कलादालनातील छायाचित्रकला... एक निरिक्षण
मिपावर या विभागात अनेक छायाचित्रकार आपली छायाचित्रे डकवत असतात. त्यांचा दर्जाही चांगला असतो. प्रतिसादावरून हेही जाणवते की वाचकांना ही चित्रे आवडतात. याचे एक कारण असे की या चित्रातील ७०-८०% च्या आसपास निसर्गचित्रे असतात. आता घनदाट झाडी, फेसाळणार्या लाटा, बर्फाच्छादित पर्वत नेत्रसुखदायक असल्याने सर्वच खुश. उरलेल्या चित्रात फुले आणि पक्षी. तेही चांगले दिसतात. आनंदी आनंद गडे....
एक लक्षात घ्या. या अशा चित्रांत वेळ, अपर्चर, स्पीड, दृष्टीकोन, थोडेफार बदलले तरी फारसा फरक पडत नाही. चित्राची आकर्षकता कायम रहाते. मग काय होते की चित्रकाराने स्वत: विचार करून, जाणीवपूर्वक चित्र काढले आहे का याचा अंदाज येत नाही. बर्याच चित्रांत कलर बॅलंस, फ़्लो. वेटेज यांचा विचार केला आहे कीं नाही असा प्रश्न चित्र काळजीपूर्वक पहाणार्याला पडतो. क्रॉपिंग किती जण करतात ? मला वाटते श्री. सूर्य यांच्या एका चित्राचे क्रॉपिंग श्री. धनंजय यांनी केले होते. तसा विचार सर्वजण करतात का ? वगैरे वगैरे .....
मला कुणाचे दोष दाखवावयाचे आहेत, टीका करावयाची आहे असे मुळीच समजू नका. श्री. धनंजय म्हणाले होते .." दहा फोटो काढले की त्यातला एक चार जणांना दाखवावयाला संकोच वाटत नाही ". सगळे असेच करत असावेत; तो फोटो येथे येतो. ठीक आहे. मलाही पहावयाला बरे वाटते. पण मला असेही वाटते की " गड्या, हे पुरेसे नाही. यात आता बदल व्हावयास पाहिजे. लाडक्या लेकराचे बोबडे बोल आईला गोड वाटतात तसे आपल्या सुहृदांचे फोटो आपल्याला छान वाटतात. याच्या पुढे जरा सरकले पाहिजे." म्हणजे नक्की काय ? "
मला सांगा, पोर्ट्रेट, स्टिल लाइफ, हाय व लो की फोटो, फोटोजर्नॅलिझ्म, ग्लेमर, ऍब्स्ट्रक्ट या सारखे अनेक विषय इथे कां दिसत नाहीत ? मान्य आहे की असले विषय वेळकाढू असतात. तुम्हाला स्टॅंड पासून फ़्लॅश, बॅकड्रॉप, शक्य असल्यास एखादा मदतनीस, वगैरे गोळा करावे लागते. मुख्य म्हणजे आपणास कसा फोटो हवा आहे याचा पक्का विचार डोक्यात हवा. तांत्रिक ज्ञान तर हवेच हवे. एकमेव सहजसुलभ गोष्ट म्हणजे कॅमेरा. हल्ल्लीचे डिजिटल कॅमेरे इतके पुढारलेले आहेत कीं तुम्हाला क्वचितच ऍक्सेसरीजची गरज भासेल. दृष्टी हवी व ती मिळवण्यासाठी मान्यवरांचे फोटो विचारपूर्वक पाहिले पाहिजेत. मला पूर्वी फोटोग्राफीवरील मासिके व पुस्तके शोधावी लागत. तुमचे काम सोपे आहे. जालावर खजिना मोफत आहे.
जर वरील गोष्टी गोळा करणे अवघड वाटत असेल तर एक कराच. फोटोशॉपची निदान जुजबी माहिती करून घ्या. जाता येता, वेळ खर्च न करता काढलेला फोटो फोटोशॉपवर बदलून घ्या. काही जणांना हे पटणार नाही. ती फसवणूक आहे असे वाटेल. पण ते खरे नाही. मी उदाहरण म्हणून दोन फोटो देत आहे. एक आहे Low Key व दुसरा Abstract. दोन्ही फोटो स्नॅप्स आहेत. म्हणजे पूर्वी ठरवून काढलेले नाहीत. हे फोटो फोटोशॉपवर बदललेले आहेत. मात्र हे फोटो अगदी असेच मी सरळ कॅमेर्यावरही काढू शकलो असतो. बराच वेळ लागला असता; एखाद दुसरा Trial-Error पद्धतीने जास्त काढावा लागला असता. पण मी नक्की काढले असते.. तेव्हा याला फसवाफसवी म्हणावयाचे कारण नाही. मी कॅमेर्यावर एक्स्पोजर कमीजास्त करू शकतो वा फोटोशॉपवर Level/Curve उपयोगात आणून तोच effect मिळवतो. मागे काळा पडदा वापरून फोटो काढला काय किंवा साधी बॅकग्राऊंड फोटोशॉपवर काळी केली काय, एकच. असे कराच असे मी म्हणत नाही पण तोही एक सोपा मार्ग आहे हे विसरू नका. हे दोन फोटो मला काय म्हणावयाचे आहे हे तुम्हाला सांगावया करिता आहेत. चांगले आहेत असा दावा नाही. असो. या विषयावर चित्रकार काय म्हणतात ते वाचणे मला नक्कीच आवडेल.
ऍबस्ट्रक्ट
Low Key
शरद
प्रतिक्रिया
24 Apr 2011 - 8:50 am | रामदास
विश्रांती छाया चित्रण बघीतले का ? मला आवडली होती म्हणून छाया चित्रकाराला आग्रह करून येथे मांडायला लावली होती. मिपावर पोर्ट्रेट हा विषय फारसा हाताळलेला दिसत नाही हे खरे आहे. तुम्ही मांडलेले दोन्ही नमुने आवडले.
24 Apr 2011 - 11:02 am | यशोधरा
पोर्ट्रेट्स -
लहान मुलगी, अजून एक, लहान मुलीचे प्रचि, म्हातारबाबा, छोटं बाळ,
धन्यवाद.
24 Apr 2011 - 5:33 pm | श्रावण मोडक
हेच शोधायचे होते. धन्यवाद.
पोर्टेटच्या पलीकडेही तुमची आणि इतरांचीही काही अशीच , निसर्गचित्रेच म्हणता येतील अशी नसणारी, शरद यांना इथं अपेक्षीत असणारी प्रकाशचित्रे पाहिल्याचे आठवते. पण आता दुवे शोधण्याचा कंटाळा आहे.
24 Apr 2011 - 11:30 am | सूर्य
दहा फोटो काढले की त्यातला एक चार जणांना दाखवावयाला संकोच वाटत नाही
बरोबर आहे. माझ्याकडुन तरी तसेच होते.
याच्या पुढे जरा सरकले पाहिजे
नक्कीच.
पोर्ट्रेट, स्टिल लाइफ, हाय व लो की फोटो, फोटोजर्नॅलिझ्म, ग्लेमर, ऍब्स्ट्रक्ट या विषयानुरुप फोटोग्राफी करावयास मला खुप आवडेल. परंतु सध्या त्या विषयातले मला काही कळत नाही. अभ्यास चालु करावा लागेल.
प्रथम मला असे वाटायचे की फोटो नॅचरली एवढा सुरेख आला पाहीजे की फोटोशॉपची गरज भासायला नको. परंतु हळुहळु लक्षात आले की बरे आलेले छायाचित्र चांगले व चांगले आलेले अजुन चांगले आपण संस्करण करुन करु शकतो. त्यामुळे फोटोशॉपच्या मुद्द्याशी सुद्धा सहमत आहे. माझ्याकडे फोटोशॉप नाही. जिंप उतरवुन घेतले आहे.
- सूर्य
24 Apr 2011 - 4:58 pm | सर्वसाक्षी
शरदराव
इथे बहुतेक लोक हौशी चित्रकार आहेत. उपकरणे व मदतनिस वगैरे दुर्लभ आहे. खस विषय घेउन चित्रे न देण्याचे कारण मला असे वाटते की चित्रे दिली जातात ती केवळ आपण काही पाहिले व आवडले तर ते सर्वांपुढे मांडावे यासाठी. अॅबस्ट्रॅक्ट वगैरे लोकांना कितपत रुचेल ही थोडी शंकाही असावी
व्यक्तिचित्रण माझ्यासारख्या माणसाने करायचे तर उपलब्ध प्रकाशात म्हणजेच बाह्यचित्रण असावे लागते. अर्थात प्रकाशाचा मेळ व डोळ्यांचा खेळ जमला तर ते चित्र बरे असे वाटते.
तुमच्या शालजोडीला माझे हे ठिगळ
24 Apr 2011 - 7:12 pm | यशोधरा
भलतंच गोड आहे पिल्लू! :)
25 Apr 2011 - 12:56 pm | धनंजय
नव्या कॅमेर्यांच्या सोयींमुळे तसा आळस होतो. म्हणजे अगदी "ऑटोमॅटिक" चित्र काढले नाही, तरी कॅमेर्यातच सात-आठ प्रीसेट असतात. म्हणजे मॅक्रो/पोर्ट्रेट/पॅनोरामा/अॅक्शन वगैरे. त्यामुळे कॅमेर्याचे छिद्र कमीजास्त करण्याऐवजी एकदा कॅमेर्याचे चक्र "मॅक्रो"वर फिरवले की चालते. फारतर एक्स्पोझर थोडेसे कमीअधिक करणे, फ्लॅश बंद करणे किंवा मुद्दामून चालू करणे (फिल-इन साठी) इतक्याच काही गोष्टी मी आजकाल लक्षपूर्वक करतो.
मात्र फोटो काढताना फ्रेमिंग करणे, आणि तयार चित्र कातरण्याकडे जास्त लक्ष देतो.
- - -
अॅब्स्ट्रॅक्ट : यात गुलाबी रंग घालण्याची निवड पटण्यासारखी आहे. मात्र गडद एकरंगी गुलाबी पट्टा जो आला आहे, तो आवडला की नाही याबाबत द्विधा अवस्थेत आहे. (पारडे "नाही"च्या बाजूला झुकते आहे.)
लो-की पोर्ट्रेट : याकरिता निवडलेले पोर्ट्रेट आणि त्यातील केसांना काळोखे करणे पटते. अशी चित्रे छापून जितकी प्रभावी ठरतात, तितकी संगणकाच्या पडद्यावर प्रभावी ठरत आही. ज्या आकारमानाचे चित्र माझ्या पडद्यावर दिसते आहे, त्या आकारमानात कॉन्ट्रास्ट-एजेस कातरेदार दिसत आहेत (उदाहरणार्थ उजव्या गालाची रेषा), तसे दिसायला नको.
25 Apr 2011 - 5:22 pm | चिंतातुर जंतू
निरीक्षणाशी सहमत. त्याहून पुढे जाऊन मी असं म्हणेन की एकंदर गुळगुळीत, गोंडस विषयवस्तूंचं चकचकीत चित्रण करण्याची आणि त्याला वाहवा देण्याची प्रवृत्ती इथे आणि इतरत्र पुष्कळ दिसते. म्हणजे प्रत्येकानं कार्तिए-ब्रेसाँ किंवा जेम्स नॅक्टवे बनलं पाहिजे असं नाही, पण रोजच्या जगण्यातल्या साध्यासाध्या गोष्टीही चित्रविषय बनू शकतात याची जाणीव झाली तरी खूप होईल असं वाटतं.
"The marvels of daily life are so exciting; no movie director can arrange the unexpected that you find in the street." Robert Doisneau.
अवांतरः फोटोशॉपची जुजबी नाही तर सखोल माहिती असणारे, पण मुळात दृश्य-संवेदनाच अतिसामान्य असणारे अनेक छायाचित्रकार माहीत आहेत; त्यामुळे तंत्रज्ञानावर स्वार होता येणं आणि त्याला आपल्या संवेदनांनुसार वळवता येणं हे महत्त्वाचं कौशल्य आहे असं म्हणावंसं वाटतं.