चांगल्या मराठी शाळा नवी मुंबई

विक्रांत's picture
विक्रांत in काथ्याकूट
8 May 2011 - 7:02 pm
गाभा: 

माझ्या मुलीला धुळ्याहून नवी मुंबईत इयत्ता तिसरीत दाखल कारायचे आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत. आम्ही गेले १० दिवस चांगली शाळा शोधतोय. मात्र, अतिशय निराश करणारा अनुभव हाती येतोय. एकतर भाराभार इंग्रजी शाळा आहेत. पालकांनाच इंग्रजी माध्यमात मुलांना घालायचेय मग आम्ही मराठी शाळा काढून काय माशा मारु, हा संस्थाचालकांचा प्रश्न उचित आहे. लहान शहरात चान्गल्या शाळेचा प्रश्न फारसा सतावत नाही. धुळ्यात जयहिंद शाळेत ती होती. आता नवी मुंबईत पनवेल्पासून ऐरोलीपर्यंत किंवा थेट ठाण्यातही आम्हाला चालेल. प्रवेश कसा मिळवावा हा नंतरचा भाग आहे, पण चांगली शाळा कोणती, हा गहन प्रश्न आहे. आम्ही साधारणतः काही शाळात तपास केला पण एकेका वर्गात तब्बल ७०-८० विद्यार्थी काही ठिकाणी तर १००सुद्धा! म्हणजे समस्या काय आहे की, आता बरेचसे पालक मराठी शाळेत मुलांना दाखल करु पाहतात. पण गेल्या ४ वर्षात इथे एकही नवी मराठी शाळा आलेली नाही. प्रवेशाला गर्दी वाढतेच आहे. महापालिका शाळांचा प्रश्नच नाही; तो भाग आपोआप गळतो. मग उरल्या सर्व शिक्षणसम्राटांच्या शाळा बरयाचशा विना अनुदानित. त्यात शिक्षकांना सेवक म्हणून २-३ हजारावर राबवणार. मग काय ते कप्पाळ शिकविणार? बरे मूळ शिकवणेच नाहीतर उपक्रमशीलता तर दूरचा भाग. विलासराव देशमुख, पतंगराव कदम, दत्ता मेघे, वळसे पाटील, डी वाय पाटील.. अशा दिग्गजांच्या शाळा आहेत. एक स्थानिक नेते रामशेठ ठाकूर यांची सीकेटी म्हणजे चांगा काना ठाकूर ही चांगली शाळा आहे पनवेलात जनार्दन भगत शिक्षण संस्थेची. महात्मा स्कूलही चांगले आहे. ऐरोलीत श्रीराम विद्यालय, मांजरा सुशीलादेवी विद्यालय, वाशीतील रयत संस्थेचे मॉडर्न स्कूल आणि फादर आग्नेल मराठी शाळा हे आवार, परिसर, स्वच्छता यावरुन आमचे हे ढोबळ मत आहे. मात्र आता खरोखरच चांगली शाळा म्हणजे जेथील मुलांना ट्यूशनची गरज नाही, मास्तर तशी सक्ती करीत नाहीत , ते स्वतः शिकवण्या घेत नाहीत, त्याना पूर्ण पगार दिला जातो... फळ्यावर लिहून मुलांना फक्त उतरवून घ्या असे सांगितले जात नाही तर मनन-चिंतन-लेखन, पाठांतर असे सारे केले जाते, शाळेला मोठे मैदान आहे, सिक्युरिटी आहे, टापटीप आहे, मैदानी खेळ खेळले जातात, अवांतर उपक्रम राबविले जातात वैगेरे वैगेरे.... लोकसत्ताने यासंदर्भात अनेक आर्टिकल्स दिलेत...

प्रतिक्रिया

जवळच्या शाळेत घालावे असे माझे मत आहे. मुलांचे खूप हाल होतात लांब घातले तर.

नरेशकुमार's picture

9 May 2011 - 6:38 am | नरेशकुमार

माझ्या मुलीला धुळ्याहून नवी मुंबईत इयत्ता तिसरीत दाखल कारायचे आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत.

बाब्बो, इतकि मोठ्ठी रिस्क. एकदा मुलीच्या भवितव्याचा विचार करुन निर्नय घ्या.
इंग्लिश शाळेतच घालावे असे सांगत आहे.

एकतर भाराभार इंग्रजी शाळा आहेत.

नव्या युगाचि नांदि.

पालकांनाच इंग्रजी माध्यमात मुलांना घालायचेय मग आम्ही मराठी शाळा काढून काय माशा मारु, हा संस्थाचालकांचा प्रश्न उचित आहे.

१०० % सत्य.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 May 2011 - 1:07 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>बाब्बो, इतकि मोठ्ठी रिस्क. एकदा मुलीच्या भवितव्याचा विचार करुन निर्नय घ्या.इंग्लिश शाळेतच घालावे असे सांगत आहे.
कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त वैचारिक दिवाळखोरी दाखवल्याबद्दल अभिनंदन !!!!

पिवळा डांबिस's picture

9 May 2011 - 6:44 am | पिवळा डांबिस

मालक, तुम्हाला वाचकांकडून काय प्रतिक्रिया अपेक्षित आहे?
तुम्हाला तुमच्या मुलीला नवी मुंबई परिसरात चांगल्या मराठी शाळेत तिसरीत घालायचं आहे हे कळलं....
पण तुम्हीच खाली तुम्हाला चांगल्या वाटत असलेल्या सहा मराठी शाळांची यादी दिली आहे...
सीकेटी,महात्मा स्कूल, श्रीराम विद्यालय, मांजरा सुशीलादेवी विद्यालय, वाशीतील रयत संस्थेचे मॉडर्न स्कूल आणि फादर आग्नेल मराठी शाळा...
मग घाला की यातल्या एखाद्या शाळेत! समस्या काय आहे?

स्वानन्द's picture

9 May 2011 - 9:22 am | स्वानन्द

त्या शाळा त्यांना बाहेरून पाहता बर्‍या वाटत आहेत. पण त्या चांगल्या आहेत का... ( चांगल्या म्हणजे काय याचे निकष त्यांनी पुढे दिले आहेत. ) असे त्यांना विचारायचे आहे असे दिसते.

शिवाय या शाळांमधील विद्यार्थी संख्या हा सुद्धा त्यांच्या चिंतेचा विषय आहे असे दिसते.

पिवळा डांबिस's picture

9 May 2011 - 11:59 pm | पिवळा डांबिस

चांगली शाळा म्हणजे जेथील मुलांना ट्यूशनची गरज नाही, मास्तर तशी सक्ती करीत नाहीत , ते स्वतः शिकवण्या घेत नाहीत, त्याना पूर्ण पगार दिला जातो... फळ्यावर लिहून मुलांना फक्त उतरवून घ्या असे सांगितले जात नाही तर मनन-चिंतन-लेखन, पाठांतर असे सारे केले जाते, शाळेला मोठे मैदान आहे, सिक्युरिटी आहे, टापटीप आहे, मैदानी खेळ खेळले जातात, अवांतर उपक्रम राबविले जातात वैगेरे वैगेरे....
या सगळ्या निकषांवर उत्तीर्ण होणारी मराठी शाळा या परिसरात सापडणे मला वाटते कठीण आहे.
आणि जर तशी शाळा मिळालीच तर त्या शाळेत जाण्यासाठी बालवाडी/ पहिलीपासून मुलांची वेटिंग लिस्ट असणार त्यामुळे मध्येच तिसरीत अ‍ॅडमिशन मिळणं कठीण आहे असं मला वाटतं...
देवाक काळजी!

सहज's picture

9 May 2011 - 7:19 am | सहज

तुम्ही 'होमस्कुलींग' ह्या पर्यायावर विचार करा असे सुचवीन.

तुम्ही अथवा तुमची पत्नी किंवा घरातील एक व्यक्ती (ज्यांना वेळ आहे) घरच्याघरी पहीली ते दहावी /बारावी स्वता उत्तम शिकवू शकाल.

आता कितीतरी सामग्री उपलब्ध आहे. बरेच पालक हा मार्ग चोखाळत आहेत.

दुवा १ , दुवा २ , दुवा ३

'शाळेशिवाय शिकलेला' १४ वर्षीय सहल कौशीक आय आय टीची प्रवेश परिक्षा पास झाला. अर्थात आय आय टी म्हणजे हात टेकले असे म्हणायचे नाही पण बेस्ट ऑफ द बेस्ट फॉर युअर चाईल्ड मार्केटींगच्या जमान्यात हे उदाहरण होमस्कूलींगचा मुद्दा अधोरेखीत करायला देत आहे.

कलंत्री's picture

9 May 2011 - 7:50 pm | कलंत्री

सध्याची स्थिती जरी मराठीसाठी प्रतिकुल असली तरी असे लेख, विचारणा आणि कळकळच मराठीला परत उर्जित अवस्था आणतील यात संशय तो काय?

धूम्केतु's picture

18 May 2011 - 12:37 am | धूम्केतु

माझे स्वतःचे शिक्षण मराठी शाळेत झाले. परन्तु त्यावेळी मराठी शाळेत उत्तम शिक्षक आसत. त्यामुळे हुशार विद्यर्थी मराठी शाळेत येऊ इछीत. आता तशी परिस्थिती रहिली नाही.

अमोल केळकर's picture

18 May 2011 - 2:17 am | अमोल केळकर

बेलापूरला ( कोकण भवन ) भारती विद्यापिठ आहे
तिथे प्रयत्न करा

अमोल केळकर