अगदी शाळेपासून माझी चित्रकला बेकार होती. शिक्षक माझ्या प्रत्येक चित्राला दहापैकी ३/४ मार्क द्यावयाचे. माझ्या एका जिवलग मित्राची चित्रकला चांगली असावी कारण त्याला नेहमीच ८-९ मार्क मिळावयाचे. एकदा मी त्याला माझ्या वहीत चित्र काढावयाला सांगितले; पण त्या चित्रालाही ४ च गुण मिळाले ! आता शिक्षकांना कळत नव्हते म्हणावयाचे कीं माझा मित्र डॅंबिस होता हे अजूनही कळले नाही (शेवटी तोही भावेस्कूलचाच!). असो. सांगावयाची गोष्ट ही की माझी चित्रकला बेकारच.
नववीपासून ती बला टळली. पुढील पन्नास वर्षात चित्रकलेतील भरपूर पुस्तके गोळा केली. जगातील १५ म्युझिअमचे खंड माझ्याकडे आहेत. एक आर्ट स्टुडिओ खरेदी करून, तेथे इतरांकडून कामे करवून घेऊन, बर्यापैकी व्यवसायही केला. पण हौस म्हणून. हातात कधी ब्रश घेतला नाही. नंतर चिरंजीवांनी एक संगणक घेऊन दिला, वेळ जावा म्हणून. त्यात फोटोशॉप PS7 होता. म्हणून डेक मॅकक्लिलॅंड्चे PS 7 Bible विकत घेतले व मग फोटोशॉप शिकताशिकता लक्षात आले की, "अरे, इथे कागद, ब्रश, रंग, कंपास पेटी सगळे फुकट आहे. आपण काढलेले चित्र पाहून कुणी फ़िदीफिदी हसायच्या आधी ते पुसून टाकता येते. कितीही खाडाखोड केली तरी ती कुणाला कळत नाही. सरळ रेषा, वर्तूळ, आरामात काढता येते. इतकेच नव्हे तर कोणाही चित्रकाराचे चित्र खाली ठेऊन त्यावर ग्लास ट्रेसिंग करावे तसे आपले चित्र काढावाचा प्रयत्नही करता येतो." दुसर्या बालपणात ही कुर्हाडच मिळाली म्हणा ना. (वॉशिंग्टनला त्याच्या वडीलांनी दिली, मला माझ्या मुलाने )
फोटोशॉप तुम्हाला काय देते बघा :
(१) न संपणारे, निरनिराळ्या आकाराचे, अनेक टेक्श्चरचे ड्रॉइंगबूक.
(२) शब्दश: शेकडो प्रकारचे ब्रश. ते पसंत पडले नाहीत तर स्वत: चा ब्रश स्वत: तयार करावयाची सुविधा. उदा. एका पक्षाचे/फुलाचे चित्र काढा. त्याचा ब्रश करा. त्या ब्रशने पाहिजे तेथे एका फटकार्यात पक्षी/फुले काढा. त्यातही पाहिजे तेव्हा पाहिजे ते बदल करा. हे सगळे पाचएक मिनिटात.
(३) रंग तुम्हाला पाहिजेत तेवढे. बरे निवडलेला रंग पाहिजे तेवढा गडद/फिकाही करता येतो.
(४) खोडाखोड करणे फार सोपे. १,२,३ ...१५ स्टेप्स मागे जा. कितीही खोडलेत तरी कागद खराब होत नाही; तुम्ही काही खोडले आहे हे कळतही नाही.
(५) सरळ रेघ काढता येत नाही ? बिघडत नाही. ( तशी ती कोणालाच येत नाही म्हणा !) दोन बिंदूंमध्ये रेष काढावयाचे काम फोटोशॉपवर सोडा. तुम्हास पाहिजे तेव्हा खाली एक ग्राफ पेपर सुद्धा मिळतो. वर्तूळ, लंबवर्तूळ , पाहिजे तेवढे, पाहिजे तेथे.
(६) दोन खांब काढावयाचे आहेत ? एक काढा. त्याची कॉपी पाहिजे तेथे उभी करा. ( माझ्यासारख्या आळशी माणसाला वरदान).
(७) तुम्ही काढलेल्या (किंवा दुसर्याने काढलेल्या) चित्रातला पाहिजे तो भाग आपल्या चित्रात डकवा.
(८) आणि बरेच काही.....
हे सगळे सांगावयाचे कारण ? खाली मी काढलेली काही चित्रे देत आहे. संगणकावर, उंदीर वापरून काढलेली. तुमच्या पैकी कोणीही..परत सांगतो, कोणीही, अशी चित्रे काढू शकेल. इच्छा व वेळ पाहिजे.
शरद