इंग्लिश, हिंग्लिश आणि मन्गलिश

ए.चंद्रशेखर's picture
ए.चंद्रशेखर in काथ्याकूट
7 Dec 2011 - 7:56 am
गाभा: 

आंतरजालावर सध्या गाजत असलेल्या 'कोलवेरी डी' या गाण्याबद्दल बोलताना या गाण्याचे गायक धानुष यांनी हे गाणे टंग्लिश या भाषेत असल्याचे सांगितले आहे. टंग्लिश ही कोणती भाषा? याचा खुलासा करताना, तमिळ ढंगाने उच्चारलेले इंग्रजी शब्द या गाण्यात असल्याने या गाण्याची भाषा टंग्लिश आहे असे आपण म्हणतो आहोत असे त्यांनी सांगितले आहे. तसे बघायला गेले तर जगातल्या ज्या ज्या देशात इंग्रजी भाषा बोलली जाते त्या सर्व देशात (अर्थातच इंग्लंड हा देश सोडून) त्या देशाची खास इंग्लिश भाषा तयार झालेली आहे. अगदी अमेरिकेतील अमेरिकन इंग्लिश पासून सिंगापूर मधील सिंग्लिश, चिनी लोक बोलतात किंवा ज्या भाषेत ते इंग्रजीचे खून पाडतात ती चिंग्लिश अशा अनेक इंग्रजी आहेत. इंग्लंडचे घट्ट शेजारी असलेले आयर्लंड किंवा स्कॉटलंड हे देशही त्यांची स्वत:ची इंग्रजी भाषा बोलत असतात.
असे असताना भारतात बोलली जाणारी इंग्रजी भाषा साहेबाच्या मूळ भाषेसारखी असेल हे संभवनीयच नाही. त्यामुळे भारतात सुद्धा हिंग्लिश, मराठी- इंग्लिश, गुज्जु- इंग्लिश, कन्नड-इंग्लिश वगैरे उप भाषा आहेतच. त्यात ही टंग्लिश पण आली आहे. परंतु साहेबाच्या मूळ भाषेतील शब्द देशी ढंगाने म्हणत इंग्रजीत बोलणे( उदा.इंग्रजीतील स्नॅक हा शब्द गुज्जु श्टाइलने स्नेक असा उच्चारणे.) आणि ते मूळ इंग्रजी शब्द खुशाल आपल्या देशी भाषेत घुसडून देऊन एका धेडगुजरी भारतीय भाषेत संभाषण करणे किंवा लेखन करणे यात बराच फरक आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोड्याच वर्षांत दिल्लीच्या राज्यकर्त्यांना आपला देश स्वतंत्र झाला आहे तरी आपण इंग्रजीचे भूत डोक्यावर घेऊन वावरतो आहोत असा साक्षात्कार झाला व प्रोफेसर रघुवीर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सरकारने स्थापन केली व राज्य कारभारात इंग्रजीच्या ऐवजी हिंदीचा वापर सुरू करण्यासाठी एक शब्द कोश निर्माण करण्याचे ठरवण्यात आले. प्रोफेसर. रघुवीर यांनी अत्यंत परिश्रमाने असा एक शब्द कोश बनवण्यात यश मिळवले या शब्द कोशातील अनेक शब्द अतिशय जडबंबाल व विनोदी होते असे मला आठवते. रेल्वे इंजिनला अग्निरथ सारखे शब्द या समितीनेच सुचवले होते. या शब्दांचा वापर सुरू झाल्यावर हिंदी शुद्ध झाली खरी पण ती बहुतेक लोकांना आणि विशेषत: परप्रांतीयांना तर समजेनाशीच झाली. त्यामुळे इंग्रजीची हकालपट्टी होण्याची प्रक्रिया जी थांबली ती थांबलीच.
जी गोष्ट इंग्रजीची, तीच मराठीची आहे. काही मंडळींना मराठीवर इंग्रजीचे आक्रमण होत आहे असा साक्षात्कार मधून मधून होत असतो. आंतरजालावर सुद्धा अशी मंडळी बरीच आहेत. कॉम्प्युटर या शब्दाला संगणक हा शब्द रूढ आहे व तो वापरला तरी फारसे बिघडत नाही. पण कीबोर्डला कळफलक , माऊसला, उंदीर किंवा क्लिक या शब्दाला टिचकी हे प्रतिशब्द वापरले की वाचणार्‍याचा गोंधळ हा होतोच. इंग्रजी भाषा ही जगात सर्वात जास्त लिहिली व वाचली जाणारी भाषा आहे. ब्रिटिश साम्राज्य हे जरी याचे ऐतिहासिक कारण असले तरी इतर भाषांतील शब्द शोषून घेऊन त्यांना आपलेसे करण्याचे या भाषेचे जे एक वैशिष्ट्य आहे त्यामुळेच ही भाषा या स्थानाला जाऊन पोचली आहे. गुरू, बझार या सारखे भारतीय शब्द आता इंग्रजी बनले आहेत ही याची सहज आठवणारी उदाहरणे आहेत. दर वर्षी ऑक्सफर्ड हे पुस्तक प्रकाशक या वर्षी कोणकोणते नवीन शब्द इंग्रजीत आले आहेत याची मुळी एक यादीच प्रसिद्ध करते.
इंग्रजी भाषा जर नव्या नव्या शब्दांचा अंतर्भाव इतक्या सहज रित्या करू शकते तर मराठीमध्ये निदान प्रचलित तांत्रिक शब्दांना प्रतिशब्द शोधत बसण्यापेक्षा आहेत तेच शब्द आपण मराठीमध्ये ओढून घेऊन त्यांचा वापर का अधिकृत का करत नाही हे मला समजत नाही. भाषा सोपी ठेवा. लोकांना समजेल अशी ठेवा. म्हणजे ती वापरली जाईल हे अगदी साधे सूत्र आहे.
दिल्लीच्या केन्द्र सरकारने नुकताच एक आदेश काढून क्लिष्ट हिंदी शब्दांचा वापर करण्याऐवजी प्रचलित इंग्रजी शब्दांचा वापर सरकारी पत्रव्यवहारात करण्यास परवानगी दिली आहे. या संबंधी काढलेल्या परिपत्रकात गृहखात्याने स्पष्ट कबूली दिली आहे की "सरकारी कामकाजामध्ये भाषांतरासाठी हिंदीचा वापर करणे कठीण आणि गुंतागुंतीचे ठरते आहे. भाषांतरात पर्यायी इंग्रजी शब्दांचा वापर तातडीने सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. भाषांतरातून मूळ मुद्यांचा नेमका अर्थ लोकांपर्यंत पोचणे आवश्‍यक आहे. प्रत्येक इंग्रजी शब्दाला हिंदी प्रतिशब्द वापरणे म्हणजे भाषांतर नव्हे. " याची काही उदाहरणे या परिपत्रकात दिली आहेत. "प्रत्याभूती" सारख्या क्‍लिष्ट शब्दाला "गॅरंटी”, "कुंजीपटल" या शब्दाला "कीबोर्ड”, "संगणक" ऐवजी "कॉम्प्युटर" हे शब्द वापरावे असे हे परिपत्रक म्हणते आहे.
मध्यवर्ती सरकारने इंग्लिश ऐवजी "हिंग्लिश" वापरा अशी दिलेली ही सूचना कार्यालयीन पत्रव्यवहार समजण्यास सुलभ करेल याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही.
याच धर्तीवर निदान आंतरजालावर उपयोगात आणल्या जाणार्‍या मराठी लेखनात तरी, शुद्धतेचा अवास्तव बडेजाव न मांडला जाता, रोजच्या व्यवहारातील प्रचलित इंग्रजी शब्द त्यात वापरले जातील अशी मला आशा वाटते. निदान माझ्या लेखनात तरी मी हे करतोच आहे व करत राहीनच.

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

7 Dec 2011 - 9:50 am | सोत्रि

सहमत!

प्रत्याभूती हा शब्दाचा अर्थ आज कळला आणि त्याचा अर्थ 'गॅरंटी' हे वाचून गार झालो.
अनुभूती संदर्भात काहीतरी असावे असे वाटत होते आजपर्यंत :)

असो, मराठी भाषेनेही खुप फारसी शब्द आपलेसे केले आहेत आणि ते आजच्या पिढीला मराठी नाहीत हे सांगूनही पटणार नाहीत इतके ते आपलेसे झालेले आहेत.

त्यामुळे उगीचच मराठीचा बाऊ करून रुळलेल्या प्रत्येक इंग्रजी शब्दाला नियम म्हणुन प्रतिशब्द शोधून वापरणे म्हणजे जरा अतिरेकच आहे असे मला वाटते. त्यामुळे रोजच्या व्यवहारातील प्रचलित इंग्रजी शब्द तसेच वापरले जावेत ह्या मुद्द्याशी सहमत.

- (पुरोगामी) सोकाजी

५० फक्त's picture

7 Dec 2011 - 10:51 am | ५० फक्त

+२ टु सोकाजी.

या संदर्भात इथल्याच एका सदस्याची स्वाक्षरी आठवली, पक्की डोक्यात बसलेली आहे.

'' पास हा इंग्रजी शब्द असेल तर नापास हा कोणत्या भाषेतला असेल ?

नगरीनिरंजन's picture

7 Dec 2011 - 11:04 am | नगरीनिरंजन

आणि ढोबळमानाने सहमत आहे. ज्या गोष्टींना आपल्या भाषेत शब्दच नाहीत ते शब्द परकीय भाषेतून जसेच्या तसे घेण्यास काहीच प्रत्यवाय नसावा.
पण आपल्या भाषेत शब्द असतानाही परकीय भाषेतला शब्द वापरण्याला मात्र विरोध केलाच पाहिजे.
आजकाल बरेच लोक हिराठी बोलतात म्हणजे हिंदाळलेलं मराठी. त्यात मग प्रेक्षकांना दर्शक म्हणणे वगैरे प्रकार केले जातात, ते मलातरी अजिबात आवडत नाही.

प्रभाकर पेठकर's picture

7 Dec 2011 - 11:08 am | प्रभाकर पेठकर

प्रचलित तांत्रिक शब्दांना प्रतिशब्द शोधत बसण्यापेक्षा आहेत तेच शब्द आपण मराठीमध्ये ओढून घेऊन त्यांचा वापर का अधिकृत का करत नाही हे मला समजत नाही. भाषा
तसा तो आपण करतच असतो. उदा. रेल्वे, स्टेशन, कप, कॉरीडोर इ.इ.इ.

कॉम्प्युटर या शब्दाला संगणक हा शब्द रूढ आहे व तो वापरला तरी फारसे बिघडत नाही. पण कीबोर्डला कळफलक , माऊसला, उंदीर किंवा क्लिक या शब्दाला टिचकी हे प्रतिशब्द वापरले की वाचणार्‍याचा गोंधळ हा होतोच.

मराठी शब्द न समजण्याचे कारण त्यांचा कमी किंवा अजिबात नसलेला वापर. संगणक हा शब्द रूढ आहे हे आपण स्विकारता. तो शब्द वापरात कधी पासून आला? आल्यापासून वरचेवर वापरला गेल्यामुळेच आता जवळ जवळ रूढ झाला आहे हे मान्य असावे. 'कळफलक', 'माऊस', 'उंदीर' हे शब्द ओढून ताणून आणलेले किंवा क्लिष्ट आहेत असे वाटत नाही. 'कळ' आणि 'फलक' हे दोन्ही शब्द वापरात होते, आहेत. त्यांच्याच संयुगाने 'कळफलक' हा शब्द वापरात आला. चुकीचे काय आहे? 'उंदीर' आणि 'टीचकी' हे शब्द आजही वापरात आहेत. ते वापरण्यावर (लोकांना कळणार नाही, ह्या मुद्यावर) आक्षेप का असावा कळत नाही.

इंग्रजी भाषा ही जगात सर्वात जास्त लिहिली व वाचली जाणारी भाषा आहे

म्हणून आपली मातृभाषा सोडून इंग्रजीच्या मागे धावायचे हा अट्टाहास पटत नाही. तसेही, फ्रान्स, जर्मनी, चीन (आणि जगातील कित्येक छोट्या-मोठ्या देशांनी) इंग्रजीचे बोट न धरता आपाआपल्या राष्ट्रभाषेतच प्रगती केली आहे अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला आव्हान दिले आहे. भारतालाच इंग्रजीच्या कुबड्या का लागतात? कारण राष्ट्र्भाषेबद्दल, मातृभाषेबद्दल अनास्था.
अरबस्तानासारख्या मागास राष्ट्रांमध्येही 'चीझ'ला 'जीबन' (जीवन?), 'बटर'ला 'झुब्दा', 'चिकन'ला 'दिजाएच', 'फिश' ला 'समक', 'मटण'ला 'लहाम', 'एग'ला 'ब्येर' म्हणतात. त्यांचे कुठे अडत नाही. आपली ती भाषा नसूनसुद्ध आम्ही त्यातील किती तरी शब्द शिकलो आहोत. मग आपल्या माणसांना आपल्याच भाषेतील शब्द परके का वाटावेत?

भाषांतरातून मूळ मुद्यांचा नेमका अर्थ लोकांपर्यंत पोचणे आवश्‍यक आहे. प्रत्येक इंग्रजी शब्दाला हिंदी प्रतिशब्द वापरणे म्हणजे भाषांतर नव्हे. " याची काही उदाहरणे या परिपत्रकात दिली आहेत. "प्रत्याभूती" सारख्या क्‍लिष्ट शब्दाला "गॅरंटी”, "कुंजीपटल" या शब्दाला "कीबोर्ड”, "संगणक" ऐवजी "कॉम्प्युटर" हे शब्द वापरावे असे हे परिपत्रक म्हणते आहे.

सततच्या वापरातूनच शब्द रुढ होत जातात. मूळ मुद्याचा नेमका अर्थ लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असले तरी त्यासाठी आपली किंवा इतरांची नसलेली भाषा वापरून तो पोहोचवणं अनैसर्गिक वाटतं. जे शब्द क्लिष्ट वाटतात, जसे 'प्रत्याभूती' ते तसेच वापरून पुढे कंसात इंग्रजी शब्द द्यावा. ज्यायोगे अशा शब्दांचा अर्थ जनमानसात रूढ होत जाईल आणि काही वर्षांनंतर 'स्टेशन', 'सिग्नल' सारखाच तो सर्वांना समजणारा शब्द होईल. पण तसे न करता मराठी किंवा हिन्दी शब्दाच्या जागी इंग्रजी शब्द वापर सुरू केला तर आहेत ते शब्दही (आणि पर्यायाने भाषा) विस्मृतीत जाईल.

आता स्टेशनला 'अग्नीरथ स्थानक' (नुसते 'स्थानक' तर वापरात आहेच), 'सिग्नल' ला 'सूचकपट्टी' वगैरे शब्द नका वापरू पण नवनवीन इंग्रजी शब्दांचा स्विकार करून, मातृभाषेची,राष्ट्रभाषेची (तशी ती असेल तर) गळचेपी का करावी?

ह्या विषयावर बरीच चर्चा करता येईल. सध्या, माझा मुद्दा (मराठीतून) पटवायला एवढे पुरेसे आहे असे वाटते.

कपिलमुनी's picture

8 Dec 2011 - 10:34 am | कपिलमुनी

आगगाडी ..
एवढा साधासरळ शब्द आहे..
गॅरंटीला खात्री ...

उच्च शब्द्च प्रतिशब्द असावे असे नाही ..

इस्राईल मधे त्यांनी हिब्रु चे पुनरुज्जीवन केले..तसेच आपण मराठीचे केले पाहिजे.

प्रभाकर पेठकर's picture

8 Dec 2011 - 11:16 am | प्रभाकर पेठकर

हल्ली 'आग' उरली नसल्याने नुसते 'गाडी' कसे वाटते?

मोटरबाईकला पूर्वी 'फटफटी', कार्पेटला 'जाजम', पँटला 'विजार', हाफ पँटला 'अर्धी विजार' किंवा 'अर्धी चड्डी' म्हणायचे. हे सर्व शब्द फार भारी होते. आता नामषेश झाल्यात जमा आहेत. काय करणार मन मोठे करून घरातल्या कुटुंबियांना बाहेर काढून परक्यांना छत्र उपलब्ध करून दिले नाही तर तथाकथित समाज आपल्यावर 'कोत्या मनाचा' असा शिक्का मारेल अशी भिती वाटते.

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Dec 2011 - 1:20 pm | llपुण्याचे पेशवेll

. काय करणार मन मोठे करून घरातल्या कुटुंबियांना बाहेर काढून परक्यांना छत्र उपलब्ध करून दिले नाही तर तथाकथित समाज आपल्यावर 'कोत्या मनाचा' असा शिक्का मारेल अशी भिती वाटते.
सहमत. पूर्वी आम्हाला कससंच व्हायचं पण आता ऑकवर्ड व्हायला होतं.
ब्रिटीशांनी इंग्रजी लोकप्रिय केली. ती भाषा काही फक्त गुरु, चाय असे २ - ३ परकीय शब्द घेऊन सर्वतोमुखी झाली असेल असे वाटत असेल तर तो खुळचट पणा आहे असे वाटते. मुख्यतः ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनी त्यांची भाषा ज्या पद्धतशिरपणे लादली ते पाहता तोच मार्ग कोणतीही भाषा रुजवायला चांगला असं वाटतं. आणि प्रचार हेच मुख्य तंत्र वापरायला पाहीजे. पूर्वीची मुंबईला बॉम्बे म्हणणारी परप्रांतीय पिढी अजूनही बॉम्बेच म्हणते. पण त्यांची नवी पिढी मुंबई म्हणू लागली आहे.
आमचा येड** मुख्यमंत्रीच सातार्‍याला सतारा म्हणत असेल तर बाकीचे कशाला त्याला सातारा म्हणतील.

पेट्रोल्, पेन्,बटन हे शब्द रुळलेले आहेत, काही अजून् रुळत आहेत हे ठिकच आहे.नवीन पण् जो येइल् तो शब्द जसाच्या तसा उचलणे पटत नाही.
पूर्वी "मेयर" ला प्रतिशब्द् सुचत नसताना "महापौर" हा शब्द सावरकरांनी दिलाच ना.
जमेल तितपत इथलेच शब्द् वापरावेत. अनुज्ञप्ती व् प्रशासन पेक्षा परवाना व सरकार हे रुळलेले शब्द ठिक वाटतात.
असेच शब्द् वापरावेत, "कुंजीपटल" वाटला नाही.दुसर्या एका स्थळावर शीच सचर्चा सुरु असताना, हिंग्लिशचा भडिमार करण्याचे उदाहरण म्हणून हा प्रतिसाद दिला होता:-

फ्रेश सब्जेक्ट आणि सिम्पल प्रेझेंटेशन बद्दल आणखी काय कमेंट देणार?
केवळ आयडियाशीर स्टाइलने केलेले रायटिंग फंटास्टिक म्याच झालय.
ही वरची दोन सेंटंन्स इंटरप्रीट करीत बसल्याने तुमच्या ब्रेनचे भुसभुशीत बर्गर बनल्यास प्रस्तुत रायटर (म्हंजे मी)
कलप्रिट नसुन वाचणारे रीडर्सच स्टुपिडिटी प्रदर्शन करताहेत असे प्रूव होते.

ह.घ्या् हे.वे.सां . न.ल.

रूटला हँड घालुन थिंक केलं तर माइंडमध्ये येइल की आपल्या लँग्वेजमधुन कम्युनिकेट करण्यासाठी एखाद्या अदर लँग्वेजचा सपोर्ट घेणं किती शेमास्पद आहे ते.

अरे तुम्हाला काय आयडेंटिटी आहे का नाय?

तुम्हा ऑलचा थ्री वार
प्रोस्टेट
प्रोटेस्ट
प्रोटेस्ट

युवर्सचाच,
माइंडोबा
(मनोबा)

--मनोबा

तिमा's picture

7 Dec 2011 - 5:16 pm | तिमा

चांगले मराठी शब्द असताना मराठीच वापरले पाहिजेत. ते जिथे नाहीयेत तिथे इंग्रजी वापरतातच.
पण उगाच 'आमचं ब्रदर इन लॉ' आलं होतं,' असले मराठी बोलू नये.

अवांतरः -
१. पूर्वी "मेयर" ला प्रतिशब्द् सुचत नसताना "महापौर" हा शब्द सावरकरांनी दिलाच ना.

पण समस्त महापौरांनी आपल्या वागण्याने त्याला 'महापोर' करुन टाकले.

२. 'माय मराठी' या शब्दातल्या माय चा अर्थ इंग्रजी माध्यमातून शिकलेली पोरं कसा घेतील ?

मन१'s picture

7 Dec 2011 - 5:51 pm | मन१

My मराठी बद्दलचे निरिक्षण बेहद्द आवडले.
असेच एकदा आम्हा फ्रेशर्सच्या(नवशिक्यांच्या) एका संवादात एक जण Un do ही कमांड ऐकल्यावर फस्सकन हसला होता. ते आथवले. बोलणार्‍याने इंग्लिश मध्ये बोलले होते. ऐकणार्‍याने मराठित "अंडू "असे ऐकले होते.

चिरोटा's picture

7 Dec 2011 - 12:58 pm | चिरोटा

वाचनिय लेख. मराठी भाषेनेही ईतर भाषांमधील शब्द आपलेसे केले आहेत. आत्या,आजी,कडबोळे हे शब्द मूळचे कन्नड आहेत. बाजार,खवा हे मूळचे फारसी आहेत.

भारतालाच इंग्रजीच्या कुबड्या का लागतात? कारण राष्ट्र्भाषेबद्दल, मातृभाषेबद्दल अनास्था.

माझ्यामते हे कारण नसून ब्रिटिश सत्तेत असताना भारतिय भाषा सर्वांगाने विकसित झाल्या नाहीत हे आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजीचे महत्व वाढतच गेले. सरकारी नोकरी असो वा मोठा धंदा, इंग्रजीचे सहाय्य घेतल्याशिवाय करणे अशक्य झाले. कालांतराने आजुबाजुचे जग आणि भारतिय भाषा ह्यात मोठी दरी निर्माण झाली.

प्रभाकर पेठकर's picture

7 Dec 2011 - 1:32 pm | प्रभाकर पेठकर

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजीचे महत्व वाढतच गेले.

वाढत नाही गेले वाढविले गेले. असो. इंग्रजी शिकण्याबद्दल, बोलण्याबद्दल आक्षेप नाही. पण त्यासाठी मातृभाषेचा, राष्ट्रभाषेचा गळा घोटणे ह्याला आक्षेप आहे. इंग्रजीचे महत्त्व आहे ह्या बद्दल दुमत नाही. पण आपली भाषाही तितकीच जीवंत ठेवा असा आग्रह आहे. शेजारच्या सुंदर बाईचे जरूर कौतुक करा पण आपल्या आईकडे अक्षम्य दुर्लक्ष करू नका हे सांगण्याचा प्रयत्न आहे.

सरकारी नोकरी असो वा मोठा धंदा, इंग्रजीचे सहाय्य घेतल्याशिवाय करणे अशक्य झाले.

असं अजिबात नाही. केरळ, पंजाब, गुजराथ ह्यांनी काय प्रगती नाही केली? तिथे स्थानिक भाषेलाच प्राधान्य आहे. भारताची आर्थिक राजधानी मुंबई. ती सुद्धा गुजराथी व्यापार्‍यांनीच भरभराटीस आणली. आजही व्यापार उदीम त्यांच्याच हाती आहे. आणि तो ते त्यांच्या भाषेतूनच करतात. इंग्रजीत नाही. आजही गुजराथी व्यापार्‍यांचे कोटी-कोटीचे व्यवहार गुजराथीतूनच चालतात.

विवेकखोत's picture

7 Dec 2011 - 2:11 pm | विवेकखोत

आहे आजकाल लोकल किवा बस मध्ये एक मराठी माणूस दुसऱ्याला हिंदीत बोलतो,
पण तेच मी मराठवाड्यात गेलो तर कुणी हि बोलायची सुरुवात मराठी मध्ये करतात म्हणजे आमच्या गावाकडे मारवाडी, मुस्लीम व इतर कुणी असखलित मराठी बोलतात .पण मुंबई पुणे ह्या भागात असे काही नजरेस पण पडत नाही

मी-सौरभ's picture

9 Dec 2011 - 6:46 pm | मी-सौरभ

मुंबईत असे होत असेल पण आमच्या पुण्यात असे होत नाही बरं का.....

बिनकामाचं पुणेकरांच्यावर आरोप करु नका....

किचेन's picture

7 Dec 2011 - 2:26 pm | किचेन

मराठीमाधले अनेक शब्द फारसी,अरबी,हिंदी संस्कृत मधून आले आहेत.तसेच इंग्रजी मधले आले तर काय फरक पडतो?
इंग्रजीनेही आपला 'अवतार' हा आहे तसा स्वीकारला न मग?
उंदराला टिचकी मार! किवा माझा उंदीर चालत नाहीये.हे बोलल्यावर किती गोंधळ उडेल.
काही दिवसांपूर्वी सावरकरांचं काळे पाणी वाचायला घेतलं होत.पण भाषेत एवढा फरक पडला कि एक पान वाचायला २ तास लागले.

नॉट अ बिग डील.आणि जर पटत नसेल तर नॉट अ बिग दिल!

परिकथेतील राजकुमार's picture

7 Dec 2011 - 6:29 pm | परिकथेतील राजकुमार

उंदराला टिचकी मार! किवा माझा उंदीर चालत नाहीये.हे बोलल्यावर किती गोंधळ उडेल.

त्यातून काही लोक 'उंदीर' ह्या शब्दाला 'रुपक' समजले तर अजून गोंधळ. ;)

वपाडाव's picture

8 Dec 2011 - 11:49 am | वपाडाव

शिंच्या, ठारलो नै का मी?

तुझ्याकड्चा पोट धरुन हसणारा चेहरा उधार देतो का?

सहमत्त

खूप खूप खूप डोक्यात जाणारे शब्द म्हणजे तूनळी (युट्युब) आणि चेहरा पुस्तक (फेसबुक). हे शब्द वापरणार्‍यावर हसूही येत नाही. मराठी शब्द वापरा पण ते समजतील असे वापरा. डोकं गहाण ठेऊन केलेली भाषांतरे डोक्यातच जातात.

नगरीनिरंजन's picture

8 Dec 2011 - 1:45 pm | नगरीनिरंजन

YouTube आणि Facebook हे शब्द ऐकून इंग्रजांना त्रास झाला असेल का अशी एक शंका आली.

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Dec 2011 - 1:29 pm | llपुण्याचे पेशवेll

अगदी अगदी. माऊसला जो गोरा सगळ्यात पहील्यांदा माऊस म्हणला असेल त्यालाही लोक असेच हसले असतील, असा विचार मनात येऊन गेला.

इंग्रजीने नवे शब्द इंग्रजी भाषेत न रुळवता त्या शब्दांचे इंग्रजी पर्यायी शब्द वापरायचे ठरवले असते तर इंग्रजी चे काय झाले असते?
इतर भाषांमधील नवे शब्द आत्मसात करुनच कोणतीही भाषा समृद्ध होत असते.
अर्थात प्रत्येक भाषा परीपूर्ण असते असे नाही. उदा: द रोड वॉज नोट मोटरेबल ...इट वॉज जीपेबल याचे शब्दशहः मराठीत भाषांतर करणे कठीण आहे.... तसेच "आमच्या हीच्या हातचे थालिपीठ " हे देखील इंग्रीजीत आणणे कठीण आहे.
स्नो , आइस यातील फरक नुसते बर्फ म्हणून समजणार नाही.
इंग्रीजीत ग्रीक भाषेतील बरेच शब्द आहेत. ( शब्द या अर्थाचा "अब्द" हा शब्द ग्रीक मध्ये आहे म्हणे.)
मराठीत तर आसपासच्या गुजराथी /कानडीतील बरेच शब्द आलेले आहेत. या सगळ्याच शब्दांची हाकालपट्टी करायची तर मग शुद्ध मराठी आणणे अशक्यच बनेल
इंग्रजीतील शब्द मराठीत यणार असतील तर येवु द्याना. त्यामुळे मराठी शब्दात नवी भर पडत असेल तर काय हरकत आहे?
उगाचच अग्नीरथ आवकजावक नियम्त्रक ताम्र हरीत लोह पट्टीका चे अवजड डब्यांची आगगाडी कशाला. शासकीय हिंदी /मराठी आम जनतेला उमजत नाही. जी सर्वसामान्य माणसाना कळत नाही त्याला भाषा कशाला म्हणायचे?

कोणतीही भाषा ही एखाद्या नदीप्रमाणे असते. नदीला अनेक उपनद्या, ओढे-नाले, झरे येऊन मिळतात आणि अंतिमत: एक मोठा जलौघ काठाकाठांवर संस्कृती फुलवत पुढे जातो. भाषेचेही तसेच आहे. तिला वेगवेगळ्या बोलीतील शब्द मिळतात तेव्हा ती अधिकाधिक समृद्ध होत जाते. इंग्रजी भाषेने जगातील अनेक भाषांमधील शेकडो शब्द आपल्यात सामावून घेतले असल्याने आज तिला वैश्विक व विराट रुप प्राप्त झाले आहे. मराठीचेही असेच आहे. संस्कृत, प्राकृत, फारसी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, कन्नड अशा अनेक भाषांतील शब्द मराठीने सहज आत्मसात केले आहेत. जेवढ्या शब्दच्छटा जास्त तेवढी ती भाषा परिपूर्ण होत जाते.

त्यामुळे कॉम्प्युटर म्हणायचे, की संगणक यात वादाचा मुद्दा येऊ नये. प्रत्येकाने सोईचे स्वीकारावे. कळफलक ऐवजी 'की बोर्ड' सोईचा. मला तर वैयक्तिक असे वाटते, की जेथे जागेची, अक्षरांची बचत होते आणि सोपेपणा येतो ते लघुरुपही स्वीकारायला काही हरकत नाही म्हणजे संगणक किंवा कॉम्प्युटर याऐवजी कॉम्प म्हटले तरी चालेल. अर्थात धन्यवादचे धन्स किंवा धन्यु हे लघुरुप मला आवडत नाही. त्याऐवजी आभार हा शब्द लिहिला तरी पटावा. ज्या ज्या भाषेत असे मिताक्षरी शब्द आहेत ते वेळ वाचवतात. आमचे मित्र 'समर्थ मराठी' चळवळीचे पुरस्कर्ते अनिल गोरे एक छान उदाहरण देतात. चेकवर ७७७७७ रुपये ही रक्कम इंग्रजीत अक्षरी लिहिताना Seventy Seven Thousand Seven Hundred Seventy Seven एवढी अक्षरे लिहित बसावे लागते. मराठीत तेच काम 'सत्त्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर' या चार शब्दांत होते. शब्दही वाचतात व धनादेशावरील जागाही वाचते.

'बोलेन तर केवळ मराठीच' आणि 'आम्ही काळे इंग्रज' अशा दोन्ही विचारसरणी मला सारख्याच नाटकी वाटतात. मिंग्लिश चालावी पण तीही हास्यास्पद नको. नाहीतर एका हिंदी गाण्याप्रमाणे 'हम तुमपे इतना डाईंग जितना सी मे पानी फ्लोईंग, आकाश में पंछी फ्लाईंग, भवरा बगियन में गाईंग' असली गंमत होते.

(अवांतर - आमच्या घराजवळ एक प्रखर मराठी भाषाभिमानी राहात होते. त्यांच्या शंभर टक्के मराठीच्या आग्रहाबद्दल त्यांची कुचेष्टा होई, पण ते आपला खाक्या सोडत नसत. तर त्यांनाही एका मुलीने चांगलेच गोंधळात पाडले. झाले असे, की त्यांच्या मुलाला एक मुलगी सांगून आली. मुलाने आधीच त्या लोकांना वडिलांबाबत कल्पना दिली होती. दाखवण्याचा कार्यक्रम सुरु असताना चौकशीदरम्यान या गृहस्थाने मुलीला विचारले, 'तू काय करतेस?' त्यावर ती म्हणाली, ' मी बँकेत क्लार्क आहे.' त्यावर ते गृहस्थ म्हणाले, 'बँक एकवेळ क्षम्य, पण क्लार्क का म्हणतेस? लिपिक आहेस असे सांग ना.' त्यावर ती मुलगी बावरली. मग यांनी दुसरा प्रश्न विचारला. 'तुझा टंकलेखनाचा वेग किती आहे?' त्यावर तिने उत्तर दिले, 'शब्द निमिषमात्र' या उत्तराने भावी सासरेबुवा गोंधळले. ते विचारु लागले म्हणजे काय? त्यावर ती मुलगी म्हणाली, 'निमिष म्हणजे पापणी लवण्याचा काळ म्हणजे एक सेकंद. मी सेकंदाला एक शब्द म्हणजे मिनिटाला ६० शब्द टंकित करते.' मग हे गृहस्थ गप्प बसले.)

मराठी_माणूस's picture

7 Dec 2011 - 3:11 pm | मराठी_माणूस

अवांतरा मधला विनोदी भाग सोडला तर त्या मराठीचा आग्रह धरणार्‍या व्यक्ती बद्दल आदरच वाटतो. त्यांची कुचेष्टा करणार्‍या व्यक्ती स्वतःचे मराठीचे अज्ञान झाकण्यासाठी तसे करत असतील.
त्या मुलीचे हजरजबाबी उत्तरही आवडले, अर्थात हे तिच्या मराठीच्या ज्ञानामुळेच शक्य झाले.

भवरा बगियन में गाईंग'

मी भवरा बनियन मे गाइंग ...अस वाचल.

आनंदी गोपाळ's picture

8 Dec 2011 - 7:59 pm | आनंदी गोपाळ

बनियन मे गोइंग
असं असेल ते

प्रभुजी,

तुझा प्रतिसाद ह्या धाग्यावर येणार हे नक्की होते आणि वाटच बघत होतो.
मस्त प्रतिसाद! सहमत!

अवांतर ही अवांतर वाटू नये इतके चपखल.

- ('प्रभु'पंखा) सोकाजी

चिरोटा's picture

7 Dec 2011 - 3:15 pm | चिरोटा

आजही व्यापार उदीम त्यांच्याच हाती आहे. आणि तो ते त्यांच्या भाषेतूनच करतात.

बनिया लोकांबद्दल,प्रोविजन स्टोर्स बद्दल नाही तर मोठ्या उद्योगधंद्यांबद्दल मी म्हणतोय. रिलायन्सवाले सगळा कारभार गुजरातीतून करु शकतील ? शेयर दलाल जे सॉफ्टवेयर वापरतात ते सगळे गुजरातीत असते?

प्रभाकर पेठकर's picture

7 Dec 2011 - 7:58 pm | प्रभाकर पेठकर

मी सुद्धा बनिया आणि प्रोव्हीजन स्टोअर्स बद्दल बोलत नसून घाऊक व्यापारी आणि मोठमोठ्या पतपेढ्यांबद्दल बोलत आहे.
माझ्याच एका प्रतिसादातील खालील वाक्य आपल्या नजरेतून निसटलेले दिसते आहे.

इंग्रजी शिकण्याबद्दल, बोलण्याबद्दल आक्षेप नाही. पण त्यासाठी मातृभाषेचा, राष्ट्रभाषेचा गळा घोटणे ह्याला आक्षेप आहे. इंग्रजीचे महत्त्व आहे ह्या बद्दल दुमत नाही. पण आपली भाषाही तितकीच जीवंत ठेवा असा आग्रह आहे.

इंग्रजीवर बहिष्कार घाला किंवा इंग्रजी अनावश्यक आहे असे मी म्हंटलेलेच नाही.

सर्वसाक्षी's picture

7 Dec 2011 - 4:23 pm | सर्वसाक्षी

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. पण इंग्रजी शब्दाला पर्यायी आणि क्लिष्ट वा उच्चारायला अवघड नसलेले मराठी शब्द जर उपलब्ध असतील वा तयार करता येत असतील तर ते वापरायचे नाहीच असे का?

एखादा शब्द नवा असणे यात गैर काय? प्रत्येक गोष्ट कधी ना कधी नविन असतेच. ती रुळली की सवयीची होते. सरकारी कचेरीत क्लिष्ट सरकारी शब्दांना लोकांनी मस्त शब्द काढले आहेत. ते इंग्रजी शब्दांचे प्रत्यक्ष भाषंतर नसले तरी योग्य अर्थाचे आहेत व म्हणुन बरोबर आहेत. उदा- साहेबानी मेमो दिला (ईग्रजी)/ साहेबांनी ज्ञाप दिला (क्लिष्ट)/ साहेबांनी बांबु दिला (बोली)

वायपर - काचपुशे
हँगर - टांगणी
स्टेपलर - टाच्या

संगणक, भ्रमण्ध्वनी हे शब्द रुढ झाले आहेत ते स्विकार व वापर यामुळेच.

मराठी शब्द वापरण्यास लाज वा कमीपणा का वाटावा? सुबक म्हटल तर गावठी आणि क्युट म्हटल तर आधुनिक असे का? आमटी म्हटले तर कमीपणा आणि करी म्हणजे भारीतली हे कसे?

सहज बोलताना अरे वा! ते बाळ किती गोंड्स आहे असे न म्हणता वॉव! ते बेबी किती क्युट आहे असे म्हणणे हे प्रवाही व समृद्ध भाषेचे लक्षण आहे का?

हा न्युनगंड का असावा?

क्ष-किरण हे सगळ्यांनाच समजणार नाही कारण एक्स रे हा अधिक वापरला जाणारा शब्द आहे. मग जर इस्पितळात 'क्ष किरण' (एक्स रे) अशी पाटी लावली तर कालांतराने तो शब्द परिचित होईलच. वैद्यकिय, संगणकिय, अभियांत्रीकी वगैरे शिक्षण हे मुळात पश्चिमात्य देशातुन आलेले व पर्यायाने ईंग्रजी अभ्यासक्रमातुन शिकविले जात असल्याने त्या क्षेत्रातले तांत्रिक शब्द इंग्रजी असणे स्वाभाविकच आहे पण म्हणुन पर्यायी शब्द नसावेतच असा अट्टाहास का? इंजेक्शन ला सुई टोचणे हा शब्द सर्वज्ञातच नव्हे तर वापरातही आहे.

केल्याने होत आहे रे. आधी केलेची पाहिजे. तुम्हाला इंग्रजीच शब्द वापरायचे असतील तर खुशाल वापरा पण किमान मराठी बोलणार्‍या वा मराठी शब्द प्रयत्नपूर्वक वापरु पाहणार्‍यांची टवाळी तरी उडवु नका.

दादा कोंडके's picture

7 Dec 2011 - 7:33 pm | दादा कोंडके

भ्रमणध्वनी वगैरे शब्दांना पण सुरुवातीला हसली असतील लोकं, पण आता रुळलेले शब्द आहेत हे. भाषा प्रवाही असली तर टिकते ठिक आहे पण कुठेतरी वाचल्याप्रमाणे, "मम्मी, माझं पेन मी कुठं किप केलं होतं हे रिमेंबरच होत नाही" याला मराठी म्हणायचं का?

आणि आजुबाजूला बघायचं झालं तर, मराठीचा अतिरेकी हस्यास्पद वापर कारणार्‍यांपेक्षा हे असलं इंग्रजाळलेलं धेडगुजरी मराठी बोलणारेच जास्तं आहेत, त्यामुळे आक्षेप घायचा तर हे असल्या लोकांच्या मराठीवर.

"सरकारी कामकाजामध्ये भाषांतरासाठी हिंदीचा वापर करणे कठीण आणि गुंतागुंतीचे ठरते आहे. भाषांतरात पर्यायी इंग्रजी शब्दांचा वापर तातडीने सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. भाषांतरातून मूळ मुद्यांचा नेमका अर्थ लोकांपर्यंत पोचणे आवश्‍यक आहे. प्रत्येक इंग्रजी शब्दाला हिंदी प्रतिशब्द वापरणे म्हणजे भाषांतर नव्हे. " याची काही उदाहरणे या परिपत्रकात दिली आहेत. "प्रत्याभूती" सारख्या क्‍लिष्ट शब्दाला "गॅरंटी”, "कुंजीपटल" या शब्दाला "कीबोर्ड”, "संगणक" ऐवजी "कॉम्प्युटर" हे शब्द वापरावे असे हे परिपत्रक म्हणते आहे.

हे सरकारच्या लक्षात आले हे उत्तमच झाले. भाषा हा विषय अंगठेबहाद्दर ते तथाकथित बुद्धीजीवांपर्यंत सारख्याच जिव्हाळ्याचा असला तरी हे बुद्धीजीव ज्यावर जोर देतील तेच प्रचलित राहणार.
इतर क्षेत्रांचे सोडा, साहित्यविषयक भाषाव्यवहारातच मूळ इंग्रजी शब्दांना मारुन मुसलमान करता येणार नाही हे सरकारला उमगले आणि तसे परिपत्रक निघाले ही आनंदाचीच गोष्ट आहे - पण ज्या वेगाने भाषेचा प्रवाह धोधाट वाहतो (आणि आमच्या धंद्यामुळं आम्हाला तो जरा जास्तच जाणवतो) त्याच्याशी तंतोतंत जुळवून घेण्यात आणि त्याला राजमान्यता, लोकमान्यता मिळण्यात प्रचंड कालहरण होते (तेवढ्यात भाषेचे लोकमान्य वस्त्रहरण इच्छा नसूनही कित्येकांच्या हातून होऊन जाते) त्यामुळे बाबा वाक्यं प्रमाणं नुसार आमच्यासारख्या शब्दांवर गुजारा करणार्‍यांना आणखी काही वर्षे पाट्या टाकत बसावे लागणारच हे निश्चित आहे.
बदलावर सर्वमान्य शिक्कामोर्तब करणारे आणि त्याच्या वापराला लोकमान्यता देणारे कोणतेही व्यासपीठ मला वाटते मराठीत तरी उपलब्ध नाही. त्यातच सध्या उफाळून आलेल्या भाषिक अस्मितेला समजून घेण्यात होत असलेल्या गैरसमजापोटी या अस्मितेला भाषा वृद्धींगत करण्याच्या कामी नव्हे तर ती आणखीच बोजड करण्याच्या कामी खर्ची पडावे लागत आहे ( आम्हाला customize ला 'सानुकूलित' आणि update ला 'अद्यतनित' असले आणि असलेच कितीतरी मुळातच प्राण नसलेले शब्द वापरण्याची तोतयागिरी करावी लागते).

अनुवाद करताना दोन्ही भाषांचे आणि त्यात जन्माला आलेल्या शब्दापत्यांचे वय विचारात घेऊन आणि एकाच कालखंडात, एकाच अन्वयार्थगामी मुहूर्तावर त्यांचा जन्म झालेला असेल तर आणि तरच त्यांचा एकमेकांशी म्होतूर लाऊन देणे नाहीतर त्यांना तसेच्या तसे वळू म्हणून का होईना, स्वभाषेत घेणे कालसुसंगत ठरेल.

शेवटी जशी कुठल्याच मुद्यावर कधीच, कुठेही सर्वसंमती न होता आपापल्या वकूबानुसार गोष्टी होत रहातात तसेच हेही होणार हे स्पष्ट आहे.

मन१'s picture

8 Dec 2011 - 12:49 am | मन१

हा शब्द जाम आवडला बुवा. म्हणजे समोरच्याला अजिबात कळू नये ह्यासाठी आम्ही लोक जसं पी पी टी बनवून काही सांगितल्याचा आभास निर्माण करतो, अगदि तसाच.

शेवटी जशी कुठल्याच मुद्यावर कधीच, कुठेही सर्वसंमती न होता आपापल्या वकूबानुसार गोष्टी होत रहातात तसेच हेही होणार हे स्पष्ट आहे.

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Dec 2011 - 10:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चर्चा प्रस्ताव आणि प्रतिसादही वाचनीय.

-दिलीप बिरुटे
(केवळ वाचनापूर्ता उरलेला )

इंटरनेटस्नेही's picture

8 Dec 2011 - 4:54 am | इंटरनेटस्नेही

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी!

प्रभाकर पेठकर's picture

8 Dec 2011 - 1:39 pm | प्रभाकर पेठकर

जाहलो दुर्भागी आम्ही विसरतोय मराठी.

अद्यतनीत, अनुकुलीत
हे म्हण्जे लैच हुच्च झाल की

किचेन's picture

8 Dec 2011 - 6:35 pm | किचेन

मायबोलिच काय घेउन बसलात.आज्काल गावाकडची पोर पण आईला मम्मी च बोलतात.
आईला देखिल आई हाक मारल तर' डाउन मार्केट ' वाटत.

आईला देखिल आई हाक मारल तर' डाउन मार्केट ' वाटत.

हेच कारण असावं.
अन्यथा आजही इंग्रजी माध्यमात जाऊन 'आई', 'बाबा' अशीच हाक मारणारी अनेक उदाहरण आहेत.
एक तर माझ्या घरातच आहे.

बाकी मंग्लिश किंवा इंग्राठी बद्दल इतकच म्हणेन की अतिरेक कुठलाही असेनाका तो वाईटच.

किचेन's picture

10 Dec 2011 - 12:55 pm | किचेन

सहमत.पण पुर्णपणे नाहि.

हे सर्व वाचुन डोक्याला हेडॅक झाला..........

पक पक पक's picture

9 Dec 2011 - 9:59 pm | पक पक पक

बाकी आईला मम्मी म्हणणार्री परवडली ,पण मम्मी च मम्मे ,मम्म्यए अस काहि होत तेव्हा नाही ऐकवत......

किचेन's picture

10 Dec 2011 - 1:01 pm | किचेन

युरेका! कोलावरिचा अर्थ सापडला! कोलावरि म्हजे किलिंग गर्ल.
पण तरिहि 'होलि काउ' ह्यात काय करतिये हे कळल नाहि.

पक पक पक's picture

10 Dec 2011 - 2:28 pm | पक पक पक

तेवढाच अर्थ महत्वाचा, बाकि एकुणच निरर्थक महाकाव्य आहे ते.महाकाव्य अशासाठी की साक्षात रजनिकान्त देवाच्या जामातांनी गायलेले आहे म्हणुन..