नव्वदच्या दशकात जेंव्हा अमेरीकेत आलो, तेंव्हा ज्या काही गोष्टीं दुरावल्या असे वाटले त्यात दोन सण होते - एक अर्थातच गौरी-गणपती, तर दुसरा दिवाळी. याचा अर्थ बाकीच्या सणांना मिस केले नाही असे नाही, पण हे प्रकर्षाने आठवत होते...तस म्हणलं तर आज देखील हे सण घरातच जास्त असतात, त्यात कुटूंबियांप्रमाणे मित्रमैत्रिणींचा सहभाग असतो आणि अर्थातच मराठी मंडळाचे कार्यक्रम... बाकी बाहेर वातावरण "तेच ते, तेच ते"!
तरी देखील इथल्या भारतीयांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे आणि भारताचे जागतीक स्थान काही अंशी का होईना पण प्रबळ होत चाललेले असल्याने भारताबाहेर, तेही प्रगत राष्ट्रांमध्ये दिवाळी ही जरा जास्त माहिती होत चालली आहे असे वाटू लागले आहे. क्लिंटनने त्याच्या शेवटच्या वर्षात भारतीयांना केवळ दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तर काय आश्चर्य वाटले होते. पण गेल्या दहा-अकरा वर्षात, व्हाईट हाऊस मधे दिवाळीची मेजवानी असणे, राष्ट्राध्यक्षाने शुभ-सदिच्छा संदेश देणे हे नेहमीचेच झाले आहे. या वर्षी (आणि आधी काही वर्षे देखील) अमेरीकन काँग्रेसने देखील दिवाळीचा सदिच्छा संदेश इथल्या हिंदू जनतेस दिला आहे. तेच ब्रिटीश पंतप्रधान डेव्हीड कॅमेरॉन यांनी केले आहे. त्यांनी तर दिवाळीला जसा दुष्टांचा संहार होऊन अंधक्कार नाहीसा होतो, तसाच या वर्षी गद्दाफी मेल्याने झाले आहे असे म्हणले..
राजकीय स्तरावर जेंव्हा अशा गोष्टी होतात तेंव्हा त्याला अर्थातच राजमान्यता लाभते. पण तरी देखील अशी मान्यता ही भारतीय वंशाचे राजकीय अनुदाने देणारे, संस्था यांच्या प्रयत्नाने काही अंशी होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याचे अगदी लहान उदाहरण म्हणजे अनेक सरकारी शाळांच्या कॅलेंडर्सवर आता दिवाळी हा सण देखील दिसतो. पण जेंव्हा इथले अ-हिंदू, अ-भारतीय वंशीय मित्र जेंव्हा दिवाळीच्या शुभेच्छा देतात, जेवायला स्वत:ची प्रेमाने/हककने वर्णी लावतात तेंव्हा कळते की आता हा सण अधिक माहितीचा होऊ लागला आहे. या वर्षी तर आमच्या बाजूच्या राज्यात, जेथे फटाके विकायला परवानगी आहे (आमच्या राज्यात उडवायला देखील नाही :( ) तेथे दिवाळीचे स्पेशल सेल होते!
आपला आनंद हा इतरांबरोबर जबाबदारीने वाटण्यासाठी म्हणून दिवाळीच्या मुहुर्तावर इथल्या अन्नछत्रांमध्ये (फूड शेल्टर्स) भारतीय तयार अन्न दान करू लागले आहेत. या वर्षी देखील असा एक मोठा कार्यक्रम सेवा इंटरनॅशनल युएसए ने हातात घेतला आहे.
त्याच बरोबर, एका गमतीदार किश्श्यामुळे दिवाळी ही प्रसिद्धीमाध्यमात पण दिसली... मायकल स्कॉट या (ऑफिस स्पेशल) विनोदी नटाने त्याच्या कार्यक्रमात म्हणलेले हे हॅप्पी दिवाळीचे गाणे. :-)
The Office - Michael's Adam Sandler ImpressionGet More: The Office - Michael's Adam Sandler Impression
(हे गाणे, अॅडम सँडलरने ज्यूंच्या हनुका या सणावर केलेल्या एका विनोदी गाण्याचे विडंबन आहे.).
तसेच २००९ च्या "बॉस्टन ग्लोब" या वृत्तपत्राने दाखवलेली ही सुरेख प्रकाशचित्रे!
दिवाळी हा केवळ काही चार भारतीय टाळक्यांचा विकेन्डला एकत्र येऊन साजरा करायचा सण राहीला नाही याबद्दल जरी कुठेतरी बरे वाटत असले तरी, भारतातील दिवाळीच्या मजेपासून लांब असल्याची रुखरुख मात्र तशीच रहाते... असो.
या धाग्यानिमित्ताने, असेच जर अजून कुठले अनुभव अथवा माहिती असेल तर येथे अवश्य सांगा.
प्रतिक्रिया
27 Oct 2011 - 2:40 am | मेघवेडा
'बॉस्टन ग्लोब' वरची प्रचि मस्त आहेत! मजा आली!
इथं १०, डाउनिंग स्ट्रीट मध्ये दिवाळी पार्टी होते हे ऐकून मला आश्चर्यच वाटलं होतं. आजच्या कॅमेरूनच्या वक्तव्यावरून कळतंय की त्यानं या सणामागची भावनाही जाणून घेतलेली दिसते! दिवाळी ग्लोबलाईज झाली आहे हे खरंच. आज ऑफिसात काही इंग्लिश कलिग्सनी केलंच पण त्याचबरोबर माझ्या एका रोमेनियन आणि एका कोसोव्ह कलिगनीही "हॅप्पी डिव्हॅली" म्हणत ग्रीट केलं तेव्हा खरंच खूप मस्त वाटलं.
गंमतीची गोष्ट म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी असणार्या इंग्रजांच्या Guy Fawkes Night लाही जोरदार फटाके उडविले जात असल्याने आणि दिवाळीही याच सुमारास येत असल्याने बर्याच जणांना वाटतं या दोन गोष्टींत काहीतरी कनेक्शन आहे! मागल्या वर्षी दिवाळी ५ नोव्हेंबरलाच होती! तेंव्हा तर इंडिपेंडटने याला 'Battle of bonfire night - which fireworks will burn brightest" या मथळ्याखाली लेख छापला होता!
27 Oct 2011 - 7:17 am | अर्धवट
मला एका विएतनामी तरुणीने आज वर्गात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, मग सहाजिकच इतरांची उत्सुकता चाळवली गेली, मग मी नेहेमिचे प्रवचन बाजुला ठेउन ह्या विएतनामी भगतगणाला दिवाळीचे महत्व या विषयावर छोटंसं व्याख्यान दिलं. त्यांचे बारके डोळे अजून बारीक करून बघत होते लेकाचे.
27 Oct 2011 - 7:20 am | रेवती
लेखन आवडले.
मलाही एकदोनदा उत्तर द्यायचा प्रसंग आला होता तेंव्हा त्यांनी हा इंडियन ख्रिसमस दिसतोय (त्या तोडीचा मोठा सण) असं म्हटलं होतं.
27 Oct 2011 - 8:18 am | मस्तानी
आमच्या घराजवळ असलेल्या लायब्ररी मध्ये दोन वर्षांपूर्वी Festivals of Light Across the World या विषयावर एक कार्यक्रम आयोजित केला होता अणि मला "तू दिवाळी विषयी एक टेबल ठेवू शकशील का" म्हणून विचारल होत. मी माझ्या एका मैत्रिणी बरोबर तो प्रयत्न केलाही होता. Kwanzaa, Hanukkah असे इतर काही सण देखील तिथे represent केले गेले होते.
तसच माझ्या मुलाच्या शाळेत देखील अशाच प्रकारच एक presentation केल होत. Craft Activity म्हणून मातीचे दिवे रंगवताना अणि कागदावर का होइना पण crayons ने रांगोळी रंगवताना लहान मुले एकदम खुश होती. या वर्षी तर वर्गशिक्षिका इतकी हौशी आहे की तिने उद्या "मुले शाळेत दिवाळीचे खास भारतीय कपडे घालून येऊ शकतात" असही सांगीतल आहे. उद्या कोणता कुर्ता घालायचा या विषयावर मुलांची चर्चा देखिल करून झालिये म्हणे !
आणि आजचीच गोष्ट सांगायची तर ... मी गेले दोन दिवस आवर्जुन ऑफिस ला जाताना पंजाबी ड्रेस घालून जाते आहे तर माझ्या बरोबर काम करणारी मुलगी कालच उत्साहाने दिवाळी बद्दल बरच कही विचारत होती मला म्हणाली "Will you bring me a Bindi dot and one of those special scarves (म्हणजे दुपट्टा), I will wear my brightest shirt". आज दिवसभर ती टिकली लावून आणि दुपट्टा घालून फिरत होती आणि कुणी विचारल की "We are celebrating Diwali, its a very special holiday in India" हे सर्वांना उत्साहाने सांगत होती :)
आणि हो, शिवाय एका स्थानिक वृत्तपत्रात दिवाळी विषयीचा एक खास लेख देखिल छापून आला होता. दिवाळी आता खरच केवळ भारतीय घरांमध्ये किंवा मंदिरात किंवा मराठी मंडळात फक्त साजरी होते अस नक्कीच नाही !
27 Oct 2011 - 8:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेहमीप्रमाणेच छान लेखन. थोडक्यात दिवाळी वैश्विक होत आहे, असेच म्हणावे लागेल.
बोष्टन डॉट कॉमवरील छायाचित्रेही सुंदर.
-दिलीप बिरुटे
27 Oct 2011 - 1:18 pm | दादा कोंडके
च्यामारी, हिरव्या देशात बसून "थँक्स गिव्हींग डे", "हेलोवीन" चं कौतुक सांगणार्यांचा कंटाळा आला होता.
एव्ह्ड्या मोठ्या प्रमाणात तिकडे दिवाळी साजरी होते ते माहीत नव्हतं.
27 Oct 2011 - 1:21 pm | निनाद मुक्काम प...
लंडन मध्ये सौथ होल , हौन्स्लो आणी वेमली आणी बहुतेक सर्व भागात जेथे भारतीय राहतात ते लक्ष्मी पूजनाच्या दिवशी भारतासारखेच रस्त्यावर फटके फोडतात तेही रात्रभर
27 Oct 2011 - 1:40 pm | गणपा
आज सकाळीच एका कंपनीतल्या एका नायजेरियन वाहन चालकाने मला चक्क "शुभ दिवाली" म्हणुन चकीत केलं.
अस मस्त वाटल सकाळच्या पारी. :)
ईथे बरेच भारतीय असल्याने दिवाळी जोरात साजरी होते. दुकानं मिठाया, पणत्या, फटाके, आकाश कंदील यांनी सजलेली आहेत.
२-४ दिवसात 'दिवाली मेला' भरणार आहे.
भारतातल्या दिवाळीची सर भरुन निघणे शक्य नाही पण हेही नसे थोडके. :)
27 Oct 2011 - 4:17 pm | पुष्करिणी
नाताळ सारखेच दिवाळीच्या आसपास गावाच्या मध्यभागात दिव्यांची आरास करण्याची काही भागात ब्रिटनमधेही प्रथा आहे.
नगरपालिकेच्या वतीने ही आरास केली जाते.
http://www.bbc.co.uk/news/uk-england-leicestershire-15333726
आजकाल पैशांची चणचण असल्याने काही गावात नगरपालिकांकडे हा (अवाजवी) खर्च करण्यासाठी पैशांची तरतूद नाही त्यामुळे दुकानदार आणि हिंदू संघटनांनी वर्गणी गोळा करून दिवे लावले आहेत.
http://www.bbc.co.uk/news/uk-england-northamptonshire-15270499.
मी सुद्धा ऑफिसात गेले काही दिवस दिवाळीसंदर्भात जनजागरण केल्यामुळे मला आज 'हॅप्पी न्यू फिस्कल इअर' अशा शुभेच्छा मिळाल्या आहेत :)
27 Oct 2011 - 3:35 pm | अप्पा जोगळेकर
दिवाळीचे जागतिकीकरण झाल्याचे वाचून आनंद वाटला.
27 Oct 2011 - 7:34 pm | Nile
सहमत आहे. साक्षात ओबामा वगैरे दिवाळी साजरी करतात हे पाहून ड्वाळे पाणावळे! (आहेच आमची संस्कृती थोर, काय समजलांत!)
पण तरी जाता जाता सांगून ठेवतो, तुमचे व्हॅलेंटाईन डे, नाताळ, हॅलोविन वगैरे सण मात्र तुमच्याकडेच ठेवा. ;-)
27 Oct 2011 - 8:04 pm | विकास
पण तरी जाता जाता सांगून ठेवतो, तुमचे व्हॅलेंटाईन डे, नाताळ, हॅलोविन वगैरे सण मात्र तुमच्याकडेच ठेवा
दिवाळीतील एखादा फटाका जसा हवा तसा वाजत नाही (पक्षी: फुसका बार) तसे वाटले. ;)
ओबामा आणि इतर मंडळी, आपल्या देशात असलेल्या इतर संस्कृतीतील जनतेच्या सणांचा आदर करतात. म्हणून ओबामाच्या या वर्षाच्या शुभेच्छा संदेशातील शेवटचे वाक्य आहे: "To all who are observing this sacred holiday here and around the world, Happy Diwali and Saal Mubarak."
थोडक्यात त्यांच्या दृष्टीने पण दिवाळी ही "तुमचीच" असे असते... फक्त त्याचा आदर केला जातो. नाताळच्या बाबतीत (तसेच इद, मोहर्रम, गुड फ्रायडे वगैरे) आपल्याकडे असाच आदर केला जातो. त्यात नवीन काही नाही. किंबहूना दिवाळी व्हाईट हाऊस मध्ये साजरी करण्यासाठी २१ वे शतक लागले. पण आपल्याकडे असे अनेक वर्षे चालू आहे.
27 Oct 2011 - 6:24 pm | चित्रा
इथे अमेरिकेत दिवाळी बर्यापैकी माहिती होत चालली आहे. काही लोक अशा दिवशी ठरवून भारतीय कपडे घालून कामावर जातात. काहीजण ठरवून हक्काने सुटी घेतात (ह्यानेही दिवाळीचा सण लोकांना माहिती होण्यास मदत होते). मी सुटी घेत नाही, कारण आम्ही सर्वांनीच एकावेळी सुटी घेतली तर काहीतरी दिवाळीनिमित्त करू शकू नाहीतर दिवसभर मिपावर आणि इतर मसंवर येजा करण्याखेरीज इतर काही हातून होणार नाही याची खात्री आहे. :)
माझ्या ओळखीच्या एक प्राध्यापिका या निमित्ताने आपल्या संस्थेत नाच आयोजित करतात. भारतीय जेवण घडवून आणतात. इथे काहीजणांना अजूनही भारतीय फूड म्हणजे स्पायसी असे समीकरण पक्के असते, ते आपल्याला जमणार नाही याचीही खात्री असते. अशांना जेवायला घालणे म्हणजे दिव्य. माझा मराठी स्वैपाक (तोही सणासुदीचा) विशेष मसालेदार असतो असे म्हणवत नाही. पण आमचे काही स्नेही हमखास आपण किती मसालेदार किती खाऊ शकतो असे तपासून बघण्याच्या उद्देशाने येतात (त्यांची लहान मुलेही!). आपण चुकून कमी मसालेदार जेवायला घातले तर त्यांना आपण स्पेशल ट्रीटमेंट देतो आहोत असे वाटून वाईट वाटते :)
त्यामुळे आमच्याकडचा चिवडा, चकल्या, मिसळ, शंकरपाळे, तांदळाची नसलेली खीर इ. पदार्थ खाऊन जेव्हा त्यांच्या मुलाने म्हटले की बाहेर इंडियन जेवायला गेले की तोच तोच चिकन टिक्का मसाला मिळतो त्यापेक्षा तुझ्याकडचे खूप आवडते तेव्हा अर्थातच बरे वाटले.
आम्ही दिवाळीचे दिवे लावतो, कंदिल लावतो, तेव्हा आमचे रस्त्यापलिकडे राहणारे शेजारी आवर्जून त्यांना आमच्याकडचे दिवे वेगळे वाटतात, आवडतात असे म्हणतात तेव्हा अर्थातच बरे वाटते.
भावाबहिणींशी दिवाळीसारख्या सणावारांना विडिओ चॅट करणे हल्ली सोपे झाले आहे. तेव्हा आम्हा भावाबहिणींच्या दूरदेशात वाढणार्या पुढील पिढ्याही एकमेकांशी बोलताना पाहून बरे वाटते.
तेव्हा सर्वांना शुभ दिपावली, दिवाळीतील पाडव्यानिमित्ताने मनापासून शुभेच्छा!
27 Oct 2011 - 7:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारताबाहेरही भारतात असल्याप्रमाणेच दिवाळी साजरी होत आहे, आनंदाचीच गोष्ट.
-दिलीप बिरुटे
28 Oct 2011 - 8:55 pm | प्रदीप
अमेरिकेतील दिवाळीची माहिती छान आहे. आता तेथील भारतीय अनेक तर्हेने (राजकारण, विविध प्रोफेशन्स्मधील उच्चपदे भूषवणारे इ..... आणि अगदी आताच्या ताज्या 'गोल्डमन' संदर्भातही... पण ते जाऊ दे) समाजाच्या नजरेत येऊ लागल्याने, तसेच भारताची आर्थिक पत आता बरीच सुधारल्याने जग आता आपली दखल घेऊ लागले आहे.
आमच्या गावात, येथील समाजावर ठसा उमटवणार्या भारतीयांपैकी ९९ टक्के तरी उत्तरेकडील एका विशीष्ट प्रांतातील असल्याने दिवाळीच काय, कुठल्याही भारतीय सणाच्या, स्थानिक समाजात होणार्या कल्पना खास त्यांच्याशी, त्यांच्या आवडीनिवडींशी, त्यांच्या चालीरीतिंशी निगडीत आहेत. दिवाळीपुरतेच सांगायचे झाले तर कालच्या इंग्लिश पेपरात आलेल्या सचित्र (चित्रे होती पणतीची, उत्तर भारतीय हलवायांच्या दुकानातील काही मिठायांची, एक भारतीय स्त्री लक्ष्मीची पूजा करतांनाची) लेखांत दिवाळीच्या माहितीत उल्लेख होते ते धनतेरस व लक्ष्मीपूजनाचे, व ह्या समाजाने नेटाने (गेली ५५ वर्षे सलग) दिवाळीनिमीत्त करीत असलेल्या 'दिवाली- बॉल' च्या कार्यक्रमाचे! अर्थात ह्या सर्वात कुठेही आपले मराठी पारंपारीक संदर्भ-- जसे दिवाळीचा आपण घरी करतो तो फराळ, नरकचतुर्दशी, पाडवा, कारीट फोडणे व त्यामागील अर्थ, भाऊबीज.... हे अजिबात नव्हते, तसे ते येण्याची शक्यताही नाही. दिवाळी सण साजरा करण्यामागील कारण दिलेले होते, ते तसेच नेमके मी काही चिनी सणांच्या संदर्भात ऐकलेले आहे. म्हणजे, पीककापणी झालेली असते, आनंदीआनंद घरोदारी असतो ह्यानिमीत्त सार्या कुटुंबियाने एकत्र येऊन खाणे-पिणे करायचे वगैरे.
एक मात्र आहे, पूर्वी हा दिवाळी बॉल स्थानिक कलाकारांच्या (ह्यांच्या घोड्या पोरी) रेकॉर्ड डान्सने साजरा होई. आता ते सारे बर्याच मोठ्या प्रमाणात होते, 'बॉलिवूड;'चे कलाकार आमंत्रित केले जातात, हा फरक गेल्या वीसेक वर्षांत पाहिला आहे.
28 Oct 2011 - 11:45 pm | धनंजय
छान! बॉस्टन ग्लोबवरची चित्रेही आवडली.
15 Nov 2011 - 2:12 am | प्रभाकर पेठकर
भारताबाहेर दिवाळी आणि इतर सणवार साजरे करताना फार उत्साह असतो. इथे मस्कतमध्ये म्हणजे फार काही भारताबाहेर वाटत नाही. पण फटाके उडविणे वगैरे गोष्टींवर बंदी आहे. १९८३ साली आकाशकंदील लावणे हेही गुन्हा ठरेल कि काय असे अनेकांना वाटायचे. आमच्या एरियात आणि माझ्या पाहण्यातील त्या काळच्या मस्कतमध्ये मीच सर्वप्रथम आकाशकंदील घराबाहेर टांगला होता. इमारतीत भारतियच राहात होते त्यांना खूप कौतुक वाटले. दिवाळीभर मला जरा काळजीच होती पोलीस वगैरे येऊन कंदिल काढायला लावतात की काय अशा विचाराने. पण तसे काही झाले नाही. आता दिवळी, ख्रिस्तमस वगैरे सर्व सणांना हिंदू-ख्रिश्चन आकाश कंदील लावतात.
मराठी मंडळात दिपावली भोजन आणि इतर कार्यक्रम असतात.
पाच दिवसांचा गणपती आणि ९ दिवासांचे नवरात्र (गरबा) व्यवस्थित साजरे होतात.
15 Nov 2011 - 9:22 am | मदनबाण
हा लेख वाचायचा राहिला होता,हिंदुस्थानाच्या बाहेर दिवाळी हा सण आता मोठ्या प्रमाणात जाणवु लागला आहे याचा आनंद वाटला.
थोडक्यात दिवाळी ही ग्लोबल उत्सवाचा भाग झाली आहे. :)