अखेर आम्ही खरोखरच निघालो! अनेक बेत अनेकदा ठरतात आणि विरतात. तर आम्ही मोराच्या चिंचोलीला निघालो. नेहेमीप्रमाणे निघायला उशीर झालाच. त्यात भर म्हणजे खंडाळा घाटात ऐन बोगद्याच्या तोंडावर रेडीएटर मधुन भसाभस वाफ निघु लागली आणि आमची मिनीबस बघता बघता वाफेने भरली. तेवढाच फुकटात वाफेचे स्नान घेण्याचा विचार होता, पण पाणी भरेपर्यंत सर्वांनी खाली उतरायचे ठरले. पाणी आणायला तशी १०-१५ मिनिटे लागणारच होती. उतरून समोर पाहतो तर डोंगरमाथा धुक्यात शिरला होता. वातावरण निर्मिती तर झकास झाली. मंडळींनी फोटु काढले, चहा घेतला आणि आम्ही मार्गाला लागलो.
मोराची चिंचोली हे गांव चाकणच्या पुढे पुणे-नाशिक मार्गावर लागताच डाव्या हाताला शिक्रापूर फाट्यावरुन आत सुमारे १८ किलोमिटर अंतरावर आहे. या गावात सुमारे दोन हजार मोर असल्याचा सरकारी दावा होता. आम्हाला ५-१० दिसले तरी चालणार होते. मस्त गावात जायचे, गावच्या घरगुती जेवणावर ताव मारायचा, जसे आणि जितके दिसतील तसे आणि तितके मोर पाहायचे, उनाडायचे असा हा 'कृषी पर्यटनाचा' कार्यक्रम. मधे मधे रस्ता खराब होता. शेवट्चा पल्ला तर दिव्यच. पण हल्ली आम्हा मुंबईकरांना खड्ड्यांची सवय झालेली असल्याने कुणी खड्ड्यांबद्द्ल फारशी तक्रार केली नाही.
पोहोचेपर्यंत साडेबारा झाले होते. मालक वाट्च पाहत होते. 'तुम्ही साडे दहाला येणार म्हणुन पोहे करुन ठेवले होते आणि तुमची वाट्च पाहत होतो' मालक सामोरे येत म्हणाले. मग उशीराचे कारण सांगत हात पाय धुतले आणि सतरंज्यांवर बैठक घेतली. 'एक वाजत आलाय तेव्हा पानं घेतो, गरम गरम जेवा आणि मग भटका मनसोक्त' हे मालकांचे म्हणणे एकदम मान्य झाले. पलिकडे मस्तपैकी शेणाने सारविलेल्या जमिनीवर पाने मांडली जात असताना मालक अलगद पावली जवळ येत म्हणाले, 'आवाज न करता, धसमुसळेपणा न करता हळुच पलिकडे चला. मोर आलाय.' हा मोर १४-१५ वर्षांचा असून तो अगदी लहान असल्यापासून त्यांच्याकडे येत असल्याने तो धीट झाला आहे पण तरीही गलका वा भारी हालचाली झाल्या तर तो निघुन जाईल असा इशारा देत मालकांनी आम्हाला त्या दिशेला नेत मोर दाखवला. मी कॅमेरा सरसावत पुढे गेलो आणि जमेल तसे फटाफट फोटु टिपले. या पक्ष्याचा रुबाब काही वेगळाच.
एव्हाना मोराची मर्जी फिरली. बेटा चक्क उड्डाण घेत एका झाडावर सावलीत जाउन निवांत बसला. आम्हाला एकाएकी पोटात कावळे कोकलत असल्याची जाणीव झाली. आम्ही बसताच ताटे वाढली गेली. गरम गरम ज्वारीची भाकरी, पिठले, मटकीची मसालेदार उसळ, दह्यातली कोशिंबीर, ठेचा, लोणचे, खारवलेल्या मिरच्या, भात, आमटी असा बेत होता. सगळे तुटुन पडले. वर मालकांचा प्रेमळ आग्रह. आता पुढे दोन आव्हाने होती. एक - हात जमिनीला न टेकता वा आधार घेता उठुन उभे राहणे आणि दुसरे - आडवे होण्याचा मोह टाळणे. हातावर पाणी पडताच आम्ही भटकायला निघालो. डावीकडे असलेल्या कृत्रिम तलावाच्या कडेला अनेक पक्षी वावरत होते. माझे लक्ष्य एका चिमणीसारख्या दिसणार्या पक्षांच्या जोडीने वेधले. मी कॅमेर्याचा किरण साधेपर्यंत एक उडाला, दुसरा सापडला.
नांगरलेल्या भुसभुशीत जमिनीत चालायला मजा येत होती. शेतातुन जाताना पलिकडच्या वाफ्यात डोलणारी कणसे टिपायचा मोह आवरला नाही.
मध्यभागी असलेल्या विहिरीच्या बरोबर वरती सुग्रणीची दोन घरटी झाडाला लटकत होती.
विहीरीकाठच्या बारक्या झाडांवर व माजलेल्या गवतावर चतुर भिरभिरत होते.
आम्ही मळा ओलांडुन दाट झाडीतुन पायवाट तुडवित एका माळावर येउन पोचलो.
वाटेत आम्हाला म्हशी दिसल्या. एकीने तर अगदी पोज देऊन आपली छबी टिपुन घेतली. हीच ती 'मिस मोराची चिंचोली'
दिड दोन तास भटकंती झाल्यावर आम्ही परतलो. अचानक मागच्या अंगाने मोराचे टाहो ऐकु येऊ लागले. आम्ही त्वरेने मागल्या बाजुला गेलो. दोन मोर होते खरे पण दूर सुरक्षित अंतरावर. मागे दाट झाडी पण पुढे उघडा नंगरलेला मळा. जराही पुढे जायची सोय नाही. चाहुलीने बुजले तर बेटे पळुन जायचे. मात्र अमचे नशिब बरे होते. एका मोराने पिसारा फुलविला.
मोरांना उन जराही सहन होत नसावे. मळभ येताच बाहेर पडणारे हे मोर उन येताच सावलीच्या दिशेने सरकायचे.
आम्ही चार पांच जण जमेल तितके झाडाच्या आडोशाने पुढे गेलो आणि शांतपणे आडोशाला कॅमेरा लावुन वाट पाहत बसलो.पुन्हा थोडे सावट येताच झाडीत गेलेला मोर थोडे सावट येताच पुन्हा प्रकट झाला. मोराचा रंग मागच्या झाडीला साजेसा, प्रकाश फारसा कडक नाही आणि पुन्हा अंतर यामुळे मोर टिपणे हे एक आव्हान होते.
बघता बघता एकीकडे दूरवर असलेल्या जोडीदाराला साद घालत त्या मोराने आपला पिसारा उघडला.
सोसाट्याचा वारा येताच छ्त्री उलटावी तदवत पिसारा मागुन उलट पुढे आलेला तो मोर मला अत्यंत देखणा वाटला. असा प्रकार पाहायला मिळणे ही पर्वणी.
तासभर मोर पाहुन आम्ही चहाला परत आलो. निघायची वेळ झाली होती.
प्रतिक्रिया
22 Sep 2011 - 12:46 am | ५० फक्त
जाम भारी रे, तसंच पुढं जैनमंदिरात जाउन यायचं की, बाकी गेला कुणाकडं होतात, त्या कालेजात का त्याच्या पलिकडं आनंदराव थोपटेंचं घरगुती केंद्र आहे तिथं.
आम्ही तिथंच गेलो होतो, हा त्याचा रिपोर्ट -http://misalpav.com/node/16602
22 Sep 2011 - 11:12 pm | सर्वसाक्षी
आम्ही थोपट्यांकडेच उतरलो होतो. 'माऊली' मळा.
22 Sep 2011 - 1:02 am | श्रावण मोडक
साक्षीबुवांच्या धाग्यावर आल्याचं समाधान झालं.
22 Sep 2011 - 1:18 am | अत्रुप्त आत्मा
येक नंबर काढलेत फोटु... आमचा तुम्हाला वन्स मोर :-)
22 Sep 2011 - 1:23 am | शिल्पा ब
वाह!!! पुढच्या फेरीत इथे नक्की जाउन येईन. खुपच छान.
22 Sep 2011 - 1:28 am | पाषाणभेद
एकदम झकास फोटो
22 Sep 2011 - 1:36 am | प्रभाकर पेठकर
झक्कास छायाचित्रे, सर्वसाक्षी. दिल मांगे मोर.....
22 Sep 2011 - 3:43 am | शुचि
सुपर्ब!!!
22 Sep 2011 - 8:24 am | प्रचेतस
मोरांचे अतिशय देखणे फोटो
22 Sep 2011 - 9:11 am | गवि
क्या बात.. क्या बात.. क्या बात..
तो चिमणीसारखा दिसणारा पक्षी लार्क ऊर्फ चंडोल असावा.
मस्त फोटो..
22 Sep 2011 - 11:42 pm | सर्वसाक्षी
गवि,
माहितीबद्दल आभारी आहे.
22 Sep 2011 - 9:39 am | किसन शिंदे
सर्वसाक्षी काका, जबरा फोटो काढलेत तुम्ही आणी हे ठिकाणही मस्तच आहे, आत्ताच्या वेळेला गावी गेलो कि इथे आवर्जुन जाणार.
22 Sep 2011 - 12:03 pm | मृत्युन्जय
सुंदर
22 Sep 2011 - 12:52 pm | गणेशा
अप्रतिम ...
22 Sep 2011 - 1:00 pm | परिकथेतील राजकुमार
एकदम जबर्यादस्त फटू.
22 Sep 2011 - 5:21 pm | नितिन थत्ते
मस्त फोटो.
नितिन थत्ते
22 Sep 2011 - 6:04 pm | चेतन सुभाष गुगळे
सर्वच छायाचित्रे अप्रतिम आहेत. फक्त एकाची caption लिहीताना चूक झाली असावी असे वाटते.
जिला मिस मोराची चिंचोली म्हंटलेय ती बहुधा मिस नसावी.
27 Sep 2011 - 4:29 pm | मनराव
>>जिला मिस मोराची चिंचोली म्हंटलेय ती बहुधा मिस नसावी<<<
लोकांची कल्पकता पाहून अंमळ गम्मत वाटली........
बाकी फोटू एकदम झक्कास..........फक्त मिस (? यांच्या मते) मोराची चिंचोलीचा न्हवेच तर सगळेच
22 Sep 2011 - 6:16 pm | स्मिता.
मोराचे क्लोज अप तसेच पिसारा फुलवलेले, सर्वच फोटो अप्रतिम.
पिसारा फुलवलेला मोर तासभर बघायला मिळाला म्हणजे नशिबवान आहात.
-(पिसारा फुलवलेला मोर कधिही न पाहिलेली) स्मिता
22 Sep 2011 - 6:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक लंबर फोटो आले आहेत.
बाकी, मोरांनी तर तुम्हाला खास मोकळ्या मैदानात येऊन माझे फोटो काढा असा आग्रह धरल्या सारखे वाटले. 'मिस मोराची चिंचोलीनेही छान पोज दिली आहे. :)
मोराच्या चिंचोलीच्या बातम्या अधून-मधून पेप्रात येत असतात. मोरांच्याझुंडीचं एखादं दृष्य वाट्याला येते की काय असे लेखन संपेपर्यंत वाटत होते.
-दिलीप बिरुटे
22 Sep 2011 - 6:58 pm | अनामिक
सगळेच फोटो खूप छान आले आहेत.
22 Sep 2011 - 7:52 pm | पैसा
पाहून अत्यानंद जहाला! मोरांचे फोटो अप्रतिम आहेतच पण पायवाटेचा फोटो फारच आवडला.
23 Sep 2011 - 12:10 am | आशु जोग
मित्रा
फोटो पाहताना खरेच छान वाटले
तिथे जाऊ शकत नाही तर निदान फोटो तरी
--
फोटो नीटपणे १, १ पाहतो आहे
मोरांमधला दुसरा मोर आणि शेवटचा मोर अतिशय छान
पण काही फोटो तो क्षण पकडताना नीट फोकस न झाल्यासारखे वाटले
उदा - चिमणी
--
कोणता कॅमेरा वापरतोस !
23 Sep 2011 - 8:42 pm | सर्वसाक्षी
फोकस तर बरोबर आहे, कदाचित डोळे गडद पट्ट्यात असल्याने प्रकाशबिंदु स्पष्ट न दिसल्याने तसेच आंगावरच्या पिसांमुळे तसा भास होत असावा. कॅमेरा निकॉन डी ६० आहे.
धन्यवाद
23 Sep 2011 - 7:22 am | रेवती
मोराचे सगळे फोटू आवडले. कणसावर मोती लावल्यासारखे वाटतायत.
पिवळा चतुर खोटा वाटावा इतका मस्त!
23 Sep 2011 - 2:55 pm | जागु
भारीच एकदम.
23 Sep 2011 - 5:02 pm | फारएन्ड
सगळे फोटो आवडले! वर्णनही मस्त.
त्यांची एक वेबसाईटही दिसते आहे. तेथूनच संपर्काचा नं वगैरे घेतला होता का आणि फोनवरून त्यांनी रिझर्वेशन केले होते का?
23 Sep 2011 - 5:07 pm | चतुरंग
मोर हा अत्यंत देखणा पक्षी आहे हे या फोटोतून सिद्ध होते.
पिवळ्या चतुराचाही मस्त आलाय एकदम शार्प फोकस!
थोपटे आणि माऊलीमळा याबद्दल जरा आणखीन माहिती द्यावीत - दूरध्वनी क्रमांक दिल्यास उत्तम.
रंगमोर
23 Sep 2011 - 8:39 pm | मदनबाण
फोटु आणि फोटो वरील सही दोन्ही दिसले. ;)
फोटु छानच आहेत. :)
24 Sep 2011 - 11:10 pm | ५० फक्त
आनंदराव थोपटे हे केंद्र घरगुती पद्धतिंनं चालवतात, अगदी त्यांच्या घरातच, वर लिंकलेल्या माझ्या धाग्यात अगदी त्यांच्या घरातल्या चुलीचे फोटो आहेत.
त्यांचे नं
९६८९१२५०४७ / ९६७३१३२४९७
24 Sep 2011 - 11:35 pm | जाई.
फोटो आणि वर्णन मस्तच आहेत
27 Sep 2011 - 11:30 am | श्यामल
मस्त फोटो आणि अर्थात वर्णनसुद्धा ! :smile: