हो गणपा तेही पातळ पातळ कालवण अगदी तो.पा.सु.

थोडी गडबडीत होते म्हणून येत नव्हते. मधुन वाचून जायचे.

Mrunalini's picture

6 Jan 2012 - 4:02 pm | Mrunalini

वा.... तोंपासु :)

आहा... जागुतै मूळ रुपात प्रकटल्या.. आनंदी आनंद...

मृणालीनी, गवी धन्यवाद.

सानिकास्वप्निल's picture

6 Jan 2012 - 4:10 pm | सानिकास्वप्निल

झक्कास :)

शाहिर's picture

6 Jan 2012 - 4:45 pm | शाहिर

लै म्हणजे लै म्हणजे ...लै भारी ..
जागु तै ...आभार

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Jan 2012 - 5:08 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अरे व्व्वा जागुताई, घोळ घातलात की इतरांना घोळात घेतलेत ? काय म्हणायचे ? ;-)

एक विनंती आहे. कालवण किंवा फ्राय सोडून माशाचे इतर काही पदार्थ होत असतील तर ते पण द्या की.

(काट्याचा मत्स्याहारी) विमे

काय तायडे बऱ्याच दिवसांनी दर्शन झाले.
टोपातल्या कालवणाचा फोटो बघून आताच जेवायला बसावे असे वाटतेय ते पण तांदळाच्या भाकरी बरोबर.

जाई.'s picture

6 Jan 2012 - 6:57 pm | जाई.

तोँपासू मस्तच

सानिका, शाहिर, विश्वनाथ, इरसाल, जाई धन्यवाद.

इतर प्रकार माझे मत्स्यपुराण पुर्ण झाल्यावर म्हणजे आकडा ५० वर गेल्यावर चालू करणार आहे.

प्रभाकर पेठकर's picture

6 Jan 2012 - 8:00 pm | प्रभाकर पेठकर

घोळ सर्वांनाच आवडणारा मासा आहे. पण इथे मस्कत मध्ये मिळतो की नाही कल्पना नाही. इंग्रजी किंवा अरेबिक मध्ये घोळ माशाला काय म्हणतात कोणाला माहित आहे का?

गणपा's picture

6 Jan 2012 - 9:05 pm | गणपा

इंग्रजी नाव (Spotted croaker?) नक्की माहीत नाही पण बहुतेक सायंटीफिक नाव Protonibea diacanthus असावं

प्रभाकर पेठकर's picture

7 Jan 2012 - 1:37 am | प्रभाकर पेठकर

दन्यवाद श्री. गणपा.

आता स्पॉटेड क्रोकर शोधणे आले.

रेवती's picture

6 Jan 2012 - 8:24 pm | रेवती

जागु, शेवटी तू घोळ घातलासच!;)
मला मत्स्याहारी बनवलेसच.
गणपतीपुळ्याला एकदा मी पापलेट मासा खाऊन पाहिला.
खूपच आवडला. शिवाय खायला सोपा वाटला.
मागवलेला कमी पडला असे वाटले हे खरे.;)

सुनील's picture

10 Jan 2012 - 9:12 pm | सुनील

शेवटी बाटवलत की हो जागूतै तुम्ही! कुठे फेडाल ही पापे! :)

कौशी's picture

6 Jan 2012 - 8:58 pm | कौशी

फोटो तर फारच जीवघेणा ,
बघुन भुक लागली.

विशाखा राऊत's picture

6 Jan 2012 - 10:01 pm | विशाखा राऊत

वाह जागुताई.. क्या बात है :)

मराठमोळा's picture

7 Jan 2012 - 6:27 am | मराठमोळा

चांगलाच घोळ दिसतोय ;)
सीफुड खायला आपण केव्हाही तयारच असतो. :)

रेवती इच्छा मारू नकोस पुन्हा एकदा जाऊन खा.

प्रभाकर, गणपा, कौशी, विशाखा, मराठमोळा धन्यवाद.

स्वातीविशु's picture

7 Jan 2012 - 12:14 pm | स्वातीविशु

माशाचा नविन प्रकार कळाला व तुमचे मत्स्यप्रेम हि कळले. लवकरच हि पाक्रु करुन फस्त करण्यात येईल.

पक पक पक's picture

10 Jan 2012 - 5:51 pm | पक पक पक

त्या फोटो मधिल माश्याच्या पोटात काय दिसते आहे(कापलेल्या भागात्..).बाकी कालवण छान्,मस्त....

गवि's picture

10 Jan 2012 - 5:53 pm | गवि

बर्फ असावा...

सुनील's picture

10 Jan 2012 - 9:15 pm | सुनील

तुकड्या तळण्यासाठी नेहमीसारखेच हळद, मसाला, मिठ लावून तळाव्यात

मस्त. हेच ते तोंडी-लावणे! कालवणापेक्षाही घोळ आम्हाला अशी आवडते.

मस्त एकदम ...

रेवती जी..

मन न मारता जे हवे ते खावे ..
बिंधास्त ..
शाकाहारी - मांसाहारी असे न करता जे योग्य आणि छान आहे ते खात जा..
आनंदि होताल अजुन

आजच हा मासा पालघरनजीक एका कोळी बांधवाला सापडला आणि तो हातोहात साडेपाच लाख रुपयांना विकला गेला, अशी बातमी वाचली. साडेपाच लाख.. काय गणित आहे कळेना राव.

कुठे लिहिलंय की तीस किलोचा हा मासा साडेपाच लाखात किनाऱ्यावर पोचताच तिथेच विकला गेला. कुठे लिहिलंय की फक्त त्याचं ७२० ग्रॅम वजनाचं फुप्फुसच साडेपाच लाखाला विकलं गेलं. या किंमती खऱ्या आहेत की बाजारगप उठली आहे?

प्रसाद_१९८२'s picture

7 Aug 2018 - 3:05 pm | प्रसाद_१९८२

खरे असावे.
--
आज सकाळी एबीपी माझा वर दाखवत होते, या माश्याचे फोटो.
या माशाच्या फुप्फुसाचा उपयोग सौंदर्यप्रसाधने व वैद्यकिय क्षेत्रात होतो म्हणून त्याची किम्मत इतकी आहे असे त्याच न्युज मध्ये सांगत होते. शिवाय ज्या व्यक्तिने हा मासा विकत घेतला त्याची देखिल छोटेखानी मुलाखत दाखवली

वरील फोटोत दाखवलेला मासा पालघरमधील सातपाटी ह्या गावात मेहेर ह्यांना मच्छीमारी करताना जाळ्यात सापडला.

घोळ आणि दाढा ह्या मच्छींना पुर्वीपासूनचं फार भाव आहे. आजच्या बाजार भावाप्रमाणं ह्या मच्छींचं मांस किलोला र. ८००-१००० दरम्यान विकलं जातं. ह्या मासांच्या फुफूस्सात असल्येल्या पिशवीला 'बोथ' असं म्हणतात आणि जी काही र.५.५ लाख किंमत लिलावाद्वारे ठरवण्यात आली ती ह्याच बोथीची. नर माश्याची बोथ ही मादी माश्यापेक्षा मोठी असल्यामूळे त्याची जास्त मागणी व साहजीकच जास्त किंमत मिळते.

ही बोथ विकत घ्यायला फक्त उत्तरप्रदेशी बंधू (पक्षी: भय्ये) येतात. त्यांनी ही बोथ इतकी महाग विकत घेतलीयं म्हणजे विचार करा की ती पुढे ते किती चढ्या भावात विकत असतील. एक आहे, ते पुढे कुठे विकतात व त्याचं काय करतात ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ते लोकं नेहमी टाळाटाळ करतात. असं ऐकलं आहे की बोथीचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रात ऑपरेशन झाल्यावर घालण्यात येणारे टाके बनवण्यासाठी होतो.

आमच्या गावात पुर्वी म्हणजे १५-२० वर्षांपूर्वी एक नाही दोन नाही तब्बल ४०-५० दाढे अथवा घोळ एका बोटीला मिळत असत. त्यावेळी सुद्धा एका बोथीची किंमत रू. ३०००-५००० मिळत असे. पण, तारापूरला TAPS आल्यापासून अर्नाळा ते डहाणू येथील समुद्रात मच्छी कमीकमी होत जाऊन आता तर अगदी संपुष्टात आली आहे. :(

त्यांनी ही बोथ इतकी महाग विकत घेतलीयं म्हणजे विचार करा की ती पुढे ते किती चढ्या भावात विकत असतील. एक आहे, ते पुढे कुठे विकतात व त्याचं काय करतात ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ते लोकं नेहमी टाळाटाळ करतात.

याविषयी जालावरही कुठे माहिती दिसत नाही. क्रोकर फिश लंग वगैर सर्च करून पाहिलं. औषधी उपयोग वगैरे या नावाने एक किलोपेक्षाही कमी वजनाचे साडेपाच लाख दिले गेले. अद्भुत आहे.

असाच एक ठराविकच जातीच्या व्हेलने ओकून टाकलेला दगडवजा पदार्थ कधी सापडला तर त्याची किंमतही अतिप्रचंड येते असं यापूर्वी एका बातमीतच वाचलं होतं. तो पदार्थ घाण उग्र वासाचा असतो, पण पुढे परफ्युमसाठी वापरतात असं लिहिलं होतं.