क्रिकेटच्या इतिहासातले चार सिंह, ज्यांनी जगातली प्रत्येक युद्धभूमी श्वास रोखायला लावणारा एल्गार करुन लढवली आहे, आणि जिथे अशक्यप्राय आव्हान आडवे आले तिथे तसलाच अशक्यप्राय प्रतिकार केलाय. आव्हानाला सामोरे जाणे आणि परिणामांची चिंता न करता लढत राहणे हा या सिंहांचा स्थायीभावच! आणि यांचा राजेशाही थाट तर अगदी पदोपदी जाणवतो. एकाच्या हाती तलवार आहे तर बाकी तिघांच्या माथ्यावर मुकुट!
आता तुम्ही विचाराल, की ये बहाद्दर शिंव्ह कौन होने का??
तर हे सिंह आहेत दोन देशांच्या लढाऊ बाण्याचे प्रतिक! श्रीलंका आणि इंग्लंड या क्रिकेटजगतातील अनुक्रमे तिसर्या आणि पाचव्या क्रमांकावरील संघांच्या बोधचिन्हात झळकणारे सिंह!
आता सहाजिकच पुढला प्रश्न येणार तो म्हणजे इंग्लंड आणि श्रीलंका यांनी असा काय भीमपराक्रम केलाय? विश्वकरंडकाच्या लढाईत तीन वेळा उपविजेते ठरलेला इंग्लंडचा संघ किंवा कुणाच्या ध्यानीमनी नसताना विश्वकरंडकाला गवसणी घालणारा आणि गतस्पर्धेत उपविजेता असणारा श्रीलंकेच्या संघ. यांना या स्पर्धेतल्या संभाव्य विजेत्यात न मोजणारा, स्वत:साठी संभाव्य हृदरोगाची सोय करुन ठेवतोय असे म्हणावे लागेल.
आता त्यापुढला प्रश्न येणार तो म्हणजे हे दोन्ही संघ संभाव्य विजेते केव्हापासून झाले?
यासाठी आपल्याला थोडं खोलात जाऊन पहावं लागेल. हे दोन्ही संघ काय आहेत, त्यांच्या जमेच्या बाजू कोणत्या, भक्कम खेळाडू कुठले आणि अजून बरंच काही!
त्यासाठी ही दोन लेखांची छोटेखानी लेखमाला.
--------------------------------------------------------------------------
श्रीलंका:
१९९२ च्या विश्वचषकापर्यंत कमकुवत मानला जाणारा आणि कायम साखळी स्पर्धेतून एक्झिट घेणारा श्रीलंकेचा संघ १९९६ मध्ये अतिशय नवनवीन अस्त्रे घेऊन स्पर्धेत उतरला होता. एक म्हणजे धुवाधार हाणामारी. खड्या बॅटचा एल्गार करणारा जयसूर्या, त्याला पुरेपूर साथ देणारा रोमेश कालुवितरणा. दुसरे म्हणजे संघातील अकरापैकी ९ जणांची आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करण्याची 'ऐपत' होती. तिसरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चिवटपणे झुंजणारी मधली फळी. आणि यांच्याच जोरावर जगातील सर्वोत्तम संघांच्या नाकावर टिच्चून १९९६चा विश्वकरंडक खिशात घालून मिष्कीलपणे हसत जाणारे रणतुंगा, डिसिल्वा, महानामा, तिलकरत्ने, चामुंडा वास, मुरलीधरन यांच्यासारखे 'जगज्जेते' खेळाडू.
१९९६ च्या वेळी पाऊस श्रीलंकेच्या बाजूने भारताविरुद्ध उभा ठाकला होता, पण २००७ च्या करंडकासाठी झालेल्या अंतिम लढतीत याच पावसाने श्रीलंकेच्या प्रयत्नांवर पाणी फिरवत ऑस्ट्रेलियाला तिसरा विश्वचषक मिळवून दिला.
यावेळी काय होईल? श्रीलंकेचा संघ १९९६ ची पुनरावृत्ती करेल? शक्यता नाकारता येत नाही!
श्रीलंकेचा २०११ विश्वकरंडकासाठीचा संघ:
१. श्रीलंकेचा कप्तान असलेला कुमार संगाकारा.
डावखुरा शैलीदार फलंदाज असलेला संगाकारा, डोळ्यात तेल घालून बॅट्समनला त्याच्या 'क्रिझ'च्या मर्यादा दाखवून देणारा यष्टीरक्षकदेखील आहे. पण सतत यष्ट्या उखडणार्या या मनुष्यास 'यष्टीरक्षक' का म्हणतात हे तो दशाननच जाणे!
२. डावखुराच, पण शैली वगैरे फाट्यावर मारून गोलंदाजांची शब्दश: पिसे काढणारा एकमेवाद्वितीय फलंदाज सनथ जयसूर्या.
याच्याबद्दल काय बोलणार!!! सगळ्या क्रिकेटजगताला दिपवून टाकणारा हा श्रीलंकन सूर्य आपल्या मॅचला उगवू नये अशी प्रार्थना जगातील प्रत्येक गोलंदाज करत असतो यातच सगळं आलं.
३. सनथ जयसूर्याच्या बरोबरीने आग ओकणारी सलामीची दुसरी श्रीलंकन तोफ म्हणजे उपुल थरंगा.
याच्या निरागस वाटणार्या चेहर्यावर जाऊ नका. सलामीच्या गोलंदाजांना मारझोड करुन घायकुतीला आणणारा श्रीलंकेचा डावखुरा स्टायलीश फलंदाज आहे हा.
४. श्रीलंकेचा आजघडीचा एक नंबर 'च्युइंगगम' फलंदाज असलेला महेला जयवर्धने.
एक बाजू चिवटपणे लावून धरुन संघाला अवघड स्थितीतून सुस्थितीत नेण्याची खासियत असणारा जयवर्धने वेळप्रसंगी अतिशय बेफाम होऊन हाणामारीसुद्धा करु शकतो.
५. टी-२० करंडक आणि आयपीएल गाजवलेला स्फोटक फलंदाज म्हणजे तिलकरत्ने दिलशान.
श्रीलंकेला अचानक गवसलेला हिरा. केवळ हाणामारी करण्यासाठीच आपला जन्म आहे अशा थाटात बॉलरला भिडणारा. आणि फलंदाजीबरोबरच चपळ क्षेत्ररक्षण आणि उपयुक्त ऑफ-स्पिनचा मारा करण्यात वाकबगार!
६. श्रीलंकेचा सर्वोत्तम आणि जगातील आजघडीच्या आघाडीच्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असणारा अँजेलो मॅथ्यूज.
मोक्याच्या क्षणी धावा करुन आणि बळी घेउन उपयुक्तता सिद्ध करणारा खेळाडू. प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्यासाठी जे खेळाडू संघात असावेत त्यापैकी एक.
७. जगातील सर्वोत्तम ऑफ-स्पिनर गोलंदाज मुथैया मुरलीधरन.
जागतिक क्रिकेटमधले सगळ्यात मिष्किल स्मितहास्य चेहर्यावर असणार्या मुरलीला ऑफ-स्पिनर का म्हणतात काही कळत नाही. फलंदाजाच्या दोन्ही बाजूंनी हातभर चेंडू वळवून त्याला जागीच कथ्थक करायला लावणारा हा जगातील ब्येष्ट कोरिऑग्राफर.
८. शब्दश: काहीही गोलंदाजी करणारा अजंथा मेंडीस.
यष्टींच्या दोन्ही बाजूंनी अचूक मारा आणि कुठल्याही दिशेला बॉल वळवण्याचं कसब असणारा मेंडीस हा मुरलीधरनचा बेस्ट बॉलिंग पार्टनर आहे.
९. श्रीलंकेच्या बॉलिंग डिपार्टमेंटचा कणा असणारा लसित मलिंगा.
लोकविलक्षण स्टाईलचा धनी असणारा मलिंगा कमीतकमी रन देऊन जास्तीत जास्त बळी घेण्यासाठी फ्येमस आहे! उगाच हॅटट्रीक करण्याची खोड अंगात असल्यामुळे लागोपाठ बळी घेण्याची हातोटी!
१०. मलिंगाच्या प्रयत्नांवर पाणी फिरु नये याची दुसर्या बाजूने पुरेपूर काळजी घेऊन त्याला साथ देणारा भरवशाचा गोलंदाज म्हणजे नुवान कुलशेखरा.
टिपिकल गोलंदाज असणारा कुलशेखरा त्याच्या अचूकतेसाठी प्रसिद्ध आहे. आखूड टप्प्यांच्या चेंडूंवर विलक्षण हुकुमत आणि नियंत्रण.
११. श्रीलंकेचा सर्वाधिक अनुभवी गोलंदाज असणारा दिलहारा फर्नांडो.
वेगवान श्रीलंकन गोलंदाज आणि हळूवार 'स्लोअर' बॉल टाकण्यात स्पेशालिस्ट. मधल्या दहा ओव्हर्स टाकण्यासाठी सध्याचा सर्वोत्तम वेगवान पर्याय.
बेंच:
या अकरा खेळाडूंशिवाय चमारा सिल्वा आणि थिलन समरवीरा यांच्यासारखे दिलखेचक बॅटींग करणारे फलंदाज,कपुगेदरासारखा स्फोटक यंग टॅलेंट, थिसारा परेरा आणि रंगना हेराथसारखे उपयुक्त गोलंदाज बाराव्या क्रमांकासाठी ठेवून बदली खेळाडूंची चांगली सोय करण्यात श्रीलंकेचा संघ यशस्वी ठरलाय.
थोडक्यात:
आठव्या क्रमांकापर्यंत व्यवस्थित फलंदाजी करण्याची ताकद.
मुरली + मलिंगा + मेंडीस = किमान २० ओव्हर्सची खराबी हे समीकरण.
दिलशान + मॅथ्यूज = फलंदाजीत ५०-६० धावा, गोलंदाजीत ३-४ बळी आणि क्षेत्ररक्षणात वाचवलेल्या किमान ३० धावा अशी सोपी बेरीज.
फक्त जयसूर्या = हताश गोलंदाज , हरवलेला बॉल, सगळी नखं कुरतडून संपवलेला प्रतिस्पर्धी कप्तान.
फक्त मलिंगा = डेड अॅक्युरेट बॉलिंग, खतरनाक यॉर्कर, रन्सचा दुष्काळ.
फक्त संगाकारा = ७०-८० धावा, किमान २ कॅचेस, आणि २०-३० वेळा यष्टी उध्वस्त केल्याने अंपायरची चिडचिड.
आपले चार पैसे:
जगातील चार बलाढ्य संघांपैकी एक. त्यामुळे सेमी-फायनलचं तिकिट नक्की. थोडासा ताणून प्रयत्न केला तर फायनल देखील गाठता येईल.
प्रतिक्रिया
18 Feb 2011 - 7:25 am | प्रीत-मोहर
मस्त झालाय लेख....और आने फो .....
18 Feb 2011 - 7:51 am | राजेश घासकडवी
श्रीलंकेच्या संघाची ओळख छानच.
मात्र मेंडीसची जादू बॅट्समनांनी ओळखल्यामुळे कमी झाली आहे, किंवा मुरलीधरनमध्ये एके काळचा भेदकपणा राहिलेला नाही असंही वाटतं.
18 Feb 2011 - 10:18 am | मृत्युन्जय
थोडक्यात पन छाण ओळख. इंग्लंड कधी आता?
18 Feb 2011 - 10:55 am | मुलूखावेगळी
भारतानंतर चा फेव संघ आहे माझा.
आनि तु छान लिहिलेस.
साउथ आफ्रिका बद्दल पन लिहिनार ना?.
18 Feb 2011 - 11:15 am | फारएन्ड
लंकेच्या आजकालच्या खेळाडूंबद्दल फारशी माहिती नव्हती. पूर्वी पेपर मधे सिरीज च्या आधी दोन्ही संघांच्या खेळाडूंचे फोटो व माहिती/स्टॅट्स यायचे त्याची आठवण झाली.
फक्त एक त्रुटी म्हणजे जयसूर्या या संघात नाही. अर्थात त्यांच्याकडे अचानक क्रीडामंत्री आज्ञा देउन एखाद्याला संघात आणतात. त्यात हाच खुद्द पार्लमेंटचा मेम्बर असल्याने अजूनही काहीही होउ शकते :)
18 Feb 2011 - 1:54 pm | गणपा
मस्तच.
आता त्या उरलेल्या ३ शिंव्हांची पण लगेच ओळख करुन द्या. :)