डायरेक्ट टँक्स कोड (डिटिसी)
मंत्रीमंडळाने डायरेक्ट टँक्स कोड (डिटिसी) बील मंजूर केलेले असून, लोकसभेने मंजूरी दिल्यानंतर सध्या अस्तीत्वात असणा-या इंकम टँक्स अँक्ट १९६१ व वेल्थ टँक्स अँक्ट १९५७ रद्द होऊन त्याऐवजी हे बील अंमलात येईल. हे बिल आर्थीक वर्ष २०१२-१३ पासून म्हणजेच १ एप्रिल २०१२ पासून अंमलात येईल. या बिलामुळे होणारे महत्वाचे बदल खालीलप्रमाणे असणार आहेत.
इंकम टँक्सचे दर
सर्वच आयकर दात्यांसाठी हे महत्वाचे आहे. प्रस्तावीत दर खालील प्रमाणे असतील.
वय वर्षे ६५ पर्यंत असणा-या स्त्री व पुरूषांसाठी समान दर
उत्पन्न आयकर दर
रु.२,००,००० पर्यंत ०%
रु.२,००,००१ ते रु.५,००,००० १०%
रु.५,००,००१ ते रु.१०,००,००० २०%
रु.१०,००,००० पेक्षा जास्त ३०%
वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असणा-या स्त्री व पुरूषांसाठी समान दर
उत्पन्न आयकर दर
रु.२,५०,००० पर्यंत ०%
रु.२,५०,००१ ते रु.५,००,००० १०%
रु.५,००,००१ ते रु.१०,००,००० २०%
रु.१०,००,००० पेक्षा जास्त ३०%
महत्वाचे मुद्दे
• स्त्री व पुरूषांसाठी समान दर – फक्त जेष्ठ नागरीकांसाठी वेगळे दर असतील.
• हे दर स्थिर रहाणार असून दर वर्षी बजेटमध्ये यात बदल केला जाणार नाही कारण हा विषय बजेटमध्ये असणार नाही.
कलम ८०-सी खाली असणारी सवलतीबाबत:
नवीन बीलानुसार सध्या असणारी सवलत रु.१,५०,०००/- पर्यंत, दोन विभागात, वाढवली जाईल.
• रु.१,००,००० दिर्घ मुदतीचे गुंतवणूकीसाठी (मुख्यत्वेकरुन निवृत्तीसाठी केली जाणारी गुंतवणूक) ज्यात असेल नवीन पेंशन योजना (एनपीएस), भविष्य निर्वाह निधी (पीएफ), ग्रँज्युईटी इ.
• रु.५०,००० अन्य गुंतवणूक साधनांवर, ज्यात असेल शुध्द जीवन विमा (टर्म इंशुरन्स), आरोग्य विमा, मुलांसाठी दिलेले शैक्षणीक शुल्क इ.
Exempt-Exempt-Exempt (EEE):
तसेच प्रस्तावीत बीलात पीएफ, पीपीएफ इ. मध्ये असणारी – गुंतवणूक करताना मिळणारी सवलत – त्यापासून मिळणारे उत्पन्न – मुदतीअखेर मिळणरी करमुक्त सवलत ज्याला Exempt-Exempt-Exempt (EEE) असे म्हटले जाते, पुर्वीप्रमाणेच रहाणार आहे.
गृह कर्जावरील सवलत
गृह कर्जाची परतफेड करताना कर्जावरील रु.१,५०,००० पर्यंतचे व्याजाची सवलत पुर्वी प्रमाणेच मिळत राहील मात्र यापुढे मुदलात केल्या जाणा-या परतफेडीवर कोणतीही सवलत मिळणार नाही.
सुट्टीचे कालावधितील प्रवास भत्ता (LTA/LTC):
सुट्टीचे कालावधितील प्रवास भत्ता (LTA/LTC) यापुढेही पुर्वीप्रमाणेच चालू राहील, म्हणजेच ४ वर्षात दोन वेळा हि सवलत तुम्हाला मिळत राहील. फरक फक्त एवढाच आहे कि या नंतर एलटिए हा तुमच्या उत्पन्नाचा भाग असेल व तो फॉर्म-१६ मध्ये उत्पन्न म्हणून दाखवला जाईल व त्याची वजावट मान्य मर्यादेपर्यंत स्वतंत्रपणे घेता येईल.
वैद्यकीय खर्चापोटी मिळणारा परतावा:
यापुढे वैद्यकीय खर्चापोटी मिळणारा परतावा रु.५०,००० पर्यंत करमुक्त असेल व त्याहून जास्त असणारी रक्कम करपात्र उत्पन्न म्हणून गणले जाऊन त्यावर लागू असणारे आयकर दराप्रमाणे कर भरावा लागेल.
शैक्षणीक कर्जावरील व्याज:
शैक्षणीक कर्जावर दिलेले व्याजावर कर सवलत मिळेल मात्र याची मर्यादा डिटिसीमध्ये स्पष्ट केलेली नाही.
अल्प व दिर्घ मुदतीचा भांडवली नफा:
गुंतवणूकदारांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा हा विषय आहे. या पुढेही शेअर्स व इक्वीटी म्युच्युअल फंड योजनेतील गुंतवणूकीपासून मिळणारा दिर्घ मुदतीचा भांडवली नफा पुर्णपणे करमुक्त रहाणार आहे. तसेच यामध्ये कला व दागदागीन्यात केलेल्या गुंतवणूकीचाही अंतर्भाव केलेला आहे, त्यामुळे अशाप्रकारे मिळणा-या नफ्यावर कर भरावा लागणार नाही. तसेच उत्पन्नाच्या प्रमाणात अल्प मुदतीचा भांडवली कराचा दर ठरणार आहे हि बाब स्वागतार्ह आहे.
अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर खालील दरपत्रकानुसार कर आकारला जाईल.
उत्पन्न अल्प मुदतीचा भांडवली कराचा दर
रु.२,००,००० पर्यंत ०%
रु.२,००,००१ ते रु.५,००,००० ५%
रु.५,००,००१ ते रु.१०,००,००० १०%
रु.१०,००,००० पेक्षा जास्त १५%
संपत्ती कर:
यापुढे संपत्तीकर १% दराने आकारला जाणार असून पुर्वीची रु.१५,००,००० ची मर्यादा रु.१,००,००,००० (रु. एक कोटी) पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. संपत्ती कराची आकारणी करण्यासाठी दागदागीने, शहरी भागातील जमीन, इमारत, वाहन, परदेशात ठेवलेल्या बँक ठेवी, परदेशातील ट्रस्टमधील भांडवली गुंतवणूक, परदेशी कंपन्याच्या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक, रु.५०,००० पेक्षा जास्त किंमतीची घड्याळे, कलेच्या वस्तूत केलेली गुंतवणूक, रु.२,००,००० पेक्षा जास्त असणारी रोख हातशिल्लक या बाबींचा समावेश असणार आहे.
डिटिसी बीलामधील काही अनुत्तरीत प्रश्र्न:
डिटिसी बीलामध्ये काही गोष्टींबाबत खुलासा केलेला नाही, या बाबतचा निर्णय हे बील अंमलात येण्यापुर्वी सरकार घेणार आहे:
• शैक्षणीक कर्जावरील कर सवलतीस पात्र असणा-या व्याजाची मर्यादा स्पष्ट केलेली नाही, म्हणजे हि सवलत अमर्यादीत समजावयाची काय?
• आयकर कलम ८०-सीसीएफ खाली, इन्फ्रास्टकचर बॉण्ड मध्ये केलेल्या गुंतवणूकीवर रु.२०,००० पर्यंत मिळणारी सवलतीबाबत कोणताही खुलासा या बीला केलेला नाही. म्हणजे हि सवलत यापुढे मिळणार नाही असे समजावे काय?
• ५ वर्षाचे मुदतीसाठी केलेल्या बँक ठेवीतील गुंतवणूकीवर सध्या मिळत असलेल्या आयकर कलम ८०-सी खालील सवलती बाबत कोणताही उल्लेख नाही. म्हणजे हि सवलत यापुढेही चालू राहील असे समजावे काय?
• या बीला निवृत्ती नंतर मिळणा-या ग्रँज्युईटी, शिल्लक रजेचा मिळणारा पगार इ. बाबींवरील सवलतीची मर्यादा किती याचा उल्लेख नाही. म्हणजे ह्या बाबी करमुक्त समजाव्या काय?
• या बीलात कंपनी/मालक (Employer) कडून दिल्या जाणा-या सवलती जशा कि वापरण्यासाठी दिलेली गाडी, रहाण्यासाठी दिलेले घर, याबाबत कोणताही उल्लेख नाही.
• या बीलात जेष्ठ नागरीक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme – SCSS), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate – NSC), म्युच्युअल फंडाच्या कर बचतीच्या योजना (Equity Link Savings Schemes (ELSS) of Mutual Fund), टर्म इंशुरन्स व्यतरिक्त भरलेले जीवन विम्याचे हप्ते (Life Insurance Premiums paid other than term insurance) या व अन्य गुंतवणूकीवर सध्या मिळत असलेल्या आयकर कलम ८०-सी खालील सवलती बाबत कोणताही उल्लेख नाही.
• या बीलात मुदती अखेर मिळणा-या जीवन विम्याच्या रकमेवर कर आकारला जाणार कि नाही याबाबत कोणताही उल्लेख नाही.
प्रतिक्रिया
1 Dec 2011 - 8:05 pm | दादा कोंडके
धन्यवाद ठाकूर साहेब.
आता यानुसार टॅक्स प्लॅनिंग कसं करावं तेही येउद्या! :)
(फुकट्या) दादा
1 Dec 2011 - 8:23 pm | गणपा
नव्या माहिती बद्दल आभार.
1 Dec 2011 - 9:23 pm | आनंदी गोपाळ
सीए साहेबांना धागा वाचायला द्यायला हवा.
(मारवाड्यांना मराठी धागे वाचता येतील का, या विवंचनेत)
आनंदी गोपाळ.
1 Dec 2011 - 10:22 pm | इंटरनेटस्नेही
सीए फक्त मारवाडीच असतात असे नव्हे साहेब!
3 Dec 2011 - 3:24 pm | आनंदी गोपाळ
माझा आहे. गप्पा मारताना छान मराठी बोलतो. पण त्याला मराठी वाचन करणे कसे गळी उतरवावे याचा विचार करीत होतो. अन त्याला मी लहानपणापासून 'मारवाड्या' अशीच हाकही मारतो :))
2 Dec 2011 - 9:41 am | मराठी_माणूस
अत्यंत उपयोगी माहीती. साठवुन ठेवत आहे. धन्यवाद
2 Dec 2011 - 10:52 am | तर्री
चांगली व ऊपयुक्त महितीबद्दल आभार.
2 Dec 2011 - 11:40 am | कापूसकोन्ड्या
ठाकूर साहेब,
जरा एन आर आय बद्दल अधिक स्पष्टिकरण करा ना! उदाहरणार्थ एन आर ओ आणि एन आर इ खाते तसेच त्यावरील भारतात जमा झालेले व्याज वगैरे.
2 Dec 2011 - 11:50 am | कुंदन
DTAA फॉर्म भरला तर एन आर ओ FD वर मिळणार्या व्याजावर कापला जाणार्या कराचा परतावा मिळवता येउ शकतो. म्हणजेच "एन आर ओ FD" हा अनिवासींसाठी गुंतवणुकीचा एक सर्वोत्तम मार्ग आहे.
"एन आर ओ FD" चा व्याजदरही चांगला मिळतोय हल्ली. कोटक महिंद्रा ९.५ % देत आहे.
5 Dec 2011 - 4:44 pm | बज्जु
ठाकूर साहेब,
चांगली व ऊपयुक्त महितीबद्दल आभार.