ईर्शाळा !

सुहास..'s picture
सुहास.. in भटकंती
29 Dec 2011 - 4:15 pm

आता पर्यंत ईर्शाळ्याला तीनवेळा गेलो..

एक :: दर गणपतीला,मोहरमला,दिवाळीत आणी नववर्षाला आमच्याईकडं "उचलाउचली" व्हायची.ती नावापुरती असली तरी ते लॉक-अप मधले दोन तास लै जिवावर यायचे,आणी वर पोलीसांना दिवाळी किंवा ईतर सणाबद्दल फुकटचा बोनस भेटायचा तो वेगळाच.पण काही वर्षापुर्वी नागपुरचाळीतल्या सामान्य गुंडानी ह्या परंपरेला तडा द्यायच ठरवल आणी मग पळापळ झाली.कोणी गावाकडे तर कोणी पाहुण्यांकडे पळाल.पण आम्ही सगळीकडेच तोंड काळं केल्याने काय कराव ह्या विवंचनेत होतो.कातकरी समाजच्या प्रदीपदादांचे वडील येरवडा जेलमध्ये चतुर्थ श्रेणीतील कामगार होते आणी आमचे शेजारी होते.त्यांच्या गावी जायचे ठरले,ते गाव म्हणजे ईर्शाळा. गेलो तर खर पण ईर्शाळा सर नाही करु शकलो.ठाकर वाडी पर्यंत गेलो आणी तिथुन प्रबळगडात शिरलो.तथाकथीत आणी छुप्या ३५० पाण्याच्या टाक्या शोधायच्या होत्या.२२- एक सापडल्या पण ३५० काही शोधु शकलो नाही,तिथुन पुढे करवलींचा डोंगर पाहिला आणी त्याच्या अक्षरश प्रेमात पडलो.आणी त्याच प्रेमापायी,पावसाच्या रिपरिपीत,घनदाट जंगलात,दोन दिवस रस्ता शोधत फिरत राहिलो.मला रस्ता दाखविणार्‍या ,धनगराच्या हाताची, स्टोव्ह वर बनविलेली आणी रिमझिम पावसात चाखलेली, नाचणीच्या भाकरीची आणी गावरान लाल मिरचीच्या ठेच्याची चव अजुनही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे.

हाच तो ईर्शाळा !!

दोन ::: दुसर्‍यांदा गेलो तेव्हा सुळका सर करायचाच असे ठरविले होते.पण घसरुन ५० फुट खाली पडलो.डाव्या तळपायाला ७ टाके पडले आणी उजव्या पायाच्या गुडघा सटकला.पण त्यावेळी दिड-दिवस ठाकरवाडीत ज्या तर्‍हेने माझा ईलाज केला त्या बद्द्ल मी त्या ठाकरवाडीच शतशः ऋणी आहे.शिवाय त्यांनी जे मला बांबुच्या कामठ्याला सतंरजी गुंडाळुन खोपोलीच्या सरकारी ईस्पितळापर्यंत आणले ते उपकार वेगळेच !!

हिच ती २५ एक घरांची ठाकर वस्ती .

तीन ::चार वर्षांनी पुन्हा एकदा जायचा योग आला. का आला ह्या करता एक वेगळा भाग लिहावा लागेल, पण ह्या वेळी पण परत येताना मात्र आयुष्यभर आठवणीत राहील असा दिवस घेउन आलो.

प्रवास सुरु होते तो ईथे ...जाताना नेहमी प्रमाणे दर्शन....प्रती शिर्डी...शिरसगाव.

आणी मग एक स्टॉप उदरभरणासाठी...पनवेल फाट्याच्या अलीकडे..

मिसळ महत्त्वाची नाही पण अश्या चटण्यांनी नाष्टार्जनाला रंगत आणली..

प्रवासाची सुरुवात होते ती ईथुन..पनवेल खोपोली रोडवर एक १७-१८ कि.मीवर धरणाचा फाटा फुटला की डाव्या बाजुला डांबरी रस्ता संपेपर्यंत जायच आणी पहिले धरण परिसर न्याहाळायचा. शेजारीच १५ एक घरांची कातकरी वस्ती..

ह्या सदगृहस्थाचा फोटो ईथे देण्याचा मोह आवरत नाहीये...एका एम-८० वर एका आख्ख्या संसाराला पुरतील ईतकी भांडी घेउन हिंडायच...स्वताच दुकान टाकण्याईतपत ऐपत नाही..खोपोलीतुन गाडीवर अडकावयची आणी मारवाड्याला गल्ला आणुन द्यायचा...वरच कमीशन आणी पेट्रोल वर मात्र ह्याचा स्वताचा संसार....

वस्ती सोडली की जंगलात शिरायच..

जे वरतुन असे दिसते..

जाताना प्रदीपदादांनी एक डिंक-भुंगा पकडला..

सुरुवातीला उजवा डोंगर आणी मग डावा....पण फोटोकडे जरा व्यवस्थित बघा...माझ्याकडे नाही त्या डाव्या बाजुला सुळक्याकडे एखादी मानवी चेहर्‍याची प्रतिमा दिसतेय का ? हे ईर्शाळ्याला आहे,होय .एक चेहरा तर थेट हनुमानाच्या चेहर्‍यासारखा दिसतो...तो सुळका कुठुनही बघा...दिसतो म्हणजे दिसतोच

दुसरी ही पायवाट संपली

डोंगर चढायला सुरुवात केली आणी हळु-हळु धरण छोटे होत गेले..

वरुन दिसणारे सृष्टी-सौंदर्य..

डोगंरमाची पर्यंत पोहोचे पर्यंत छातीचा भाता झाला होता..आणी पायवाट ही नीटशी दिसत नव्हती पण ईर्शाळा मात्र एकदम स्पष्ट...

आणी ठाकर वस्तीला वळसा घालुन सुळक्याकडे निघालो...वरच्या चित्रात एक कातळाला पडलेल नेढं लक्षात ठेवा..त्यात पंधराजण तरी बसु शकतात..

टेकाडाला रिंगण घालुन सुळक्यापर्यंत जात येत .एखादा ९ नंबरचा शुज आडवा केला की जितकी जागा होईल तितक्याच जागेईतकी पायवाट ...

ईथवर रस्ता संपतो आणी चढाईला सुरुवात होते..

आणी शेवटी शिडी सापडली ...

आणी पाणी ही....ईथे आणी वरच्या सुळक्यावर दोन टाक्या आहेत . ..वरती साचलेले शेवाळ नाही...कसलीतरी पानं आहे ..हे पाणी ईथे १२ महिने असते...आणी पिण्याजोगते,,

टाकीशेजारी असलेल औदुबंराच झाड्...आणी लांबवर जो दुसरा सुळका दिसतोय तो कर्नाळा..

योगेशने मंदीराची साफसफाई केली ..त्याचा जो पाय खाली गेलाय ..तिथुनच मी खाली पडलो होतो...पावसामुळे निसरड झालत.

ईथुन साधारण १५-२० फुट वर सरळ चढ्ण आहे..पण एकावेळेस एकजण जाउ शकतो..आणी पहिला वर गेला की त्याने दुसर्‍याला आवाज द्यायचा..त्यामुळे फोटोज नाही काढता आले ..पण वर ..हेच ते नेढं

ही वरची टाकी..एखाद्या ईंटेरियर डिझायनरने बनवावी तशी...एक वर्तुळाकार टाकीच्या मधोमध खांब बसविला...मागच्या कातळाला नेढं आहे नेढातुन सुर्यप्रकाश थेट टाकीच्या पाण्यात शेजारी औंदुबराच झाड्..पण एकावेळेस एक माणुस थांबु शकेल ईतकीच शेजारी जागा..

नावं बघुन गडबडु नका...ठाकर गड्याच लग्न झाल की ठाकर गडी,गडणी आणी पुर्ण परिवाराला ईथे ह्या जागी याव लागत्..सासु सासर्‍यासकट्...पुर्वीच्या काळी ईथे काहीतरी दगडाने कोरायचे ..पण आता सुशिक्षीत झाल्याने नावे टाकतात ..ईथे पाच माणसांच्या वर लोक उभे राहु शकत नाही...पण प्रदीपदादानी सांगीतले की ईथे एक आख्खा उत्सव होतो...मला विश्वास बसला नाही..पण प्रदीपदादा मात्र ठाम होता...

शेवटी खाली आलो...संध्याकाळी प्रदीपदादाकडे जेवलो..अ‍ॅन्ड रिटर्न टु पुणे..

हे असेच काहीसे..

एक ठाकर आणी ठाकर वाडीतील घरे.

एक ठाकर आणी प्रबळगड

ही कातकर्‍यांची वस्ती

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

29 Dec 2011 - 4:25 pm | किसन शिंदे

प्रबळगडला पण गेला होतास का?

प्यारे१'s picture

29 Dec 2011 - 4:27 pm | प्यारे१

बघूनच अंगावर येतंय प्रकरण....
वाचता वाचता धाप लागली.
खतरा आहे एकदम.
मस्त ट्रेक.
खरंच स्टॅमिनाचा कस पाहिला जाईल .

मनराव's picture

29 Dec 2011 - 4:29 pm | मनराव

मस्त........!!!

इथे नक्किच जाऊन येणार.......

मन१'s picture

29 Dec 2011 - 4:30 pm | मन१

एकदम आख्खं मिपा भटकंतीवरच कसं काय निघालय की एकाएकी?

परिकथेतील राजकुमार's picture

29 Dec 2011 - 4:33 pm | परिकथेतील राजकुमार

झकास वर्णन आणि ज ब रा ट फटू.

एक वेगळेच जग बघायला मिळाले. तेच तेच फटू आणि अँगल बघून कंटाळलेल्या जीवाला जरा सुख मिळाले.

गणेशा's picture

29 Dec 2011 - 4:35 pm | गणेशा

आपले लिखान एकदम छान .. ह्रुद्याला भिडणारे असतेच
सोबत हा भटकंतीचा वृत्तांत आणि फोटो ही तितकेच भिडणारे ...
मस्त एकदम..

चार वर्षांनी पुन्हा एकदा जायचा योग आला. का आला ह्या करता एक वेगळा भाग लिहावा लागेल

लिहा हो ... सुमार पिक्चरच्या सिक्वेल पेक्षा.. असल्या अस्सल गोष्टींनी मन छान प्रफुल्लित होते...

अन्या दातार's picture

29 Dec 2011 - 5:00 pm | अन्या दातार

जबराट वर्णन सुहासभौ! थरारक वाटतोय ट्रेक. जायलाच हवे एकदा. :)

मोदक's picture

29 Dec 2011 - 5:25 pm | मोदक

झकास वर्णन...

मागच्या महिन्यात कलावंतीण ला गेलो होतो.. प्रबळगड, ईर्शाळा, पेब ही पुढची लिस्ट आहे.. बघुया कधी योग येतो..

मोदक.

सोत्रि's picture

29 Dec 2011 - 5:41 pm | सोत्रि

एकदमच मस्त फोटो आणि नरेशन सुद्धा!

- (भटक्या) सोकाजीराव त्रिलोकेकर

गणपा's picture

29 Dec 2011 - 5:50 pm | गणपा

निव्वळ सुरेख.
चित्रांना तुझ्या शब्दांची साथ लाभल्याने चार चाँद लागले धाग्याला. :)

सुहास झेले's picture

29 Dec 2011 - 5:52 pm | सुहास झेले

जबरा.... नव्या वर्षात एक मस्त ट्रेक जमवू मिपाकरांचा .... काय बोल्तो? :) :)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Dec 2011 - 6:11 pm | अत्रुप्त आत्मा

सॉल्लीड आहे बाबा हे सगळं..आणी त्याहुन तुंम्ही जिद्दीने अश्या अवघड/अशक्य ठिकाणांचे फोटो तितक्याच उत्तम माहिती सकट काढलेत.पंढरीला जाऊन आलेल्या वारकर्‍याचे पाय धरले तर आपल्यालाही तिथे गेल्याचं पुण्या लाभतं,असं म्हणतात...तुंम्ही भेटलात तर माझीही तीच भावना राहिल.हॅट्स ऑफ तुंम्हाला.

पैसा's picture

29 Dec 2011 - 6:51 pm | पैसा

काय म्हणू कळत नाही! जीव धोक्यात घालायची ही हौस कुठून येते? आणि तिथले फोटो आमच्यासाठी काढून घेऊन आलास! अशक्य आहे! ती ठाकर कातकर्‍यांची घरं पाहून एका वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटलं.

खरं तर ही सगळी ठिकाणं म्हटली तर जवळ, पण कधी जायच्या ठिकाणांच्या यादीत येत नाहीत, आज निदान फोटो तरी बघायला मिळाले!

फोटो अप्रतिम आहेत !!!

काही फोटो वॉलपेपर म्हणून वापरण्यासाठी डाऊनलोड केले आहेत. :)

पाषाणभेद's picture

29 Dec 2011 - 11:34 pm | पाषाणभेद

सुहास, त्या एम ८० वाल्याचा फोटो दुसर्‍या धाग्यातही वापरला होता काय? बघीतल्याचे ठाम आठवते आहे.
बाकी वर्णनशैली एकदम झकास. तू समोर बसून वर्णन करतो आहेस असे जाणवले. लेखात फक्त आणी च्या ऐवजी आणि हवे होते.

सुहास..'s picture

30 Dec 2011 - 11:50 am | सुहास..

पाभे , धागा इतरत्र पुर्व-प्रकाशित आहे , विसरलास का ?? :)

काल-परवा स्पावड्याने कर्नाळ्याची आठवण काढली म्हणुन आठवण झाली, (http://www.misalpav.com/node/20233) अर्थात ट्रेक किंवा व्हिजीट करण्याची पारंपारिक ठिकाणे असली तरी काही अपारंपारिक ठिकाणे दाखवावीत हा ही त्याकरिता एक मानस होता :)

धन्यवाद मित्रांनो.

(सहसा स्वता च्या धाग्यावर लिहायला कंटाळतो मी, नेमके हे प्रकाशित करताना, पुर्वप्रकाशित लिहायला विसरलो :( )

sneharani's picture

30 Dec 2011 - 1:37 pm | sneharani

मस्त फोटो अन वर्णन ही!

अप्रतिम फोटू
आणि वर्णन

जाई.'s picture

30 Dec 2011 - 2:05 pm | जाई.

फोटो छान आलेत

प्रचेतस's picture

30 Dec 2011 - 9:10 pm | प्रचेतस

जबरदस्त फोटो आणि सुरेख वर्णन.
इर्शाळला जायलाच हवे आता.

५० फक्त's picture

31 Dec 2011 - 8:20 am | ५० फक्त

मला तर हे नाव पण माहित नव्हतं, जबरदस्त आहे जागा, पण कधी जाणं होईल कोण जाणे. फोटो आणि माहिती इथं दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद.

अप्पा जोगळेकर's picture

31 Dec 2011 - 3:33 pm | अप्पा जोगळेकर

खूप छान फोटो आहेत. ईर्शाळगड -प्रबळगड खूप छान ट्रेक आहे.
तुम्ही वरपर्यंत गेलात असे लिहिले आहे. म्हणजे समिट केला का ? केला असेल; तर अभिनंदन.
तुम्हाला कदाचित वाईट वाटेल पण रोप, कॅराबिनार, हार्नेस इत्यादी इक्विपमेंट नसताना असे समिट करणे म्हणजे मूर्खपणा होय असे नम्रपणे सुचवावेसे वाटते. पुन्हा असे करु नये अशी विनंती आहे.

चिगो's picture

16 Jan 2012 - 1:00 pm | चिगो

लै भारी, दोस्ता.. ईर्शाळ्याबद्दल पहील्यांदाच ऐकतोय (ह्या बाबतीत माझी तशीही बोंब आहे म्हणा :-() पण ही जी काही धडपडण्याची खाज आहे, तिच्याशी चांगलीच ओळख असल्याने तूमची ही ट्रीप लै आवडली.. कधीतरी लांबलचक सुट्टी काढून सह्याद्रीच्या डोंगर-दर्‍या आणि किल्ले भटकायची इच्छा आहे..

लगे रहो..

प्रीत-मोहर's picture

16 Jan 2012 - 3:32 pm | प्रीत-मोहर

खल्लास फोटो!!!