नमस्कार मंडळी,
सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा !!!
दिवाळी म्हटलं की रांगोळी, दिव्यांच्या रोषणाई, फटाक्यांच्या आतषबाजी सोबत आठवतो तो दिवाळीचा फराळ. तसा मी लहानअसल्या पासून तिखटखाऊ. फराळातल गोडं धोड सहसा आवडत नाही. अपवाद म्हणजे बेसनाचे लाडू.
तर आजची सुरवातच या आपल्या लाडक्या बेसनलांडूंनीच करु.
साहित्य :
२ वाट्या बेसन.
३/४ वाटी वितळलेल तुप.
१/४ वाटी चण्याची डाळ.
३/४ वाटी बारीक साखर / पिठी साखर
२-४ चमचे दुध.
१ लहान चमचा वेलची पुड
आणि आवडी नुसार काजु तुकडा , बेदाणे, चारोळ्या आदी सुका मेवा.
कृती :
बेसनाचे लाडु खाताना बरेच वेळा टाळ्याला चिटकुन बसतात आणि माझा विचका करतात. त्यामुळे माझी आई निव्वळ बेसन वापरण्या पेक्षा चण्याची डाळच भाजुन ती गीरणीवाल्या कडुन थोडी भरड वाटुन आणत असे. भारतात असेल तर ठिक आहे पण परदेशात असण्यार्यांनी आता पीठाची गिरणी कुठे शोधायची. त्यावर तोडगा म्हणुन मग मी थोडी चण्याची डाळ वापरतो.
चण्याची डाळ कोरडी भाजुन घ्यावी. थोडीशी डागाळायला लागली बाजुला काढुन ठेवावी.
गार झाल्यावर मिक्सर मध्ये थोडी भरड(रवाळ) वाटुन घ्यावी.
नॉनस्टीकच्या कढईत वितळवलेले तुप घेउन त्यात बेसन आणि डाळीच रवाळ पीठ टाकुन मध्यम आचेवर किमान २५-३० मिनिटं चांगल खरपुस भाजाव. सुरवातीला घट्ट दिसणार मिश्रण नंतर तुप सोडु लागल की थुलथुलीत दिसायला लागेल.
कढई गॅसवरुन उतरवुन मग त्या मिश्रणावर दुधाचा हबकारा मारावा. दुधामुळे मिश्रण लगेच फसफसुन येईल. ते चांगल ढवळुन घ्याव. आणि लागलीच एका वेगळ्या भांड्यात काढुन घ्याव.
साधारण १५-२० मिनिटां नंतर जेव्हा मिश्रण थोड गार होईल तेव्हा त्यात वेलची पुड आणि सुकामेवा टाकावा.
बरेच वेळा लाडू वाळुन झाले की मग वरुन एखादा बेदाणा, काजु लावुन तो सजवतात मला तो प्रकार आवडत नाही. हे म्हणजे काय की आमच्या लाडुत सुकामेवा आहे बरका अशी जाहिरात केल्या सारख झाल. ;)
सुकामेवा कसा लाडूखाताना मध्येच दाता खाली येउन सरप्राईज मिळायला हवं. जर एखादा जास्त पुण्यवान असेल त्याला मिळतील २-३ सुक्यामेव्याचे तुकडे. ;) असो हे झाल माझं मत.
तर सुकामेवा टाकुन झाल्यावर त्यात बारीक साखर नाहीतर सरळ पिठीसाखर टाकावी आणि मिश्रण एकत्र करावे. साखरेचे कण जेव्हा दाताखाली येतात तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचा रवाळपणा लाडुत येतो जो मला खुप आवडतो.
नंतर लगेच आवडत्या आकारात लाडू वाळुन घ्यावे.
ही आमची वाढीव स्टेप.
चित्र फितीत दाखवल्या प्रमाणे एका बाऊल मध्ये दिड चमचा बारीक साखर घ्यावी. त्यात एका वेळी एक करत लाडू घोळवून घ्यावा. थोडासा हातात फिरवुन जास्तीची लागलेली साखर काढुन टाकावी.
आणि हे आहेत तयार बेसनचे लाडू. :)
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
दुसरे जे लाडू करणार आहोत ते फारच सोप्पे आणि अगदी १५-२० मिनिटात होण्यासारखे आहेत.
मुख्य म्हणजे जेवढे करायला सोप्पे तेवढे चवीत अफलातुन :)
चला तर सामान गोळा करु या.
खोबर्याचे लाडू.
साहित्य :
२ वाट्या डेसिकेटेट नारळ.+ १/४ वाटी बाजुला काढुन ठेवावा
१/२ वाटी पेक्षा थोड कमी क्रिम.
१/२ वाटी कंडेन्स्ड दुध.
१ चमचा वेलची पुड.
चीमुट्भर मीठ (ऑप्श्नल.)
बेदाणे
कृती :
नॉनस्टीक कढईत खोबर मध्यम आचेवर गुलाबी-सोनेरी रंगावर भाजुन घ्याव.
आच मंद करुन खोबर्यात क्रिम आणि कंडेंन्स्ड दुध टाकुन मिश्रण चांगले एकत्र करुन घ्याव.
५-१० मिनिटांनी आच बंद करुन वरुन वेलची पुड आणि बेदाणे मिश्रणात टाकावे.
मिश्रण गरम असतानाच पटापट लाडू वाळुन घावे आणि खोबर्याच्या चुर्यात घोळवुन घ्यावे.
हे आहेत तयार खोबर्याचे लाडू. :)
शुभ दिपावली.
पुर्वप्रकाशीत : 'मी मराठी' दीपावली अंक २०११
प्रतिक्रिया
27 Oct 2011 - 1:28 pm | प्रचेतस
गणपा शेठ, नेहमीप्रमाणेच खमंग पाककृती, तोंडास पाणीच सुटले.
खोबर्याचे लाडू तर एकदम खल्लास.
27 Oct 2011 - 2:24 pm | स्मिता.
लाडू मस्तच दिसत आहेत.
फक्त बेसनपिठाचे लाडू टाळूला चिटकतात म्हणूनच मला आवडत नाही.
माझी आई बेसनाचे लाडू जरा वेगळ्या पद्धतीने करते.
ती बेसनाच्या पुर्या तुपात तळून त्यांना बारीक मोडून घेते आणि त्या पुर्यांच्या रवाळ भुग्यात पाक की साखर घालून मग लाडू वळते. तेही लाडू छान लागतात.
31 Oct 2011 - 3:50 pm | विवेक मोडक
बेसनाचे लाडु टाळुला चिकटतात म्हणुन ते खाण्याची मजा (हे माझं वैयक्तीक मत आहे)
बाकी लाडवांचा आकार बघता ते हाताने वळले असतील असं वाटत नाही :-)
27 Oct 2011 - 2:50 pm | कच्ची कैरी
व्वा मस्तच!!!!लाडु साखरेत घोळवण्याची कल्पना आवडली.
27 Oct 2011 - 3:59 pm | रुचा निमक
चण्याची डाळ कोरडी भाजुन,गार झाल्यावर मिक्सर मध्ये रवाळ करुन वापरण्याचि पद्ध्त छान.
27 Oct 2011 - 6:05 pm | रेवती
दोन्ही लाडू छानच रे गणपा!
31 Oct 2011 - 6:59 pm | पैसा
बाकीचा फराळ कुठे आहे?
2 Nov 2011 - 3:12 am | मीनल
तूम्ही ग्रेट आहात.
रेसिपी ही ग्रेट!!!
2 Nov 2011 - 10:20 pm | विलासराव
झालच तर द्या पाठवुन.
15 Nov 2011 - 1:51 am | प्रभाकर पेठकर
बेसन लाडू म्हणजे माझा अगदीच अशक्त बिंदू.
चण्याची डाळ भाजून थंड करून रवाळ दळून आणणे हा एकमेव खमंग उपाय आहे. चण्याचे रवाळ पीठ तुपावर मंद आंचेवर व्यवस्थित भाजले की टाळूला चिकटत नाही.
छायाचित्रातील दोन्ही प्रकारचे लाडू आणि पाककृती अप्रतिम आहेत. अभिनंदन.
उशीराने दिलेल्या प्रतिसादाबद्दल क्षमस्व.