अलंग-मदन-कुलंग

sagarpdy's picture
sagarpdy in भटकंती
6 Jan 2012 - 12:17 pm

पुण्यात राहून गेल्या काही वर्षात सिंहगड, राजगड, तोरणा, लोहगड-विसापूर इ. किल्ल्यांना भेट देण्याचा आणि अर्थात काही प्रमाणात गिर्यारोहणाचा बऱ्यापैकी अनुभव आला - छंदच जडला म्हणा ना.
सध्या कार्यालयीन कामकाजातून जसा वेळ मिळेल तसा कोणत्यातरी नवीन ठिकाणी जायला बघत असतो. काही नाही तर पुस्तके वाचून, 'आपण अजून कोठे गेलो नाही?' याची यादी बघत बसतो.असेच एका पुस्तकातून समजलेले हे किल्ल्यांचे त्रिकुट.
अलंगगड
Alang
मदनगड
Madan
कुलंगगड
Kulang

अलंगगड, मदनगड आणि कुलंगगड हे तीन किल्ले सह्याद्रीच्या कुशीत अगदी कळसुबाई च्या शेजारी उभे आहेत. तिघांचीही उंची जवळपास कळसुबाईएवढीच. वाट अतिशय दुर्गम, लिखित माहिती(ऐतिहासिक लेख, नकाशे) अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध! गड सर करताना / उतरताना rock climbing, rappelling करावे लागते. परिणामतः बऱ्याच गिर्यारोहकांना या किल्ल्यांबद्दल काहीच माहिती नसते अथवा येथे येणे केवळ स्वप्नच राहते. (बऱ्याच अनुभवी गिर्यारोहकांच्या मते हा महाराष्ट्रातील दुसरा सर्वात कठीण ट्रेक आहे.)

मध्यंतरी आम्ही काही मित्र ढाक-बहिरी ला जाऊ म्हणत होतो. सगळे लोकं नवखेच, रस्ता कोणालाच माहित नाही, मग ठरवले कि कोणत्या तरी ट्रेक-ग्रुप बरोबर जाऊ. मग आंतरजालावर काढलेल्या शोधमोहिमेत असे समजले कि Explorers Group अलंग-मदन-कुलंग चा ट्रेक आयोजित करत आहे. आपल्याला काय ? जाऊ म्हटले, पण जशी तारीख जवळ आली तसे एक एक करून लोकं गळपटले. शेवटी मी एकट्यानेच जायचे ठरवले. नवीन लोकंही भेटणार होते आणि अनुभवही खत्री! पण या ट्रेक आधी मी स्वतः कधीच rock climbing किंवा rappelling केले नव्हते. त्यामुळे थोडा विचारात होतो. हो-नाही करत शेवटी उडी मारली.

१६ डिसेंबर
१५ डिसेंबर च्या रात्री आम्ही लोकं स.प. महाविद्यालायासमोरून कूच केले. सकाळी ५ वाजता भंडारदरा MTDC ला पोहोचलो. नाश्ता-पाणी आटोपून अलंगाच्या पायथ्याकडे उडदवणे गावाकडे निघालो. ७ वाजता गड चढण्यास सुरुवात केली.

सुरुवातीची चढण सोपी होती. पहिल्या पठारावर पोहोचल्यावर थोडी विश्रांती घेऊन आम्ही लोक पुढे निघालो. यानंतर जवळपास अर्धा-पाऊण तासाची सपाट पायवाट आहे. या पठारावरून चालताना एक मोठा किस्सा झाला. पठारावर एक म्हैशींचा कळप चरत होता. विपुल नामक आमच्यातील एक महाशय थोडे जास्त उत्साही! काय अवदसा सुचली त्यांना आणि त्यांनी त्या कळपाला डिवचण्यासाठी काही आवाज केले, खुन्नस-बिन्नस दिली. झालं, त्या कळपातले एक म्हसोबा जे काही चिडले ते आले सरळ आमच्या 'कळपावर' चाल करून. अशी तारांबळ उडाली होती आम्हा ६-७ लोकांची कि विचारू नका. कसेबसे इकडे-तिकडे उड्या मारून त्या म्हैशीच्या वाटेतून बाजूला झालो आणि ती म्हैस बाजूच्या झुडूपांमध्ये गडप झाली. सर्वांनी विपुलशेठना थोडा झापून , मनातल्या मनात 'जान बची तो लाखो पाये' म्हणून पुन्हा वाटचाल सुरु केली.
पठारानंतरच्या मुख्य चढणीत पहिला कडा आहे (१२-१५ फुट). तो ओलांडून पुढे गडाचे मुख्य द्वार समोर येते. (ज्यावर दगड पडल्याने बाजूच्या बांधावरून चढून जावे लागते).
पहिला कडा
First Cliff

गडावर ४०-५० लोकांना राहण्यासारखी गुहा आहे. मुख्य द्वारापासून या गुहेपर्यंत दरीच्या काठावरून तासाभराची पायवाट आहे (येथून चालताना 'फाटते').
अलंग - गुहेपर्यंतची वाट
AlangPath

दुपारी गुहेपर्यंत पोहचून जेऊन घेतले. थोडी विश्रांती गेऊन संध्याकाळी गड पाहण्यास बाहेर पडलो. गडावर पाहण्यासारखी 'सरदाराची कोठी' हि एकमेव वास्तू शिल्लक आहे. त्याचबरोबर गडावर एक शंकराची लहानशी पिंडी व पाण्याच्या भरपूर टाक्याही आहेत. आजूबाजूला भटकून आम्ही गुहेकडे परत आलो. नंतर रात्री जेवण करून थोडा टाइमपास करून १० वाजायच्या सुमारास झोपलो.
अलंग - पाण्याच्या टाक्या , वरील डाव्या बाजूस - सरदाराची कोठी

१७ डिसेंबर
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून, आवराआवर करून ६-६.३० च्या सुमारास आम्ही मदन कडे वाटचाल सुरु केली. सुरुवातीलाच अलंगवरून उतरताना rappelling करावे लागते. ५० फुटाचा हा कडा बोचऱ्या थंडीत उतरून खालच्या छोट्या गुहेत येऊन आम्ही थांबलो.
अलंग - rappelling
Alang Rappelling

येथे नाश्ता करून घेतला. यानंतर मदनची खरी 'वाट' सुरु झाली. पुन्हा एकदा १/२ तास दरीच्या कडेवर चालत आम्ही मदनच्या पायऱ्यांपर्यंत पोहोचलो. येथे आमची पाठुंगळीची बोचकी काढून ठेवली. (उतरताना याच रस्त्याने परत यायचे असल्यामुळे). अर्ध्या पायऱ्या चढून गेल्यावर एक २५ फुटी कडा आहे. खाली ३००० फुट दरी आणि वर त्या कड्यावर चढाई असा रोमहर्षक अनुभव होता हा. येथे खूप मजा आली.
मदन - rock climb
MadanRockClimb

मदनगड हा तसा आकाराने छोटा किल्ला आहे. एक पाण्याचे टाके आणि २५ माणसे राहतील एव्हढी एक खोली आहे. किल्ल्यावर पाहण्यासारखे इतर खास काही नाही, पण आजूबाजूच्या परिसरातील अलंग-कुलंग, कळसुबाई, रतनगड, आजोबाचा डोंगर, दूरवर दिसणारा हरिश्चंद्रगड, खाली दिसणारे भंडारदरा धरण आणि आजूबाजूचे विस्तार्ण मैदान हे अंगावर रोमांच आणतात. इकडे फोटो-बिटो काढून आम्ही परत खाली उतरलो, खाणे खाल्ले, १०-१५ मिनिटे विश्रांती घेऊन कुलंगकडे निघालो.
मदन ते कुलंग हा रस्ता दाट झाडाझुडूपांचा आहे. यात प्रवासात आपण जवळपास अर्धीअधिक दरी उतरतो आणि कुलंगच्या तीव्र चढावाने पुन्हा वर चढतो. खूप दमछाक झाली या प्रवासात. कुलंगच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली तेव्हा संध्याकाळी अंधार पडू लागला होता. तसेच विजेरीच्या मदतीने आम्ही गड चढलो आणि बोचकी टाकली एकदाची गुहेत!
दुसरा दिवस म्हणजे जवळजवळ ११ तास चालण्याचा विक्रमाच केला होता, पाय आणि पोट दोन्ही बोंबा मारत होते. आमच्या मार्गदर्शकांनी आम्हाला चार घास जेवण शिजवून घातलं आणि नंतर आम्ही ढाराढूर झोपलो.

१८ डिसेंबर
तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही काही लोकं कुलंग बघत फिरलो, भरपूर फोटो काढले. कुलंगच्या एका बाजूला असलेला कडा हे गडाचे मुख्य आकर्षण (माझ्या मते) - टोकाला निमुळत्या होत गेलेल्या या भागात गेल्यानंतर म्हणजे ढगात पोहोचल्यासारखे वाटते.
कुलंग - कडा
Kulang Kada

येथे थोडा वेळ काढून परत गुहेकडे आलो, नाश्ता+जेवण घेतले, सर्व ग्रुप चे फोटो काढले, आणि उतरणीस सुरुवात केली.अर्ध्या पाउण तासात कुलंगच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो.
कुलंग - ग्रुप फोटो
Group

यानंतर कुलंग आणि त्याच्या शेजारील डोंगर 'छोटा कुलंग' यांना वळसा घालून नंतर तीनही किल्ल्यांच्या समोरून जवळपास पळतच घाटघर जवळ पोहोचलो.
बस जवळून - दुर्ग त्रिकुट आणि छोटा कुलंग
AllThree

या वाटेत मध्ये एक नदी लागते, तेथे कोणत्यातरी हिंदी सिनेमाचे चित्रीकरण झाले होते. पळण्या-पळण्यात बाकी खास काही बघून झाले नाही.
घाटघर जवळ आमची प्रिय बस उभी होती. तेथे आलो कपडे बदलले आणि जवळजवळ रस्त्यावरच आडवे झालो. तास-दीड तासाने सर्व लोकं पोहोचल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. वाटेत बस मध्ये धिंगाणा घातला, संगमनेर मधे रात्रीचे जेवण जेऊन अखेरीस मध्यरात्री पुण्यात घरी येऊन पोहचलो.

एकूण ट्रेक हा 'लई भारी' या प्रकारात पार पडला.

[ हिच माहिती मी येथे नकाशासह प्रकाशीत केली आहे. ]

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

6 Jan 2012 - 12:56 pm | प्रचेतस

भन्नाट ट्रेक, पण या दुर्गत्रयी मधल्या प्रत्येक किल्ल्यासाठी वेगवेगळे लेख भरपूर फोटोंसहित यायला हवे होते, नव्हे तसे कराच.
सह्याद्रीतील सर्वांग सुंदर सर्वात आणि कठीण ट्रेक तर हा आहेच. अलंग, मदन दोर वापरूनच करावा लागतो, कुलंगची चढाई तर सह्याद्रीमधली पायथ्यापासून सर्वोच्च अशा उंचीची आहे.

असेच म्हणतो...

आणि मला मात्र ३ च फोटो दिसले येथे .. बाकीचे दिसले नाहित

प्यारे१'s picture

6 Jan 2012 - 5:02 pm | प्यारे१

ट्रेक फक्त बघावा आमच्यासारख्यांनी.

बाकी, गणेशाला ज्यादिवशी ऑफिसमधून सगळे फोटो दिसतील त्यादिवशी आम्ही 'हत्ती' मागवणार आहोत 'फ्रुट पंच' वाटण्यासाठी.... (साखर काय कुणी पण वाटेल!) :)

हलके घेतो आहेस ना रे गणेशा? ;)

हत्ती फ्रुटपंच खाऊन टा़केल, वाटण्या ऐवजी..............

तसं झालं तर प्यारे फ्रुट खाऊन हत्तीला पंच मारेल.

५० फक्त's picture

7 Jan 2012 - 7:12 am | ५० फक्त

@ मा. प्यारे,मा. श्री गणेशा यांना ऑफिसमधुन फोटो दिसणे, हे लोकपाल विधेयक संमत होण्याशी संबंधित आहे अशी माहिती मिळालेली आहे.

शाहिर's picture

6 Jan 2012 - 1:03 pm | शाहिर

अरे सुखा मधे निवांत लोळत प डायचा सोडुन कशाला झक्क मारत जायचा...मस्त ए सी लावुन टी व्ही बघत बसायचा...
मॉलमध्ये शॉपींग करायची .. मल्टीप्लेक्स ला इंग्लीश चित्रपट बघायचे ..हापिसामधून मि पा चिवडायचे..

इतका सुखी आयुष्य सोडून कशाला रे बाबा वणवण फिरतो ??
( ईनो घेतलेला )

सुहास..'s picture

6 Jan 2012 - 1:03 pm | सुहास..

ट्रेकर्स ला नेहमीच चॅलेंज करणारा ट्रेक आहे हा, अर्थात दमछाक झाली तरी आनंद देवुन जातो .

अवांतर : जरा' नाविन्य' कमी झालय हे मात्र तितकेच खरे , अलंग-मदन-कुलंग वर ईतके ट्रेक आणि गप्पा झाल्यात की नव्याने झालेला/आलेला ट्रेक थरार कमी करतो :)

वा.. उत्तम वृतांत..
आणि झकास फोटू

स्वाती दिनेश's picture

6 Jan 2012 - 6:07 pm | स्वाती दिनेश

फोटो मस्त.. ट्रेकही जबरा झालेला दिसतो आहे.
स्वाती

मोदक's picture

6 Jan 2012 - 7:14 pm | मोदक

ते विपुल महाशय "कुलकर्णी" होते का हो..?

माझा एक कॉलेजसोबती पण तिथे गेला होता त्याच दरम्यान.

मोदक.

sagarpdy's picture

6 Jan 2012 - 7:26 pm | sagarpdy

होय :)

मोदक's picture

6 Jan 2012 - 7:49 pm | मोदक

:-)

दुनिया गोल है.

अशा ट्रेक्समध्ये सन्ध्याकाळी सुर्यास्तावेळी एकदम विचित्र फिलीन्ग येते...आपल्यासमोरच्या अफाट निसर्गात आपल्या अस्तित्वाची एक खुजी जाणिव...

मोदक's picture

7 Jan 2012 - 12:25 am | मोदक

असेच फिलींग समुद्रकिनारी आणि धबधब्याजवळ येते..

"जलौघ" चा शब्दशः अर्थ कळतो.

मराठमोळा's picture

7 Jan 2012 - 6:47 am | मराठमोळा

अवघड ट्रेक वाटतो आहे...
बर्‍याच दिवसात किल्ला. गड, डोंगर सर केलेला नाही. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Jan 2012 - 11:10 am | विश्वनाथ मेहेंदळे

आम्ही तर असे ऐकून आहोत की तुम्ही सातेक महिन्यांपूर्वी जी भरारी घेतली आहे, त्यानंतर रोज नवनवे गड-किल्ले सर करत असता....

मराठमोळा's picture

9 Jan 2012 - 11:20 am | मराठमोळा

विमे,

मी खर्‍याखुर्‍या लेखातील चित्रात दाखवलेल्याप्रमाणे गड-किल्ल्यांबद्दल बोलत होतो हो. ;)
बाकी आयुष्यातले डोंगर, दर्‍या पार करणे हे ओघाने आलेच.

५० फक्त's picture

7 Jan 2012 - 7:12 am | ५० फक्त

जळवा आमची, नाहीतर काय, आता उद्या वल्ली सुद्धा भेटला की असल्याच काहीतरी गप्पा मारत राहणार...

बज्जु's picture

7 Jan 2012 - 11:07 am | बज्जु

जबरा ट्रेक केलात राव. २-३ वर्षापुर्वी केलेल्या मदनच्या ट्रेकची आठवण झाली.

मदन रॉक प्यचच्या आधीचा हा एक फोटो खास तुमच्यासाठी.

मदन ट्रेक चे वर्णन ईथे वाचा
http://www.misalpav.com/node/11314

अलंग, मदन आणि कुलंग या दुर्ग त्रिकूटाला एकत्र आणि वेगवेगळी भेट देण्यात सुध्दा भारी मजा आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2012 - 2:19 pm | अत्रुप्त आत्मा

बज्जु जी -नुसता फोटो बघुनच घाम फुटला... असल्या अशक्य ठिकाणी बिनधास्तपणे विदाऊट प्रोटेक्शन जाताय(गेला होतात)-हे खर असेल तर आपला तुंम्हाला तुमच्या मित्रपरिवाराला सा.नमस्कार...

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2012 - 2:25 pm | अत्रुप्त आत्मा

अलंग-मदन-कुलंग म्हणजे अमच्या साठी ब्रम्हा/विष्णु/महेश,,, त्यामुळे त्या त्रिकुटासह ते सर करणार्‍या प्रचंड धैर्यवान भक्तांनाही आमचा दंडवत

सुहास झेले's picture

7 Jan 2012 - 3:37 pm | सुहास झेले

अगदी अगदी.... एकदम भन्नाट ट्रेक झालेला दिसतोय :) :)

दिपक's picture

7 Jan 2012 - 3:51 pm | दिपक
भडकमकर मास्तर's picture

19 Jan 2012 - 12:28 am | भडकमकर मास्तर

--> ‘अलंग-मदन-कुलंग’वर ‘निसर्ग गिरिभ्रमण’ची सायकल स्वारी! >>>>>>

या असल्या अवघड रॉक प्याचांवरून सायकल चालवायला भलतेच स्किल पाहिजे बुवा... भारी

अभिजीत राजवाडे's picture

7 Jan 2012 - 8:20 pm | अभिजीत राजवाडे

जबरदस्त ट्रेक आहे हा. फोटोही आवडले.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Jan 2012 - 11:16 am | विश्वनाथ मेहेंदळे

काय जबरी ट्रेक आहे राव. केला पाहिजे एकदा. (पण त्या आधी इतर बरेच ट्रेक करून मग इथे हात घातला पाहिजे)

झकासराव's picture

19 Jan 2012 - 6:18 pm | झकासराव

_/\_ अतिशय अवघड ट्रेक.
आम्ही तर कळसुबाई वरुनच ह्या त्रिकुटास वंदन केल आहे.

चौकटराजा's picture

6 Feb 2012 - 8:46 am | चौकटराजा

हा ट्रेक हा माझ्या आकर्षणाचा विषय आहे .... पण मी फक्त शिरवळचा सुभानमंगल हा भुईकोट किल्ला चढून (?) गेलो आहे .इतका महान
अनुभव माझे पाठीशी असल्याने अलंग वगैरे पुढ्च्या जन्मी .गेलेल्या " टेरर " ट्रेकरना आदाब !